पुन्हा एकदा डिस्क्लेमरः सदर लेखात उल्लेखलेल्या चवी या लेखकाच्या वैयक्तिक आवडीनिवडी आहेत.
वाचकांची मते त्यांच्याशी जुळतील असे नाही. तसा आग्रहही नाही.Bon Appétit!
'भूक लागली की खाणे ही प्रकृती, आपल्यातले अर्धे दुसर्याला देणे ही संस्कृती आणि भूक नसताना खाणे ही विकृती' अशा चमत्कृतीजन्य फालतू सुभाषितांनी इतिहास भरलेला आहे.पोटभर नाश्ता केला की 'सलाड आणि ग्लासभर ताक' असले हलकेफुलके जेवण करावे हे पथ्यकर वाक्य डोळ्याआड करावे आणि दुपारचे अस्सल म्हराटी जेवण घ्यावे. दुपारचे जेवण अंगावर येऊ नये हे खरे, पण म्हणून दुपारी अर्धपोटी राहाणे हेही काही खरे नाही. आठवडाभर कचेरीत घाम गाळून कर्तव्यपूर्तीचे समाधान मिळवले की रविवारी दुपारी चाखतमाखत जेवायला आपण रिकामे होतो. शनिवारी रात्री पार्टी व्हावी आणि रविवारी दुपारी मेजवानी. रविवारी दुपारी सुस्ती उतरली की मग क्यालरीबिलरीजचा विचार सुरु करावा. त्यामुळे रविवारचे दुपारचे जेवण याला केवळ शनिवारचे पापक्षालन इतकेच अस्तित्व असू नये. इथे मग मुख्य कलाकार म्हणून भाकरी की चपाती हा वाद संभवत नाही. चपाती किंवा भाकरी, भाजी, वरण किंवा आमटी, कोशिंबीर आणि भात हे दुपारचे जेवण जमून जाते. 'पोळी' ही अॅनिमिक भाजीबरोबर डब्यातून न्यायची सोय आहे, तर चपाती ही मांडी घालून बडवायची हौस आहे. बाकी ही चपाती आपल्या काकांसारखी. सदैव बेरजेचे गणित मांडणारी. तूप घातलेल्या काकवीबरोबर संसार मांडणारी, तशीच भाजी - मटण- चिकन यांच्याबरोबरही जमून जाणारी. दुपारच्या जेवणात जाडसर खरपूस डागाच्या चपातीवर तूप असावे. एकवेळ तूप नसले तरी चालेल, पण चपातीबरोबर दमदार चवीची भाजी पाहिजे. बटाट्याची डोसाभाजी डोशात कितीही चविष्ट लागत असली तरी दुपारच्या जेवणात चपातीबरोबर आली की ती थकलेल्या गृहीणीची आयत्या वेळची तडजोड वाटते. एकंदरीतच बटाटा हे फसलेल्या स्वयंपाक नियोजनाचे द्योतक आहे. ज्यांना होस्टेल आणि मेस हे शब्द परिचयाचे आहेत, त्यांना बटाटा हा जिन्नस काही दु:खद दिवसांची याद दिलवून जातो. कोबी- फ्लॉवर हेही शहरी संस्कृतीचा आब राखून जगणारे गृहस्थ. बटाट्याच्या रसभाजीत फ्लॉवर खपून जातो खरा, पण तोही धर्मांतर करुन पवित्र झाल्यासारखा. भाजी खरी असावी ती देशीच. 'भाजीत भाजी मेथीची, अमकी माझ्या प्रीतीची' हे काही नाव घेण्यापुरतेच नाही. पीठ पेरुन केलेली मेथीची गोळाभाजी प्रसंगी अंडा बुर्जीला अस्मान दाखवून जाते.
'मला पालेभाजी आवडत नाही' असे अभिमानाने सांगणार्याला आपण दयेशिवाय काय देऊ शकतो? मेथी, पालक, राजगिरा, चाकवत यांच्या गोळाभाज्या असोत की रसभाज्या, त्यांना एक दणकेबाज मराठी चव असते. अर्थात पालेभाजीने रसना उत्तेजितच नव्हे तर तृप्त व्हायला करणारीचा (किंवा गणपासारख्या करणार्याचा) हात सुगरणीचा पाहिजे. पालेभाजी म्हणजे 'मिनरल्स आणि फायबर्स' डोळ्यासमोर ठेवून केलेली तडजोड नव्हे. ते शाकाहाराचे एक स्वतंत्र मानचिन्ह आहे. बाकी पालेभाजी भाकरीबरोबर जशी लागते, तशी चपातीबरोबर लागत नाही. भाकरी- मग ती ज्वारीची असो, बाजरीची असो, की तांदळाची - ती पालेभाजीला मस्त साथ देऊन जाते. बाजरीची तीळ लावून केलेली भाकरी, लेकुरवाळी भाजी, लोणी आणि ताजे ताक यासाठी आल्हाददायक हिवाळा संपवून रखरखीत उन्हाळ्याची चाहूल देणारी संक्रांतही चालेल असे वाटते .त्या मानाने अंबाडी, चुका, शेपू, अळू या दुय्यम समजल्या जाणार्या पालेभाज्या. अळू तर पात्रता फेरीतून एकदम फायनललाच जावे तसा श्राद्धापक्षांतून एकदम लग्नाच्या पंगतीतच जाऊन बसला आहे. पण पुणेरी अळूचे जोशींच्या वड्यांसारखे जरा अवास्तवच कौतुक झाले आहे. सुक्या खोबर्याचे तुलडे घालून केलेले अळूचे फतफते भाताबरोबर लागते बरे, पण दणकेबाज पालेभाजीची गंमत त्यात नाही. कांद्याच्या पातीची पीठ पेरुन केलेली भाजी आणि तव्यावरुन डायरेक्ट पानात आलेली भाकरी हे कसे न मोजता खायचे काम आहे. सोबत शेंगदाण्याची जाडसर वाटलेली चटणी असली तर क्या कहने!
फळभाज्यांमध्ये बटाटा, कोबी आणि फ्लॉवर हे सपक फिरंगी तिरंगी सोडले तर इतर भाज्या डोंबारणीच्या उफाड्याच्या पोरीसारखे 'उम्फ' घेऊन येतात. भरल्या वांग्याची शेंगदाण्याचे कूट, काळा मसाला, कांदा, कोथिंबीर, मीठ, गूळ आणि लालभडक तिखट घालून केलेली भरली भाजी एखाद्या आजारी माणसाचीही वासना चाळवून जाईल. घाटावर ब्राह्मणेतर कुटुंबांत वांग्याची अशी भाजी वांग्याच्या देठांसकट करतात. या भाजीत गूळ नसतो आणि मसाल्याचे तिखट कंजूषी न करता पडलेले असते. त्यातले ते शिजलेले आणि मसाल्यात मुरलेले देठही एक वेगळी चव देऊन जाते. दोडक्याला 'करोगेटेड बॉक्स' म्हणून हिणवणार्या पुळचट नागर जनांकडे येशू ख्रिस्ताच्या भूमिकेतून पाहावे. दोडक्याच्या शिरांच्या चटणीच्या कौतुकात मूळ देशी दोडक्याचे मूल्यमापन हरवले आहे. वांग्यासारखीच दोडक्याचीही भरुन भाजी करावी. बेताच्या रसात बेताचीच शिजलेली ही मसालेदार भाजी चवीने खाणार्याला 'त्या' देणार्यानेच 'टेस्ट बडस' चे एक जादा पाकिट दिलेले असते. चवीने खाणारा अशा चटकदार भाजीत मटण मसाल्याचे रुप बघतो. अशीच वंचना गवार आणि पडवळाच्या वाट्याला येते. गवारीची शेंगदाणे घालून केलेली सुकी भाजी किंवा गोळे घालून केलेली रसभाजी यांना तोड नाही. गवारीच्या जोडीलाच विविध प्रकारच्या शेंगा येतात. श्रावणघेवड्यापासून फरसबीपर्यंत या शेंगाचे विविध प्रकार अगदी मंडईत खरेदीला गेल्यापासून आल्हाद देणारे. 'तूपघेवडा' नावाचा एक घेवड्याचा गावठी प्रकार असतो, त्याची तुपकट भाजी आता फक्त आठवणीत राहिली आहे. शेंगांच्या उल्लेखाबरोबर आठवते ते शेवग्याचे नाव. शेवग्याच्या शेंगा म्हणे औषधी असतात. असेनात का बापड्या! पण तुरीच्या डाळीच्या आमटीतल्या शेवग्याचा शेंगा सगळे टेबल म्यानर्सबिनर्स गुंडाळून ठेवून चोखून खाताना मला तरी असले काही आठवत नाही.
पडवळ त्या मानाने जरासे दुधी भोपळ्याच्या वळणावर जाणारे. पडवळाची रसभाजी हल्ली फारशी कुणाला ठाऊक असत नाही. भिजवलेल्या हरभर्याची डाळ घातलेली ही भाजी एक वेगळीच चव देऊन जाते. तशीच अवस्था भेंडीची आहे. 'भेंडी' हा शब्द काही फारशा चांगल्या अर्थाने वापरला जात नाही. त्यातल्या त्यात भेंडीची भाजी म्हणजे फारफारतर काचर्या करुन केलेली सुकी भाजी. पण भेंडीची रसभाजी खाल्ल्लीय तुम्ही? भेंडीचा बुळबुळीतपणा जावा म्हणून त्या भाजीत चिंच, आमसुल नाही तर लिंबाचा रस घालतात. ही भाजी जराशी गोडसर असते. गरम भात, तूप आणि भेंडीची ही अशी भाजी हे रात्रीचे जेवण असावे. असे ऊनऊन जेवावे आणि लवकर पांघरुणात गडप व्हावे. बाहेर जोरदार पाऊस किंवा कडाक्याची थंडी असेल तर काय, सोने पे सुहागाच! दहीभेंडी हाही एक जमून जाणारा प्रकार. हल्ली हाटेलात बुंदी रायता नावाचा एक भयानक गिळगिळीत पदार्थ देतात. मुळातच शेळपट पुरुषाने लग्नानंतर आक्रमक बायकोपुढे अगदी पोतेरे पोतेरे होऊन जावे तसला हा पदार्थ. दहीभेंडीतली भेंडी बाकी दह्यातही आपली अस्मिता जपून असते. सामान्यांचे पडवळाहून नावडते म्हणजे कारले . पण कारल्याच्या कडवटपणालाच त्याचा 'यू एस पी' बनवणारी सुगरण मिळाली तर कारल्याची भाजी अपरिमित आनंद देऊन जाते. ढबू मिरचीची (याचे सिमला मिरची असे नामकरण करणार्यांचा निषेध असो!) पीठ पेरुन केलेली भाजीही सुरेख लागते. फक्त घास कोरडा होऊन तोठरा बसण्याची शक्यता असते. यावरही उपाय आहे. सोबत वाटीभर गोड दही घ्यावे. साईचे असल्यास अधिक उत्तम. भाजीची चव द्विगुणित होते. डिंगरी हा शहरातला शब्द झाला. गावाकडे याला 'मुळ्याच्या शेंगा' म्हणतात. शेपूसारखीच ही अत्यंत उग्र वासाची भाजी - बर्याच लोकांना न आवडणारी. पण कोवळ्या डिंगर्यांची शेंगदाणे घालून केलेली भाजी ज्यांना आवडते त्यांना ती कोळंबीच्या कालवणासारखी चटकदार वाटते. त्या मानाने तोंडली, नवलकोल, ढेमसे, आर्वी वगैरे रणजी खेळणारे खेळाडू. शेवग्याच्या पानाची भाजी आणि ओल्या हरभर्याच्या पानांची भाजी हे अगदीच दर्दी खवय्यांचे काम. केळफूल आणि हादग्याचा फुलांची भाजी हेही त्याच लायनीतले मेंबर. हादग्याच्या फुलांची भाजी करताना त्यातले 'नर' काढून टाकावे लागतात, नाहीतर ती भाजी कडू होते. लहानपणी शेतातून असली फुले गोळ करुन आणायची आणि त्यातले नर काढून ती भाजीसाठी द्यायची हे आवडीचे काम होते. बेसन घालून केलेली हादग्याच्या फुलांची भाजी आता कोठे मिळेल बरे?
होस्टेलच्या मेसला रोज रात्री उसळ असे. ही योजना ज्याने सुरु केली त्याचे कल्याण असो. कडधान्यांची उसळ ही भाज्या महाग झाल्यावर करायची तडजोड नाही. उसळींचे शाकाहारात एक स्वतंत्र स्थान आहे. पण उसळी खाव्यात त्या चवीसाठी. फक्कड उसळीचा चमचमीत घास घेताना कुणी 'प्रोटीन्स' हा शब्द उच्चारला तर दाताखाली खडा आल्यासारखे वाटते. मटकीची उसळ मिसळीसाठीच अधिक प्रसिद्ध आहे, पण खर्या कोल्हापुरी मिसळीत (पोह्यांसारखेच) तिला स्थान नाही. हल्ली ढाब्याढाब्यांवर 'आख्खा मसूर' नावाची एक उसळ मिळते. कोणत्याही गोष्टीचा सतत कंटाळा येणार्या आणि 'साधे वरण' ही पाककौशल्याची कमाल मर्यादा असणार्या सपक पोरींच्या नवर्यांना कधीतरी अस्सल जेवायला मिळावे म्हणून केलेली ही सोय आहे. बाकी हाटेलात जाऊन उसळी खाणे हे हाटेलात पोहे खाण्याइतकेच निरर्थक आहे. मसुराला मोड आणता येतात, त्याने कदाचित त्यातली पोषणमूल्येही वाढत असतील; पण बिनमोडाच्या मसुराची लसूण घालून केलेली उसळ जशी चविष्ट लागते, तशी मोडाच्या मसुराची लागत नाही. वाटाण्याचेही तसेच आहे. पण काळा वाटाणा आणि हरभर्याची उसळ बाकी मोड आणूनच करावी. हरभर्याच्या उसळीवर तेलाचा 'कट' पाहिजे, आणि काळ्या वाटाण्याच्या उसळीत ओले खोबरे. काळसर वाटाणे, त्यांचे शुभ्र, फडफडीत मोड, लालभडक रस्सा आणि त्यावर परत पांढरेशुभ्र खोबरे ही रंगसंगतीच भूक दुप्पट करणारी आहे. मूग पचायला सोपे असतात म्हणे. असोत बापडे. मुगाची भरपूर लसूण आणि कोथिंबीर घालून केलेली घट्ट उसळ खाताना असले काही आठवू नये. चवळी किंवा अळसुंदाची रस्सेदार उसळ अशीच मजा आणून जाते. राजमा आणि छोले बाकी त्या मानाने परके वाटतात. आम्लपित्ताची आठवण करुन देणारेही.
आमटी ही तर मराठी जेवणाची शोभा आहे. 'भातपिठले' आणि 'भातआमटी' यातले सरसनिरस ठरवणे अवघड आहे. तुरीच्या (चिंचगूळ घातलेल्या) आमटीबरोबर साधा भात पाहिजे आणि कटाच्या आमटीबरोबर पुरणपोळी. कोवळ्या हरभर्याची - ज्याला गवाकडे 'सोलाणा' म्हणतात- झणझणीत आमटी आणि गरम भाकरी हे असेच एक दिलखेचक कॉम्बिनेशन आहे. दुसरी प्रसिद्ध आमटी म्हणजे शेंगदाण्याची. वरईच्या किंवा भगरीच्या जोडीला येणार्या शेंगदाण्याच्या आमटीने उपवासाचे सार्थक होते. टोमॅटोचे सार ही बाकी शुद्ध फसवाफसवी आहे. सार खरे ते आमसुलाचे. आजारपणातून उठलेल्या माणसाचा आहार म्हणून किंचित बदनाम झालेले , पण एकदम भूक चाळवणारे. त्यातली तुपाची फोडणी, जिरे आणि कढीलिंब यांचे आमसुलाशी असे काही जमून जाते, की ज्याचे नाव ते! कढीही अशीच मजा आणून जाते. हल्ली कढीत कसल्याकसल्या भजी, काकडीचे तुकडे.. काय वाट्टेल ते घालतात. अस्सल कढीला असले काही नखरे लागत नाहीत. कढी, खिचडी, तूप, मेतकूट, पापड .. फारफारतर लिंबाचे लोणचे. 'माणसाला किती जागा लागते?' या धर्तीवर 'जगात सुखी व्हायला फार काय लागते?' असा प्रश्न पाडणारे हे जेवण . पण खिचडी-कढी ही खरी तर हिवाळ्यातल्या रात्रीची मजा.
मराठी जेवणात 'डाव्या उजव्याला' फार महत्व आहे. चटणी, लोणचे, मीठ, लिंबू आणि कोशिंबीर हे अस्सल मराठी थाळीतले मानाचे शिलेदार. शेंगदाणा, लसूण, कारळे, जवस, तीळ, दोडक्याच्या शिरा या तर नेहमीच्या चटण्या झाल्या. उन्हाळ्यात गूळ, तिखट, मीठ घालून केलेल्या कैरीच्या चटणीच्या आठवणीने तोंडाला चळचळून पाणी सुटते. तसेच काहीसे कवठाच्या चटणीबाबत. पण कवठाची चटणी ही जेवणात खाण्याची गोष्ट नव्हे. कवठाची चटणी तशीच खावी आणि तीही त्या कवठाच्या भकलात घेऊन. कवठाचे बी चावून खावे. अगदी चारोळ्यासारखे लागतात. बी काढून कवठे खाणे म्हणजे साल काढून सफरचंद खाण्यासारखे आहे. आमसुलाची चटणी तिला लाभलेल्या संदर्भाने एरवी अस्पर्श झाली आहे, पण तीही एक वेगळीच खमंग चव.
कोशिंबिरीचे काकडी आणि टोमॅटो हे सेहवाग-तेंडुलकर. गाजराची फोडणी दिलेली आणि सढळ हाताने शेंगदाण्याचे कूट घातलेली कोशिंबीरही जमून जाते. बीट बाकी स्वतःचे काहीही अस्तित्व नसलेले. केवळ 'लोह' हा विचार करुनच खायच्या लायकीचे. मुळ्याची कोशिंबीर न आवडणारेच लोक अधिक. पण मुळ्याच्या वासाची बिअरच्या वासासारखीच सवय व्हावी लागते. आणि एकदा ही सवय झाली की मुळ्याच्या कोशिंबिरीसारखी कोशिंबीर नाही, तुम्हाला सांगतो! दहीकांदाही असाच मजा आणून जातो. दहीकांद्याचे मांसाहारी जेवणाशी नाते जोडले आहे, पण शाकाहारातही तो खपून जातो. दहीकांदा कालवताना त्यात चिमूटभर साखर आणि एवढे जिरे घालावेत. एकदम भन्नाट चव तयार होते. वांग्याचे आणि लाल भोपळ्याचे भरीत हेही 'ऑल टाईम फेवरिट' मध्ये मोडणारे. पण कैरीच्या कायरसाला पर्याय नाही. आंबटगोड चवीचा हा कायरस चपातीबरोबर खावा किंवा तूप भाताबरोबर. जीभ आभाराचे भाषण करु लागते!
तात्पर्य काय, की कोणतेही पक्वान्न, गोडधोड असले काही नसतानाही दुपारचे साधे शाकाहारी जेवणही कधीकधी 'जीवन त्यांना कळले हो' असे म्हणायला लावते. रात्रीच्या रंगीबेरेंगी जेवणाची रंगीत तालीम किंवा सकाळच्या भक्कम नाश्त्यावर उतारा एवढेच रविवार दुपारच्या जेवणाचे स्वरुप नसते. असले साधे पण मर्दानी - मर्दानी हा शब्द फक्त 'फिगरेटिव्हली' - जेवण झाले की कुणी दूरदर्शीपणाने आधीच आणून फ्रीजमध्ये ठेवलेली मसाला पानपट्टी लावतो, तर कुणी नुस्तीच बडीशेप खाऊन कोपर्यावर जाऊन आपापली विल्स, गोल्ड फ्लेक काय असेल ती शिलगावतो. हेही नको असेल तर साधे सुपारीचे एक खांड चघळत राहावे. पंखा अंमळ मोठा करावा, एखादे पातळ पांघरुण घ्यावे, डोळ्यासमोर टाईम्स धरावा.... थोड्या वेळाने हातातला टाईम्स गळून पडतो, पंख्याच्या 'हम्म..' अशा आवाजात एक बारीक खर्ज मिसळतो... आठवडाभर घाम गाळून उपसलेल्या कष्टाचे चीज झाले असे वाटू लागणारी रविवार दुपार सुरु झालेली असते....
प्रतिक्रिया
16 Nov 2009 - 7:21 pm | प्रदीप
आलो की जेवायचे कुणाकडे हे हा लेख वाचून मी ठरवून टाकले आहे. कारण 'चवीने खाणार्याबरोबर भोजन केले की मोक्ष मिळतो' असे वेदात (३.अ.२८०९१) मध्ये वाचल्याचे स्मरते.
18 Nov 2009 - 12:42 pm | विजुभाऊ
पुलंच्या लेखाणाची तिय्यम दर्जाची रटाळ आणि सुमार नक्कल करण्याचा स्तूत्य उपक्रम. वाहवा वाहवा तोडलत भौ....जीओ ...लगे रहो
जय महाराष्ट्र.....
16 Mar 2010 - 12:06 pm | गोगोल
देअर इज एलीफंट इन द रूम ..
ब्रावो विजुभाऊ
16 Nov 2009 - 7:22 pm | स्वाती२
नेहमीप्रमाणेच रुचकर!
>>कवठाची चटणी तशीच खावी आणि तीही त्या कवठाच्या भकलात घेऊन.
देवा! नुसत्या आठवणीनेच =P~ =P~ =P~
16 Nov 2009 - 7:46 pm | रेवती
फारच रुचकर लेख!
अख्ख्या मसूराची उसळ करताना फार शिजवून त्याचे गरगट करणे ही माझी खासियत होती. हल्ली जरा शिजवताना कधी थांबायचे हे कळते आहे. डिंगरी/मुळ्याच्या शेंगांची साधी पटकन होणारी कोशिंबीर हाही छान प्रकार आहे. मुळ्याच्या कोवळ्या शेंगा बारीक चिरून, कच्चे तेल, गोडा मसाला, तिखट, मीठ, साखर, लिंबूरस. बाकी पालेभाज्यांबद्दल काय बोलावे? तो तर अशक्त बिंदू आहे सगळ्यांचा. भारतात असताना कुठली भाजी करू? असा प्रश्न पडत नाही. उलट भाजी रिपिट होत नाही असे वाटते. इथे मेल्या त्याच त्या भाज्या खाऊन कंटाळा येतो, मग बटाटा हीच पर्यायी भाजी असते. छे बुवा! फारच आठवणी येताहेत भाज्यांच्या!:)
रेवती
17 Nov 2009 - 1:27 pm | भोचक
आख्ख्या मसुराला लसणाची फोडणी देऊन मस्तपैकी उसळ-वरण करण्यात हातखंडा असल्याचा आपला समज आहे. (तो खरा असल्याचं बायकोचं म्हणणं आहे.)
बाकी लेख नेहमीप्रमाणे रूचकर, चविष्ट.
(भोचक)
इंदूरला आलात नि सराफ्यात नाही गेलात? आयुष्य फुकट गेलं यार तुमचं!
हा आहे आमचा स्वभाव
16 Nov 2009 - 8:46 pm | प्रभो
मस्त ....सुंदर लेख......
--प्रभो
-------------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
16 Nov 2009 - 8:51 pm | गणपा
रावसाहेब आपल्या खवय्येगीरीला सलाम. सुरेख लिहिलयत.
शेवट पर्यंत लाळ टपकत होती वाचताना.
>>शेवग्याच्या पानाची भाजी आणि ओल्या हरभर्याच्या पानांची भाजी.
आजीची आठवण करुन दिलीत. आजी अशी फक्कड करायची आणि जोडिला त्यांचीच भजी.
>> मुळ्याच्या कोशिंबिरीसारखी कोशिंबीर नाही.
लाखमोलच बोललात. गेल्याच आठवड्यात केली होती.
मुळा न आवडणार्या अनेकांना नंतर बोटं चाटायला भाग पाडलय ;)
17 Nov 2009 - 1:05 am | रेवती
हे गणपाभाऊ आले की रेशिपी नाहीतर फटू घेऊनच येतात!
आधीच लेखामुळे वाईट मानसिक अवस्था त्यातून हा फोटू!;)
अवांतर: कोशिंबीर छान सजवलीये. नेत्रसुख म्हणतात ते हेच असेल!:)
रेवती
16 Nov 2009 - 10:19 pm | टारझन
नेहमीप्रनांए उच्च लेखन ... बारकावे अतिशय सुक्ष्मपणे टिपलेत ..
आवडले रावसाहेब ...
- खाद्योप राव
जेवण गरम आहे ... तोवरंच खाण्यात मजा आहे.
16 Nov 2009 - 10:36 pm | आण्णा चिंबोरी
उत्तम लेख.
जियो!!!
--आण्णा चिंबोरी
16 Nov 2009 - 11:48 pm | चतुरंग
जेवता जेवता वाचण्यासाठी खास ठेवून दिला होता हा लेख! :) मजा आली.
वर्णन बरेच बारकाईने केले आहेत. पालेभाज्यांची खवय्येगिरी ही मी भरपूर अनुभवली ती मिरजेला शिकायला रहात होतो तेव्हा. मावशीकडे नियमितपणे ताज्या भाज्या येत करडई, मेथी, लाल माठ, तांदुळजा, कांद्याची पात, अळू, हिरवा माठ, शेपू, पालक, घोळ, अंबाडी कितीतरी.
मावशीकडे समाधान की गणेश अशा नावाची एक चूल बांधून घेतलेली होती बर्याचदा त्यावर स्वैपाक होई. चुलीतल्या आगटीत भाजायला घातलेले कांदे आणि वांगी स्वयंपाक होईस्तो मस्त खरपूस भाजून निघत. जेवताना तोंडी लावायला काय मजा यायची वा!
शेंगदाण्याच्या किंवा लसणाच्या झणझणीत चटणीला कच्चं करडीचं तेल मिसळून ज्वारीच्या भाकरीबरोबर हाणणे म्हणजे स्वर्गसुखच. हाच आनंद नुसता कच्चा काळा मसाला (पण हा कांद्याचा हवा) अधिक तेल ही जोडगोळी सुद्धा देते.
अंबाडीची भाजी आणि वरून चरचरीत लसणाची फोडणी मारलेलं तेल असं भाकरीबरोबर खाताना जगातल्या समस्त गोष्टी यःकश्चित वाटायला लागतात.
शेवग्याच्या शेंगांबद्दलही मीही असाच अशिष्ठ आहे. शेंग सोलून दाताने गर काढून खाल्ल्याखेरीज काय मजा आहे राव? उगीच आपलं पंगतीचा नसता आब-बीब राखण्याच्या भानगडीत मी पडत नाही, मस्त सोलून, चाखून बिखून खातो शेंगा (मग माझं बघून इतरही चार जण हळूच इकडे तिकडे बघत शेंगा सोलायचा प्रयत्न करतात! ;) )
चतुरंग
17 Nov 2009 - 8:46 am | sujay
अंबाडीची भाजी आणि वरून चरचरीत लसणाची फोडणी मारलेलं तेल असं भाकरीबरोबर खाताना जगातल्या समस्त गोष्टी यःकश्चित वाटायला लागतात.
+१००००
लेख तर नेहमी प्रमाणे चवीष्टच.
सुजय
17 Nov 2009 - 12:58 am | प्राजु
अळू तर पात्रता फेरीतून एकदम फायनललाच जावे तसा श्राद्धापक्षांतून एकदम लग्नाच्या पंगतीतच जाऊन बसला आहे. =)) =)) =))
हे वाचून एकदम फस्सकन् हसू आलं. सॉल्लिड!! एकदम पटलं.
लेख छान ,सुंदर च्या पलिकडे गेला आहे. चमचमीत तर आहेच पण.. बर्यापैकी झणझणीतही आहे.
सुंदर लेखाबद्दल रावसाहेब तुमचं अभिनंदन!!
- प्राजक्ता
http://www.praaju.com/
17 Nov 2009 - 1:06 am | विसोबा खेचर
क्या केहेने..
अतिशय सुरेख खाद्ययात्रा.. जियो...
तात्या.
17 Nov 2009 - 4:42 am | घाटावरचे भट
लहानपणी समजायला लागलं तेव्हापासूनचा काळ असा एखाद्या माँटाजसारखा डोळ्यापुढे तरळून गेला. आई आणि हयात असलेल्या व नसलेल्या सर्व आज्या, मावश्या, काकवांच्या हातच्या स्वयंपाकाच्या आठवणीने तोंडाला पाणी सुटलं (क्षणभर वाटलं की एखादा थेंब चुकून डोळ्यांतही आला असावा), आणि भारतात पळून जावंसं वाटलं...
धन्यवाद रावसाहेब!!
- भटोबा
17 Nov 2009 - 6:36 am | सहज
हा भाग उल्लेखनीय. वाचनखुण साठवली आहे.
असे पुण्यात हॉटेल आहे का? जिथे यातील बर्यापैकी पदार्थ ते देखील चांगल्या चवीचे नियमीत मिळतात?
तश्या बर्यापैकी भाज्या लक्षात आहेत पण भारतदौरा करताना परत एकदा लक्षात ठेवायला आयती लिस्ट दिल्याबद्दल धन्यवाद.
17 Nov 2009 - 8:13 am | चित्रा
लेखन आवडले.
>बीट बाकी स्वतःचे काहीही अस्तित्व नसलेले. केवळ 'लोह' हा विचार करुनच खायच्या लायकीचे.
हे विशेष पटले नाही. स्वतःचे खूप अस्तित्व नसले तरी इतर गोष्टींबरोबर छान "जाते". उकडून चिरलेल्या बिटाची थोडे दही, कच्चा कांदा मध्यम आकाराचा चिरून थोडे मीठ- थोडी हवी असल्यास साखर घालून केलेली कोशिंबीर छान लागते.
बीट आवडत नसल्यास एका प्रकारे अजून खाऊन पहावे - बिटाचे उकडून मध्यम लांबी/जाडीचे काप करावेत. कांदाही तसाच उभा चिरावा. बिट/कांद्यात ऑलिव्ह ऑईल, व्हिनेगर आणि किंचित मीठ घालून मुरवावे.
>आमसुलाची चटणी तिला लाभलेल्या संदर्भाने एरवी अस्पर्श झाली आहे, पण तीही एक वेगळीच खमंग चव.
खरे आहे.
ह्याला थोडा वेगळा पर्याय म्हणजे जिरे आणि आमसुले एकत्र वाटून (खूप बारीक नाही) गोळी करायची, आणि ती पिठीसाखरेत घोळवून जेवणानंतर खायची. लहानपणी मला पाट्यावर करू द्यायचे असा हा एकच पदार्थ होता.
17 Nov 2009 - 8:35 am | Nile
आणि खाद्योपजीवीये| विषेशी लोकी इये|दृष्टादृष्टविजये होआवे जी||
आम्ही नेहमीच म्हणतो, मस्त दुपारचे असेच मस्त जेवण आणि मग तास दोन तास झोप. मग जगी सर्व सुखी असा दुसरा कोण आहे?
17 Nov 2009 - 11:52 am | नंदन
आहे, रुचकर लेख!
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
17 Nov 2009 - 8:49 am | पर्नल नेने मराठे
काल तर वाचलाच लेख्..पण आता पहाटे उठुन परत वाचला.
भन्नाट्च!!!! अम्बाडीची भाजी हवीये :(
चुचु
17 Nov 2009 - 11:46 am | JAGOMOHANPYARE
***************************
प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l
प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll
17 Nov 2009 - 11:54 am | सुनील
आपल्याकडील विविध प्रकारच्या भाज्या आणि त्यांच्या वैशिष्ठ्यांचा घेतलेला धांडोळा आवडला.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
17 Nov 2009 - 11:54 am | अमोल केळकर
क्या बात है ! खुपच छान
आपल्या या लेखाने आता कुठलिही भाजी चवीने ( लेख आठवत ) खाल्ली जाईल यात शंका नाही.
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
17 Nov 2009 - 11:55 am | लवंगी
आता २ आठवडे कोणत्या भाज्या करायचा प्रश्न सोडवला तुम्ही..
17 Nov 2009 - 12:05 pm | baba
+१ नंबर लेख....
8> 8> 8> 8> 8> 8> 8> 8> 8> 8>
8> 8> 8> 8> 8> 8> 8> 8> 8> 8>
17 Nov 2009 - 12:12 pm | दिपक
खल्लासच ! :)
हाही लेख चवदार झालाय. रविवारच्या दुपारी जेवणात जर गरम गरम मटकीची, चवळीची आमटी असेल तर चपात्या भराभर संपतात. मस्त टम्म जेवून झाल्यावर झोपण्यापेक्षा हृषीदांचा ’गोलमाल’ किंवा 'चुपके चुपके' पाहत बसायच.
17 Nov 2009 - 12:23 pm | नितीनमहाजन
मानले तुम्हाला! B)
नितीन
17 Nov 2009 - 12:25 pm | वेताळ
मराठी खाद्यपदार्थाच्या संपन्न साम्राजाची सफर खुपच आवडली.
कोवळ्या हरभर्याची सकाळी खुडुन आणलेल्या कोवळ्या पानाची भाजी,त्यात शेंगदाणे व चवीसाठी खरडा घालुन केलेली भाजी काय चवीची असते ते खाल्याशिवाय लक्षात येणार नाही.
सुंदर लेखाबद्दल परत एकदा धन्यवाद.
वेताळ
17 Nov 2009 - 12:29 pm | llपुण्याचे पेशवेll
लेख छानच.
(फणसाची भाजी आणि अळूची भाजी प्रेमी)
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984
17 Nov 2009 - 12:30 pm | sneharani
एकदम रुचकर झालाय हा लेख.
17 Nov 2009 - 12:31 pm | भाग्यश्री कुलकर्णी
नेहमीसारखाच मस्तच आहे लेख
17 Nov 2009 - 12:35 pm | शिप्रा
आधिच्या लेखांप्रमाणेच हा भाग पण मस्त झाला आहे..
17 Nov 2009 - 12:45 pm | चेतन
लेख चांगला झालायं
आमच्या कोकणात डाळिंब्या नावाचा एक प्रकार असतो म्हणजे वालाला मोड आणुन मग साल काढुन कांदा लसुण घालुन केलेली उसळ. (चापुन खावी अशी लागते.)
चेतन
17 Nov 2009 - 1:03 pm | ज्ञानेश...
भूक चाळवली हे वाचता वाचता..! =P~
हादग्याच्या फुलांची भाजी आमच्याकडे बर्याचदा होते! खूप चविष्ट असते. प्रॉब्लेम एवढाच की खूप सार्या फुलांची थोडीशीच भाजी बनते!
:(
"Great Power Comes With Great Responsibilities"
17 Nov 2009 - 1:24 pm | jaypal
विश्वास ठेवा . वाचुन खरोखरीच "निशब्द" झालो.
गावच्या आठवणी ताझ्या झाल्या. थंडीत सकाळी पाखरं राखताना भुक लागल्यावर खालेला गरमागरम हुरडा,मक्याची कोवळी कणसं, शेणात आंड लपेटुन ते चुलीत टाकावं आणि शेकल्यावर गट्कन मटकवाव. आह्हाहाहा......
खयालोंमे, खयालोंमे, खयालोंमे मझा मुंगेरीलाल झाला आणि तो केल्या बद्द्ल लक्ष लक्ष धन्यवाद
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/
जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
17 Nov 2009 - 1:54 pm | फ्रॅक्चर बंड्या
मस्तच लेख आहे...
एकदम रुचकर
17 Nov 2009 - 2:05 pm | श्रावण मोडक
सुरेख. चवदार!
17 Nov 2009 - 2:16 pm | ऋषिकेश
लेख सकाळीच बघितला होता. पण जेवण झाल्याशिवाय वाचायचा नाहि हे ठरवून आत्ता उघडला.. माझ्याच निर्णयाचे मला कौतूक वाटते :)
या अप्रतिम रेचचेलीत माझी अत्यंत आवडीची भरपूर ओले खोबरे घालून केलेली सागरमेथी (वाळूतील मेथी) विसरल्याबद्दल णिशेध! ;)
याच बरोबर पावसाळ्यात शेवळं, करवं वगैरे पावसाळी पालेभाज्यांची आपलीच एक वेगळी मजा आठवली.
मस्त लेख!
ऋषिकेश
------------------
मनातली प्रतिक्रीया नेहमी लपलेलीच राहते का?
17 Nov 2009 - 2:24 pm | झकासराव
वाह!!!!!
काय मस्त लिहिल आहे संजोपराव तुम्ही. :)
मला तर आमटीतली शेवग्याची शेंग चोकुन न खाता तशी टाकुन देणाराच अशिष्ठ वाटतो. :)
17 Nov 2009 - 2:34 pm | सुमीत भातखंडे
एकदम मस्त
17 Nov 2009 - 8:22 pm | अक्षय पुर्णपात्रे
श्री राव, भाज्यांची सरमिसळ आवडली.
17 Nov 2009 - 8:37 pm | धमाल मुलगा
संजोपरावांच्या लेखणीतुन उतरलेला आणखी एक फक्कड लेख!
बस्स..ह्यापलिकडे संजोपरावांच्या लेखनाबद्दल आम्ही पामरांनी काय बोलावे?
बाकी संजोपराव,
ह्या सरंजामात मिरचीचा ठेचा/खर्डा आला असता तर मजा आली असती :)
17 Nov 2009 - 8:52 pm | सन्जोप राव
ह्या सरंजामात मिरचीचा ठेचा/खर्डा आला असता तर मजा आली असती
खरे आहे. मिरचीचा खर्डा, वर्हाडी ठेचा, चिंचेची चटणी आणि कर्नाटकी चटणी पूड राहून गेले...
प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार.
सन्जोप राव
जगण्यात मजा आहे, तोवरच मरण्यात मजा आहे.
17 Nov 2009 - 9:19 pm | श्रावण मोडक
पानातील डावीकडच्या या पदार्थांवर स्वतंत्र लिहा. लोणची, चटण्या, चटणीपुडी, कोशिंबिरी वगैरे सलगतेनं घेता येईल कदाचित.
17 Nov 2009 - 9:37 pm | आण्णा चिंबोरी
श्री. संजोप राव साहेब,
तुम्ही शेपूची भाजी आणि हुलग्याची उसळ या अनुक्रमे पालेभाजीची राणी व कडधान्यांचा राजा असलेल्यांना का वगळले हे कळले नाही.
मुळ्याप्रमाणेच शेपूचीही टेस्ट डेवलप करावी लागते... मुगाची भिजवलेली डाळ घालून ठेचलेला भरपूर लसूण घालून केलेली शेपू कुठल्याही अमेरिकन बर्गर-पिझ्झ्याच्या मुस्काटीत मारुन जाते. हुलग्याची उसळ तर क्या कहने. त्यावर एक लेखच लिहावा लागेल.
17 Nov 2009 - 11:14 pm | बिपिन कार्यकर्ते
झ क्का स ! ! ! झ क्का स ! ! ! झ क्का स ! ! !
जीभ खवळणे हा वाक्प्रचार अनुभवास आला, वाचता वाचता.
बिपिन कार्यकर्ते
17 Nov 2009 - 11:20 pm | विसोबा खेचर
मिपाची टिमकी वाजवायची असं नाही, परंतु मिपाच्या निमितानं संजोपला योग्य ते कोंदण मिळालं असं म्हणू इच्छितो..
संजोपने असंच सुंदरतेने येथे मनमुराद लिहावंन असंच मनापासून वाटतं..
शुभेच्छा..
खाद्ययात्रेचा पुढला भाग येऊ दे लौकर..
(सजोपचा चंचीमित्र) तात्या.
21 Nov 2009 - 2:52 am | मिसळभोक्ता
+१
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
18 Nov 2009 - 12:24 pm | वैशाली हसमनीस
आपला नुसता लेख वाचूनच तोंडाला पाणी सुटले आणि डोळ्यातही भारतातल्या भाज्यांच्या आठवणींनी पाणी आले.फारच सुंदर्,रसभरित लेख !
21 Nov 2009 - 12:05 am | एक
मला वाटलं काहितरी नवीन पदार्थ, नवीन खाद्यसंस्कृतीची (Cuisines) ची ओळख वगैरे होईल.
पण त्याच त्या चुलीवरच्या भाकर्या, रस्से, कढ्या यांबद्द्ल गळे काढणं चालू आहे आणि ते देखील पुलं च्या शैलीची भ्रष्ट नक्कल करून..(स्वःताची शैली अत्यंत चांगली असताना.)
आपले पदार्थ ग्रेटच आहेत यात वाद नाहीच. मरे पर्यंत आमच्या जेवणाला पूर्णत्त्व त्याच पदार्थांनी येणार आहे. पण एका ज्येष्ठ लेखकाने त्यावर आधीच लिहिलं आहे, परत तेच काय वाचायचं?
अनुभव असेल तर जरा बाहेरच्या पदार्थांवर लिहा की राव! साला आम्हाला अनुभव आहे पण लिहिता येत नाही हो!
-(स्टेक नंतर थोडासा आमटी-भात खाणारा) एक
16 Mar 2010 - 12:02 am | शुचि
>>पण तुरीच्या डाळीच्या आमटीतल्या शेवग्याचा शेंगा सगळे टेबल म्यानर्सबिनर्स गुंडाळून ठेवून चोखून खाताना मला तरी असले काही आठवत नाही.>>
शेवग्याच्या शेंगा आणि चिंबोरीचा रस्सा हे २ पदार्थ अगदी जवळच्या कुटुंबियांबरोबर खावेत. कारण दोन्ही खाताना एक प्रकारचा नि:संकोचपणा लागतो. शिष्टाचार , संकोच वगैरे सगळं मस्त बासनात गुंडाळून ठेवावं लागतं हे अगदी खरय.
"माझे खाद्य-पेय जीवन - १,२,३" - लेखमाला वाचली . अ-प्र-ति-म
***********************************
we (women) go from mothers to men with no self in between. Once we wanted to be "nice girls". Now we are "nice married ladies" - just like mother.