बॉस्टनच्या म्युझियम ऑफ फाईन आर्टस (कला संग्रहालया) मध्ये आम्ही काय खाल्ले सारखे (अजूनच) रटाळ डिटेल्स कोणाला नको असतील असे धरून पुढे चालू करते...
आर्ट म्युझियम म्हटले की खरे तर आपल्या डोळ्यांसमोर शिल्पे, भिंतीवर अडकवलेली चित्रे, फारतर कलात्मक गालिचे अशा वस्तू येतात, पण बहुदा टीव्ही येत नाहीत/नसावेत. पण आम्ही खाणे आटपून मधल्या चौकातून जिन्याकडे जायला निघालो तो काही लोक भिंतीला टेकून समोर पाहत हसत असल्याचे दिसले. तर त्यांच्यासमोर भिंतीवर एकत्र जोडलेल्या पंधरा-वीस लहान टीव्हींचा एक संच होता. प्रत्येक टीव्हीत एका व्यक्तीचा क्लोजअप, आणि कानाला हेडफोन लावून ऐकू येत असलेले गाणे म्हणत असल्याचे चित्रीकरण दिसत होते. बाथरूममध्ये कोणी गात असताना जसे कोणी ऐकत नाही म्हणून निर्धास्त असतो तसे मन लावून गाणे म्हणत स्वतःत गुंगून गेलेल्या त्या सर्व लोकांना पाहून थोडी गंमत वाटली. पं. भीमसेन जोशी, लता, अशा अनेक गायकांचे "मिले सूर मेरा तुम्हारा" ज्यांना परिचित आहे त्यांना यात फारसे वेगळेपण वाटणार नाही. फरक फक्त एकच होता की सर्वजण एकच गाणे एकाच वेळी म्हणताना दिसत होते, त्या सर्वांचे मिळून एकच एक जोडलेले चित्र तयार झाले होते. त्यांच्याकडे बघताना असे वाटले की येत्या काळाची ही झलक आहे. खरे तर म्युझियममधील वस्तूंना "हात लावू नये" ही सूचना आपण बरेचजण पाळत असतो, पण तरी मनात आणल्यास वस्तू इथे समोरच आहे, मनात आणल्यास तिला स्पर्श करता येऊ शकतो ह्याची मनात जाणीव असते, खोलीतले गंध, दगडी शिल्पाचा थंडगारपणा, ह्या गोष्टी हा अनुभव घडवत असतात. पण कोणी सांगावे कदाचित पुढच्या काळात कलेचे आविष्कार बघण्याच्या पद्धती कदाचित स्पर्शरहित असू शकतील?!
खरे तर यापुढे अधिक फिरण्याचे मनात नव्हते. पण मागे एकदा येथे आलेले असताना म्युझियममधील भारतीय उपखंडाच्या दालनात खास राजस्थानी मिनिएचर (लहान) चित्रे बघून तशी चित्रे काढण्याच्या आणि रंगवण्याच्या संधीचा आम्ही पुरेपूर फायदा घेतला होता. त्याची आठवण आली आणि म्हटले जाण्याआधी परत एकदा तिथे जाऊ या.
या दालनाकडे जायला एक मोठी खोली ओलांडून जावे लागले. मिनिमलिस्ट (कमीतकमी) अशा सामानात विमानतळांवर असतात तशा काँप्युटरांच्या पुढे बसलेले म्युझियमचे कर्मचारी पाहून म्युझियमची वाटचाल स्पर्शरहित होण्याकडे चालली आहे असा संशय अशामुळे जरा दाटच झाला!
पण एकदा का या भारतीय दालनात आले की परत त्या कधीच्या काळी घडवलेल्या दगडा-मातीच्या वस्तू आपल्यापासून हाताच्या अंतरावर असतात. हडप्पा/मोहेंजोदारो येथील लहानलहान मातीच्या रांजणांपासून ते बौद्ध, जैन, हिंदू शिल्पकला, आणि काही मुस्लिम प्रभावाखालची चित्रे येथे ठेवलेली आहेत. यातील वस्तू इजिप्तमधील वस्तूंइतक्या भव्य नाहीत, काही तर दहा एक शतके इतक्याच जुन्या, म्हणजे खरे तर बर्यापैकी अलिकडच्या काळातील आहेत, त्यामुळे या वस्तूंना इजिप्तसारखे वलय नाही. शिवाय इजिप्तमधील प्रदर्शनाची जाहिरात कितीही भरभक्कम केली असली तरीही या दालनात आल्यावर एक प्रकारचा आपलेपणा वाटतो. तरी इथल्या भारतीय हॉटेलांमध्ये गेलो, की तिथे भिंतीवर लावलेले गणपती, राधा-कॄष्ण, फारतर लामणदिवे, किंवा उंच पितळी समया, आग्रा शैलीतली चित्रे, नक्षीकाम केलेली लाकडी पार्टिशने अशा सवयीच्या झालेल्या शोभेच्या वस्तूंकडे दुर्लक्ष करून आपल्या टेबलाकडे जाण्याचा एक प्रकारचा कोडगेपणा देखील आलेला असतो. त्यामुळे परत जेव्हा कुठेतरी खणून काढलेल्या ह्या वस्तू दिसतात त्यावेळी त्यांच्याकडे हॉटेलमधील शोभेच्या वस्तूंकडे पाहतो त्यापेक्षा वेगळ्या नजरेने पाहिले पाहिजे हे मुद्दाम लक्षात ठेवावे लागते. मग त्या नुसता वस्तू न राहता त्यात मागील संस्कृतीच्या खुणा, तंत्रज्ञानात झालेली प्रगती, तत्कालिन व्यापार-उदीमाची व्यापकता असे थोडे थोडे लक्षात येत जाते. थोडा का होईना इतिहास वाचलेला असला, की ह्या म्युझियमांकडे पाहण्याची एक वेगळी दृष्टी मिळते हेही खरे. शिवाय एखाद्या समाजाच्या आशा-आकांक्षांमध्ये काळाप्रमाणे होणारे बदलही जाणवू शकतात. म्युझियममध्ये आम्ही बरेच काही पाहिले, बरेच फोटो काढले. फोटो काढताना लक्षात आले नाही, पण नंतर असे वाटले की यात स्त्रियांच्या शिल्पांमध्ये काळानुरूप होत गेलेले बदल आपोआप थोडेफार टिपले गेले असे वाटते. शिल्पे करण्याच्या माध्यमात, तंत्रात आणि सादरीकरणातही खूपच फरक पडल्याचे दिसते.
ख्रिस्तपूर्व काळात स्त्रियांना देवतेचा दर्जा (मातृदेवता) दिला असावा अशी समजूत आहे. यापैकी पहिल्या मूर्तींची डोळे दाखवण्याची पद्धत अतिशय सोपी, लहान मुलांनाही करता येईल अशी दिसते. स्त्री असूनही मूर्तीच्या डोक्यावर एक प्रकारची पगडी दिसते आहे. पहिली मूर्ती करणे विशेष अवघड नाही. दुसर्या मूर्तीवर मात्र श्रम घेतले आहेत हे स्पष्ट आहे. ह्या स्त्रीने घातलेल्या विशिष्ट दागिन्याला छन्नविरा म्हणतात असे कळले. हा दागिना त्याकाळात बराच लोकप्रिय असावा. ह्या नटलेल्या मूर्तीवरून ती देवता असावी असे दिसत नाही. एखादी नर्तकी, आकर्षक स्त्री असावी तशी दिसते.
डोळे दाखवण्याची पद्धत आता खालच्या मथुरा येथील प्रतिमेमध्ये वेगळी, जरा सुधारलेली दिसते. शिवाय ही प्रतिमा भट्टीतून भाजून काढलेली आहे.
कान झाकून जातील इतकी मोठी कर्णभूषणे दिसतात. एवढे मोठे कानातले घातले तर कान ओघळतील असे आम्हाला सांगत, तसे त्यांना लहानपणी कोणी सांगितले नसावे! डोक्यावर बांधलेली तीन गोलाकार आभुषणे नक्की कशासाठी आहेत समजत नाही.
नंतरच्या स्त्रीप्रतिमांमध्ये आकार, लय, प्रमाणबद्धपणा, मोकळेपणा अधिक जाणवू लागतो. सांचीच्या प्रसिद्ध स्तूपाच्या एका तोरणावरील यक्षीचे अवशेष (इ. स. पहिले शतक).
या यक्षीला "फर्टिलिटी गॉडेस" म्हटले आहे. बुद्धानंतरच्या काही शतकांत अनेक स्तूप, लेणी बांधली गेली.
बुद्धाने तर करीत असलेला संसार सोडून दिला. त्याच्या गोष्टीत "मार" नावाचा राक्षस येतो, खरे तर मार म्हणजे बुद्धाला निर्वाणापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करणारा मोह. अमरावतीच्या स्तूपावरील ह्या चित्रात मार आपल्या मुलींना बुद्धाचे लक्ष त्यांच्याकडे जावे म्हणून पाठवतो. पण अशा सर्व मोहांवर विजय मिळवल्यानंतर बुद्धाला निर्वाण प्राप्त होतेच. वरील शिल्पातून दिसते ती बौद्ध शिल्पकलेची जुनी परंपरा आहे, या परंपरेने बुद्धाचे मनुष्यस्वरूपात चित्रण केले जात नाही, तर चित्रात बुद्ध असल्याचे त्याच्या पादुका, सिंहासन (कारण तो राजपुत्र होता) आणि बोधीवृक्ष यावरून दाखवले जाते. या शिल्पात स्त्रिया आहेतच, पण दुर्लक्षित आहेत.
मग येतात "हिंदू" देव-देवता. यात दोन्ही देव आणि देवता यांना महत्त्वाची स्थाने मिळालेली दिसतात. त्यांचे चेहरे आधीच्या शिल्पकलेहून अधिक आकर्षक, आणि नाजूक दिसतात. देव जरा कुटुंबवत्सलही झालेले दिसतात! सुंदर चेहरे, दागदागिने, दोनांहून अधिक हात असे या शिल्पांचे स्वरूप दिसू लागते. शंकर, पार्वती यांचे कुटुंब म्युझियममध्ये आहेच. गणपतीदेखील आपल्या दोन्ही पत्नींसह आहे. हरीहर (शंकर आणि विष्णू यांच्या संगमाने तयार झालेला - काही संशोधकांच्या मताने शैव आणि वैष्णव यांच्या "समन्वय" काळातील ) गोतावळ्यासह येथे आहे. तशीच महिषासुरमर्दिनी दुर्गा आहे. जावा येथील महिषासुरमर्दिनीचे हे नवव्या-दहाव्या शतकातले शिल्प. या दुर्गेचा चेहरा अगदी भारतीय म्हणावा असा नाही, त्यावर जावा येथील कारागिरांचीच छाप आहे. पण बाकी शिल्प मात्र भारतातील दुर्गेप्रमाणेच आहे.
रामायणातील सीताहरणाच्या दृष्याचे इंडोनेशियातील अकराव्या शतकातील शिल्प दिसते -म्हणजे या काळात रामायण इंडोनेशियापर्यंत पोचले होते.
तेराव्या शतकापर्यंत स्त्रियांचे प्रेमिक म्हणून मोकळेपणाने चित्रीकरण झालेले दिसते. हे हस्तिदंतामध्ये कोरलेले ओरिसामधले एक शिल्प. इथले कोरीवकाम अधिक वाढलेले दिसते, दागदागिने, आकार, विषय सर्वच दृष्टींनी कला विकसित झाल्याचे दिसते.
माती, दगड, हस्तिदंत, लाकूड अशा विविध माध्यमांमधून तयार केलेली ही शिल्पे बदलती सामाजिक स्थिती दाखवत असावीत असे वाटले. जरी एका दालनातील काही चार-दोन शिल्पांवरून तत्कालिन समाजाचे यथार्थ चित्र उभे करणे शक्य नसले तरी कळते की या शिल्पांमध्ये वैविध्य आहे, वस्तू तयार करण्याची तंत्रे हळूहळू पण खात्रीने विकसित होत गेली आहेत, त्या शिल्पांचे विषय बदलत गेले आहेत, याचाच अर्थ समाज गतिशील होता, भरभराटीस येत होता. भारताला स्वतःचा इतिहास नाही असे म्हणणार्या मार्क्सच्या लिखाणाचा प्रसिद्ध संशोधक डी. डी. कोसंबी यांनी कठोर समाचार घेतला आहेच, पण ही अशी शिल्पेही हे दाखवून देण्यास ठोस पुरावा ठरावी.
स्लाईड-शो -
प्रतिक्रिया
25 Nov 2009 - 10:19 am | llपुण्याचे पेशवेll
चित्रातै,
चित्रे फार लहान दिसत आहेत. जरा मोठी केली तर त्यांचा आस्वाद घेणे सुलभ होईल. हाही लेख छानच.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984
25 Nov 2009 - 10:23 am | विसोबा खेचर
छान, माहितीपूर्ण लेख..
तात्या.
25 Nov 2009 - 11:11 am | सहज
लेख आवडला.
>अशा सवयीच्या झालेल्या शोभेच्या वस्तूंकडे दुर्लक्ष करून आपल्या टेबलाकडे जाण्याचा एक प्रकारचा कोडगेपणा ...
खरे आहे. :-)
शाळांमधे फक्त अभ्यास एक्के अभ्यास मधे वस्तुकला, शिल्पकला, चित्रकला, संगीत इ हे विषय देखील १०० मार्काचे ठेवले पाहीजेत असे वाटते खरे!
25 Nov 2009 - 12:44 pm | मदनबाण
लेख आवडला... :)
मदनबाण.....
"Life is the flower for which love is the honey."
Victor Hugo
25 Nov 2009 - 1:12 pm | गणपा
असच म्हणतो.
25 Nov 2009 - 1:16 pm | श्रावण मोडक
माहितीपूर्ण लेख!
25 Nov 2009 - 3:25 pm | भाग्यश्री कुलकर्णी
मस्त.चांगली माहिती आहे.
25 Nov 2009 - 6:15 pm | स्वाती२
माहितीपूर्ण लेख आवडला.
25 Nov 2009 - 6:54 pm | सूहास (not verified)
अजुन लिहा !! आणी फोटो मोठे करा !!
सू हा स...
25 Nov 2009 - 7:05 pm | प्रियाली
दोन्ही लेख आवडले. माहितीपूर्ण आहेत. साठवून ठेवावे असे.
चित्रांचा आकार थोडा मोठा हवा. खाचाखोचा लक्षात येत नाहीत.
25 Nov 2009 - 7:10 pm | ऋषिकेश
प्रियालीताईशी सहमत
लेख माहितीपूर्ण आहेच, फक्त चित्रे मोठी करता आली तर अधिक मजा येईल
ऋषिकेश
------------------
मनातली प्रतिक्रीया नेहमी लपलेलीच राहते का?
25 Nov 2009 - 7:12 pm | यशोधरा
प्रियालीप्रमाणेच म्हणते. लेख आवडला.
25 Nov 2009 - 7:19 pm | अनामिक
माहितीपूर्ण लेख आवडला!
-अनामिक
25 Nov 2009 - 7:34 pm | प्रदीप
आवडला. शिल्पांच्या सामाजिक संदर्भाचा सविस्तर उहापोह विशेष आवडला.
25 Nov 2009 - 7:37 pm | धनंजय
बॉस्टनमधील MFAचे भ्रमणवर्णन आवडले. माहितीपूर्ण लेख आहे.
पूर्वी पाश्चिमात्त्य संग्रहालयांत भारतीय विभागात मी जात नसे - मनात "यांना काय कळते" किंवा "हे करतीलच विपर्यास" अशी काही सुप्त भावना असावी. पण आजकाल भारतीय दालनात जरूर जातो. संग्रहालयांमध्ये अभ्यासपूर्ण, नेहमीच सन्मानपूर्ण प्रदर्शने बघितलेली आहेत. शिवाय चित्रा म्हणतात, तशीच आपुलकी मला भारतीय ऐवजांना भेट देताना वाटते.
*(हल्लीच मुंबईतील काळ्या घोड्याजवळील संग्रहालयाला मी आयुष्यात पहिल्यांदा भेट दिली. बॉस्टनला जाणे-येणे नसेल, पण मुंबईला जाणे-येणे असेल, त्यांनी आपल्या भटकंतीमध्ये याचा समावेश जरूर करावा. चित्रा म्हणतात, तसे अनेक भाव मनात येतात.)*
26 Nov 2009 - 2:10 am | Nile
असेच म्हणतो, धन्यवाद.
25 Nov 2009 - 8:33 pm | मीनल
उत्तम लेखन शैली, अचूक शब्द, माहितीपूर्ण वर्णन + त्यावरील तुमच स्वतःच मत यामुळे लेख आवडला.
मीनल.
25 Nov 2009 - 9:08 pm | चित्रा
हे भ्रमंतीवर्णन लिहीण्याचे मनात ठेवून न गेल्याने असेल, पण लेख परत पाहिले तर विस्कळित झाला आहे. तरी आवडल्याचे कळवल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार.
फोटो आता गूगलच्या स्लाईडशोमध्ये जितके जमतील तितके मोठे केले आहेत.
25 Nov 2009 - 9:36 pm | प्रभो
मस्त ..लेख आवडला..
--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!