तेजोनिधी सावरकर - लेख २ -जीवनपट १

अर्धवट's picture
अर्धवट in जनातलं, मनातलं
25 Jun 2010 - 9:22 am

तेजोनीधी लोहगोल भास्कर हे गगनराज, दिव्य तुझ्या तेजाने झगमगले भुवन आज.

तात्यारावांच्या विषयी काहीही लिहिण्यापूर्वी त्यांचा थोडक्यात जीवनपट आणि त्यांचे जीवितकार्य तुमच्या समोर मांडावे असा विचार आहे. सनावल्यांच्या वगैरे जास्त भानगडीत न पडता थोडक्यात प्रवास आणि त्यांच्या लेखनाची जंत्री तुमच्या समोर मांडणार आहे, एकूणच हेतू फार जड न लिहिता शक्य तितक्या गोष्टीवेल्हाळपणे त्यांच्या आयुष्यातील एकेक नाट्यमय, धाडसी आणि करुण प्रसंग प्रत्येक लेखातून उलगडावेत असा प्रयत्न आहे. हे लिहितालीहीताच माझ्या त्यांच्यावरच्या ह्या लेखमालेची पुढील रुपरेशाही माझ्या मनात आकार घेत आहे,

तात्यारावांचा जन्म २८मे १८८३ सालचा, जन्मगाव नाशिक जिल्ह्यातले भगूर. तात्यारावांच्यावर लहानपणापासून झालेले संस्कार आणि आजूबाजूचे वातावरण ह्यामुळे त्यांचा ओढा सतत वैचारिक, तात्विक साहित्याकडे साहजिकच जास्त, त्यांच्या बालपणातील रचलेल्या कविता वा लिहिलेले लेख अथवा सार्वजनिक वक्तृत्व स्पर्धांमधील भाषणांचे केवळ विषय पाहिले तरी त्यांच्या बुद्धीच्या तत्कालीन ध्येयाचा स्पष्टपणा आणि झेप जाणवल्यावाचून रहात नाही. त्यांच्या कविता प्रथमत: प्रसिद्ध झाल्या त्या त्यावेळच्या "जगतहितेच्छू ह्या वर्तमानपत्रामध्ये, वयाच्या दहाव्या वर्षी!! अर्थात त्यावेळेला संपादकांना माहित नव्हते त्यांचे वय.

वासुदेव बळवंत फडके यांना फाशी दिल्याची बातमी वाचून वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी देवघरातल्या भगवतीदेवीसमोर त्यांनी त्यांच्या पुढील आयुष्याची दुर्दम्य मार्गदर्शक ठरणारी ती शपथ घेतली

"यापुढे मी माझ्या देशाचे स्वातंत्र्य परत मिळवण्याकरीता सशस्त्र क्रांतीचा सेतू उभारून मारिता मारिता मरेतो झुंजेन"

पुढचे विचार त्यांच्याच शब्दात ऐका

“ त्या चिमुकल्या देवघरात माझ्या वयाच्या पंधराव्या वर्षी मी सद्गद अंतकरणाने त्या देवीच्या पायाला हाताने स्पर्श करताच, त्या दैवी स्पर्शाने ही जी शपथेची लहानशी ठिणगी उडाली तिचा भविष्यात केवढा भडका होणार होता ! किती रक्तपात, घात-प्रत्याघात, वध, फाशी, वनवास, छळ, यश आणि अपयश, दौरात्म्य आणि हौतात्म्य प्रकाश आणि अंधार, आगीचे आणि धुराचे कल्लोळ, खंडोखंडी ती आग भडकणार होती कि जी एका लहानशा ठीणगीत एक चमक होऊन दिसली, एक भयंकर वादळ चे वादळ त्या पहिल्या विजेच्या तळपात सामावले होते ”

त्यानंतर आलेल्या प्लेगात तात्यारावांच्या घरावरही हि भयंकर आपत्ती कोसळली पण सुदैवाने प्लेगाला बळी पडलेले त्यांचे दोन भाऊ त्यातूनही सुखरूप बचावले. ह्याच प्लेगाच्या संकटात सगळे कुटुंबिय नाशकास आले. . ह्या प्लेगाच्या करुण प्रसंगाविषयी एक लेख विस्तृतपणे लिहीनच. ह्या प्लेगाच्या आघाताने विचाराची दाहकता कमी झाली नव्हतीच, येथेच समवयस्क जमवून तात्यारावांनि मित्रमेळा ह्या संघटनेची स्थापना केली. पुढे पुण्यास ह्याचेच रुपांतर अभिनव भारत मधे करण्यात आले.

१९०१ साली तात्यारावांनी पुण्याला फर्ग्यूसन कॉलेज मध्ये प्रवेश घेतला. शहरातल्या सगळ्या चळवळीत अखंड भाग घेण्याचा आणि सतत नव्या चळवळी पेटवून देण्याचा धडाका उडाला. पण आता हा स्वातंत्र्ययज्ञ एका शहरापुरता मर्यादित ठेऊन चालणार नाही हे त्यांच्या लक्षात आले. आता पुढचे ध्येय म्हणजे हि वावटळ एका वादळासारखी संपूर्ण राष्ट्राला कवेत घेईल तर तिचे सार्थक, असा विचार करून शोध सुरू झाला. हा शोध दुहेरी होता. एक बाजू होती आपल्यासारखे लाखो तरुण ह्या ध्येयाने प्रेरित करून सोडण्याची, आणि दुसरी गुप्त बाजू होती सशस्त्र क्रांतीच्या उद्देशासाठी एक नवं मुक्त प्रांगण शोधण्याची. त्यावेळेला संपूर्ण भारतातले बुद्धीमान तरुण एकगठ्ठा कुठे भेटत असतील तर लंडनला, तिकडच्या कॉलेजातून. बेत ठरला - वकीलीच्या अभ्यासक्रमासाठी लंडनला जायचे.

इंग्लंडमध्ये जाताच तर काही स्थानिक वृत्तपत्रातून तिकडच्या पुढारयापेक्षा हेच जास्त प्रसिद्ध होऊन गेले, असामान्य बुद्धीमत्ता आणि जहाल विचार ह्यामुळे. हा महात्मा शत्रूच्या राजधानीत राहून आंतरराष्ट्रीय परिस्थितीवर केवळ स्वदेशहिताने ओथंबलेले लेख आणि पत्रके ज्या जिकिरीने प्रसिद्ध करीत होता, ते पाहून आत्ताही धडकी भरते. तिकडे त्यांचे लेखनाचे आणि विचार डागण्याचे काम सतत चालूच होते. त्यांनी तीकडून धाडलेल्या लंडनची बातमिपत्रे ह्यावर लिहीनच यथावकाश, इथेच त्यांनी मॅझीनीचे चरित्रही पूर्ण केले, आणि लगेच त्यावर बंदीही घालण्यात आली. छापण्याच्या आधीच छापायलाच बंदी घातलेले हे जगातले एकमेव पुस्तक.

लंडनच्या अवघ्या चार वर्षाच्या वास्तव्यात जवळजवळ सर्व परदेशी हेरांशी संबंध प्रस्थापित करून, तात्याराव स्कॉटलंड यार्डाच्या पदराताला एक धगधगता निखाराच बनले होते. हा वकिलीचा हा विद्यार्थी कुठल्याच कलमात तर सापडेना आणि हा विद्रोह तर पाहवेना अशा कचाट्यात इंग्रज सरकार सापडले. मग अप्रत्यक्ष छळ सुरु झाला, रहायला जागा मिळेना, टपाल मिळेना. अशाच एका उदास रात्री ब्रायटन च्या समुद्रकिनाऱ्यावर ‘ने मजसी ने’ हे अद्वितीय काव्य त्यानी लिहिले.
अखेर मित्रांच्या आग्रहावरून पॅरीसला जायचे ठरले, नवीन देश, नवीन मित्र, ध्येय तेच, आवेश तोच, कार्यही तेच. इकडे हिंदुस्थान सशस्त्र कटांनि पेटत चालला होता, लंडनच्या वृत्तपत्रांनी राळ उडवली होती की सावरकर स्वत: बाहेर राहून आपल्या सहकाऱ्यांना आगीत ढकलत आहेत.हे कळताच तो तेज:पुंज तरुण गर्जून उठला “मी परत लंडनला जाणार, मी माझे भाऊ स्नेही सहकारी अशा अनेक देशवीरांबरोबरच कामी येणार, मी पॅरीसला राहणार नाही !! सगळेच मागे राहिले तर मरणार तरी कोण ? जो तो विजय पहावयास इच्छू लागला तर तर लढाईचे तोंडावर उभे राहून विपक्षाची पहिली फैर छातीवर झेलणार तरी कोण ? छे, मी जाणार !! “

क्रमशः

या दोन लेखांमधून तात्यारावांचा जीवनपट तर मांडत आहेच, त्याचबरोबर माझ्या लेखनाची रुपरेशाही ढोबळमानाने आखून घेत आहे. निळ्या रंगात उल्लेखिलेल्या प्रसंगांवर स्वतंत्र लेख ह्यापुढच्या लेखनमालेत लिहिण्याचा विचार आहे, आपणा सर्व वाचकांना जास्त उत्सुकता वर उल्लेखलेल्या कुठल्या प्रसंगांवर आहे हे सांगितल्यास मला लेखांचा अनुक्रम ठरवण्यास मदत होऊ शकेल. आपल्याला सावरकरांच्या जीवनातील इतर कुठल्याही प्रसंगाबद्दल, विचारांबद्दल, कवितेबद्दल उत्सुकता असेल तर तसेही अवश्य कळवा. म्हणजे तेही लेख यामध्ये समाविष्ट करता येतील

वाङ्मयआस्वाद

प्रतिक्रिया

मुशाफिर's picture

25 Jun 2010 - 10:30 am | मुशाफिर

तुम्ही आधी म्हटल्याप्रमाणे, सावरकरांचा समग्र जीवनपट समर्थपणे मांडणं जवळ जवळ अशक्य आहे. तुम्ही करत असलेले लेखन हा एक चांगला प्रयत्न आहे. सावरकरांनी मांडलेले विज्ञाननिष्ठ विचार/ साहित्य हेही आपण आपल्या लेखमालेत समाविष्ट करावे, ही विनंती. कारण तो त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक फार महत्वाचा पैलू आहे, असं मला वाटतं.

मुशाफिर.

अर्धवट's picture

25 Jun 2010 - 7:17 pm | अर्धवट

>>विज्ञाननिष्ठ विचार

नक्की.. त्यावर तर २-३ लेख होणारच..

धन्यवाद मुशाफिर.

राजेश घासकडवी's picture

25 Jun 2010 - 11:22 am | राजेश घासकडवी

स्तुत्य प्रयत्न. अनेक माहीत नसलेल्या गोष्टी कळल्या.

निळ्या रंगात उल्लेखिलेल्या प्रसंगांवर स्वतंत्र लेख ह्यापुढच्या लेखनमालेत लिहिण्याचा विचार आहे...

रेडीमेड विकीपिडिआ एंट्री तयार होईल...

निखिल देशपांडे's picture

25 Jun 2010 - 2:09 pm | निखिल देशपांडे

निळ्या रंगात उल्लेखिलेल्या प्रसंगांवर स्वतंत्र लेख ह्यापुढच्या लेखनमालेत लिहिण्याचा विचार आहे...

उत्तम विचार..
हाही लेख आवडला

निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!

सहज's picture

25 Jun 2010 - 2:12 pm | सहज

लेख व प्रकल्प दोन्ही मस्त!

विसोबा खेचर's picture

25 Jun 2010 - 3:09 pm | विसोबा खेचर

लेखमाला संग्राह्य होते आहे..

अर्धवट's picture

25 Jun 2010 - 7:19 pm | अर्धवट

आधी कशावर लिहु याचं उत्तर अपेक्षित..

बिपिन कार्यकर्ते's picture

25 Jun 2010 - 3:21 pm | बिपिन कार्यकर्ते

अर्धवट, परत एकदा धन्यवाद. खूप छान होते आहे. लेखाचा आवाका आणि लांबी थोडी वाढवली थोडी चालेल.

बिपिन कार्यकर्ते

अर्धवट's picture

25 Jun 2010 - 7:18 pm | अर्धवट

धन्यवाद बिपिनसेठ

नितिन थत्ते's picture

25 Jun 2010 - 9:41 pm | नितिन थत्ते

उत्तम लेखमाला.

पुढच्या लेखांची वाट पहात आहे.

नितिन थत्ते

लिखाळ's picture

26 Jun 2010 - 12:29 pm | लिखाळ

छान लेख. पुढील लेख वाचण्यास उत्सुक आहे.
त्यांचे इंग्लंडातील कार्य-वर्तमानपत्रात लेखन याबद्दल अजून काही लिहावे. तसेच त्यांच्या कार्याची व्याप्ती, परिणाम भारतात किती होती? वगैरे बद्दल अजून जाणून घ्यायला आवडेल.

आपण लिहिताना काही संदर्भ नोंदवलेत तर उत्तम होईल.
त्याचे अनेक फायदे होतील. १)अभ्यासूंना नवी कवाडे उघडी होतील, २) लेखातील मर्म समजाऊन घेण्याआधी शुष्क तपशीलांवर डोके घासणार्‍यांना उत्तरे देताना नुसता संदर्भाकडे अंगुलीनिर्देश करुन आपले काम होईल :) ३) काही प्रश्नांना उत्तरे देताना 'प्रतीसाद लेखन' असा नवा कार्यक्रम आपल्याला करावा लागणार नाही, ४) आणि खूप 'माहिती' करुन घेऊन 'ज्ञानी' होणार्‍यांची आपोआप सोय होईल. ;)

शुभेच्छा.
--लिखाळ.

परिकथेतील राजकुमार's picture

26 Jun 2010 - 12:32 pm | परिकथेतील राजकुमार

मिपावरील काही उत्कृष्ट लेखमालांपैकी हि एक होईल ह्याबद्दल शंकाच नाही. खुप छान लिहित आहात.

तुम्ही केल्या पुढील लेखन संकल्पाची आतुरतेने वाट पाहात आहे. नेहमीप्रमाणेच वाचनखुण साठवली आहे.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य