काही आत्मचरित्रं! काही व्यक्तिचित्रं! :)

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in जनातलं, मनातलं
28 Mar 2008 - 4:25 pm

नमस्कार,

मी इडली!

मी सर्वांना आवडते, हवीहवीशी वाटते. सकाळच्या वेळेला 'वा! काय छान नी गरमगरम इडल्या मिळाल्या, अगदी हलक्या आणि चवीला छान होत्या!' असं माझं वर्णन बर्‍याचदा केलं जातं आणि कुणी असं वर्णन केलं की मला अगदी लाजल्यासारखं होतं बाई! :)

पांढरा रंग हे आपल्याकडे शांततेचं प्रतिक मानतात. आपल्या तिरंग्यातला पांढरा रंगही, भारत हा शांतताप्रिय देश आहे, हेच दर्शवतो! मला हा रंग लाभला आहे तोखील कदाचित माझ्या शांत आणि सात्विक स्वभावामुळेच! मीदेखील स्वभावाने अगदी शांत, पचायला हलकी, चवीला सात्विक अशी आहे! अहो इतकंच काय, परंतु डॉक्टर मंडळीदेखील आजारी माणसाला , 'हलकी, ताजी आणि गरमागरम इडली खायला काहीच हरकत नाही' असं सांगतात. म्हणजे बघा, मला किती मान आहे तो!

मी मूळची दक्षिण भारतातली आहे असं म्हणतात परंतु आता माझं वास्तव्य सगळीकडेच असतं! आजही सकाळी सकाळी कित्येक लोकं न्याहरी म्हणून माझ्याच गरमागरम चवीला प्राधान्य देतात.

(अवांतर - क्वचित प्रसंगी माझा एक मेदूवडा नामक मावसभाऊही असतो माझ्यासोबत! काही लोक आम्हा दोघांना एकत्र खातात. तसा अगदीच अनवट स्वभावाचा आहे माझा हा भाऊ आणि मला खूप आवडतो! असो, सांगेलच तो केव्हातरी स्वत:बद्दल! पण तो बटाटेवडा मेला मात्र मला अगदी मुळ्ळीच आवडत नाही!)

पण बरं का मंडळी, तो सांबार नामक उकळता प्रकार माझ्या अंगावर ओततात ना, तो मात्र मला मुळीच आवडत नाही हं! मी त्या सांबारात सगळी भिजून जाते आणि माझं सगळं रूपच पालटून जातं! कध्धी एकदा स्वच्छ पाण्याने अंघोळ करेन असं मला होतं! पण काय करणार? तुम्हाला मी सांबारासोबतदेखील आवडते ना! :(

पण सांबारापेक्षा छानशी दक्षिण भारतीय पद्धतीची किंवा आपल्या महाराष्ट्रीयन पद्धतीची ओला नारळ-लसूण-हिरवी मिर्ची वाटून केलेली चटणी, ही माझी अतिशय प्रिय मैत्रिण! तिच्याशिवाय मला चैनच पडत नाही! आणि आम्हा दोघींची मैत्री इतकी घट्ट आहे की लोकांनाही तिच्याशिवाय मी पसंत नसते! नेमकी दोन विरुद्ध स्वभावाची माणसं एकमेकांना आवडतात असं म्हणतात ना, तसं आहे माझं आणि माझ्या चटणीचं! :) मी तशी शांत आणि सात्विक आणि ती स्वभावत:च जरा झणझणीत आणि चटपटीत! मला नेहमी परोपरी समजावून सांगत असते की, 'बाई गं, हल्लीच्या जगात एवढा शांतपणा, सात्विकपणा उपयोगाचा नाही, तू थोडी माझ्यासारखी झणझणीत, चटपटीत हो!'

पण मला मेलीला जमतंच नाही ते. मग मीच तिला म्हणते, 'तुझा चटपटीतपणा आहेच ना माझ्यासोबत? मग झालं तर! आणि तुला तुझा स्वभाव सोडता येतो का ते सांग बरं? तुला कुणी गुळमट चवीची म्हटलेलं आवडेल का? मग मी तरी का माझी चव बदलू, स्वभाव बदलू?'

असा माझा आणि चटणीचा प्रेमळ संवाद नेहमीच चालतो आणि शेवटी ती बिचारी हसून पुन्हा आपली कौतुकाने, माझ्या प्रेमापायी माझ्यासोबतच केळीच्या पानात उतरते! :)

अहो माणसं जर आपला स्वभाव बदलत नाहीत, त्यांच्या स्वभावाला काही औषध नसतं, तर मी तरी माझा स्वभाव का बदलावा सांगा पाहू! मी जशी आहे तशीच मला राहू दे. शांत, प्रेमळ नी सात्विक! आणि तुम्हीदेखील माझ्या याच साधेपणावर, सात्विकतेवर आजपर्यंत भरभरून प्रेम केलंत तसंच यापुढेही कराल अशीच माझी खात्री आहे! माणसाने सात्विकपणा, साधेपणा, सोबरपणा माझ्याकडनंच शिकावा असेच माझे गुण आहेत! खरं की नाही मंडळी?

असो,

आपली सुखदु:खातली मैत्रिण,
-- इडली.

---------------------------------------------------------------------------------------------------

राम राम साहेब!

मी बटाटावडा! च्च! सॉरी, स्वत:ला एकेरी का संबोधा?

तर साहेब, आपण बटाटावडा! काय ओळखलं का नाय?! :)

आपण साला एकदम बिनधास्त व्यक्तिमत्व आहे बघा साहेब! आपल्याच मस्तीत जगणारा! आपलं नांव पण एकदम लै भारी आहे.."बटाटावडा!" काय? आहे की नाही चांगलं जंक्शन भारीभक्कम नांव? आपल्या गरमागरम स्वरुपापुढे आणि चवीपुढे दुनियेतले सगळे पदार्थ झक मारतात साहेब! साला कुणाची टाप नाय आपल्यापुढे काही बोलण्याची! :)

काय म्हणालात? हा माजोरीपणा आहे?

बरं मग? आहोतच आम्ही माजोरी! काय म्हणणं आहे तुमचं?? :)

त्या इडलीच्या सात्विकपणाचं आणि साधेपणाचं नसतं कवतिक पुरे झालं!

माणसाला खर्‍या अर्थाने मस्तीत जगायला आपण शिकवतो साहेब! डाळीच्या पिठात बुडवून उकळत्या तेलात फेकतात बघा साहेब आपल्याला! पण साला फिकीर नाय! आपण त्या उकळत्या तेलातही मस्तपैकी पोहतो आणि चांगले लालसरवजा पिवळसर खरपूस कल्लर घेऊन भाहेर पडतो बघा साहेब! स्वत: उकळत्या तेलाचे चटके सोसून मस्तीत कसं जगायचं ते आपण जगाला शिकवतो साहेब!

काय म्हणलात? चव? चविष्टपणा?

अर्रे!!! त्या बाबतीत तर साला पब्लिकच्या उड्या पडतात आपल्यावर साहेब! गरमागरम बटाटेवडा म्हटलं की पब्लिकच्या तोंडाला पाणी सुटतं बघा! साले जिभल्या चाटत तुटून पडतात आपल्यावर! अहो साधी वडापावची गाडी लावून लखपती झालेली किती माणसं दाखवू तुम्हाला साहेब? विश्वास नसेल ना, तर जा जाऊन त्या कर्जतच्या दिवाडकराला विचारा! :)

तसा आपण मुळचा मराठी बरं का साहेब! अस्सल महाराष्ट्रीय पदर्थात आपला लंबर एकदम टॉपच्या रॅन्कमध्ये लागतो बघा साहेब! पण सिंधी माणसाचं डोसकंच लै अवली बघा! त्यानं प्रथम मला पावात भरला आणि 'वडापाव' हे नांवा रातोरात फेमस झालं! तसा आपण हायसोसायटीत फारसा उठतबसत नाय बरं का साहेब! त्या पिझ्झा आणि बर्गरच्या संगतीत आपला तिच्यायला जीवच उबतो!

आपण कितीही माजोरी असलो ना, तरी आम पब्लिक आपल्यावरच प्रेम करतं बघा साहेब! साला, ते तुमची फ्यॅशनबिशन आपल्याला काय पण माहीत नाय बघा! उंची प्लेटी नकोत आणि ते काटेचमचे नकोत, की काय पण नको आपल्याला. ४-५ रुपायात आम पब्लिक रस्त्यावरच्या गाडीवर वडापाव खातो आणि समाधान पावतो! अहो गरीबाच्या पोटाची थोडा वेळ तरी आग शमते! काय, खरं की नाय?

तुमी तुमचं ते व्यक्तिचित्र की आत्मचरित्र का काय म्हणतात ते सांगा म्हणाले म्हणून एवढा वेळ तुमच्याशी बोललो साहेब! पण आता आपल्याजवळ तुमच्याशी बोलायला जादा टाईम नाय!

जाण्यापूर्वी एकच सांगतो, की मस्त मजेत जगा, स्वत:च्या स्वभावात चवदार, चविष्ट, खमंगपणा आणा आणि दुसर्‍याला पण तसंच अगदी मस्त मजेत चवीचवीने जगायला शिकवा! अहो तेलातनं बाहेर पडल्यावर गार होंण्याच्या आत गरमागरम असतांनाच जगून घेतलं पाहिजे, एकदा गार झाल्यावर कोण विचारतो आपल्याला? साली दोन घटकांची जिंदगी आपली!

काय? खरं की नाय?

तुमचाच,
(एक चवदार, चविष्ट, दोस्त!) बटाटावडा!

---------------------------------------------------------------------------------------------------

राम राम मंडळी,

मी तात्या अभ्यंकर. हां हां, असे दचकून, घाबरून जाऊ नका! इडली आणि बटाटावड्यासारखं मी काही माझं आत्मचरित्र किंवा मनोगत तुम्हाला सांगणार नाहीये,की व्यक्तिचित्रही रंगवणार नाहीये! (साला, आपण पडलो मराठी आंतरजालावरचा एक नंबरचा बदनाम आणि हलकट माणूस! तेव्हा आमचं व्यक्तिचित्र आम्हीच काय रंगवणार कप्पाळ? ते काम आमचे हितचिंतक आणि हितशत्रू करतच असतात!) असो...! :)

सांगायचा मुद्दा असा की काल रात्री भाईकाका स्वप्नात आले होते आणि मला म्हणाले, "तात्या, रागांची आणि माणसांची व्यक्तिचित्र बरीच रंगवलीस, आता जरा काही खाद्यपदार्थांची व्यक्तिचित्र रंगवायचा प्रयत्न कर. मी जरा वाचेन म्हणतो!"

आता खुद्द भाईकाकांकडनंच हुकूम निघाल्यामुळे आम्ही चुपचाप हे लेखन केलं! आपल्याला कसं वाटलं ते सांगा, म्हणजे पुढच्या भागात साक्षात "मिसळ" आणि "गोडाचा (प्रसादाचा) शिरा" यांची जरा भारीभक्कम व्यक्तिचित्र रंगवायचा प्रयत्न करणार आहे! :)

भाईकाकांचा आशीर्वाद तर आहेच पण तुम्हा मायबाप वाचकांचाही हवा!

असो..

आपलाच,
तात्या.

आगामी : (अर्थात, सवडीने, मूड लागेल तसं!)

१) मिसळीचे व्यक्तिचित्र/आत्मकथन!
२) प्रसादाच्या शिर्‍याचे व्यक्तिचित्र/आत्मकथन!
३)" आम्ही दडपे पोहे!"

धन्यवाद!

संस्कृतीवाङ्मयमौजमजाप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

आनंदयात्री's picture

28 Mar 2008 - 4:34 pm | आनंदयात्री

आज संध्याकाळी वडापाव अन उद्याच्या न्याहरीला इडली.. मेन्यु फिक्स.
धन्यवाद भाईकाका !!

प्राजु's picture

28 Mar 2008 - 6:51 pm | प्राजु

मस्त...
अगदीच वाफाळलेली आणि चमचमित.
हा प्रकार लेखन प्रकार नविन आहे. आणि खरं हॉटेलात (मिसळ पाव मध्ये) आल्यासारखं वाटलं.

- (सर्वव्यापी)प्राजु

सृष्टीलावण्या's picture

28 Mar 2008 - 4:36 pm | सृष्टीलावण्या

मस्तच.

खाद्यपदार्थांच्या आत्मचरित्राची कल्पना ढासू आहे एकदम. त्वाडा जबाब नही..

>
>
शेवाळलेले शब्द आणिक यमकछंद करतील काय, डांबरी सडकेवर श्रावण इंद्रधनु बांधील काय?

स्वाती दिनेश's picture

28 Mar 2008 - 4:42 pm | स्वाती दिनेश

वा वा..मस्तच!
पण इथे ना वडापावची गाडी ना उडप्याची हाटेलं..चित्रं पाहून जीभ खवळली,त्यामुळे आता स्वतः च वडा आणि इडली करणे आले :(
स्वाती

धमाल मुलगा's picture

28 Mar 2008 - 4:50 pm | धमाल मुलगा

हम्म.....

बेष्ट...भूकच लागली ना राव!
च्यामारी, वडापावच॑ आत्मवृत्त वाचून दिल्लीतले दिवस आठवले.
वडापाव खाण्यासाठी इतका व्याकूळ झालो होतो की "दिल्ली हट" मध्ये जाऊन आख्खे ३५ रुपये टेकवून २ वडे आणि पाव खाल्लेले आठवल॑. खर्रय बॉ...वडापाव तो वडापाव!

स्वत:च्या स्वभावात चवदार, चविष्ट, खमंगपणा आणा आणि दुसर्‍याला पण तसंच अगदी मस्त मजेत चवीचवीने जगायला शिकवा! अहो तेलातनं बाहेर पडल्यावर गार होंण्याच्या आत गरमागरम असतांनाच जगून घेतलं पाहिजे, एकदा गार झाल्यावर कोण विचारतो आपल्याला? साली दोन घटकांची जिंदगी आपली!

तात्या एकदम पटल :-- मस्त मजेत चवीचवीने जगायलाच पाहिजे.....

(कुंजविहार आणि राजमाता येथील वडापाव चाखणारा --ठाणेकर)
मदनबाण

प्रमोद देव's picture

28 Mar 2008 - 4:52 pm | प्रमोद देव

वा ! तात्या! लई ब्येस लिवलंया! खान्याच्या वस्तु बगून जास्त काय बलावं ते सुधरत नाय बा!
आरं पन त्ये खायची गोष्ट हाय! नुस्ता लिवून ने फोटू बगून आम्चा पॉट कसा भरनार?
पोटाची बी काय तरी सोय करा. त्वांडाला पानी सुटलं की आमच्या.

मनापासुन's picture

28 Mar 2008 - 5:00 pm | मनापासुन

बाकी काही म्हणा वडापाव तो वडापाव्...........मग तो पुणेरी जोशांचा असुदे किंवा जम्बो किंग चा वडा पाव मस्त सोलापुरी चटणी आ हा हा................स्स्स्स्स्स्स्स्स्स्स :
देशी बर्गर.......पण बाहेरच्या सारखे जाड सालीचे वडे कसे बनवायचे ते कोणी सांगाल का?
घरचे वडे पावात कोंबले की ते पार वेगळेच लागतात

अहो तात्या तात्या काय मस्त विषय घेतलाय...
फोटो बघुनच मन तृप्त झाले.
इडलीचटणी - हा तर एकदम वीक पॉईंट... अगदी बरोब्बर सांबारापेक्षा चटणीची मजा काही औरच!

स्वत: उकळत्या तेलाचे चटके सोसून मस्तीत कसं जगायचं ते आपण जगाला शिकवतो साहेब!

मस्त!

पण सिंधी माणसाचं डोसकंच लै अवली बघा! त्यानं प्रथम मला पावात भरला आणि 'वडापाव' हे नांवा रातोरात फेमस झालं!

नाही तात्या... आपल्या मराठमोळ्या पदार्थाचे श्रेय सिंध्यांच्या गळ्यात घालू नका... काहीही असो... वडापाव मराठी होता मराठी आहे मराठी राहील!
आपली छत्रचामरं दुसर्‍यांना का बरे काढून द्या?

अवांतर : ऑफिसमध्ये बसल्याबसल्या असे वाचले की खूप उचंबळून येते.. ७ कधी वाजतात असे होते.

(वाडेश्वरची इडलीचटणीप्रेमी आणि चौकातल्या हातगाडीवरील वडापावभक्त) मनस्वी

विसोबा खेचर's picture

28 Mar 2008 - 5:06 pm | विसोबा खेचर

नाही तात्या... आपल्या मराठमोळ्या पदार्थाचे श्रेय सिंध्यांच्या गळ्यात घालू नका... काहीही असो... वडापाव मराठी होता मराठी आहे मराठी राहील!

कबूल! शब्द मागे घेतो, परंतु तेवढ्यावरून आता इथे वाद सुरू होऊ नये असे वाटते!

आपला,
(उदास!) तात्या.

मनस्वी's picture

28 Mar 2008 - 5:10 pm | मनस्वी

आता मला उदास करू नका... वाद होउच नये... कोणी तशी प्रतिक्रिया दिल्यास तिला कोणीच उत्तर देउ नये...

(अतिउदास) मनस्वी

नंदन's picture

28 Mar 2008 - 6:14 pm | नंदन

सुरेख कल्पना आहे. मिसळ पहिल्याच भागात शोधत होतो, पण पुढच्या भागात येतेय हे वाचून हायसं वाटलं. बाकी इडली-बटाटावडा आणि शिरा-मिसळ म्हणजे सात्विक-तामसी जोड्याच!.

आणि तुझ्याच 'माझा परजातप्रवेश' मध्ये ज्याबद्दल लिहिलंय ती खानदानी, नबाबी दम गोश्त बिर्याणी ; पंजाबी तगडी लस्सी; ऐसपैस पण हिशोबी खमण-ढोकळा अशी अनेक मंडळी रांगेने उभी आहेत:)

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

झकासराव's picture

28 Mar 2008 - 7:03 pm | झकासराव

लिहिलय की :)
आवडल.
बटाटावड्याच आत्म चरित्र झ्याक वाटल.
साला दोन घटकांची जिंदगी हेच अंतिम सत्य.
इडली तर मला नेहमी चटणी सोबतच आवडते.
ते देखील छान जमलय.
इडलीच आत्मचरित्र वाचुन एक नाजुक साजुक छान दिसणारी सभ्य अशी साउथ इंडियन मुलगी आली नजरेसमोर :)

चतुरंग's picture

28 Mar 2008 - 8:13 pm | चतुरंग

तुमची ही पहिली दोन 'पदार्थचित्रे' खासच भावली!

अहो कालच गरमागरम इडल्यांचा आस्वाद घेतलाय ना! (आमच्या सौ. फारच भारी करतात हो इडल्या, त्याबाबतीत आपण भाग्यवान आहोत!)

स्वत: उकळत्या तेलाचे चटके सोसून मस्तीत कसं जगायचं ते आपण जगाला शिकवतो साहेब!
क्या बात है तात्या! अहो हे असं व्यक्तिरुप देताय ना तुम्ही त्यामुळे पुढच्या वेळी वडापाव खाताना उगीचच अपराधी वाटेल की काय अशी भीती वाटतेय!;)

चतुरंग

सुधीर कांदळकर's picture

28 Mar 2008 - 8:18 pm | सुधीर कांदळकर

आपल्या मिपावर शोभेल असा. झकास जमला आहे. पोटात आग पडली. तमिळनाडूत 'सरवान' मध्ये इडलीबरोबर तीन वेगवेगळ्या चटण्या मिळतात बरे का.

आता खातोच काहीतरी. वा. नशीब. जेवण तयार आहे. मिरच्या तळायचीच ऑर्डर देतो.

धन्यवाद.
चिंचेची, खोब-याची व टोमॅटोची.

अर्धवटराव आचरटाचार्य,
सुधीर कांदळकर.

पिवळा डांबिस's picture

28 Mar 2008 - 11:40 pm | पिवळा डांबिस

गरमगरम इडल्या मिळाल्या, अगदी हलक्या आणि चवीला छान होत्या!' असं माझं वर्णन बर्‍याचदा केलं जातं
सकाळी सकाळी कित्येक लोकं न्याहरी म्हणून माझ्याच गरमागरम चवीला प्राधान्य देतात.
सांबारापेक्षा छानशी दक्षिण भारतीय पद्धतीची चटणी, ही माझी अतिशय प्रिय मैत्रिण!
मार डाला! विशेषत: सक्काळी सक्काळी, धारवाडच्या दक्षिणेला कुठेही, केळीच्या पानावर वाढलेली गरमागरम वाफा येणारी इडली एखाद्या टपरी हाटेलात खावी. चंदनी अगरबत्तीच्या सुगंधात न्हाऊन! आणि काउंटरवरच्या इडलीइतकेच शुभ्र शर्ट-लुंगी नेसलेल्या अण्णा-अप्पाला "अय्योय्यो! स्वामी, तुम्हारे जैसा इडली और किसीको जमताइच नही" म्हणून दाद द्यावी!

आपण साला एकदम बिनधास्त व्यक्तिमत्व आहे बघा साहेब! आपल्याच मस्तीत जगणारा! आपलं नांव पण एकदम लै भारी आहे.."
आयला, दचकलोच! मला एकदम वाटलं की हा तात्या माझंच व्यक्तिचित्र लिहितोय की काय? :))

स्वत: उकळत्या तेलाचे चटके सोसून मस्तीत कसं जगायचं ते आपण जगाला शिकवतो साहेब!
वा, जवाब नही!!!

तुमी तुमचं ते व्यक्तिचित्र की आत्मचरित्र का काय म्हणतात ते सांगा म्हणाले म्हणून एवढा वेळ तुमच्याशी बोललो साहेब! पण आता आपल्याजवळ तुमच्याशी बोलायला जादा टाईम नाय!
नायतर काय! डेक्कन एक्सप्रेस यायची वेळ झाली नाय काय!!:))

तेलातनं बाहेर पडल्यावर गार होंण्याच्या आत गरमागरम असतांनाच जगून घेतलं पाहिजे, एकदा गार झाल्यावर कोण विचारतो आपल्याला? साली दोन घटकांची जिंदगी आपली!
खरंय बाबा, आपली सगळ्यांचीच जिंदगी साली दोन घटकांची!!

काल रात्री भाईकाका स्वप्नात आले होते आणि मला म्हणाले,
साला, तुझ्या बरे भाईकाका स्वप्नात येतात! आमच्या स्वप्नात साला प्रयत्न करकरून सुद्धा येत नाहीत!! आमच्या स्वप्नात सदानकदा फक्त मुकुंद टाकसाळे!!:)))

असो. मस्त लिहिलंयस तात्या, आता पुढील भागांच्या प्रतिक्षेत!!
-पिवळा डांबिस बटाटेवडा

विसोबा खेचर's picture

28 Mar 2008 - 11:44 pm | विसोबा खेचर

आमच्या स्वप्नात सदानकदा फक्त मुकुंद टाकसाळे!!:)))

हा हा हा! हे बाकी मस्त! :)

बाय द वे, मुकुंदाही छान लिहितो. मला आवडतं त्याचं लेखन..!

तात्या.

बेसनलाडू's picture

29 Mar 2008 - 5:08 am | बेसनलाडू

बटाटावडा जबर्‍या. इडलीही मस्त! वाचून मौज वाटली (आणि चित्रे पाहून भूकही लागली :) )
(खादाड)बेसनलाडू

वरदा's picture

29 Mar 2008 - 5:34 am | वरदा

मी लगेच आधी जाऊन इडलीसाठी डाळ भिजत टाकली आणि कोलेस्टेरोल ला गोळी मारुन लगेच पुढच्या आठवड्यात वडे करायचं ठरवलं....
सोपे आणि नेहेमीचे पदार्थ आम्हाला नाही बुवा असं काही सुचत ते पाहुन्..आम्ही खायला टपलेले असतो...कसं सुचतं तुम्हाला इतकं छान लिहायला.....
मस्तच आहे....आता जाते खूप भूक लागली...पण पोळि खावी लागणार्..तीही आधी स्वतः लाटली की मगच मिळेल....
पोळीचंही आत्मचरित्र लिहा एकदा...माझ्या घरची पोळी म्हणेल्..रोज ही बाई किती कंटाळून बनवते मला पण खाताना अगदी पटापट जाते की मी पोटात.....

विसोबा खेचर's picture

29 Mar 2008 - 7:12 am | विसोबा खेचर

रोज ही बाई किती कंटाळून बनवते मला पण खाताना अगदी पटापट जाते की मी पोटात.....

अरे वा वरदा! पोळीचं आत्मचरित्रं तूच लिहायचा प्रयत्न कर की. नक्की जमेल तुला! वरील वाक्यानेच सुरवात कर! तुझ्या घरची पोळी थोडी तुझ्याचसारखी गोष्टीवेल्हाळ वाटते आहे, तिच्या मनात काही नाही! :)

ती बापडी पटकन तव्यावर पडते आणि तिथून छानशी फुगून ताजी, गरमागरम होऊन तुझ्या पानात पडते!

तव्यावरून डायरेक्ट पानात गरमागरम पडलेल्या पोळी इतकं दुसरं या जगात काहीही शुभ नाही, काहीही सुंदर नाही!

खरं की नाही वरदा? असो..!

पोळीच्या आत्मचरित्राची कल्पना सुरेख आहे. ते लिहायचा तू जरूर प्रयत्न कर! तुलाही जमेल!

तात्या.

प्रभाकर पेठकर's picture

29 Mar 2008 - 2:11 pm | प्रभाकर पेठकर

रोशनी..रोशनी....रोशनी....रोशनी.... कुठे गेली रोशनी?

विसोबा खेचर's picture

29 Mar 2008 - 4:48 pm | विसोबा खेचर

परंतु अद्याप मूड लागत नाही. परंतु आता मात्र सर्व लेखन पूर्ण झाल्यानंतरच रौशनीला घेऊन मिपावर येईन. म्हणजे उगाच पब्लिकला वाट पाहायला लागायला नको..

तात्या.

स्वाती राजेश's picture

29 Mar 2008 - 7:33 pm | स्वाती राजेश

भन्नाट कल्पना आहे..
तात्या काय मस्त कल्पनाशक्ती आहे तुमची. मस्त लिहिले आहे
हे पदार्थ करत असताना ते काय बोलत असतील? याची कल्पना सुद्धा किती छान..
मला नेहमी परोपरी समजावून सांगत असते की, 'बाई गं, हल्लीच्या जगात एवढा शांतपणा, सात्विकपणा उपयोगाचा नाही, तू थोडी माझ्यासारखी झणझणीत, चटपटीत हो!'

जाण्यापूर्वी एकच सांगतो, की मस्त मजेत जगा, स्वत:च्या स्वभावात चवदार, चविष्ट, खमंगपणा आणा आणि दुसर्‍याला पण तसंच अगदी मस्त मजेत चवीचवीने जगायला शिकवा! अहो तेलातनं बाहेर पडल्यावर गार होंण्याच्या आत गरमागरम असतांनाच जगून घेतलं पाहिजे, एकदा गार झाल्यावर कोण विचारतो आपल्याला? साली दोन घटकांची जिंदगी आपली!

ही वाक्ये नेहमी वरील पदार्थ करताना आठवतील...

वरदा's picture

31 Mar 2008 - 12:05 am | वरदा

पोळीच्या आत्मचरित्राची कल्पना सुरेख आहे. ते लिहायचा तू जरूर प्रयत्न कर! तुलाही जमेल!

मी लिहीणार म्हणजे झालच कल्याण..लोक पळून जातील हो इथून...तुम्ही मस्त लिहीताय...येऊदेत मिसळ आणि साजुक तुपाचा शिरा....
तव्यावरून डायरेक्ट पानात गरमागरम पडलेल्या पोळी इतकं दुसरं या जगात काहीही शुभ नाही, काहीही सुंदर नाही!


हे अगदी खरं ती पोळी मऊ मुलायम टमाटम फुगलेली असावी आणि त्यावर मस्त तुपाची धार सोडावी..आणि ती आईने प्रेमानं वाढावी आणि जग तिथेच थांबून रहावं....नॉस्टॅल्जीक वाट्टय आता जाम....:((((

धोंडोपंत's picture

31 Mar 2008 - 8:00 am | धोंडोपंत

वा वा वा वा वा तात्या,

किती सुंदर लिहिले आहेस तू? अप्रतिम. इतके वर्ष जे पदार्थ रोज भेटत आहेत त्यांना तू बोलके केलेस. झकास लेखन.

कसं काय सुचतं बुवा तुम्हांला अशा वैविध्यपूर्ण गोष्टींवर लिहायला?

आपला,
(प्रभावित) धोंडोपंत

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

विसोबा खेचर's picture

1 Apr 2008 - 1:34 am | विसोबा खेचर

प्रतिसाद देणार्‍या सर्व मंडळींचे मनापासून आभार..!

ज्या मंडळींना हे लेखन बरा-वाईट, असा कोणताच प्रतिसाद देण्याच्याही लायकीचे वाटले नाही, त्यांचेही आभार..! :)

तात्या.

भोचक's picture

1 Apr 2008 - 3:22 pm | भोचक

तात्या मजा आणली. आता मिसळीचं येऊ द्या.

(मिसळप्रेमी) भोचक

यशोधरा's picture

16 May 2008 - 7:51 pm | यशोधरा

मस्तच लिहिलय!! :) आवडल !

देवदत्त's picture

16 May 2008 - 9:42 pm | देवदत्त

मस्त एकदम. सकाळी मी मेदूवडा सांबारच खायचो नाश्त्याला. आता बटाटेवडा सांबार खातो :)
तात्या ते बटाटेवड्याचे फोटो पाहून लगेच वास दरवळला इथे. भूकही वाढली. :)

उंची प्लेटी नकोत आणि ते काटेचमचे नकोत, की काय पण नको आपल्याला. ४-५ रुपायात आम पब्लिक रस्त्यावरच्या गाडीवर वडापाव खातो आणि समाधान पावतो! अहो गरीबाच्या पोटाची थोडा वेळ तरी आग शमते! काय, खरं की नाय?
खरं एकदम.

अरे हो, आता शिव वडा ही मिळणार आहे ना काही दिवसांत. आणि आपल्याकरता आहेच हो कुंजविहार इथे
=P~ =P~ =P~

शितल's picture

16 May 2008 - 10:25 pm | शितल

तात्या तुम्ही माझ्या खादाडीच्या अगदी विक पॉईन्ट वरच लेख लिहिला आहात, काय बोलु आता.
आता वाट पहाणे शक्य नाही बेत लगेच तयारीला लागते, त्या शिवाय जिवाला शात॑ता नाही लागायची.
अगदी मस्त लिखाण, आता इथुन पुढे इडली आणि बटाटे वड्याला विचारूनच त्या॑ना पोटात ढकलणार.

ईश्वरी's picture

17 May 2008 - 12:14 am | ईश्वरी

इडली , बटाटावडा ...मस्त अगदी .
तात्या , छान लिहीलत. मजा आली वाचताना. धन्यवाद.

उंची प्लेटी नकोत आणि ते काटेचमचे नकोत, की काय पण नको आपल्याला. ४-५ रुपायात आम पब्लिक रस्त्यावरच्या गाडीवर वडापाव खातो आणि समाधान पावतो
-- एकदम सही
मिसळीचे व्यक्तीचित्र तुम्ही छान रेखाटाल . मिसळी बद्दल तुमच्या शैलीत लिहीलेले वाचायला खूप आवडेल.

(पुढील पदार्थांच्या आत्मकथनाच्या प्रतिक्षेत ) ईश्वरी

मन's picture

17 May 2008 - 2:48 am | मन

पुढले भाग सुद्धा पोटभरुन वाचायला आवडतील.

आपलाच,
मनोबा

प्रगती's picture

17 May 2008 - 12:52 pm | प्रगती

एवढया छान छान प्रति़क्रिया आल्यावर आम्ही आणखी काय वेगळं सांगणार. लवकर प्रसादाच्या शिर्‍याबद्द्ल लिहा.
शिराप्रेमी प्रगती.