माझे जग

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जनातलं, मनातलं
4 Apr 2010 - 6:53 pm

माझे जग

काही दिवसांपुर्वी एखाद्या वर्षापुर्वी मी एकटी होते. नाही म्हणायला माझ्या इतर दोन भगिनी होत्या घरात. तसं आम्ही तिघेही समोरासमोरच होतो. दररोज सकाळी जाग आल्यावर आमचे बोलणी व्ह्यायची व्ह्यायची. आमच्या काही चुलत बहिणी पण वरच्या मजल्यावर होत्या. त्या आता काही दिसत नव्हत्या. आम्हाला येथे आणण्याच्यावेळी एका गाडीत आम्ही एकमेकांच्या पाठीला पाठ लावून आलेलो होतो तेव्हांचेच काय ते बोलणे त्यांच्याशी. आता फक्त खालच्या मजल्यावरील आम्ही तीन भगीनीच एकमेकांशी बोलू शकतो, पाहू शकतो.

नव्याचे नउ दिवस असतात तसे आमचे रंग नविन होते. आमच्या गजांना मस्तपैकी रंग लावलेले होते. जणू काही रंगीत रिबीनीच बांधल्या होत्या म्हणा ना. आमच्या मालकाने मोठ्या हौशीने कलात्मक पद्धतीचे गज आणले होते. त्यावर मधून मधून फुले लावलेली होती. आताच्या युगात यांत्रिकीकरणामुळे खिडकीचे सरळ सरळ समांतर गज जावून नविन रचनेच्या जाळ्या आल्या. त्यातलीच एक महाग जाळी आम्हां तिनही भगीनींवर चढलेली होती. आमच्या अंगावर मस्त पैकी काचा लावलेल्या होत्या. त्यातून दिवसा घरात कमी उजेड येवून उन्हाचा प्रखरपणा कमी करणारी एक फिल्म लावलेली होती. सुरूवातीला आम्हालाही मजा वाटायची. पण रात्री मात्र बाहेरच्या माणसाला त्या काचांतून सरळ आत दिसायला लागे. अर्थात आमच्या मालकाने रहायला आल्यानंतर लगेचच त्याच दिवशी आतून छानपैकी पडदे लावले. त्या पडद्यांमूळे मात्र आम्ही भगीनी रात्री एकमेकांकडे पाहू शकत नसू. ते ठिक होते. तसेही आम्ही रात्री झोपतच असू म्हणा. परत सकाळी दिवस सुरू.

आमच्या काचा अन घरातील आतील भाग यात मोठी जागा होती. म्हणजेच भिंतीची रूंदी एखादी फुट असेल नसेल. त्या रूंदीत चारी बाजूंनी मालकाने हिरवा मार्बल लावलेला होता. एका अर्थाने लग्नाच्या नवरीला जसे सजवतात तसे आम्हाला सजवलेले होते. त्या जागेत मालकाचा गोड मुलगा बसत असे. खुपच अवचिंदी होता तो. खाऊ खातांना आणलेली वाटी तो आमच्या आमच्या पुढ्यात ठेवून खाऊ खात असे तेव्हा तोंडाला पाणी सुटे. मग खाली पडलेला खाऊ खाण्यासाठी मुंग्या आमच्या अंगावरून जात तेव्हा गुदगूल्या होई. तेवढेच बोलणे त्यांच्याशी होई. त्या मुलाची आई मात्र लगोलग आम्हाला साफ करीत असे. त्या मुलाचे वडील आमच्यात वर्तमानपत्र तर नेहमी ठेवत. त्या लहानग्याचे आजोबा तर ओली कपबशी चहा पिवून माझ्या अंगावर ठेवीत तेव्हा मात्र केव्हा माझी साफसफाई होते अन केव्हा नाही असे होवून जात असे. माझ्या इतर दोन बहीणींना हा त्रास नसे. कारण त्या दुसर्‍या भिंतीत होत्या. नाही म्हणायला स्वयंपाक घरात असणार्‍या माझ्या सख्या बहीणीला मात्र फोडणीच्या धुराच त्रास फार होई. तिला फोडणीमुळे जेव्हा शि़ंका येत तेव्हा आम्ही दोघी खदखदा हसत असू. मग तिची तावदाने रागाने थडथडत.

आम्हाला जेव्हा भिंतीत चिणत होते तेव्हा मात्र खुपच त्रास झाला. एखाद्या मातेला प्रसूतीच्या वेळी काय वेदना होत असतील त्या आम्हीच जाणो. नंतर आमच्या शेजारी असणार्‍या भिंतींना कोणते रंग लावावे यात त्या कुटूंबाची चर्चा झाली. दुसर्‍या दिवशी एका माणसाने माझ्या समोरील भिंतीला ५/६ रंगांचे दोन दोन फुटांचे पट्टे मारले. ते रंग पाहून मी तर हरकूनच गेले होते. नंतर माझ्या समोरील ३ भिंतींना फिक्कट पिवळा रंग दिला अन माझ्या भिंतीला मात्र वेगळा म्हणजे गुलाबी रंग दिला गेला. त्या वेगळ्या रंगामुळे मी तर मोठ्या तोर्‍यात मिरवत होते सुरूवातीला. अर्थात त्या वेगळ्या रंगाचा बघण्याचा आनंद माझ्या समोरील बहीणींनाच होत असे. कारण त्यांनाच तो रंग दिसत होता. मला मात्र समोरील एकसारखा पिवळाच रंग दिसत असे. पण माझी भिंत वेगळी होती हे निश्चित. मला एक वडिलकीचा मान होता. घरातील लहान मोठे माझा उपयोग करतात याचा मला अभिमान होता. मी घराच्या मुख्य दरवाज्याच्या जवळ होते. घरात येणारेजाणारे तसेच बाहेरच्या रस्त्यावर येणारेजाणारे मीच पाहू शकत असे. बाहेरील गमतीजमती मी माझ्या बहिणींना सांगत असे.

बाहेर तसे फारसे काही घडत नसे. पोर्च मध्ये मालकाची मोटरसायकल, सायकल, त्या बंडोबाची लहान सायकल, काही झाडाच्या कुंड्या अन काही चपला असल्या सटरफटर गोष्टीच सतत दिसत असत. आम्ही कोणत्या जंगलात आलो की काय असेच वाटे. कारण दिवसभर कोणी एखादाच माणूस त्या गल्लीत चक्कर मारी. मालकाच्य बोलण्यावरून आम्ही शहराच्या नविन भागात रहायला आलोय ही खात्री पटली होती. एक दही विकणारा मात्र त्याच्या सायकलवरून दर दोन दिवसाआड त्या गल्लीत दही विकायला येत असे. गल्ली कसली इनमिन दोन ते तीन बंगले होते ते. तिसर्‍या घराचे बांघकाम तर अजून सुरूच होते. पण मोजायचे म्हणून मोजता येई ते आकडे होते तिनच. तेथे दोन दिवसात येणारा बाहेरचा माणूस म्हणजे हा दहिवालाच. बाकी रस्ता म्हणावा असा नसल्याने तेथून इतर वाहनेही जात नसत. हा कॉलनी रस्ता असल्याने इतर वर्दळीची अपेक्षाही नव्हती म्हणा.

लांबवर मला खुपशी झाडे दिसत. काही निलगीरीची, काही चिंचेची होती. तरीही त्या झाडांजवळ काही शेती वैगेरे नव्हती. एक जवळच असणारी चिंच मला सांगत होती की पुर्वी येथे एका पाटलाची फार मोठी शेती होती म्हणे. पण हा भाग शहराजवळ असल्याने त्याने शेताची काही जमीन बिल्डर लोकांना विकली. त्यातच तुम्ही म्हणजे आमचा बंगला बांधला गेला. सुरूवातीला ही चिंच काहीच बोलत नसे. फक्त रागाने पाही. सहाजिकच आहे म्हणा, तिच्या लेखी आम्ही उपरेच होतो की. पण नंतर नंतर ती ही हवा पाण्याच्या गप्पा मारायला लागली माझ्याबरोबर. मीच जवळची राहिली होते ना तिला. तिच्या जुळ्या भगिणींना तर कापले गेले होते. त्यामुळे एकाकी होती बिचारी. मागल्या बहाराच्या वेळी तिच्यावरील चिंचा तोडायला काही मुले आली तेव्हा किती हरकली होती ती. अगदी वात्सल्याने ती गदगदा हालली होती. पण नंतर तिला ही आपण कधीतरी कापले जावू याची भिती वाटत होती. मग मात्र ती माझ्याशी तासंतास बोलत बसे. मी तिला धिर देई की 'बाई ग तु तर अगदी रत्याच्या कडेला आहेस. तु होणार्‍या बांधकामाच्या मध्ये येत नाही. वैगेरे वैगेरे.' ती मग धिर येवून गप्प बसे.

त्या झाडांच्याच बाजूला मात्र अजूनही मोठी शेती होती. आताच चालू असलेली उसकापणी मी पाहू शकत असे. इतरही दुसरी पिके तेथे घेतली जात. पाटलाचा मोठे घर अन बैठी चाळ ही दिसत असे. ते पाहून मला खूप आनंद होई. एकदा तर तेथे सालदाराच्या घरासमोर एक नाचणारा मोर देखील मी पाहीला. त्या सालदारानेच तो पाळलेला असावा. तेथे आंब्याची मोठी मोठी झाडेही होती. पोपट तर नेहमीच तेथे उडत असत. रानातली कबूतरे तर ओळखीचीच झालेली होती. आपल्या किरट्या आवाजात ती नेहमी ओरडत. त्या पलिकडे शहरातल्या उंच उंच इमारती दिसत. पाच सहा मोबाईलचे मनोरेही दिसत. त्यातला उंचच उंच मनोरा आकाशवाणीचा होता हे मला आताशा समजले होते. असेच आमचे दिवस चालले होते.

एके दिवशी आमच्या समोर दुरवर काही माणसे आली. ती जमीनीची मोजमापे घेवू लागली. नंतर मोठा बुलडोझर आला. त्याने माती सारखी केली अन काही खड्डे केले. नंतर तेथे काही मजूर आले. त्यांची तात्पुररती घरे बाजूलाच उभी राहीली. त्यांची ती कामाची लगबग, त्यांची खळणारी मुनसे.त्या येणार्‍या जाणार्‍या वाळूच्या, खडीच्या गाड्या पहात दिवस कसा निघून जाई ते मला कळतच नसे. ते मोठ्या रो हाउसचे बांधकाम होते असा मला एका कबूतराने निरोप दिला होता. माणसे खपून कामे करीत होती. वेगाने बांधकाम होत होते. खालचा मजला बांधला गेला. त्यात माझ्यासारख्याच खिडक्या अन दरवाजे चिणले गेले. त्या माझ्याशी बोलू शकत नव्हत्या. अंतर खुप म्हणजे खुपच होते.

काही दिवसांनी वरचा मजला चढवला गेला. म्हणजे त्याचे उभे खांब पहिल्यांदा बांधले गेले. मला एकदोन मनोरे दिसेनासे झाले. त्या खांबांच्या मधल्या भागातून त्या पाटलाचे घर दिसत होते पण ती चाळ अर्धी झाकली गेली. त्या सालदाराचे घर, तो शेतमळा, तो मोर तर कधीचेच दिसेनासे झालेले होते. आधी असलेल्या मोकळ्या वातावरणाचे आता कोंदट वातावरण भासू लागले होते. पोपट तर काही दिसतच नव्हते. कबूतरेच आपली जुनी ओळख समजून निरोप द्यायला येत असत.

आता त्या समोरील घरांच्या वरील मजल्यावरील खांबांमध्ये भिंती बांधल्या गेल्या. त्या घरांना आकर्षक रंगही दिल्या गेले. तेथे काही रहिवासी रहायलाही आलेले होते. आता त्यांची लगबग मी पाहू शकत असे. तेथे काही मुलेही खेळत असत. आमच्या घराचा छोट्याही कधी कधी तेथे खेळायला जात असे. असे असले तरी मला बाहेरचा निसर्ग आता पाहायला अडचण येवू लागली. ते मोकळे वातावरण मी विसरूनच गेले. जणू नविन झालेल्या घरांच्या मध्ये मी चिणूनच गेले होते. तरीही मी खुष आहे. कारण मी बदल स्विकारलाय. मी आता त्या मुलांचे खेळ पाहते. चिंचेशी अजूनही बोलते. उंच दिसणार्‍या आकाशवाणीच्या मनोर्‍याला साद घालते. कबूतरांशी बोलते. बाहेर घडणार्‍या घटना, गंमती मी माझ्या बहिणींना सांगते. एकूणच माझे मजेत चालले आहे असेच म्हणायचे. बाकी तुमचे काय? कसे चालले आहे तुमचे. तुमच्याही गंमती सांगा अन बोलत रहा माझ्याशी.

राहती जागामुक्तकजीवनमानप्रकटनविचारलेख

प्रतिक्रिया

मि माझा's picture

5 Apr 2010 - 12:50 am | मि माझा

माफ करा पन खुपच बोअर लेख आहे