अमेरिकेतील वास्तव्याने मला काय दिले याचा हिशेब कधी मांडायचाच झाला तर पोटोमॅक नदीकाठी तासोनतास केलेल्या भटकंतीचा क्रम अगदी वरचा असेल.
अथांग पाण्यात डोलणार्या नावा, अफाट आकाश, पानाफुलांनी लगडलेली झाडे आणि हिरवेगार गालिचे अशा या परिसरात मी अनेकदा स्वतःला विसरून जातो. माझ्या जीवनसखीलाही निसर्गामध्ये हरवून जायला आवडते त्यामुळे जरा कोठे संधी मिळाली आम्ही वॉशिंग्टनच्या त्रिस्थळी धाव घेतो. ही त्रिस्थळे म्हणजे नॅशनल मॉल, टायडल बेसिन आणि पोटोमॅक नॅशनल पार्क.
कॅपिटॉल (अमेरिकन संसद) ते वॉशिंग्टन मॉन्युमेन्ट हा पट्टा नॅशनल मॉल म्हणून प्रसिद्ध आहे. वॉशिंग्टन मॉन्युमेन्टची मान अगदी ताठ आहे... त्याहून उंच इमारत अमेरिकेच्या राजधानीत नाही. वॉशिंग्टन मॉन्युमेन्टच्या उंचवट्यावर उभे राहून कॅपिटॉलकडे तोंड केल्यास डाव्या अंगाला व्हाईट हाऊस तर पाठीमागे लिंकन स्मृतीस्थळ आणि उजव्या अंगास जेफरसन स्मृतीस्थळ आहे.
जेफरसनच्या समोर नैसर्गिक असे पाण्याचे तळे तयार झाले आहे. हेच ते रम्य टायडल बेसिनचे रिंगण! बोटिंगचा आणि भटकण्याचा आनंद येथे अगदी मनमुराद लुटावा. याखेरीज आजूबाजूच्या परिसरात असणारी म्युझिअम्स हा स्वतंत्र लेखमालेचा विषय होईल. होप डायमन्डपासून ते पुण्याच्या दगडापर्यंत आणि अतिप्राचीन ज्यू परंपरेपासून ते अवकाशयानांपर्यंत बरेच काही येथे जतन करून ठेवलेले आहे. पण त्याविषयी आज नाही. या ठिकाणी आज फक्त वसंत ऋतूचा आनंद लुटायचा आहे.
अमेरिका आणि जपान यांच्या वाढत्या मैत्रीचे प्रतीक म्हणून सन १९१२ मध्ये टोकियोच्या महापौराने चेरिची ३००० झाडे अमेरिकेला भेट देऊ केली. ह्या झाडांचा बहर तेव्हापासून वॉशिंग्टन परिसराची शोभा वाढवितो आहे. महिन्या दीड महिन्यापूर्वी याच परिसरातील पानाफुलांचे ताटवे आणि माणसांचे थवे यांची टिपलेली काही निवडक क्षणचित्रे येथे विखरून टाकली आहेत.
आणखी काय काय म्हणून येथे मांडू? वर मांडलेली आणि संगणकावर साठवून ठेवलेली इतरही अनेक प्रकाशचित्रे ही निव्वळ एक बायप्रॉडक्ट आहे. मोबाईलवर असलेल्या सुविधेचा उठविलेला हा जबरदस्त फायदा!! (थॅक्स टू माय बेटर हाफ् फॉर द बेस्ट वनस्!)
चेरिब्लॉसमच्या काळात अनेकदा, अगदी वेगवेगळया वेळी, पोटोमॅक आणि डिसी परिसरात आम्ही वेड्यासारखे धावलो खरे पण प्रत्येक वेळी डिजिटल घेऊन जायला विसरलो. हळहळ वाटली पण हे क्षण कॅमेर्यात बंद करूच नयेत.... किमान माझ्यासारख्याने तर नाहीच नाही.
भान हरपून जावे असाच हा भव्य पसारा आहे. अगदी आजही डोळे मिटले की मन कसे प्रसन्नतेने भरून जाते. पोटाची खळगी भरण्याचा विचार काही काळ का होईना पण "कोहम्" "कोहम्" च्या कुंजनात विरून जातो.
प्रतिक्रिया
1 Apr 2008 - 8:46 am | विसोबा खेचर
अतिशय सुरेख आणि मनमोहक प्रकाशचित्रे पाहिल्याचे समाधान मिळाले, खूप बरे वाटले!
एकलव्या, तुझे मनापासून आभार. अरे इतके दिवस होतास कुठे? बर्याच दिवसांनी तू काढलेली प्रकाशचित्रे बघायला मिळाली! :)
तुझा,
तात्या.