हे लेखन माझा मित्र चंद्रशेखर महामुनीचे आहे. आधी इ-सकाळवर प्रकाशित झालंय पण त्याच्या परवानगीने इकडे प्रकाशित कर्तेय...
पल पल दिल के पास...
हर शाम आँखोपर तेरा आँचल लहेराये,
हर रात यादों की बारात ले आये
मै सॉंस लेता हूँ, तेरी खुशबू आती है
इक महका महका सा, पैगाम लाती है
मेरे दिलकी धडकन भी, तेरे गीत है
पल पल दिल के पास, तुम रहती हो
जीवन मिठी प्यास, ये कहती हो...
प्रियतमेच्या आठवणींचं, जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी सर्वत्र भासणाऱ्या तिच्या हव्याहव्याशा अस्तित्वाचं इतकं अप्रतिम वर्णन खूप कमी ठिकाणी वाचायला मिळतं. "मणिकांचन योग', "समसमा संयोग', "दुग्धशर्करा योग', असे जे काही शब्द आपण अशा वेळी वापरतो ते सारे शब्द, साऱ्या उपमा "ब्लॅकमेल' मधल्या या अनुपम गाण्यासाठी अगदी यथार्थ आहेत.
हिंदी चित्रपटातील काही गाणी अशी असतात, की एखादं गाणं आपण फक्त ऐकतो, तेव्हा त्याच्या चित्रीकरणाविषयी आपल्या मनामध्ये एक प्रतिमा तयार होते, पण जेव्हा ते गाणं आपण पडद्यावर पाहतो, तेव्हा मात्र भ्रमनिरास होतो. दिग्दर्शकानं आपल्या मनातल्या गाण्याची पार वाट लावलेली आपल्याला त्या वेळी दिसते. (रात का समॉं - लता - जिद्दी - या सुंदर गाण्याच्या बाबतीत मी स्वतः या अनुभवातून गेलोय.)
काही गाणी रुपेरी पडद्यावरच्या नितांत सुंदर चित्रीकरणामुळे मनात कायमची घर करून राहतात. (रमय्या वस्तावय्या - श्री 420, मेरे सपनों की रानी - आराधना) काही गाणी अशी असतात, त्यांची श्रवणीयता इतकी उच्च असते, की ती पडद्यावर न पाहताही आपल्या परिपूर्ण संगीताची अनुभूती देतात. "पल पल दिल के पास' मात्र या दोन्ही पातळ्यांवर आपल्याला आनंद देतं. तरल रोमॅंटिक गाण्यांमध्ये या गाण्याला खूप वरचं स्थान द्यावं लागेल; कारण ते "एव्हरग्रीन रोमॅंटिक' आहे.
सत्तरच्या दशकामध्ये इतिहास घडविलेल्या गुलशन रायच्या आणि देव-हेमामालिनीच्या "जॉनी मेरा नाम'च्या निमित्तानं गोल्डी (विजय आनंद) आणि संगीतकार कल्याणजी-आनंदजी यांची गाठ पडली. बॉक्स ऑफिसवर कोणती चाल हीट होईल, याचे अचूक अंदाज असणाऱ्या आणि सदासर्वदा गप्पांची मैफल जमविणाऱ्या बडबड्या कल्याणजींपेक्षा हळूवार, मितभाषी अशा धाकट्या आनंदजींबरोबर गोल्डींचे सांगीतिक सूर जास्त जुळले. त्यामुळे जॉनी मेरा नाम, ब्लॅकमेल, कोरा कागज या सगळ्या चित्रपटांमध्ये या दोघांनी एकत्र बसून जास्त काम केलं. "जॉनी'च्या बंपर यशानंतर राखी-धर्मेंद्रच्या "ब्लॅकमेल'साठी गाण्यांच्या सीटिंग्ज सुरू झाल्या.
राजेंद्रकृष्णसारखा पट्टीचा आणि अनुभवी लेखक-गीतकार या चित्रपटासाठी होता. गोल्डीला एक हळूवार प्रेमगीत हवं होतं. त्याचं शूटिंग कसं करायचं याचा विचार त्यानं आधीच पक्का केला होता.
त्यानं कल्याणजी-आनंदजींना गाण्याची सिच्युएशन सांगितली, "नायक एका मुलीवर प्रेम करतोय, पण ते तिला सांगायचं धाडस काही केल्या त्याच्यानं होत नाही एवढा तो लाजाळू आहे. आपल्या प्रेमभावना मग तो दररोज लिहायला सुरवात करतो, पण चिठ्ठी तिच्यापर्यंत पोचविण्याची हिंमत त्याच्यात नाही. अखेर एके दिवशी धाडस करून तो त्या सगळ्या चिठ्ठ्या, ती प्रेमपत्रं तिला देतो आणि नायिका वाचत असताना ती पत्रंच गायला लागतात. नायकाच्या भावना तिच्यापर्यंत पोचवितात.'
गोल्डीच्या डोक्यातली ही भन्नाट कल्पना ऐकून दोघंही चक्रावून गेले. याच्यावर गाणं कसं बनवायचं, हा प्रश्न उभा राहिला; कारण चिठ्ठ्या गाणार होत्या! कल्पनांची देवाण-घेवाण सुरू झाली. दिवस लोटले. गाण्याच्या शूटिंगचा दिवस येऊन ठेपला, पण चाल काही तयार होईना. आदल्या दिवशीच्या रात्री पुन्हा बैठक जमली आणि सर्जनशील गोल्डीच्या मनात एक ओळ उमटली, "पल पल दिल के पास, तुम रहती हो...' त्यानं ही ओळ सांगताच आनंदजींना लगेच त्याची चाल सुचली. "जीवन मिठी प्यास ये कहती हो...' गोल्डीला लगेचच पुढचे शब्द सुचले. लगेच त्यालाही चाल लागली आणि पाहता पाहता गाण्याचा मुखडा तयार झाला.
दुसऱ्या दिवशी राजेंद्रकृष्ण आल्यानंतर गोल्डीने त्यांना सगळा किस्सा सांगितला आणि क्षमा मागून मुखडा समोर ठेवला. राजेंद्रकृष्ण यावर काही बोलले नाहीत. त्यांनी बराच वेळ विचार केला, पण कदाचित त्यांनाही या मुखड्याला पर्यायी शब्द सुचले नसावेत. त्यांनी तेच शब्द कायम ठेवून अत्यंत अप्रतिम असे एकाहून एक सरस तीन अंतरे लिहून दिले आणि एका अवीट गाण्याचा जन्म झाला!
पण मंडळी खरा क्लायमॅक्स अजून पुढेच आहे. गाणं तयार झालं खरं, पण शूटिंग आधीच ठरलेलं असल्यानं रेकॉर्डेड गाणं हातात नसताना, गोल्डीनं गाण्याचं "मीटर' डोक्यात ठेवून, त्यानुसार धर्मेंद्रला गाणं गुणगुणायला लावून आपल्या अद्भुत कल्पनाशक्तीनं गाणं शूट केलं. त्यानंतर आपल्या "गोल्डन' आवाजात किशोरनं ते रेकॉर्ड केलं. आज हेच गाणं पाहात किंवा ऐकत असताना आपल्याला या सगळ्या गोष्टींचा पत्ता तरी लागतो का?
- चंद्रशेखर महामुनी
nishad.pune@gmail.com
प्रतिक्रिया
23 Aug 2010 - 11:47 pm | दिपाली पाटिल
व्हिडीओ अपलोड होत नाहीये...प्लिज हेल्प
24 Aug 2010 - 12:05 am | बहुगुणी
24 Aug 2010 - 12:00 am | मस्त कलंदर
पल पल माझ्या अत्यंत आवडत्या गाण्यांपैकी एक.
बाकी, काही गाणी प्रत्यक्षात पडद्यावर बघताना त्यांची वाट लागलेली असते यात वादच नाही. एकदा एका शेरशायरीप्रेमी मित्राने मला एक शेर ऐकवला,
"ये न थी हमारी किस्मत के विसाल(आता आठवतोय तो अर्थ- भेट)-ए-यार होता, यूंही जीते रहते, तेरा इंतजार होता." सांगताना त्या मित्राने इतका भावुक होऊन सांगितला की वाटले, किती आर्त भाव आहे या शेर-कम्-गझलेत. नंतर कळाले की हे गाणे म्हणून चित्रपटात घेतलेय. पाहायला गेले तर या एक बाई या गाण्यावर मुजरा करत टणाटण उड्या मारत नाचत होती. तेव्हापासून गाण्याचे शब्द, चाल आणि चित्रिकरण यांची गल्लत त्यातल्या त्यात कमी करायचा प्रयत्न करते. :)
आता आठवण आली म्हणून तो व्हिडिओ शोधायचा प्रयत्न केला. पण सापडेचना. राज कपूरचा कुठला तरी मूव्ही आहे तो.
24 Aug 2010 - 2:13 am | भीडस्त
>>"ये न थी हमारी किस्मत के विसाल(आता आठवतोय तो अर्थ- भेट)-ए-यार होता, यूंही जीते रहते, तेरा इंतजार होता." <<
गालिबच्या गझलेतला आहे.
मात्र तो
ये न थी हमारी किस्मत के विसाल ए यार होता,
अगर और जीते रहते यही इंतजार होता.
असा आहे.
>> किती आर्त भाव आहे या शेर-कम्-गझलेत <<
खरंच आहे हे .
>>तेव्हापासून गाण्याचे शब्द, चाल आणि चित्रिकरण यांची गल्लत त्यातल्या त्यात कमी करायचा प्रयत्न करते. <<
पते की बात आहे ही.
24 Aug 2010 - 1:04 am | हुप्प्या
विजय आनंद या माणसाच्या दिग्दर्शनाविषयी आदर होताच तो ही हकीकत वाचून वाढला.
माझ्या एका अत्यंत आवडत्या गाण्याचा कर्ता गोल्डी आहे हे ऐकून आनंद झाला.
जुन्या काळातील गाणी ही नवीन गाण्यापेक्षा कितीतरी जास्त ताजी वाटतात. आजही हे गाणे लागले की ऐकावेसे वाटते.
दुर्दैवाने देव आनंद सत्तरीच्या दशकात आपल्या गुणी भावाची साथ सोडून स्वतः दिग्दर्शनात शिरला आणि एकाहून एक बकवास सिनेमे काढले.
अनेक सुरेल, सुंदर गाणी ही पडद्यावर बघितली की डोक्यावर हात मारून घ्यावासा वाटतो हे अगदी खरे. माकडाच्या गळ्यात माणिक ह्या म्हणीची आठवण होते. (हे गाणे तसे वाटले नाही).
जुन्या काळातले गायक, संगीतकार, गीतकार हे आपल्या क्षेत्रात प्रतिभावंत होते आणि कष्ट करण्यातही कमी नव्हते हे जाणवते. पुन्हा ते सुवर्णयुग येणे नाही. असो.
जाता जाता: ब्लॅकमेल हा चित्रपटही ठीकठाक आहे (माझ्या मते). विशेषतः नायक आणि खलनायक हिंदी सिनेमात बर्याचदा पांढर्या आणि काळ्या रंगाने रंगवले जातात. ह्यातला शत्रुघ्न सिन्हा हा खलनायक थोडा ग्रे शेडमधे रंगवलेला वाटला. त्याच्या जाळ्यात अडकलेली राखी नंतर धर्मेंद्रला आपला मानते आणि मग ब्लॅकमेल.
24 Aug 2010 - 1:20 am | विलासराव
माझं हे सर्वात आवडत गाणं.लहान असताना कधीतरी ऐकलं होतं. अर्थ कळत नव्ह्ता तेव्हाही ते आवडलं होतच. नंतर फक्त गाणं आवडत होते म्हनुन सिनेमाही पाहिला. आजही हे गाणं माझे सर्वात आवडीचे गाणे आहे.