पुणे ते लेह (भाग ९ - द्रास ते निम्मू)

अभिजीत अवलिया's picture
अभिजीत अवलिया in भटकंती
29 Jan 2018 - 10:20 am

०१ सप्टेंबर
***************************************************************************************
-६० अंश सेल्सिअस

डोळे विस्फारलेली स्मायली. काय झाले असेल ह्या दिवशी द्रास मधील लोकांचे ?

द्रास या कायमस्वरूपी मानवी वस्ती असलेल्या जगातील दुसऱ्या सर्वात थंड ठिकाणाहून कारगिल कडे निघालो. आजचा पूर्ण दिवस कुणी ना कुणी लिफ्ट मागण्याचा होता. काकसर गावाच्या थोडे अलीकडे दोन शालेय मुलांनी लिफ्ट मागितली. दोघेही खारबु गावी शाळेत जात. त्यांना गाडीत घेऊन खारबु मधे सोडले. तर कारगिलच्या अलीकडे ७-८ किमीवर असताना दोन बहीण भावांनी गाडीला हात केला. दोघेही पहिली दुसरीत असावेत. त्यांना कारगिल मधे शाळेजवळ सोडले आणि एका हॉटेलात न्याहारी करून कारगिलच्या बाजारपेठेत एक फेरफटका मारला.

कारगिल हे लेह खालोखाल लडाख भागातील दुसरे मोठे शहर आहे. स्वान्त्र्यपूर्ण काळात लडाख ही एक वझारत होती ज्यात लेह, कारगिल आणि स्कर्दू असे तीन तालुके होते. १९७९ साली लेह जिल्ह्याचे विभाजन करून कारगिलला स्वतंत्र जिल्ह्याचा दर्जा देण्यात आला. अगोदरच्या भागात लिहिल्याप्रमाणे भारत पाक मधे काश्मीर वरून १९४८ साली युद्ध सुरु झाल्यावर पाकिस्तानने झोजी ला सह द्रास वर जवळपास कब्जा केला होताच. आणि त्यांनी कारगिल व लेह पण जिंकले असतेच. पण नंतर ऑपरेशन बायसन हाती घेऊन भारताने हा सगळा भाग परत जिंकून घेतला. ह्या युद्धानंतर कारगिल व लेह तालुके भारताच्या ताब्यात आले तर मेजर शेर जंग थापा ह्यांनी जेमतेम २८५ सैनिकांच्या मदतीने जवळपास ६ महिने पराक्रमाची शर्थ करून देखील जवळपासचा दारुगोळा, अन्यधान्य संपल्याने आणि त्यांच्यापर्यंत रस्तामार्गे/हवाईमार्गे मदत पोचवण्याचे सर्व प्रयत्न फोल ठरल्याने भारताला स्कर्दू वाचवता आले नाही.

(मेजर शेर जंग थापा आणि स्कर्दूच्या लढाईबद्दल इथे अधिक वाचता येईल.
https://en.wikipedia.org/wiki/Sher_Jung_Thapa

https://www.newslaundry.com/2017/08/16/sher-jung-thapa-skardu-gilgit-kar...
)

कारगिल मधूनच झंस्कार व्हॅली ट्रेक सुरु होतो. इथली एक गोष्ट सर्वप्रथम नजरेत भरली ती म्हणजे स्वच्छता. प्रत्येक छोट्या मोठ्या दुकानाच्या बाहेर एक सुक्या कचऱ्यासाठी आणि एक ओल्या कचऱ्यासाठी अशा कचरा पेट्या ठेवलेल्या होत्या.

कारगिलकडे जाताना

सुरु नदीच्या काठावर वसलेले कारगिल शहर

कारगिल वरून लेह ला जाण्यासाठी तीन रस्ते आहेत.
१) कारगिल - मुलबेख - साराकस - लामायुरू - अल्ची - निम्मू - लेह (आम्ही ह्या रस्त्याने गेलो. हा सध्याचा श्रीनगर लेह महामार्ग)
ह्या मार्गावर दोन मोठे ला म्हणजे पासेस लागतात.
* मुलबेखच्या पुढे असणारा नमिका ला (समुद्र सपाटीपासूनची उंची १२१९८ फूट) आणि
* लामायुरूच्या थोडे अगोदर असणारा फोटू ला (समुद्र सपाटीपासूनची उंची १३४७९ फूट)
फोटूला टॉप हा श्रीनगर लेह महामार्गावरचा सर्वात उंचीवरचा स्पॉट आहे. जरी हे दोन्ही 'ला' झोजिला पेक्षा जास्त उंचीवर असले तरी इथले रस्ते अतिशय चांगल्या स्थितीत असल्याने इथे गाडी चालवणे अजिबात त्रासदायक न्हवते.

२) कारगिल - बटालिक - धा - चिकतान - लामायुरू - अल्ची - लेह
३) कारगिल - बटालिक - धा - दर्गु - दमखर - खालसी - निम्मू - लेह
ह्या दोन्ही मार्गाने जायचे असल्यास बहुतेक इनर लाईन परमिट लागते. कारण हे रस्ते बटालिक सेक्टर मध्ये येतात.

कारगिलच्या थोडेच बाहेर आले असू आणि अचानक तिघांनाही खूपच अनावर झोप यायला लागली. मला तर माझे इंजिनीरिंगचे दिवस आठवले. त्यावेळी देखील वर्गात प्रचंड झोप येत असे. एका ठिकाणी सुरक्षित जागा बघून तिथे गाडी पार्क केली आणि गाडीतच अर्धा तास झोपून पुढे निघालो.

एका वळणावर अचानक हे अहि मही अन्य छोट्या राक्षसांसह समोर आले.

पूर्ण हिमालय भागात रस्त्यावर हे असले मोठाले दगड पडलेले असण्याची शक्यता खूप जास्त. त्यामुळे वळणावर खूपच काळजीपूर्वक राहणे गरजेचे. अन्यथा चुकून गाडी धडकली तर तर तर .....

मला आवडलेले एक घर

१२ वाजता मुलबेख आले. इथे मैत्रेय बुद्धाची एक मूर्ती आहे. मैत्रेय बुद्ध हा गौतम बुद्धाचा भविष्यात अवतरणारा अवतार आहे. इथल्या छोट्या गोम्पा मध्ये देखील गेलो. एक लामा प्रार्थना करत बसले होते. त्यामुळे आतले फोटो जास्त काढले नाहीत.

मुलबेख मधील मैत्रेय बुद्ध

आणि हा १२१९८ फूट उंची असलेला नमिका ला

नमिका ला पार करून जाताच बोधखारबु नामक गाव आले. इथे लष्कराचे एक कॅन्टीन होते. इथे जेवण केले. जेवण म्हणजे नेहमीप्रमाणे मॅगी आणि आपल्या वडापावचा भाऊ बडापाव नामक एक पदार्थ.

१३४७९ फूट उंचीवर असलेला फोटू ला

नमिका ला आणि फोटू ला ह्या दोन्ही ठिकाणी बायकोला विरळ हवेच्या त्रासाने डोके दुखणे वगैरे प्रकार सुरु झाले. High Altitude Sickness हा कुणालाही अचानक हिसका दाखवतो आणि तो जीवघेणा देखील असू शकतो असे वाचले होते. त्यामुळे कधीही ह्या उंचीवरच्या ठिकाणी जास्त वेळ थांबू नये. दोन चार फोटो काढून लगेच खाली उतरने श्रेयस्कर.

नमिका ला ते फोटू ला प्रवासातील काही दृश्ये

फोटू ला पार करताच लामायुरू गाव आले.

लामायुरू गाव

एकदा मुलबेख आले की तिथून पुढे प्रत्येक छोट्या मोठ्या गावी दिसते ती म्हणजे एक तरी मॉनस्टरी आणि जागोजागी दिसणारे माने. मॉनस्टरी म्हणजे बुद्धिस्ट लोकांचे प्रार्थनास्थळ. अतिशय स्वच्छ, टापटीप, आणि आतून बाहेरून सुंदर चित्रे काढलेल्या ह्या मॉनस्टरी फारच शांत असतात. ना कुठला गोंधळ, ना गडबड. लामायुरू मॉनस्टरीला ५०रू. प्रवेश फी आहे. लहान मुलांना फुकट प्रवेश. इथे मला एक जर्मन नागरिक भेटला. तो दोन वर्षांपूर्वी इकडे पहिल्यांदा फिरायला आला होता. हा पूर्ण लडाख भाग त्याला इतका आवडला की दर दोन वर्षांनी तरी इकडे येण्याचा मानस त्याने बोलून दाखवला.

लामायुरू मॉनस्टरी मधील माने

प्रत्येक मॉनस्टरी मध्ये हे असलेच पाहिजे. हे गोल फिरवल्याने मनातील इच्छा पूर्ण होतात अशी श्रद्धा आहे बहुतेक लडाखी लोकांची.

मॉनस्टरी बघून पुढे निघताच मुनलॅन्ड आले.
लामायुरू मधील मुनलॅन्ड

लामायुरू मध्ये काही भागात हे असे एकदम वेगळे डोंगर आहेत. हे डोंगर चंद्रा वरच्या डोंगराप्रमाणे आहेत असे म्हणतात. त्यामुळे ह्यांना मुनलॅन्ड म्हटले जाते. हे नक्की खरे आहे का हे खगोल शास्त्रज्ञानाच माहीत.

अजून काही विचित्र आकार

इथे थोडा वेळ थांबून पुढे निघालो आणि ५ च्या दरम्यान एक पंजाबी धाब्यावर चहासाठी विश्रांती घेतली. धाब्याच्या बाजूने नैसर्गिक पाण्याचा झरा वाहत होता. त्यातले पाणी जवळच्या कंटेनर मध्ये भरून घेतले.

धाबा

पुढे दोन युवतींनी लिफ्ट मागितली. त्यांना गाडीत घेऊन कुठे जायचेय असे विचारले तर उत्तर आले सासपोल. खरंतर आम्हाला वाटेत असलेल्या अल्ची गावी जाऊन तिथली मॉनस्टरी बघायची होती. पण अल्ची साठी सासपोलच्या आधीच एक रस्ता आहे. आता ह्यांना असे अर्धवट वाटेत सोडणे योग्य नाही त्यामुळे अल्ची रद्द करून त्यांना सासपोल मध्ये सोडून पुढे निघालो.

सासपोल ते लेह रस्ता

आम्ही आजच लेह गाठू शकलो असतो. पण लेह ला गेलो असतो तर निम्मू मधील सिंधू झंस्कार संगम आणि मॅग्नेटिक हिल पाहण्यासाठी परत दुसऱ्या दिवशी मागे यावे असते. ते टाळण्यासाठी निम्मू मधेच मुक्काम करण्याचे ठरवले आणि निलजा नामक होमस्टे वर मुक्काम केला.

प्रतिक्रिया

कपिलमुनी's picture

29 Jan 2018 - 1:28 pm | कपिलमुनी

लेख आणि प्रचि आवडले.
सगळे भाग सुंदर !
प्रत्येक भागावर प्रतिक्रिया देणे जमत नाही पण आवर्जुन वाचतो

असेच म्हणतो.

केल्याने पॅसिव्ह देशाटन
मज येतसे चातुर्य फार !

सुबोध खरे's picture

30 Jan 2018 - 6:44 pm | सुबोध खरे

तंतोतंत +१

त्या मोनास्टरी च्या बाहेरच्या भिंतीचा फोटो [वरून फोटो क्रमांक १४] श्वेत धवल मध्ये टाक .... फारच सुरेख दिसतील ते प्रेयर व्हील्स ...बाकी तो शेवटचा रस्त्याचा फोटो चे कंपोझिशन लाजवाब!

लवकर पुढचा भाग येऊ देत ....

अभिजीत अवलिया's picture

30 Jan 2018 - 9:32 am | अभिजीत अवलिया

@केडी,
तोच फोटो कृष्ण धवल मध्ये.

केडी's picture

30 Jan 2018 - 10:30 am | केडी

एक नंबर!

मराठी कथालेखक's picture

29 Jan 2018 - 3:22 pm | मराठी कथालेखक

लडाखमधील जनजीवन समजू शकेल असे फोटोज असतील तर कृपया टाका (गाव /शहराच्या मुख्यवस्तीतील घरे, रस्ते, दुकाने, शाळा ई)

वाह! अत्यंत सुंदर भाग आहे हा सगळा. छायाचित्रे आणि लेखन दोन्ही छान!

सुरेख. जसे जमेल तसे वाचते आहे.
फोटो आवडताहेत.

डॉ सुहास म्हात्रे's picture

29 Jan 2018 - 10:36 pm | डॉ सुहास म्हात्रे

या लेखातले फोटो खास आवडले ! मस्तं सफर चालली आहे !

पैसा's picture

29 Jan 2018 - 10:42 pm | पैसा

खूप छान होत आहे मालिका.

प्रचेतस's picture

30 Jan 2018 - 8:45 am | प्रचेतस

हा भागही खूप आवडला.
काश्मीरखोर्‍यातील हिरवाई कमीकमी होत जाउन लडाखमधील रखरखाट अधिक वाढताना जाणवतोय. तुमच्याबरोबरच प्रवास केल्याचा फील येतोय.

अभिजीत अवलिया's picture

30 Jan 2018 - 9:36 am | अभिजीत अवलिया

@मकले साहेब,
पुढच्या भागांमध्ये त्याबद्दल लिहितो. किंवा एखादा स्वतंत्र भाग करता येईल का ह्याचा विचार करतोय.

@प्रचेतसजी,

काश्मीरखोर्‍यातील हिरवाई कमीकमी होत जाउन लडाखमधील रखरखाट अधिक वाढताना जाणवतोय.

होय. रखरखाट म्हणजे अक्षरश: गवताचे पाते पण दिसताना मुश्किल अशी परिस्थिती काही ठिकाणी आहे. :)

अन्य सर्व वाचकांचे देखील आभार.

राजाबाबु's picture

30 Jan 2018 - 12:34 pm | राजाबाबु

मस्तं खूप छान......

अनिंद्य's picture

30 Jan 2018 - 3:38 pm | अनिंद्य

हा भागही आवडला.

मराठी कथालेखक's picture

30 Jan 2018 - 3:55 pm | मराठी कथालेखक

लडाखमध्ये कोणती भाषा बोलली जाते ? तुम्हाला भाषेची काही अडचण आली का ?

अभिजीत अवलिया's picture

31 Jan 2018 - 8:35 am | अभिजीत अवलिया

कारगील भागात उर्दू. आणि लेह जिल्ह्यात लडाखी (जिला बोधी असेही म्हणले जाते.)

आपल्याकडे जशा मालवणी, वर्हाडी, खानदेशी, प.महाराष्ट्रातील घाटी अशा मराठीच्या विविध बोली आहेत तशाच लडाखीच्या देखील आहेत.

भाषेची काही अडचण येत नाही. हिंदी/इंग्रजी सर्वत्र बोलतात तिथे.

श्रीधर's picture

30 Jan 2018 - 6:32 pm | श्रीधर

फोटो आणि वर्णन खूप आवडले

मस्तच झालाय हा भाग. फोटोही खूप सुंदर!

किल्लेदार's picture

1 Feb 2018 - 1:14 am | किल्लेदार

आलची आणि लिकीर गोम्पा सुद्धा बघण्यासारख्या आहेत. आलची जवळच्या डोंगरांची रंगसंगती तर अफलातून आहे. थाजीवास ग्लेशिअर साठी तुम्हाला रिटर्न गिफ्ट्स.....

लिकीर गोम्पा...
IMG_4429_edited

आलची जवळ...
IMG_4122_edited_edited

निशाचर's picture

1 Feb 2018 - 4:28 am | निशाचर

सुरेख फोटो!

अभिजीत अवलिया's picture

1 Feb 2018 - 8:29 am | अभिजीत अवलिया

मस्त आहे लिकीर गोम्पा आणि आलची.
उघडे बोडके डोंगर किती सुंदर दिसू शकतात हे लडाखला गेल्यावर समजले.

दुर्गविहारी's picture

5 Feb 2018 - 6:20 pm | दुर्गविहारी

अफलातून फोटो आणि समर्पक वर्णन. रुक्ष वाळवंटात देखील किती सौंदर्य असते हे या फोटोतून दिसते. किल्लेदार यांनी टाकलेले फोटोसुध्दा छान आहेतच. सर्वच फोटोंचे कॉम्पोझिशन उत्तम जमले आहे. पु.ले.शु.