हे वारिस शाह! - अमृता प्रीतमच्या काव्याचा अनुवाद

अरुंधती's picture
अरुंधती in जे न देखे रवी...
17 Jun 2010 - 7:52 pm

गेले कितीतरी दिवस तिची ती कविता मनात ठाण मांडून बसली आहे. त्या कवितेवर लिहिण्यासाठी अनेकदा सुरुवात केली.... पण त्या अभिजात कवयित्रीच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेल्या त्या काव्याचा अनुवाद मांडताना ''लिहू की नको'' अशी संभ्रमावस्था व्हायची... लिहिताना माझे हात उगाचच थबकायचे! आज मनाने धीर केला आणि तो अपूर्ण अनुवाद पूर्ण केला.

ते अजरामर काव्य आहे अमृता प्रीतम यांच्या हृदयस्पर्शी लेखणीतून उतरलेलं, ''वारिस शाह नूं''......

भारत व पाकिस्तानच्या फाळणीचे दरम्यान पंजाब प्रांताचे जे विभाजन झाले त्या मानवनिर्मित चक्रीवादळात कित्येक कोवळ्या, निरागस बालिका - युवती, अश्राप महिला वासना व सूडापोटी चिरडल्या गेल्या. एकीकडे रक्ताचा चिखल तर दुसरीकडे आयाबहिणींच्या अब्रूची लक्तरे छिन्नविछिन्न होत होती. प्रत्येक युद्धात, आक्रमणात, हिंसाचारात अनादी कालापासून बळी पडत आलेली स्त्री पुन्हा एकदा वासना, हिंसा, सूड, द्वेषाच्या लचक्यांनी रक्तबंबाळ होत होती. अनेक गावांमधून आपल्या लेकी-बाळींची अब्रू पणाला लागू नये म्हणून क्रूर कसायांगत नंगी हत्यारे परजत गिधाडांप्रमाणे तुटून पडणाऱ्या नरपशूंच्या तावडीत सापडण्याअगोदरच सख्खे पिता, बंधू, चुलत्यांनी आपल्याच लेकीसुनांच्या गळ्यावरून तलवारी फिरवल्या. शेकडो मस्तके धडावेगळी झाली. अमृता आधीच निर्वासित असण्याचे, तिच्या लाडक्या पंजाबच्या जन्मभूमीपासून कायमचे तुटण्याचे दुःख अनुभवत होती. त्या वेळी तिच्या संवेदनशील कवीमनावर आजूबाजूच्या स्त्रियांचे आर्त आक्रोश, त्यांच्या वेदनांच्या ठुसठुसत्या, खोल जखमा, हंबरडे आणि आत्मसन्मानाच्या उडालेल्या चिंधड्यांचे बोचरे ओरखडे न उठले तरच नवल! अशाच अस्वस्थ जाणीवांनी विद्ध होऊन, एका असहाय क्षणी तिच्या लेखणीतून तिने फोडलेला टाहोच ''वारिस शाह नूं'' कवितेत प्रतीत होतो. १९४७ साली लिहिली गेलेली ही कविता ''हीर'' या लोकप्रिय दीर्घकाव्याच्या - हीर व रांझ्याच्या अजरामर व्यक्तिरेखांच्या रचनाकाराला, वारिस शहाला उद्देशून लिहिली आहे!

हे वारिस शाह!

आज मी करते आवाहन वारिस शहाला
आपल्या कबरीतून तू बोल
आणि प्रेमाच्या तुझ्या पुस्तकाचे आज तू
एक नवीन पान खोल

पंजाबच्या एका कन्येच्या आक्रोशानंतर
तू भले मोठे काव्य लिहिलेस
आज तर लाखो कन्या आक्रंदत आहेत
हे वारिस शाह, तुला विनवत आहेत

हे दुःखितांच्या सख्या
बघ काय स्थिती झालीय ह्या पंजाबची
चौपालात प्रेतांचा खच पडलाय
चिनाब नदीचं पाणी लाल लाल झालंय
कोणीतरी पाचही समुद्रांमध्ये विष पेरलं

आणि आता तेच पाणी ह्या धरतीत मुरतंय
आपल्या शेतांत, जमिनीत भिनून
तेच जिकडे तिकडे अंकुरतंय...

ते आकाशही आता रक्तरंजित झालंय
आणि त्या किंकाळ्या अजूनही घुमताहेत

वनातला वाराही आता विषारी झालाय
त्याच्या फूत्कारांनी जहरील्या
वेळूच्या बासरीचाही नाग झालाय

नागाने ओठांना डंख केले
आणि ते डंख पसरत, वाढतच गेले
बघता बघता पंजाबाचे
सारे अंगच काळेनिळे पडले

गळ्यांमधील गाणी भंगून गेली
सुटले तुटले धागे चरख्यांचे
मैत्रिणींची कायमची ताटातूट
चरख्यांची मैफिलही उध्वस्त झाली

नावाड्यांनी साऱ्या नावा
वाहवल्या आमच्या सेजेसोबत
पिंपळावरचे आमचे झोके
कोसळून पडले फांद्यांसमवेत

जिथे प्रेमाचे तराणे घुमायचे
ती बासरी न जाणे कोठे हरवली
आणि रांझाचे सारे बंधुभाई
बासरी वाजवायचेच विसरून गेले

जमिनीवर रक्ताचा पाऊस
कबरींना न्हाऊ घालून गेला
आणि प्रेमाच्या राजकुमारी
त्यांवर अश्रू गाळत बसल्या

आज बनलेत सगळे कैदो*
प्रेम अन सौंदर्याचे चोर
आता मी कोठून शोधून आणू
अजून एक वारिस शाह....

(* कैदो हा हीरचा काका होता, तोच तिला विष देतो! )
अनुवाद -- अरुंधती

मूळ काव्य :

(पिंजर चित्रपटात ह्या कवितेचा सुरेख वापर केला गेला आहे. )

वारिस शाह नूं

आज्ज आखां वारिस शाह नूं

कित्थे कबरां विचों बोल ते आज्ज किताबे ईश्क दा

कोई अगला वर्का फोल

इक रोई सी धी पंजाब दी तूं लिख लिख मारे वैण

आज्ज लखां धिया रोंदियां तैनूं वारिस शाह नूं कैण

उठ दर्दमंदा देया दर्दिया उठ तक्क अपना पंजाब

आज्ज वेले लाशा विछियां ते लहू दी भरी चिनाव

किसे ने पंजा पाणियां विच दित्ती जहर रला

ते उणा पाणियां धरत नूं दित्ता पानी ला

इस जरखेज जमीन दे लू लू फुटिया जहर

गिट्ठ गिट्ठ चड़ियां लालियां ते फुट फुट चड़िया कहर

उहो वलिसी वा फिर वण वण वगी जा

उहने हर इक बांस दी वंजली दित्ती नाग बना

नागां किल्ले लोक मूं, बस फिर डांग्ग ही डांग्ग,

पल्लो पल्ली पंजाब दे, नीले पै गये अंग,

गलेयों टुट्टे गीत फिर, त्रखलों टुट्टी तंद,

त्रिंझणों टुट्टियां सहेलियां, चरखरे घूकर बंद

सने सेज दे बेड़ियां, लुड्डन दित्तीयां रोड़,

सने डालियां पींग आज्ज, पिपलां दित्ती तोड़,

जित्थे वजदी सी फूक प्यार दी, ओ वंझली गयी गवाच,

रांझे दे सब वीर आज्ज भुल गये उसदी जाच्च

धरती ते लहू वसिया, कब्रां पइयां चोण,

प्रीत दिया शाहाजादियां अज्ज विच्च मजारां रोन,

आज्ज सब्बे कैदों* बन गये, हुस्न इश्क दे चोर

आज्ज कित्थों लाब्ब के लयाइये वारिस शाह इक होर

--- अमृता प्रीतम

हे काव्य अमृता प्रीतम यांच्याच आवाजात ऐकण्यासाठी यूट्यूबची ही लिंक :

विशालनेही ह्या काव्य व अनुवादाला आपल्या ब्लॉगवर akshare!
येथे टाकलंय, एका सुरेख प्रस्तावनेसह....:-) अवश्य वाचा.

-- अरुंधती

करुणसंस्कृतीवावरकविताभाषासमाजजीवनमानराजकारण

प्रतिक्रिया

मस्त कलंदर's picture

17 Jun 2010 - 9:57 pm | मस्त कलंदर

मस्तच गं...
मूळ कविता आणि अनुवाद दोन्हीही.. गद्याचा अनुवाद एकवेळ सोपा पण कवितेचा मूळ आशय कायम ठेऊन तिचा अनुवाद करणं खरंच अवघड!!!!

बाकी, तुझी प्रस्तावना वाचताना मला "अ ट्रेन टू पाकिस्तान" हे पुस्तक आणि किरण खेरचा "खामोश पानी" नावाचा मूव्ही आठवला.. खरेतर त्या मूव्हीबद्दल लिहायचंय मला एकदा.. कुठे मिळाला तर अवश्य बघ.. किरण सोडून कुणी भारतीय कलाकार नाहीत, पण याच विषयावरच्या कोंकोणाच्या "अमु" पेक्षा तरी मला चांगला वाटला.

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

अरुंधती's picture

18 Jun 2010 - 6:14 am | अरुंधती

धन्स मस्त कलंदर!.... आता बघतेच शोधून तो चित्रपट कुठे मिळतोय का ते! आणि पुस्तकपण! :-)

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

मस्त कलंदर's picture

19 Jun 2010 - 12:22 am | मस्त कलंदर

हे खुशवंतसिंगांचे खूप जुने पुस्तक आहे.. मी आधी त्याचा मराठी अनुवाद वाचला.. नंतर एकदा क्रॉसवर्डस मध्ये मूळ इंग्रजी पुस्तक चाळत होते.. त्यात तेव्हाचे फोटोसुद्धा आहेत की जे मराठी अनुवादात नाहीत.. फोटो पाहूनच मन इतकं विषण्ण झालं.. की त्यादिवशी काही सुचलंच नाही..

'खामोश पानी' हा फाळणीनंतरचा चित्रपट आहे.. याबद्दल इतकंच सांगते की, किरण खेर शीख असते,आणि ती विहिरीवर गेली असताना तिला पाकिस्तानी मुस्लीम धरतात नि अत्याचार करतात.. त्यातलाच एक मुस्लीम तिच्याशी लग्न करतो आणि त्यानंतर तिला एक मुस्लीम बनूनच राहायला लागतं.. या घटनेची ती इतकी धास्ती घेते की ती कधी पाणी आणायला विहिरीवर जात नाही.. बाकी तू पहाच...

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

विसोबा खेचर's picture

17 Jun 2010 - 10:13 pm | विसोबा खेचर

वरवर चाळला.. चांगला लेख. सवडीने वाचतो..

तात्या.

अरुंधती's picture

18 Jun 2010 - 6:15 am | अरुंधती

तात्या, धन्यवाद! :-) सवडीने लेख वाचा..... मला सुध्दा हा अनुवाद करायला बरीच सवड लागली होती! :-)

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

मुक्तसुनीत's picture

18 Jun 2010 - 2:45 am | मुक्तसुनीत

मूळ कविता वाचलेली होती. या कवितेचा इथे दिलेला अनुवाद उत्तम झालेला आहे.

फाळणीच्या जखमा अनेक दशके बुजल्या नव्हत्या. फाळणी अनुभवलेली पीढी काळाच्या पडद्याआड गेली. मात्र फाळणीच्या दस्तावेजाच्या आणि कादंबर्‍या-कथा-कविता-चित्रपटांच्या रूपाने हा सगळा इतिहास जतन करून ठेवण्यात आलेला आहे.

अरुंधती's picture

18 Jun 2010 - 6:22 am | अरुंधती

मुक्तसुनीत, प्रतिसादाबद्दल धन्स! या संदर्भातील फाळणी प्रत्यक्ष अनुभवलेल्या लोकांच्या मुलाखती आहेत यूट्यूबवर.... त्यातीलच ही एक.... ऐकताना, पाहतानाच अंगावर काटा येतो! अश्या अनेक चित्रफीती आहेत तिथं....

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

sur_nair's picture

21 Jun 2010 - 4:25 am | sur_nair

साठ वर्ष असा अनुभव मनात ठेऊन जगणं कसं भयानक असेल. टोनी मोरीसन यांच्या Beloved कादंबरीत एक आई आपल्या एक दोन वर्षाच्या मुलीला गुलामगिरीतून वाचवायला मारून टाकते. Sophie 's Choice मध्ये एका आईला आपल्या दोन मुलांमध्ये एकाची निवड करावी लागते. हे सगळेच खरे घडलेले अनुभव. असे कृत्य घडवून आणणारे मनुष्य असतात हे जाणून विश्वास बसत नाही.

अक्षय पुर्णपात्रे's picture

18 Jun 2010 - 8:37 am | अक्षय पुर्णपात्रे

कविता व अनुवाद दोन्ही दाहक.

शुचि's picture

19 Jun 2010 - 12:36 am | शुचि

अमृता प्रीतमच्या काव्यात गेयता, अनुप्रास जाणवला जास्त. तुझा प्रयत्न नक्कीच आवडला. विशेषतः इतक्या दाहक (मी ही तोच शब्द वापरते) विषयाच्या कवितेला तू हात घातलास. जे की मला तर वाचवतही नाही. तू केलेला अनुवाद स्तुत्य आहे, अतिशय अवघड आहे. अनुवाद वाचताना असं वाटतं आपण होरपळून निघतोय. नक्कीच चांगला प्रयत्न आहे.

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

sur_nair's picture

21 Jun 2010 - 4:08 am | sur_nair

धन्यवाद. कविता आणि तिचा अनुवाद दोन्ही छान. अम्रिता प्रीतम यांच्या कविता वाचाव्या असा नुकताच ध्यास घेतला होता. त्यांची एक कविता 'अंबर कि एक पाक सुराही' मला खूप आवडते. जीवन हे मृत्यू ने आपल्याला दिलेले कर्ज आहे, त्याबद्दल त्याचे ऋण मानून हे जीवन अनुभवावे. शेवटी जाताना पुन्हा ते कर्ज फेडायचे आहे असा काहीसा त्याचा अर्थ आहे.
हि कविता 'कादंबरी या चित्रपट आशातैंनी गाईली आहे. उस्ताद विलायत खान यांचा संगीत.
http://www.youtube.com/watch?v=eVTAQh0-LF0

स्वाती२'s picture

21 Jun 2010 - 5:43 am | स्वाती२

अनुवाद आवडला.

सहज's picture

21 Jun 2010 - 6:34 am | सहज

काही मोजके विषय कमालीचे अस्वस्थ, सुन्न करतात. त्यातलाच हा!