आमच्याकडे सध्या नवा वाद रंगलाय.
आमच्या ओळखीचे एक शेतकरी दादा परवा तावातावाने घरात शिरले.
त्यांच्या व माझ्या भावामधला हा संवाद!
"तुम्ही ते बीटी वांग्याचं, बीटी भाज्यांचं आमच्या बायकूकडं येवढं कवतिक का हो करून राहिला भाऊ? "
"का? काय झालं? मी तर वर्तमानपत्रातल्या बातम्या मोठ्यानं वाचत होतो!"
"अहो, तुमचं वाचन आमच्या बायकूनं आयकलं आन आमच्या 'हिच्या' डोक्यात तवापास्नं किडा वळवळाया लागलाय बघा... म्हनत्ये की भाजीत जर त्या ब्यॅक्टेरियाचा जीन टाकता येतो तर मग मानसात का नाही?"
"म्हणजे? मी नाही समजलो... "
"अहो, आता बघा, त्यो जीन घालून पिकवल्येलं वांगं म्हने कीड, रोगाला जवळ फटकू द्येत न्हाय... त्येला दवा-औषध काय लागत न्हाय असं आमचे दादा म्हनून राह्यले...म्हंजे त्ये आसं त्यांच्या भाषनात म्हनाले आसं तुमीच सांगितलं! "
"बरं... मग? "
"तर आता आमची 'ही' म्हनतिया की फुडचं प्वार बीटी प्वारच पायजेल! "
"आँ? "
"आरं भाऊ, तिचं म्हननं जर बीटी वांग्याला कीड, रोग लागत नसंल, दवापानी कराया लागत नसंल तर तसंच मानसाच्या पोराला का नको? मानसात पन घालायचा असलाच कंचा तरी जीन आन मग होऊन जाऊ द्ये पटापटा हवी त्येवढी पोरं! "
"अरे बाबा, पण त्याला कायद्यानं मान्यता हवी ना! आणि तेवढं तंत्रज्ञानही विकसित व्हायला हवं! "
" पर कायदा का म्हनून नाकारेल अशी बात? जर त्यानं समद्यांचा फायदा होत आसंल, भलं होत आसंल तर मग कायदा त्या बाजूनंच हवा की हो राव! आन तुमी ते तंत्रज्ञानाचं काय पन सांगू नकासा! फारीनला ते गोरे लोक जर डुप्लिक्येट मानूस बनवून राह्यले तर ह्ये तर येकदम सोप्पं काम हाय! मस्त चार-पाच पोरं झाली की कारभारनी माझं टकुरं खानं बंद करंल!"
"अरे, पण एवढ्या पोरांना तू खायला काय घालणार? त्यांचा कसा सांभाळ करणार? "
"आवं आसं काय बोल्तासा, हायेत की मंग आपली बीटी वांगी, बीटी धान्य आमच्या बीटी पोरास्नी पोसाया....जास्त पोरं म्हंजे शेतात कामास्नी येत्याल, आन आजारी पन पडणार न्हाय.... "
आता आमच्या ह्या शेतकरी भाऊना काय बरे उत्तर द्यावे?
त्यांना आता बीटी पोर हवे आहे. भारत सरकार त्यांना मदत करेल काय?
अरुंधती
Sing, Dance, Meditate, Celebrate!
http://iravatik.blogspot.com/
प्रतिक्रिया
7 Mar 2010 - 1:39 pm | उग्रसेन
मानसात पन घालायचा असलाच कंचा तरी जीन आन मग होऊन जाऊ द्ये पटापटा हवी त्येवढी पोरं!
आन्
त्यांना आता बीटी पोर हवे आहे. भारत सरकार त्यांना मदत करेल काय?
लय भारी. सर्कारनं त्यायला मदद कराला पाह्यजेन. :)
बाबुराव :)
7 Mar 2010 - 1:38 pm | श्रावण मोडक
शेतकऱ्याच्या बायकोच्या तोंडून हाणलेला हा टोला योग्य जागी पोचेल काय, इतकाच प्रश्न आहे!!!
8 Mar 2010 - 9:34 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
अगदी!
मस्त लिहीलं आहेत.
अदिती
7 Mar 2010 - 1:52 pm | पक्या
मस्त टोला.
- जय महाराष्ट्र , जय मराठी !
7 Mar 2010 - 2:41 pm | अन्या दातार
मोन्सेन्टो कंपनीला विचारा असं काही तंत्र आहे का ते! ;)
7 Mar 2010 - 6:15 pm | jaypal
(भिम) टोला.
भैविष्यात काही मदत / सहकार्य लागल्यास सांगा, सिंहाचा नाही पण खारीचा वाटा तरी नक्कीच देउ.
जयपाल नांगरफाळे
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
7 Mar 2010 - 9:38 pm | अरुंधती
प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद! :-)
अरुंधती
http://iravatik.blogspot.com/
7 Mar 2010 - 11:43 pm | विसोबा खेचर
छान प्रकटन! :)
तात्या.
10 Mar 2010 - 6:40 pm | अरुंधती
तात्या, धन्यवाद! ह्या लेखावर आलेली अजून एक प्रतिक्रिया अशी : ताई, आपले शरदकाका जर मनुष्यबळविकास मंत्री झाले तर हे सहज शक्य होईल हो! :-)
अरुंधती
http://iravatik.blogspot.com/
10 Mar 2010 - 6:50 pm | परिकथेतील राजकुमार
मनुष्यबळ विकास का कुटुंब कल्याण ??
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
10 Mar 2010 - 7:20 pm | jaypal
खती दिली तर ? ;-)
मन्युष्यबळाचा वापर करुन कुटुंब कल्याणचा गुटगुटीत विकास करता येईल
सखाराम सुटणे
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
10 Mar 2010 - 8:00 pm | अरुंधती
तात्या, धन्यवाद! ह्या लेखावर आलेली अजून एक प्रतिक्रिया अशी : ताई, आपले शरदकाका जर मनुष्यबळविकास मंत्री झाले तर हे सहज शक्य होईल हो! :-)
अरुंधती
http://iravatik.blogspot.com/
11 Mar 2010 - 10:09 am | मंगेशपावसकर
नवीन लेख आठवणी ने वाचा