होतं असं कधी कधी...

अनामिक's picture
अनामिक in जनातलं, मनातलं
18 Dec 2009 - 2:07 am

मी अगदी लहान होतो तेव्हा बाबांबरोबर घडलेली गोष्टं (मी ऐकलेली). माझ्या दादाचं शाळेत नाव घालायचं होतं म्हणून बाबा गावातल्याच शाळेत गेले. तिथले कर्मचारी, शिक्षक तसे ओळखीचेच होते, त्यामुळे आधी गप्पा झाल्या आणि नंतर दादाच्या नाव नोंदणीचा फॉर्म भरायला घेतला. त्यात मुलांचं नाव काय असं विचारलं आणि बाबा गोंधळात पडले... घरी दादाला 'दादा'च म्हणत होते सगळे आणि त्यामुळे बाबा त्याचं नावंच विसरले होते... झाली का पंचाईत! सगळे कर्मचारी हसायला लागले.... नाव काही केल्या आठवेना... तेव्हा लोकांसमोर हशा तर झालाच, पण घरी नाव विचारायला आल्यावर काय झालं ते विचारू नका. होतं असं कधी कधी!

_____________

मी नुकताच शाळेत (बालकवाडीत) जायला लागलो होतो. म्हणजे चार्-आठ दिवसच झाले असतील. एक दिवस घरचा नोकर मला सायकलवर शाळेत सोडत होता, तेवढ्यात घरापासून जवळच राहणार्‍या एका डॉक्टर काकांना आम्ही दिसलो. ते त्यांच्या मुलीला मोटरसायकलवर शाळेत सोडत होते. खरंतर तिची आणि माझी शाळा शेजारी शेजारी होती. पण त्या काकांना वाटले की आम्ही दोघे एकाच शाळेत (वर्गात) आहोत. तरी बरं मी माझी शाळा पास होताना मी त्यांना म्हंटलंही 'काका माझी शाळा, काका माझी शाळा'. पण त्यांना वाटलं मी समोर दिसणार्‍या शाळेबद्दल बोलतोंय, ते पण म्हणाले... 'हो बेटा, तुझी शाळा'... आणि मला त्या नवीन शाळेत सोडलं. मला काय, लहान होतो त्यामुळे नवीन शाळेत गेलो. सकाळीच नोकराला त्या काकांनी सांगितले होते, की काही काळजी करू नको मी या दोघांना दररोज सोडत जाईन आणि न्यायला पण येत जाईन. त्यामुळे पुढचे चार्-पाच दिवस मी काकांच्या कृपेने नवीन शाळेत जात होतो. त्या नवीन शाळेतल्या बाईंना शेवटी कळालंच की मी त्यांच्या शाळेत नाव न नोंदवताच जात आहे. त्यांनी चौकशी केली मी कुणाचा आहे याची आणि म्हणाल्या की उद्या बाबांना शाळेत घेऊन ये. मी घरी येतो तर घरी माझ्या खर्‍या शाळेतून निरोप आलेला होता की मी शाळेत येतच नाहीये आणि मी सांगत होतो की उद्या शाळेत बोलावलंय. घरचे गोंधळात! शेवटी रात्री डॉ. काकांना विचारल्यावर उलगडा झाला की मी दुसर्‍याच शाळेत जात आहे म्हणून!

_____________

अजून एक अशीच ऐकलेली गोष्टं. ताई चार एक वर्षाची असेल (मी तेव्हा जन्मलोही नव्हतो). आई-बाबा तेव्हा साकळेंच्या वाड्यात भाड्याने रहायचे. शेजारी बरीच बिर्‍हाडं होती, त्यामुळे ताई नेहमीच कुणाकडेतरी खेळायला जायची. प्रत्येकवेळी विचारल्याशिवाय आई कुणालाच ताईला घेऊन जाऊ देत नसे. पण एक दिवस कुणी घेऊन गेलं नाही तरी ताई घरातून गायब झाली. आईला सुरवातीला वाटलं बाजूच्याच घरी असेल, पण मग विचारलं तर ति तिथे नव्हतीच. मग शेजारी पाजारी सगळीकडे विचारून झालं. कुणाकडेच नव्हती ताई. मग मामाकडे पाठवलं एकाला की तिथे नेलंय का कोणी म्हणून विचारयला, पण तिथेही नव्हती ताई. एक आजोबा नेहमी ताईला ते स्वतः फेरफटका मारायला जाताना घेऊन जायचे. त्यांनाही विचारून झालं. पण ताईचा कुठेच पत्ता नव्हता. आता आई चांगलीच घाबरली. बाबांना दुकानत निरोप गेला. बाबा तातडीने घरी आले. परत सगळ्यांची शोधाशोध सुरू. दोन एक तासानंतर पोलीसात जायचा निर्णय घेत होते, त्याच वेळी आजोबांना खोलीतल्या कोपर्‍यात ठेवलेल्या सुटकेसमधे काहीतरी हालचाल जाणवली. आजोबा आईला म्हणाले चेक कर, उंदीर असेल. आईने सुटकेस उघडली तर ताईसाहेब आत घामाघूम, पण निवांत झोपलेल्या आढळल्या. आणि सगळ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला.

______________

आमच्या शाळेत पोटे सर म्हणून मुख्याध्यापक होते. आणि पोटे बाई म्हणजे त्याच्या पत्नीसुद्धा शाळेतच शि़क्षिका होत्या. अर्थातच ते दोघे सरांच्या गाडीवर सोबतच शाळेत यायचे. एक दिवस शाळेत येताना चौकात ते कशासाठीतरी थांबले असावे. कामा संपल्यावर पोटेसरांनी गाडी सुरू केली, बाईंना बसायला सांगितलं. बाई बसता असतानाच त्यांनी गाडी चालवायला सुरवात केली... बाई जागेवरच पडल्या, पण सर आपल्याच तंद्रीत पुढे निघून गेले. इकडे बाई 'अहो मी पडले, अहो मी पडले' म्हणून ओरडत होत्या. सरांना मात्र बाई गाडीवर नाहीत हे शाळेत गेल्यावर कळालं. बाई कुठे गेल्या हे बघण्यासाठी ते तसेच परतले तर बाई सायकल-रिक्षातून शाळेत येत होत्या. हा किस्सा गावात येवढा फेमस झाला की शाळेतली काही कार्टी बाई किंवा सर रस्त्यात कुठे दिसले की लपून बसत आणि 'अहो मी पडले, अहो मी पडले' असे त्यांना चिडवत.

_____________

मी आठवी नववीत असेल. मराठीचा तास सुरु होता. बाई धडा वाचत होत्या. त्यात कोण्यातरी गरीब मुलांची कहाणी होती, आणि त्यांना कशी फक्तं कधीकाळी पुरणपोळी खायला मिळायची त्याबद्दल लिहिलेलं होतं. मी आपल्याच तंद्रीत होतो बहुतेक. मी ते चुकून 'कधी कधी काळी पुरणपोळी खायला मिळायची' असं वाचलं. परिच्छेद वाचून झाल्यावर माझा हात वर बघून बाईं 'काय?' म्हणाल्या तसं मी काळी पुरणपोळी कशी असते असं विचारलं आणि त्यानंतर वर्गात एकच हशा पिकला. लक्ष न दिल्याने मला फारचं लाजल्या सारखं झालं. मी हि गोष्टं विसरूनपण गेलो. बाईपण 'मी' असं विचारलं होतं हे विसरून गेल्या असाव्यात. त्यानंतर काही दिवसांनी बाई आणि माझी आई कुठल्यातरी स्पर्धेसाठी परिक्षक म्हणून होत्या. त्या दोघींची चांगली मैत्री असल्याने बाईंनी बोलण्याच्या ओघात मुलं कसा गोंधळ घालतात आणि वाचताना शब्दांची कशी चिरफाड करतात ते 'काळ्या पुरणपोळी'च्या उदाहरणासकट सांगितलं (पण त्यांनी मीच तो घोळ घालणारा असं सांगितलं नाही). काही दिवसांनी घरी काहीतरी होतं म्हणून मामाकडचे सगळे आणि काही जवळचे लोक जमले होते. जेवणे आटोपल्यावर सगळेजण हॉलमधे गप्पा मारत होतो तेव्हा आईने मुलं कशी वेंधळी असतात ते सांगताना बाईंनी सांगितलेलं उदाहरण सगळ्यांना सांगितलं आणि वरून 'अशी कशी बाई आजकालची मुलं, नीट वाचतही नाहीत' असा शेरा मारला. मी हळूच म्हणालो 'आई तो मुलगा मीच', तेव्हा आईने कपाळावर हात मारून घेतला.

_______________

इंजिनियरींग कॉलेजात असताना कॉलेजच्या आवारातच कॉलेजच्या प्रिन्सिपॉलला राहण्यासाठी एक बंगला होता. एका प्रोफेसरांनी एक दिवस शेवटचं लेक्चर जरा जास्तंच लांबवलं. संध्याकाळ होत आली होती आणि आम्ही मित्रमैत्रीणी गप्पामारत कॉलेजच्या बसस्टॉपकडे जात होतो. जाताजाता त्या प्रिन्सिपॉलच्या बंगल्या बाहेर एक माणूस पायजामा, बनियन घालून गवत साफ करत होता. तेवढ्यात एक मैत्रिण म्हणाली...'इस आदमी को पेहले भी कंही देखा है'... आम्ही सगळे त्याच्याकडे बघायला लागलो आणि सगळ्यांनाच वाटलं की खरच या माणसाला आपण पहिले कुठेतरी पाहिलं आहे. तेवढ्यात एका मित्राच्या डोक्यात ट्यूब पेटली आणि तो म्हणाला 'अबे ये तो अपने प्रिन्सि है'... आणि सगळेच हसायला लागलो. नेहमी अगदी कडक इस्त्रीच्या कपड्यात राहणार्‍या प्रिन्सिला पायजामा, बनियनमधे बघून असं झालं होतं. होतं असं कधी कधी.

_______________

हे सगळं आठवायचं कारण म्हणजे मी भारतातून परत इथं आल्यापासून अगदी वेधंळ्यागत वागतोय. आपल्याच तंद्रीत असतो एवढ्यात. मागच्या एका महिण्यातल्याच गोष्टी. एक दिवस सकाळी ऑफिससाठी ट्रेनमधे बसलो तर ऑफिसच्या स्टेशन नंतर दोन स्टेशन गेल्यावर लक्षात आलं. बर परत येताना तरी नीट उतरावं की नाही... पण नाही, परततानापण मी ऑफिसच्या नंतरच्या स्टेशनवर उतरलो. ऑफिसला पोचायला फारच उशीर झाला त्या दिवशी! एक दिवस घरी परतल्यावर सूप बनवलं... अर्धं बाऊलमधे घेतलं आणि परत भांड गॅसवर ठेऊन बेडरूमधे येऊन बसलो. कितीतरी वेळाने किचनमधे गेलो तेव्हा लक्षात आलं की गॅस बंद केलाच नव्हता. त्या सूपचं पिठलं झालं होत आणि भांड खालून जळालं होतं. मागच्याच आठवड्यातली गोष्टं, कॉफी गरम करायला मायक्रोवेव्ह ऐवजी फ्रिजमधे ठेवली आणि टायमर साठी बटण दाबायला गेलो तेव्हा लक्षात आलं! आणि परवाच सकाळी ऑफिसला निघताना लावलेला टिव्ही ऑफिसमधून घरी गेल्यावर बंद केला. म्हणायला छोट्या छोट्या गोष्टी, पण हल्ली जरा जास्तंत होतंय. कधी अनावधानाने, कधी आपल्याच तंद्रीत असल्याने, तर कधी वेंधळेपणाने असं होत असावं... तुमच्या सोबतही होतं का असं कधी कधी?

-अनामिक

विनोदमुक्तकप्रकटनविचारअनुभवविरंगुळा

प्रतिक्रिया

स्वप्निल..'s picture

18 Dec 2009 - 2:22 am | स्वप्निल..

>>हे सगळं आठवायचं कारण म्हणजे मी भारतातून परत इथं आल्यापासून अगदी वेधंळ्यागत वागतोय. आपल्याच तंद्रीत असतो एवढ्यात.

खरं कारण मला माहीती आहे ;)

आणि हो सगळेच प्रसंग मस्त आहेत .. तुला आठवते तरी मला एवढं जास्ती आठवत पण नाही .. पोटे मास्तरच नाव बर्‍याच दिवसानंतर ऐकलं .. अजुन आहे का तीथेच?

>>एक दिवस घरी परतल्यावर सूप बनवलं...

असच माझ्या बाबतीत चहा करतांना होते .. आत्तापर्यंत कमीत कमी १० वेळा मी ते भांडे जाळले आहे =))

चिरोटा's picture

18 Dec 2009 - 2:36 am | चिरोटा

सगळेच मस्त अनुभव.
शाळेत असताना मी एकदा कुकरमध्ये नुसते तांदुळ ठेवले पाण्याशिवाय तापवत ठेवले होते.तांदुळ गरम झाले झाले की आपोआप शिजतील असा समज होता.
भेंडी
P = NP

भानस's picture

18 Dec 2009 - 2:46 am | भानस

आहेत सगळे अनुभव. बाकी सुटकेस मध्ये झोपणे म्हणजे लागणच म्हणायला हवी...:) किती तरी धमाल आठवणी जागा झाल्या.

रेवती's picture

18 Dec 2009 - 3:07 am | रेवती

तुमच्या सोबतही होतं का असं कधी कधी?
आमच्या सोबत फक्त असंच होतं!;)
आता सांगत बसलं तर ग्रंथ होइल किहो!
आणि ते स्वप्निल भौ म्हणताहेत त्यांना कारण माहितीये......आम्हालाही कळू द्या!.......विकेट पडली असेल तर!:)

रेवती

स्वप्निल..'s picture

18 Dec 2009 - 3:37 am | स्वप्निल..

रेवती ताई,

:) बरोबर ओळखलस!!

स्वप्निल

रेवती's picture

18 Dec 2009 - 7:42 am | रेवती

अरे वा वा वा!!!
अभिनंदन अनामिक!
अनुभव मजेशीर आहेत. तुम्हाला स्वत:ला आलेले अनुभव (वेंधळेपणाचे) योग्य आहेत आणि आत्ता यायलाच हवेत. सगळं कसं बरोबर चालू आहे.;)
मला असे अनुभव रोज येतच असतात. आज कपभर दूध मायक्रोवेव्हमध्ये ३० सेकंदासाठी ठेवले. आलार्म झाल्यावर फ्रिज उघडून कप शोधत बसले. अश्याच प्रकारे फ्रिजमध्ये चमचे, डाव अश्या गोष्टी ठेवून इतर ठिकाणी शोधत बसते. कालच इंडियन ग्रोसरीमध्ये कोथिंबीर घ्यायची म्हणून प्लास्टिकची पिशवी घेउन त्यांच्या फ्रिजपाशी उभी राहून थोड्यावेळानं मेथी घेउन परत आले.
मी लहान असताना आम्हा भावंडांचे मित्र मैत्रिणी यांचा गलका ऐकून (व आपलीच मुले आहेत असे वाटल्याने) बाबा वैतागून रागवायला लागले. आईनं आठवण करून दिली.....ही आपली मुले नाहीत, शेजारच्या मुलांवर ओरडू नका! सगळेजण हसून बेजार झाले. असे भरपूर हास्यास्पद प्रकार आहेत.
रेवती

अनामिक's picture

18 Dec 2009 - 7:55 pm | अनामिक

ही आपली मुले नाहीत, शेजारच्या मुलांवर ओरडू नका! सगळेजण हसून बेजार झाले.

हे फार आवडल! मी पण हसत बसलोय...

-अनामिक

Nile's picture

18 Dec 2009 - 10:38 pm | Nile

असेच म्हणतो.

अभिनंदन अभिनंदन. आता असे किस्से आठवायचेच! ;)

प्राजु's picture

18 Dec 2009 - 3:27 am | प्राजु

अनामिक भौ..
हे असं कधी कधीच होतं.. पण तुमचं सारखं सारखं का होतंय ते कळलंय बरं आम्हाला. असो..
सध्या हे असे थोडेसे वेंधळे आणि सुवर्णाचे दिवस घ्या भोगून. :) या दिवसांची योग्यता या वयातच असते. ;)
- प्राजक्ता
http://www.praaju.com/

मदनबाण's picture

18 Dec 2009 - 9:19 am | मदनबाण

अनामिकराव लगे रहो... ;)

मदनबाण.....

Love is life. And if you miss love, you miss life.
Leo Buscaglia

विजुभाऊ's picture

18 Dec 2009 - 9:30 am | विजुभाऊ

मी एकदा शाळेत जाताना घराला कुलूप लावायच्या ऐवजी ते कुलूप दप्तरात घेऊन शाळेत गेलो होतो. वर्ग चालू झाल्यावर वही काढताना कुलूप हाताला लागले तेंव्हा लक्षात आले.
माझा एक मित्र रस्त्यात भेटला. तो त्याच्या बायकोसोबत चालला होता.
बोलताबोलता आणखी कोणीतरी त्याला हात केला. तो त्या व्यक्तीशी बोलताना त्याच्या स्कूटरवर बसून निघून गेला. मित्राची बायको तिथेच राहिली. ह्याच्यावर कडी म्हणजे . मित्राच्या बायकोल जेंव्हा तिच्या घरी पोचते केले तेंव्हा हे महोदय दार उघडताना म्हणाले " काय ग कुठे गेली होतीस. मी कित्ती वेळ वाट बघतोय"

मी पडलो,मी पडलो, साफ आडवा झालो.

***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

बिपिन कार्यकर्ते's picture

18 Dec 2009 - 8:11 pm | बिपिन कार्यकर्ते

जबरी... मस्त...

हा प्रतिसाद चुकून दुसर्‍याच धाग्यावर टंकत होतो... वेळेत लक्षात आलं म्हणून बरं. ;)

बिपिन कार्यकर्ते

प्रशु's picture

18 Dec 2009 - 8:15 pm | प्रशु

अनामिक भाऊ तुमचा गजनी होत चाल्लाय.. सांभाळा स्वतःला..

बाकी ताई सुटकेस मध्ये गेली पण सुटकेस बाहेरुन बंद झाली का व कशी?

तुमच्यासारखाच विसरभोळा
प्रशु

अमृतांजन's picture

18 Dec 2009 - 10:24 pm | अमृतांजन

सगळेच अनुभव मजेशीर आहेत.

"पण निवांत झोपलेल्या आढळल्या. आणि सगळ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला"
"सुटके(स)चा निश्वास" हा वाक्प्रचार कसा तयार झाला त्याचाही उलगडा झाला....

पर्नल नेने मराठे's picture

19 Dec 2009 - 6:59 pm | पर्नल नेने मराठे

मला शाळेचा किस्सा जाम आवडला.
=)) =)) =)) =))

चुचु