मराठी आणि भाषांतर - २

मेघना भुस्कुटे's picture
मेघना भुस्कुटे in काथ्याकूट
29 Mar 2010 - 7:37 pm
गाभा: 

(तुम्हांलाही आपापले पाठ (छ्या:! हे नाही ब्वॉ बरं वाटत!) भाषांतरित करून इथे द्यायचे असले, तर नक्की द्या. तूर्तास हे नवीन भाषांतर (थोडं मोठं!):
औषध कंपन्या संशोधनासाठी पैसा का पुरवतात?
- संध्या श्रीनिवासन
(http://infochangeindia.org/Health/Healthcare-markets-and-you/Why-does-a-...)
---
स्तनांच्या कर्करोगातील धोक्यांवर होणार्‍या संशोधनासाठी एखादी बहुराष्ट्रीय कंपनी पैसा का पुरवते? परोपकार म्हणून? की त्यातून या विशिष्ट रोगाच्या ('प्रॉब्लेम'चं थेट भाषांतर 'त्रास' असं होऊ शकेल. पण ते इथे शोभून दिसणार नाही असं वाटतंय. शिवाय मी मुळातली वाक्यरचान बदलून दोन लहान वाक्यांचं एकच मोठं वाक्य केलं आहे.) दर रुग्णामागे दरमहा ९०,००० रुपये किंमतीच्या औषधाचा धंदा होतो म्हणून? औषध बाजाराचा तुमच्यावर - ग्राहकावर वा रुग्णावर - होणारा थेट परिणाम या विषयावर नवीन स्तंभात संध्या श्रीनिवासन लिहितात:
भारतीय स्त्रियांमधील कर्करोगाच्या अभ्यासावरील वृत्तान्त २०१०च्या फेब्रुवारीमध्ये वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाले. "एचईआर-टू पॉझिटिव्ह" प्रकारच्या स्तनांच्या कर्करोगातील धोक्यांची पाहणी करण्यासाठी, मुंबईतील टाटा मेमोरियल रुग्णालयात आणि पुण्यातील जहांगीर रुग्णालयात स्तनांच्या कर्करोगावरील उपचारात्मक चाचण्यांमध्ये (क्लिनिक या शब्दाला प्रतिशब्द काय? उपचार / दवाखाना यांत त्यातल्या प्रायोगिक धोक्याची / अनिश्चिततेची अर्थछटा नाही) सहभागी होणार्‍या एक हजार महिलांची तपासणी करण्यात येणार आहे.
या प्रकारच्या कर्करोगामध्ये एचईआर-टू प्रथिनांच्या अतिरिक्त निर्मितीमुळे कर्करोगाची गाठ (ट्यूमर या शब्दाचं असं ओढून ताणून भाषांतर करावं की कसं? मराठीतील प्रतिशब्द वापरण्याचा आग्रह आणि वाचकांची सोय या दुहेरी कात्रीत सापडण्याची हीच ती जागा!) अधिकाधिक वेगाने वाढते. ('फ्युएल्ड बाय' या शब्दाला 'खतपाणी मिळणे/घालणे' हा शब्द आठवला होता. पण तो इथे अर्थातच चपखल वाटायचा नाही). स्तनांच्या कर्करोग झालेल्या पाश्चिमात्त्य रुग्णांपैकी २०% रुग्णांमध्ये एचईआर-टू आढळून येते; तर स्तनांचा कर्करोग झालेल्या भारतीय रुग्णांपैकी ३०% महिलांमध्ये एचईआर-टू असल्याचे दिसते. या फरकामागची कारणे समजून घेण्यासाठी ही तपासणी (स्टडी या शब्दाचं भाषांतर सरळसोट अभ्यास असं करता येईल, हे मला मान्य आहे! पण वर 'तपासणी' हा शब्द वापरला असल्यानं हा द्राविडी प्राणायाम! काही उपाय सुचतोय?) करण्यात येणार आहे.
ग्लॅक्सोस्मिथक्लाईन या बहुराष्ट्रीय कंपनीच्या आफ्रिका, लॅटिन अमेरिका आणि आशियामध्ये संशोधनासाठी पैसा पुरवणार्‍या 'ओन्कॉलॉजी इंटरनॅशनक एथनिक रिसर्च इनिशिएटिव्ह'ने (भाषांतर? भाषांतर??? आवश्यक की अनावश्यक? शक्य की अशक्य??) या अभ्यासाचे प्रायोजकत्व स्वीकारले आहे.
'ग्लॅक्सो'च्या (मराठीतलं सुटसुटीत - संक्षिप्त रूप - पक्षी 'शॉर्टफॉर्म'! बरोबर आहे का? की दर वेळी कंपनीचं नाव पूर्ण लिहिलं पाहिजे?) किंवा वरील दोन्ही रुग्णालयांच्या संस्थळांवर या अभ्यासाबद्दल कोणतीही अधिक माहिती उपलब्ध नाही. तसेच, 'आयसीएमआर / डब्ल्यूएचओ' (ICMR/WHO) यांच्या नोंदींमध्ये किंवा 'यूएस क्लिनिकल ट्रायल्स'च्या (क्लिनिकल ट्रायल=संशोधनात्मक चाचणी?) नोंदीमध्येही या अभ्यासाचा कोणताही उल्लेख करण्यात आलेला नाही. जून २००९पासून भारतात होणार्‍या कोणत्याही चाचणीमध्ये (क्लिनिकल ट्रायल=संशोधनात्मक चाचणी? मीच आधी केलेल्या वापराला सरावून, कसलाही सबळ आधार नसताना दडपून एखादा शब्दसमूह वापरायला मी सुरुवात करते ती अशी!) रुग्णनोंदणीला सुरुवात होण्याआधी आयसीएमआर (ICMR) नोंदखात्यामध्ये (रजिस्ट्री??!) त्या चाचणीची नोंद करणे बंधनकारक झाले असल्यामुळे; या अभ्यासामध्ये अद्याप रुग्णनोंदणी झालेली नसल्याचे मानावयास जागा आहे. (उगाच लांबलचक वाक्य. पण ते कसं तोडलं असता परिणामकारक होईल?)
ते काहीही असले तरी ('इन एनी केस'='कोणत्याही परिस्थितीत'. पण त्यापेक्षा मला माझंच भाषांतर जास्त चपखल वाटतं आहे) भारतातील एचईआर टू पॉझिटिव्ह असलेल्या स्तनांच्या कर्करोगावरील अभ्यासासाठी पैसा पुरवण्यात 'ग्लॅक्सो'ला इतका रस (हे मी केलेलं रूपांतर, भाषांतर नव्हे) का आहे, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. स्तनांच्या कर्करोगातील एथनिक (????? हेल्प!) घटक खोलात जाऊन जाणून घेणे आणि त्यायोगे जगाच्या या भागातील कर्करोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यात मदत करणे हा (हा की हाच?) यामागचा शुद्ध परोपकारी हेतू आहे काय?
.....

प्रतिक्रिया

श्रावण मोडक's picture

29 Mar 2010 - 10:33 pm | श्रावण मोडक

मूळ उतार्‍याची निवड खूपच आवडली. थोडे अधिक आव्हानात्मक काम आहे.
माझ्या मते -
१. परोपकार याऐवजी कल्याण हा शब्द अधिक उचित. येथे वाक्यात वापरताना तो लोककल्याण असा येईल.
(मुळातील मोठ्या वाक्याची तुम्ही दोन वाक्ये केली आहेत आणि माझ्या मते तेच योग्य आहे. प्रत्येक भाषेच्या सौष्ठवाची काही मापे असतात. इंग्रजीच्या सौष्ठवाची मापे मुळातच (मराठीच्या संदर्भात आणि तुलनेत) आडदांड असतात. ते माप तसेच ठेवणारे मराठी वाक्य करूच नये, त्यातून काहीही साध्य होत नाही.
मी स्वतः भाषांतर केलेल्या दोन पुस्तकांमध्ये असे घडले आहे. मी दिलेल्या भाषांवर अपेक्षीत संपादनसंस्कार झालेच नाहीत आणि आता मला तीच वाक्ये परत वाचावी लागतात तेव्हा अक्षरशः माझा त्रिफळा उडालेला असतो.)
२. "रोगाच्या दर रुग्णामागे" असं झालं आहे. "स्तनाच्या-कर्करुग्णामागे" असं करता येईल. संपादन म्हणून "दर" हा शब्द मी कमी करेन.
३. "औषधबाजाराचा तुम्हा-आम्हांवर होणारा परिणाम याविषयी संध्या श्रीनिवासन यांचा नवा स्तंभ". मी हे असे करेन, कारण हा पहिला परिच्छेद त्या स्तंभाचा परिचय देणारा (आमच्या भाषेत इंट्रो) आहे.
४. क्लिनिकल ट्रायल/टेस्टसाठी साधारणपणे वैद्यकीय चाचणी असाच शब्दप्रयोग केलेला मी पाहिला आहे. मूळ मजकुराचा अर्थ माझ्या मते, "टाटा मेमोरियल आणि जहांगीर रुग्णालयात उपचार घेणाऱ्या एक हजार महिलांवर चाचणी केली जाईल" अशा आशयाचा आहे. त्या महिला तेथे उपचार घेत आहेतच. त्यांच्यावर ही चाचणी होणार आहे, असे लेखिकेला सांगावयाचे आहे.
यापुढचे भाषांतर वाचल्यानंतर माझे मत -
मुळातल्या मोठ्या वाक्याची दोन छोटी वाक्ये करावीशी ज्यामुळे वाटली, ती प्रेरणा कुठं तरी लयाला गेली. पहिल्या परिच्छेदात जो सोपेपणा (मजकुराचे वजन कायम ठेवून) आणला आहे तो तसाच ठेवत पुढचा मजकूरही रुपांतरीत करणं शक्य होतं. तसे न होण्याचे कारण अज्ञात नाही. माझ्या मते समोरच्या मजकुरावर अतिरिक्त लक्ष केंद्रीत केले की तसे होते.
मी कार्यालयातील मुलांना नेहमी एक सूत्र सांगायचो - "इंग्रजी (किंवा इतर कोणत्याही भाषेतील) मजकूर वाचलात? तो समजला?" दोन्ही प्रश्नांची उत्तरं होकारार्थी आली की सांगायचो, "मग जे समजलं आहे ते मराठीत लिहून काढा आधी. मग मूळ मजकुरानुसार त्यात आवश्यक तेथे दुरूस्त्या करा."
हे सूत्र बरंचसं यशस्वी ठरायचं. :)

धनंजय's picture

29 Mar 2010 - 11:35 pm | धनंजय

श्रामोंशी बहुतेक बाबतीत सहमत...

माझे भाषांतर :
Does a pharmaceutical MNC sponsor research on the risk factors (रिस्क फॅक्टर म्हणजे धोका नव्हे. धोक्याची लक्षणे) for breast cancer because it is altruistic (येथे नि:स्वार्थी ही अर्थछटा हरवता कामा नये), or because it markets a drug for this particular problem that costs a patient Rs 90,000 per month (येथे दरडोई फायद्यापेक्षा रुग्णाला होणारा खर्च सांगितलेला आहे)? Sandhya Srinivasan starts a new column on the impact of healthcare markets on you, the consumer/patient

बहुराष्ट्रीय कंपनी स्तनाच्या (येथे मेघना यांनी "स्तनांच्या" असे अनेकवचन का केले?) कर्करोगाच्या धोक्याच्या लक्षणांबद्दल संशोधन का करते? नि:स्वार्थ कल्याणाकरिता? की कंपनीने या रोगाकरिता विकलेल्या औषधावर प्रत्येक रुग्णाचा ९०,००० रुपये मासिक खर्च होतो म्हणून? ग्राहक वा रुग्ण म्हणून तुमच्यावर आरोग्यसेवेच्या बाजारपेठेचा काय परिणाम होतो त्याबद्दल संध्या श्रीनिवासन यांनी नवा स्तंभ सुरू केलेला आहे.

In February 2010, newspapers carried reports on a study of cancer in Indian women.
फेब्रुवारी २०१० महिन्यात भारतीय स्त्रियांच्या कर्करोगाच्या सर्वेक्षणाचे (अभ्यासप्रकल्पाचे) वृत्त वर्तमानपत्रांमध्ये दिले गेले (प्रकाशित झाले).

One thousand women attending breast cancer clinics at the Tata Memorial Hospital in Mumbai and the Jehangir Hospital in Pune will be put through tests to identify their risk factors for ‘HER-2 positive’ breast cancer.
टाटा मेमोरियल इस्पितळ, मुंबई, आणि जहांगीर हॉस्पिटल, पुणे, येथील स्तन-कर्करोग चिकित्सा केंद्रांत दाखल झालेल्या एक हजार स्त्रियांना "एचईआर-२-पॉझिटिव्ह" प्रकारच्या कर्करोगाच्या धोक्याच्या लक्षणांची चाचणी दिली जाईल.

... वगैरे ...
विवक्षित विचारणांबद्दल :

('प्रॉब्लेम'चं थेट भाषांतर 'त्रास' असं होऊ शकेल. पण ते इथे शोभून दिसणार नाही असं वाटतंय. शिवाय मी मुळातली वाक्यरचना बदलून दोन लहान वाक्यांचं एकच मोठं वाक्य केलं आहे.)

योग्य निर्णय.

(क्लिनिक या शब्दाला प्रतिशब्द काय? उपचार / दवाखाना यांत त्यातल्या प्रायोगिक धोक्याची / अनिश्चिततेची अर्थछटा नाही)

अशी अर्थछटा "क्लिनिक" शब्दातसुद्धा नाही.

(ट्यूमर या शब्दाचं असं ओढून ताणून भाषांतर करावं की कसं? मराठीतील प्रतिशब्द वापरण्याचा आग्रह आणि वाचकांची सोय या दुहेरी कात्रीत सापडण्याची हीच ती जागा!)

"गाठ" हा प्रतिशब्द सुयोग्य आहे. ओढूनताणून नाही.

('फ्युएल्ड बाय' या शब्दाला 'खतपाणी मिळणे/घालणे' हा शब्द आठवला होता. पण तो इथे अर्थातच चपखल वाटायचा नाही)

("अतिरिक्त" नव्हे, तर "अत्यधिक" निर्मिती.) प्रतिशब्द ठीक.

(स्टडी या शब्दाचं भाषांतर सरळसोट अभ्यास असं करता येईल, हे मला मान्य आहे! पण वर 'तपासणी' हा शब्द वापरला असल्यानं हा द्राविडी प्राणायाम! काही उपाय सुचतोय?)

अभ्यासप्रकल्प, सर्वे-स्टडी असल्यास सर्वेक्षण
"अभ्यास" असे भाषांतर प्रामादिक आहे.

'ओन्कॉलॉजी इंटरनॅशनल एथनिक रिसर्च इनिशिएटिव्ह'ने (भाषांतर? भाषांतर??? आवश्यक की अनावश्यक? शक्य की अशक्य??)

कदाचित गरज नाही. मात्र भाषांतर केल्यास हरकत नाही.
कर्करोगाच्या वांशिक भेदांचे संशोधन करणारी आंतरराष्ट्रीय आघाडी.
आंतरराष्ट्रीय कर्करोग वंशभेद संशोधन प्रकल्प...

(क्लिनिकल ट्रायल=संशोधनात्मक चाचणी?)

वैद्यकीय परीक्षण

नोंदखात्यामध्ये (रजिस्ट्री??!)

ठीक. पण या शब्दाची गरज नाही. "आयसीएमआर कडे नोंद करणे आवश्यक आहे" मध्ये सगळे येते.

वगैरे.

राजेश घासकडवी's picture

30 Mar 2010 - 8:07 am | राजेश घासकडवी

थोडं धनंजयचं, थोडं माझं. खूपच बारीकबारीक बदल असल्यामुळे ते अधोरेखित करत नाही. संपूर्ण उतारा वाहता होतो की नाही यावर माझा भर आहे, त्यामुळे तो एकसंध वाचावा.

स्तन-कर्करोगाच्या धोक्याचा निर्देश करणाऱ्या लक्षणांवर संशोधन करण्यासाठी एखादी बहुराष्ट्रीय कंपनी पैसा का पुरवते? परोपकार म्हणून? की हा रोग असणाऱ्यांसाठी दरमहा ९०,००० रुपये किमतीची आपली औषधं खपवता यावी म्हणून? आरोग्यसेवा ही बाजारपेठ असून, ग्राहक बनलेल्या रुग्णावर तिचा काय परिणाम होतो, याबद्दलच्या स्तंभात संध्या श्रीनिवासन लिहितात:
फेब्रुवारी २०१० महिन्यात भारतीय स्त्रियांच्या कर्करोगावरील वैद्यकीय संशोधनाचे वृत्त वर्तमानपत्रांमध्ये प्रकाशित झाले. त्यानुसार, टाटा मेमोरियल इस्पितळ, मुंबई, आणि जहांगीर हॉस्पिटल, पुणे, येथील स्तन-कर्करोग चिकित्सा केंद्रांत दाखल झालेल्या
एक हजार स्त्रियांना "एचईआर-२-पॉझिटिव्ह" प्रकारच्या कर्करोगाच्या धोक्याच्या लक्षणांची चाचणी दिली जाईल.

या रोगात शरीरातली एचईआर-टू प्रथिनं वाढल्यामुळे कर्करोगाची गाठ अधिक जोमाने वाढते. पाश्चिमात्य रुग्णांपैकी २०% मध्ये तर भारतीय रुग्णांपैकी ३०% मध्ये ही प्रथिनं वाढलेली असल्याचं दिसून आलं आहे. या चाचणीतून या फरकाची कारणं समजावून घेण्याचा प्रयत्न होईल.

ग्लॅक्सोस्मिथक्लाईन या बहुराष्ट्रीय कंपनीच्या आफ्रिका, लॅटिन अमेरिका आणि आशियामध्ये संशोधनासाठी पैसा पुरवणार्‍या 'ओन्कॉलॉजी इंटरनॅशनक एथनिक रिसर्च इनिशिएटिव्ह'ने या संशोधनासाठी पैसा पुरवला आहे. ग्लॅक्सोस्मिथक्लाईनच्या किंवा वरील दोन्ही रुग्णालयांच्या संस्थळांवर या अभ्यासाबद्दल कुठचीच अधिक माहिती उपलब्ध नाही. तसेच, जून २००९पासून भारतात होणार्‍या कोणत्याही अशा चाचणीमध्ये रुग्णनोंदणीला सुरुवात होण्याआधी आयसीएमआर (ICMR) नोंदखात्यामध्ये त्या चाचणीची नोंद करणे बंधनकारक झालेले असूनही 'आयसीएमआर / डब्ल्यूएचओ' (ICMR/WHO) यांच्या नोंदींमध्ये किंवा 'यूएस वैद्यकीय चाचण्यां'च्या नोंदखात्यामध्येही या अभ्यासाचा कोणताही उल्लेख करण्यात आलेला नाही. तेव्हा या अभ्यासामध्ये अद्याप रुग्णनोंदणी झालेली नसल्याचे मानावयास जागा आहे.

ते काहीही असले तरी भारतातील एचईआर टू पॉझिटिव्ह असलेल्या स्तन-कर्करोगावरील अभ्यासासाठी पैसा पुरवण्यात ग्लॅक्सोस्मिथक्लाईनला इतका रस का आहे, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. स्तन-कर्करोगातील वांशिक घटक खोलात जाऊन जाणून घेणे आणि त्यायोगे जगाच्या या भागातील कर्करोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यात मदत करणे हा शुद्ध परोपकारी हेतूच यामागे आहे काय?

राजेश

सर्व प्रथम - उत्तम कल्पना, प्रयत्न अणि मांडणी
सर्वांचेच भाषांतर आवडले.
ह्या बाबतीत एक मुद्दा विचारात घ्यावासा वाटतो तो म्हणजे 'भाषांतराचे प्रयोजन". ह्यावरुन बरेच काही ठरु शकते.
म्हणजे, मी माझ्या एखाद्या मित्रासाठी, ज्याला ईंग्रजी येत नाही तितके नीट, भाषांतर करत असेन तर साधारण गोषवारा कळला म्हणजे झाले, पण तेच जर मी एखाद्या प्रबंधाचे लिखाण करत असेन तर उतारा निर्दोषच असला पाहीजे. असेच वेगळे नियम ललित कलाकृतींच्या भाषांतरालाही लागू पडतील. मागे एकदा उपक्रमावर ह्याविषयी चर्चा वाचल्याचे (ओझरते) आठवते.

मेघना भुस्कुटे's picture

30 Mar 2010 - 8:03 pm | मेघना भुस्कुटे

श्रामो: तुमची युक्ती आवडली आहे. इथून पुढे मी ती वापरीन. भाषांतर करताना मी एकदा मूळ उतारा वाचून घेते. पण जसं जसं पुढे जावं, तसतसं माझं पूर्ण वाक्यापेक्षा वा त्यातल्या आशयापेक्षा एकेका शब्दावर लक्ष केंद्रित होऊ लागतं. त्यावर उपाय म्हणून ही आशय आधीच टार्गेट लँग्वेजमध्ये (?!) लिहून काढण्याची आणि मग फरक दुरुस्त करण्याची युक्ती छान आहे.
धनंजयः मी 'स्तन-कर्करोग' / 'स्तनाचा कर्करोग'ऐवजी अनेकवचन का केले कुणास ठाऊक. तशी आवश्यकताच नव्हती, हे तुम्ही दर्शवल्यावर लक्षात आलं. बाकी 'परोपकारी'मध्ये 'कल्याण' किंवा 'लोककल्याण'मधली नि:स्वार्थी छटा येत नाही का? बाकीच्या सुचवण्या अर्थातच स्वीकारार्ह.
राजेश: तुमचा उतारा खरंच प्रवाही आहे. इथे माझं घोडं कायम पेंड खातं. एकेका शब्दाचा कीस काढण्यावर इतकं लक्ष केंद्रित होतं, की ते 'भाषांतर' आहे याची छाप उतार्यावर राहतेच राहते. असं होऊ नये, म्हणून तुम्ही काय करता?
वाचकः उपक्रमावरच्या चर्चेचा दुवा देऊ शकाल का? बरे होईल. प्रयोजनाबद्दल तुमचे खरेच आहे. त्यावर पुष्कळ गोष्टी अवलंबून असतात. बदलत्या प्रयोजनानुसार भाषांतरशैली बदलणे, हे मात्र प्रतिभासाध्य (निदान अपरिमित कष्टसाध्य तरी) असावे. त्याचेच काही नियम घालून घेण्याकरता हा खटाटोप.

राजेश घासकडवी's picture

4 Apr 2010 - 8:51 am | राजेश घासकडवी

श्रामोंनी सांगितलेलं १००% बरोबर आहे. मुळातला इंग्रजीतला आशय भाषांतर करून मराठीत लिहिला की बरंच सच्चं भाषांतर होतं. त्यात आशय मध्ये त्यांना लेखकाचा एक स्वर असतो किंवा रोख असतो तो देखील गृहीत आहे असं वाटतं. शब्द वा वाक्य पातळीच्याही वरच्या पातळीला तो दिसतो. उदाहरणार्थ, वरच्या उताऱ्यात 'कंपनीला त्यांची औषधं खपवायची आहेत, दुसरं काही नाही. या असल्या मागास देशात रिसर्च वगैरे करून परोपकार थोडीच करायचाय? अहो, या नवीन उगवत्या मार्केटमध्ये पाय रोवायचेत त्यांना, म्हणून हे सगळे उद्योग..' या बोलण्यात जो स्वर किंवा रोख आहे तो वृत्तपत्रीय, शास्त्रीय भाषेत जर सभ्यपणे मांडायचा आहे. (त्यामुळे तुमचं परोपकारचं वाक्य आवडलं)

मला स्वत:ला वाईट भाषांतरं घासातल्या खड्यांसारखी टोचतात. चांगली भाषांतरं खूपच विरळ असतात हे माझ्या लक्षात आलेलं आहे. एक सुचतं ते म्हणजे जीएंनी केलेलं लॉर्ड ऑफ द फ्लाईज चं भाषांतर. आणि भा रा भागवतांनी केलेली रूपांतरं...

उपक्रमवरची चर्चा अजून पूर्णपणे वाचलेली नाही. वाचायला आवडेल.

अक्षय पुर्णपात्रे's picture

30 Mar 2010 - 10:14 pm | अक्षय पुर्णपात्रे

(मराठीतलं सुटसुटीत - संक्षिप्त रूप - पक्षी 'शॉर्टफॉर्म'! बरोबर आहे का? की दर वेळी कंपनीचं नाव पूर्ण लिहिलं पाहिजे?)

ग्लॅक्सोवेलकम (ग्लॅक्सो आणि बरोज वेलकम कंपनी १९९५ मध्ये एकत्र झाल्यानंतर ग्लॅक्सोचे ग्लॅक्सोवेलकम असे नामांतर झाले.) आणि स्मिथक्लाईन बीचम यांचे २००० साली एकत्रीकरण झाल्याने नवीन कंपनीचे नाव ग्लॅक्सोस्मिथक्लाईन असे करण्यात आल्याने ते पूर्ण नाव वापरले जावे असे वाटते.

बिपिन कार्यकर्ते's picture

3 Apr 2010 - 11:25 pm | बिपिन कार्यकर्ते

हा आणि आधीचा असे दोन्ही धागे आत्ताच वाचले. खूप आवडला हा उपक्रम. पुढील भाषांतरांची वाट बघतोय.

बिपिन कार्यकर्ते