१९९१-९२चा सुमार. मी तेव्हा नौकरी करत होतो.. फोरासरोडवरील झमझम नावाच्या सरकारमान्य देशी दारूच्या बारमध्ये..क्यॅशियर कम म्यॅनेजर होतो मी..आजूबाजूला सारी वेश्यावस्ती, दारुवाले, मटकेवाले, पोलिस, गुंड.. यांचंच सारं राज्य.. आयुष्यात एके से एक अनुभव आले त्या दुनियेत. कधी सुखावणारे, कधी दुखावणारे, कधी विचार करायला लावणारे, काही चित्र, काही विचित्र, काही नैसर्गिक, काही अनैसर्गिक..अस्वस्थ करणारे..आजूबाजूला अनेक प्रसंग रोजच्या रोज घडत होते.. स्वाभाविक, अस्वाभाविक..पण प्रत्येक प्रसंग एक अनुभव देऊन गेला..
बारमध्ये असंख्य प्रकारची माणसं येत.. रोजचे नियमित-अनियमित बेवडे हजेरी लावायचेच..त्याशिवाय रोज एखादी 'काय अभ्यंकर, सगळं ठीक ना? काय लफडा नाय ना?" असं विचारणारी नागपाडा पोलिस स्टेशनच्या कदम हवालदाराची किंवा त्याच्या सायबाची फेरी.. मग कुठे बरणी उघडून फुकट चकली खा, चा पी असं चालायचं.. कधी हलकट मन्सूर किंवा अल्लाजान वेश्यांकरता भूर्जी, आम्लेट, मटन सुका, खिमपाव असं काहीबाही पार्सल न्यायला यायचे.. कधी अफूबाज, चरसी डब्बल ढक्कन यायचा..कधी बोलबोलता सहज सुरा-वस्तरा चालवणारे हसनभाय, ठाकूरशेठ सारखे गुंड चक्कर काटून जायचे.. "क्यो बे तात्या, गांडू आज गल्ला भोत जमा हो गया है तेरा.. साला आजकल बंबैकी पब्लिकभी भोत बेवडा हो गएली है..साला, एक हज्जार रुप्या उधार दे ना." असं म्हणून मला दमात घ्यायचे..
कधी त्या वस्तीत धंदा करणारे हिजडे यायचे.. उगीच कुठे ठंडा, किंवा अंडापाव, असंच काहीबाही पर्सल न्यायला यायचे.. 'ए तात्या... म्येरा पार्सल द्येव ना जल्दि.. कितना मोटा है तू..' अश्या काहितरी कॉमेन्टस करत माझ्या गल्ल्याशी घुटमळत..मी त्रासाने हाकलून द्यायला लागलो की काडकन टाळी वाजवून 'सौ किलो..!' असं मला मिश्किलपणे चिडवायचे! अक्षरश: नाना प्रकरची मंडळी यायची त्या झमझम बारमध्ये आणि केन्द्रस्थानी तात्या अभ्यंकर!
गणपतीचे दिवस होते.. रस्ता क्रॉस केल्यावर आमच्या बारच्या समोरच्याच कामाठीपुर्यातल्या कोणत्याश्या (११ व्या की १२ व्या? गल्ली नंबर आता आठवत नाही..) गल्लीत हिजड्यांचाही गणपती बसायचा. हो, हिजड्यांचा गणपती! वाचकांपैकी बर्याच वाचकांना कदाचित ही गोष्ट माहीत नसेल. परंतु मुंबैच्या कामाठीपुर्यात अगदी हिजड्यांचाही गणपती बसतो.. साग्रसंगीत त्याची पूजा केली जाते.. कामाठीपुर्यात काही तेलुगू, मल्लू भाषा बोलणारे, तर काही उत्तरप्रदेशी हिजडे आहेत ते दरसाल गणपती बसवतात.. बरेचसे मुस्लिम हिजडेही त्यात आवर्जून सहभाग घेतात..
झमझम बारचा म्यॅनेजर म्हणून मला आणि आमच्या बारच्या सार्या नौकर मंडळींना त्या हिजड्यांचं सन्मानपूर्वक बोलावणं असायचं.. 'तात्यासेठ, गनेशजीको बिठाया है.. 'दरसन देखने आनेका.. खाना खाने आनेका..' असं आग्रहाचं बोलावणं असायचं..! अल्लाजान मला घेऊन जायचा त्या गणेशोत्सवात..
संध्याकाळचे सात वाजले असतील.. मी गल्ल्यावर होतो..पूजाबत्ती करत होतो. तेवढ्यात अल्लाजान मला बोलवायला आला.. "गनेशके दरसन को चलनेका ना तात्यासेठ?"
मी दिवाबत्ती केली.. अर्जून वेटरला गल्ल्याकडे लक्ष द्यायला सांगितलं आणि हिजड्यांच्या गणपतीच्या दर्शनाला अल्लाजानसोबत निघालो. कामाठीपुर्याच्या त्या गल्लीत गेलो.. खास दक्षिणेकडची वाटावी अशी गणेशमूर्ती होती.. नानाविध फुलं, मिठाई, फळफळावळ, थोडे भडक परंतु सुंदर डेकोरेशन केलेला हिजड्यांचा नानाविध अलंकारांनी नटलेला 'अय्यप्पा-गणेश' स्थानापन्न झाला होता.. एका म्हातार्या, स्थूल व टक्कल पडलेल्या हिजड्यानं माझं स्वागत केलं.. तो त्यांचा म्होरक्या होता. बसायला खुर्ची दिली.. झमझम बारचा म्यॅनेजर तात्याशेठ! म्हणून मोठ्या ऐटीत माझी उठबस त्या मंडळींनी केली.. अगदी अगत्याने, आपुलकीने..!
हिजड्यांबद्दल काय काय समज असतात आपले? परंतु ती देखील तुमच्याआमच्यासारखी माणसंच असतात.. आपल्यासारख्याच भावभावना, आवडीनिवडी, रागलोभ असतात त्यांचे.. ते हिजडे कोण, कुठले, या चर्चेत मला शिरायचं नाही. ते धंदा करतात एवढं मला माहित्ये. चक्क शरीरविक्रयाचा धंदा.. पोटाची खळगी भरणे हा मुख्य उद्देश. आणि असतातच की त्यांच्याकडेही जाणारी आणि आपली वासना शांत करणारी गिहाईकं! कोण चूक, कोण बरोबर हे ठरवणारे आपण कोण?
मला सांगा - एखाद्या सिने कलाकाराने म्हणा, किंवा अन्य कुणा सेलिब्रिटीने म्हणा, दगडूशेठला किंवा लालबागच्या राजाला भेट दिल्यानंतर त्याचं होणारं आगतस्वागत आणि कामाठीपुर्यातल्या हिजड्यांच्या गणेशोत्सवाला तिथल्याच एका देशीदारूच्या बारच्या तात्या अभ्यंकराने भेट दिल्यावर हिजड्यांनी त्याच आपुलकीनं त्याचं केलेलं आगतस्वागत, यात डावंउजवं कसं ठरवायचं?
लौकरच एक अतिशय स्वच्छ प्लेट आली माझ्या पुढ्यात. वेफर्स, उतम मिठाई, केळी, चिकू, सफरचंद इत्यादी फळांच्या कापलेल्या फोडी, दोनचार उत्तम मावा-बर्फी, काजुकतलीचे तुकडे..!
तो म्हातारा हिजडा मोठ्या आपुलकीनं आणि प्रेमानं मला म्हणाला..
"मालिक, थोडा नाष्टा करो.."
"बादमे तुम्हे हमारा गणेशका पूजा करना है. और बादमे खाना भी खानेका..!"
बापरे..! 'मला यांच्या गणपतीची पुजा करायच्ये?' मला काही खुलासा होईना.. 'बघू नंतर काय होईल ते होईल, आपण आपली पुढ्यातली ही डिश खाऊन काहितरी कारण सांगून सटकू इकडनं..' अस ठरवून मी समोरच्या बर्फीचा एक तुकडा तोंडात टाकला.. सुरेखच होती बर्फी.. अगदी ताजी! :)
-- तात्या अभ्यंकर.
(अंतीम भाग - लौकरच)
प्रतिक्रिया
4 Sep 2010 - 2:24 pm | योगी९००
तात्या..
मस्त लिहिलेय..हिजडे हा एक कायम चेष्टेचा विषय असतो..कदाचित हा लेख वाचणारे ह्या पुढे त्यांची चेष्टा करणे (जर करत असतील तर) बंद करतील..
मला सांगा - एखाद्या सिने कलाकाराने म्हणा, किंवा अन्य कुणा सेलिब्रिटीने म्हणा, दगडूशेठला किंवा लालबागच्या राजाला भेट दिल्यानंतर त्याचं होणारं आगतस्वागत आणि कामाठीपुर्यातल्या हिजड्यांच्या गणेशोत्सवाला तिथल्याच एका देशीदारूच्या बारच्या तात्या अभ्यंकराने भेट दिल्यावर हिजड्यांनी त्याच आपुलकीनं त्याचं केलेलं आगतस्वागत, यात डावंउजवं कसं ठरवायचं?
माझ्या मते सिनेकलाकाराने दिलेली एखाद्या मंडळाला दिलेली भेट ह्यात दोन्ही बाजूचा फायदा बघितला जातो..त्यात ना प्रेम असते, ना आपुलकी , ना श्रद्धा..
लवकर पुढचा भाग टाका..
4 Sep 2010 - 2:24 pm | प्रचेतस
एकदम सहीच लेख...पुढच्या भागाची आतुरतेने वाट बघतोय. 'झमझम बार आणि तात्या' वरील अजून बाकीचे अनुभवही येउ द्यात.
अवांतरः रौशनीचे उरलेले भागही पुर्ण करा. शिवाय शिंत्रेगुरुजींचा अंतिम भागही टाकाच.
4 Sep 2010 - 7:22 pm | sagarparadkar
अवांतर मजकूराशी पूर्णपणे सहमत ... 'रौशनी' चे उर्वरीत भाग वाचण्यासाठी उत्सूक ...
4 Sep 2010 - 3:56 pm | डावखुरा
नेहमीप्रमाणेच उत्तम..पुढ्च्या भागाच्या प्रतिक्षेत..
तसेच वल्लीप्रमाणेच रौशनी पुर्ण करण्यास आग्रही..
आणि हे शिंत्रे गुरुजी काय प्रकरण आहे कृपया दुवा द्या...
4 Sep 2010 - 3:57 pm | अविनाशकुलकर्णी
खुप छान लिहिले आहे..पुढचे येवु द्या
4 Sep 2010 - 4:10 pm | काव्यवेडी
खूप छान लिहिले आहे. ते विश्व सामान्यजनान्ना फारसे माहीत नसते.
पण खरे आहे, ती ही माणसेच असतात ना शेवटी !!!!
अन्तिम भाग वाचायला उत्सुक आहे.
4 Sep 2010 - 5:24 pm | अवलिया
अतिशय उत्तम. लवकरात लवकर पुढला भाग टाकणे !
4 Sep 2010 - 5:30 pm | वेताळ
आपल्याला तरी आवडले. अजुन येवु द्या.
4 Sep 2010 - 5:57 pm | jaypal
>>>"बघू नंतर काय होईल ते होईल, आपण आपली पुढ्यातली ही डिश खाऊन काहितरी कारण सांगून सटकू इकडनं.."

हा हा हा . तात्या पोट-पुजा आवडली. पुजा, सोडपुजा ,तिर्थ-प्रसाद आणि दक्षिणा वसुलीची वाट बघतोय
4 Sep 2010 - 6:12 pm | अवलिया
तात्याचा लहानपणाचा फटु आवडला !
4 Sep 2010 - 11:37 pm | मी-सौरभ
फोटोत हातातली मिठाई पण दाखवायला पाहिजे :)
4 Sep 2010 - 6:02 pm | प्रियाली
हा भाग आवडला. खास तात्याश्टाईल. पुढला भाग लवकर टाका.
4 Sep 2010 - 7:09 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>हा भाग आवडला. खास तात्याश्टाईल. पुढला भाग लवकर टाका.
-दिलीप बिरुटे
4 Sep 2010 - 6:52 pm | पुणेरी मिसळ्पाव
Powered By: VideoBuzz
4 Sep 2010 - 6:54 pm | पिवळा डांबिस
छान उतरलाय हा भाग, तात्या.
हिजड्यांची दुनिया अपरिचित असते आपल्याला. ते फक्त घेराव घालून भीक मागतात एव्हढंच ठाऊक असतं.....
फार पूर्वी एकदा श्री. प्रमोद नवलकरांनी त्यांच्याविषयी लिहिलं होतं, भटक्या (की भ्रमंती?) मधून..
असो.
पुढल्या भागाची उत्सुकतेने वाट पहातोय....
तात्याच्या लिखाणाचा फॅन
पिवळा डांबिस
4 Sep 2010 - 7:06 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>श्री. प्रमोद नवलकरांनी त्यांच्याविषयी लिहिलं होतं, भटक्या (की भ्रमंती?) मधून..
पिडा, मीही प्रमोद नवलकरांच्या भटकंतीचा फॅन होतो. भटकंतीतूनच मुंबैची एक नवी ओळख होत गेली.
-दिलीप बिरुटे
4 Sep 2010 - 9:18 pm | मिसळभोक्ता
पुस्तकांतून हिजड्यांची ओळख होती.
प्रत्यक्ष अनुभव मिसळ्पाव (उर्फ झमझम बार) वर आला.
4 Sep 2010 - 7:24 pm | प्रियाली
हो नवलकरांनी विस्तृत लिहिले होते.
मला वाटते भटक्याची भ्रमंती
4 Sep 2010 - 7:00 pm | पुणेरी मिसळ्पाव
तात्यानू,
लेख जबरा आसा !
4 Sep 2010 - 7:14 pm | चतुरंग
पुढचा भाग टाका लवकर.
रंगा
4 Sep 2010 - 7:33 pm | बिपिन कार्यकर्ते
तात्या, पुढचा भाग टाक लवकर. हा भाग वाचून पुढे काय झाले ते वाचायची उत्कंठा लागली आहे.
4 Sep 2010 - 7:42 pm | अमोल खरे
खुप आयुष्य पाहीलाय तुम्ही तात्या.
4 Sep 2010 - 7:47 pm | निखिल देशपांडे
तात्या लवकर टाका हो पुढचा भाग
हा भाग आवडलाच
निखिल
4 Sep 2010 - 9:52 pm | अर्धवटराव
तात्यांच्या गल्ल्यावर येणार्या मंडळींची जत्रा, त्यांचे वर्णन, बेळगावच्या रावसाहेबांच्या बैठकिची आठवन करवुन जाते...
पुढील भाग लवकर येउ द्या तात्या.
(पु.ल.कित मांदिळायीतला) अर्धवटराव
4 Sep 2010 - 10:44 pm | शिल्पा ब
लेखन आवडले...पुढचा भाग टाका लवकर..
रोशनी प्रकरण पण पुर्ण करा.(आमच्यासाठी लिहायचे)
4 Sep 2010 - 11:35 pm | मस्त कलंदर
खरंय. या लोकांबद्दल काही माहित नसते. मध्येच कधीतरी विषय निघाला, तेव्हा कुणी म्हटलं की या लोकांची प्रेतयात्राही रात्री बारानंतर कुणाच्या नजरेला पडू नये अशी असते. खरंखोटं माहित नाही. मध्य प्रदेशात असे लोक घरकाम करतात म्हणे. असे इतरत्रही त्यांना स्वीकारले गेले तर त्यांचे आयुष्य थोडे सुसह्य आणि मानाचे झाले असते. मी सहसा भीक देत नाही. अगदीच लहान मुले-म्हातारे असतील तर जवळचा खाऊ देते म्हणजे तो निदान त्यांना मिळेल तरी.. पण या लोकांना मात्र पाच-दहा रूपये देते. असंही वाटतं, समाजाने त्यांना साधारण नोकरी-धंद्यात स्वीकारलं असते, तर कदाचित त्यांच्यावर ही वेळ आली नसती.
एकदा मी कुठेतरी जात होते. ट्रेन थांबल्या-थांबल्या मी टुणकन फलाटावर उडी मारली. 'तो' त्याच डब्यात चढायला आला होता. अभावितपणे म्हणाला, "संभालके बेटा...."
मी त्याच्या पाठमोर्या आकृतीकडे पाहात राहिले. :(
4 Sep 2010 - 11:39 pm | मी-सौरभ
:)
5 Sep 2010 - 4:31 am | दिपाली पाटिल
मस्त लेख तात्या, याचीही रौशनी होउ देउ नका...