पुर्वसुत्र - तेजोनिधी सावरकर - लेख २ -जीवनपट १
इंग्लंडच्या बोटीतून उतरून ट्रेनच्या डब्यात बसल्या क्षणीपासून इंग्रज गुप्तहेरांचा पहारा होताच, ती ट्रेन लंडनच्या स्टेशनांत घुसताच सावरकर धरले गेले, ह्याच प्रसंगी त्यानी माझ्या मागच्या लेखात वर्णन केलेली माझे मृत्युपत्र हे काव्य लिहिले. सगळीकडे बातम्यांचा, अफवांचा गदारोळ उडाला, जगातल्या सर्व प्रमुख वृत्तपत्रात हि बातमी झळकली ह्यावेळेपर्यंत त्यांना आपल्याला अटक कुठल्या गुन्ह्यासाठी केलेली आहे हे ही माहीत नव्हते. तिथल्या कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार सावरकरांना परत भारतातल्या कोर्टापुढे पाठवायचे ठरले. कारण भारतातल्या कोर्टापुढे विनाविलंब फाशी किंवा जन्मठेप देता आली असती. त्यांना नेणारे जहाज यदाकदाचित फ्रेंच किनारयाला लागलेच तर, झटपट हालचाल करून वैध वा इतर धाडसी मार्गाने सुटकेची योजना तयार होतीच. म्हणूनच कदाचित कुठल्याही राष्ट्रीय बंदराला न लागता थेट भारतात पाठवण्यासाठी अनेक बड्या बड्या पोलीस अधिकाऱ्यांबरोबर कडेकोट बंदोबस्तात तात्याराव जहाजावर चढवले गेले.
जहाज मार्सेलिस बंदराजावळून जात असता मोठ्या धाडसाने जहाजाच्या पोर्ट होल मधून उडी मारून तात्याराव कसे पळाले ह्यावर एक स्वतंत्र लेख लिहायचा मानस आहे. फ्रेंचांच्या स्वतंत्र भूमीवर एका अनधिकृत प्रवेश केलेल्या तरुणाला फ्रेंच कायद्याप्रमाणे शिक्षा व्हायला हवी होती. पण त्यांना परत इंग्रज पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्या अपेशी काळरात्रीची कथा लेखमालेचा एक सुरस भाग ठरावी हे उचितच. उर्वरीत प्रवास अत्यंत सशस्त्र कडेकोट पहाऱ्यात होऊन शेवटी मातृभूमीस पाय लागले.
पण मार्सेलिसचे साहस अगदीच वाया गेलेले नव्हते, तिकडच्या काही अभिनव भारताच्या सदस्यांनी आपले वजन वापरून, दबाव इतका वाढवला कि सावरकरांना पुन्हा आपल्या ताब्यात द्यावे असे फ्रेंच सरकारचे पत्र येऊन पोचले, इंग्लंड व फ्रेंच सरकारचे राजकीय संबंधात वितुष्ट येते कि काय इतका तणाव वाढला. हे प्रकरण हेग च्या आंतरराष्ट्रीय न्यायालयात सोपवावे लागले. इकडे हिंदुस्थानात त्यांच्यावरचा खटला सुरु होण्यापूर्वीच गडबडीने एक कायदा पास करून घेतला, ‘स्पेशल ट्रायब्युनल’ असे त्याचे नाव, ह्या कायद्याप्रमाणे सरकाने नेमलेल्या तीन जज्जांना अपिलाशिवाय फाशी देण्याचा अधिकार मिळाला. वा रे न्याय, एका आरोपीसाठी नवीन कायदा.
या खटल्यातील किस्से एका स्वतंत्र लेखासाठी राखून ठेवत आहे, तर अशा सगळ्या जामानिम्यात, तारीख २३ डिसेंबर १९१० उजाडली, कोर्टाच्या कामाकाजात न्यायाधीशांनी सावरकरांचे नाव घेऊन सांगितले “ तुम्हाला फाशीच व्हायची पण आम्ही आजन्म काळ्यापाण्याची शिक्षा सांगतो !! “ सावरकर अर्धे उठले, ताठ मानेने गरजले ‘वंदे मातरम’
आजन्म ह्याचा कायद्याच्या भाषेतला अर्थ आयुष्यातली उमेदीची वर्षे – २५ वर्षे, पण लगेच त्याच पुराव्याखाली दुसरा खटला भरण्यात येऊन सावरकरांना त्याही खटल्यातली शिक्षा सुनावली गेली, अजून एक जन्मठेप म्हणजे ह्या २६ वर्षाच्या तरुणाला एकूण शिक्षा झाली ५० वर्षे.
माझे डोळे आत्तासुद्धा भरून येत आहेत, हे लिहिताना.... वयाच्या २६व्या वर्षी मला काय अक्कल होती? कसले वेड होते? आणि हा तेजस्वी तरुण कुठल्या ध्येयासाठी हसत हसत बळी जात होता.
हा तेजोनिधी प्रकाशगोल कारागृहाने १९१० साली असा गिळला, तो दिव्य प्रकाश जगाला पुन्हा पहायला मिळाला १९२४ साली. लक्षपटीने अधिक तेजपुंज होऊन. या कारागृहातील काळावर लिहिलेली ‘माझी जन्मठेप’, तेथील जागृतीचे, शुद्धीचे, शिक्षणाचे कार्य यावरही वेगळे ३-४ लेख अवश्यच आहेत. ६ जानेवारी १९२४ ला सावरकरांची राजकारणात भाग न घेणे व जिल्ह्याबाहेर न जाणे ह्या दोन अटींवर सुटका करण्यात आली.
आता प्रकाटकार्य वेगळे होते, आता त्यांनी हातात घेतला तो सामाजिक सुधारणांचा प्रश्न. अस्पृश्यतानिवारण, जातीभेद विरोधी आंदोलन, अंधश्रद्धा विरोधी लेखन, व्याख्याने या सगळ्या बाजूने त्यांनी रान पेटवून दिले. रत्नागिरीत पतीतपावन मंदीर स्थापन केले.
क्रमशः
या लेखांमधून तात्यारावांचा जीवनपट तर मांडत आहेच, त्याचबरोबर माझ्या लेखनाची रुपरेशाही ढोबळमानाने आखून घेत आहे. निळ्या रंगात उल्लेखिलेल्या प्रसंगांवर स्वतंत्र लेख ह्यापुढच्या लेखनमालेत लिहिण्याचा विचार आहे, आपणा सर्व वाचकांना जास्त उत्सुकता वर उल्लेखलेल्या कुठल्या प्रसंगांवर आहे हे सांगितल्यास मला लेखांचा अनुक्रम ठरवण्यास मदत होऊ शकेल. आपल्याला सावरकरांच्या जीवनातील इतर कुठल्याही प्रसंगाबद्दल, विचारांबद्दल, कवितेबद्दल उत्सुकता असेल तर तसेही अवश्य कळवा. म्हणजे तेही लेख यामध्ये समाविष्ट करता येतील
प्रतिक्रिया
5 Jul 2010 - 10:48 am | विजुभाऊ
सावरकर म्हणायचे की माझी मार्सेलसची उडी लोक विसरले तरी चालतील पण मी केलेले समाजकार्य त्यानी विसरू नये....
........................ दुर्दैवाने नेमके उलटे झालेय
नेत्यांच्या तत्वांचा पहिला पराभव अनुयायांकडून होतो हेच खरे
5 Jul 2010 - 11:38 am | अर्धवट
मला वाटतं दुर्दैवानं तात्यारावांच्या बाबतीत लोक दोन्ही विसरलेयत..