पूर्णब्रम्ह -२

चंडोल's picture
चंडोल in जनातलं, मनातलं
21 Mar 2010 - 6:42 pm

पूर्णब्रम्ह -१

पूर्वसूत्रः
(कोणालाही ह्या बाबतीत कसलीच महिती लागू न देण्याच्या अटीवर गणेश जयंतीच्या मुहूर्तावर वाड्यावर जेवणावळ आयोजित केली गेली आणि आपापल्या गटाचे प्रतिनिधित्व कोणी करायचे ह्यावर दोन्ही बाजूस चर्चा सुरु झाली)

स्पधेचे एकूण स्वरूप आणि नियम पाहून कोंकणी गोटामध्ये उत्साहाचे वातावरण होते. ह्यावेळी घाटावरच्यांची खोड नक्की मोडणार ह्याच्या बद्दल त्यांना खात्रीच पटली. याचं कारणही तसंच होतं. वसिष्ठाकुलोत्पन्न नरहरी भट्ट मुळचे राजापूरचे, तरीही भोजन महर्षी म्हणून ते पूर्ण कोंकण मुलुखात प्रसिद्ध होते गुजरातेतील बडोद्या पासून ते फिरंग्याच्या आधिपत्याखालील मंगेशिपर्यंत त्यांच्या भोजनपटुत्वाचा दरारा होता. फुललेल्या तळणीच्या कुरडई प्रमाणे भासणारा त्यांचा गोरापान वर्ण. मुळची काळीभोर पण वयोमानाप्रमाणे शेवया प्रमाणे पांढरी पडलेली त्यांची शीखा. गुळाच्या पिवळ्या रंगाशी स्पर्धा करणारे त्यांचे याद्नोपवीत, कुण्या दानशूर यजमानाने बहाल केलेलं मोरपंखी रंगाचं सोवळं, ह्या सगळ्या भरभक्कम ऐश्वर्यावर कोणाची नजरही पडणार नाही अशी त्यांची शरीर संपदा होती. हनुवटीच्या खाली मानेचे जेमतेम अस्तित्व जाणवते ना जाणवते तोच तेथून सुरु झालेले त्यांचे दोंद पार नाभीच्या खाली पोचूनही वर दशांगुळे उरत असे. वर अजस्त्र मुद्गालाप्रमाणे भासणारे त्याचे स्थूल हात-पाय आणि या सर्व पसाऱ्यात रुतलेलं त्यांचं तांबड्या भोपळ्या प्रमाणे भासणारं शीर, हा सगळा अवतारच सदावर्तवाल्यांच्या उरात धडकी भरवत असे. अनेक लहान मोठ्या मनसबदारांच्या भटाराखान्यातील रिकाम्या पात्रांचा केविलवाणा किणकिणाट त्या अळूच्या पानाप्रमाणे विशाल भासणाऱ्या कानांनी ऐकला होता. एका बैठकीत पंचवीस मोठे द्रोण बासुंदी, परातीच्या आकाराच्या बत्तीस पुरणपोळ्या आणि बुंदीचे सव्वीस लाडू हे एकदा त्यांनी मूळ पंगत संपल्यानंतर मुखशुद्धी म्हणून खाल्ले होते. मुख्य पन्गातीचा तपशील बाहेर पडू द्यायचा नाही आशी नरहरी भट्टांची सख्त ताकीद होती. परंतु जाणकार यजमानांच्या चेहऱ्यावरील काकूळतिचे भाव पाहून जिन्नस बरोब्बर हेरत असत. नरहरी भट्टांनी ताक माग्वेपर्यंत काही यजमानांना धीर नसायचा. एकदा का ते भाताचे तीन ढीग संपले की मग भट्टांच्या हातावर पाणी पडायचं आणि यजमान निश्वास टाकायचे. असे हे नरहरी भट्ट एकमताने कोकणपक्षाचे प्रतिनिधी ठरले आणि निकालाबद्दल त्या गोटात खात्री पसरली.

ही परिस्थिती देशावरील विप्रवारांना माहित होती, अशी स्पर्धा मान्य केली म्हणून अनेकांनी महादेव भटांना खाजगीत आपली नापसंतीही कळवली होती. नरहरीला सामोरं जायचं म्हणाल्यावरच अनेकांना घाम फुटला . तरीही महादेवराव निश्चिंत होते. त्याचा नजरेत असेक एक मातब्बर रुचीवर्य होते. मुळचे त्रीयम्बकातले श्रीधरपंत हे विशेष मोठा प्रस्थ नव्हतं सिंहस्थातील सदावर्त सोडली तर ते विशेष कुठे प्रवास करत नसत. त्यांच्या येण्याने यजमानांच्या कपाळावर आठ्याही पडत नसत. मुळातच दोन मोठे मुसळ सलग ठेवल्यावर होईल तेवढी त्यांची उंची, काहीसा गव्हाळ परंतु तेजस्वी वर्ण , रामादासिप्रमाणे राखलेली त्याची दाढी आणि रोखलेली नजर अशी त्यांची मूर्ती चेहऱ्यावर विल्सणाऱ्या हास्यामुळे फारच मैत्रीपूर्ण वाटत असे. त्यांचं एका पंगतीतील जेवणही बेताचंच नसलं तरी कोणाच्या नजरेस न येणारं. असं असूनही महादेवरावांना त्यांच्या बद्दल खात्री होती कारण अशा ८-९ पंगती श्रीधरपंत एका दिवसात आटोपित असत!! कुठे ३४ ओघरळी श्रीखंड पचवतील तर कुठे तीसेक मांड्यांचा फडशा पडतील. ३-४ वेळा मसालेभाताची परात रिकामी करूनही साधारण तासाभरात तेव्हडाच वरण भातही संपवतील. अशी चौफेर भोजनाची फैर झडली की त्यांच्या चेहऱ्या वरील हसू अजूनच तेजस्वी दिसत असे. मुळातच प्रवासाचा कंटाळा असूनही केवळ महादेवारावांच्या मर्जी खातर ते कराड पर्यंतचा प्रवास करण्यास सज्ज झाले. एवढ्या लांबच्या प्रवासात काही त्रास होऊ नये म्हणून अगाश्यांनी खास पालखीची व्यवस्था आणि वाटेतील गावांत उत्तम सोय करून दिली होती.

हा सर्व खटाटोप चालू असताना कराडला भोजनाची व्यवस्था हि जोरात चालू होती. मूळ स्पर्धे बरोबरच दानशूर यजमानांनी विजेत्यास चांदीची पोह्ची देण्याचीही तयारी केली होती. पंगतीच्या दिवस आला आणि संपूर्ण वाडा सांडगे कुरडयांच्या तळणीच्या सुवासाने भरून गेला. गणेश जयंतीचे औचित्य साधून मोदकांचा मुख्य बेत होता. ह्याबरोबर मसालेभात, अंबाडीची ओली, कारल्याची कोरडी अशा भाज्या ह्याच बरोबर अनेक अनवट कोशिंबिरी, लोणची आणि खुसखुशीत भजे अशा सात्विक पदार्थांची रेलचेल होती. दोन अजस्त्र रांजणात ताकावर आले आणि कोकमची रुचकर चव चढवायची तयारी चालू होती. सोनापिवळं वरण, जून आंबेमोहर भात, नारळ व गुळाचं वाफावणार सारण आणि सर्व भाजांचा मिळून एक आत्यंतिक आल्हादायक असा सुवास आसमंतात भरून राहिला होता. आधी ठरवलेल्या गुप्तते मुळे खाशांना सोडून फारच कमी लोकांना आमंत्रण होतं. सर्व मंडळी जमली. नवीन सरावलेल्या ओसरी वर सुंदर रांगोळी काढून आणि पाट मांडून पंगतीची सिद्धता झाली. नरहरी आणि श्रीधर पंता बरोबर सर्व ब्राम्हणांनी हातात आपोष्णी घेऊन मंत्र पुटपुटायला सुरुवात केली.

क्रमशः

कथाआस्वाद

प्रतिक्रिया

मी-सौरभ's picture

22 Mar 2010 - 12:44 am | मी-सौरभ

तोंडाला पाणी सुटलं.....

-----
सौरभ =P~