अस मला आजकाल म्हणावसं वाटत आहे. आता तुम्ही विचारलं की का बुआ, असं विशेष काय झालं. नाही म्हणजे प्रत्येक वेळी काहीतरी मनापासून वाटायला काहीतरी घडावाच लागतं असं आहे का ? असो. तसं आहे खरं. आता बघा, मी राहतो पुण्यात. कामानिमित्त. तसा मी मुळचा मुंबईचा, पण पुणं तसं मला नवीन कधीच नव्हतं. बरेच नातेवाईक राहतात माझे इथे. लहानपणापासून येतोय मी इथे. आवडतं ही मला पुणं.
विद्येच माहेरघर म्हणतात ह्याला. एकेकाळी इकडच्या सर्व शाळांना आपापला माज होता. एक गर्व, आता तो दुराभिमान कि अभिमान ह्या वादात मी आत्ता जात नाही. पण हा गर्व आज मला कुठे दिसत नाही. मराठीची गळचेपी होतेय वगैरे असं अगदी आपल्याला घसा खरवडून ओरडता येतं, पण तसा होऊ नये ह्यासाठी आपण काही विशेष केलं का आजतागायत ?
मी 'मराठी' व्हावं म्हणून मला आई-वडिलांनी मराठी शाळेत घातलं. तो त्यांचा निर्णय मला अजूनही मनापासून आवडतो. त्यांच्या कृपेने मी आज, 'मी ना a little late होईन आज, तुम्ही start करा dinner' अशी मराठी तर बोलत नाही. आणि आजपर्यंत, पुण्यातही कोणी बोलत नव्हतं. पण परिस्थिती बदलत आहे हे खरं. आज पुण्यातल्या मोठ्या मोठ्या आणि प्रतिष्ठीत शाळा, semi-english नाहीतर पूर्ण English च्या सावलीत बदलत्या काळाची गरज, अशी फुटकळ कारण देऊन जात आहेत. ज्या पुणेरी पाट्यांचा उपरोधिक स्वर खोचक असला तरी एक आनंद देऊन जातो, त्या खाली येऊन लवकरच, तिथे, may I help you? अश्या प्रकारचे ग्राहकाभिमुख फलक लागतील.
काहीजण असं म्हणतील की मराठी अजूनही आहे की, म्हणजे भारतातली चवथी आणि जगातली पंधरावी बोलली जाणारी भाषा आहे ही. मी त्यांना असं विचारू इच्छितो की 'बदलता काळ' पाहता, त्याच लोकांना अशी कितपत खात्री देता येईल की हे असंच राहील ? माझा दुसरा छोटासा प्रश्न. आता इथे पुणे Infosys मध्ये बरेच मराठी लोक आहेत. त्यातले बरेच ब्लॉगही लिहितात. त्यातले किती मराठीतून काही लिहितात ? फक्त मराठी नाही म्हणत मी, पण कधीतरी, थोडंतरी ? ह्याउलट, मी अनेक दक्षिणात्य लोकांचे blog पाहतो ते त्यांच्या मातृभाषेत लिहितात. बरेच जण लिहितात. प्रश्न असं की आपण लिहू शकत नाही ? की आपल्याला लिहावसं वाटत नाही ? की मी write केलेलं मराठी कितपत readable असेल अशी fear वाटते आपल्याला ?
मी इथे कुठल्याही राजकीय पक्षाचा जाहीरनामा वाचत नाहीये, तसं म्हणता हा माझाही पहिलाच मराठी blog आहे त्यामुळे तसा मलाही फारसा बोलायचा अधिकारही नाहीये. इथे कोणालाही दुखवायचा हेतू नाही. जे वाटलं ते आपला टाकलं इथे. मी स्वतः माझ्या मित्रांना हा प्रश्न विचारला होता. त्यानंतर आम्ही CCD आणि Pizza Hut सारख्या ठिकाणी सरळ मराठी बोलायला सुरुवात केली. एक छान आहे की, त्यांच्या साठी ग्राहक हा राजा असतो, जेंव्हा ग्राहक coffee कशी दिलीरे विचारतो तेंव्हा तो पण, should I suggest you, वरून 'तुम्ही हे का नाही घेऊन बघत' वर येतो.
अजून एक गम्मत म्हणजे, जनमानसांना संस्कृत कळत नाही, म्हणून ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली. ती भाषा आज आपल्याला जड वाटते. ज्ञानेश्वर सोडा, टिळकांचं गीतारहस्य, विनोबांची गीताई, रामदासांचे मनाचे श्लोक, ते काल सावरकरांनी लिहिलेलं १८५७ चा स्वातंत्र्यसमर नाही वाचता येत आपल्याला धडाधड. आज ग दि मां इतकी चांगली गीतं लिहिणारे शोधून सापडणार नाहीत, काल ज्यांचा सत्कार झाला ते जगदीश खेबुडकर. त्यांच्या नंतर त्यांचा वारसा टिकवणारा मला तरी कोणी दिसत नाही.
ह्या सगळ्यासाठी मी काय करतोय ? काही नाही. सध्या तरी फक्त मराठी माणसाशी मराठी बोलण्याचा मी प्रयत्न करतोय. लता, अशा, बाबूजींची गाणी ऐकतोय... गीत रामायणातल्या रामाकडे आशेने पाहतोय....
ता. क. : हा जुना लेख आहे, ह्यात तक्रारवजा सूर जरी असला, तरी मला वाटलं म्हणून तसं लिहिलेलं आहे. कुणाला माझी मतं पटत नसतील तर त्यांना दुखावण्याचा माझा हेतू मुळीच नाही.
प्रतिक्रिया
22 Oct 2010 - 2:29 pm | अवलिया
अजून एक गम्मत म्हणजे, जनमानसांना संस्कृत कळत नाही, म्हणून ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली. ती भाषा आज आपल्याला जड वाटते.
हेच पुन्हा पुन्हा वाचा... मनन करा.. चिंतन करा... तुम्हाला उत्तर सापडेल.
भाषा बदलत असते. सतत बदलत असते. चिरंतन बदलत असते.
बदलली नाही तर मृत होते..
भाषा महत्वाची की संवाद? निर्णय घ्या !!
22 Oct 2010 - 2:33 pm | रन्गराव
>>भाषा महत्वाची की संवाद? निर्णय घ्या !!
लाख मोलाचं बोललात!
22 Oct 2010 - 3:00 pm | विश्वनाथ मेहेंदळे
शिवकाळात तुम्ही नव्हतात हे किती वाईट झाले हो. राज्यव्यवहार कोश करण्याच्या भानगडीपासून तुम्ही शिवरायांना नक्की परावृत्त केले असते ;-)
असो, विनोदाचा भाग सोडा, लोकमान्य टिळकांनी तुमच्या मताचे खंडन छान प्रकारे केले आहे. भाषा ही प्रवाही असली पाहिजे, बदलती असली पाहिजे सगळे मान्य. इतर भाषेतील शब्द आपल्या भाषेने घेऊन ती समृद्ध झाली पाहिजे हे ही मान्य. पण टिळकांच्याच शब्दात सांगायचे तर, पिठात जितके मीठ टाकतात तितकेच परकीय शब्द मराठीने उचलले पाहिजे. जास्त झाले तर गडबड होईल. मला हे मत पूर्ण मान्य आहे. युट्यूब वर हे भाषण आहे. खाली पहा.
22 Oct 2010 - 3:19 pm | अवलिया
टिळकांनी माझ्या कोणत्या मताचे खंडन केले ?
25 Oct 2010 - 11:46 pm | विश्वनाथ मेहेंदळे
>>भाषा बदलत असते. सतत बदलत असते. चिरंतन बदलत असते. बदलली नाही तर मृत होते
मूळ लेखातील एक मुद्दा होता मराठीत इंग्रजी शब्द येण्याचा. तुमचे वरील वाक्य त्या संदर्भात होते असे मी गृहीत धरले. कारण लेखातील बाकीच्या मुद्द्यांबाबत (आपल्याच भाषेत बोलणे वगैरे) वरील विधानाचा संदर्भ निदान मलातरी लागला नाही.
भाषा प्रवाही असते हे मान्य म्हणून अनावश्यक प्रमाणात इतर भाषेतील शब्द वापरू नयेत. "तुम्ही start करा dinner" अशा वाक्यांनी मराठी समृद्ध कशी होईल आणि तसे न बोलल्याने तिचे काय नुकसान होणार आहे किंवा ती मृत कशी होणार आहे हे निदान मलातरी कळत नाही. टिळकांनीही हेच म्हटले आहे.
28 Oct 2010 - 6:26 pm | अवलिया
ट्रेझरी --> तिजोरी
मास्टर --> मास्तर
बस --> बस
कंडक्टर --> कंडक्टर (वाहक असा बिल्ला फक्त नावाला असतो, लोक कंडक्टर असेच बोलतात)
ड्रायव्हर ---> ड्रायव्हर, डायवर (चालक असा बिल्ला नावाला असतो, लोक ड्रायव्हर असेच बोलतात)
अशी अनेक उदाहरणे देता येतील ज्यांचा मुळ उगम इंग्रजीत असुन बदल होत किंवा तसेच्या तसेच उचलले आहेत. रुळले आहेत. तुम्ही डिनर स्टार्ट करा असे वाक्य अजुन ऐकले नसले तरी आज डीनरला कूठे जायचे? लंचला काय होते? टिफिन कुठे आहे? इत्यादी वाक्ये सर्रास बोलली जातात.
आणि आम्ही मित्र मित्र पेग मारायला बसल्यावर सगळी तयारी झाली की हं करा स्टार्ट ! जरा अलगद द्या ठोका (चिअर्स ला पर्यायी) ! असे बोलले जात असल्याचे आठवते.
15 Nov 2010 - 11:45 pm | विश्वनाथ मेहेंदळे
>>आज डीनरला कूठे जायचे? लंचला काय होते? टिफिन कुठे आहे? इत्यादी वाक्ये सर्रास बोलली जातात.
अशी वाक्ये सर्रास बोलली जातात म्हणून तसे करणे ठीक आहे असे मला वाटत नाही. शिवकालीन मराठी भाषेत हिंदी / फारसी शब्द खूप प्रचलित होते म्हणून शिवाजी महाराजांनी भाषाशुद्धीचे अभियान सुरु केले. म्हणून पुढील काळात मराठी भाषा परत संस्कृतप्रचुर झाली. (आता त्यांनी तसे केले हे चुकीचे केले असा युक्तिवाद तुम्ही करू शकता) तुम्ही वानगीदाखल वर दिलेली वाक्ये शुद्ध मराठीत बोलता येतील ते ही ती वाक्ये बोजड न करता. आणि तुम्ही आजूबाजूला नीट ऐकलेत तर अजून खराब मराठी ऐकायला मिळेल.
मी वर म्हटले तेच परत म्हणेन. अशा वाक्यांनी मराठी समृद्ध कशी होईल आणि तसे न बोलल्याने तिचे काय नुकसान होणार आहे किंवा ती मृत कशी होणार आहे हे निदान मलातरी कळत नाही.
(प्रतिसाद द्यायला अंमळ उशीर झाला. तुमचा प्रतिसाद आलेला पाहिलाच नव्हता)
16 Nov 2010 - 12:55 am | अडगळ
'चांगभलं' असं आम्ही म्हणतो.
22 Oct 2010 - 2:35 pm | स्वैर परी
तुझ्या वर मांडलेल्या मतांशी मी पुर्णपणे सहमत आहे. परंतु, नुसते सहमत असण्यापेक्शा, यावर कहितरि ठोस उपाय कुणी तरी सुचवावा असे मला वाटते!
24 Oct 2010 - 9:40 am | पारा
स्वतः प्रत्येक माणूस जेंव्हा मराठीत बोलायला शिकेल, आपल्या मुला-मुलीला आवर्जून मराठी शाळेत घालेल, त्याला-तिला मराठी साहित्याची गोडी समजावून देईल, तेंव्हाच काहीतरी शक्य आहे
22 Oct 2010 - 2:36 pm | ऋषिकेश
मराठी ही माझी मातृभाषा आहे याचा मला अभिमान आहे आणि म्हणूनच माझे मराठीवर प्रेमही आहे. मात्र "मराठी धोक्यात आहे तिला वाचवा!!" वगैरे ओरड मला 'इस्लाम खतरे मे!' इतकीच पोकळ वाटते हे ही खरे!
मात्र तरी मीही नेहमी बोलण्याची सुरवात मराठीतूनच करतो. अगदी भारतीय एअर होस्टेसबरोबरही.. समोरच्याला मराठी कळत नसलं की मग हिंदी/इंग्रजी प्रसंगी थातुरमातूर गुजरातीवर येतो
22 Oct 2010 - 3:43 pm | यशोधरा
ऋशी सर्व बाबतीत सहमत.
22 Oct 2010 - 2:36 pm | चिरोटा
लेख आवडला.
सगळ्या भाषा सारख्या असे म्हणायची पद्धत असली तरी वस्तुस्थिती तशी नाही.काही जुन्या भारतिय भाषांचे शब्दभांडार त्यामानाने नविन भारतिय भाषांपेक्षा जास्त आहे.म्हणूनच इंग्रजी/ईतर भारतिय भाषेतील शब्दांची गरज त्यांना पडत नाही.
28 Oct 2010 - 6:18 pm | पारा
मिपावरील व्यक्तींचे लेख वाचून मला मराठी अगदी ठणठणीत आहे ह्याचा प्रत्यय आलाच आहे. मात्र, मिपावरील लोक सोडले तरी, जेंव्हा अगदी रोजच्या आयुष्यातील घटना आपण पाहतो, तेंव्हा मी लिहिलेल्या लेखातील काही गोष्टी जाणवल्याशिवाय राहत नाहीत.
आणि इतर भाषांसारखी मराठी ही विपुल शब्द भांडराने स्वयंपूर्ण आणि स्वयंसिद्ध आहेच. फक्त हळूहळू तिच्या शुद्धतेत, व्याकरणात, शब्दरचनेत होणारा बदल खटकतो इतकाच.
कदाचित, कालपरत्वे सर्वच भाषा ह्याला बळी पडत असतील, पण हे स्थित्यंतर मनाला सहज मानवण्याजोगं नाही इतकंच.
22 Oct 2010 - 2:45 pm | सहज
सलामीचे फटके चांगले आहेत. सेंच्युरीसाठी शुभेच्छा!
24 Oct 2010 - 9:41 am | पारा
22 Oct 2010 - 4:08 pm | Dhananjay Borgaonkar
आपल्या ईथे बरेच मिपाकर ब्लॉग लिहितात्.त्यांचे ब्लॉग वाचा. गैरसमज दुर होईल.
सगळे शुद्ध मराठीतच आहेत. आणि आता थोडेफार इंग्रजी शब्द येणारच याचा अर्थ असा नाही होत की कोणी मराठीला विसरल अथवा कमी लेखल. वानगीदाखल उदा. द्यायचे झाल्यास आजकाल ब्रेकफास्ट हाच शब्द जास्त प्रचलित झालाय न्याहरीच्या ऐवजी. असे बरेचसे शब्द आहेत जे आपण सर्रास वापरतो.
मॉल मधे वा तत्सम ठिकाणी मात्र मराठीच बोलल पहिजे या मताशी मीही सहमत आहे.
24 Oct 2010 - 9:55 am | गांधीवादी
http://www.मिसळपाव.कॉम :sad:
http://www.misalpav.com :smile:
http://www.misalpav.com/node/15065 म्हणजे हा धागा. :wink: