पूर्णब्रम्ह - १

चंडोल's picture
चंडोल in जनातलं, मनातलं
21 Mar 2010 - 6:39 pm

(अनेक वर्षापूर्वी वाचलेल्या एका कथेवर आधारीत)

उत्तरपेशवाइतील ऐन वैभवशाली दिवसांमध्ये मराठी मुलुखात विविध देवीदेवतांच्या व्रत-अनुष्ठानांचे पेव फुटले होते. आड गावातील अडीच गुंठा बखळीत, एखादा बुद्रुक मनसबदार देखील शेपाचशे पान सहज उठवून देवून आशीर्वाद पदरात पाडून घेत होता. नाशिक, सातारा, रत्नांगिरी, श्रीवर्धन, वाई, कोल्हापूर अशा खाशा शहरांमध्ये पूजा-अर्चा, यज्ञ, होम-हवन ह्यांची रेलचेल होती. यजमान विविध प्रांतातील रुचकर खाद्यपदार्थ आपल्या पंगतींत समाविष्ट करून विप्रवारांचे आशीर्वाद घेत होते.

जेंव्हा पूर्ण दौलतीत अशी पुण्य मिळवण्याची चढाओढ चालू होती, तर खुद्द श्रीमंत पेशव्यांच्या गादीचे स्थान असलेल्या पुण्याचे रूप तर काय वर्णावे? उत्तरेतील कान्यकुब्ज, मैथिली पासून ते रामेश्वरवासी नाम्बूदिरीनपर्यंत दशग्रंथी ब्राम्हण मराठेशाहीचे वैभव आणि येथील यजमानांच्या आग्रहानैपुण्याच्या कथा ऐकून येथे येत आणि साक्षात रामराज्य 'याची देही याची डोळा' पाहिल्याचे समाधान मानून स्वगृही परतत. मातब्बर सरदारांच्या भटारखाण्यातील सर्व पात्रे मासातून एकदातरी पाण्याचा स्पर्श अनुभवत होती.

अश्या ह्या पुण्याश्लोकी वातावरणात, विप्रगणामध्ये मात्र काहीतरी आक्रीतच चालू होते आणि त्याला कारण होत्या ह्या नित्यनेमाने चाललेल्या जेवणावळी. मणाचे ब्राम्हण हा मान मिळवण्यासाठी मराठेशाहीतील झाडून सर्व द्विज पंगतीमागून पंगतीत आपले रुचीनैपुण्य दाखवायची चढओढ करीत होते. त्यातच देशावरचे आणि कोकणातले असे दोन गट पडले आणि अक्षरशः रणकंदन सुरु झाले. ह्या स्पर्धेमुळे यजमानांची चांगलीच पंचाईत झाली आणि आमंत्रणांचा ओघ अटू लागला.

काही अनुभवी द्वीजेषांना हा आचरटपणा मुळीच रुचला नाही. भोजनपटुत्वा सारखी भूषणवाह योग्यता अशी आखाड्या सारखी चार चौघांत मांडण्याचा प्रकार त्यांना असह्य झाला आणि त्यांनी ह्या स्पर्धेचा सोक्षमोक्ष लावण्याचा निर्णय केला. देशावरील गटाकडून सातारकर महादेवभट आणि कोकणातील गटाकडून चिपळूणचे बगंभट ह्यांची निवाड्या साठी नियुक्ती झाली.

चालू असलेला प्रकार हा समाजाच्या हिताचा नाही ही गोष्ट ह्या पोक्त मंडळींनी मान्य केली. परंतु त्याच बरोबर भोजनाच्या पंगतीचा मान हा एक भावनिक प्रश्न असल्याचेही त्यांच्या लक्षात आले, आणि म्हणून त्यांनी ह्या प्रकरणाचा निवडा करण्यासाठी एक स्पर्धा आयोजित करायचे ठरवले. स्पर्धा तशी सोपीच शिवाय कुळातील लोकांच्या विशेष जिव्हाळ्याची. मुळात विषय भोजनपटुत्वाशी निगडीत असल्याने याच गोष्टीच्या प्राबल्याच्या जोरावर कोणत्याही एका गटास विजयी घोषित करावे असे ठरले. याचबरोबर नुसत्या अन्नपदार्थांच्या संख्येस किंवा वजनास प्राधान्य न देता रुचीप्रीयतेच्या दृष्टीकोनातून स्पर्धा व्हावी असही ठरलं (हो, नाहीतर एखादा कोंकण्या खंडीच्या पायली भात चरून विजयाचा विडा उचलायचा, इति महादेवभट). आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ह्या गोष्टीचा बोभाटा होऊ नये म्हणून स्पर्धा एखाद्या सधन विप्राच्या घरी आणि ती देखिल कुठल्या तरी अनुष्ठानाच्या सबबीखाली करावी असं मान्य झालं (न जाणो कोण्या पाप्याची शिंची द्रिष्ट लागायची, इति बगंभट)

अशा आगळ्या वेगळ्या स्पर्धेचं यजमानपद स्वीकारण्याचं शिवधनुष्य कराडच्या आगाशे खोतांनी आनंदाने स्वीकारलं. कोणालाही ह्या बाबतीत कसलीच महिती लागू न देण्याच्या अटीवर गणेश जयंतीच्या मुहूर्तावर वाड्यावर जेवणावळ आयोजित केली गेली आणि आपापल्या गटाचे प्रतिनिधित्व कोणी करायचे ह्यावर दोन्ही बाजूस चर्चा सुरु झाली.

क्रमशः

कथालेख