कुठून बरं सुरवात करावी ?
हां. साल २०११. पुण्यातील एका टूर ऑपरेटरने लडाख भागातील फोटोंचे प्रदर्शन भरवले होते. लडाख हा भाग तोपर्यंत मला ऐकून माहित होता. इंटरनेट वापरत असलो तरी त्याचे तितके ऍडिक्शन झाले न्हवते. त्यामुळे कधीच गूगल मध्ये 'लडाख फोटोज' असे सर्च पण केले न्हवते. लडाख भाग किती सुंदर आहे हे तेव्हा पहिल्यांदा फोटोंचे प्रदर्शन बघितल्यावर समजले आणि लवकरच इकडे जायचे हे मनाशी पक्के ठरवले.
सर्वप्रथम २०१२ साली कंपनीतील आम्ही काही जणांनी मिळून लडाखला जायचे ठरवले. दिल्ली पर्यंत विमानाने जाऊन तिथून बसने मनालीला जायचे आणि मनालीतून बाईक भाड्याने घेऊन लडाख पालथा घालायचा आणि विमानाने परत यायचे. बस इतकाच प्लॅन ठरला. त्यानंतर पुढे ट्रिप संदर्भात कुणाचीच कसलीही हालचाल नाही. ते वर्ष निघून गेले. 'ठीक है यार. अगले साल जरूर जायेंगे' असे म्हणत पुढच्या वर्षीचा वादा करण्यात आला.
'अगले साल' आले. आणि २०१२ प्रमाणेच निघून गेले. 'जायेंगे. इस साल तो पक्का जायेंगे' असे म्हणून कुणीच गेले नाही.
साल २०१४. ह्या वेळी आम्ही आणि अजून दोन विवाहित जोड्या ह्यांनी मिळून जायचे असे ठरवले. पण जून महिना आला आणि काही अपरिहार्य कारणामुळे एका जोडीने रद्द केले. एकाचे रद्द होताच दुसऱ्या जोडीचे पण पाय गळपटले आणि त्यांनी पण रद्द केले. आणि मग बहुमत गमावताच आम्ही पण रद्द करून टाकले.
लडाखला पोचायला २ रस्ते आहेत.
१) श्रीनगर ते लेह - हा रस्ता अंदाजे १५ मे ते १५ ऑक्टोबर चालू असतो. उर्वरित काळ बर्फवृष्टीमुळे बंद असतो.
२) मनाली ते लेह - हा रस्ता अंदाजे जून ते सप्टेंबर चालू असतो. बाकीचे ८ महिने बर्फवृष्टीमुळे बंद.
२०१५ आणि २०१६ ला मी ह्या काळात भारताबाहेर असल्याने ही दोन्ही वर्षे पण निघून गेली. पण ह्या वर्षी मात्र काहीही झाले तरी जायचेच असा निश्चय केला. ३ जून २०१७ ही पुण्याहून निघायची तारीख ठरवली. कंपनीत दोन महिने आधीच दोन आठवड्याची सुट्टी टाकून ठेवली. अंदाजे रोज कुठपर्यंत जायचे आणि लडाख मध्ये काय बघायचे ह्याचा एक प्लॅन बनवला.
एवढ्या लांब गाडी घेऊन? त्यापेक्षा विमानाने श्रीनगरला जा. तिथे भाड्याची गाडी आणि ड्रायव्हर घेऊन फिरा आणि विमानाने परत या.
काश्मीरला कशाला जाताय ? तिथलं वातावरण कसं आहे ते बघताय ना टी.व्ही. वर.
तिथे हवा विरळ असते. ऑक्सिजन कमी असतो. मुलाला त्रास होईल. नका जाऊ.
सल्ल्यावर सल्ले मिळत होते. एकतर मी तिथे जाऊ नये किंवा गेलो तरी पुण्याहून गाडी चालवत जाऊ नये हे सांगणारे. अर्थात त्यात चुकीचे असे काही नाही. कारण त्यामागे आपली काळजी असते. पण मी मात्र आपली गाडी घेऊनच जायचे ह्या निर्णयावर ठाम होतो. कारण असा प्रवास करणारा मी काही पहिला न्हवतो. कित्येक लोकांनी हा प्रवास लहान मुलांना सोबत घेऊन केलेला आहे. अजून एक म्हणजे विमानाने तिथे जाऊन येणे आणि तिथे भाड्याची गाडी करणे म्हणजे खर्च आवाक्याबाहेर गेला असता. तसेच मला स्वत:ला एक लांबची रोड ट्रिप करायची खूप वर्षांपासून इच्छा होती. लडाखला जायचे ते तिथले सौंदर्य पाहण्यासाठी आणि तिथल्या असलेल्या किंबहुना नसलेल्या रस्त्यांवरून प्रवासाचा/गाडी चालवण्याचा अनुभव घेण्यासाठी. मग भाड्याची गाडी/ड्रायव्हर घेऊन त्यांच्या तालाने फिरल्यास हे कसे जमायचे?
अगोदर सांगितल्याप्रमाणे इथे जाणारे रस्ते जेमतेम ४ ते ५ महिने सुरु असतात. रोज वेगवेगळ्या वेबसाईटवर रस्ते चालू झाले आहेत का नाही हे चेक करत बसलोच होतो. http://www.leh.nic.in/ ह्या साईटवर रस्ते चालू आहेत का बंद ह्याचा स्टेटस सतत टाकला जातो. पण त्यापेक्षा वर्गीस खान यांची http://vargiskhan.com साईट चेक करणे उत्तम. कुठपर्यंतचा बर्फ क्लिअर केलाय ? अंदाजे कधी रस्ता चालू होईल? सद्यस्थिती प्रवासास कशी आहे? ह्याची इत्यंभूत माहिती वर्गीस खान ह्यांच्या साईट वर असते.
गेल्या वर्षी झालेल्या विक्रमी बर्फवृष्टीमुळे रस्ते चालू होण्यास उशीर होईल असे समजले. तरी देखील श्रीनगर लेह रस्ता मे महिन्याच्या शेवटी चालू होईल आणि त्यामुळे 3 जूनला निघण्यास काहीही अडचण नाही असा विश्वास वाटत होता. म्हणून २६ मे ला BSNL च्या कर्वे रोड वरच्या ऑफिस मध्ये गेलो आणि पोस्टपेड सीम कार्ड घेतले. कारण लडाख भागात BSNL आणि एअरटेल ह्यांचेच पोस्टपेड नेटवर्क आहे. त्यातही जो अतिशय दुर्गम भाग आहे तिथे चुकून चालले तर फक्त BSNL. सीम कार्ड घेऊन घरी येऊन बातम्या लावल्या तर बुऱ्हाण वाणीचा उत्तराधिकारी सबझार अहमद भट याला भारतीय सैन्याने ठार मारल्याची बातमी आली होती. अपेक्षेप्रमाणे ह्यामुळे श्रीनगर मध्ये दगडफेक सुरु झाली आणि कर्फ्यू लावण्यात आला. त्यामुळे लडाखला श्रीनगर वरून जाण्याचा पर्याय बंद झाला. तर मनाली लेह महामार्ग अजून चालूच झाला न्हवता व लवकर होणार देखील न्हवता. मग शेवटी विचार करून ३ जूनचा मुहूर्त १० जून पर्यंत पुढे ढकलला. पण १० जूनला पण श्रीनगर मधील परिस्थिती तंगच होती. तर मनाली लेह महामार्ग दोन दिवसांपूर्वीच चालू झाला होता. पण तो कोणत्याही क्षणी दुरुस्तीसाठी पुन्हा बंद केला जाईल अशी सूचना होती. तसेच रस्ता खूपच भयानक कंडिशन मध्ये असून जून मध्ये शक्यतो येऊ नका अशी सूचना काही साईट्सवर होती. शेवटी १० जूनचा प्लॅन पण आदल्या दिवशी रद्द केला. ह्या वर्षी पण ही ट्रिप हुकणार असेच वाटू लागले. परत सुट्टी रद्द करून २४ ऑगस्ट ही तारीख ठरवली. BSNL चे सिम कार्ड परत करून टाकले. उगाच एक महिन्याचे बिल भरावे लागले.
२४ ऑगस्ट आला. दोन्ही रस्ते चालू होतेच. त्यामुळे निघूया, जे काय होईल ते होईल असा विचार करून निघालो. जाण्यापूर्वी २२ ऑगस्टला परत BSNL चे सिम कार्ड घेतले. सिम घेऊन ऑफिसच्या बाहेर आलो आणि अचानक माझ्या मोबाईलची रेंजच गेली. ३ आठवड्यापूर्वी कोराईगड किल्ल्यावर गेलो होतो तेव्हा तो तिथल्या तळ्यात पडला होता पण तरीही व्यवस्थित चालू होता. आणि असा अचानक ऐन मोक्याच्या वेळी गचकला. मग एकच मोबाईल घेऊन पूर्ण प्रवास केला.
जवळ घेतलेले महत्वाचे सामान
१) खाण्याचे पदार्थ - चिवडा, बदाम, खजूर, बाकरवडी, बिस्कीट, आवळा कँडी, साखर वगैरे
२) वैद्यकीय सामान - मुलाची ताप, उलटी वगैरेची औषधे
३) बेसिक मेडिकल किट - आयोडेक्स, मूव्ह, बाम, ऍनासिन, बँडेज वगैरे
४) कोका-२०० - तिथल्या विरळ हवेचा त्रास होऊ नये ह्यासाठी कोका-२०० नावाच्या होमिओपॅथिक गोळ्या डॉक्टरने लिहून दिल्या आणि श्रीनगर पासून खायला सुरवात करा असे सांगितले. प्रवासाच्या एक दिवस अगोदर गोळ्या घेऊन आलो. ह्या गोळ्यांचा काही फायदा झाला असे वाटत नाही. मी श्रीनगर आणि सोनमर्ग मध्ये ह्या गोळ्या खाल्ल्या पण नंतर खाल्ल्याचं नाहीत. पण मला काही त्रास झाला नाही. तर नेहमी गोळ्या खाऊन देखील बायकोला थोडा त्रास झालाच.
५) कापूर - विरळ हवेचा त्रास झाल्यास थोडा वेळ कापूर हुंगायचा असे डॉक्टरने सांगितले होते.
गाडीसाठी बरोबर घेण्याचे महत्वाचे सामान -
१) पंक्चर रिपेअर किट - लडाख भागात मैलोनमैल मानवी वस्ती नाही. त्यामुळे हे किट आणि पंक्चर कसे काढायचे याचे ज्ञान असणे अत्यावश्यक आहे. या दोन्ही गोष्टी जवळ नसल्याने एका मुलाचे झालेले हाल पुढे सांगेनच.
२) पम्प - गाडीतील 12v सप्लाय वर चालणारा हवा भरण्याचा पम्प. मी हा ऍमेझॉन वरून घेतला. साधे हाताने हवा भरायचे पण पम्प मिळतात पण त्याने हवा भरायची वेळ आल्यास खूप त्रास होऊ शकतो. कारण ह्या भागात असलेल्या विरळ हवेमुळे थोडे जरी काम केले तरी थकवा येतो.
३) कपडे धुण्याच्या पावडरचे छोटे पॅकेट्स - हे गाडीसाठीच. कारण गाडी पंक्चर झाल्यास हे पॅकेट पाण्यात मिसळून ते पाणी टायर वरून फिरवतात आणि जिथे बुडबुडे येतील तिथे पंक्चर आहे असे ओळखले जाते.
४) एक लांब आणि जाड दोरी - गाडी कुठे बंद पडली तर तिला टो करता यावी ह्यासाठी.
५) गाडीची बॅटरी - जर बॅटरीची कंडिशन योग्य नसेल जर ती जाण्यापूर्वीच बदलावी. मी सहा महिन्यांपूर्वीच नवी बॅटरी बसवली होती. बॅटरी खात्रीची नसल्यास जम्प स्टार्ट केबल सोबत न्याव्यात.
६) टायर - नवीन टायर टाकून एक वर्ष झाले होते आणि त्यांच्यात थ्रेडींग चांगले शिल्लक होते. जर टायर गुळगुळीत झाले असतील तर ते बदलूनच जावे. लडाख मधील खराब रस्त्यांवर टायर खराबच होणार आहेत. मग अगोदर जाऊन येऊ नी मग बदलू असे करू नये.
७) ब्रेक पॅड्स - हे पण नवीन टाकले होते ४ महिन्यांपूर्वी.
८) क्लच प्लेट्स - व्यवस्थित होत्या. नसल्यास बदलाव्यात हे उत्तम.
९) काही जण एक-दोन लिटर इंजिन ऑइल, कूलंट वगैरे पण घेऊन जातात सोबत. पण ह्याची तुम्हाला काहीच गरज पडणार नाही असे मला चंदीगड मध्ये गाडीचे सर्व्हिसिंग करताना तिथल्या सर्व्हिस ऍडव्हायजरने सांगितले. त्यामुळे मी नाही घेतले. पण घेतलेले उत्तम.
१०) गाडीची सर्व ओरिजिनल कागदपत्र
इतर
हातोडी, इलेक्ट्रिशियन वापरतात तसली काळी टेप, एक मोठी प्लास्टिक शीट, हॅन्ड ग्लोव्हज, जॅकेट वगैरे.
प्रवासाला निघण्यापूर्वी गाडीचे सर्व्हिसिंग अत्यावश्यक आहे. माझ्यासाठी गाडीच्या सर्व्हिसिंगचा तर मोठाच जोक झाला. सर्व्हिसिंगसाठी मी १९ ऑगस्टला पुण्यातील प्लॅनेट फोर्डच्या शोरूमला फोन करून २२ ऑगस्टची अपॉइंटमेंट बुक केली. आणि २१ ऑगस्टला शोरूम मधून फोन आला की त्यांच्याकडे संप चालू झालाय त्यामुळे सर्व्हिसिंग बंद झालेय. (आता तर प्लॅनेट फोर्डची पुण्यातील तिन्ही शोरूम बंद झालीत). मग पुण्यातील फोर्डच्या बाकीच्या शोरूमना फोन केले. पण कुठेही फोन उचलला गेला नाही. मग बाहेरच्या स्थानिक मेकॅनिक कडून सर्व्हिसिंग करण्यापेक्षा चंदीगड मध्ये सर्व्हिसिंग करू असा निर्णय घेतला. त्याप्रमाणे चंदीगड मधील सलुजा फोर्ड मध्ये अपॉइंटमेंट बुक करून ठेवली आणि तिथे सर्व्हिसिंग केले.
'भाई. गलतीसे पाकिस्तान मत जाना. अभी भी तुम्हारी जरुरत है टीमको' वगैरे पांचट जोक मारत ऑफिस मधल्या सहकार्यांनी प्रवासाला शुभेच्छा दिल्या. सगळे सामान डिकीत टाकले. जोडीला लॅपटॉप, कॅमेरा, ज्यादाची हार्ड डिस्क घेतली. गाडीचा ट्रिप मीटर शून्यावर सेट केला आणि अखेरीस २४ ऑगस्टला रात्री ९ वाजता पुण्याहून प्रवासाची सुरवात झाली.
प्रतिक्रिया
12 Nov 2017 - 12:53 am | कपिलमुनी
चला सफरीवर
12 Nov 2017 - 10:00 am | लोनली प्लॅनेट
वा.. सुरुवात तर छान झाली
मजा येणार प्रवास वर्णन वाचायला
12 Nov 2017 - 12:32 pm | mayu4u
ल टा
12 Nov 2017 - 1:15 pm | मराठी कथालेखक
EcoSport का ? डिजेल की पेट्रोल ? डिजेल इंडिका व्हिस्टा (फियाट इंजिन) ने असा प्रवास केला जावू शकतो का ? म्हणजे ग्राउंड क्लीअरन्सचा मुद्दा सोडल्यास थंडीत इंजिन स्टार्ट होणे आणि विरळ हवेतही नीट चालणे या दृष्टीने विचारत आहे.
12 Nov 2017 - 4:34 pm | अभिजीत अवलिया
फोर्ड फिगो डिझेल (२०१२ साली आलेले मॉडेल).
डिजेल इंडिका व्हिस्टाने प्रवास केला जाऊ शकतो. तिथले स्थानिक लोक मारुती ८००/अल्टो वगैरे गाड्या पण वापरताना दिसतील. पण ते सुद्धा अत्यंत विरळ. कुठलाही पर्यटकांचा ग्रुप मला हॅचबॅक कार मधून प्रवास करताना दिसला नाही. सर्वजण शक्यतो भाड्याची SUV घेऊनच फिरत होते. थंडीत/विरळ हवेत इंजिन स्टार्ट होणे थोडेसे त्रासदायक ठरते. त्यासाठी एक महत्वाचे म्हणजे कुठे अर्ध्या किंवा एक मिनिटाचा छोटा ब्रेक घेतल्यास गाडी बंद करायची नाही. सकाळच्या वेळी गाडी चालू होत नसेल तर जंप स्टार्ट केबल्स वापरून केली जाऊ शकते.
अन्य सर्व वाचकांचे देखील आभार.
12 Nov 2017 - 2:37 pm | भुजंगराव
खूप उत्कंठावर्धक सुरवात केली तांत्रिक बाबीचे वर्णन उत्तम
12 Nov 2017 - 4:56 pm | किसन शिंदे
वाचतोय. पुढील भागाच्या प्रतिक्षेत.
12 Nov 2017 - 8:24 pm | पगला गजोधर
वाचतोय... सुरुवात झकास.
13 Nov 2017 - 10:36 am | दुर्गविहारी
मस्त होणार लेखमाला !! सीट पकडली आहे. आने दो.
13 Nov 2017 - 12:17 pm | अमर विश्वास
यशस्वी सफरीबद्दल अभिनंदन ... हे एक व्यसन आहे.. पुढचा महिना जवळ आला परत जायचे वेध लागतील :)
13 Nov 2017 - 12:24 pm | खेडूत
अरे व्वा.
एकदाचा मुहूर्त सापडला लिहायला!!
छान सुरुवात. पुभाप्र..
13 Nov 2017 - 1:23 pm | मोदक
हेच म्हणतो.. फोटो बघण्यास उत्सुक..!
13 Nov 2017 - 12:54 pm | पाटीलभाऊ
चाल लडाखच्या सफरीवर...!
पु. भा. प्र.
13 Nov 2017 - 12:54 pm | पाटीलभाऊ
चला लडाखच्या सफरीवर...!
पु. भा. प्र.
14 Nov 2017 - 12:51 pm | केडी
पुढचा भाग लवकर येऊ देत!
14 Nov 2017 - 1:27 pm | शलभ
मस्त सुरुवात..
14 Nov 2017 - 8:15 pm | श्रीधर
यशस्वी सफरीबद्दल अभिनंदन ....
पुढील भागाच्या प्रतिक्षेत.
15 Nov 2017 - 4:04 am | एस
वाचतोय. खूप उपयुक्त माहिती आहे. पुभाप्र.
15 Nov 2017 - 5:49 pm | प्रविन ९
मस्त सुरूवात.... लवकर टाका पुढील भाग
एक शंका swift dezire चालेल का तिकडे ???
16 Nov 2017 - 7:07 am | अभिजीत अवलिया
swift dezire चालेल.
16 Nov 2017 - 8:01 am | चामुंडराय
होय, युअर डिझायर मस्ट बी स्विफ्ट टू ड्राइव्ह ऑल द वे टू लडाख :)
बाकी तुमची पूर्वतयारी अतिशय उत्तम आणि विचारपूर्वक केलेली. हि स्वयंचलित रथाची दौड वाचायला मज्जा येणार हे नक्की.
17 Nov 2017 - 7:29 am | प्रविन ९
Thnks
16 Nov 2017 - 2:21 pm | किल्लेदार
ठरल्याप्रमाणे जून मध्येच आला असता तर आपली भेट झाली असती.
18 Nov 2017 - 9:59 am | अजया
२०१८ लेहला जाणार आहे. श्रीनगरमार्गे. १० जून आत्ता तरी ठरवलंय. तुमच्या मालिकेचा उपयोग होईल.
18 Nov 2017 - 1:06 pm | स्वाती दिनेश
छान सुरूवात झाली आहे,
स्वाती