आस एक जगण्याची!

अरुंधती's picture
अरुंधती in जनातलं, मनातलं
18 Mar 2010 - 6:08 pm

काल सकाळी पारुबाई कामावर आल्या तेव्हा त्यांचा उजवा गाल टम्म सुजला होता, डोळ्याजवळचा भाग सुजून काळानिळा झालेला! माझ्या छातीत चर्रर्र झालं. "काय हो पारुबाई, कुठं पडलात वगैरे की काय?"
माझ्या प्रश्नावर खिन्न हसून पारुबाई चेहरा वाकडा करत म्हणाल्या, "कसलं काय ताई! काल रातच्याला ह्ये लई पिऊन गोंधळ घालीत व्हते म्हनून त्यास्नी बोल्ले तर मार मार मारलन मला! समद्या लोकांसमोर तमाशा केला वर माज्याकडचं पन्नास रुपयं घ्येतलं बळजबरीनं! आता तुमीच सांगा मी पोरांच्या प्वाटात काय घालायचं?"
नवर्‍यानं दारु पिऊन आपल्याला बेदम मारले, शिवीगाळ केली ह्यापेक्षा त्या माऊलीला पोरांच्या पोटाची चिंता लागली होती. "अहो, डॉक्टरकडे तरी गेलात का? केवढं लागलंय तुम्हाला! तो डोळा उघडता तरी येतोय का नीट?" माझ्या प्रश्नावर पारुबाईंनी नकारार्थी मुंडी हलवली. शेवटी आईने त्यांना घरातली जुजबी औषधे दिली व आठवणीने डॉक्टरकडे जायला सांगितले.

गेली दोन वर्षे पारुबाई आमच्याकडे कामाला आहेत. त्या दरम्यान अनेक वेळा त्यांनी त्यांच्या नवर्‍याच्या व्यसनाधीनतेविषयी, बेकारीविषयी, हात उगारण्याविषयी मनातली मळमळ बोलून दाखवली असेल. त्याच्या व्यसनापायी त्यांना स्वतःच्या घरात दहा रुपयेही ठेवण्याची चोरी झाली आहे. कारण नवरा लपवलेले पैसे हुडकून काढतो आणि थेट गुत्ता गाठतो. पण त्यावर उपाय सुचवला, सांगितला तरी पारुबाईंना तो ऐकायचा नसतो. आपल्या नवर्‍याच्या व्यसनावर इलाज आहे हे कळूनही त्या उत्तरतात, "काय करायचंय ताई ह्यांचं व्यसन सोडवून! काय पाप्याचं पितर झालंया बगा त्यांचं त्या दारुपायी. प्वाटात अन्न नसंल येक वेळ, पन रोजच्याला दारु लागतीया! तुमी म्हनताय ह्यावर औषद आसतंया, पन त्ये औषद पचवन्याची तरी ताकद आसाया पाह्यजे नव्हं! रोज रोज पिऊन गटारात लोळत पडत्याती, ना अन्नाची शुध आसते, ना कपड्याची. कोनीतरी घरला घेऊन येतो त्यास्नी, न्हायतर सांगावा धाडतो. आता आसा मानूस सुदरनार तरी का ह्ये तुमीच सांगा!"

पारुबाई त्यांच्या निर्णयावर ठाम आहेत. नवरा दारुशिवाय पण फारसा कामाचा नाही, त्याला काम करण्याची इच्छा नाही, हे वास्तव त्यांनी स्वीकारलंय. त्याच्या औषधपाण्यावर खर्च करायला त्या नाखूष आहेत. त्या ऐवजी त्याच पैशात आपल्या कच्च्याबच्च्यांची गुजराण, त्यांचे शिक्षण करून त्यांना मोठं करायचं स्वप्न त्या पहातात. नवर्‍याला बरं करुनदेखील आपल्या आयुष्यात, कष्टांमध्ये असा कोणता फरक पडणार आहे ह्या त्यांच्या बिनतोड सवालावर आपल्याकडे उत्तर नसते. त्यांच्या लेखी त्यांची मुलेच त्यांचे भविष्य आहेत. त्यांच्या शालेय यशात त्या समाधान मानतात. पण पारुबाईंच्या स्वत:च्या आयुष्याचे काय? भल्या पहाटे उठून घरातली चार कामे आटपायची, जुनेरं नेसून कामावर हजर व्हायचे, सकाळपासून दहा घरी राब राब राबायचे, लोकांनी दिलेल्या शिळ्या अन्नावर स्वतःची भूक भागवायची, दुपारी उशीरा दमलेले पाय ओढत ओढत अर्ध्या तासाच्या अंतरावर असलेले आपले झोपडे गाठायचे... तिथेही कोठला आला आहे आराम? धुणी, भांडी, स्वयंपाक, सार्वजनिक नळावरून पाणी भरणे, मुलांना अभ्यास करत नाहीत म्हणून बदडणे यातच पारुबाईचा दिवस संपतो. दिवसभर पाण्यात, साबणात काम करून आग होणारे हात-पाय, दुखणारी पाठ-कंबर आणि दारु पिऊन हैदोस घालणारा नवरा त्यांना सुखाची झोपही घेऊ देत नाहीत.
जोडउत्पनासाठी करायला लागणार्‍या कष्टासाठी त्यांच्या शरीरात ताकदच नसते. नात्यातल्यांनी नवर्‍याच्या व्यसनापायी नाव टाकलेलं... मदत करणार तरी कोण? ज्या कामांवर जातात तिथले शिकलेले लोक अडीअडचणीला करतात मदत तशी... कोणी मुलांच्या शाळेच्या फी ची व्यवस्था करतं तर कोणी महिनाअखेरीस ज्वारी-बाजरीचं पीठ देतं... पण हे काही कायमस्वरूपी उपाय नव्हेत.

"पारुबाई, ही पुस्तकं घ्या, जुनीच आहेत, पण तुमच्या मुलांना आवडतील वाचायला," माझ्या हातातली काही जुनी पुस्तकं, मासिकं मी पारुबाईंच्या हातात ठेवते... पारुबाईंच्या चेहर्‍यावर पुस्तकं पाहून आनंद दिसू लागतो. एरवी कोणी साड्या, कपडे, धान्य, पैसे दिले तर ते पारुबाई गरजेपायी घेतात; पण कोणी त्यांच्या मुलांसाठी पुस्तके, शाळेचे सामान दिले की त्यांच्या तोंडात त्याखेरीज दुसरा कौतुकाचा विषय नसतो.

इतर बायांच्या गप्पा-टप्पांमध्ये पारुबाईंचं मन रमत नाही. त्यांना सतत घराची चिंता असते. कधी त्यासाठी झेपत नसतानाही त्या उरापोटावर जास्तीची कामे घेतात, वणवण पायपीट करतात. तात्पुरती नड भागते. पण पुढचे काय?
आज त्यांच्या दोन पोरी आठवीत आणि सहावीत आहेत. अभ्यासाला बर्‍या आहेत. त्यांना किमान दहावीपर्यंत तरी शिकवायचे त्यांचे स्वप्न आहे. मुलगा तसा लहान आहे, चौथीत बसलाय यंदा... अभ्यासात जरा नाठाळच आहे आणि हूडही! मुलींचा समजूतदारपणा त्याच्यात नाही. सारखा हट्ट करतो आणि पारुबाईंच्या हातचा खरपूस मारही खातो. पण पारुबाईंना मुलांविषयी खूप आशा आहे. अजून दोन-चार वर्षांत पोरी हाताशी येतील, घरी-बाहेर कामामध्ये मदत करतील, मुलगा कळता झाला की कमावू लागेल आणि मग आपल्याला चार सुखाचे दिवस येतील हे स्वप्न उराशी बाळगून त्या दिवस काढत आहेत. स्वतःला चौथीपेक्षा जास्त शिकता आले नाही, फारशी मौजमजा करता आली नाही, संसाराचे सुख फार काळ लाभले नाही याचे त्यांना शल्य आहे. पण त्या खचून न जाता, जिद्दीने आज मुलांसाठी, आपल्या संसारासाठी खस्ता काढत आहेत. त्यांच्या डोळ्यांमध्ये भोगलेल्या वेदनांच्या जखमा आहेत, पण त्याहीपेक्षा जास्त, चांगले दिवस येणार ही एक वेडी आशा आहे. बहुधा हीच आशा त्यांना बळ आणि जगण्याची उभारी देत असावी!

--- अरुंधती कुलकर्णी.

http://iravatik.blogspot.com/

समाजजीवनमानप्रकटनविचारलेखअनुभव

प्रतिक्रिया

शुचि's picture

18 Mar 2010 - 8:10 pm | शुचि

व्यक्तीचित्रण सुरेखच.
सुरुवात केली आणि शेवटपर्यंत वाचतच गेले. फार वाइट वाटतं व्यसनाधीन लोकांची कुटुंबे पाहून.

प्राजु's picture

18 Mar 2010 - 10:07 pm | प्राजु

अशा पारूबाई बहुतेक कमीअधिक फरकाने सगळीकडेच असतात.
नशिब!! दुसरं काय??
छान लिहिला आहेस लेख.
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/

विसोबा खेचर's picture

18 Mar 2010 - 11:20 pm | विसोबा खेचर

हम्म..

या दुर्दैवी गोष्टी कॉमन आहेत..

तात्या.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

18 Mar 2010 - 11:26 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चांगले दिवस येणार ही एक वेडी आशा आहे. बहुधा हीच आशा त्यांना बळ आणि जगण्याची उभारी देत असावी!

खरं आहे...!

-दिलीप बिरुटे

इंटरनेटस्नेही's picture

19 Mar 2010 - 1:32 am | इंटरनेटस्नेही

'आशानाम मनुष्यानाम् काचिद् आश्चर्य शृंखला यया बध्दा प्रधावन्ते मुक्त: तिष्ठती बंदिवान'

रेवती's picture

19 Mar 2010 - 2:22 am | रेवती

दुर्दैवी कहाणी!
अश्या कितीतरी पारूबाई आपल्या आजूबाजूला दिसतात. न दिसणार्‍या पारूबाईही आहेत्.....अनेक! फरक आहेत काही ........जसं कि पैसा भरपूर, शिक्षण भरपूर पण मोठ्ठ्या पोस्टवरचा नवरा रागाच्या भरात मारतो किंवा सिगरेटचे चटके देतो वगैरे. काही उदाहरणं आहेत माहितीची!:(

रेवती

पक्या's picture

19 Mar 2010 - 3:24 am | पक्या

काही कजाग २-४ स्त्रियांनी पुरषांवर अन्याय केला तर समस्त स्त्री जातीला एक ते एकच लेबल लावणार्‍या युयुत्सु साहेबांचं काय म्हणणं आहे ह्यावर?
अशा धाग्यांवर येईल का त्यांचा प्रतिसाद?
जय महाराष्ट्र , जय मराठी !

मॅन्ड्रेक's picture

19 Mar 2010 - 7:46 pm | मॅन्ड्रेक

नमस्कार,
लेख सहज सुन्दर आहे.
वैषम्य एकाच गोष्टिचे वाट्ते की इतर महीला मंड्ळी
अश्याना काहिच करु शकत नाहीत.
एक जुटीने अश्या नवरर्याना चोप दिला पाहिजे.

at and post : Xanadu.

अरुंधती's picture

19 Mar 2010 - 8:55 pm | अरुंधती

व्यसनाधीन नवर्‍यांपायी होरपळत असलेल्या सर्वच स्तरांतील महिलांसाठी व्यापक प्रमाणात आधारगट, जागृती अभियान इ. राबविणे गरजेचे आहे. अनेक स्वयंसेवी संस्था हे काम करत आहेत. परंतु व्यसनाधीनतेची व्याप्ती पाहता त्यासाठी प्रत्येकाने आपापल्या परीने योगदान देण्याची गरज आज समाजात निर्माण झाली आहे. दारुनिर्मितीला अनुदान देऊन सरकार एकीकडे दारुबाजांना प्रोत्साहन देते, तर दुसरीकडे दारुबंदी कामासाठी समित्या निर्माण करते. असा दुटप्पी कारभार काय कामाचा? दोन्हीकडून जनतेचेच नुकसान! (समित्यांचा खर्च शेवटी जनतेच्याच पैशातून ना!)

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/