यूं तो है हमदर्द भी...(२)

बहुगुणी's picture
बहुगुणी in जनातलं, मनातलं
3 Jan 2011 - 10:16 pm

या आधीचा कथाभाग

नवनवीन उपकरणं विकसित करण्यात गुंतल्याने संजयची आणि संपदाच्या शिक्षणात आणि स्वत:च्या शालेय कामात गुंतल्याने पद्माची जवळजवळ चार वर्षं कशी निघून गेली ते कळलंच नाही. मधल्या कालावधीत दोनदा घरच्यांचीच अमेरिकेत वारी झाल्याने भारतात जाणंही राहूनच गेलं होतं. त्यामुळे या सुटीत, निदान सीझनचे शेवटचे का होईना, हापूस आंबे चाखायचे, आणि भरपूर मित्र-मंडळींना भेटून घ्यायचं हे ठरवूनच संजय-पद्मा निघाले होते.

**********
**********

प्रवासाला आठवडाच राहिला असतांना एकदा संध्याकाळी पद्मा म्हणाली, 'थोडासा ताप वाटतोय रे, मी जरा पडते, तू घेशील का जेवून संपदाला वाढून देऊन? मला भूकही नाहीये फारशी. संपदाला काल स्कूलमधून घेऊन येतांना तिची ती मैत्रीण आहे ना, ल्यूसी, ती जोरदार शिंकत होती आमच्या बरोबर चालतांना, मी व्हायरस घेतला बहुतेक तिच्याकडून, वाटेल उद्यापर्यंत बरं, नाहीतरी शनिवार आहे उद्या, आराम केला की होईल बरं.' तरीही संजयने तिला थोडासा मऊ तूप-मीठ भात खायलाच लावला आणि ती झोपली. दोन दिवसांत ताप थोडा कमी झाला, पण थकवा खूपच वाटत होता तिला. प्रवास चारच दिवसांवर आलेला, म्हणून तिला आराम करायला लावून संजयनेच वेळ काढून भारतात जाण्यासाठीची खरेदी आटोपली. शनिवारी संध्याकाळी बॅगा भरून, संपदाची न थांबणारी टकळी ऐकत दोघे विमानतळाकडे रवाना झाले.

विमान प्रवासात प्रज्ञाचा ताप तसा थोडाच राहिला पण जवळ जवळ १५ तास झोपेचा प्रयत्न करूनही थकवा काही केल्या कमी वाटत नव्हता तिला. 'घरी पोहोचलो आणि जरा आराम केलास की वाटेल बरं' असं म्हणून संजयने तिची समजूत काढली.

संजयच्या आईंना बरोबर घेऊन मुंबई जवळच ठाण्यात राहणारे पद्माचे आई-नाना आले होते एअरपोर्ट वर घ्यायला. बरोबर संपदाची एकुलती एक मावशी असलेली पद्माची धाकटी बहिण नेहाही होती. संपदा बाहेर आल्यावर एकदम चिकटलीच नेहाला जाऊन,"मावशी! मी केंव्हाची वाट पहातेय तू कधी भेटणार म्हणून!"
"ओह माय गॉड, कसलं गोड मराठी बोलतेस गं तू?" नेहा चीत्कारली. "मग, तुला काय वाटलं? मी खूप गाणी पण म्हणून दाखवेन तुला, मला येतात, तुला येतात?"
"अगं ताई, कसली मस्त मराठी बोलतेय ही!" नेहा प्रज्ञा कडे पहात म्हणाली. प्रज्ञा अभिमानाने संपदाकडे पहात म्हणाली, "अगं आम्ही दोघेही तिच्याशी घरी फक्त मराठीतच बोलतो, शाळेत आहेच की इंग्लिश."

दादरला पहिल्या मजल्यावरच्या घरात प्रवेश करतांना संजयच्या आईंनी त्यांना क्षणभर बाहेर थांबवून पोळीचा तुकडा ओवाळून टाकला तिघांवरून, आणि 'आता या आत' म्हणाल्या. घरी गेल्यावर संपदाच्या भोवती रुंजी घालणाऱ्या लहान-थोरांशी बोलतांना excitement मध्ये पद्मा स्वत:चं दुखणं काही तास विसरून गेली. आईंशी, आई-नानांशी, नेहाशी - भरपूर गप्पा मारल्या तिने, जेवणं संपल्यावर मध्य रात्रीच्या बर्‍याच नंतर केंव्हा तरी आई-नाना, नेहा आणि इतर शेजार-पाजारची मंडळी आपापल्या घरी निघाली. जातांना पद्माच्या आईंनी संजयच्या आईंना सांगितलं, "तुम्हीही या हं संजूच्या आई बुधवारी, ती बाजूची जागाही पाहून होईल." दादरला एकटं राहण्यापेक्षा आता त्यांनी ती जागा विकून टाकून ठाण्याला पद्माच्या आई-नानांच्या जवळच तयार होत असलेल्या इमारतीत जागा घेऊन सोबतीने राहावं अशी सर्वांची इच्छा होती, "हो, येईन ना, बघुयात ती जागाही," आई म्हणाल्या. सारे ठाणेकर निघाले. दार लावल्यावर आई म्हणाल्या, 'झोपा आता, काही सकाळी उठायची घाई नाहीये, रखमाला सांगितलंय मी साडेआठ-नवापर्यंत येऊ नकोस म्हणून.'

पुढचे दोन दिवस फार नाही तरी थोडी थोडी लोकं येतच राहिली संजय-पद्माला भेटायला, काही त्यांचे आय आय टी च्या मित्र-मैत्रिणी, काही इतर ओळखीचे, आणि संजयचा जवळचा मित्र शेखर आणि त्याची बायको स्नेहा. शेखरने तीन आठवड्यांसाठी त्याची गाडी देऊ केली, म्हणाला, "आम्ही दिल्लीला जातोय तीन आठवडे, तेंव्हा मला काही लागणार नाहीये, नुसती माझ्या बिल्डींग खाली पडून राहण्यापेक्षा तुझी सोय होईल." संजय आढेवेढे घेतो आहे हे पाहून तो म्हणाला "हे बघ, भाडं वगैरे फालतू गोष्टी बोलूच नकोस! तुलाच अगदीच अवघड वाटत असेल तर ड्रायव्हरला वरचे पैसे तू दे तुला द्यायचे ते. फक्त, मी त्याला पगारही देतोय आणि रुपयांत कमावून देतोय -डॉलर्स मध्ये नव्हे, एव्हढं लक्षात ठेव, तेंव्हा फार चढवून ठेवू नकोस! ओके?"

बुधवारी आई-नानांकडे ठाण्याला जायचं ठरलं होतं आठवडा संपेपर्यंत, पण पद्माला अगदीच निरुत्साही, शीण आल्या सारखं झालं होतं. आई म्हणाल्या 'डॉ. लिमयांकडे जाऊन ये कोपर्‍यावरच्या, चांगला गुण आहे त्यांच्या हाताला, आणि विनाकारण भरमसाठ औषधं देत बसत नाहीत ते, आराम कर उद्या. परवा बघ चांगली व्यवस्थित जाऊ शकशील ठाण्याला.' संजय तिला घेऊन जाऊन आला डॉक्टरांकडे. साठीच्या डॉ. लिमयांनी तिला तपासून झाल्यावर ब्लड टेस्ट, युरीन टेस्ट वगैरे करून घेतली, 'हे रिपोर्टस् उद्या आल्यावर नक्की काय ते कळेल, व्हायरल इन्फेक्शन असावं बहुधा, तसं असेल तर self-limiting असेल. पण तरीही इतका थकवा यायचं कारण नाही.... पाहूयात काय रिपोर्टस् आहेत ते उद्या, फोन करतो मी ते आले की.'

रिपोर्टस् मध्ये काही खास निघालं नाही. डॉ. लिमये फोन वर पद्माला म्हणाले, "ESR -erythrocyte sedimentation rate - थोडा जास्त आहे, तुझ्या वयात साधारणपणे १५-२० असायला हवा तो ३५ आहे, पण तो नॉन-स्पेसिफिक इंडिकेटर आहे इनफ्लमेशनचा, कुठेतरी इनफ्लमेशन आहे, सद्या तरी obvious spot नाहीये, म्हणजे मला कुठे गाठी वगैरे जाणवल्या नाहीत, पण इनफ्लमेशन per se वाईट नाही, ती आपल्या शरीरातली protective immune mechanism आहे, बरेचदा इन्फेक्शन असलं - अगदी सब-क्लिनिकल असलं- तरीही वाढतो ESR.... अरे, पण मी हे तुला का सांगतोय? संजयच्या आई म्हणत होत्या की तू चांगली पोस्ट-ग्रॅज्यूएट आहेस बायोटेक्नॉलॉजीत... sorry बरं का!"

"छे हो डॉक्टर, immunology त बोंब होती माझी! तेंव्हा तुम्ही समजावून सांगताहात ते बरंच आहे," पद्मा म्हणाली " मग काय करू म्हणताय?" "काहीही करू नकोस, आराम कर, शनिवारपर्यंत बरं वाटेल, मग जा ठाण्याला," डॉक्टर म्हणाले. दोन दिवस खरंचंच झोपून काढायला लावले तिला आईंनी, शनिवारी संध्याकाळ पर्यंत बरीच फ्रेश झाली. मग शेखरची गाडी घेऊन ते चौघे ठाण्याला पोहोचले. दोन-अडीच दिवस मस्त पाहुणचार झाला, भरपूर आंबे खाऊन झाले, तलाव पाळी वर भटकून झालं, गडकरी रंगायतन मध्ये नाटक पाहून झालं, मामलेदारची मिसळ खाऊन झाली, नेहाचं संपदाला टीकुजी-नी-वाडी हुंदडून आणणं झालं, आणि आईंसाठी तो शेजारच्या इमारतीतला flat ही पाहून झाला, त्यांना तो आवडल्याचं त्यांनी सांगितल्यावर सगळेच खूष झाले.

(क्रमशः)

*****************************************


- बहुगुणी

कथाविचार

प्रतिक्रिया

धमाल मुलगा's picture

3 Jan 2011 - 10:24 pm | धमाल मुलगा

लागली का आता रुखरुख..काय झालं असेल-काय झालं असेल म्हणून!
:(

मलाही रुखरुख लागलीये.
आजकाल तर धसकाच येतो.

जाई अस्सल कोल्हापुरी's picture

3 Jan 2011 - 11:44 pm | जाई अस्सल कोल्हापुरी

लवकर पुढचा येउ दे !

वाहीदा's picture

5 Jan 2011 - 7:27 pm | वाहीदा

वाचताना हूरहूर लागली पण लेखन आवडले !