यूं तो हैं हमदर्द भी

बहुगुणी's picture
बहुगुणी in जनातलं, मनातलं
3 Jan 2011 - 4:26 am

घरासमोरून निघतांना डावी-उजवीकडे एकदा बघून घेऊन संजयने गाडी रिकाम्या रस्त्यावर वळवली, वेग घेण्याआधी किंचित थबकून खिडकीतून डावीकडे नजर टाकत घराकडे पाहिलं, दार बंद होतं पण बाहेरच्या बैठकीच्या खोलीच्या खिडकीत पद्माचा चेहेरा आणि हलता हात दिसला. त्याने हसर्‍या चेहेर्‍याने हात केला, टर्न इंडिकेटर बंद केला आणि गाडीला वेग दिला. 'आज सकाळीच वेळ मिळाला की डॉ. गानूंना फोन करावा....मुंबईत असणार त्या आज, सेल फोनवरच गाठावं लागणार. जिम ला ही फोन करावा लगेचच.. '

************
सकाळी गाणं गुणगुणत त्याने आंघोळीला शॉवर चालू केला आणि थेंबभर शँपू हातात घेतला. डोक्यावर फेस पसरवत असतांना त्याला पुन्हा एकदा आपलं वाढतं वय जाणवलं, 'धत्तेरी तो! शँपू ज्यादा, बाल कम! आयला, चाळीशी नाही आली अजून तर ही अवस्था आहे, लवकरच अनुपम खेर होणार माझा!' आंघोळ संपेपर्यंत संजयच्या डोळ्यांपुढून गेले सहा महिने झर्रकन तरळून गेले....

************
दहा जून ते तेवीस ऑगस्ट असा चांगली अडीच महिन्यांचा समर ब्रेक होता संपदाचा, म्हणून आधीपासून प्लॅन करून तिला घेऊन संजय आणि पद्मा दहा जूनला भारतात निघाले. सात वर्षांपूर्वी सिंगापूरला तिचा जन्म झाला तेंव्हा आई-बापांच्या नावांची आद्याक्षरं घेऊन नातीचं नाव 'संपदा' ठेवावं असं पद्माच्या वडिलांनी - नानांनी - सुचवलं होतं, पद्माच्या आई आणि संजयच्या आई या दोघींना आणि संजय-पद्मालाही ते आवडलं आणि परदेशात उच्चारायलाही सोपं जाईल असं वाटलं म्हणून त्यांनी होकार दिला होता. त्यानंतर तीन वर्षांनी अमेरिकेत आले तेंव्हा प्री-केजी मध्ये संपदाचं 'सँपदा' झालं तेंव्हाही त्यांना फारसं वावगं वाटलं नाही. सिंगापूरला असतांना नातीची आजी-आजोबांशी वर्षातून दोनदा भेट व्हायची, पण गेल्या चार वर्षांत फक्त एक-एकेकदाच ते भेटले, तेही एकदा तीन वर्षांपूर्वी संजयच्या आई अमेरिकेत आल्या तेंव्हा आणि पुढच्या वर्षी आई-नाना आले तेंव्हा. म्हणून या वेळचं संपदाचं भारतात जाणं हा घरच्या सर्वच नातेवाईकांसाठी सोहोळाच होता.

मुंबई आय आय टी मधून आधी बायोएंजिनीअरींग मध्ये एम टेक आणि नंतर डॉक्टोरेट मिळवल्यावर सिंगापूरला संजय सीमेन्स कंपनीत त्यांच्या हेल्थकेअर डिव्हिजन मध्ये बायोमेडिकल एंजिनीअर म्हणून रुजू झाला. आय आय टी मध्ये असतानाच बायोटेक्नोलोंजी मध्ये एम एस सी संपवत असलेल्या पद्माचं आणि त्याचं सूत जुळलं होतं, उभयतांच्या कुटुंबियांच्या संमतीने दोघांनी वैवाहिक जीवनाला सिंगापुरमध्येच सुरुवात केली. सुरूवातीला पद्माने तिथल्या नॅशनल युनिव्हर्सिटी मध्ये रिसर्च फेलो म्हणून वर्षभर काम केलं, पण त्यानंतर संपदाचा जन्म झाला आणि तिच्याकडे आधिक लक्ष देता यावं म्हणून पद्माने स्वेच्छेने 'होममेकर' व्हायचा निर्णय घेतला. त्यानंतर दोनच वर्षांत संजयच्या 'डायग्नॉस्टिक डिव्हायसेस डिव्हिजन' मधल्या कामातल्या निपूणतेकडे पाहून कंपनीने त्याला intra-company transfer वर अमेरिकेत इलिनॉय मधल्या डिअरफील्ड इथल्या 'डायग्नॉस्टिक सोल्युशन सेंटर' मध्ये पाठवलं.

डिपेंडन्ट L2 व्हिसा वर असलेल्या पद्माला वर्क परमिट मिळेपर्यंत वर्ष लागलं, तोपर्यंत घर स्थिरस्थावर झालं होतं. वेळ मिळेल तशी पद्मा संपदाच्याच शाळेत volunteer म्हणून काम करायची, तेवढंच संपदाकडे लक्ष ठेवता यायचं. वर्क परमिट मिळाल्यावर तिने मग तिथेच बायॉलॉजीच्या शिक्षिकेची नोकरी स्वीकारली. मूळच्याच उत्साही स्वभावाची पद्मा तिच्या नव-नव्या उपक्रमांमुळे शाळेत विद्यार्थ्यांमध्ये तसंच शिक्षक-पालकांमध्येही अल्पावधीतच लोकप्रिय झाली. तिला चित्रं काढायची आणि रंगवायची लहानपणा पासून आवड, त्यामुळे बायॉलॉजीचे क्लासेस घेतांना विद्यार्थ्यानाही तिने आत्मीयतेने tissues, organ systems वगैरे शिकवायला घेतले आणि त्यांना ते आवडलेही. सुरूवातीला जरी कठीण गेलं तरी पुढे तिथल्या थंडीची त्यांना सवय झाली, आणि ते गावही आवडलं. आधी वर्ष भर अपार्टमेंटमध्ये राहून, नंतर एक छोटंसं भाड्याचं घर मिळालं शाळेजवळच्याच sub-division मध्ये, तिथे मूव्ह झाले ते. वीकेंड्स ना वेळ मिळेल तसं तासाभराच्या अंतरावरच्या शिकागो मध्ये - विशेषतः तिथल्या डिव्हॉन अ‍ॅव्हेन्यू वरच्या 'देसी कॉरिडॉर' मध्ये - जायचं आणि मनसोक्त खाबूगिरी करून यायची, याचीही सवय झाली. संजयच्या कामातील प्रगतीचा आलेख चढताच राहीला, मायक्रोमेकॅनिकल सेन्सर्स चा वापर करून एकाच वेळी अनेक रोगलक्षणांचं मॉलेक्युलर डायग्नॉसिस करू शकेल असा एक नवीन डायग्नॉस्टिक अ‍ॅरे -नॅनोअ‍ॅरे- त्याने आणि त्याच्या सहकार्‍यांनी विकसित केला होता. विशेषत: कर्करोगासाठी असणाऱ्या या उपकरणाचं बरंच कौतूक झालं आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर एक-दोन परिसंवादांमध्ये त्याने भाषणंही ठोकली. नॅनोअ‍ॅरे विषयी वैद्यकीय व्यवसायिकांमध्ये प्रसिद्धी व्हावी म्हणून कंपनीने सादर केलेल्या अनेक चर्चासत्रांच आयोजनही त्याने समर्थपणे सांभाळलं.

नवनवीन उपकरणं विकसित करण्यात गुंतल्याने संजयची आणि संपदाच्या शिक्षणात आणि स्वत:च्या शालेय कामात गुंतल्याने पद्माची जवळजवळ चार वर्षं कशी निघून गेली ते कळलंच नाही. मधल्या कालावधीत दोनदा घरच्यांचीच अमेरिकेत वारी झाल्याने भारतात जाणंही राहूनच गेलं होतं. त्यामुळे या सुटीत, निदान सीझनचे शेवटचे का होईना, हापूस आंबे चाखायचे, आणि भरपूर मित्र-मंडळींना भेटून घ्यायचं हे ठरवूनच संजय-पद्मा निघाले होते.

(क्रमशः)

कथाविचार

प्रतिक्रिया

गोगोल's picture

3 Jan 2011 - 5:00 am | गोगोल

येउ द्यात अजुन पटापट

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

3 Jan 2011 - 5:25 am | निनाद मुक्काम प...

सुंदर सुरवात झालेली आहे .
पु ले शु

पुढील लेखनाची वाटत पाहत आहे, बहुगुणींच्या दर्जेदार लेखनाची ओळख असल्याने उत्सुकता वाढली आहे.

अरुण मनोहर's picture

3 Jan 2011 - 6:06 am | अरुण मनोहर

वाचतो आहे.पुढचे भाग लवकर येऊ द्या.

वाहीदा's picture

3 Jan 2011 - 5:06 pm | वाहीदा

पण क्रमशः मुळे पुढचे भाग कधी वाचायला मिळणार या प्रतिक्षेत ...

अतिशय छान सुरुवात आहे, माझ्या सारखं क्रमशः लिहुन प्रतिक्षा वाढवली आहे, त्याबद्दल धन्यवाद.

हर्षद.

यशोधरा's picture

3 Jan 2011 - 12:01 pm | यशोधरा

वाचत आहे..

पर्नल नेने मराठे's picture

3 Jan 2011 - 12:17 pm | पर्नल नेने मराठे

कधी नव्हे ते वाचायला घेतले न क्रमश मधे आले :(

विसोबा खेचर's picture

3 Jan 2011 - 12:44 pm | विसोबा खेचर

और भी आने दो..

नंदन's picture

3 Jan 2011 - 2:18 pm | नंदन

वाचतो आहे....

रेवती's picture

3 Jan 2011 - 7:13 pm | रेवती

नेहमीप्रमाणेच छान लेखन.
पुढच्या भागाची वाट पहात आहे.

धमाल मुलगा's picture

3 Jan 2011 - 7:20 pm | धमाल मुलगा

बहुगुणींची कथा म्हणजे...बहुगुणी कथाच की. :)
वाट पाहतोय देवा...येऊद्या.

बहुगुणी's picture

3 Jan 2011 - 10:18 pm | बहुगुणी

पुढील भाग आजच टाकला आहे.

सर्वांना नव-वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!