कोकण दर्शन - दिवेआगरचा समुद्र-भाग १

प्रचेतस's picture
प्रचेतस in जनातलं, मनातलं
7 Dec 2010 - 9:35 am

नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात ४ दिवस सुट्टी घेतली व सकाळी ६ च्या पिंपरी चिंचवड- वाडा एस टी बसने पनवेलला उतरलो. पनवेलला नासिकवरून कारने प्रसाद व हृषीकेश हे दोन भाउ थोड्याच वेळात आले. व पुढे प्रवास चालू केला. कर्नाळ्याचा सुळका थोड्याच वेळात दिसू लागला मुंबई-गोवा महामार्ग कर्नाळ्याच्या पक्षी अभयारण्यातूनच गेलेला आहे. वाटेत मर्कटलीला पाहायला मिळाल्या. पुढे पेण-वडखळ नाका, कोलाड असे करत माणगावला पोहोचलो तिथून डावीकडे वळून म्हसळा-दिवेआगरच्या रस्त्याला लागलो. आता लाल माती, सदाहरित जंगलांचा फील येउ लागला होता. म्हसळा मागे टाकले व व थोड्याच वेळात बोर्ली पंचतनला पोहोचलो. दिवेआगर व बोर्ली अंतर जेमतेम १ किमी पण मध्ये पूर्ण ओसाड जमीन आहे.
दिवेआगरात प्रवेश करताच ओसाड जमिनीची जागा नारळी-पोफळींनी घेतलेली असते. सुवर्णगणेशाचे मंदिर मागे टाकून आम्ही पुढे जातो. आता पोटात कावळे कोकलू लागलेले असतात. आम्ही आता बापटांकडे जातो. तिथल्या सुग्रास भोजनाने तृप्त होतो. मुक्कामाचे ठिकाण मिळायला गर्दी नसल्याने काहीच अडचण येत नाही. थोड्याच वेळात वामकुक्षी आटोपते. आता वेध लागलेले असतात ते समुद्रस्नानाचे. आम्ही किनार्‍यावर जातो. केवड्याच्या वनातूनच रस्ता आहे. स्वच्छ,सुंदर, सुरक्षित, लांबलचक समुद्रकिनारा पाहूनच भान हरपून आम्ही लगेच पाण्यात उतरतो. सोनेरी वाळू निळयाशार पाण्यात पायांना गुदगुल्या करत असते. मनसोक्त डुंबतो. पाण्यातून बाहेर येतो. किनार्‍यावरच चटई टाकून बसतो. निवांतपणे.
सुर्यास्ताची वेळ जवळजवळ येत असते. भगवान सहस्त्ररश्मी अजूनही झळाळतच असतो. पण हळू हळू त्याचे तेज डोळ्यांना सहनीय होत जाते. सुवर्ण आता तांबूस व्हायला लागते. पाण्याचाही रंग आता बदलायला लागतो. थोड्याच वेळात सुर्य खालून अर्धा होतो. अजून कमी होतो. शेवटी कमी कमी होत क्षितीजावर एक बारीकशी रेघ दिसूनशी लुप्त होते. सुर्यास्त होतो तो दुसर्‍या दिवशी पुन्हा सुर्योदयासाठीच.

दिवेआगरातील कोकणी घर-

सुपारीची वाडी-

सुर्यास्ताच्या आधी

सुर्यास्ताच्या शेवटच्या क्षणी-

सुर्यास्तानंतर

प्रवासआस्वाद

प्रतिक्रिया

स्पा's picture

7 Dec 2010 - 9:48 am | स्पा

एकदम सुंदर...........

गांधीवादी's picture

7 Dec 2010 - 9:52 am | गांधीवादी

दिवेआगरला दोन वेळा जाने झालेले आहे. एकदा मित्रांसोबत आणि एकदा घराच्यासोबत.
मित्रांसोबत गेलो असताना, आम्ही काय धम्माल केली म्हणून सांगू. आठवणी ताज्या झाल्या. सुवर्णगणेशाचे दर्शन झाल्यावर त्यानंतर तेथेच बाजूला एक खानावळ होती, तेथे यथेच्च भरपेट भोजन करून पडलो होतो आम्ही सगळे. अजूनही आठवतंय....

ह्या असल्या आठवणीच जगण्यास एक नवी उमेद देत राहतात. आठवणी जाग्या करून दिल्याबद्दल धन्यवाद.

प्रचेतस's picture

7 Dec 2010 - 9:53 am | प्रचेतस

>>माणगावला पोहोचलो तिथून डावीकडे वळून

कृपया उजवीकडे असे वाचावे. संपादकांनी योग्य तो बदल करावा. स्वसंपादनाची सोय नसल्याने संपादकांना विनंती.

पियुशा's picture

7 Dec 2010 - 9:59 am | पियुशा

व्वा ..............काय झक्कास फोटू आहेत व्वा मस्त!

अमोल केळकर's picture

7 Dec 2010 - 10:08 am | अमोल केळकर

मस्त.
रहाण्याच्या व्यवस्थेची काही माहिती दिलीत ( पत्ता / फोन नं ) तर उपयोग होईल

धन्यवाद
अमोल केळकर

प्रचेतस's picture

7 Dec 2010 - 10:21 am | प्रचेतस

आम्ही येथे राहीलो होतो.
तसेच इतरही बरेच ठिकाणी घरगुती स्वरूपात राहायची उत्तम सोय होते.
शाकाहारींसाठी सुहास बापटांचे भोजनालय सर्वोत्तम- 02147-224377, 09423837967

मत्स्यप्रेमींसाठी पाटील, पोतनीसांची खानावळ आहेच.

बदामीकर कॉटेज.

जांभ्या दगडाचे घर. खोल्या यथातथाच.

निसर्गरम्य पण राहणे खाणे वगैरेची खास सोय नाही.

एक बीच टच (व्ह्यू नाहीच ) रिसोर्ट आहे, एक्झॉटिका नावाचा. तिथेही व्हॅल्यू फॉर मनी नाहीच. अत्यंत छोट्या (फायबर केबिन असतात टोलनाक्यांजवळ तशा) रूम्स. त्यापेक्षा बदामीकर अर्ध्या किमतीत. (टीव्ही नाही)

खानावळी सगळ्या आधी ऑर्डर देऊन खाणे या स्वरूपाच्या. (तसं ते गणपतिपुळे वगैरे सर्व पिलग्रिमेजला असतंच. अन्न बनवून वाया जाऊ नये म्हणून फक्त ऑर्डरने बनवतात. एकदोन किरकोळ हॉटेलेही आहेत नाश्त्याची..)

मूळ धागाकर्त्यांनी सुरेख धागा लिहिलाय. ते अधिक माहिती देतीलच. नुकताच जाऊन आलोय म्हणून हा आगाऊपणा :)

टारझन's picture

7 Dec 2010 - 10:10 am | टारझन

व्वा वल्ली व्वा !! कोकण म्हंटलं की मला आठवतात ती पावसाळ्यात बांधलेली तात्पुरती संडासं ... आणि फोटु एकदम झकास.

अवांतर : तो उंट नर की मादी ? आणि त्याला शेपुट का नाहीये ?

- (तात्पुरता कोकणी) टल्ली

प्रचेतस's picture

7 Dec 2010 - 10:18 am | प्रचेतस

तिथे २ उंट होते. फोटू एकाच उंटाचा टाकलाय. शेपूट आहे पण झाकली गेलीय. :)
हा बघ जोडीचा

अन्जन's picture

7 Dec 2010 - 10:24 am | अन्जन

अतिशयोक्ति नाहि पण, महाराश्टाचा स्वर्ग कोकणच आहे. खात्रि नसेल वाटत तर एकदा येवाच.

स्पंदना's picture

7 Dec 2010 - 5:29 pm | स्पंदना

मी काशिद अन त्या बाजुला राहिले आहे. एक कराल ? केवड्याच बन कस असत ते पहायच आहे. एखादा फोटो टाकाल?

बाकिचे तुमचे फोटोज पण आवडले.

प्रचेतस's picture

8 Dec 2010 - 8:43 am | प्रचेतस

केवड्याच्या वनाचा फोटो काढला नाही. पण वरून तिसर्‍या फोटोत सूर्य ज्या झुडूपांमधून दिसतोय ते केवड्याचे वन आहे. दिवेआगराच्या संपूर्ण किनारपट्टीवर ते आडवे पसरलेले आहे.

परिकथेतील राजकुमार's picture

7 Dec 2010 - 5:40 pm | परिकथेतील राजकुमार

मस्त हो वल्ली :)

अप्रतिम छायाचित्रे आणि वर्णन. दिवेआगारला एकदा जाण्याचा योग आला आहे, पण बरीच वर्षे झाली आता त्याला.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

7 Dec 2010 - 7:41 pm | निनाद मुक्काम प...

फोटो मस्तच आले आहेत .
बाकी कोकणाला लाभेल्या निसर्ग सौदर्य व त्याला अमाप अगदी गोव्याहून जास्त पर्यटक मिळवू देऊ शकतो .कारण मुंबई शी असलेली जवळीक .पण गोरे लोक येतील व संस्कृती बुडवातील अशी भीती .
जैत पूर प्रकल्पाला विरोध का तर पर्यावरण/ निसर्ग नष्ट होईल .मग करे तो करे क्या कोकणी चाकरमानी .मुंबईत यायची सोय नाही उरली .तिथे आधीच उपटसुंभ आहेत .उपटलेले .
खरच मल्या जेव्हा अलिबागला आपल्या खाजगी यॉट मधून मुंबईच्या किनार्यातून आपल्या दिनदर्शिकेवरच्या तायांबरोबर अलिशान रिसोर्ट मध्ये जायचा तेव्हा त्याला आम्ही हॉटेल चा स्टाफ साश्रू नयनाने निरोप द्यायचो .
तो जाऊ शकतो .पण विदेशी पर्यटक नको .गोव्याची नि कोकणाची संकृती वेगळी .(पण शेवटी दोन्ही भारताच्या ना )
बाकी लेख थोडा विस्तृत आला असता म्हणजे दळणवळण व मुक्कामच्या सोयी आदी माहिती .तर मुंबईत जाणार्या जर्मन प्रवाशांना येथून
येवा कोकण आपलेच आहे .असा सल्ला देता आला असता .

नगरीनिरंजन's picture

7 Dec 2010 - 8:20 pm | नगरीनिरंजन

सगळे फोटो छान! खालून पहिला फोटो विशेष मस्त! बाकी कोकणच्या निसर्गसौंदर्याचे गोडवे गाऊन थकलोय आणि कितीही गायले तरी कमीच पडतात म्हणून उगी राहतो.

मदनबाण's picture

7 Dec 2010 - 9:17 pm | मदनबाण

छान... :)

विलासराव's picture

9 Dec 2010 - 10:24 pm | विलासराव

जाउन आलोय एकदा अलिबाग,काशिद, जंजिरा, दिवे आगार, श्रीवर्धन, हरिहरेश्वर, केळ्शी,मंडणगड, दापोली, गणपती पुळे , पावस असा दौरा होता.
कोकण खरोखरच पर्यटनासाठी उत्तम आहे फक्त सोयीसुविधा अजुन अपुरया आहेत बर्याच ठिकाणी. बाकी निसर्ग तर अप्रतिमच.