रात्री हुंडर वरून परत आल्यावर होमस्टे मध्ये मुक्कामास असलेला एक कॉलेजवयीन मुलगा माझ्याकडे आला. त्याच्याच शब्दात सांगायचे तर ठाण्यात राहणारा बॉम्बेकर होता तो.
मुंबई ते दिल्ली विमानाने, तिथून लगेच बस ने मनाली आणि तिथून खाजगी गाडीने विना मुक्काम लेह गाठले होते त्याने. जी लोक विमानाने लेहला येतात किंवा मनाली लेह एका दिवसात प्रवास करून लेह ला पोचतात त्यांनी लेह मध्ये पोचल्यावर २-३ दिवस आराम करून मग ऊंचावरचे प्रवास करणे अपेक्षित असते. ह्यामुळे आपले शरीर उंचीवरच्या विरळ हवेला सरावते. इकडे पोस्टिंगवर येणारे सैनिक ज्यांची शारीरिक क्षमता आपल्यापेक्षा चांगलीच असते त्यांना देखील हा नियम पाळावा लागतो. ह्या पोराने मात्र इकडे आल्यावर लगेच दुसऱ्या दिवशी भाड्याची बाईक घेऊन खारदूंग ला चा प्रवास केला आणि तिसऱ्या दिवशी पॅंगॉन्ग ला एका दिवसात जाऊन परत येण्याचा आटापिटा. पॅंगॉन्ग वरून परतीच्या प्रवासात चांग ला पासच्या उंचीवर ह्याची बाईक पंक्चर झाली. ह्याच्या जवळ ना पंक्चर काढण्याचे किट ना पंक्चर कसे काढायचे याची माहिती. मोबाईलला रेंज नसल्याने गाडीच्या मालकाला फोन करून काय झालेय ते सांगण्याचा पण प्रश्न न्हवता. आणि जरी संपर्क झाला असता तरी मालक काय करणार होता म्हणा? बराच वेळ चांग ला पासवर अडकून राहल्यावर शेवटी ह्याला मदत मिळाली आणि त्याला त्याच्या गाडीसह ट्रकात चढवून कारू गावापर्यंत आणून सोडलं. तिथे पंक्चर काढून तो लेहला परत आला. एकंदरीत 'बॅग भरो और निकलो' पद्धतीचा नियोजनशून्य प्रवास अशा दुर्गम भागात करणे त्याच्या अंगलट आले.
'नहीं होगा अब मुझसे. में दो दिन लेह में ही रुकता हूं. परसो दिल्ली चला जाऊंगा. और भाग जाऊंगा घर'.
त्याचा थकलेला चेहरा बघता हा १००% योग्य निर्णय होता.
होमस्टे मध्ये अजून एक ६-७ माणसांचे कुटुंब आले होते. जयपूर वरून विमानाने. त्यांनी पण ह्या ठाण्याच्या पोरासारखे लगेच खारदूंग ला चा प्रवास केला आणि एक दिवस पॅंगॉन्ग मध्ये मुक्काम करून परत आले होते. त्यांचा पण पॅंगॉन्ग चा अनुभव अतिशय वाईट होता.
'क्या बतायें सर आपको. पुरी रात निंद नहीं आई पॅंगॉन्ग पर. सांस लेने में बहुत तक्लिफ हो रही थी. साथ में एक छोटा ऑक्सिजन सिलेंडर लेकर गये थे. हर एक को २-२ मिनिट मिला. बहूत ही ज्यादा परेशानी हुई.' - ग्रुप चे लीडर काका
#################################################################################
०५ सप्टेंबर
सकाळी ७ लाच लेह सोडले. लेह मनाली महामार्गाने कारू गावापर्यंत येऊन तिथून डावीकडे वळले की चेमरें - झिंगरल - दुर्बुक - टांगत्से - लुकुंग - स्पॅन्गमिक - मान - मेरक असा हा लेह पासून एकंदरीत १७५ किमीचा पल्ला आहे. स्पॅन्गमिक, मान, मेरक ही पॅंगॉन्ग च्या काठावरची किरकोळ गावे आहेत. आणि प्रत्येक ठिकाणी मुक्कामाच्या सोयी आहेत. ह्या प्रवासात आपल्याला पार करावा लागतो १७५८६ फूट उंचीचा चांग ला पास.
लेह मधून बाहेर येताच एका पंपावर गाडीची टाकी व जवळचा कॅन डिझेल ने भरून घेतला. कारू मध्ये देखील एक पेट्रोल पम्प आहे आणि त्यानंतर कारू पासून ३५० किमीवर लेह मनाली महामार्गावर असलेल्या तंडी मध्ये. कारू ते पॅंगॉन्ग पर्यंत काहीही नाही. पॅंगॉन्ग वरून त्सो मोरिरी लेकला जायचे असेल तर ३ मार्ग आहेत.
१) पॅंगॉन्ग वरून एक कच्चा रस्ता चुशुल पर्यंत येतो. तिथून न्योमा वरून त्सो मोरिरी. हे अंतर आहे अंदाजे २०० किमी.
२) टांगत्से पर्यंत मागे येऊन तिथून चुशुल न्योमा मार्गे त्सो मोरिरी. हे अंतर होते अंदाजे ३२० किमी.
३) कारू पर्यंत मागे येऊन लेह मनाली मार्गाने त्सो मोरिरी. अंतर अंदाजे ३२० किमी.
ह्या संपूर्ण भागात कुठेही पेट्रोल पम्प नसल्याने लेह/कारू मधून गाडीसाठी पुरेशा प्रमाणात अतिरिक्त पेट्रोल/डिझेल घेऊन जाणे जरुरीचे आहे.
कारू ओलांडताच एका ठिकाणी ILP दिले व पुढे निघालो. चेमरें मोनेस्टरी आली.
१६६४ साली बांधलेली चेमरें मोनेस्टरी
मोनेस्टरी पाहून पुढे निघालो. चांग ला पासच्या रस्त्याची दुरुस्ती चालू होती. त्यामुळे वाहतूक दुसऱ्या एका कच्च्या रस्त्यावरून वळवली होती जो पुढे काही अंतरावर चांग ला पासला जोडलेला होता. तो भयानक कच्चा रस्ता पार करून परत चांग ला पासवर आलो. अक्षरश: ब्रह्माण्ड आठवले ह्या कच्च्या रस्त्यावर.
चांग ला पास (चुका ध्यान गई जान)
वर वर जात होतो आणि पुन्हा गाडीचा Malfunction Indicator ऑन झाला. शेवटी एका क्षणी तर गाडी वर चढायचीच बंद झाली. फ्रस्टेशन. आज बहुतेक मागं फिरावं लागणार अशी चिन्हे दिसू लागली. आमच्या मागून एक फोर्स ट्रॅव्हलर टेम्पो येत होता. त्याचा चालक थांबला आणि एक मोठा दगड हातात घेऊन माझ्याकडे आला.
'रुको भाई रुको. ऐसे नहीं चढ़ेगी गाडी यहां. में दिखाता हूं क्या करना है.' आणलेला दगड गाडीच्या मागच्या चाकाला लावून तो म्हणाला.
तो ड्रायव्हिंग सीटवर बसला. मी बाजूच्या सीट वर गेलो. त्याने क्लच दाबून गिअर टाकला आणि क्लच दाबलेल्या अवस्थेतच ठेवून जोरात अक्सिलेटर दिला. गाडी गुरगुरायला लागली की पटकन क्लच/हँडब्रेक सोडला. अगदी आरामात पुढे जाऊ लागली.
'यहाँ ऑक्सिजन बहुत कम है ना. पावर कम पडती है. अगर गाडी कहीं रुकानी पडी तो अभि मैने जो किया वैसे ही इधर करना है. तो ही गाडी चढ़ेगी नहीं तो नहीं. हम भी ऐसा ही करते है.'
थोडक्यात त्याने मला इथे भेडसावणाऱ्या सर्वात मोठ्या समस्येवरचे उत्तर देऊन टाकले. त्याचे आभार मानून पुढे निघालो आणि ११ च्या सुमारास चांगला पासच्या टॉपवर पोचलो. कारू ते चांग ला टॉप पर्यंतचा संपूर्ण रस्ता खूपच उध्वस्त झालेला होता.
चांग ला (काय चांगले आहे ह्याच्यात?)
बाजूचे दगडी डोंगर तर कोणत्याही क्षणी आपल्या डोक्यात येऊन पडतील इतके तकलादू वाटतात. चांग ला गाडीसाठी अजिबात चांगला नाही. इथे पण शेवटच्या काही अंतरात प्रचंड बर्फवृष्टी झालेली होती. टॉपवर चांगला बाबांचे (जे ह्या चांग ला पासचे संरक्षण करतात अशी समजूत आहे) मंदिर आहे जिथे आज पूजा होती. एका सैनिकाने जिलेबी सारखा प्रसाद दिला. तो घेऊन १० मिनिटे थांबून पुढे निघालो. लांबवर दरीत लष्कराचे ३ ट्रक अपघातग्रस्त होऊन पडलेले होते.
अपघातग्रस्त ट्रक
ते दरीत इतक्या आतपर्यंत कसे गेले असावेत हे मात्र काही समजले नाही.
आज दुपारचे जेवण होते दुर्बुक मध्ये खाल्लेला लेमन राईस. एका ताटात पांढरा भात आणि त्याच्या बाजूने वर्तुळाकार पद्धतीने मांडलेल्या लिंबाच्या आठ फोडी असा अनोखा लेमन राईस हॉटेल मालकाने पुढे आणून ठेवला. ह्याच्याबरोबर अजून काहीतरी असणार असे वाटल्याने आम्ही थोडा वेळ तसेच बसलो.
'लेमन राईस में इतना ही आता है' - हॉटेल मालक
भारीच की. याला म्हणतात इनोव्हेशन. मग डाळ पण घेतली. अतिशय बेचव.
दुर्बुक मधून पुढे निघालो आणि कारू पासून सुरु असलेला रखरखाट संपून थोडी हिरवळ आणि त्यात मनसोक्त चरणाऱ्या बकऱ्या, याक, घोडे दिसू लागले.
चांगथन्गी बकरी (इतके केस अंगावर असल्यावर कशाला थंडी वाजतेय ?). हिच्यापासून मिळणारी लोकर वापरून पश्मिना शाली वगैरे बनवल्या जातात.
थंडगार पाणी, बाजूने हिरवळ आणि समोर अजस्त्र डोंगर असलेली एक छोटीसी नदी सामोरी आली. इथे १५ मिनिटे थांबून पुढे निघालो.
शेवटी ३:१५ च्या दरम्याने एकदाचे पॅंगॉन्ग आले. जवळपास ६०० स्क्वेअर किमी क्षेत्रफळ असलेला हा खाऱ्या पाण्याचा तलाव भारतात ४०% आणि चीन मध्ये ६०% असा विभागला गेला आहे. इथे कॅम्प वॉटर मार्क ह्या टेन्ट मध्ये मुक्काम केला. कापडी तंबू, पाठीमागे बर्फाच्छादित डोंगर, तंबूच्या बाहेर बसायला आराम खुर्ची आणि पुढे चालत जेमतेम ५० मी. अंतरावर असलेला पॅंगॉन्ग. प्रसन्न वाटले.
कॅम्प वॉटर मार्क
पॅंगॉन्ग तलाव
आतापर्यंत सर्व उंचीवरच्या ठिकाणी आम्ही थोडा वेळ थांबून खाली उतरत होतो. पण इथे एक रात्र मुक्काम करायचा होता. आणि समुद्र सपाटीपासून १४२७० फूट उंचीवर असणाऱ्या पॅंगॉन्ग तलाव परिसरात असलेली ऑक्सिजनची कमी थोड्या वेळातच जाणवू लागली. अगदी चालताना देखील धाप लागत होती. इतक्या उंचीवर शरीराची जास्त हालचाल न करणे, तसेच घन पदार्थांपेक्षा द्रव अन्न पदार्थ/गरम पाणी पोटात जास्त जाणे योग्य.
#################################################################################
६ सप्टेंबर
सकाळी कॅम्प वॉटर मार्क पासून अंदाजे १० किमी पुढे असणाऱ्या मान गावापर्यंत गेलो.
मान गावामधून दिसणारा पॅंगॉन्ग
हे १० किमी अंतर पार करायला अंदाजे दीड तास लागला. त्यावरून कच्च्या रस्त्याच्या दर्जाची कल्पना यावी. बऱ्याच ठिकाणी तर २-३ मिनिटे थांबून नक्की गाडी कुठून काढावी ह्याचा विचार करण्यात गेली. ह्या रस्त्याने चुशुल गाठणे आपल्या गाडीसाठी खूप धोकादायक आहे हे लक्षात आले. त्यामुळे तिथून मागे फिरून ज्या रस्त्याने आलो त्याच रस्त्याने परत कारुला जाण्याचा निर्णय घेतला.
परतीच्या प्रवासात एका ठिकाणी बरेच हिमालयीन मरमॉट दिसले.
हिमालयीन मरमॉट
आणि ही अतिशय शांत आणि सुंदर अशी टांगत्से मोनेस्टरी
संपूर्ण प्रवासातील मला सर्वात जास्त आवडलेली मोनेस्टरी. आतील भिंतींवरची कलाकुसर तर फारच सुंदर होती.
परतीचा प्रवास अपेक्षेपेक्षा जास्त जलद होऊन ४:३० वाजताच कारु मध्ये पोचलो. त्यामुळे मोर्चा वळवला हेमिस मोनेस्टरी कडे.
प्रतिक्रिया
15 Apr 2018 - 10:25 pm | एस
अप्रतिम फोटो आहेत. फारच नेत्रसुखद. टेम्पो ड्रायव्हरने सांगितलेली युक्ती अत्यंत उपयुक्त आहे. पुभाप्र.
15 Apr 2018 - 11:00 pm | डॉ सुहास म्हात्रे
मस्तं चालली आहे सफर !
लेहची प्रवासवर्णने वाचून आणि मनमोहक फोटो पाहून, हा भाग २-३ आठवड्यात हळू हळू प्रवास करत चवीने पहाण्याचा आणि डोळ्यात-मनात साठवण्याजोगा आहे असे मत बनले आहे ! :)
17 Apr 2018 - 12:52 pm | अभिजीत अवलिया
शक्य असेल तर २-३ महीने तरी जावे असे सुचवेन. अति सुंदर निसर्ग आणि जोडीला नो इंटरनेट हा दुग्धशर्करा योग आहे.
16 Apr 2018 - 12:08 pm | दुर्गविहारी
अप्रतिम फोटो आणि वर्णन. ईथे जायची इच्छा तर आजेच, पण आपल्या धाग्यामुळे ती आणखी पक्की झाली.
मधे एक भारतीय- चिनी सैनिकांच्या पँगाँग लेकजवळच्या मारामारीचा व्हिडीओ आला होता. वास्तविक सैनिक भारताच्या विविध भागातून आलेले असतात, मग ते या प्रदेशात रुळतात कसे? आणि असे युध्द करण्याईतपत उर्जा आणतात कशी?
पु.भा.प्र.
बाकी हिमालयीन मरमॉट गोजिरवाणा दिसतोय. टांगत्से मोनेस्टरीदेखील आवडली.
17 Apr 2018 - 12:49 pm | अभिजीत अवलिया
माझ्या माहितीप्रमाणे अति उंचीवरच्या ठिकाणी युध्द करणारे भारतीय सैनिक High Altitude Warfare School (स्थापना १९४८) ह्या गुलमर्ग इथे असलेल्या संस्थेत प्रशिक्षण घेऊन आलेले असतात. त्यांना अति उंचीची ठिकाणे व बर्फात लढण्याचे वेगळे प्रशिक्षण मिळते.
17 Apr 2018 - 1:41 pm | वरुण मोहिते
नो इंटरनेट . अगदी बरोबर म्हणालात . लेख आवडला हे वेगळे सांगायला नको.
17 Apr 2018 - 4:53 pm | प्रचेतस
अप्रतिम लेख. छायाचित्रेही भयानक आवडली.
17 Apr 2018 - 5:26 pm | सस्नेह
स्वर्गतुल्य फोटो !!
वर्णनशैली भारी.
17 Apr 2018 - 5:49 pm | विशुमित
मस्त वर्णन आणि फोटोस..
19 Apr 2018 - 12:08 pm | अनिंद्य
हा भागही आवडला.
जबरदस्त फोटो, 'चांग ला पास'चा फोटो तर ऑस्सम !
19 Apr 2018 - 8:07 pm | यशोधरा
लैच भारी!
28 Apr 2018 - 5:22 pm | किल्लेदार
परत जावं लागणार आता.
28 Apr 2018 - 5:22 pm | किल्लेदार
परत जावं लागणार आता.
28 Apr 2018 - 7:50 pm | निशाचर
अप्रतिम फोटो! हा भागही आवडला.
28 Apr 2018 - 8:19 pm | Nitin Palkar
सुंदर वर्णन अतिशय सुंदर फोटोज.