सर्व मिसळपाव सभासदांना चैत्रपाडव्याच्या शुभेच्छा! आज चैत्रपाडव्याच्या निमित्ताने काही ओळी सुचल्या.
चैत्रामधले मैत्र!
चैत्रपाडवा नववर्षाचे आला उधळित रंग
मोहरलेले तरुवर झुलती गाती गीत विहंग
सांजसकाळी मत्त कोकिळा करिती मधुकूजन
प्रितीचे बांधून पदिपैंजण मोर करी नर्तन
कविताशाखेवरी बैसला वाल्मिकी कोकिळ
रामनामजप करिता रचिले रामायण सकळ
वैराग्याचा वसंत फुलवी ज्ञानेश्वर माउली
वसंत वीरांचा सजवाया जगदंबा पावली
नवीन पर्वासाठी फुंकू आता नवी तुतारी
नवीन आव्हाने पेलाया वंदू नवगिरिधारी
नवी झडू दे मानवतेच्या विजयाची नौबत
नव्या भारता लिहावयाला नवा पार्वतीसुत
गुढी उभारू आनंदाची, अभिमानाची आज
सख्यत्वाची चंपकमाला सत्यशिवाचा साज
सुराज्य संकल्पना दाखवी रामराज्य भूवरी
उठा, चला संकल्प करुया शुभमंगल वासरी
नकोच आम्हा विजय पाशवी क्रूर रक्तरंजित
नकोच दुबळ्या अश्रापांच्या आक्रोशाचे गीत
विश्वमंगलाच्या सूर्याला करू नमस्कार
चैत्रामधले मैत्र मनांचे स्वर्गसुखालंकार
जनगणमानसमंदिरावरी झळके विजयपताका
सघोष संचलनात गाजतो विमलयशाचा डंका
किल्ल्यावरुनी रायगडाच्या तोफांचे चौघडे
ग्वाही देती आज मराठी पाऊल पडती पुढे
-- अशोक गोडबोले, पनवेल.
प्रतिक्रिया
6 Apr 2008 - 8:43 pm | विसोबा खेचर
वा गोडबोलेसाहेब! केवळ अप्रतिम कविता...
वैराग्याचा वसंत फुलवी ज्ञानेश्वर माउली
वसंत वीरांचा सजवाया जगदंबा पावली
नकोच आम्हा विजय पाशवी क्रूर रक्तरंजित
नकोच दुबळ्या अश्रापांच्या आक्रोशाचे गीत
किल्ल्यावरुनी रायगडाच्या तोफांचे चौघडे
ग्वाही देती आज मराठी पाऊल पडती पुढे
या ओळी अतिशय आवडल्या. सुंदर...!
गोडबोलेसाहेब, आपल्यालाही गुढीपाडव्याच्या मनापासून शुभेच्छा!
अवांतर - आपली कविता वाचून आपल्या घरी फोन केला होता, परंतु आजच आपले पनवेलात ज्ञानेश्चरीवर प्रवचन आहे असे काकूंकडून कळले. असो, सवडीने केव्हातरी पनवेलात आलो की आपली भेट अवश्य घेईन..
तात्या.
8 Apr 2008 - 10:05 pm | प्राजु
अतिशय सुंदर वर्णन. कविता खूप आवडली.
शब्दरचना आणि योजना अप्रतिम.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
8 Apr 2008 - 9:34 pm | चतुरंग
अशोकराव, आपल्या काव्याच्या उंच गुढीने मन उल्हसित झाले, धन्यवाद!
चतुरंग