"घेऊन जा"
"घेऊन जा? अरे कमीत कमी ५०-६० हजार असतील ते"
"शो मागून अजून पैसे घालवायची इच्छा नाही माझी"
"तुझी इच्छा. सत्ती टॉपवर येवढे पैसे जिंकणारा मी पहिला असीन बहुदा जगात"
"सत्ती टॉप ? तुझ्याकडे तीन राजे आहेत. आणि माझ्याकडे ३ गुलाम"
"आपण दोघेही ब्लाईंड खेळतोय मिस्टर. स्टील यू आर सो शुअर ?"
"मी सांगितलेली पाने निघाली नाहीत तर आत्ता टेबलवर आहेत तेवढेच अजून पैसे माझ्याकडून घेऊन जा"
समोरच्या तरुणानं घाईघाईने त्याच्या पुढची पाने पालथी केली. तीन गुलाम... समोरचा तरुण डावा गाल उडवत छद्मीपणाने हसला. आता तरुणानं स्वतःच्या पुढची पाने उलटी केली. सत्ती आणि दोन पंजा. दोघांची पाने न बघता सांगण्याचा गाढवपणा करणार्य तरुणाचे डोळे आता खोबणीतून बाहेर यायचे बाकी राहिले होते.
"बाळा, काय नाव काय तुझे ?"
"हं.. हंगीर खान. नाही नाही जहांगीर खान"
"पुन्हा पाने लावशील तेव्हा आजचा दिवस कायम लक्षात ठेवशील. तू चड्डीत चिंचोके घेऊन हिंडायचासना तेव्हा हा फिरोज इराणी दो का पाच करायला शिकला होता." हसत हसत फिरोजनी नोटा खिशात कोंबल्या आणि तो 'जस्ट चिल' च्या बाहेर पडला. घड्याळात बघितले तर रात्रीचा दीड वाजला होता. येवढ्या लवकर फिरोज घरी गेला असता तर त्याला बघून वॉचमन सुद्धा चक्कर येऊन पडला असता.
विचारांच्या नादात फिरोजने त्याची रेसर बाहेर काढली आणि त्याचवेळी मागून सुसाट वेगाने येणारी बेंझ त्याच्या गाडीला चाटून पुढे गेली. बेंझच्या मागेच एक पांढरी व्हॅन सुसाटत होती. क्षणात घडलेल्या घटनेने फिरोज चक्रावला पण त्याने लगेच स्वतःला सावरले. नो डाऊट त्या बेंझचा पाठलाग होत होता आणि फिरोजचा अंदाज चुकत नसेल तर काही सेकंदातच त्याने रिव्हर्स मिरर मध्ये मारलेल्या नजरेने बेंझ मध्ये एक तरुणी टिपलेली होती. संकट आणि ते हि एका तरुणीवर... उत्साहाने नुसता सळसळला फिरोज. क्षणात त्याची रेसर दोन्ही गाड्यांच्या मागे सुसाट सुटली.
काही वेळातच बंद पडलेली बेंझ आणि तिला धडकून थांबलेली व्हॅन फिरोजच्या नजरेत शिरली. अंधार जरी जास्ती होता तरी स्ट्रीट लाइटमध्ये एक तरुणी आणि तिला घेरून असलेले पाच जण स्पष्ट दिसत होते. अब आयेगा मजा. आरामात शीळ वाजवत फिरोज खाली उतरला. तोवर त्याच्या थांबलेल्या गाडी कडे कोणाचे तरी लक्ष गेले असावे. हातात गन सावरतच एक जण पुढे आला. "
"नीघ चल.."
"कुठे?"
"कुठे काय? अबे नीघ इथून नाहीतर सहा भोक पाडून ठेवीन"
"कुठे?"
"*** दुसरे काय बोलता येते का नाही?"
"दुसरे काय?" त्याच्या चिडण्याची फिरोजला गंमत वाटत होती. भवतेक नवशिका असावा. "अरे.." असे म्हणत फिरोजनी तरुणाच्या डाव्या हाताला बघितले आणि तो फसला. त्याने मान वळवली आणि दुसर्याच क्षणी त्याचे पिस्तूल फिरोजच्या हातात होते. "चल तुझ्या मित्रांना भेटून येऊ" फिरोज त्याच्या गळ्यात हात टाकत म्हणाला. भकास नजरेने फिरोजकडे बघत तो तरुण पाय ओढत निघाला.
लाजवाब... एकाच शब्दात त्या तरुणीचे वर्णन होत होते. गोल चेहरा, नाजुक जिवणी आणि काळेभोर डोळे. थोडीशी बंगाली झाक चेहर्यात जाणवत होती. तरुणी तयारीची असावी, येवढ्या गुंडांनी घेरलेले असूनही ती शांत वाटत होती. फिरोजला दरडावायला आलेला बहुदा त्या नवशिक्यांचा नायक असावा, कारण इतरांकडे फक्त गुप्ती. हॉकी स्टिक येवढेच दिसत होते. त्यात फिरोजच्या हातात पिस्तूल बघून ते हंटर बघून हवालदिल झालेल्या गुलामासारखे दिसत होते.
"लहान मुलांनी रात्रीचे बाहेर हिंडू नये, कोणी शिकवले नाही का तुम्हाला... ?" फिरोज आपले शब्द पूर्णं करत असतानाच एकाने वेड्यासारखी हालचाल केली. त्याची हॉकी स्टिक सुसाट वेगाने फिरोजच्या मनगटाकडे वळली. फिरोज सावधच होता, दुसर्याच क्षणी त्याने ती हॉकी स्टिक पकडून त्या तरुणाला आपल्याकडे ओढले. पुढल्याच क्षणी फिरोजच्या डोक्याची आणि त्याचा नाकाची प्रेमळ भेट झाली. दोन्ही बुबुळं नाकापाशी आणून तो तरुण खाली कोसळला. त्याचा चेहरा बघून फिरोज अक्षरशः वेड्यासारखा हसायला लागला. "पुढच्या वेळी मी डोकेच वापरीन असे नाही, सर्वांनी त्या तरुणीपासून लांब जाऊन उभे राहा. गाडीची किल्ली माझ्याकडे फेका." फिरोजच्या हुकुमाची क्षणात अंमल बजावणी झाली. गाडीची किल्ली मात्र गाडीतच असल्याने फिरोजला नाईलाजाने गाडीकडे जावे लागले. पिस्तूल खिशात ठेवून फिरोजने गाडीच्या इग्निशनला हात घातला आणि त्याच बेसावध अवस्थेत तो फसला.गाडीत अजून कुणीतरी होते... दुसर्याच क्षणी फिरोजच्या डोक्यावर घणघणाती घाव बसला आणि बधिर अवस्थेत फिरोज गाडीला धडकून मागे सरकला. त्याला पडलेले पाहताच आता सगळी टोळीच उस्ताहाने फिरोजवर तुटून पडली. एकाचवेळी सहा जणांचा मार फिरोजला तसा जड न्हवता, पण डोके आधीच सुन्न झालेले आणि तो कोणत्याही क्षणी बेशुद्ध पडण्याच्या अवस्थेत असताना प्रतिकार तरी कसा करणार ? फिरोज होता म्हणून निदान अजून डोळे तरी उघडे ठेवून होता. तेवढ्यात एकाने सर्रकन गुप्ती काढली आणि फिरोज चमकला. आता काहीतरी केलेच पाहिजे होते. अशा पावशेर गुंडांच्या हातून मरण्यासाठी फिरोज जन्माला आला न्हवता. फिरोजने चपळाईने हालचाल करण्याच्या प्रयत्न केला मात्र डोक्यातून एक प्राणांतिक वेदना त्याच्या अंगभर पसरली आणि तो पुन्हा कोसळला. शेवटाच्या जाणीवेने फिरोजने गच्च डोळे मिटून घेतले आणि ......
आणि त्याचवेळी सहा जणांचे केकाटणे एकदमच कानावर पडले. प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर फिरोजने डोळे उघडले. स्ट्रीट लाइटच्या उजेडात त्याला त्याच्या आणि त्या सहाजणांच्या मध्ये उभी असलेली एक पहाडी आकृती जाणवली. वार्याने तिच्या मानेपर्यंत आलेले केस सुलसुळत होते. अंधुकशा उजेडातही प्रमाणबद्ध शरीर डोळ्यात भरत होते. फिरोजला उठवण्यासाठी त्या व्यक्तीने आपला हात त्याच्या पुढे केला. त्याच्या हाताचा आधार घेऊन उठत असतानाच फिरोजला ती वेदना पुन्हा जाणवली आणि तिचा शेवट होत असतानाच त्याची शुद्ध हरपली.
सकाळी स्वच्छ जाग आली ती प्रशस्त हॉस्पिटलच्या रूम मध्येच. "गुड मॉर्निंग, कसे वाटतंय आता?" कालचीच तरुणी त्याच्या पलंगाच्या कडेला बसली होती.
"मस्त.. पण मी इथे ?"
"हो. काल तुम्ही बेशुद्ध पडलात आणि माझी गाडी बंद. शेवटी आम्ही तुम्हाला तुमच्याच गाडीत घालून इकडे घेऊन आलो."
"थँक्स. पण आम्ही म्हणजे? मला माझ्या उपकारकर्त्यांची नावे कळतील का?"
"मी रमी, रमी चक्रवर्ती..."
"आणि मी दारा बुलंद...." दाराच्या दिशेने एक आवाज गर्जत आला.
(क्रमशः)
(परवा अचानक सु. शि. चे चारही नायक एकाच कथेत गुंफता आल्यास काय धमाल येईल असे वाटले. आमचे परम मित्र / हितचिंतक धमाल मुलगा व असुर ह्यांनी हि कल्पना नुसती उचलूनच धरली नाही तर लिखाणात देखील साहाय्य केले. ह्या दोघांचे मनःपूर्वक आभार)
प्रतिक्रिया
15 Dec 2010 - 4:00 pm | निनाद मुक्काम प...
वाचतोय
येऊ दे पुढचा भाग लवकर
15 Dec 2010 - 5:39 pm | असुर
सुहास शिरवळकरांच्या ज्या चार नायकांची परा गोष्ट लिहीतोय, त्या चार नायकांविषयी चार शब्द लिहीण्याची अपार इच्छा झाल्याने हा प्रतिसाद. सु.शि. (दुर्दैवाने) ज्यांना माहीती नाहीत, अशा वाचकांसाठी या चारही हिरोंना अचानक खूप सार्या गोष्टी एकाचवेळी करताना पाहून आचंबा वाटेल खरा, तो आचंबा स्ट्रीमलाईन करायचा हा प्रयत्न आहे. बाकी कथेद्वारे (आणि पटापटा लिहून) परा तुम्हाला आचंबित करीत राहीलच याची खात्री!
दारा -
'दारा हिम्मत बुलंद' असं दणदणीत नाव असणारा दणदणीत हिरो. राजस्थान हे याचं कार्यक्षेत्र. पण तो राजस्थानपुरता बांधलेला नाही. व्हिलन्सच्या पाठलागावर चंबळ, माळवा, इतकंच काय तर पाकिस्तानात देखील जाऊन आलाय! राजस्थानातील प्रत्येक तरूणीचा मानलेला भाऊ, कधीही कुणालाही मदत करायला तत्पर असा दारा सव्वासहा फूट उंच आहे, आणि अमानवी ताकदीचा आहे. या दाराचे ३ जीवाभावाचे मित्र त्याला त्याच्या कामात मदत करत असतात. त्यापैकी 'मधुर' या टीमचा ब्रेन आहे (आणि दाराच्या बहीणीचा 'सलोनी'चा हिरोही), 'शीतल' शस्त्रविद्येत पटाईत आहे, आणि 'बादल' मार्शल आर्टस आणि फ्रीस्टाईल मध्ये पारंगत!
बॅरिस्टर अमर विश्वास -
पदवीवरुनच लक्षात आलं असेल की अमर हा पेशाने वकील आहे. कोर्टरूममध्ये याला अजूनतरी कोणी चकमा दिलेला नाही! अडीअडचणीतल्या अशीलांच्या केसेस तो जीवापाड मेहेनत घेऊन आणि प्रसंगी स्वत:चा जीव धोक्यात घालून सोडवतो. पण 'सत्याचा पाठपुरावा करणे' हे त्याचे तत्व आहे, त्यामुळे तो उगाच कोणाचेही वकीलपत्र घेत नाही. वकीली हा त्याचा पेशा असला तरी त्याने त्याचा धंदा केलेला नाही. 'गोल्डी' हा अमरचा मित्र आहे, आणि एक डिटेक्टीव्ह एजन्सी चालवतो. वेळोवेळी अमरला मदत करणे हे त्याचे आवडते काम आहे. पण जिथे कुठे जान का खतरा असेल तिथे गोल्डीचा जीव धोक्यात घालण्याऐवजी अमर स्वत: तिथे पोहोचतो 'रातों का राजा' बनून! पण त्याचा हा 'आयडी' फक्त वाचकांनाच माहीती आहे.
मंदार पटवर्धन -
'पटवर्धन' या आडनावातूनच मंदारचे सगळे गुण प्रकट होतात. म्हणजे तो स्मार्ट आहे, मुंबईकर आहे, एकदम हिरो मटेरियल आहे आणि पेशाने डिटेक्टीव्ह आहे. प्रिन्स आणि डॅनी या मित्रांना मदतीला घेऊन मुंबईतले गुंड पिसणे, टोळ्या उध्वस्त करणे आणि उरलेल्या वेळात 'रमी'बरोबर (रमोला चक्रवर्ती, अर्थात मंदारची गर्लफ्रेंड) चकाट्या पिटत फिरणे हा याचा उद्योग! कमिशनर केतकरांचा भाचा असल्याने फोलिसमध्ये लैच ओळखी आहेत याच्या. दिनेश सायगल नावाचा तडफदार इन्स्पेक्टर हा मंदारचा मित्र.
फिरोज इराणी -
या चारही लोकांमधला सर्वात इरसाल मनुष्य! लहानपण अतिशय गरीबीत आणि मुंबईच्या झोपडपट्ट्या आणि फुटपाथवर गेल्याने जीवनाचे वास्तव जवळून पाहीलेला. आणि त्यामुळेच कुणालाही मदत करताना कायदा, सुव्यवस्था, पोलिस वगैरेची पर्वा न करणारा अतिशय बेदरकार हिरो! सुरुवातीची काही वर्षे फिल्मलाईनमध्ये स्टंटमन म्हणून काम केरताना अनेकविध मारामार्या आणि शस्त्रे शिकावी लागली त्याचा त्याला पदोपदी फायदा होतोय. रहीमचाचाने बनवलेल्या 'बैदुल'चा सढळ हाताने वापर करुन गुंडांना ठोकून काढणे हा याचा आवडता टाईमपास! बाकी दिवसभर कुणा गुंडाला (आणि त्याच्या टोळीला) पिसून झालं की रात्री एखाद्या कसिनोमध्ये जाऊन पत्ते पिसणे हा याचा मुख्य उद्योग. पत्त्यातला अतिशय बेरकी आणि तितकाच अव्वल दर्जाचा खेळाडू. तीच अक्कल सट्टा, जुगारातही लावून लोकांचा काळा पैसा त्यांच्या खिशातून काढून त्यांच्या मनातली टोचणी कमी करण्याचे सत्कार्यही करत असतो. इतक्या कुचाळक्या करुनही इन्स्पेक्टर मुकेश भाटीया आणि आघाडीचे उद्योगपती श्री. बिमल रॉय यांच्यामुळे कानूनच्या लंबे हातातून बचावला आहे. थोडक्यात म्हणजे 'रंगूनी रंगात सार्या, रंग माझा वेगळा' असणारा हिरो!
असे हे चार हिरो आपापल्या कादंबर्यांतून तर धुमाकुळ घालतच आहेत. आता पराषेठने त्यांना एकाच कथेत गुंफण्याचं जे शिवधनुष्य उचललंय त्यासाठी पराषेठ आणि त्यांच्या हिरोंना शुभेच्छा!! सुहास शिरवळकर नावाच्या विलक्षण प्रतिभेच्या लेखकाने गाजवलेले हे हिरो पराषेठचं ऐकतात का हाच सध्याचा सवाल नं. १ आहे!
--असुर
16 Dec 2010 - 9:57 am | दिपक
धन्यवाद असुर. :-)
सुरुवात एकदम भारी झालीये परा. येऊदेत पुढे!!
उत्सुकता ताणली गेलेली आहे.
16 Dec 2010 - 10:26 am | स्वानन्द
मान गये बॉस!
मस्त पात्रपरिचय! बाकी परा ही जबाबदारी पेलू शकेल यात शंका नाही. सव्यसाची आणि हॅकर्स अंडरग्राऊंड ( तेच ते अर्धवट सोडलेले ) वाचल्यावर तर नाहीच नाही.
17 Dec 2010 - 5:45 am | निनाद मुक्काम प...
दुर्दैवाने ह्या चारही शिलेदारांची एकही कांदबरी अथवा गोष्ट वाचली नाही . रहस्य कथांमध्ये आमची मजल गुरुनाथ नाईक व शैलजा राजे/ अगदीच कंटाळा आला तर प्रणय कथांची साम्रांज्ञी आशु विजू रानडे
ह्या गोष्टीच्या निम्मित्ताने ह्या चार नायकांची बलस्थाने व कामगिरी फत्ते करण्याचा वकूब कळून येईन .
15 Dec 2010 - 4:01 pm | sneharani
झाल का क्रमशः ?
लिहा पटापट पुढे!
मस्त झालाय हा भाग!
15 Dec 2010 - 4:02 pm | गवि
पुढचे लवकर.
15 Dec 2010 - 4:02 pm | स्पा
झकास सुरुवात ............
वाचतोय.....
(सु शी चे चार नायक.... कृपया नवीन वाचकांसाठी खुलासा करावा)
15 Dec 2010 - 4:03 pm | गणपा
काळापाहाडाची कथा वाचतोय असा भास झाला.
मस्त येउंदेरे अजुन. :D
15 Dec 2010 - 4:04 pm | गणेशा
मस्त लिहित आहात .. येवुद्या पुढचे भाग ...
15 Dec 2010 - 4:07 pm | मेघवेडा
हाण्ण तेज्यायला.. परा किती भारी सुरूवात केलीयेस रे. पण सुसाट वेगात सुटलेल्या गाडीनं अचानक काच्चकन ब्रेक मारावा तसं काहीसं..
(क्रमशः)
15 Dec 2010 - 4:39 pm | भाऊ पाटील
लय भारी सुरूवात
15 Dec 2010 - 5:26 pm | स्मिता.
गोष्ट अशी रंगात येत असतानाच हे क्रमशः का कलमडतं देव जाणे! मला तर आता हा शब्दाबद्दल अतिशय नावड निर्माण झाली आहे.
पुढले भाग लवकर लिहा.
15 Dec 2010 - 4:08 pm | यकु
वा! वा! वा!!
येऊ द्या की मग पुढचे भाग पण!
जब्बरदस्त वेगवान आणि उत्कंठावर्धक झालंय.
भन्नाट - २ लवकरच वाचायला मिळो अशी आशा :)
15 Dec 2010 - 4:11 pm | प्राजक्ता पवार
वाचतेय .पुढचा भाग लवकर टाका .
15 Dec 2010 - 4:12 pm | नंदन
वेगवान सुरुवात. पुढच्या भागांची वाट पाहतो.
15 Dec 2010 - 4:18 pm | छोटा डॉन
+१
अजुन काय लिहणे ?
15 Dec 2010 - 5:37 pm | नगरीनिरंजन
+२
तेच.
16 Dec 2010 - 11:34 pm | अनिल हटेला
वाचतोये !!!
:-)
15 Dec 2010 - 4:15 pm | स्वानन्द
पहिल्यांदा लेखाच्या खाली 'क्रमशः' आहे का ते पाहिलं. क्रमशः असल्याने, पूर्ण लेख मालिका आल्याशिवाय वाचणारच नाही.
15 Dec 2010 - 5:28 pm | गणेशा
मी पण आता हाच मार्ग निवडावा असे वाटत आहे ..
15 Dec 2010 - 4:16 pm | सूड
झकास !!
15 Dec 2010 - 4:27 pm | चिंतामणी
पण दरवेळी लिखाणात (क्रमशः)चा ब्रेक असायलाच पाहीजे का रे परा?
15 Dec 2010 - 4:38 pm | सुहास..
भन्नाट कल्पना आणि भन्नाट सुरवात रे पर्या !!
"अरे.." असे म्हणत फिरोजनी तरुणाच्या डाव्या हाताला बघितले आणि तो फसला. त्याने मान वळवली आणि दुसर्याच क्षणी त्याचे पिस्तूल फिरोजच्या हातात होते. "चल तुझ्या मित्रांना भेटून येऊ" फिरोज त्याच्या गळ्यात हात टाकत म्हणाला. भकास नजरेने फिरोजकडे बघत तो तरुण पाय ओढत निघाला. >>>
दोन मिनीटाकरिता वाटले सुशिंच एखाद पुस्तकच वाचतोय की काय ,
रंगुन गेलो आणि क्रमश : पाहिले ..का ? का ? का ?
असो ..लवकर लिही ..
अवांतर : कावेरीत दहा दिवसांची स्पॉन्सरशिप देतो हवे तर !! ;)
15 Dec 2010 - 7:55 pm | आत्मशून्य
असो.. ह्याची एकता कपूरची सीरियल बनवू नका.....
15 Dec 2010 - 6:04 pm | चिगो
>>"तुझी इच्छा. सत्ती टॉपवर येवढे पैसे जिंकणारा मी पहिला असीन बहुदा जगात"
समोरच्या तरुणानं घाईघाईने त्याच्या पुढची पाने पालथी केली. तीन गुलाम... समोरचा तरुण डावा गाल उडवत छद्मीपणाने हसला.<<
मी इथंच "सुशिं" स्टाईल ओळखली..
परा, लाख लाख धन्यवाद आणि शुभेच्छा... तडफडत होतो सुशिं स्टाईल लिखाण वाचण्यासाठी यार..
असुरभौ आणि धमुभौ चे ही खुप खुप धन्यवाद..
ऑल द बेस्ट फ्रेंड्स...
(मी ही सिरीज कॉपी-पेस्ट करुन ठेवणार आहे)...
15 Dec 2010 - 6:10 pm | अवलिया
तुझ्यामायला.... उद्या पुढचा भाग आला नाही तर कॅफेवर येउन डोळे काढुन गोट्या खेळेल...
15 Dec 2010 - 6:11 pm | टारझन
भाग जोरदार ... औत्सुक्यवर्धक .. पु.ले.शु.
15 Dec 2010 - 6:19 pm | श्रावण मोडक
आरंभशूर ठरू नये, ही शुभेच्छा. :)
15 Dec 2010 - 8:02 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
पुढे?
(आणखी एक आरंभशूर)
15 Dec 2010 - 7:31 pm | उपास
'क्रमशः 'च्या एन.सी.टी
16 Dec 2010 - 10:18 am | सविता
सहमत
15 Dec 2010 - 7:51 pm | पैसा
ही कथा सुरू करताना परा वर नक्कीच सुशिंचा अवसर आला असावा! "क्रमशः" मात्र थोडा विरस करतो. पुढच्या वेळी अख्खी दीर्घकथाच द्या त्यापेक्षा!
15 Dec 2010 - 8:10 pm | जाई अस्सल कोल्हापुरी
पुर्ण लिहुनच टाकत जा यार!
15 Dec 2010 - 8:10 pm | मस्त कलंदर
सुशि वाचून खूप दिवस झाले. आता पटापट पुढचे भाग येऊ देत. तिची शिकार केलीत तर बघाच मग!!!!
15 Dec 2010 - 8:12 pm | योगी९००
परा..
बर्याच दिवसांनी तुमच्या कडून चित्तथरारक लिखाण आले आहे..पुढचा भाग लवकर टाका ...
सुरूवात भन्नाट आहे...
15 Dec 2010 - 9:25 pm | स्वाती दिनेश
सुरुवात झक्कास... सु शि स्टाइल लिहिण्यात परा यशस्वी झालेला आहे, क्रमश:चा व्यत्यय लवकर दूर कर रे..
स्वाती
15 Dec 2010 - 11:04 pm | ऋषिकेश
बापरे! फारच धाडस दाखवतो आहेस!
अनेक शुभेच्छा!
15 Dec 2010 - 11:40 pm | पिवळा डांबिस
सुरवात एकदम मेलोड्रामॅटिक (एका रहस्यकथेला जशी हवी तशीच) झालीये!
त्यामुळे उत्सुकता वाढली आहे.
क्रमशः बद्दल तक्रार करायचा अधिकार आम्हाला नाही (असं नंदन म्हणतो!!)
तेंव्हा पुढील भागांची वाट पहातो...
येऊ द्या!
16 Dec 2010 - 12:17 am | शुचि
ऐला! ह्याला म्हणतात का सुशि स्टाईल????????? मी पहील्यांदाच वाचतेय. मला अक्षरक्षः ऐलमा पैलमा खेळावसं वाटू लागलय एक्साईट्मेंट्मुळे ...... आय मीन इट्स टू मच!!!
लवकर लिहा.
16 Dec 2010 - 12:33 am | पुष्करिणी
मस्त सुरूवात, पुढचे भाग लौकर येउदेत
16 Dec 2010 - 2:43 am | इंटरनेटस्नेही
मस्त!
16 Dec 2010 - 5:27 am | पिंगू
पुढचे भाग लवकर येउदे नाहीतर उपासमार व्हायची हो..
- (पुढच्या भागासाठी भुकेला) पिंगू
16 Dec 2010 - 9:26 am | मनीषा
भन्नाट कल्पना ...
कोणे एके काळी ... सुहास शिरवळकरांची अनेक पुस्तके वाचली आहेत .
त्यांची लेखनशैली तुम्ही बरोबर आत्मसात केली आहे ...
16 Dec 2010 - 10:05 am | प्रीत-मोहर
वरच्या सगळ्यांशी सहमत :)
16 Dec 2010 - 10:31 am | मृत्युन्जय
सुरुवात तर झक्कास झाली आहे. पण पराचा एकुण लिखाणाचा वेग, आवेग आणि उत्साह बघता तिसर्या आणि चौथ्या नायाकाची एंट्री बहुधा अनुक्रमे २०११ आणि २०१२ मध्य व्हायची. कथा पुर्ण होइपर्यंत जगल्या वाचल्यास (मी नव्हे परा) पुढची प्रतिक्रिया नक्की देइन.
16 Dec 2010 - 10:34 am | बिपिन कार्यकर्ते
उच्चभ्रू प्रतिक्रिया : सुशि हे नाव वाचले आणि धागा बंद केला.
मनातली प्रतिक्रिया : परा, लै भारी. वेगवान. साला तू तर सुशिंचा वारस वगैरे होशील यार!
27 Nov 2015 - 6:24 pm | अजिंक्य विश्वास
कल्पना छान आहे. मात्र फिरोजच्या गाडीचे नाव स्पीड-ब्रेक ९०० असे आहे. आणि कथेत थोडी घाई होत आहे. बाकी कल्पना मस्त. पूर्ण झाल्यावर फेसबुकवर शिरवळकरांच्या ग्रूपवर आणि पेजवर शेअर करता येईल का?
7 May 2020 - 6:50 am | आगाऊ म्हादया......
मी ही फेयर डील नावावर जरा अडकलो. मस्त आहे पण. आज 2020 मध्ये वाचतोय