डिस्क्लेमरः मद्य, मद्यपान व मद्यपी यांच्याविरुद्ध तीव्र आणि टोकदार मते असणार्यांनी हे लिखाण वाचले नाही तरी चालेल. मद्यपानाचे मला काही उदात्तीकरण वगैरे करायचे नाही, जे आहे, जे पाहिले, ते सांगायचे आहे, इतकेच. चिअर्स!
चहा, कॉफी ही प्रातःकालीन उत्साहवर्धक पेये झाली की इतर पेयांचा विचार सुरु होतो. त्यातली बाटलीबंद शीतपेये तूर्त सोडून देऊ. इतर पेयांमध्ये लिंबू सरबत, कोकम सरबत आणि पन्हे हे सरताज. लिंबू सरबतात बारीक वेलदोड्याची पूड आणि बर्फाचे भरपूर खडे असले की ते अधिक चविष्ट लागते. कोकम हे तहान भागवणारे खरे, पण त्यात पाण्याऐवजी थंडगार सोडा घातला तर ते अधिक मादक लागते. आणि पन्हे तर काय, सदासर्वदा चिरतरुण. उकडलेल्या कैरीचा गर, मीठ, गूळ, वेलदोडा आणि गार पाणी ही जणू पंचमहाभुतेच असावी असा पन्ह्याचा थाट असतो. पण पन्हे पाहिजे ते गुळाचेच. हा गूळही सातारा ते निपाणी या पट्ट्यात तयार झालेला असेल तर अधिक उत्तम. फ्रीजमधल्या पाण्यापेक्षा माठातल्या पाण्याचे पन्हे पिऊन बघावे. पाणीपुरीच्या पाण्यासारखी पन्हे ही पण न मोजता प्यायची चीज आहे.
उन्हाळ्यातल्या पहाटेपहाटे फिरुन येतायेता नीरा प्यावी (का कुणास ठाऊक, नीरा म्हटल्यानंतर 'नीरा उपासाला चालते' आणि'नीरा गर्भवती महिलांना लाभदायक आहे' हेच आधी आठवते!) आणि दुपारी मीठ आणि जिरेपूड घातलेले थंडगार गोड ताक प्यावे. मठ्ठा ही बाकी ज्याची त्याची आवड. जिलेबी आणि मठ्ठ्याची इतकी लग्नजेवणे जेवावी लागली आहेत, की आता मठ्ठा म्हटले तरी आंबूस ढेकर आल्यासारखे वाटते. लस्सी ही बाकी लाजवाब. लहानपणी बेहतरीन लस्सी मिळाली ती सांगलीच्या भगवानलाल कंदीच्या दुकानातली. त्या बेताच्या दाटसर लस्सीवर चांगली भरपूर मलई आणि त्या मलईवर मुक्तहस्ताने पेरलेली काजूची भरड पूड असे. कंदीचे दुकानही चांगले तेजीत होते. कलाकंद, खाजा, पेढे असे खाणार्या खवय्यांची गर्दी असे. आता 'फॉर ओल्ड टाईम्स सेक' कधी कंदीच्या दुकानात गेलो, तर त्या अंधार्या, कुबट दुकानात अर्धा तास वाट बघितल्यानंतर भयंकर गोड आणि आंबूस ताकाचा ग्लास समोर येतो. कालाय तस्मे नमः! दुसरे काय? अशीच मस्त लस्सी मुंबईत मराठा मंदिरसमोर मिळत असे. पुण्यातल्या बापट उपहारगृहातील लस्सी 'आमच्या येथे लस्सी पीत नाहीत, खातात' या पुणेरी पाटीमुळेच अधिक प्रसिद्ध आहे. पण हे म्हणजे थोडेसे पातळ श्रीखंड खाल्ल्यासारखेच. खरी लस्सी इतकी दाट असून चालत नाही. बाकी उत्तर भारतात तर काय, जागोजागी लस्सीचे दर्जेदार ठेलेच असतात. बरेलीतली 'दीनानाथ की मशहूर लस्सी' नावाप्रमाणेच मशहूर आहे.
सांगलीतल्या पटेल चौकात 'आराम' नावाचे एक कोल्ड्रिंक हाऊस होते. (आता आहे की नाही, कल्पना नाही.) 'फालुदा' या पदार्थाची तिथेच पहिल्यांदा ओळख झाली. त्या वेळी हा टंपासभर फालुदा केवळ पाच रुपयांना मिळायचा. शिजवलेल्या शेवया, सब्जाचे बी, गार दूध आणि वर एक आईसक्रीमचा गोळा असा हा फालुदा कित्येक वर्षे आवडीने खाल्ला किंवा प्याला. दूध कोल्ड्रींक या धेडगुजरी नावाचे पेय बाकी फसवाफसवीच. धड इकडचे नव्हे, धड तिकडचे.
फालुद्याचीच सुधारित आवृत्ती म्हणजे मस्तानी. पुण्यातल्या कावरेंची मस्तानी, 'सुजाता' मधली मस्तानी वगैरे तर प्रसिद्धच आहे. दूध आणि फळे एकत्र करुन खाऊ नयेत असे आयुर्वेद सांगतो, पण आयुर्वेदाला टांगावे आणि विविध फळांचे मिल्क शेक्स प्यावेत. 'थिक शेक' हा पोटाला आनंद देणारा पण ओठांना आणि गालांना व्यायाम देणारा प्रकार मी बडोद्यात जसा पाहिला (किंवा प्याला) तसा इतरत्र कुठेच मिळाला नाही. पण हापूस आंब्याचा मिल्क शेक म्हणजे आनंदाचे डोही आनंद तरंग अशातला प्रकार. केळ्याच्या मिल्कशेकला 'मिक्सरमधून काढलेली शिकरण' असे नाव न ठेवता न्याय द्यावा. चिक्कू आणि दूध हेही जमून जाणारे काँबिनेशन. सिताफळ मी वैयक्तिक नावडीमुळे खात नाही, पण सिताफळ शेक हाही (सिताफळ आईसक्रीम किंवा सिताफळ रबडीप्रमाणे) दर्दी खवय्यांनी चाखावा असा पदर्थ, असे काही दर्दी खवय्ये सांगतात.
पण पेयाला 'पिणे' असे म्हटले की मग ते संध्याकाळचे किंवा खरे तर रात्रीचेच पिणे. मद्य, मांस आणि मैथुन हे तीन मकार माणसाचे शत्रू आहेत असे कुणी म्हणालाच (तसे म्हणणारे असतातच!) तर आपण 'शत्रूवर प्रेम करा' असे वाक्य फेकून समोरचा जाम उचलावा. 'अल्कोहोल हे स्लो पॉयझन आहे' असे कुणी म्हटलेच तर त्याला (किंवा बहुतेक वेळा तिला) 'असू दे, इथे कुणाला मरायची घाई आहे' हे 'क्लिशे' झालेले पण तरीही परिणामकारक वाक्य टाकून समोरच्या पेल्याइतकेच गार करावे.या पिण्याचेही मद्य, ड्रिंक्स आणि दारु असे तीन प्रकार आहेत. उंची ,निमुळत्या चकचकीत पेल्यातून -खरेतर चषकांतून, सोनेरी रंगाचे पेय घुटक्याघुटक्यांनी पीत वैचारिक गप्पा मारल्या किंवा 'कलांचा रसास्वाद' वगैरे घेतला तर ते मद्य होते. यालाच कार्पोरेट किंवा 'पेज थ्री' छटा दिली तर ती 'ड्रिंक्स' होतात. आणि शनिवार- बुधवार हाताला येईल त्या ग्लासांतून, प्रसंगी स्टीलच्या पेल्यातून , हाताने उचलून घातलेले बर्फाचे खडे - आणि तोही बर्फ बहुदा दुसर्या पेगनंतर संपलेला-, अर्धा सोडा, अर्धे पाणी आणि खाली अंथरलेल्या वर्तमानपत्रावर असलेला भेळेचा - 'चकण्या'- चा ढीग यांच्या साक्षीने सामान्य माणसे जे पितात ती दारु. 'अरे, समजतो काय तू आपल्याला? मनात आणलं तर होंडा घेईन!' ,'तू शब्द टाकून बघ, जीव गहाण टाकू साला आपण', 'तिच्यावर एवढं लव होतं ना आपलं, पन साली किस्मत बहुत कुत्ती चीज है' अशा वाक्यांच्या साक्षीने जनता पिते ती दारु! 'मी पितो' ही काही फारशा प्रौढीने सांगण्याची गोष्ट नाही, पण तशी 'दारु? आणि मी? आपण ते तसलं काही घेत नाही बुवा!' हेही आढ्यतेने सांगण्याचे काही कारण नाही. शेवटी
पिणार्याने पीत जावे
पाजणार्याने पाजत जावे
पिता पिता एक दिवस
पाजणार्याचे ग्लास घ्यावे
असे म्हणून ज्याला योग्य वाटेल ते त्याने /तिने करावे. जीवनाला अर्थ देणार्या गोष्टी अशा बदनाम झालेल्याच असतात. 'अच्छोंको बुरा साबित करना, दुनिया की पुरानी आदत है, इस मय को मुबारक चीज समझ, माना के बहुत बदनाम है ये' असे तो बदनाम शायर म्हणूनच गेला आहे. असो, तर हे पिणे फक्त 'नशा' म्हणून करणार्या दुर्दैवी जीवांविषयी सहानुभूती व्यक्त करुनच पहिला पेग भरावा. नशा तर आहेच. नशेमें कौन नही है मुझे बताओ जरा, किसे है होश मेरे सामने तो आओ जरा. किसी को हरे हरे नोट का नशा है, किसी को बूट सूट कोट का नशा है. मग आम्ही थोडीशी घेतली तर त्याचे काय? पण नशा ही घेणार्याच्या मनात अधिक असते हेही खरे. वरना नशा शराब में होता तो नाचती बोतल. पण हे प्रत्येक शराब्याचे जसे एक तत्वज्ञान असते तसे झाले. शराब्याला दारुडा म्हटले की बाकी अपमान झाल्यासारखे वाटते. पण न पिणार्यांबाबत बाकी पिणारे कम्बख्त तूने पीही नही अशीच भावना बाळगून असतात. 'एक कतरा मै का जब पत्थर के होटों पर पडा, उसके सीने में भी दिल धडका, के उसने भी कहा - जिंदगी ख्वाब है,' हे म्हणणार्या शैलेंद्रला आपण काय म्हणतो आहोत याचे पूर्ण भान असावे!
पिण्याची सुरुवात ही बहुदा बीअरपासून होते. बीअर म्हटल्यावर आज मद्यसम्राट मल्यानिर्मित किंगफिशर जरी आठवत असली तरी कोणे एके काळी हेवर्ड्स आणि लंडन पिल्सनर हे भाव खाऊन होते. एलपी डाएट नावाची एक सुरेख बीअर आजकाल का मिळत नाही कुणास ठाऊक! खजुराहोही फार्मात होती. खजुराहोची कडक आणि किंचित गोडसर चव ही आवडीने पिणार्यांची पसंती असे. अगदी सस्त्यातलीच प्यायची तर खोपोलीची स्ट्ड. पण तेही दिवस आता संपले. बडवायझर परदेशात जशी लागली तशी भारतात लागली नाही. कलकत्याच्या एस्प्लनेडला पाचशे लोकांच्या कलकलाटात एका टेबलवर तीन अनोळखी माणसांत बसून घेतलेली कल्याणी ब्लॅक लेबलही पुन्हा तशी लागली नाही. आता तर काय सगळ्याच विदेशी बीअर भारतात मिळू लागल्यात. उन्हाळ्यातल्या दुपारी थंडगार बीअर दुप्पट चवीची होऊन येते. मे महिन्यात अचानक हाफ डे सुट्टी मिळाली किंवा घेतली की व्हीटी स्टेशनसमोरच्या बारमध्ये दोघात तीन बीअर पिणे ही मुंबईकराची लाडकी कल्पना आहे. पण बीअर ही सूर्याला साक्षी ठेऊनच घ्यावी. रात्री तिची मजा नाही. बीअरमधून एकदा माणूस उत्तीर्ण झाला की मग हळूहळू व्हिस्की, रम, जीन, व्होडका अशी प्रगती सुरु होते. यातल्या नवनवीन चवी घेत घेत माणूस एका कुठल्या तरी ब्रँडवर येऊन स्थिरावतो. मग बाकी मागे वळून बघणे जड जाते. ब्लॅक स्टालियन, हॅवर्ड्स, ओल्ड टॅव्हर्न अशा भयानक चवीच्या व्हिस्क्या कोणे एके काळी कशा घशाखाली घातल्या याचे आता नवल वाटते. हौशी लोक नवनवीन प्रकार आजमावून बघत असतात. 'रावसाहेब, स्मिरनॉफचा ग्रीन अॅपल फ्लेवर प्याल्याशिवाय मरु नका' असा प्रेमळ दम आमच्या एका मित्राने दिला होता. पण ही वाट एकट्याची आहे. साथीदाराचा आणि आपला ब्रॅन्ड एक असला तर उत्तमच. नाही तर आपापली चपटी घेऊन बसण्याची सोय आहेच. ओल्ड मंकचा चाहता स्कॉच जरी पुढ्यात आणली तरी तिच्याकडे ढुंकूनही बघत नाही असे म्हणतात. ब्लॅक रममध्ये मॅकडावेल ही तशी बनवाबनवीच. खरी ब्लॅक रम ही फक्त ओल्ड मंकच. ओल्ड स्मगलर ही तुलनेने स्वस्त रम आता परत मिळू लागली आहे म्हणे. बकार्डी ही बाकी चैनीचा मामला. रम हे 'मॅन्स ड्रिंक' असे 'बॉबी' मध्ये प्रेमनाथ जरी म्हणत असला तरी त्याला काही अर्थ नाही. हे म्हणजे जीनला 'लेडीज ड्रिंक' म्हणण्याइतकेच बावळटपणाचे आहे. जीनमागून येऊन तिखट झालेली म्हणजे व्होडका. व्होडकातले स्मिरनॉफ हे थोराघरचे श्वान आहे. वेळीप्रसंगी रोमनॉव्हही चालून जाते. फ्युएल हा मध्यममार्ग. डायरेक्टर्स स्पेशल, बॅगपायपर, मॅकडावेल या सामान्यांच्या व्हिस्क्या. त्याच लायनीतली इम्पिरीअल ब्लू हा जरा कमी कडक मामला. रॉयल चॅलेंज, सिग्नेचर, अँटिक्विटी, ब्लेंडर्स प्राईड हे मानाचे शिलेदार. पैकी ब्लेंडर्स प्राईड मध्ये क्यालरीज कमी असतात म्हणून (प्यायचीच असली तर) मधुमेही लोकांनी ती प्यावी असा एक 'गोड' समज आहे. पण त्यात काही तथ्थ्य नसावे. व्हिस्की पिणार्यांनी बाकी अँटिक्विटी ब्लू प्याल्याशिवाय मरु नये! नरकात जागा मिळत नाही म्हणे!
स्कॉच या शब्दाच्या उच्चारापासून सगळे आकर्षक आहे. स्कॉचमध्ये पाणी, सोडा असले काही घालणे हा स्कॉचचा अपमान आहे असे दर्दी लोक सांगतात. भारतीय जिभेला बाकी 'ऑन दी रॉक्स' हे प्रकरण जडच जाते. 'तकीला' चे शॉटस असेच घ्यायचे असतात, आणि पालथ्या हातावर टाकलेले चिमूटभर मीठ चाटायचे असते (आणि डान्स फ्लोअरवर नाचायला पळायचे असते!) असेही तज्ञांनी सांगितले. मी बाकी चक्क तकीलात 'टॉनिक" टाकून प्यालो. माझ्याकडे तुच्छतेने बघणार्यांना 'पुढचा पेग दुधातून घेऊन बघू का?' असे विचारुन मी गलितगात्र करुन टाकले!
पिण्यातले मानचिन्ह म्हणजे वाईन. एका प्रचंड मोठ्या पार्टीत रेड वाईनचे चार ग्लास पिऊन वैतागून मी शेवटी व्हिस्की मागवायच्या विचारात होतो, पण त्या 'साकी'ने मला तसे करु दिले नाही.रेड वाईन रेड मीटबरोबर तर व्हाईट वाईन व्हाईट मीटबरोबर प्यावी म्हणतात. पण वाईन म्हणजे सोनिया गांधी तर व्हिस्की म्हणजे रेणुका चौधरी. वाईन म्हणजे कतरीना कैफ तर रम म्हणजे योगीता बाली. वाईन म्हणजे नादिरा तर व्होडका म्हणजे ('तुमसा नही देखा' किंवा 'गूंज उठी शहनाई' मधली) अमिता, वाईन म्हणजे वहिदा रेहमान तर जीन म्हणजे माला सिन्हा, वाईन म्हणजे... जाऊ दे!
पिण्याच्या पार्ठीत आधीआधी वातावरणनिर्मितीवरच अधिक भर असतो. फरसाण, वेफर्स, उकडलेली अंडी, खारे काजू, तंदुरी चिकन, शेंगदाणे, पापड असल्या भाऊगर्दीत ती शराब बिचारी बावरुन जाते. त्यातून सोडा ही माणसाने माणसाला दिलेली अद्वितीय देणगी सोडली तर थम्सप, स्प्राईट, लिम्का आदि मद्यार्कविरलक पेयांचीही सद्दी असते. असल्या गर्दीत मैफील जमते खरी, पण शराब खुलत नाही. खरा शौकीन एक चपटी, अर्धा लिटर सोडा, गार पाणी, दोनच भाजलेले पापड आणि दोन सिग्रेटी यावर जन्नतची सैर करुन येतो.
'पीनेका असली मजा तो अकेले पीनेमेही है' असं 'बावर्ची' मध्ये हंगलबाबूंना राजेश खन्ना सांगतो तर 'बाते करनेके लिये इतना तरस रहा था की सोचा थोडी पीकर, अपने आपसे कुछ कहूं' असं ढलणार्या दिनाला साक्षी ठेऊन राजू गाईड म्हणतो. पसंद अपनी अपनी. एखादे नवीन पुस्तक किंवा एखादे जुने गाणे याला ही सुरा जी साथ देते तिला तोड नाही. शनिवार रात्र आणि असली 'असली' मौजमजा यांचे जे गणित जमून गेले आहे, ते केवळ अफलातून आहे. थंडीच्या रात्री, एकदोनच घट्ट दोस्त, चांगली गाणी, उशीरपर्यंतच्या गप्पा, 'रम'तगमत घेतलेले दोनतीन पेग, मोजकेच पण चविष्ट पदार्थ.... सुख सुख म्हणतात ते हेच की हो!
प्रतिक्रिया
6 Dec 2009 - 6:23 pm | बिपिन कार्यकर्ते
मास्तर, सलग चारपाच दिवस कधी मोकळा वेळ आहे? :D
खानपानसेवा अगदी जोरात चालू आहे. बाकी प्रत्यक्ष हे सगळे खाणे पिणे जमेल तेव्हा जमेल पण तुमच्या या लेखमालेने बर्याच मस्त आठवणी जागवल्या... सुख सुख म्हणतात ते हेच की हो!
बिपिन कार्यकर्ते
6 Dec 2009 - 6:50 pm | श्रावण मोडक
ठरवा एकदाचं काय ते! येता बुधवार? की शनिवार? हे अवांतर नाहीये. हा खरा प्रतिसाद आहे! त्यामागचे भाव शासनकर्ते (छ्या, काय शब्द आहे हा! आणि असल्या रसील्या लेखावरच्या प्रतिसादात वापरावा लागतोय) ध्यानात घेतील, अशी आशा आहे!!!
6 Dec 2009 - 6:36 pm | पर्नल नेने मराठे
न बोललेलेच बरे 8| :|
चुचु
6 Dec 2009 - 6:58 pm | रेवती
हेच म्हणते.
न बोललेले बरे!
रेवती
6 Dec 2009 - 6:44 pm | अमृतांजन
जुनी दारु नव्या बाटलीमधे पुन्हा. न राहवून पुन्हा एकदा प्रतिसाद्रुपी हे चिंतन-
आज मला सगळे ते हवे-हवेसे वाटते
आहे मादक ते सगळे प्यावेसे वाटते
रिचवले पेले फुल्ल भरुन हे असले एव्हढाले
अग बाई, हे काय, हे तर आजच आले वाटते?
खोटंच हसत म्हणालो, "धुंदीत मजा असते"
पण मीच घेते, का तुला घेणे नकोसे वाटते?
सावली माझी म्हणे, "आराम थोडा दे मला,
सारखे झिंगणे तुझ्या सारखे नकोसे वाटते!"
आण काही तू नवे आता, बाटल्या नको त्या जुन्या
तेच-तेच शेंगदाणे नि मांचोरीयन नकोसे वाटते
थंडीत घेतात का ती ब्रॅंडी भरपुर व सारखी?
औषध जरी असले तरी एकटे पिणे नकोसे वाटते!
6 Dec 2009 - 6:52 pm | chipatakhdumdum
उत्क्रुष्ट लेख्..१०/१० मार्क..
( हा क्रु कसा लिहायचा)
6 Dec 2009 - 7:11 pm | चतुरंग
कोणे एकेकाळ बिअरच्या यत्तेतून उत्तीर्ण झालो पण नंतर पुढच्या यत्तात काही राम वाटेना म्हणून शाळा सोडून दिली! :D
त्यामुळे पीएचडी, डबल डॉक्टरेट अशा लोकांत आपले काम नव्हे, आपली प्रगती 'मधुशालेचे' भाषांतर करण्यापर्यंतच!
पण तरीही लेख वाचला, मद्यप्रेमीने लिहावा तसा चांगला लिहिलाय.
(यत्ता पहिली)चतुरंग
6 Dec 2009 - 7:39 pm | गणपा
>>आयुर्वेदाला टांगावे आणि विविध फळांचे मिल्क शेक्स प्यावेत.
जे बात.
सन्जोपराव मस्त जमलय पेयपान. :)
--(शत्रूवर प्रेम करणारा)- गण्या
6 Dec 2009 - 7:52 pm | घाटावरचे भट
वा वा... मस्त लेख. बियर ते अॅब्सिंथ असा प्रवास डॉळ्यांपुढे तरळून गेला...
- (ब्ल्याक लेबल) भट
बाकी दुधापासून बनवलेली पेये हा आपलाही वीकपॉईंट. ज्यूसची वेगळी गोडी असली तरी मिलकशेक ते मिलकशेक. एकदा मथुरेला गेला असताना भर थंडीत एका अस्सल उत्तरप्रदेशी भैय्याच्या ठेल्यावर सकाळ सकाळ गरमागरम दूध प्यालो होतो. त्याची सर तर आजतागायत कुठल्याही पेयाला आली नाही.
- (मिल्कशेक प्रेमी) भट
6 Dec 2009 - 8:00 pm | स्वाती२
छान लेख! माझी धाव मात्र मॉकटेल इतपतच.
6 Dec 2009 - 10:27 pm | चतुरंग
जुलैच्या भारतवारीत गुडगावच्या बीकानेरवालाकडून लस्सी आणली. मडक्यात बंद करुन दिलेली. रात्री १२ वाजता मस्त हिरवळीवर बसून प्यायलो. व्वा भई! ज ह ब ह र्या हा चव होती!!
बीकानेरवाले दी लस्सी दा ज्वाब नहीं!!
चतुरंग(पाजी)
7 Dec 2009 - 1:02 am | मदनबाण
वाचतोय...
मदनबाण.....
Love is life. And if you miss love, you miss life.
Leo Buscaglia
7 Dec 2009 - 1:20 am | प्रभो
मस्तच संजोप राव..लै आवडला भाग आपल्याला........
(पाणिपुरीचं पाणी,निरा, मठ्ठा, हेवर्ड्स्,आर सी,आय बी,स्मिरनॉफ,टकिला,मार्गरिटा आणी सध्या करोना वर प्रेम असलेला)प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
7 Dec 2009 - 7:19 am | संदीप चित्रे
एक से एक बढिया पेयांबद्दलचा लेख खूप आवडला.
ह्यातली काही पेयं आवडत नाहीत आणि काही प्यावीशी वाटत नाहीत पण तरीही हा लेख इतका आवडलाय तर पूर्ण पियक्कडला तर खूपच आवडेल ह्यात वादच नाही :)
7 Dec 2009 - 7:58 am | वेदनयन
एक बरस में, एक बार ही जगती होली की ज्वाला,
एक बार ही लगती बाज़ी, जलती दीपों की माला,
दुनियावालों, किन्तु, किसी दिन आ मदिरालय में देखो,
दिन को होली, रात दिवाली, रोज़ मनाती मधुशाला।।
आणी
पित्र पक्ष में पुत्र उठाना अर्ध्य न कर में, पर प्याला
बैठ कहीं पर जाना, गंगा सागर में भरकर हाला
किसी जगह की मिटटी भीगे, तृप्ति मुझे मिल जाएगी
तर्पण अर्पण करना मुझको, पढ़ पढ़ कर के मधुशाला।
अर्थातच मधुशाला - हरिवंश राय बच्चन
7 Dec 2009 - 8:30 am | sujay
खरी ब्लॅक रम ही फक्त ओल्ड मंकच
ह्या वाक्याल +१०००००
ईजीनीयरींगच्या तमाम पब्लीकची हिच पहली मोहब्बत असते.
ओल्ड मंकची मजा खरा दर्दी रसीकच जाणे.
लेख खलासच.
चीअर्स !!!
(ग्लेनफिडीचप्रेमी)
सुजय
7 Dec 2009 - 9:49 am | प्रकाश घाटपांडे
कधी कधी रात्रीच्या अनेक पेयांच्या व खाद्यांच्या माहोल मधुन दुसर्या दिवशी बुळकांडी लागते. अशा वेळी इराण्याच्या हॉटेल मधे शिकंदर सरबतचा एक पेग नीट मारावा. लगेच बुच बसतय असा अनेकांचा अनुभव आहे.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
7 Dec 2009 - 10:52 am | धनंजय
लेख आवडला
7 Dec 2009 - 12:19 pm | विजुभाऊ
एकूण लिखाण हल्ली फारच पांचट होउ लागलय. निखालस पणे सांगायच तर हा लेख लेखकाच्या नेहमीच्या हातखंड्याच्या अगदीच विरुद्ध क्वालीटीचा आहे. अपेक्षाभंग झाला.
प्रत्येक मद्याला वेगळीच जातकुळी असते.
वाईन , व्होडका , व्हिस्की , रम , बीयर या प्रत्येकाची ढंग वेगळे असतात. चवीने पिणारासाठी त्यांचे सर्व कराय्चे थाटमाट ही निराळे असतात. साजर्या करायच्या वेळा / प्रसंग निराळे असतात
या बद्दल काहीच लिहिले नाही. कदाचित अनुभवाचा अभाव असावा.
असो.
7 Dec 2009 - 7:30 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
एकूण लिखाण हल्ली फारच पांचट होउ लागलय. निखालस पणे सांगायच तर हा लेख लेखकाच्या नेहमीच्या हातखंड्याच्या अगदीच विरुद्ध क्वालीटीचा आहे. अपेक्षाभंग झाला.
सहमत आहे. विजुभौ, मनातला प्रतिसाद टंकल्याबद्दल आभारी.
-दिलीप बिरुटे
जिस जगह हम हों, वहां गर तू न हो, तो कुछ नही !
और जहा तू हो, वहां काबू न हो, तो कुछ नहीं !! -जफर
7 Dec 2009 - 11:23 pm | अनाडि
एकूण लिखाण हल्ली फारच पांचट होउ लागलय
हम्म...चालायचच विजुभाऊ.
वैयक्तिक टीकाटिप्पणी केलेला भाग संपादित. कृपा करून मतप्रदर्शन फक्त लेखनावर असावे. एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी नको.
अनाडि.
अब्दुल नारायण डिसुझा
8 Dec 2009 - 12:01 pm | टारझन
संजोपराव लेख आवडला :)
वैयक्तिक टीकाटिप्पणी केलेला भाग संपादित. कृपा करून मतप्रदर्शन फक्त लेखनावर असावे. एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी नको.
7 Dec 2009 - 7:09 pm | jaypal
अंशतः सहमत.
लिखाणात हात आखडता घेतल्यासारखा वाटला.
असो "सिंगल माल्ट" ही भारतीय व्हिस्की पण खुप छान आहे. ट्राय करुन पहा.
7 Dec 2009 - 7:27 pm | रामदास
खरं आहे भाऊ.
बियर कॉलेजातल्या मैत्रीणीसारखी. दुपार टळण्या इतपत प्यावी.
रम कॉलेजातल्या मित्रासोबत प्यावी.
दोस्तीचा वास्ता देत अनेक वादे ओरडून ओरडून द्यावेत आणि दुसर्या दिवशी विसरून जावेत. रीयुनीयनच्या मिटींगला प्यायचा आयटम.
व्होडका पिण्याचं वय असतं.भलत्या सलत्या वयात पिण्याचं पेय नव्हे ते.दोन पेगाच्या वर व्होडका विरार लोकलसारखी सुसाट धावते. अंधेरीवाल्या प्यासेंजराला उतरू देत नाही.थेट बोरीवली.
व्हिस्कीचं दु:ख काय सांगू . इंडीयन व्हिस्कीनी जे काय केलं आहे त्याची तुलना फक्त गुलशन कुमारनी जे जुन्या गाण्याचं पोतेरं केलं त्यासोबत करावी.
स्कॉचला सोबत सुध्दा तोलामोलाची असावी लागते. नवरात्रीच्या गरब्यात गायचं गाणं नव्हे बा ते.असली ख्याल गायकी आहे बा ती. घड्याळाकडे न बघता गायची चिज आहे.फक्त नव्या गायकानी गायली तर द्रुत गाताना तराण्याचा भास होतो.लतीया टकट टारे गींगीं.
बाकी वाईन प्यावी तर घरीच. फोन काढून बंद ठेवावा. मुलांना मामाकडे पाठवावं.चखणा घरचाच असावा. एखादी बाटली संपल्यावर हॉलमध्ये टिव्ही चालू ठेवून आपण बेडरूमात जावं .फेमीना चाळणार्या बायकोला मनोहर कहानीया सांगाव्या. आपला पेला तिच्याकडून उष्टावून घ्यावा. वाईन रक्तात फिरायला लागली की मग विरघळून चंद्र आज रक्तातून वाहे..असं बोबडं बोलत निळा दिवा लावावा.आणि विजूभाऊ काय सांगू तुम्हाला.
शँपेनसाठी आजही निमीत्त गावलेले नाही.
मर्यादीत पिणारा
रामदास
7 Dec 2009 - 7:36 pm | चतुरंग
बाकी वाईन प्यावी तर घरीच. फोन काढून बंद ठेवावा. मुलांना मामाकडे पाठवावं.चखणा घरचाच असावा. एखादी बाटली संपल्यावर हॉलमध्ये टिव्ही चालू ठेवून आपण बेडरूमात जावं .फेमीना चाळणार्या बायकोला मनोहर कहानीया सांगाव्या. आपला पेला तिच्याकडून उष्टावून घ्यावा. वाईन रक्तात फिरायला लागली की मग विरघळून चंद्र आज रक्तातून वाहे..असं बोबडं बोलत निळा दिवा लावावा.
क्या बात है! रामदासभौ असे वाचता वाचता झिंग आणणारं लिहितात की आमच्यासारख्यांना प्यायची गरज भासू नये! ;)
(अजिबात न पिणारा)चतुरंग
7 Dec 2009 - 7:45 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्रत्येक मद्याला वेगळीच जातकुळी असते. वेळ,सहकारी, प्रसंग,संगीत, या आणि अशा कितीतरी गोष्टींची संगत 'चिअर्सची' नजाकत वाढवतात. अर्थात अनुभव असला तर तो शब्दातून सहज येतो. उगाच ओढून ताणून ब्रँडची नावे लिहून मैफील रंगवता येत नाही.
-दिलीप बिरुटे
8 Dec 2009 - 2:01 am | संदीप चित्रे
काय प्रतिसाद आहे... लै म्हणजे लैच आवडला.
ह्या प्रतिसादाचा एक झक्कपैकी लेख करा अजून थोडे तपशील वाढवून ... वाट बघतोय.
8 Dec 2009 - 10:00 am | विजुभाऊ
रामदासभौ ...खरय तुमचे.
बडा ख्याल ऐकत स्कॉच पिताना कशाची नशा असते तेच उमजत नाही.
आहाहा.....
8 Dec 2009 - 10:20 am | प्रकाश घाटपांडे
वा रामदास! अशा लिखाणामुळे आपल्याविषयी असुयायुक्त आदर वाढतो आहे
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
14 May 2014 - 12:37 pm | यसवायजी
आपला पेला तिच्याकडून उष्टावून घ्यावा. वाईन रक्तात फिरायला लागली की मग विरघळून चंद्र आज रक्तातून वाहे..असं बोबडं बोलत निळा दिवा लावावा.
_/\_ दंडवत. :)
7 Dec 2009 - 10:38 pm | मिसळभोक्ता
खरा शौकीन एक चपटी, अर्धा लिटर सोडा, गार पाणी, दोनच भाजलेले पापड आणि दोन सिग्रेटी यावर जन्नतची सैर करुन येतो.
अगदी खरे बोललात.
-- (शौकीन) मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
7 Dec 2009 - 10:59 pm | मेघवेडा
मस्तच!!
किती छान वर्णन केलंय राव! एखाद्या आशिकानं आपल्या सजणीचं वर्णन करावं अगदी तसं!!! तुमचं मद्यप्रेम लेखाच्या थेंबाथेंबातून डोकावतंय!! छा गये गुरु!!!
मजा आली वाचायला!
--
(किंगफिशर पासून सुरुवात करून पुढे सिग्नेचर, स्मरनॉफ, जेडी, बकार्डी अशा प्रत्येक 'सुरे'च्या प्रेमात पडलेला आणि सध्या पुन्हा 'बियर' घराण्याच्या 'क्रोनेनबर्ग' या विदेशी कन्येशी सलगी केलेला) पेगवेडा!!
8 Dec 2009 - 12:07 am | मुक्तसुनीत
अगदी हेच म्हणतो ! :-)
7 Dec 2009 - 11:49 pm | अक्षय पुर्णपात्रे
श्री राव, पेय पदार्थांचे चांगले संकलन. अल्कोहोल असलेली व नसलेली पेये यांच्यासाठी स्वतंत्र लेख लिहिता आला असता. असो.
ओल्ड मंक भारतात असतांना पीत असे पण अमेरिकेत आल्यानंतर 'कॅप्टन मॉर्गन प्रायवेट स्टॉक' ही रम अत्यंत आवडू लागली.
8 Dec 2009 - 10:59 am | प्रकाश घाटपांडे
वा वा! नीरा हे आमचे अत्यंत आवडते पेय.स्वत:ही प्यावी व इतरांनाही प्रेमळ जबरदस्तीने पाजावी असे हे पेय.याची व्युत्पत्ती 'नीर' या शब्दापासुन झाली असावी असा आमचा ठळक कयास आहे.ताड या झाडापासुन ताडी बनते तसे नीर या झाडापासुन नीरा बनत असावी असा भाबडा विचार आमच्या मनी येत असे.पण ती शिंदी नावाच्या झाडाच्या रसगळतीतुन होते असे कुणीतरी ध्यानी आणुन दिले. कारमधुन उतरुन नीरा पिणारी गर्भवती स्त्री एकदाच/ची दिसली आणि पाटीच चीज झाल्याचा आनंद विक्रेत्यापेक्षा आम्हालाच जास्त झाला. 'नीरा उपासाला चालते' याचा अर्थ आम्ही उपास करणार्या सहकार्यांना उपासाला दुसर काही चालत नाही असा करुन देउन नीरा पिण्यासाठी प्रवृत्त करीत असु. आमच्याकडुन सहकार्यांना नीरा मोफत व अनीवार्य असल्याने सहकारीही कुर कुर न करता पीत असत.
पुण्यात नीरेचे एवढे स्टॉल्स असतात कि हल्ली आम्हाला शंका येउ लागली कि ही नीरा खरेच झाडापासुन काढतात का?
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
8 Dec 2009 - 3:07 pm | विंजिनेर
अगदी!
कुठेशी ऐकलं होतं की कुणा एकीला बागेतला प्रेमळ (माळी)म्हातारा आज्जा पहाटे चार वाजता काढलेली ताजी निरा दररोज घेऊन यायचा. मी ते आपल्या बाबतीत कधी घडेल ह्याचं स्वप्न अजून बघतोय :)
असो. बाकी सुरापानाचे अनुभव ठीक.
8 Dec 2009 - 11:07 pm | अभिज्ञ
दर्जेदार लेख.
ब-याच दिवसानी सुंदर लेखन वाचायला मिळाले.
अभिनंदन रावसाहेब.
अभिज्ञ.
10 Jul 2012 - 3:27 pm | मन१
उत्खननादरम्यान सापडलेला चविष्ट लेख.
10 Jul 2012 - 6:37 pm | सोत्रि
मनोबा,
खुप आभार हा लेख उत्खनन करून वरती आणल्याबद्दल!
-( मद्यप्रेमी) सोकाजी