मै ऐसा क्यूं हूं?

बिपिन कार्यकर्ते's picture
बिपिन कार्यकर्ते in जनातलं, मनातलं
3 May 2010 - 6:47 pm

जेव्हापासून आठवतंय तेव्हापासून घरात पुस्तकंच पुस्तकं असायची. त्यामुळे मला वाचनाची मुद्दाम सवय लावावी वगैरे लागली नाही कुणाला. मला अगदी लहानपणचं जे आठवतंय त्यापैकी एक असं... रात्रीची वेळ. सगळे जेवायला बसले आहेत. आणि मी काही तरी पुस्तक वाचतो आहे. आई जेवायला बोलवून बोलवून थकली आहे आणि शेवटी आता वाचन पुरे म्हणून एक धपाटा घालून जेवायला नेलं मला. :)

बरं पुस्तकं खूप म्हणजे किती असावीत? अक्षरशः घरात माणसांच्या अगदी बरोबरीने पुस्तकांची दाटी असावी. घरात आजोबा, आजी, आई, बाबा, दोन काका, एक आत्या, ताई आणी सगळ्यात लहान मी. एवढी माणसं. प्रत्येकाच्या आवडीनुसार वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं. माळ्यावर ट्रंकेत पुस्तकं. ग्यालरीतल्या शेल्फात पुस्तकं. माझ्या कप्प्यात अर्ध्या भागात कपडे, अर्ध्या भागात पुस्तकं. असं सगळं.

अगदी सुरूवातीला वाचलेली पुस्तकं म्हणजे (बहुधा) ज्योत्स्ना प्रकाशनाची अथवा केशव भिकाजी ढवळे प्रकाशनाची लहान मुलांच्या गोष्टींची पुस्तकं. राजाराणी, राक्षस, त्याचा पोपटात असलेला जीव वगैरेंची. वेगळ्याच एका अद्भुत दुनियेत घेऊन जाणारी. सुट्टी असो नाही तर शाळा असो... रोज एखादे तरी पुस्तक वाचायचोच. मग रात्री स्वप्नातही तेच दिसायचं. अर्थात तेव्हा राजकन्या वगैरे पेक्षा तो राक्षस, पोपट आणि त्याच्या राजपुत्राशी होणार्‍या लढायाच जास्त दिसायच्या स्वप्नात. पण एकंदरीत मजा यायची. जसजसा थोडा मोठा झालो तसतसं मग क्षितिज विस्तारले. बाबा दर शुक्रवारी का अशाच कोणत्याशा वारी 'द इलस्ट्रेटेद विकली ऑफ इंडिया' आणायचे, ऑफिसातून येताना. त्यातली रंगीत चित्रं बघायला मजा यायची. त्यातच ओळख झाली 'फँटम'ची. फँटम, त्याची लेडी डायना, जंगल, मधून मधून त्या फँटमचा होणारा मि. वॉकर, सध्याच्या फँटमचा पूर्वज जो पहिल्यांदा फँटम झाला, त्याने कवटी हातात घेऊन घेतलेली शप्पथ, फँटमची मुलं, म्हातारा गुर्रन हे सगळं मला अगदी अजूनही खरं वाटतं. आता, हे सगळं काल्पनिक आहे असं माहिती आहे, पण वाटत नाहीच अजूनही. अजून थोडा मोठा झाल्यावर भेटली, इंद्रजाल कॉमिक्स. बाबांपाशी हट्ट करून पेपरवाल्याकडे दर आठवड्याचे नवीन प्रसिद्ध झालेले कॉमिक्स टाकायला लावले होते. त्यात प्रामुख्याने मँड्रेक आणि त्याचा पैलवान सहाय्यक लोथार यांचे कारनामे असत. जादूचे कॉलेज, तिथला प्रिन्सिपॉल थेरॉन आणि ते मनाच्या शक्तीचे प्रयोग इत्यादी हे केवळ अद्भुत.

त्याच वेळेस आणि त्याच बरोबरीने वेड लावले होते ते अमर चित्रकथांनी. माझ्या मते अगदी अजूनही 'कॉमिक्स' या प्रकारातली ही सगळ्यात छान अशी मालिका आहे. या चित्रकथांनी माझ्यासारख्या मराठी माध्यमात शिकणार्‍या मुलाला भारतिय हिरोज आणि भारतिय संस्कृतीतल्या गोष्टींचा प्रच्चंड खजिना अतिशय नेटकेपणाने खुला केला. रामायण, महाभारत वगैरे तर आहेच... पण राजपुतान्यातल्या राणा संगा, राणा प्रताप, राणी पद्मिनी सारख्या थोर आणि शूर व्यक्तींचा परिचय मला झाला. आजही मला अमरचित्रकथांचा संपूर्ण संग्रह माझ्या मुलींसाठी विकत घ्यायची इच्छा आहे. अमर चित्रकथांचे वैशिष्ट्य म्हणजे अतिशय सुंदर रेखाटनं आणि साधी सरळ भाषा. नुसती बघत रहावी अशी रंगसंगती. अमर चित्रकथांना माझ्या मनात एक अगदी वेगळेच स्थान आहे. नेहमीच राहील. चांदोबा आणि किशोर मासिकं तर अगदी नववीत वगैरे जाईपर्यंत दर महिन्याला घरी येत असत.

आम्हाला पाचवीपासून इंग्रजी सुरू झाले. हळूहळू अक्षरओळख झाली आणि वाचनाची गाडी त्या भाषेकडे वळायला लागली. सतत प्रयत्न केल्याने बर्‍यापैकी लवकर इंग्रजी वाचता येऊ लागले. रोजचे इंग्रजी वर्तमानपत्र वाचणे हा तर नियमच झाला. माझ्या वडिलांना अ‍ॅगाथा ख्रिस्ती किंवा डॅफ्ने डु मॉरिएच्या कादंबर्‍या वाचायचा दांडगा शौक. त्यांच्याकडे बर्‍याचशा कादंबर्‍या संग्रही होत्याच. अर्थात हे सगळे वाचता येऊ लागे पर्यंत बराच वेळ गेला. पण पुस्तकं हाताशी असल्याने नेहमीच ती चाळली जात. मला आठवतंय, मी सातवीत की आठवीत असताना मला माझ्या आत्याने दिवाळीत शेरलॉक होम्सच्या सगळ्य कथांचा संग्रह दिला होता. सुट्टी संपायच्या आत वाचून संपले होते दोन्हीही खंड. बाबांच्या संग्रहामुळे हर्क्युल पायरॉची ओळख झालीच होती. मराठीतल्या गुरूनाथ नाईक वगैरेंची पुस्तकं तर तेव्हा सर्रास उपलब्ध असत. त्यांची तर पारायणं चालूच होती. एके दिवशी माळा साफ करताना, एका ट्रंकेत त्यांनी आणि माझ्या वडिलांनी त्यांच्या तरूणपणी जमवलेली अर्ल स्टॅनले गार्डनरची आख्खीच्या आख्खी पेरी मेसनची सिरिजच हाती लागली. थोड्याच दिवसात त्याचाही फडशा पाडण्यात आला.

अशा रितीने हळूहळू माझी वाचनाची सवय वाढत होती... अगदी हाताबाहेर जात होती असे म्हणले तरी चालेल. वाणसामान गुंडाळलेल्या पुड्यांचे कागदही सुटत नव्हते माझ्या तावडीतून. घे कागद की वाच, घे पुस्तक की वाच असं चालायचं.

पण माझ्या वाचनावर खरा प्रभाव असेल तर तो माझ्या काकाचा. घराण्याच्या गुणधर्माला अनुसरून तोसुद्धा वाचनकिडा आहेच. आमच्या घराजवळच मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाची शाखा होती. खूपच सुसज्ज लायब्ररी होती ती. अजूनही आहे बहुधा. काका तिथे मेंबर. त्याची साहित्याची जाणही प्रगल्भ आहे. तो जी पुस्तके आणत असे ती दिवसा माझ्या ताब्यात असत. कथा / कादंबर्‍या / मासिकं अगदी भरपूर वाचन केलं त्याच्याजोडीने. लहान वय असल्यामुळे सगळंच कळलं असेल असं नाही, पण ती नावं, ती भाषा न कळत मनावर ठसत होती, संस्कार करत होती. काका 'ललित' मासिकाचाही सदस्य होता. दर महिन्याला त्याच्या जोडीने मीही नवीन अंकाची वाट बघत असे. 'ठणठणपाळ' तर लै हिट्ट होता त्यातला. अजूनही ते मिशाळ ठणठणपाळाचे सरवट्यांनी काढलेले व्यंगचित्र डोळ्यासमोर आहे. 'ललित'चा दिवाळी अंकही दणदणीत असायचा. माझ्या वडिलांचा आत्तेभाऊ साहित्यिक / प्राध्यापक वगैरे. तो नेमाडपंथी. म्हणजे, नेमाड्यांच्या अगदी रोजच्या बैठकीतला. त्या कनेक्शनमुळे माझा काकाही तसाच. कोसला, बिढार, झूल इत्यादी कादंबर्‍या घरच्याच संग्रहातल्या. अगदी शाळकरी वयातल्या. 'कोसला' पहिल्यांदा वाचली तेव्हा काहीतरी वेगळंच (पण त्या वयात नेमकं लक्षात न येणारं) असं काही आपण वाचतो आहे हे कळत होते त्या जाणिवेची आठवण अजूनही मनात घर करून आहे. महानोर, कोलटकर वगैरे नावं ऐकून माहित झाली. त्यापैकी महानोरांची कविता समजायला जास्त सोपी म्हणून त्याची पारायणं झाली. 'या नभाने या भुईला दान द्यावे' वगैरे ओळी तर मनात घर करून बसलेल्या. त्यावेळच्या नवीन वाटा चोखाळणार्‍या साहित्यिकांची ओळख अशा रितीने घरातच होत होती. काकाकडे 'फणीश्वरनाथ रेणू' या महान हिंदी सहित्यिकाची काही पुसकं / कादंबर्‍या होत्या. त्यापण वाचत होतो.

आज हे सगळे आठवायचे कारण म्हणजे काही दिवसांपूर्वी झालेला मेघनाबरोबरचा संवाद. तिच्याशी बोलताना जुन्या आठवणी निघाल्या आणि मी विचार करायला लागलो. आज मला कोणी विचारले की तुला काय करायला सगळ्यात जास्त आवडेल तर मी रात्री झोपेतसुद्धा 'वाचन' असे उत्तर देईन. मग 'मै ऐसा क्यूं हूं?' असा विचार करत असताना मला लहानपणापासून सहजतः मिळालेला पुस्तकांचा सहवास आणि माझ्यसमोर घरातले इतर लोक करत असलेले वाचन हे त्याचे मुख्य कारण आहे असे जाणवले. मग असा विचार आला मनात की एखादा धागा टाकावा. सगळ्यांनाच काही ना काही छंद असतो, आवड असते. माझ्यासारखी आणि माझ्यहूनही जास्त वाचनाची आवड असणारे थोर लोक इथे आहेत. त्यांच्या त्या त्या आवडीनिवडी अथवा छंद त्यांना कसे लागले असावेत? त्या लोकांनी त्यांचे अनुभव / आठवणी इथे शेअर कराव्यात अशी कल्पना.

प्रत्येकाने वाचन वगैरे बद्दल लिहावे असे नाही. मला वाचनाचा छंद आहे. अजून कोणाला पर्यटनाचा असेल, कोणाला गिर्यारोहणाचा असेल. कोणाला चित्रकलेचा अथवा संगिताचा असेल. कोणी जुन्या हिंदी गाण्यांचा / चित्रपटांचा शौकिन असेल. तर प्रत्येकाने असे काहीना काही लिहावे ही अपेक्षा.

इतिहासमौजमजाप्रकटनअनुभवविरंगुळा

प्रतिक्रिया

सस्नेह's picture

12 Jul 2012 - 1:18 pm | सस्नेह

आणखी एक गंमत म्हणजे अभ्यासाच्या पुस्तकात चांदोबा किंवा कादंबर्‍या लपवून वाचणे.
पण आईला ते कसे कोण जाणे, लगेच समजायचे..
बाकी, चान्दोबातली चित्रे, विशेषतः अप्सरांची, अजुन डोळ्यापुढे आहेत.

परिकथेतील राजकुमार's picture

13 Jul 2012 - 4:59 pm | परिकथेतील राजकुमार

प्रतिक्रिया वाचून.

मोहनराव's picture

13 Jul 2012 - 6:00 pm | मोहनराव

जपा निरागसता! ;)

मस्तं धागा आणि सुंदर प्रतिसाद!

मी या विषयावर लिहिलं तर जे लिहीन तेच आलंय लेखात! कसा वाचायचा सुटला होता लेख कळत नाही!सुरेख लेख आणि प्रतिसाद!विशेषतः मेघनाचा!

खटपट्या's picture

9 Jan 2015 - 12:55 am | खटपट्या

खूप छान !! आवडले !!

पारुबाई's picture

27 Jan 2015 - 1:52 am | पारुबाई

लहानपणापासूनच मला वाचायला आवडते.माझ्या आठवणीतील माझी पहिली पुस्तक खरेदी म्हणजे मी पहिली दुसरीत असताना पुण्यात अप्पा बळवंत चौकात ‘अरगडे आणि मंडळी’ नावाचे एक कोपर्यावर दुकान होते तिथून मला बाबांनी लहान मुलांची ४० पुस्तके एका दमात आणून दिली होती.त्यांना वाटले कि मी आता उन्हाळ्याच्या सुट्टीत “आई मी काय करू?” असा धोशा लावणार नाही.पण मी सगळी पुस्तके २-४ दिवसात वाचून संपवली.
तेव्हापसुन मी वाचतेच आहे..इयत्ता चौथी मध्ये असताना मी आचार्य अत्रे यांचे ‘कर्हेचे पाणी’ चे पाच खंड वाचून संपवले होते.माझे बाबा आल्या गेल्या सर्वाना हे कौतुकाने सांगत असत.मी स्वतःमध्ये रमते ते देखील याच कारणाने.मला वाचलेले मनात घोळवायला त्यावर विचार करायला खूप आवडते.मात्र मी काय वाचते याच्याकडे बाबांचे लक्ष असे.रहस्यकथा,कादंबर्या किंवा खून माऱ्यामाऱ्या यांचा समावेश असलेले मी वाचले कि बाबा एकच वाक्य म्हणायचे,”काहीतरी चांगले उत्तम अभिरुचीचे वाच” .त्यामुळे मी विविध तर्हेचे चौफेर वाचन केले असे म्हणता येणार नाही. माझी आई देखील खूप वाचायची रात्र रात्र जागून वाचायची.तीच माझी,माझ्या नवर्याची आणि माझ्या मुलांची सवय आहे. काही लोकांना जेवताना पण वाचयला आवडते.ते मात्र माझ्या आईला मान्य नव्हते.तिच्या मते तो अन्नाचा अपमान होता.
लहान वयात जसे चांदोबा,किशोर,कुमार,आनंद आणि कॉमिक्स खूप वाचले तसे अधिकक मोठे होताच रणजीत देसाई, ना सं इनामदार वाचले पु ल आणि व पु ही तर दैवते. शांता शेळके वसंत बापट मंगेश पाडगावकर सुरेश भट यांच्या कित्येक कविता तोंडपाठ केल्या.आता अमेरिकेत आल्यावर माझी वाचनाची आवड एका वेगळ्याच विषयाकडे वळली.nonfiction, parenting, self-help books.या विषयावर इथे खूपच मोठा खजिना आहे गेली १४-१५ वर्षे मला या विषयावरच्या पुस्तकांनी झपाटून टाकलेले आहे.मात्र अजून अनेक विषयावर वाचून व्हायचय.
माझे असे दिवस रात्र सलग वाचणे पाहून बाबांचे मित्र म्हणायचे,” किती गुणी मुलगी आहे रे तुझी! कशी शांतपणे एकटीच कोपर्यात वाचत बसली आहे”
रात्रीचे जागरण करून वाचणे मला अजूनही आवडते.सगळीकडे शांत आहे रात्र हळूहळू चढत जत आहे आणि मी मोठमोठे श्वास घेत एका पानामागून एक पान उलगडत क्वचितच आजू बाजूला पाहत मी पुस्तक वाचनात रमून गेलेली आहे.हा माझा आनंदाचा ठेवा आहे.