पूर्वसूत्र :
(आधी ठरवलेल्या गुप्तते मुळे खाशांना सोडून फारच कमी लोकांना आमंत्रण होतं. सर्व मंडळी जमली. नवीन सरावलेल्या ओसरी वर सुंदर रांगोळी काढून आणि पाट मांडून पंगतीची सिद्धता झाली. नरहरी आणि श्रीधर पंता बरोबर सर्व ब्राम्हणांनी हातात आपोष्णी घेऊन मंत्र पुटपुटायला सुरुवात केली.)
पंगतीला सुरुवात झाली. त्रिसुपर्ण संपवून लोकांनी पहिला घास घेई पर्यंत अगश्यांच्या वाड्यातील नुकतीच मुंज झालेल्या लहान मुलांनी श्लोकांचा धडाका लावला. वेद पुराणातील श्लोकांपासून वामन पंडितांच्या सुमधुर रचनापर्यंत श्लोकांचे तार स्वरात गायन झाले. अगशांचा नातू शांताराम याने गायनात पुढाकार घेऊन घरातील संस्कारांचे प्रात्यक्षिक दाखवले.
पंगतीच्या सुरुवातीलाच, मल्लांनी हाप - हूप करून दंड बैठका काढाव्यात त्या प्रमाणे सर्वांनी आपापल्या घशाला ओलावा यावा म्हणून पोळ्या आणि प्रसादच्या म्हणून केलेल्या खिरीवर ताव मारण्यास सुरुवात केली. सौभाग्यवती गोदावरी बाईंनी जातीने लक्ष घालून अत्यंत सुग्रास जेवणाचा बेत केला होता. कित्येकांची क्षुधा वासावारच चेकाळत होती. नरहरी भट्ट सुरुवातीपासूनच आघाडी घ्याच्या मिषाने चपचप करून खिरचे सात आठ द्रोण संपवले पोळ्या वाढणारा सेवक परात मोकळी झाल्याने वेगाने भटार खान्याच्या दिशेने पळाला. तो परत येई पर्यंत नरहरीने भाताचे ५-६ मुटके लीलया मटकावले. अगश्यांनी बाका प्रसंग लक्षात घेऊन आणखी २-३ वाढपी कामाला लावले. पोळ्यांचा राबता सुरळीत झाल्यावर नरहरीने आपला मोर्चा कार्ल्याच्या भाजी कडे वळवला. अनेक जाणकारांनी याला रुचीनैपुण्याचे एक अजोड उदाहरण मानून त्यांची स्तुती करावयास सुरुवात केली. नरहरीचा धडाका पाहून बगंभटांच्या तोंडावर स्मित विलसू लागले.
श्रीधर पंत मात्र अत्यंत संयमाने जेवत होते खिरीचे ४-५ द्रोण संपवून त्यांनी सरळ मसाले भाताला हात घातला त्यावर भरपूर तूप वाढून घेऊन त्यांनी स्वयंपाक्याच्या प्रत्येक खेपेस एक प्रमाणे तीनदा पातेलं भर भात संपवला. वर शुभ्र भात घेऊन त्यावर साग्रसंगीत अंबाडीची भाजी ओतून घेली आणि झकास भुर्के मारत तो ढीग संपवला. नैवेद्याचे ४-५ मोदकही तुपाच्या धारेखाली धरून घशाखाली उतरवले. एकूणच स्पर्धेचं निकाल काय लागेल याबद्दल अंदाज येणं कठीण होऊन बसलं होतं.
हळू हळू एक एक विप्रवर 'अन्नदाता सुखी भव' म्हणत आपापल्या पानावरून उठू लागले. या आगळ्या वेगळ्या स्पर्धेत आपणही थोडी कीर्ती मिळवावी या हेतूने आलेले सर्व ब्राम्हण निराश झाले. कारण अन्न घशाशी येऊन ढेकर देऊन बाजूला पाहतात तो दोनही द्विजोत्तामांच अगदी तालात जेवण चालू होतं. उठणाऱ्या एकेक मनुष्याकडे पाहताना नरहरीच्या डोळ्यातील छद्मी भाव सर्वांना दिसत होते. अखेर ८-९ घटीकांनंतर केवळ दोनच भोजन पटू शिल्लक राहिले आणि ते म्हणजे नरहरी आणि श्रीधर!
निर्णायक वेळ पाहून नरहरीने आग्यावेताळाप्रमाणे खाण्यास सुरुवात केली दोन वाढपी सतत त्यांच्या आजूबाजूला दिसत होते. अनेक मोदक फस्त करूनही तो तेवढ्याच धडाक्यात भाताच्या उन्ड्याही संपवत होता. एखाद्या सराईत गोलंदाजाप्रमाणे तो अत्यंत लायीत भाताचे भुर्के मारत होता. आता हा कुंभकर्ण अगशांचे घरच फस्त करील अशी शंका येऊ लागली. श्रीधारपंत मात्र अत्यंत शांत चित्ताने आणि रुची प्रीयतेने भोजन करीत होते. ताक भाताबरोबर लिंबाचे लोणचे आणि पानातील उरलेले पदार्थ कालवून ते खात असताना त्यांचे भोजन संपले अशी शंका अनेकांना आली, पण पान स्वत्च्छ करून ते पुन्हा एकदा नवीन पानावर बसावं त्याप्रमाणे जेऊ लागले. त्यांचे हे भोजन पटुत्व पाहून सर्वांच्या चेहऱ्यावर समाधानाची मुद्रा प्रकटली.
इकडे नरहरी एका घासत आता समोरची पत्रावळ ही संपवतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. अत्यंत अधाशी पणाने आणि विशेष चावाण्याचेही कष्ट न घेता केलेल्या भोजनाने आपला प्रताप नरहरीवर दाखवावयास सुरुवात केली. त्याला अन्न जाईना तरी जिंकायच्या ईर्षेने तो अन्न रिचवत राहिला आणि शेवटी व्हायचे तेच झाले. हातात एकाच वेळी घेतलेले चार चार भाजे त्याने तोडत कोंबले आणि ते घशाखाली ढकलताच 'ख्ख्खः' असा आवाज झाला नरहरीचे डोळे उर्ध्व लागल्या प्रमाणे वरती गेले आणि त्यच्या तोंडातील ऐवज बाहेर उडाला. त्याने शुद्धी वर येऊन पाण्याचा पेला उचले पर्यंत त्याला भयंकर उचकी लागली. अशात पुढे खाण्याचा प्रश्नच उरला नव्हता. त्राण गाळलेल्या वीरा प्रमाणे तो उठायचा प्रयत्न करू लागला पण त्याला उठायचे ही बळ उरले नव्हते. शेवटी २-३ रखवालदरांनी त्याला काखे खाली हात घालून वर उचलला आणि आत घेऊन गेले.
झाल्या प्रकाराने सर्व लोक चकित झाले आणि काही वेळ कोणीच काही हालचाल केली नाही. तेवढ्यात 'पंतsss, कोशिंबीर पाहू जराsss' अशी हाक आली आणि सर्व जण भानावर आले. श्रीधरपंतांचे भोजन अजून उरकले नव्हते. ही गोष्ट लक्षात येताच देशावरील गोटात उत्साह पसरला. आता पंतांनी पंगतीचा ताबा घेतला एका वाढप्यास कारल्याची भाजी आणि दुसरयास पोळ्या आणायची सूचना करून ते पानातील नुकत्याच वाढलेल्या कोशिम्बिरीवर तुटून पडले. शांतारामाने 'हरीच्या ss घरी ss' सुरु केले आणि पाठोपाठ भाजीचे पातेले घेऊन वाढपी आला. श्रीधर पंतांनी आपल्याच हाताने भाजी निपटून तिचे शेवटचे शीतही पानात घेतले आणि तुपाने माखलेल्या पोळी समवेत संपवून टाकले. दिग्विजयी राजाने मुलुख काबीज करावा, त्या प्रमाणे त्यांनी एकेक पदर्थ काबीज करण्याचा सपाटा लावला. कारल्याची भाजी संपली, खिरीच्या पत्राचा तळ दिसू लागला, मसाले भातात खर्पुडीचे प्रमाण उत्तरोत्तर वाढू लागले, भाजांचा रंग अधिकाधिक गडद होऊ लागला. इतकेच काय तर तुपातही बेरीचे तरंगणारे कण जास्त दिसू लागले. रिकाम्या पात्रांचा आवाज ऐकून आगाशे मुदपाकखान्याकडे वळले. आणि केलेल्या निरीक्षणात स्वयंपाक्यांनी स्वतः साठी काढून ठेवलेली मोदकाची एक रास त्यान त्यांच्या नजरेस पडली. रागाने लालबूंद होऊन त्यांनी तो ढीग उचलून तसाच बैठकीच्या दिशेने नेला आणि सोवळं सरसावून जातीने श्रीधर पंताच्या पानात मोदक वाढू लागले. तो ढीग ही पंतानी सहजपणे संपवला एवढंच काय तर आर्ध्या मुर्ध्या उरलेल्या मोदकांचा चुरा आणि सारणही त्यांनी संपवलं. द्रोणातील ताकाचा शेवटचा घोट घेऊन .पानावर मधला बोट ठेऊन त्यांनी वर बघितलं. पलीकडील झोपाळ्यावर बसलेल्या बगं भट यांच्या कडे एक नजर टाकली. ते आ वासून पंतांचा चमत्कार पाहत होते. नजर अगशांकडे वळवली तर ते हातात पोह्ची घेऊन हात जोडून उभे होते. 'विप्रवरा, द्विजेषा !! नारायणाने जसा नारादमुनींचा आणि हनुमंताने जसा भीमाचा गर्व हरला तशीच कृपा आपणही माझ्यावर केलीत, या उप्पर आपले भोजन पूर्ण करण्यासाठी माझ्या कडे काही नाही तेव्हा आम्हास क्षमा करावी' असे म्हणून त्यांनी पंतांपुढे सपशेल दंडवत घातले. 'उठा ss, आगाशे उठा, इतके सुग्रास जेवण आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर अन्नदान करणारे सावकार जोवर या मुलुखात आहेत तोवर इथे पुण्याची कधीच कमतरता भासणार नाही. आमचे भोजन उरकले आहे.. अन्नदाता सुखीभव' शेवटचा आशीर्वाद देताना त्यांनी आपले हात पालथे पसरले.
देशावरील विप्रांच्या गोटात आनंदी आनंद पसरला. पंगतीचा मान हा देशावरील ब्राह्मणानपाशीच राहिला. परंतु मुलुखाची विभागणी झाली आणि सर्व विप्रवार्गात आनंद पसरला. भोजन महर्षी अशी पदवी मिरवणाऱ्या नरहरीची सद्दी संपली. परंतु पूर्ण मुलुखात प्रसिद्ध होऊनही श्रीधरपंत परत त्रयम्बाकास निघून गेले आणि आमरण तेथेच राहिले.
समाप्त.
प्रतिक्रिया
22 Mar 2010 - 12:49 am | मी-सौरभ
-----
सौरभ :)
22 Mar 2010 - 3:14 am | अर्धवटराव
मित्रा... फार फार सुंदर लिहिलस रे !! तिनही भाग एकसाथ वाचले आणि वरण-भाता पासुन सुरु करुन वीडा संपेपर्यंत यथासांग भोगलेल्या पंगतीचा लुफ्त आला... आणि सोबतच पेशवाईचा शेवट का व कसा झाला याचे एक कारण देखिल समजले. पु.लंच्या या विषयावरच्या एका लेखाची आठवण झाली.
(भोजनपटू) अर्धवटराव
-रेडि टु थिंक
22 Mar 2010 - 10:47 am | विंजिनेर
मस्त आणि चविष्ट!
20 Oct 2023 - 7:04 pm | जेपी
हे राहिल