शब्द दुय्यम आहेत विचार महत्वाचा त्यामुळे आपण काय विचार करतो या कडे बारकाईने लक्ष द्या - स्वामी विवेकानंद
आजकालच्या धकाधकीच्या जीवनात माणसाला विचार करायला फुरसतच कुठे आहे? आणि विचार करत बसला तर आलेली संधी हुकण्याची शक्यता अधिक पण त्यामुळे अविचाराने केलेल्या गोष्टींचा त्याला कधी कधी मनस्ताप हि फार होतो किंबहुना एखादीच गोष्ट यशस्वी झालेली आढळते.
त्यामुळे विचारपूर्वक केलेली कृती हि निश्चितच फलदायी ठरते. आणि यदाकदाचित ती यशस्वी झाली नाही तरी त्याचे होणारे परिणाम भोगण्यास आपण निश्चितच तयार असतो
विचार महत्वाचा कारण त्याच्या अनुषंगानेच पुढील कृती होत असते. म्हणून चांगल्या कृतीमागे चांगले विचार असतात.
प्रत्येकाने आपण काय विचार करतो याचा बारकाईने अभ्यास करणे आवश्यक आहे मग त्यामध्ये आपण आपल्या संबधी किती विचार करतो, समाजासाठी मी म्हणत नाही कारण ती मक्तेदारी फक्त राजकार्ण्यानीच घेतलेली आहे पण शेजाऱ्या संबंधी किती विचार करतो, आपल्या संपर्कात येणारी माणसे त्यांच्या बद्दल किती विचार करतो, निसर्गात घडणाऱ्या छोट्या मोठ्या गोष्टींचा किती विचार करतो आणि तो विचार जीवनमान सुधारण्यास, किंवा एखाद्याला जगण्याची उमेद देण्यास, वार्धक्याकडे झुकलेल्या व्यक्तीचा उत्साह वाढविण्यास तो कारणीभूत होतो कि नाही हे महत्वाचे.
एखाद्या रोपट्याची जोमाने वाढ होण्यासाठी जशी त्याला खात, पाण्याची गरज असते त्याच प्रमाणे चांगले विचार येण्यासाठी सुद्धा गरज असते ती चांगल्या वाचनाची, शुद्ध चारित्र्याची, निरोगी आरोग्याची, आणि मुख्य म्हणजे सुसंगतीची गरज असते नि या गोष्टी तुम्ही प्राप्त करून घेतल्यात कि चांगले विचार
आपोआप एकामागे एक येऊ लागतील जशी रेशीम लडी उलगडत जावी किंवा चित्रपटाची दृशे एकापुढे एक येऊन कथा पुढे सरकावी मग तुमचे चांगले विचार सर्व दूर पसरण्यास वेळ लागणार नाही आणि चांगल्या विचारांची कमीही पडणार नाही.
चांगले विचार जगण्याची नवी उमेद देतातच पण कठीण प्रसंगी धीरही देऊन जातात व भीतीचे उच्चाटन करतात आणि वाईट विचार येण्याचा मार्गाच बंद करून टाकतात. म्हणूनच संतमंडळी सांगतात " सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो " म्हणजे जेणे करून सुविचार प्रसवतील व समाज सुधारण्यास मदत होईल हे निश्चित.
(मिसळपाव वर लिहिण्याचा पहिलाच प्रयत्न........ सांभाळून घ्यावे )
प्रतिक्रिया
8 Nov 2010 - 8:41 pm | शुचि
मुक्तक खूप आवडलं. पुलेशु.
8 Nov 2010 - 10:40 pm | पैसा
प्रकटन आवडलं. आणखी लिहा.
8 Nov 2010 - 11:32 pm | अर्धवटराव
सुविचाराचे महत्व विषद करणारे विचार आवडले :)
(अविचारी) अर्धवटराव