ईश्वर, सगुणातला आणि निर्गुणातला...!

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in जनातलं, मनातलं
31 Mar 2008 - 3:20 pm

राम राम मंडळी,

आज मी तुम्हाला एक कथा सांगणार आहे, ष्टोरीच म्हणा ना! :)

कथा तशी जुनी आणि पारंपारिकच, १९९५/९६ साली ऐकलेली. खैरागढ विद्यापिठाच्या संगीत विभागात ख्याल गायकीची सौंदर्यस्थळे असं काहीसं शीर्षक असलेल्या कार्यशाळेत मला डॉ जंगम यांनी रसिक श्रोत्याची भूमिका मांडण्याकरता मुद्दाम बोलावलं होतं (येण्याजाण्याचा आणि राहण्याचा खर्च देऊन बरं का!), तेव्हा गप्पांच्या ओघात जंगम साहेबांनी ही कथा मला सांगितली होती.

डॉ जंगम तेव्हा त्या विद्यापिठाच्या संगीत विभागाशी निगडित होते, परंतु बर्‍याच वेळेला मुंबईला यायचे व मुंबईतील गाण्याच्या मैफलींमधूनच त्यांची माझी ओळख झाली होती. डॉ जंगम हे एक मर्मज्ञ संगीतज्ञ होते आणि त्यांचा घराणेदार गायकी तसेच टप्पा, कजरी, होरी, चैती, झुला इत्यादी गानप्रकारांचा खूप अभ्यास होता. 'पूरब अंगाची ठुमरी' या विषयावर जंगम साहेबांची डॉक्टरेट होती. जंगम साहेब, डॉ भालचंद्र पाटेकर, पं यशवंतबुवा महाले ही काही फारशी प्रसिद्ध नसलेली परंतु अभिजात संगीतावर विलक्षण अधिकार असलेली मंडळी! या मंडळींकडून मला खूप काही शिकायला मिळालं. आमचे पाटेकर साहेब तर जयपूर गायकीवर, ठुमरी-टप्प्यावर, केसरबाईंच्या गायकीवर अतिशय सुरेख लेकडेमो देत असत. पाटेकर साहेब अलिकडेच वारले. मला या सर्व मंडळींवर खूप काही लिहायची इच्छा आहे. संगीतक्षेत्रातील आम पब्लिकमध्ये फारशी प्रसिद्ध नसलेली ही सगळी अतिशय गुणी आणि जाणकार मंडळी! असो..

तर आता ब्याक टू कथा..! शब्दांकन, अर्थातच तात्या अभ्यंकरांचं!

मंडळी, ही सुंदर कथा आहे फाईन आर्ट्स च्या संदर्भात. म्हणजे संगीत, साहित्य, शिल्प, चित्रं इत्यादी ज्या कला आहेत, त्या एकमेकांशिवाय अपुर्‍या आहेत, उलटपक्षी त्या एकमेकांना पुरकच आहेत, यातल्या कुठल्याच कलेत कुणीच लहानमोठं नाही, आणि या सर्व कलांचं असं हे एकमेकांचं अद्वैत म्हणजेच तो परमेश्वर, या सगळ्या कला अखेर त्या परमात्म्याला मिळतात, त्याच्या ठायी एकरूप होतात, हेच या कथेत फार छान रितीने सांगितलं आहे!

एकदा काय होतं!, (असं म्हटलं की कथा ऐकतो आहे असं वाटतं!;)

तर एकदा काय होतं की परमेश्वर त्याच्या एका भक्ताला म्हणतो,

"अरे तू रोज माझ्या दर्शनाकरता पृथ्वीवरून एवढ्या लांब स्वर्गात येतोस आणि पुन्हा परत जातोस, त्यामुळे तुला रोजचा किती हेलपाटा पडतो! त्या पेक्षा तू असं कर ना, माझी एखादी छानशी मूर्तीच प्रस्थापित कर की पृथ्वीवर! आणि त्या मुर्तीचंच रोज दर्शन रोज घेत जा. म्हणजे तुझा रोजचा पृथ्वीवरून इथे स्वर्गात येण्याचा हेलपाटा तरी वाचेल!"

हे एकल्यावर भक्त आनंदीत होतो आणि "वा देवा, तुझी कल्पना मस्तच आहे. मी आता तसंच करतो!" असं म्हणून पृथ्वीवर परततो. आता त्याला प्रश्न पडतो की देवाची ती छानशी मूर्ती आणायची कुठून? म्हणजे सर्वात प्रथम कुणीतरी ती मूर्ती घडवली तर पाहिजे! आणि मूर्ती घडवायची म्हणजे मूर्तीकाराला आणि पर्यायाने शिल्पकलेला आमंत्रण द्यायला हवं! :)

तो गावातल्या एका मूर्तीकाराला भेटतो आणि म्हणतो, "अरे बाबा मला देवाची एक मूर्ती इथे प्रस्थापित करायची आहे आणि या कामात मला तुझी मदत पाहिजे. तू मला एखादी सुरेख मूर्ती घडवून दे!"

त्यावर मूर्तीकार म्हणतो,

"ठीक आहे. तू म्हणतोस त्याप्रमाणे मूर्ती तर मी घडवीन परंतु मला चित्रं बघितल्याशिवाय मूर्ती घडवता येत नाही! कुणीतरी देवाचं एखादं सुंदरसं चित्र मला काढून द्यावं, म्हणजे मग त्या बरहुकूम मी अगदी झकास मूर्ती घडवून देईन!"

त्यावर भक्त म्हणतो, "ठीक आहे, मी तुला त्या मूर्तीचं चित्र लवकरच देतो!"

पण आता त्याला प्रश्न पडतो की देवाचं ते चित्रं आणायचं कुठून? म्हणजे प्रथम कुणीतरी त्या मूर्तीचं रेखाचित्रं/चित्रं तर काढलं पाहिजे! आणि चित्रं काढायचं म्हणजे चित्रकाराला आणि पर्यायाने चित्रकलेला आमंत्रण द्यायला हवं! :)

तो गावातल्या एका चित्रकाराला भेटतो आणि म्हणतो, "अरे बाबा मला देवाची एक मूर्ती इथे प्रस्थापित करायची आहे आणि या कामात मला तुझी मदत पाहिजे. तू मला देवाचं एखादं छानसं चित्र काढून दे म्हणजे त्या चित्राबरहुकूम मी देवाची सुरेख मूर्ती घडवून घेईन!"

त्यावर चित्रकार म्हणतो,

"ठीक आहे. तू म्हणतोस त्याप्रमाणे मी तुला देवाचं चित्रं काढून देईन परंतु मला चांगलं गाणं ऐकल्याशिवाय उतम चित्रं काढता येत नाही. गाणं ऐकता ऐकता माझा खूप छान मूड लागतो आणि मी खूप छान चित्रं काढू शकतो! तू तुझ्यासोबत इथे कुठल्यातरी चांगल्या गायकाला घेऊन ये, त्याला गायला सांग, म्हणजे ते गाणं ऐकता ऐकता मी तुला देवाचं अगदी सुरेख चित्र काढून देईन! पण तेवढी माझी चांगलं गाणं ऐकायची मात्र तू सोय कर!"

त्यावर भक्त म्हणतो, "ठीक आहे, मी लवकरच तुझी चांगलं गाणं ऐकवायची सोय करतो!"

पण आता त्याला प्रश्न पडतो की चांगलं गाणं ऐकवायचं कुठून? म्हणजे प्रथम कुणातरी चांगलं गाणं म्हटलं पहिजे! आणि गाणं म्हणायचं म्हणजे गायकाला आणि पर्यायाने संगीतकलेला आमंत्रण द्यायला हवं! :)

तो गावातल्या एका गायकाला भेटतो आणि म्हणतो, "अरे बाबा मला देवाची एक मूर्ती इथे प्रस्थापित करायची आहे आणि या कामात मला तुझी मदत पाहिजे. तुला एखादं छानसं गाणं म्हणावं लागेल. म्हणशील का?"

त्यावर गायक म्हणतो,

"ठीक आहे. तू म्हणतोस त्याप्रमाणे मी गाणं म्हणेन परंतु कुणीतरी मला चांगली कविता लिहून दिली पहिजे! कारण मुळात कविता चांगली असल्याशिवाय चांगलं गाणं निर्माण होत नाही. तू मला एखादी चांगली कविता लिहून दे मग मी तिला छान चाल लावून तुझ्याकरता एक उत्तम गाणं म्हणीन!"

त्यावर भक्त म्हणतो, "ठीक आहे, मी लवकरच एखादी चांगली कविता देतो!"

पण आता त्याला प्रश्न पडतो की चांगली कविता आणायची कुठूनऐकवायचं कुठून? म्हणजे प्रथम कुणातरी चांगल्या कवीला गाठलं पहिजे! आणि कवीला गाठायचं म्हणजे पर्यायाने साहित्यकलेला आमंत्रण द्यायला हवं! :)

सरते शेवटी तो भक्त एका कवीला गाठतो, शब्दप्रभू कवी छानशी कविता लिहितो, गायक ती कविता अतिशय सुरेखरित्या गातो, ते गाणं ऐकून चित्रकाराची कल्पना भरारी घेते आणि त्याचा कॅनव्हास सजतो आणि ते चित्र पाहून जिवंत वाटावं असं शिल्प तो शिल्पकार घडवतो आणि ईश्वराची मूर्ती आकाराला येते!

तर मंडळी, अशी ही छोटेखानी कथा! म्हटलं तर अगदी बाळबोध आणि म्हटलं तर खूप काही सांगून जाणारी!

कला ही कला असते, तिच्यात लहानमोठं,डावं-उजवं असं काही नसतं! म्हटलं तर सर्व कला या एकमेकांना पूरक असतात आणि प्रत्यक्ष-प्रत्यक्षरित्या त्या ईश्वर नावाच्या दैवी शक्तिकडे आपल्याला घेऊन जातात, आत्मानंदाचा अनुभव देतात! अहो सगुण स्वरुपातली ईश्वराची मूर्ती काय आणि निर्गुण स्वरुपातला, आत्मा तृप्त करणारा अनुभव काय, दोन्ही एकच! आणि हे सगुण-निर्गुण ईश्वरस्वरूप हेच तर सर्व कलांचं निधान, हेच सर्व कलांचं माहेरघर!

ही ईश्वराची मूर्ती आपल्याला अगदी कुठेही दिसते! एखाद्या लहानग्याने काढलेल्या साध्या सूर्योदयाच्या देखाव्याच्या चित्रात, तर कधी कुणा मूर्तीकाराने घडवलेल्या अप्रतिम शिल्पात, तर कधी 'हो, मीच तो गणपतराव बेलवलकर, नटसम्राट!!' असं म्हणणार्‍या आणि अक्षरश: अंगावर येणार्‍या कुसुमाग्रजांच्या शब्दात, तर कधी पाककलेत साक्षात अन्नपूर्णा शोभावी अश्या एखादीने केलेया साध्या आमटीभातात, तर कधी हृषिदांच्या निखळ करमणूक करणार्‍या चित्रपटात!

अगदी कुठेही दिसते ही ईश्वराची मूर्ती!

ईश्वरप्राप्तीकरता कुठली मोठी पोथ्यापुराणं वाचातला नकोत की कुठले यागत्याग करायला नकोत! रसिकाच्या नजरेने एखाद्या कलेत मन रमवलं, त्या कलाकृतीशी एकरूप झालं की अगदी क्षणात तिथे ईश्वर दिसायला लागतो, त्याची साक्ष पटते, अनुभूती मिळते, आणि जीव तृप्त होतो! फक्त आपली नजर रसिकाची हवी, रसिकतेची साधना हवी, आपण रसिकाग्रणी हवं, मग ईश्वर फारसा लांब नाही!!

आज ॐकार जोशीने गाण्याच्या शोधात हा एक सुरेख लेख लिहिला आहे! तो वाचून अचानक माझं मन काही वर्ष मागे गेलं आणि मला जंगम साहेबांनी सांगितलेली वरील कथा आठवली!

कुणाच्या तरी मनात विचारांचं जबरदस्त काहूर माजलं, ती काळोखी वादळी रात्र उभी राहिली आणि 'असा बेभान हा वारा' या कवितेच्या रुपानं शब्दबद्ध झाली! कुणा संगीतकाराला ती कविता वाचता वाचतच ते गाणं दिसायला लागलं, कुणा गायिकेने ते रसिकांच्या थेट काळजाला नेऊन भिडवलं! एक गाणं जन्माला आलं, ईश्वराची एक मूर्ती घडली!

पण मंडळी, निर्मिती इथेच थांबत नाही! पुन्हा कुणा ॐकारने स्वत:च्या शब्दसामर्थ्याने ते गाणं एका वेगळ्याच रुपात आपल्यापुढे मांडलं, रसास्वादाची एक उत्तम साहित्यकृती निर्माण झाली!

'दैवजात दु:खे भरता' हे गाणं बाबूजींनी खास तात्याराव सावरकरांना एकदा ऐकवलं होतं. उतारवयातले तात्याराव लोडाला टेकून बसले होते. गाणं ऐकता ऐकता नकळत, भर समुद्रात स्वत:ला फेकून देणार्‍या, अंदमानात अनंत हालअपेष्टा सोसलेल्या वज्रासारख्या मनाच्या तात्यारावांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले आणि ते बाबूजींना म्हणाले, "कुणाचं अधिक कौतुक करू? तुझं की माडगुळकरांचं?!"

कुठली कला अधिक मोठी? संगीत की साहित्य? डावंउजवं कसं करणार? ईश्वरी साक्ष तर दोन्ही कलांच्या एकत्रितपणामुळेच मिळली होती, जी तात्यारावांच्या अश्रूंतून ओघळली होती!!

असो, तर मंडळी तूर्तास पुरे करतो ही तात्या अभ्यंकराची बडबड! हा लेख मी जंगमसाहेबांना समर्पित करत आहेत! आज आमचे जंगम साहेब हयात नाहीत. आमच्या रोजच्या भेटीगाठी तर मुळीच नव्हत्या परंतु तरीही खूप दोस्ती होती आमची! ते मला गुरुसमानच होते आणि मी कधीच त्यांच्या खांद्यांवर मित्राच्या नात्याने हात ठेवला नाही! परंतु त्यांचा मोठेपणा हा की त्यांनीही कधी गुरुच्या नात्यानं माझ्या डोक्यावर हात न ठेवता नेहमी दोस्ताच्या नात्यानं माझ्या खांद्यावरच हात ठेवला हे माझं भाग्य! दुसरं काय?

-- तात्या अभ्यंकर.

कलासंगीतसंस्कृतीकवितावाङ्मयप्रतिभा

प्रतिक्रिया

आनंदयात्री's picture

31 Mar 2008 - 3:40 pm | आनंदयात्री

छान वाटली.

कला ही कला असते, तिच्यात लहानमोठं,डावं-उजवं असं काही नसतं! म्हटलं तर सर्व कला या एकमेकांना पूरक असतात आणि प्रत्यक्ष-प्रत्यक्षरित्या त्या ईश्वर नावाच्या दैवी शक्तिकडे आपल्याला घेऊन जातात, आत्मानंदाचा अनुभव देतात!

हे वाक्य एकदम ढासु ! आवडले.

स्वाती राजेश's picture

31 Mar 2008 - 3:46 pm | स्वाती राजेश

तात्या, तुम्ही तुमची मस्त आठवण लिहिली आहे. खरचं तुमच्या या कथेमुळे
कला ही कला असते, तिच्यात लहानमोठं,डावं-उजवं असं काही नसतं! म्हटलं तर सर्व कला या एकमेकांना पूरक असतात आणि प्रत्यक्ष-प्रत्यक्षरित्या त्या ईश्वर नावाच्या दैवी शक्तिकडे आपल्याला घेऊन जातात, आत्मानंदाचा अनुभव देतात! अहो सगुण स्वरुपातली ईश्वराची मूर्ती काय आणि निर्गुण स्वरुपातला, आत्मा तृप्त करणारा अनुभव काय, दोन्ही एकच! आणि हे सगुण-निर्गुण ईश्वरस्वरूप हेच तर सर्व कलांचं निधान, हेच सर्व कलांचं माहेरघर! हे पटते..

अवांतरः तुमच्या कॉलेज मधल्या मुलीसोबत खाल्लेले बटाटा भजीच्या आठवणींमधे ही सुद्धा आठवण येते हे खासच....

सहज's picture

31 Mar 2008 - 3:57 pm | सहज

ॐकार यांच्या कथेमुळे सुरू झालेली ही साखळी आवडली.

तात्यांची अजुन एक आवड ओळखुन, "त्या" कलेला देखील ह्या साखळीत आणता आली.

सरते शेवटी तो भक्त एका कवीला गाठतो.. तो कवी म्हणतो, "अरे बाबा, मला लागलीय भूक. जेवुन आत्मा तृप्त झाल्याशिवाय काही प्रेरणा येत नाही की शब्द सुचत नाहीत. भक्ताला कळते की म्हणजे आधी पोटापाण्याची सोय केली पाहीजे, पर्यायाने पाककलेला आमंत्रण द्यायला हवं! :)

धमाल मुलगा's picture

31 Mar 2008 - 4:15 pm | धमाल मुलगा

आता तात्याबा॑च्या लेखनावर आम्ही पामराने काय प्रतिक्रिया द्यावी ? छान लेख.

सरते शेवटी तो भक्त एका कवीला गाठतो.. तो कवी म्हणतो, "अरे बाबा, मला लागलीय भूक. जेवुन आत्मा तृप्त झाल्याशिवाय काही प्रेरणा येत नाही की शब्द सुचत नाहीत. भक्ताला कळते की म्हणजे आधी पोटापाण्याची सोय केली पाहीजे, पर्यायाने पाककलेला आमंत्रण द्यायला हवं! :)
चला सहजरावा॑च्या ह्या प्रतिसादाने ही साखळी पुढे चालू ठेवण्याची प्रक्रिया स्वातीताईच्या एखाद्या लेखाने होईल अस॑ दिसत॑य :-))

नंदन's picture

31 Mar 2008 - 4:54 pm | नंदन

लिहिलं आहेस, तात्या. अगदी मनापासून. 'झाड फुलांनी आले बहरुन, तू न पाहिले डोळे उघडून' अशी बर्‍याचदा आपली स्थिती असते.

ईश्वरप्राप्तीकरता कुठली मोठी पोथ्यापुराणं वाचातला नकोत की कुठले यागत्याग करायला नकोत! रसिकाच्या नजरेने एखाद्या कलेत मन रमवलं, त्या कलाकृतीशी एकरूप झालं की अगदी क्षणात तिथे ईश्वर दिसायला लागतो, त्याची साक्ष पटते, अनुभूती मिळते, आणि जीव तृप्त होतो! फक्त आपली नजर रसिकाची हवी, रसिकतेची साधना हवी, आपण रसिकाग्रणी हवं, मग ईश्वर फारसा लांब नाही!!
-- अशी रसिकता असणं मोठं भाग्याचं. 'रसिकत्वी परतत्त्वस्पर्शु'चा अर्थही कदाचित असाच असावा.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

स्वाती दिनेश's picture

31 Mar 2008 - 5:00 pm | स्वाती दिनेश

ईश्वरप्राप्तीकरता कुठली मोठी पोथ्यापुराणं वाचातला नकोत की कुठले यागत्याग करायला नकोत! रसिकाच्या नजरेने एखाद्या कलेत मन रमवलं, त्या कलाकृतीशी एकरूप झालं की अगदी क्षणात तिथे ईश्वर दिसायला लागतो, त्याची साक्ष पटते, अनुभूती मिळते, आणि जीव तृप्त होतो! फक्त आपली नजर रसिकाची हवी, रसिकतेची साधना हवी, आपण रसिकाग्रणी हवं, मग ईश्वर फारसा लांब नाही!!

वा तात्या,हे फारच छान!
स्वाती

धोंडोपंत's picture

31 Mar 2008 - 5:37 pm | धोंडोपंत

अप्रतिम....केवळ अप्रतिम.

शब्दच नाहीत वर्णन करायला. शब्द अन शब्द आवडला, पटला, भावला.

तात्या, तुझे लेखन अतिशय प्रगल्भ होते आहे याचा आम्हांदिकांस आत्यंतिक आनंद आहे. असेच उत्तमोत्तम लेखन तुझ्याकडून होत राहो, या शुभेच्छा.

आपला,
(आनंदित) धोंडोपंत

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

प्राजु's picture

31 Mar 2008 - 6:34 pm | प्राजु

तात्या,
खूप सुंदर जमला आहे लेख. आणि बाबूजी आणि सावरकरांची आठवण तर खासच..!
कला ही कला आहे.. तिच्यामध्ये कमी जास्त, वाईट्-चांगले काहीही नसते.. हे अगदी खरंच आहे.

ईश्वरप्राप्तीकरता कुठली मोठी पोथ्यापुराणं वाचातला नकोत की कुठले यागत्याग करायला नकोत! रसिकाच्या नजरेने एखाद्या कलेत मन रमवलं, त्या कलाकृतीशी एकरूप झालं की अगदी क्षणात तिथे ईश्वर दिसायला लागतो, त्याची साक्ष पटते, अनुभूती मिळते, आणि जीव तृप्त होतो! फक्त आपली नजर रसिकाची हवी, रसिकतेची साधना हवी, आपण रसिकाग्रणी हवं, मग ईश्वर फारसा लांब नाही!!
हा या कथेतून घेण्यासारखा बोध आहे..असेच मी म्हणेन.

- (सर्वव्यापी)प्राजु
www.praaju.blogspot.com

ॐकार's picture

31 Mar 2008 - 7:37 pm | ॐकार

छान आहे. आता चित्रं काढायला वेळ काढलाच पाहिजे :) मित्रमंडळी गोळा करावीत आणि हार्मोनिअम काढून बसावे आणि गाणी बजावणी करावीत असं तुमचा लेख वाचल्यावर वाटू लागले आहे.

चतुरंग's picture

31 Mar 2008 - 7:57 pm | चतुरंग

खुमासदार शैलीत छान आठवण दिली आहेस.
बाबूजी-तात्यारावांच्या आठवणीनेही मनात घर केले.

चतुरंग

विसोबा खेचर's picture

1 Apr 2008 - 1:35 am | विसोबा खेचर

आपुलकीने प्रतिसाद देणार्‍या सर्व मंडळींचे मनापासून आभार..!

ज्या मंडळींना हे लेखन बरा-वाईट, असा कोणताच प्रतिसाद देण्याच्या लायकीचे वाटले नाही, त्यांचेही आभार..! :)

तात्या.

बेसनलाडू's picture

1 Apr 2008 - 8:31 am | बेसनलाडू

छान! ष्टोरीच्या ओघात सहजपणे उलगडत गेलेले कलाविचार आवडले.
(कलाकार)बेसनलाडू