आता यात काय लिहायचे असे वाटेल तुम्हाला...पोहता येत नसेल तर क्लास लावायचा आणि हात पाय मारताना थोडेफार नाका-तोंडात पाणी जाऊन काही काळाने पोहायला जमते..
खरं तर हीच प्रक्रिया आहे...पण...
मला आत्तापर्यंत पोहता येत नव्हते...म्हणजे आता येते अशातला भाग नाही पण आताशा मी पाण्याला घाबरून काठावर उभी राहत नाही एवढंच..मला पाण्याची फार्फारच भीती वाटत आलीये...अजूनही वाटते...अंघोळ करताना डोक्यावरून जास्त पाणी घेतलं तरी एकदम धबधब्याखाली आले असं वाटून डोळे उघडून कितीतरी वेळा साबण डोळ्यात गेला असेल... पाण्यात कायम मगर, सुसर आणि शार्क असतातच असं मला आपलं वाटायचं, आणि डोळे बंद करून पोहायचं म्हणजे संकटच....आला समजा शार्क नाहीतर मगर तर डोळे बंद केल्यावर कसं कळणार? आणि डोळे उघडे ठेवले तर डोळ्यात पाणी जाऊन डोळे चुरचुरतात त्यामुळे उगाच पोहायच्या भानगडीत पडले नाही कधी...माझ्या पोहायच्या विरुद्ध असायला जन्मदात्रीचे वेगळेच कारण होते...पुलात पोहून पोहून मी काळी पडले तर माझ्याशी लग्न कोण करणार?
खूप लहान असताना मांडवगणच्या गीतेच्या क्लासच्या सहलीला पंढरपूरला गेले होते तेव्हा चंद्रभागेत बरेच लोक उतरले, ते उतरले म्हणून मी पण...आणि ५ एक वर्षाची असतानाच विठ्ठलाला भेटायला जायची वेळ आली होती...तेव्हापासून मी देवापासून दोन हात लांबच राहते.
लग्न झाल्यावर नवऱ्याला एकदा हौसेने म्हंटल मला पोहायला शिकव तर याने मला पुलात नेलं आणि माझं डोकं पाण्यात दाबून धरलं...काय तर म्हणे अशाने भीती जाते...जीव गेल्यावर भीती कशाची?
तर कालेजात पोहण्याचा क्लास होता तो करू का नको करत घेतला...नाव नोंदवायच्या आधी कोचला सांगितलं कि मी आत्तापर्यंत मुद्दामहून कधीही पाण्यात गेलेले नाही..
आता मुंबईत पावसाळ्यात आमच्या गल्लीत ५-५ फुट पाणी जमायचे आणि त्यातून मी अनेकदा गेले आहे हे तिला सांगायची गरज नव्हती म्हणून नाही सांगितलं ...आणि त्या
पाण्यात इतके लोक ये-जा करीत असतात कि बुडू म्हंटल तरी बुडायचे नाही...असो,
तर ब्याक टु माझं पोहणं...तर मी कोचला सांगितल्यावर ती म्हणाली हा क्लास बिगीनरसाठीच आहे...म्हंटल चांगलं आहे ...सगळे आपल्याचसारखे असतील त्यामुळे फजितीचा प्रश्न
फारसा नाही...पहिल्या दिवशी पहिले तर मी आणि अजून एक दोन मुलं सोडली तर बाकीचे लोक छान पोहत होते...मी पायरीजवळच्या पाण्यात उभी कारण त्यापुढे जायची हिम्मत होत नव्हती...पूल प्रचंड मोठा आहे...३ १/२ फुटापासून ८ फुटापर्यंत खोल आणि साधारण २५-३० फुट लांब एवढा मोठा आहे.. ४.५ फुटावर एक मोठा दोर मध्यावर बांधला
कोच आल्यावर आधी वॉर्मअप म्हणून पाण्यात धावायला लावले...त्याने अंगात उष्णता निर्माण होऊन पाणी तेवढे गार वाटत नाही...
मी कधीच २ फुटाच्या वर गेले नसल्याने आजूबाजूला लोक आहेत आणि कालेजवाले आपल्याला मरू देणार नाहीत हे जाणवल्याने मीसुद्धा पाण्यात धावायचा प्रयत्न केला....आणि साधारण ४.५ ते ५ फुटापर्यंत गेल्यावर प्रचंड भीती वाटली आणि तोल जायला लागला...म्हंटल आता मी बुडणार...लगेच जवळच असणाऱ्याचा भसकन हात धरला आणि पाणी कमरेखाली आल्यावर गुपचूप कडेला जाऊन उभी राहिले....
माझी हि अवस्था पाहून थोडेसे बेसिक शिकवल्यावर बेल्ट लावायला दिला...मी बुडू नये म्हणून ...तर त्या बेल्टने मला काही पाय खाली ठेवता येईना आणि धड पोहताही येईना...एकदम त्रिशंकू होऊन गेले...दोनतीन वेळा तर ३.५ फुट खोल पाण्यातच गटांगळ्या खाल्ल्या...क्लास संपल्यावर दुसरा एक कोच जो थोड्या वरच्या लेवलला शिकवायचा त्याने काही टिप्स द्यायचा प्रयत्न केला...
" असं श्वास घेऊन खाली जायचं आणि हळूहळू श्वास सोडायचा "
मी श्वास घेऊन खाली गेले आणि फुस्कन सगळा श्वास सोडला आणि भसकन पाणी नाका तोंडात...
"घरी बादलीत पाणी घेऊन त्यात सराव कर"
"बरं" असं सांगून केला नाही तो नाहीच... शेवटी विद्यार्थी असण्याचा पुरावा नको का?
आणि काय यड्यासारख बादलीत तोंड घालून बसायचं ...त्यापेक्षा पुलात बुडलेल परवडेल हासुद्धा एक विचार होताच...
सारखंसारखं बुडून वैताग आला शेवटी मी म्हंटल आता या बाईचं ऐकलं पाहिजे...म्हणतीये अंग सैल सोडून श्वास धरून डोक घाल पाण्याखाली तर घालावं....काही मरेपर्यंत बुडू द्यायची नाही...शेवटी तिचेही रेप्युटेशन आहेच नाही का? थोडा श्वास धरून डोक घातलं पाण्याखाली आणि कसलासा फोमचा बोर्ड धरून पाय मारायला लागले ....काय आश्चर्य २ एक फुट तरी पोहता आले असेल...मग काय महाराजा !!!...भीती झाली ना कमी...मग एकदम जन्मजात कोळीण असल्यासारखं पोहायचा प्रयत्न करायला लागले...डोकं फार काळ पाण्याखाली ठेवायची हिम्मत अजूनही होत नव्हती पण बर्यापैकी बेल्ट न लावता जमायला लागलं...बऱ्याच जणांनी मी इतका मनापासून प्रयत्न करताना पाहून मदत केली, कौतुक केलं...आमच्या पोहायच्या बाईंनी तर दुसरा वर्ग चालू होईपर्यंत सराव करण्याची मुभा दिली...हळू हळू जमायला लागले आणि दोनचार स्ट्रोक सुद्धा जमायला लागले...
आता तर पाण्याची भीती बऱ्यापैकी कमी होऊन थोडफार पोहता येतं...काहीही झाले तरी पाय जमिनीवरच ठेवायचे हे मी लहानपणापासूनच ठरवले असल्याने इथेही उगाच फार खोल मी शिरत नाही आणि पाय जमिनीवर टेकतील इतपर्यंतच जाते...तरी हेही नसे थोडके.
प्रतिक्रिया
14 Aug 2010 - 10:45 am | विलासराव
मला तर दुसरीत असताना आमच्या गावी सरळ काठावरून विहिरीत ढकलून देण्यात आले. सरळ तळाला जाउन आपोआप वरती आलो.घाबरलो होतोच पण आठच दिवसात चांगले पोहयला शिकलो.
बाकी नवीन शिकनारया लोकांची उडालेली तारांबळ बघुन गंमत वाटते.
14 Aug 2010 - 11:18 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
छान लिहीलं आहेस शिल्पा!
मला आणि माझ्या एका कलीगला दोन-तीन महिन्यापूर्वी अचानक जाणीव झाली, आता तिशी आली आणि आपल्याला पोहोता येत नाही. मग रीतसर कापडचोपड, चष्मा खरेदी झाली. जवळच दुसर्या सर्कारी संस्थेत तरणतलाव आहे, सकाळी सातला तिथे जायचो. तीच वेळ दोघींना मिळून सोयीची होती आणि आमची दोघींची फजिती बघायला इतर कोणी नसेल म्हणून! पाण्याच्या भीतीच्या बाबतीत मी तुझ्यापेक्षा काकणभर सरसच असेन... यू ट्यूब झिंदाबाद करत दोन आठवड्यांनी पाणी कमीत कमी उडवत मी फ्री स्ट्रोक शिकले पण अजून डोकं बाहेर काढून श्वास घेता येत नाही. त्यामुळे एका श्वासात जाता येईल तेवढं जायचं इतपतच दोघींची प्रगती झाली.
आणि मग पाऊस आला. तलाव उघड्यावर असल्याने स्वाईन फ्लू, टायफॉईड, इ इ. गोष्टींना घाबरून पुन्हा पोहोणं बंद! पुढच्या उन्हाळ्यापर्यंत उत्साह टिकला तर पुढे शिकेन पोहायला ... नाहीतर सगळ्या गोष्टी सगळ्यांना यायलाच पाहिजे असं थोडीच आहे असं स्वतःलाच सांगायचं आणि पुन्हा एक ना धड... दुसरं काहीतरी शिकायला सुरूवात करायची.
14 Aug 2010 - 11:23 am | अप्पा जोगळेकर
मी पहिलीत असतानाच शिकलो पोहायला. पोहायची जबर आवड आहे. नदीत अनेकदा आणि ऑलिंपिक साईझ टँकात नेहमीच पोहणं चालू असतं. सलग अर्धा तास पोह्ण्यापर्यंत मजल मारली आहे.
२५-३० फुट लांब एवढा मोठा आहे.
तुम्हाला २५-३०मीटर म्हणायचं आहे का? २५-३० फूट म्हणजे खूपच छोता टँक होईल.
पुलात पोहून पोहून मी काळी पडले तर माझ्याशी लग्न कोण करणार?
या कारणासाठी माझ्याबरोबर पोहायला येणार्या एका मित्रासाठी पाहणं सुरु झालं आणि पोहणं बंद झालं. त्याला सांगितलं की इथे ओझोन फिल्ट्रेशन आहे अजिबात काळा होणार नाहीस. पण त्याचे कुटुंबीय ऐकायलाच मागत नाहीत. एकच डोक्यात की पूलमधे पोहून काळं व्हायला होतं.
14 Aug 2010 - 11:47 am | परिकथेतील राजकुमार
या धाग्यावरील प्रतिसादातून पुढील मुद्द्यांवर प्रकाश पडावा अशी अपेक्षा आहे:-
याव्यतिरिक्त इतर माहिती असल्यास तीही येथे द्यावी. धन्यवाद.
14 Aug 2010 - 3:46 pm | असुर
आवरा!!! एक नंबर!!!
अतिशय वाचनीय आणि विचार करायला लावणारा प्रतिसाद... ;-)
--असुर
14 Aug 2010 - 3:51 pm | अप्पा जोगळेकर
आवरा!!! एक नंबर!!!
+१. मी अगदी तब्येतीत रिप्लाय वगैरे केला. आणि आत्ता क्रेमर यांचा शेअर बाजार वाला धागा पाहिला आणि मग ट्यूब पेटली.
14 Aug 2010 - 11:59 am | भारतीय
धाग्याच्या शिर्षकावरूनच समजलं कि कुणी लिहिलं असावं ;).. बादवे, फार छान लिहिलं आहेच.. तुमच्याकडून अजून लिखानाच्या प्रतिक्षेत (ईथे!! मिसळपाववर!)..आजपर्यंत तुम्हाला (मी तरी) ईथे फक्त प्रतिसादांमधे वाचलं.. मिपाकरांनाही समजू द्यात तुमच्या लेखणीची जादू..
14 Aug 2010 - 12:22 pm | अप्पा जोगळेकर
सामान्य व्यक्तिस नियमीत पोहणे (वेळ तसेच आवश्यक असलेली माहिती विचारात घेता) शक्य आहे काय?
होय. सामान्य माणसास नियमित पोहणे शक्य आहे. सामान्य माणसासाठी वीस मिनिटे ते अर्धा तास पोहोणे सुद्धा खूप झाले त्याने उत्तम व्यायाम तर होतोच शिवाय पोहोण्याचा आनंदही मिळतो. त्याहून अधिक पोहल्यावर दिवसभारातली कामे करताना खूप झोप येत हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. पोहोल्यानंतर घरी येउन वेगळी आंघोळ करावी लागत नाही. त्यामुळे ती एक रुटीन अॅक्टिविटी आटपते. काहीजणांना पूलच्या बाथरुम्समध्ये आंघोळ करायला आवडत नाही. तसे असल्यास गोष्ट वेगळी.
पोहताना तांत्रिक विश्लेषण (Technical analysis) योग्य की मूलभूत विश्लेषण (Fundamental analysis) योग्य?
मूलभूत विश्लेषण आधी करावे. जसे स्विमिंग टँक स्वच्छ आहे की नाही , फिल्ट्रेशन आहे का, असल्यास ओझोन आहे की क्लोरीन आहे इत्यादी. याशिवाय उड्या मारण्यासाठी किंवा डायव्हिग साठी किती मजले आहेत, टँक मोठा आहे की छोटा हीदेखील महत्वाची गोष्ट आहे. छोट्या टँकमध्ये पोहणे हा अतिशय खराब अनुभव आहे.
(१२-१३ वर्षांपूर्वी पुण्यात स्वारगेट टँकवर पोहोलो होतो. इतका भिकार टँक कधी पाहिला नाही. सगळीकडे पाच फूट आणि लांबच लांब टँक. कहर म्हणजे फिल्टरेशन सिस्टिमच नाही. आणि कित्येक पोरे ज्यांच्यापैकी अनेक झोपडपट्टीतली असावीत ती तर दिगंबर अवस्थेत पोहत होती. डोकंच फिरलं होतं. )
तांत्रिक विश्लेषणात कुठल्या पद्धती (बॅक स्ट्रोक, बटरफ्लाय वगैरे) फायदेशीर ठरू शकतात?
याबाबत तज्ञांनीच सल्ला दिला पाहिजे. मला बटर्फ्लाय पद्धतीने आजवर कधीही नीट पोहोता आलेलं नाही. अनेकदा प्रयत्न केले पण फारच अवघड आहे. पण जर यापद्धतीने पोहोता आलं तर धमाल. प्रचंड वेग आणि नजाकतदार स्टाईल. पाहात राहावंसं वाटतं.
- ( जलदेव फेल्प्सचा फ्यान)
14 Aug 2010 - 12:28 pm | piu
मला माझ्या स्विमिंग क्लासची आठवण आली. तरी बर तुमची पाण्याची भिती तरी गेली.
14 Aug 2010 - 12:52 pm | शिल्पा ब
सर्वांना धन्यवाद.
अवांतर : अदितीने कौतुक केले हे वाचून आनंद झाला..(ती सहसा कुणाचं कौतुक करायच्या भानगडीत पडत नाही)
आणि अवांतर प्रतिसाद न दिल्याबद्दल (अजूनतरी) परत धन्यवाद.
14 Aug 2010 - 12:55 pm | सहज
अनुभव छान लिहलाय तसेच प्रेरणादायी वाटतो.
14 Aug 2010 - 2:44 pm | Dhananjay Borgaonkar
माझ्या पोहायच्या विरुद्ध असायला जन्मदात्रीचे वेगळेच कारण होते...पुलात पोहून पोहून मी काळी पडले तर माझ्याशी लग्न कोण करणार?
लग्न झाल्यावर नवऱ्याला एकदा हौसेने म्हंटल मला पोहायला शिकव तर याने मला पुलात नेलं आणि माझं डोकं पाण्यात दाबून धरलं...काय तर म्हणे अशाने भीती जाते...जीव गेल्यावर भीती कशाची?
मेलो हसुन हसुन हे वाचल्यावर्.खुप मस्त रंगवलाय अनुभव. असेच मजेशीर अनुभव लिहित चला.
मी सुद्धा १० वी च्या सुट्टीत पोहायची शिकवणी लावली होती. आमचा मास्तर एकदम बिलंदर.
तीसर्या दिवशी पाण्याची भिती जावी म्हणुन त्याने मला आणि माझ्या मित्राला टिळक तलावाच्या पहिल्या मजल्यावरुन उडी मारयला सांगितली. मित्र शुरवीर त्याने लगेच मारली. मला खाली बघुनच चक्कर आली. आणि त्यातच मागच्या एकाने धक्का दिला का तर मी उडी मारत नव्हतो म्हणुन. झाल नाका तोंडात एवढ पाणी गेल की दुसर्या दिवसापासुन शि़कवणी बंद.
14 Aug 2010 - 5:05 pm | शानबा५१२
अरर्रे बाप रे!!!!
खरं की काय!!!!
तिला खोट वाटेल हे माहीती होत्,म्हणुन नसेल सांगितलत,पण आम्हालाही थापच वाटते.
1 feet = 30 cm
5 feets = 5 X 30 = 150cm.
अस कोणाच झाल्याच ऐकीवात आहे का? मग मला त्या पुलाचा पत्ता द्या निदान तिथे तरी आमची सहचारणी मिळेल आम्हाला! नाहीच मिळाली तर कुणाला तरी उचलुन टाकेन म्हणतोय!!
(ह्यावरुन आमच्या एका केनियाच्या मैत्रीणीने पाठवलेले निबंधासारखे भलेमोठे ईमेल्स आठवले,ती आम्हाला अजुनही लय गॉड वाटते!!)
MJ Rules!
14 Aug 2010 - 3:16 pm | मदनबाण
ह्म्म... ठाण्याला मी तरण तलावात माझ्या मित्रा बरोबर पोहायला शिकण्यासाठी जात असे ते दिवस आठवले...
पहाटे पहाटे मी त्याच्या बंगल्यावर त्याला बोलवण्यासाठी जात असे... त्याच्या घरी जाताना मला लयं भ्या वाटायच्...आधीच त्याचा बंगला जरासा जंगलातच होता,त्यात त्याच्या घरा जवळ रात राणीची काही झाडे देखील होती...व रातराणीच्या झाडा जवळ साप असण्याची शक्यता जास्त असल्यामुळे जास्तच भिती वाटायची...त्यात भरीस भर म्हणुन त्याच्या घरा जवळ बिबळ्या देखील येत असे !!! माझी तर जाम टरकायची...मुख्य गेट पासुन मी राम राम राम म्हणत घाई घाईत चालत आजु बाजुला न पाहता पावले झपा झप टाकुन त्याच्या बंगल्याच्या दरवाजा पर्यंत पोहचत असे...पण जसा मी त्या दरवाज्या जवळ पोहचत असे की माझा धीर सुटायचा !!! मी दना दन त्याच्या घराची बेल वाजवायला सुरवात करत असे...एकदा घरात शिरल्यावर माझ्या जिवात जिव येत असे...
तरण तलावातला एक प्रशिक्षक तर फार रानटी होता... हातानी पाण्यावर फटके मारुन तो आमच्या चेहर्यावर पाण्याचे फटकारे मारायचा...हालत फार खराब व्ह्यायची...क्लोरीनमुळे डोळे पार लालेलाल होउन जात... आमचे आम्हीच प्रयत्न करुन पोहायला शिकलो.
14 Aug 2010 - 3:41 pm | तिमा
पोहणे हा एक अतिशय आनंददायी प्रकार आहे. पण वजन कमी करायचे असेल तर त्याचा मला काही उपयोग होत नाही. कारण पोहल्यानंतर इतकी भूक लागते की खर्च झालेल्या कॅलरीजच्या दुप्पट कॅलरीज शरीरात जमा होतात.
प्रत्येक व्यक्तिला पोहता आलेच पाहिजे नाहीतर कधी पाण्यात पडलं तर मरणच!
14 Aug 2010 - 3:49 pm | असुर
शिल्पातै, लेख अतिशय मस्त.
आमचे पोहायला शिकलो तेव्हाचे प्रताप आठवले. एकदा एका सज्जनाच्या पाठीवर डाइव्ह मारून त्याला ३ महिन्यांसाठी जायबंदी केला होता. तो सज्जन मनुष्य माझा 'कोच' असल्याने नंतर त्याने माझी पाठ मोडेपर्यंत सराव करून घेतला माझ्याकडून! असो!
--असुर
14 Aug 2010 - 4:55 pm | स्वाती२
अनुभव कथन आवडले.
14 Aug 2010 - 5:29 pm | मी-सौरभ
तेव्हा पोहायला शिकलच पाहिजे...
(आभारः ईंडिया टिव्ही, आज तक, .........)
14 Aug 2010 - 5:35 pm | स्वाती दिनेश
लेख आवडला, माझे पोहोणे शिकण्याचे दिवस आठवले.. ६वी,७वीत असेन .. भीती नव्हती कधी वाटली आणि पोहायलाही शिकले ५,६ दिवसात.. १५ फूट खोल पाण्यातही जाऊ लागले. पण १ल्या मजल्यावरुन खाली उडी मारताना मात्र खूप घाबरलेली होते. मैत्रिणीने मागून ढकलून दिले. पाण्यावर वेडीवाकडी पडून हबकले.. परत बरेच दिवस स्प्रिंग बोर्डावरुन सुध्दा उडी मारायचे धाडस होत नव्हते.. मग हळूहळू भीती गेली.बटरफ्लाय स्ट्रोक मात्र जमला नाही कित्येक दिवस, अजूनही नीट जमत नाहीच म्हणा! बट पोहोणे इज प्लेजर..
स्वाती
14 Aug 2010 - 5:57 pm | मदनबाण
प्रकटाआ...
14 Aug 2010 - 6:10 pm | मीनल
मी ही दोन चार वर्षापूर्वी हट्टाने शिकले पोहायला.
पहिल्यादिवशी संपूर्ण शरिर दूखत होते. पेन किलर पिल्स घेतल्या.
नंतर जरा कमी कमी होतं गेले. पण नंतर न ओळखण्या इतकी काळी कुट्ट झाले होते तेव्हा.
14 Aug 2010 - 9:16 pm | दीविरा
पोहण्यावरुन सहजच आठवले, पुण्यात कुठे तरण तलावा मध्ये करायचे व्यायाम प्रकार शिकवतात का?
मराठीत प्रथमच टाईप केले आहे.चुक भुल समभाळुन घेणे.
14 Aug 2010 - 11:38 pm | राजेश घासकडवी
पोहोण्याची भीती माझ्या जनुकांमधूनच आली. आमचे आईवडील पाण्याला प्रचंड घाबरतात. एकदा गेटवे ऑफ इंडियाला गेल्यावर मी हट्ट केला म्हणून मला बोटीतनं फिरायला घेऊन गेले. अर्ध्या तासाची वगैरे ती फेरी असेल, पण त्या काळात ते बोटीच्या मध्यभागी उभं राहून, टायर्स वगैरेना दृष्टीपथात ठेवून, जीव मुठीत धरून उभे होते. बोट जरा हलली की त्यांच्या मनात धाकधुक व्हायची. अर्थातच मला पोहायला वगैरे शिकवण्याचं धार्ष्ट्य झालं नाही. मी अठरा-एकोणीस वर्षांचा असताना शिकलो. पण पाण्याची भीती पूर्णपणे गेली नाही. आता मला तरंगता येतं. पण महत्त्वाचं म्हणजे माझ्या मुलाला शिकवता येतं. तो एक नंबरचा पाणी-प्रेमी आणि शूरवीर. पावणेदोन वर्षांचा असतानाच पोहायला नेल्यावर दोन तीन दिवसांतच इतरांचं बघून त्याने आपली आपण दाणकन पाण्यात उडी मारली. तेव्हा निदान पुढच्या पीढीचं भविष्य उज्वल आहे म्हणायचं.
16 Aug 2010 - 2:12 am | इंटरनेटस्नेही
चांगला लेख आहे. माझ्या पोहोन्यासंबंधीच्या जुण्या आठवनी जाग्या झाल्या.
16 Aug 2010 - 9:56 pm | चतुरंग
भरपूर हासलो! :)
आमचे जलतरणाचे उपद्व्याप इथे वाचता येतील! ;)
(जलप्रेमी)चतुरंग