विहीर: खोल अन गुढ अंधारी, काळीकुट्ट, सगळ्यांना कवेत घेणारी

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जनातलं, मनातलं
27 Mar 2010 - 10:18 pm

नुकतीच विहीर (थेटरात) 'पाहीली'.

'वळू' चीच बरीचशी टिम यात आहे. कथा दोन मावस भावांमधील आहे. पुण्याचा समिर (मदन देवधर) अन गावाकडचा नचिकेत (आलोक राजवाडे). सम्या आपल्या नचादादावर फार प्रेम करतो. प्रत्रांमधूनही संवाद साधत असतो. दोघेही संवेदनशील आहेत. सम्या त्याच्या आई, बहिणीबरोबर त्याच्या मावशीच्या लग्नासाठी नच्याच्या घरी, गावी येतात. वाड्यात खेळतात. विहीरीत पोहतात. सम्या पट्टीचा पोहणारा असतो तर नचादादा सांगड लावून पोहोतो.

नचादादा गुढ बोलतो. त्याचा जीव नेहमीच्या वातावरणात गुदमरतो. त्याला त्याच्या पलीकडे कोठेतरी दुर निघून जायचे असते. गायब, अद्रूष्य व्हायचे असते. तसे तो सम्याला बोलूनही दाखवतो. समिरला नचादादाला पुण्याला शिकायला आणायचे असते. तो त्याच्या आईला तसे सांगतो. नचादादालाही आग्रह करतो. नचादादा प्रतिसाद देत नाही. सम्याला त्याचा फार राग येतो. तो त्याच्याशी संवाद साधत नाही. पण मनातून त्याच्याशी नचादादाच बोलेल अन नचादादाला सम्याच त्याच्याशी बोलेल असे वाटते. सम्या पोहोण्याच्या स्पर्धेसाठी शहरात येतो. सम्या स्पर्धेहून परत येतेवेळी नचादादाचा विहीरीत मृत्यू झालेला असतो. त्याच्या मामाला त्याने (मामाने) नचादादाला सांगड ढिली बांधल्याची खंत जाणवते. सम्याला नचादादा गेल्याचे काही पटत नाही. तशातच त्याच्या मावशीचे लग्न लागते. तो कुटूंबासह पुण्यास येतो. तरीही वारंवार सम्या नचादादाचा विचार करतो. त्याचे अस्तित्व त्याला नेहमी जाणवत राहते. कुटूंबातील इतर जण कुणी गेल्यानंतर आपले नेहमीचे व्यवहार कसे करू शकतात याचे त्याला कोडे पडते.
नचादादाच्या परिक्षेचा निकाल लागल्यानंतर तो पेढे वाटून आनंदही व्यक्त करतो.
शेवटी एक दिवस तो नचादादाला शोधण्यासाठी घराबाहेर पडतो. त्याला नचादादाला केवळ एकदाका होईना भेटायचे असते. एकदोन दिवस भटकल्यानंतर त्याला एक मेंढपाळ (विठ्ठ्ल उमप) भेटतो. तो त्याला जीवनाचे तत्वज्ञान सांगतो. त्यानंतर सम्या पुन्हा गावी जातो. तो मनापासून नचादादाला हाक मारतो. त्याच वेळी नचादादा त्याला विहीरीच्या काठावर दिसतो. शेवटी हा सगळा भास असतो. सम्या पुन्हा नेहमीचे जगणे जगतो का हे त्याने प्रेक्षकांवर सोडलेले आहे.

बाकी चित्रपटातील तंत्राबद्दल, दिग्दर्शनाबद्दल, कलाकारांबद्दल बोलावे तितके थोडेच आहे.

असा हा चित्रपट पाहिल्यानंतर सम्याबद्दल खुपच कणव निर्माण झाली. एकीकडे त्याच्या भावनांशी आपण एकरूप होवू पाहतो तर त्याच वेळी अनेक अनुत्तरीत प्रश्न तो सोडून जातो.

मला चित्रपटातील काही बाबी समजल्या नाहीत. मेंढपाळ अन सम्यातले संवाद फारच कमी आहेत.
१) मेंढपाळाचं जीव असलेलं व हरवलेलं कोकरू त्याला कोणत्या शक्तीने परत मिळते? तिच शक्ती तो सम्याला कशी काय देतो? (या ठिकाणी मी जेथे चित्रपट पाहीला तेथे तो कापलेला वाटला. आत्ताच्या डिजीटल चित्रपट दाखविण्याच्या तंत्रात चित्रपट कापता येतो का?)
२)सम्याला विहीरीवर नचादादा परत भेटतो, ते दोघे परत फोहोतात. सम्याला तसा भास का होतो?
३)नचादादा पुर्ण चित्रपटभर हातात दांडकं घेवून का वावरतो?
४)पुर्ण चित्रपट समिर नचादादाचा असतांना गावातील घरातील काही दृष्यांमध्ये खुपच बारकाई का दाखविली? (जसे सम्याची आई दळण कांडतांनाचे संवाद) जे न दाखवले असते तरी चित्रपटात काही अडथळा नसता आला. मान्य आहे की बारकाईच्या द्रूष्यांत दिग्दर्शनाचे अंग आहे पण त्याचा कथेशी काही संबंध नसल्यासारखा वाटतो.
५) सम्या नच्याला शोधण्यासाठी २/३ दिवस फिरल्यानंतरही त्याच्या अंगावरची बंडी एकदम कोरी करकरीत कडक इस्त्रीची दिसते. नचादादाच्याही शर्टाची इस्त्री बर्‍याच द्रूष्यांत नजरेला टोचते.
६) विहीर च्या ऑफिशीयल संस्थळावर हे लिहीले आहे:
"Samir’s search leads him towards the experience of oneness where he can unite with Nachiket again!"
समिर एकटा पडूनही तो नचिकेत शी (किंवा त्याच्या भासमान अस्तित्वाशी) कसा एकरूप होतो? तो पुढील आयुष्य सरळ जगतो का?

काहीही असो. चित्रपट पाहून बाहेर आल्यावर हातात काही लागलं नाही तरीही जे हातात आलं नाही ते शोधण्यासाठी मेंदूने विचार जरूर केला. यातच हा चित्रपट करणार्‍यांचं यश आहे.(माझा पुण्यातील एक लांबचा भाऊ अगदी समिरसारखा दिसतो. न कळत त्याच्याशी रिलेट होत गेलो. गावी जाण्याची हुरहूर, बरोबरीचे भाऊ भेटण्याची ओढ अनुभवलेली असल्याने हा आपलाच चित्रपट आहे असे जाणवले.)

समिरच्या मनातील द्वंद, प्रश्न, संभ्रम आपले होवून जातात.

चित्रपट संपल्यानंतर बर्‍याच जणांच्या तोंडून "च्यायला, काय समजलं नाय बुवा" असे उद्गार एकण्यात आले. तशीच परिस्थीती माझीही होती. पण ते न कबूल करायची मध्यमवर्गीय मनस्थिती माझीच होती. एवढा अंतराष्ट्रीय स्तरावरचा गाजलेला हा चित्रपट आपल्याला समजला नाही आपला कमीपणा की हेच त्या चित्रपटाचे यश? खरेच विहीर फारच खोल अन गुढ आहे, अंधारी, काळीकुट्ट, खोल खोल, सगळ्यांना कवेत घेणारी.

विहीर:
दिग्दर्शक - उमेश कुलकर्णी, कथा-पटकथा - गिरीश कुलकर्णी, सती भावे
छायालेखन - सुधीर पलसाने, संकलन - नीरज वोरालिया, संगीत - मंगेश धाकडे
कलावंत - मदन देवधर, आलोक राजवाडे, रेणुका दप्तरदार, डॉ. मोहन आगाशे, ज्योती सुभाष, गिरीश कुलकर्णी, अमृता सुभाष, सुलभा देशपांडे आणि अन्य.

अवांतर: एबी कॉर्प निर्मित जरी ही विहीर असली तरी सगळी छाप ही मराठीच आहे. अमीताभ ने काही ढवळाढवळ केलेली दिसत नाही. (की केवळ मराठीच्या तथाकथित प्रेमापोटी झाले? काहीही असो. एक चांगली कलाकृतीची निर्मीती झाली हे नक्की. मराठीचा झेंडा असाच उत्तरोउत्तर उंच जावो अन विहीर सारखे विचार करायला लावणारे चित्रपट निर्माण होवो याच अपेक्षा.)

कुणास हा चित्रपट पुर्ण समजला असेल, किंवा काही वेगळा अर्थ जाणवत असेल तर सांगा.

कलाचित्रपटमाध्यमवेधआस्वादसमीक्षा

प्रतिक्रिया

सनविवि's picture

27 Mar 2010 - 10:39 pm | सनविवि

Trailer आवडलं होतं पण काहीच झेपलं नव्हतं. परीक्षणाबद्दल धन्यवाद, बघायला पाहिजे हा चित्रपट.

वर्षा म्हसकर-नायर's picture

28 Mar 2010 - 12:18 am | वर्षा म्हसकर-नायर

मी हा चित्रपट बघितला, मला पुर्णपणे समजला, पण तरिही फारसा आवडला नाही, कारण उत्तरार्धात खुपच slow घेतला आहे.
चित्रपटाचे मर्म असे आहे कि.. " माणुस आपल्यात असुन देखिल आपल्यात नसु शकतो आणि आपल्यात नसुन देखिल आपल्यात असु शकतो." म्हणजे शरिराने जरी आपल्यात असला तरिही मनाने आत्म्याने तेव्हा तो आपल्यापासुन खुप दूर असु शकतो आणि शरीरानी जरी आपल्यात नसला तरीही तो आत्म्याने आपल्यात असु शकतो.
हे झाले चित्रपटाचे मर्म.

असणे आणि नसणे ह्यावरील अध्यात्मिक भाष्य चित्रपट करतो.

मेंढपाळ जेव्हा समिर ला सांगतो कि हरवलेले वासरु सापडते त्यासाठी त्याला खुप आतुन हृदयातुन साद घालावी लागते. समिर तेच करतो, त्याच्या नचादादाला खुप आतुन साद घालतो आणि नचादादा त्याला भेटतो. आता भेटतो म्हणजे त्याला तसा भास होतो.पण त्या भासातुनच त्याला खरेखुरे भेटल्याची अनुभुती मिळते. शेवटी सगळे मानण्यावरच तर असते ना, आस्तित्व आहे कि नाही ते. आपल्याला जे दिसते तेव्हडेच सत्य नसते तर त्यापलिकडेही सत्य असु शकते.

असो, पण उत्तरार्ध म्हणजे नचिकेत मेल्यानंतर चित्रपट किती कंटाळवाणा slow घेतला आहे. कमित कमी प्रकाश, एकच फ्रेम ५ मिनिटे स्र्कीनवर. अरे काय हे? खुप जुने तंत्रज्ञान आहे हे. ७०-८० च्या दशकात नाही का ते parallel movies निघाले होते त्यांच्यासारखे. कमीत कमी प्रकाश वापरायचा आणि symbolic shots दाखवायचे.
छपरातुन पाणी खालील भांड्यात पडत आहे हा शॉट symbolic आहे, पण म्हणून तो किती वेळा आणि किती वेळ दाखवायचा ह्याला काही limit आहे कि नाही?

स्वतन्त्र's picture

28 Mar 2010 - 1:30 am | स्वतन्त्र

चित्रपटाची मुख्य संकल्पना: आवडत्या व्यक्तीच्या मृत्यूचा मुलांवर होणारा परिणाम !
चित्रपट थोडा गोंधळात टाकणारा आहे.मध्यंतरानंतर चित्रपट हवी ती पकड घेऊ शकत नाही,बराच काही प्रेक्षकांवर सोडला आहे.जसे साम्य ला jar नाच्याला भेटायचे होते तर तो त्यांच्या मामाच्या किव्वा पंढरपूरला गावी शोधायचा तर,नको तिथे म्हणजे खाणीत वगेरे शोधात बसतो...हे काही पटलं नाही बुवा.आणि समीर ट्रेन मध्ये बसतो पण तो नक्की कोणत्या दिशेने प्रवास का करतो करतो.हे अगदी प्रेक्षकांवर लादलय कि तुम्ही समंजस आहात आता समीर पळून गेलेला आहे असा समजून घ्या
आणि पाणी भांड्यात पडून इतके सुंदर दिसू शकते...ती दृश्ये अप्रतिम ...पण पाणी slab मधून भांड्यात का पडत असते आणि सारखे सारखेच ?
पूर्वार्धात एकटी समीर ची आई, बहिण सोडली तर उत्तरार्धात एकही पत्र दिसत नाही हि खंत.
बर्याच गोष्टी प्रेक्षकांनी समजून घ्याव्या लागतात आणि प्रेक्षक मग त्याचे नको ते अर्थ लावतात...त्यापेक्षा चित्रपटाची लांबी थोडी वाढली असती तर चालली असती !
बर आपण हे सगळा समजून घेतला पण climax जेवढा प्रभावी हवा तेवढा नाही,एका वाक्याशिवाय मेंढपाळ समीर ला कोणतेही तत्वाग्यान सांगत नाही...समीर ला ते लगेच कळते(मग तो आधी आणि जवळ पास एक तास का एवढा गोंधळलेला असतो ?) ज्याच्या वर अक्खा चित्रपट बेतलाय ते सगळा एका वाक्यात संपतं(अक्षरशः २ मिनिटे) का त्याला ते धनगरांच्या लोकगीता तून कळले(हे गरज नसताना टाकलेले लोकगीत २ lines ) ?...आम्हाला तर नाही कळले ते गीत !
एकंदरीत काय तर मध्यंतर पर्यंत उत्कृष्ट असलेला हा चित्रपट slow आणि Trutinyukta उत्तरार्धामुळे घालवलेला आहे !
विचार करण्या सारखी concept आहे पण उत्तरार्ध presentation मुले घालवलेला आहे.
आणि एक:चित्रपट serious असून प्रेक्षक जास्त जास्त खेचले जावेत म्हणून विनोदनिर्मिती असलेले Trailers तयार केलेले आहेत.
त्यामुळे प्रेक्षक जर मनात एक हलकाफुलका,विनोदी चित्रपटाची प्रतिमा मनात ठेवून जात असतील तर त्यांची घोर निराशा !

मुक्तसुनीत's picture

28 Mar 2010 - 6:02 am | मुक्तसुनीत

चित्रपट पाहिलेला नाही. या धाग्यातच प्रथम वाचले. काही प्रश्न पडतात.

१. ओपन-एंडेडनेस : चित्रपट ओपन-एंडेड असावा असे दिसते. ओपन-एंडेड चित्रपटांमधे "..आणि ते सुखाने नांदू लागले" , "खुनाचा/गुन्ह्याचा शोध लागला" , "त्यांचे प्रेम/आयुष्य विफल झाले" छाप ठराविकपणा तर नसतोच. चित्रपटांचा शेवट कुठल्याही निर्णायक स्वरूपाने होताना दिसत नाही. "पुढे काय झाले असेल ?/नक्की काय घडले असेल ?" या शक्यतांना संपूर्णपणे सोडवून चित्रपट संपत नाही.
या ओपनएंडेडनेस मागची भूमिका एक प्रेक्षक या नात्याने मी पुरेशी समजू शकलेलो नाही. प्रामाणिकपणे सांगायचे तर "कॅथार्सिस" या (अ‍ॅरिस्टॉटलने सर्वप्रथम विशद केलेल्या ? चूभूदेघे !) चिरकालीन सूत्राच्या प्रभावातून एक प्रेक्षक म्हणून मी सुटलो आहे असे वाटत नाही. समजा एखादा ओपन-एंडेड चित्रपट पहायचा असेल तर त्याच्या जोडीने मी (बरा वाईट कसाही असेल-नसेल ) एखादा कन्व्हेंशनल चित्रपट पाहतो. ( खोटे कशाला बोला ? जेवायला बसायचे तर निदान पोट तरी भरायला नको का हो ?:-) )

२. नाट्य : हा मुद्दा सुद्धा पहिल्या मुद्द्याशी मिळताजुळता परंतु किंचित वेगळा आहे. आपण इतकी वर्षे पाहात आलेल्या चित्रपटांमधे "नाट्य" हा प्रकार असतोच. कथेमधला ताण , प्रतिद्वंद्व चढत जाते नि कुठे तरी उत्कर्षबिंदू असतो. बर्‍याचदा या उत्कर्षबिंदू भवती चढत जाणारे नाट्य गुंफलेले असते. कित्येकदा चित्रपटांधे आपल्या कल्पनाशक्तीला , संवेदनशीलतेला धक्के बसावेत असे प्रसंग असतात. "विहीर" मधे पुन्हा याबाबतीत वेगळेपण असावे असे दिसते आहे. कुठल्याही चित्रपटाला कथेची चौकट असावी की नसावी ? हा ढाचा आवश्यक आहे की नाही ? ही चौकट कितपत काँक्रिट असावी ? हे असे प्रश्न विहिर बद्दल वाचून मनात आले.

३. तिसरा मुद्दा कदाचित वर येऊन गेलाही असेल. पण तरी लिहितो. तो आहे रंजनाचा. "रंजना"च्या व्याख्या ज्याच्या त्याच्या वेगळ्या, वेगवेगळ्या अभिरुचीचे लोक असतात , निरनिराळा प्रतिसाद मिळतो हे सारे आपल्याला ठाऊक आहेच. तरीही , "विहिर"सारख्या चित्रपटांमुळे , "चित्रपटांचे काहीएक रंजनमूल्य असावे की नाही ?" हा प्रश्न उपस्थित होतोच.

असो. मराठी चित्रपट नक्की वेगळ्या वाटा धुंडाळत आहे. अनेक प्रयोग होत आहेत. सर्वच प्रयोग आर्थिक दृष्ट्या यशस्वी होणार नाहीत हे उघड आहे. बाकी कलात्मक दृष्ट्या काय फसले , काय उत्कृष्ट ठरले हे फारच सब्जेक्टीव्ह असणार.

इन्द्र्राज पवार's picture

28 Mar 2010 - 1:59 pm | इन्द्र्राज पवार

राजन, मला वाटते मराठीतील नव्या वातावरणातील बहुतांशी दिग्दर्शकांनी हे एक सूत्र मनात ठसवून घेतले आहे कि काही तरी गूढ अगम्य आणि पचनी पडायला जड निर्मित केले तरच ऑस्कर तोडीचे चित्रपट आपण काढू शकू. दुसरीकडे असाही एक प्रवाह आहे कि अशी काही निर्मिती केली तरच माध्यमे आणि चर्चा सत्रे यांना उकळी फुटते मग अशा ठिकाणी आपली हजेरी लाऊन परत परत तेच तेच मुदध्ये सभाग्रहात आलेल्यांच्या माथी मारत बसणे. "हा चित्रपट काढताना मला कुरोसावा कसा आठवला, मग मी फेलीनीची कशी पारायणे केली, सत्यजित रे ची दुर्मिळ कलाकृती कशी मिळवली, अदूर गोपालक्रीश्णनच्या भूमिकेतून हा चित्रपट कसा उभा राहिला असता किंवा गिरीश कासारवल्ली व गेला बाजार गिरीश कर्नाड, दुबे यांचे मत घेतले...." इत्यादि इत्यादी ची चौफेर टोलेबाजी होऊ शकते. मग च्यायची ठरलेली वार्तापत्रे आहेतच "ऑस्करच्या तोडीचा दिग्दर्शक आमच्याकडे आहे...." अशा गाजली करायला रिकामी....आणि मग blue diamond वर cheers करत "आपण मराठी चित्रपटाला माहेरच्या साडीतून कसे बाहेर काढले" यावर परत एकदा भरत नाट्य मंदिर आहेच !

तुमच्याप्रमाणे मी देखील "विहिरी"त डोकावलेले नाही, आणि आता ही चर्चा वाचल्यावर असे वाटते तशी गरजहि नाही. मागे एकदा अशीच २२ जून १८९७ वर झालेली चर्चा आठवली (इथे नाही, प्रत्यक्षात सभागृहात...). त्यातील एक मुद्धा खरोखरीच कळीचा म्हणावा असा होता ~~~~ "जर गोऱ्यांचे सैनिक (शिवाय काही देशी देखील) पटकी झालेल्या रोग्यांना बाहेर काढण्यासाठी आपल्या देवघरात गेले नसते तर Rand चा खून झाला असता काय?" याला नाही असेच उत्तर होते, मग नचिकेत पटवर्धन म्हणाले कि आपल्या राज्यात त्या घटनेपासून खऱ्या अर्थाने ती क्रांती क्रांती म्हणतात ती झाली म्हणून आम्ही ती पडद्यावर आणायची असे नक्की केले ! असेल बुवा !!

चिंतातुर जंतू's picture

30 Mar 2010 - 7:21 pm | चिंतातुर जंतू

चित्रपट अद्याप पाहिलेला नाही, पण मुक्तसुनीत यांनी उपस्थित केलेल्या काही मूलभूत प्रश्नांविषयी थोडी टिप्पणी:

२. नाट्य : हा मुद्दा सुद्धा पहिल्या मुद्द्याशी मिळताजुळता परंतु किंचित वेगळा आहे. आपण इतकी वर्षे पाहात आलेल्या चित्रपटांमधे "नाट्य" हा प्रकार असतोच. कथेमधला ताण , प्रतिद्वंद्व चढत जाते नि कुठे तरी उत्कर्षबिंदू असतो. बर्‍याचदा या उत्कर्षबिंदू भवती चढत जाणारे नाट्य गुंफलेले असते. कित्येकदा चित्रपटांधे आपल्या कल्पनाशक्तीला , संवेदनशीलतेला धक्के बसावेत असे प्रसंग असतात. "विहीर" मधे पुन्हा याबाबतीत वेगळेपण असावे असे दिसते आहे. कुठल्याही चित्रपटाला कथेची चौकट असावी की नसावी ? हा ढाचा आवश्यक आहे की नाही ? ही चौकट कितपत काँक्रिट असावी ?

कथेमधला ताण, उत्कर्षबिंदू हे अनेक प्रकारांचे असतात. त्यामुळे उत्पन्न होणारे नाट्यदेखील आशयास अनुरुप असावे. यातील काही प्रकारचे नाट्य हे रुढ अर्थाने नाट्यमय नसणे शक्य आहे. उदाहरणार्थः 'कोसला'मधील बहीण मेल्यानंतरचा प्रसंग (अजिंठा) घ्या. यातील बरेचसे नाट्य हे सांगवीकराच्या मनात आहे. सांगवीकर अजिंठ्यात हिंडत असता तुम्हांस आढळला असे कल्पाल आणि ते जसेच्या तसे (म्हणजे वास्तवदर्शी) चित्रपटात दाखवाल, तर त्याकडे पाहून लोक कदाचित अतिशय कंटाळवाणा, 'आर्ट' सिनेमा वगैरे असेच म्हणतील. याऊलट दूरचित्रवाणी मालिकांसारखी नाट्यमयता त्यात दाखवली (उदा: सांगवीकराचा मेलोड्रॅमॅटिक भावयुक्त चेहेरा तीन-चार उभ्या-आडव्या-तिरक्या कोनांतल्या शॉटमध्ये दिसणे, ढॅण-ढॅण पार्श्वसंगीत वगैरे) तर कोसलाच्या अनेक भक्तांना ती मूळ कादंबरीच्या तलम आशयाशी प्रतारणा वाटेल. अशा आत्ममग्न करणार्‍या करुण आशयास दर्शवण्यासाठी अंधार किंवा संवाद/घटनारहित स्तब्धता (बराच वेळ काही 'अ‍ॅक्शन' न घडणे) वगैरे दृश्यमाध्यमात परिणामकारकरीत्या वापरता येतात. तो दृश्यभाषेच्या व्याकरणाचा एक मूलभूत भाग आहे. पण मग "कंटाळवाणा, slow, कमीत कमी प्रकाश, एकच फ्रेम ५ मिनिटे स्र्कीनवर' अशा गोष्टींविषयीचा आक्षेप थोडा बाजूस ठेवावा लागेल. अभिजात संगीतात जसा श्रोत्याच्या मनात काही भाव निष्पन्न करण्यासाठी बंदिशीची तीच ओळ पुन्हा पुन्हा आळवली जाते, तसाच हा प्रकार आहे. प्रेक्षकाने त्या संगीताशी/दृश्याशी एकात्म व्हावे, अंतर्मुख व्हावे असा विचार त्यामागे असतो. जिवलगाचा मृत्यू आणि त्यामुळे नायकाच्या मनात निर्माण होणारी अस्वस्थता यातील नाट्य तरीही अशा 'स्लो' अभिव्यक्तीत असू शकते. त्यापर्यंत पोहोचण्यास आपण (म्हणजे साधारण, मेलोड्रॅमॅटिक चित्रपटांस सरावलेल्या प्रेक्षकाने) कदाचित काही प्रमाणात स्वतःस 'तयार' करावे लागेल. असे चित्रपट शक्यतो खुल्या दिलाने पाहाणे हा त्या तयारीचा एक भाग असू शकेल.

३. "रंजना"च्या व्याख्या ज्याच्या त्याच्या वेगळ्या, वेगवेगळ्या अभिरुचीचे लोक असतात , निरनिराळा प्रतिसाद मिळतो हे सारे आपल्याला ठाऊक आहेच. तरीही , "विहिर"सारख्या चित्रपटांमुळे , "चित्रपटांचे काहीएक रंजनमूल्य असावे की नाही ?" हा प्रश्न उपस्थित होतोच.

इथेही पुन्हा आशयाकडे जावे लागेल. 'जिवलगाचा मृत्यू आणि त्यामुळे नायकाच्या मनात निर्माण होणारी अस्वस्थता' याला रंजनमूल्य आहे असे मानावे का? जर नाही असेच मानावयाचे असेल, तर आपण भरताच्या नाट्यशास्त्रातला करुण रसच नाकारतो आहोत का? याउलट, यात रंजनमूल्य आहे, असे मानले, तर प्रेक्षकाला करुण रसाची निष्पत्ती होण्यासाठी आधी धीरगंभीर, आत्ममग्न (आणि मग शोकात्म) करण्यासाठी चित्रपट या दृक-श्राव्य माध्यमाचे जे व्याकरण आहे (अंधार वगैरे), ते किमान तत्त्वतः तरी स्वीकारावे लागेल. अर्थात, तरीही विशिष्ट चित्रपटाविषयी मतमतांतरे होऊ शकतात, पण 'अंधारच नको; slow चित्रपट म्हणजे कंटाळवाणाच' असे मानू नये, एवढेच.

- चिंतातुर जंतू :S
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||

मुक्तसुनीत's picture

30 Mar 2010 - 8:55 pm | मुक्तसुनीत

वरचा प्रतिसाद आवडला.

प्रत्येक माध्यमाची बोलीभाषा वेगळी हे खरे. याचबरोबर "ज्याचे बळ त्यांस" हेदेखील खरेच.

"कोसला" मधला बहिणीच्या दु:खाचा प्रसंग हे अतिशय उत्तम उदाहरण आहे. याच कादंबरीच्या अलिकडच्या आवृत्तींचे मुखपृष्ठ पाहिल्यास, त्यात याच बहिणीच्या मृत्युच्या प्रसंगानंतरच्या पांडुरंगाच्या खोलीच्या अवस्थेचे चित्र रेखाटण्यात आलेले आहे. कादंबरी वाचून झाल्यावरच मग वाचकाला या मुखपृष्ठाचा कादंबरीशी असलेला संबंध समजेल. तोवर वाचकाला , ते एखादे केवलरूपी चित्रच वाटेल. (किंवा इन्स्टॉलेशनचा प्रकार वाटेल - त्यात आरसा आहे , शाईची बोटे आहेत, खोलीतले अस्ताव्यस्त सामान आहे वगैरे). म्हणजे , शेवटी या मुखपृष्ठाच्या अंगभूत अर्थगर्भतेला, कादंबरीतला विशिष्ट संदर्भ प्राप्त झाला की मगच नवा पदर मिळतो.

पांडुरंगाच्या मनातला क्षोभ , असहाय्यता , बहिणीच्या वेदनेचे आणि तिच्या मृत्यूचे आणि पर्यायाने तिच्यापासून अंतरल्याचे दु:ख या सार्‍याचे "बिटवीन द लाईन्स" चित्रण हे कुठल्या दृक्माध्यमात तसेच्या तसे पकडता येईल या बद्दल मी साशंक आहे. याउलट , याच प्रचंड घालमेलीच्या प्रसंगांनंतर पांडुरंग अजिंठ्याला जातो. तिकडे त्याला पहुडलेल्या बुद्धाच्या सहवासात जे वाटले असेल तो क्षण फारच परिणामकारकरीत्या टिपता येईल.

मला माझ्यापुरता जाणवलेला एक विचार : शब्दांचे माध्यम हे बर्‍यापैकी फ्लुईड आहे. एकेका शब्दातून एकेका वाक्याद्वारे भावछटा दाखवणे शक्य आहे. दृक्माध्यमामधे एखादा क्षण दाखवला जाऊ शकतो, एखादी फ्रेम मूड पकडू शकते. "एकसमयावच्छेदेकरूंन" घडणार्‍या गोष्टी दाखवण्याकरता दृक्माध्यमाला पर्याय नाही.

मोठे कलाकार बर्‍याचदा त्या त्या माध्यमांच्या मर्यांदा ओलांडण्याचा प्रयत्न करतात. जीए कुलकर्णींची प्रतिमाबहुलता हे याचे उदाहरण मानता येईल. याउलट मोठमोठ्या चित्रकारांची सेल्फ-पोर्ट्रेट्स म्हणजे अंतर्मनातल्या तरंगांना कुंचल्यावाटे व्यक्त करायचा प्रयत्न वाटतो.

चिंतातुर जंतू's picture

31 Mar 2010 - 12:37 am | चिंतातुर जंतू

पांडुरंगाच्या मनातला क्षोभ , असहाय्यता , बहिणीच्या वेदनेचे आणि तिच्या मृत्यूचे आणि पर्यायाने तिच्यापासून अंतरल्याचे दु:ख या सार्‍याचे "बिटवीन द लाईन्स" चित्रण हे कुठल्या दृक्माध्यमात तसेच्या तसे पकडता येईल या बद्दल मी साशंक आहे.

भाषांतराविषयीच्या या किंवा दुसर्‍या भागात इंग्रजीचे मराठीत शब्दशः भाषांतर न करता ते नैसर्गिक मराठी वाटेल, असे रूपांतर करावे, असा मुद्दा मांडला गेला होता. तिथे किमान एका शब्दाधारित भाषेतून दुसर्‍या शब्दाधारित भाषेकडे प्रवास करायचा होता; आणि तो ही माहिती पुरवण्यापुरता. इथे तर भावार्त शब्दांकडून प्रतिमेकडे असा प्रवास आहे. त्यामुळे 'जसेच्या तसे' हवे असा आग्रह धरता येत नाही. किंबहुना कादंबरीचे 'जसेच्या तसे' चित्रण करण्याच्या प्रयत्नात चित्रपट शब्दबंबाळ आणि प्रतिमादरिद्री होण्याचाच धोका संभवतो. मुख्य मुद्दा राहतो, तो माध्यमांतर होऊनही तत्सम भाव व्यक्त करता येतो का? तर हे अनेक प्रकारे शक्य असते. अंधारात उमटणारा एखादाच आर्त सूर काळजावर ओरखडा उठवू शकतो उदा. 'साहिब, बीबी और गुलाम' मध्ये मीनाकुमारी दिसण्याआधीच 'धीरे धीरे चले आओ' अशा ओळी (संगीताशिवाय) गीता दत्तच्या सुरांत रात्री ऐकू येतात व नंतर 'कोई दूरसे आवाज दे' हे गाणे सुरू होते. गढीत राहणारे कुणीतरी अतिशय दु:खी आहे, हे त्यातून समजते. प्रत्यक्ष दु:ख कसले ते पुष्कळ उशिरा कळते.

देहबोलीतूनही खचलेपण दाखवता येते. उदा. व्हॅन गॉघचे 'Sorrow' हे चित्र पाहा.
Sorrow - Vincent Van Gogh

चेहेर्‍यावरील भाव न दाखवूनही देहबोली पुरेशी बोलकी ठरते. पार्श्वभूमीची वठलेली झाडे देखील भावाशी एकतान आहेत. गोयाने काढलेल्या 'Mournful_Foreboding' या चित्रात (खाली पाहा) चेहेरा मुख्य परिणाम साधतो. तसेच काळ्या रंगाचा वापर देहबोलीतील हताशपणास अधिक उठाव देतो.

Mournful Foreboding - Goya

थोडक्यात, शब्दांचे प्रतिमेत (वा त्या उलट) माध्यमांतर होताना थोडे तरी निसटून जाणारच, याचे भान ठेवावे; एकंदरीत रसनिष्पत्तीतील सुसंगती मात्र तपासून पाहावी.

- चिंतातुर जंतू :S
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||

पाषाणभेद's picture

31 Mar 2010 - 5:05 am | पाषाणभेद

कोणताही चित्रपट बघतांना ते कलामाध्यम आहे हे मान्य केले तर बरेच प्रश्न हलके होतात. केवळ रंजनाच्या हिशोबाने एखादी महान कलाकृती (यात एखादे चित्र, शिल्प, नाट्य, काव्य, लेख, किंवा एखादे मोठे बांधकाम, एखादी इमारत, पुल, मंदिर आदी.) बघालयला गेल्यास एखाद्याला ती एकदम तत्सम देखील वाटू शकते. परत ती कलाकृती 'त्या' प्रेक्षकाने बघण्याच्या आधीच महान का ठरवल्या गेली हा देखील प्रश्न उरतोच. त्या नंतरदेखील त्या प्रेक्षकाची मानसिक स्थिती, त्याच्या बुद्धीचा आवाका (कलाकृती समजून घेण्याची अवस्था), आजूबाजूची सामाजिक परिस्थिती इत्यादी घटक घटकदेखील कारणीभूत ठरतात.

आपण ही विहीर एक कलाकृती आहे असे मानू.
मोनालिसा ही कलाकृती अजून कोणालाही समजलेली नाही. तीच्या हास्याचे अनेक प्रवाद आहेत.
मुक्तसुनीतांनी म्हटल्याप्रमाणे विहीर हा चित्रपट एका अर्थाने ओपन-एंडेड आहेही अन नाहीही.

ओपन-एंडेड नाही अशा साठी की नचादादाच्या गेल्यानंतर समिरमध्ये एकप्रकारचा आयुष्याकडे फोलपणे बघण्याचा दृष्टीकोन येवू घातलेला आहे. तरीही त्याला त्याचे दररोजचे आयुष्य जगायचे आहे हे ही कळते आहे. अतिशय प्रेम असणारा नचादादाला तो शोधण्यासाठी बाहेर पडतो. अन धनगराने दिलेल्या दृष्टीमुळे तो नचादादाची केवळ भासमान प्रतीमा पाहतो. अन तो आनंदीत होतो. हे झाले ओपन-एंडेड नाही.

अन आहे अशा साठी की दिग्दर्शकाने (हा एक कलाकार असतो हे मान्य करावे की ज्याची कलाकृती आपण बघतो.) सम्या नेमका कशाने नचादादाला पाहू शकतो, नंतर तो सावरतो का? त्याच्या घरच्यांप्रती, समाजाप्रती त्याचे बदल सुसह्य होतात का हे त्याने प्रेक्षकावर सोडलेले आहे. हे झाले मुक्तसुनीतांनी म्हटलेल्या ओपन-एंडेड बाबतीत.

आता काही प्रेक्षक केवळ रंजनाच्या हेतूने विहीरीत डोकावण्यासाठी जातील (चित्रपट 'विकण्यासाठी' काही वेळा व्यापारी तत्वे अंमलात आणावी लागतात. महान कलाकारी विकण्यासाठी कलादालनाची गरज लागते. नाहीतर ते चित्र / कलाकारी कलेचा मापदंड म्हणून साठवणूक करण्यासाठी कलासंग्रहात लावले जाते) तर त्यांच्या हातात काहीच न लागल्याने (क्लोज्ड एंडेड) त्यांचा आपेक्षाभंग होवू शकतो. काही जणांना एखाद्या चित्रात एखादा रंग, पोत, उठाव आवडत नाही त्याच प्रमाणे मग ते त्या त्या चित्रपटातील उणीवा शोधत बसतात. याचा अर्थ ते निकृष्ठ प्रेक्षक असतात असे नाही तर तसे घडणे म्हणजे परत वर उल्लेखिलेले मुद्देच (प्रेक्षकाची मानसिक स्थिती, त्याच्या बुद्धीचा आवाका (कलाकृती समजून घेण्याची अवस्था), आजूबाजूची सामाजिक परिस्थिती इत्यादी घटक) लक्षात घ्यावे लागतील.

चिंतातुरजंतूंच्या म्हणण्यात तथ्य आहे. 'जिवलगाचा मृत्यू आणि त्यामुळे नायकाच्या मनात निर्माण होणारी अस्वस्थता' याला रंजनमूल्य आहे असे मानावे का? जर नाही असेच मानावयाचे असेल, तर आपण भरताच्या नाट्यशास्त्रातला करुण रसच नाकारतो आहोत का? ... अर्थात, तरीही विशिष्ट चित्रपटाविषयी मतमतांतरे होऊ शकतात, पण 'अंधारच नको; slow चित्रपट म्हणजे कंटाळवाणाच' असे मानू नये, एवढेच.

या चर्चेत विहीर हा चित्रपट चांगली कलाकृती आहे की नाही हे आपण थोडे बाजूला ठेवले अन केवळ सम्या किंवा नचादादाच्या भुमिकेशी तद्रूप होवून हा चित्रपट बघीतला असता प्रेक्षकाच्या मनास थोडावेळ तरी विचार करण्यास भाग पाडतात. केवळ चांगल्या फ्रेम्स, चांगली प्रकाशयोजना, चांगले कलावंत म्हणजेच चांगला की वाईट चित्रपट नव्हे. प्रत्येक वेळी ते प्रेक्षकावर अन त्याच्या जाणीवांवरच अवलंबून असते.

चिंतातुरजंतू म्हणतात "असे चित्रपट शक्यतो खुल्या दिलाने पाहाणे हा त्या तयारीचा एक भाग असू शकेल."

खरे आहे. पण हे प्रत्येक वेळी प्रेक्षकाला शक्य नसते. त्या त्या चित्रपटासाठी तो ज्या कारणासाठी बघण्यास जातो ते कारण त्यास सापडले नाही तर त्याचा आपेक्षाभंग होवू शकतो. तसेच कदाचित विहीरबाबतीत एखाद्याचे होवू शकते. काहीवेळा दिग्दर्शक अन प्रेक्षकाची तार जुळत नाही. त्या वेळी असे होवू शकते.

अर्थात विहीर मला आवडला किंवा नाही हा वेगळा मुद्दा आहे. तो मराठी कलाकृती असल्याने त्याला भावनीक पदर तर आहेच पण त्यातला नायक मला आपला वाटला. त्याचे विचार मला जवळचे वाटले. त्याच्या वाटेला आलेल्या काही फ्रेम्स मी जगलो असल्याने त्यात मी दिसलो असेही असू शकते. काही बाबतीत काही घटना त्या दिग्दर्शकाने का दाखविल्या ते मुळ लेखातील सहा प्रश्न मला पडलेले आहेत. कदाचित एखाद्याच्या बाबतीत ते प्रश्न दुसरेच असू शकतील किंवा काही जण त्या बाबतीत तितका सखोल विचार न करता सोडून देतील असेही होवू शकते.

वर्षा म्हसकर-नायर यांच्या म्हणण्याप्रमाणे हा चित्रपट अध्यात्मिक भाष्य करतो पण त्याच बरोबर तो गुढरंजन देखील करतो जो जीएंच्या कथेत बघायला मिळतो.

एकूणच विहीर चित्रपटाने थोडाकाळ का होईना विचार करायला लावला. त्या कलाकारांच्या भावनांशी, त्या वातावरणाशी एकरूप व्हायला भाग पाडले यातच त्या चित्रपटाचे यश आहे.

बाकी कलाकृतीच्या बाबतीत पुन्हा बोलतो. एखादी कलाकृतीची जेव्हा कलाकार निर्मीती करतो त्या वेळी ती त्याच्यापुरती मर्यादित असते. त्याचे मन, भावना त्यात उतरतात. ज्यावेळी ती कलाकृती प्रदर्शीत होते त्यावेळी ती त्याची राहत नाही. ती प्रेक्षकांची होते. अन प्रेक्षक एकच नसतो. ते तर हजारो असतात. म्हणजेच हजार मने, भावना त्या कलाकृतीला बघत असतात. असे असतांना सर्वांचा एकजिनसी अभिप्राय त्या कलाकृतिच्या बाबतीत असूच शकत नाही. अन तशी अपेक्षा त्या त्या कलाकृतीचा कलानिर्माता देखील बाळगू शकत नाही.

पुढचे वाक्य विनोदाने म्हणावे लागेल. मागे मी एक सही घेतली होती. ती अशी: "मुल होईपर्यंत ते आईवडीलांचे खाजगी असते. ते झाल्यानंतर ते मुल सार्वजनीक होते." असो.

सद्य उपप्रतिसादात नामोल्लेख न केलेल्यांचेही आभार. अजूनही कुणास ह्या चित्रपटाचा काही वेगळा अर्थ जाणवत असेल तर सांगा.

अशा चर्चेतून एखाद्या प्रेक्षकाला एखादी कलाकृती चांगल्या तर्‍हेने बघण्याची दृष्टी येवू शकली तर ते अशा चर्चेचे यशच म्हणावे लागेल. कलाकृती माणूसाला नवा दृष्टीकोन देते ते अशा प्रकारे!

येथे बर्‍याच प्रतिसादकर्त्यांनी हा चित्रपट बघीतलेला नाही. तो बघीतल्यानंतर त्यांची काय प्रतिक्रीया आहे हे बघणे उत्सूकतेचे ठरते. कृपया आपण चित्रपट बघून आपली प्रतिक्रीया काय होते ते सांगून ही उत्सूकता शमवा.

The universal symbol for diabetes
डायबेटीस विरुद्ध लढा

महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्‍यांच्या कटी||

महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद
शके १५६३

The universal symbol for diabetes
डायबेटीस विरुद्ध लढा

महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्‍यांच्या कटी||

महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद
शके १५६३

इन्द्र्राज पवार's picture

31 Mar 2010 - 11:20 am | इन्द्र्राज पवार

"शब्दांचे प्रतिमेत (वा त्या उलट) माध्यमांतर होताना थोडे तरी निसटून जाणारच, याचे भान ठेवावे; एकंदरीत रसनिष्पत्तीतील सुसंगती मात्र तपासून पाहावी."
..... हे मान्य करायला काहीच हरकत नाही, नसावी. परंतु वादाचा मुद्धा हा "प्रतिमा" किंवा थेट "शब्द" नसून त्याची मर्यादा हा आहे. आपला चित्रपट "अडीच तासांचा" झाला नाही तर तो बघायला प्रेक्षक येणार नाही ही एक अकारण भीती मराठी चित्रपट दुनियेत पसरली आहे त्याला अनुसरून दृश्यांची कंटाळा येईतो पर्यंत ओढाताण चालू असते ती बाब खरे तर चिंताजनक आहे. काही उदाहरणे देऊ का? "२२ जून..." मध्ये गावाबाहेर चापेकर आणि मंडळी बंदूक शिक्षण घेताना दाखविले ~~ किती वेळ ? "वाडा चिरेबंदी" तील गुप्त खजिना खोदकाम ~~ "श्वास" मधील गावाकडील परतीचा प्रवास ~~ "रावसाहेब" खुर्ची दृश्य ~~ "कैरी" वर्गातील तास ! अशी व याच पठडीतील अन्य उदाहरणे आपला अंत पाहतात आणि कथेच्या मूळ धाग्यापासून नकळत भरकटत जातो.

कोणताही संवाद नसलेला तथापि चित्रपटाच्या कथेत परमोच्च स्थान असलेला "राशोमान" मधला "पाऊस" पाहावा. हा सुंदर पट पावसाशिवाय कल्पनेही शक्य नाही. तीच गोष्ट "कॅसाब्लांका" ची. बारमध्ये सैनिकांचा गोंगाट चालू असतानाही नायक व अचानकपणे तेथे आलेली त्याची प्रेयसी यांच्या चेह-याचे अबोल भाव त्या गोंगाटावर मात करू शकतात. मास्कोच्या प्रचंड अशा रेल्वे स्टेशनवर हजारो दुर्दैवी निर्वासितांच्या दंग्यातदेखील आपणास युरीच्या तंतुवाद्याचे कोमल स्वर ऐकू येतात, त्यामुळे त्याचे कविमन आणि त्यातील खळबळ जाणवते; मग ते चित्र एकट्या "झिवागो" ची न राहता आपलेही बनून जाते. अंगावर शहारे आणणारा सुमारे २० मिनिटांचा तो बर्फातील प्रवास !! ही एक हाताळणी आहे जिचा प्रभाव चटकन जाणवतो, त्यासाठी प्रकाश कमी की जास्त, लांबी किती, कोल्ज अप, फेड इन, फेड आउट हे प्रश्न कर्त्यापुढे आलेले नाहीत. श्री. नेमाडे यांनी "बिढार" मध्ये मुबारक बेगमच्या "कभी तन्हायीयो मे हमारी याद आयेगी....." या गाण्याचा उल्लेख केला आहे. या गाण्याचे चित्रीकरण या जातकुळीतील असल्याने आपणास चटकन भिडते. (गौग व गोया चित्रांबाबत मनःपूर्वक धन्यवाद !)

-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

विसोबा खेचर's picture

28 Mar 2010 - 9:31 am | विसोबा खेचर

चित्रपट पाहिला पाहिजे..

तात्या.

जे.पी.मॉर्गन's picture

28 Mar 2010 - 9:46 am | जे.पी.मॉर्गन

टिपिकल जी. ए. कुलकर्णींच्या कथेवर बेतलेला चित्रपट वाटतो (तसा खरोखरच असल्यास माहिती नाही). आमच्या "पुरुषोत्तम" मध्ये अश्या कथा ४० मिनिटांत खूप परिणामकारकपणे मांडल्या जातात. हीच गोष्ट चित्रपटात तब्बल अडीच तास चालते. मला चित्रपट पूर्णपणे समजत होता आणि म्हणून "समजलं... आता तरी पुढं सरका की राव" असं सारखं वाटत होतं. वरील बर्‍याच विधानांशी सहमत -

>>मला पुर्णपणे समजला, पण तरिही फारसा आवडला नाही<<
सेम हियर !

>>कमित कमी प्रकाश, एकच फ्रेम ५ मिनिटे स्र्कीनवर. अरे काय हे?<<
सायकलवरून बाहेर पडणारा समीर, एसटी, "फणस", स्विमिंग टँक, शॉवर, पाणी साठणारं भांडं, बडबड करणारी आजी (सुलभा देशपांडे), वसंतराव ऐकणारा मामा.... एक ना दोन... कित्येक गोष्टींचा अतिरेक झालाय !

>>"विहिर"सारख्या चित्रपटांमुळे , "चित्रपटांचे काहीएक रंजनमूल्य असावे की नाही ?" हा प्रश्न उपस्थित होतोच.<<
हा प्रश्न असू शकतो??? चित्रपट लोकांनी बघावा अशी निर्माता दिग्दर्शकांची इच्छा असेल तर त्याला किमान रंजनमूल्य असायलाच हवं नाही का? खूप गंभीर आणि क्लिष्ट विषय देखील लोकांपर्यंत पोहोचवता येतात हे अनेक चित्रपटांनी पूर्वी सिद्ध केलं आहेच. तरीही 'विहीर' २:३० तास बघितल्यावर शेवटी हाताला काहीच लागत नाही". बरं बाबा सम्याला जीवन-मृत्यूचं तत्त्वज्ञान उलगडलं... "सो व्हॉट?".

ज्यांना हा चित्रपट कळतच नाही त्यांची शुद्ध फसवणूक झालेली असते आणि ज्यांना कळतो त्यांनाही हा कंटाळवाणा वाटतो. काही चांगल्या फ्रेम्स साठी १५० रुपये घालवणं आपल्याला तरी परवडत नाही बुवा !

वर्षा म्हसकर-नायर's picture

28 Mar 2010 - 2:57 pm | वर्षा म्हसकर-नायर

>>तिसरा मुद्दा कदाचित वर येऊन गेलाही असेल. पण तरी लिहितो. तो आहे रंजनाचा. "रंजना"च्या व्याख्या ज्याच्या त्याच्या वेगळ्या, वेगवेगळ्या अभिरुचीचे लोक असतात , निरनिराळा प्रतिसाद मिळतो हे सारे आपल्याला ठाऊक आहेच. तरीही , "विहिर"सारख्या चित्रपटांमुळे , "चित्रपटांचे काहीएक रंजनमूल्य असावे की नाही ?" हा प्रश्न उपस्थित होतोच. >>>
अगदी अगदी १००% सहमत.

>>सायकलवरून बाहेर पडणारा समीर, एसटी, "फणस", स्विमिंग टँक, शॉवर, पाणी साठणारं भांडं, बडबड करणारी आजी (सुलभा देशपांडे), वसंतराव ऐकणारा मामा.... एक ना दोन... कित्येक गोष्टींचा अतिरेक झालाय>>>>>

पुन्हा सहमत. फणसाचा तर खरंच अतिरेक आहे. आणि स्विमींग टँक सुद्धा.

मला वाटते हे सर्व चित्रपट हे फक्त आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रदर्शित करण्यसाठीच बनविलेले असतात. त्यामुळे ह्या चित्रपटात संवाद देखिल अगदी minimum आहेत. का तर भाषा हि चित्रपट समजण्याच्या आड येवु नये.
अरे मग असे आहे तर अशा चित्रपटांना येथिल चित्रपट गृहात प्रदर्शित करुच नका ना. म्हणजे प्रश्नच मिटला.
एकतर मला खुप कमित कमी प्रकाश ह्या so called parallel, art movies मधे का वापरतात ते समजत नाही. 70-80 च्या दशकात चावुन चोथा झालेली techniques आहेत ती. आता काही तरी नविन वापरा ना. सगळेच symbolic shots. अरे २१ व्या शतकात, जरा वेगळी treatment वापरुन बघा की. जरा direct shots (symbolic नाहीत) वापरले आणि जर जास्त लोकांना चित्रपट समजला तर त्यात काही गैर आहे का? का मग असे चित्रपट internatioonal film festival ला participate करु शकत नाहीत?

इन्द्र्राज पवार's picture

28 Mar 2010 - 7:09 pm | इन्द्र्राज पवार

अगदी बरोबर ! तुम्हाला केवळ ऑस्करच्या बाहुलीचेच महत्व वाटत असेल तर मग येथील सिनेगृहात झळकला नाही तर काय बिघडणार आहे..... दोन्ही पक्षांचे ? पणजी internatioonal film फेस्टिवल मध्ये जगभरातील काही उत्तमोत्तम कलाकृती पाहण्याचा योग आला होता. विशेष म्हणजे जी काय सात-आठ सिनेमे पाहिले तीत आपण आता चर्चा करीत असलेल्या मराठी परंपरेचा मागमूसही नव्हता. गोव्यातील हायस्कूलला जाणारा मुलगा अगर मुलगी अत्यंत आनंदाने त्या चित्रपटाचे कथानक आणि चित्रीकरण यांचा आनंद घेऊ शकत होते. मग आमचाच असा अट्टाहास का असावा कि हमेशा गूढ आणि कमी प्रकाशातील चित्रीकरण तसेच मस्तकात तिडीक आणणारी वेळखाऊ shots !! पूर्वी एका महोत्सवात "वाडा चिरेबंदी" पाहिला होता त्याची आता आठवण येते. तिथेही असाच प्रकार.

सुरेखा पुणेकर's picture

29 Mar 2010 - 12:24 am | सुरेखा पुणेकर

धाग्याचं नाव वाचून वाटल्यालं ह्या पाशानभेदानं पुन्ना येकांदी डेंजर लावनी टाकली का काय... पन आतमंदी येगळच हाये :)

-- सुरेखा
कारभारी दमानं.....

मेघना भुस्कुटे's picture

30 Mar 2010 - 7:39 pm | मेघना भुस्कुटे

अजून सिनेमा पाहिला नाही. येत्या आठवड्यात बहुतेक पाहीन. हा मायबोलीवरच्या चर्चेचा दुवा.

अमोल केळकर's picture

31 Mar 2010 - 11:33 am | अमोल केळकर

बघायला पाहिजे हा सिनेमा

अमोल
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा