गुमरी मधून पुढे निघालो आणि अजस्त्र पर्वतांनी स्वागत केले. दूर दूर पर्यंत फक्त आकाशाला स्पर्श करू पाहणारे पर्वत. श्रीनगर लेह महामार्गाच्या सुरक्षेसाठी जागोजागी तैनात असलेले सैनिक आणि रस्ता दुरुस्तीचे काम करणारे कामगार सोडले तर अन्य मानवी अस्तित्व फारसे नाहीच. गुमरी ते द्रास पर्यंतच्या प्रवासात एखादेच छोटेसे गाव लागले असेल. हा तसा अवर्षणग्रस्त प्रदेश असल्यामुळे थोडेफार खुरटे गवत सोडले तर एक झाड दिसायची मारामार. अवर्षणग्रस्त असला तरी ग्लेशिअरचे बर्फ वितळून वाहणारे पाणी भरपूर. खूपच टाईमपास करत ४:३० च्या दरम्यान द्रास मध्ये पोचलो.
गुमरी ते द्रास प्रवासातील काही दृश्ये
कृष्णधवल प्रयत्न
द्रास म्हणजे 'गेटवे टू लडाख'. कारगिल जिल्ह्यातील अगदी छोटे गाव आहे. कारगिल आणि लेह हे लडाख भागातील दोन जिल्हे. कारगिल मुस्लिम बहुल तर लेह बौद्ध बहुल जिल्हा.
'द्रास मध्ये काही नाही. कारगिल मध्ये मुक्काम करा.' - सकाळी झोजिला वर भेटलेल्या सैनिकांनी सल्ला दिला होताच. पण आम्ही द्रासच फायनल केले. कारण काल सोनमर्ग मध्ये मुक्काम झाला होता जे समुद्र सपाटीपासून २८०० मी. उंचीवर आहे. त्यामुळे आज कालच्या तुलनेत अजून उंच ठिकाणी मुक्काम करणे फायद्याचे होते. त्यामुळे शरीर अजून उंचीवरच्या विरळ हवेला सरावले असते. त्यामुळे कारगिल सारख्या कमी उंचीच्या (२६७६ मी). ठिकाणी राहण्यापेक्षा द्रासची (३२८० मी.) निवड केली. इथे देखील भयानक थंडी होती. द्रास ही कायमस्वरूपी मानवी वस्ती असलेली जगातील दुसरी सर्वात थंड जागा आहे. हिवाळ्यात इथले तापमान -२५ अंश सेल्सिअस पर्यंत खाली जाते. २०-२५ फूट बर्फ असतो. तरी देखील इथे लोक कायस्वरूपी राहतात. ९ जानेवारी १९६० रोजी तर इथले तापमान -६० अंश सेल्सिअस इतके खाली गेले होते.
गावात गाडी थांबवून एकदा छोटेखानी बाजारपेठ पालथी घातली. मुक्कामासाठी दोनच पर्याय दिसले. अगोदर एका लॉज मध्ये गेलो. अतिशय वाईट स्थितीत असलेली बैठी इमारत होती. त्यामुळे तिथून निघून त्याच्या पासून जवळच असलेल्या जम्मू काश्मीर टुरिझमच्या हॉटेल मध्ये जाऊन डोकावलो. तर तिथे चिटपाखरू देखील दिसेना. नुसती स्मशान शांतता. मिनिटभर तिथे थांबून कुणी येतेय का, दिसतेय का ह्याचा कानोसा घेतला पण कुणीच दिसेना. बहुतेक पहिल्या लॉजवरच मुक्काम करावा लागेल आपल्याला असे वाटून परत बाहेर निघालो तेवढ्यात ...
'अस सलाम अलैकुम सर ...' - एका आजोबानी हॉटेलच्या बाजूच्या बिल्डिंग मधून हाक मारली. (अस सलाम अलैकुम असाच उच्चार आहे ना?)
'रुकीये रुकीये. में आ रहा हूं.'
लगेच ते आले. अंदाजे ७५ च्या आसपास वय. अंगात खादीचे कपडे. चेहऱ्यावर स्मित हास्य आणि आवाजाबद्दल काय बोलावे? एकच विचार डोक्यात आला. आपला आवाज पण ह्या आजोबांच्या आवाजासारखा असता तर ?
मी नमस्कार केला.
'कहीये. क्या सेवा करू आपकी?'
'यहां रहने का इंतजाम हो सकता है?'
'बिलकुल होगा. चलीये. में आपको कमरा दिखाता हूं.'
लॉज मध्ये २ प्रकारच्या खोल्या होत्या. एका ४०० रु. भाड्यावाली आणि दुसरी ६०० रु. साधासा असला तरी इतक्या कमी भाड्यात लॉज मिळू शकतो म्हणजे नवलच. दोन्ही प्रकारच्या खोल्या सारख्याच होत्या. फक्त ६०० रु. भाडे असलेल्या खोलीला एका अतिरिक्त छोटी खोली होती ज्यात सोफा आणि टीपॉय होते. चहा पिण्यासाठी सोय. पण त्या सोफ्यावर बसून पिण्यासाठी लागणारा चहा काही तिथे मिळत न्हवता बहुतेक. त्यामुळे ४०० रु. भाड्यावाली खोली घेतली.
मी भाड्याचे पैसे काढून त्यांच्याकडे देऊ लागलो तर 'पैसा कहाँ जा रहा है भागकर? बादमे आता हूं.' असे बोलून निघून गेले.
खोलीची चावी घेऊन बाहेर गेलो आणि गाडी आत आणून लावली. गरजेपुरते सामान गाडीतून काढून रूमवर नेऊन टाकले. अजून बराच वेळ शिल्लक होता त्यामुळे कारगिल वॉर मेमोरियल उद्यावर ढकलण्यापेक्षा आत्ताच बघून येऊ असे ठरवले. १९९९ साली झालेल्या कारगिल युद्धाचे स्मारक 'कारगिल वॉर मेमोरियल' प्रत्यक्षात द्रास मध्ये आहे. जास्त युद्ध देखील द्रास मधेच झाले होते. श्रीनगरला बाय बाय केल्यानंतर इंटरनेटने पण आम्हाला बाय बाय केले होतेच. त्यामुळे कुणाला तरी विचारने हाच एक पर्याय उरला होता.
लॉजच्या खाली येताच लॉज परिसरात एक महिला दिसली.
'यहां करगिल वॉर मेमोरियल' कहां है?' - बायकोचा त्यांना प्रश्न
'पता नहीं.'
एकदम निरेच्छेने उत्तर देऊन ती निघून गेली. बहुतेक हा प्रश्नच तिला आवडला नाही.
बाहेर आलो. एका हॉटेलात चहा पिऊन तिथे उभ्या असलेल्या एका मुलाला विचारले. उत्तर तेच. 'पता नहीं.'
अजून थोडे पुढे गेलो. तिथे काही माणसे उभी होती. त्यांना विचारले. आणि परत उत्तर आले. 'पता नहीं.'
बघितले तर जेमतेम १२०० लोकवस्तीचे हे गाव. इतक्या छोट्या गावातले हे इतके प्रसिद्ध स्मारक कुठे आहे ते माहीत नाही?
कारगिल युद्धातील भारताचा विजय हा ह्या लोकांची दुखरी नस असेल असा मी अंदाज बांधला. फक्त अंदाज. खात्री नाही.
त्यामुळे 'आता ?' ह्या बायकोच्या प्रश्नाला 'इथल्या स्थानिक लोकांना विचारण्यात काही पॉईंट नाही. बहुतेक कुणी सांगणार नाही आपल्याला. एखादी मिलिटरीची गाडी दिसेलच इथे. त्यांना विचारूया.' असे उत्तर दिले व पुढे निघालो.
पुढे एक लष्कराची गाडी दिसली. गाडीच्या ड्रायव्हर सैनिकाला विचारले.
'सिधा जाईये ६-७ किलोमीटर. लेफ्ट में बहुत बडा तिरंगा दिखेगा. वही है मेमोरियल.' - सैनिक
१० मिनिटात तिथे पोचलो. श्रीनगर लेह महामार्गावर द्रास पासून ६-७ किमी अंतरावर आहे हे मेमोरियल.
कारगिल वॉर मेमोरियल
ह्या झेंड्याच्या मागे जो डोंगर दिसतोय ती आहे टोलोलिंग रेंज.
टोलोलिंग रेंज
ह्यावर देखील पाकिस्तानने एक चौकी बसवली होती.
'टोलोलिंगच्या मागे अजून एक डोंगर रांग आहे जी आपल्या हद्दीत आहे आणि त्याच्या पलीकडे पाकिस्तान' अशी माहिती एका सैनिकाने दिली.
बोफोर्स तोफ
इथे लिहिलेल्या एका फलकावरील माहितीनुसार कारगिल युद्धात बोफोर्स मधून २.५ लाख पेक्षा जास्त राऊंड फायर केले गेले. शत्रूचे जितके घुसखोर मारले गेले त्यातील तब्बल ८०% पेक्षा जास्त एकट्या बोफोर्सने संपवले. ह्यावरून ह्या तोफेचे महत्व लक्षात यावे. दुर्दैवाने ही तोफ तिच्या पराक्रमापेक्षा अन्य कारणामुळेच चर्चेत राहिली असे वाटत नाही का?
वीर भूमी (ही फक्त कारगिल युद्धातील शहिदांची वीरभूमी नाही)
इथे लष्कराचे एक कॅन्टीन आणि भेटवस्तूंचे दुकान देखील आहे. जवळपास दीड तास मेमोरियल मध्ये थांबून परत लॉजवर आलो. 'ते' आजोबा आले आणि त्यांच्याकडच्या रजिस्टर मध्ये आमची नावे लिहून पैसे घेऊन गेले.
इकडे आलोय तर इकडचे पदार्थ खाऊन बघू असा विचार करून रात्रीच्या जेवणात नेहमीच्या पदार्थांबरोबरच एक लडाखी पदार्थ घेऊ असे ठरवले.
'ये स्क्यू मिलेगा ?' स्क्यूच्या लिस्ट मधील एका स्क्यूवर बोट ठेऊन वेटरला विचारले.
'आप लोग यहां के दिखते नहीं हो. नहीं पचा पायेंगे उसे.' - वेटर.
इथल्या लोकांची चेहरेपट्टी वेगळीच होती. उभट चेहरा, टोकदार नाक, त्वचेचा पोत पण वेगळा. आपले वेगळेपण उठून दिसते इथे.
मग त्याच्याच सांगण्यावरून दुसरा एक पदार्थ घेतला. आता नाव विसरलो त्याचे. बार्लीच्या धान्यापासून बनवलेला केक सारखा आकाराचा होता आणि मधोमध तूप. तुपाचे आणि माझे प्रचंड वाकडे असल्याने मी बाजूचा थोडा थोडा भाग काढून खाल्ला. जितके त्या पदार्थाचे नाव विचित्र होते तितकीच चव. अजिबात आवडला नाही. केवळ वेटरला वाईट वाटू नये म्हणून 'कैसा लगा ये ?' या त्याच्या प्रश्नाला 'अच्छा है' असेच म्हणालो. बाकीचे जेवण उत्तम होते.
थोड्या वेळाने हॉटेलचा मालक आला. कुठून आलाय, कसे आलाय, श्रीनगर कसे वाटले ही चौकशी करून झाली. मग अचानक काय झाले त्याला हसायलाच लागला.
'पागल है ये कश्मिरी लोग. जब देखो तब पत्थरबाजी, कर्फ्यू, बंद. जिना मुश्किल कर दिया है. में भी श्रीनगर का हूं. बहुत परेशान हो गया. फिर इधर आकर ये होटल चालू किया. ६-७ महिने ये चलाता हूं. फिर सर्दीयों में श्रीनगर जाकर रुकता हूं. वैसे तो जाना भी नहीं चाहता कभी उधर लेकिन सर्दीयों में मजबुरन जाना पडता है. इधर २०-२५ फीट बर्फ होती है ऊस वक्त...... वैसे टुरिस्ट को कश्मीर में कोई कुछ नहीं करेगा. हां. सिर्फ हिंदुस्थान का झंडा लेकरं खुलेआम मत घुमना. दिक्कत हो सकती है.' - हॉटेल मालक.
त्यांच्याशी बोलणे आटोपून रूम एका स्थानिक दुकानातून ऍप्रिकॉट खरेदी करून आजचा दिवस संपला.
प्रतिक्रिया
14 Jan 2018 - 9:12 pm | शलभ
हा ही भाग मस्त..
14 Jan 2018 - 9:41 pm | मराठी कथालेखक
छान
15 Jan 2018 - 8:37 am | राघवेंद्र
मस्त चालु आहे सफर!!! हा ही भाग आवडला.
15 Jan 2018 - 9:03 am | प्रचेतस
तपशील्वार माहिती आणि त्याला पूरक छायाचित्रे असल्याने वर्णन वाचायला खूपच मजा येतेय.
15 Jan 2018 - 10:32 am | केडी
....हा देखील भाग मस्त, आणि फोटो तर लाजवाब!
15 Jan 2018 - 1:23 pm | एस
वाचत आहे. बरीच उपयुक्त माहिती मिळते आहे. पुभाप्र.
15 Jan 2018 - 2:13 pm | अनिंद्य
मस्त सफर !
पु भा प्र
15 Jan 2018 - 4:27 pm | श्रीधर
+1
16 Jan 2018 - 2:17 pm | कपिलमुनी
पु भा प्र
16 Jan 2018 - 2:48 pm | पद्मावति
सुंदर फोटो आणि लेखन
कारगिल मेमोरियल विषयीची स्थानिकांची अनास्था धक्कादायक आणि दुर्दैवी आहे.
सिर्फ हिंदुस्थान का झंडा लेकरं खुलेआम मत घुमना. दिक्कत हो सकती है.'
हे तर फारच वाईट :(17 Jan 2018 - 8:36 am | अभिजीत अवलिया
ह्या अनास्थेचे कारण हे लोक स्वत:ला भारतीय मानत नाहीत हे असावे. त्यामुळे आपल्याला कितीही वाईट वाटले तरी हे चित्र एक दिवस बदलेल अशी आशा ठेवत सध्या जी वस्तुस्थिती आहे ती स्वीकारण्याशिवाय पर्याय नाही.
अन्य सर्व वाचकांचे देखील आभार.
29 Jan 2018 - 10:29 pm | यशोधरा
फोटो आवडले!
कारगिल युद्धातील भारताचा विजय हा ह्या लोकांची दुखरी नस असेल असा मी अंदाज बांधला. फक्त अंदाज. >> खरेच असेल का असे? :(
29 Jan 2018 - 10:40 pm | डॉ सुहास म्हात्रे
मस्तं लेख. इथे जायचेच आहे, पण, फोटो पाहून ही जागा यादीत वरच्या जागी गेली आहे.
29 Jan 2018 - 10:45 pm | पैसा
सुरेख भाग हाही
30 Jan 2018 - 9:17 am | अभिजीत अवलिया
@यशोधरा ताई,
नक्कीच असेल. काश्मीर खोऱ्यात विशेष करून श्रीनगर मध्ये पावलोपावली भारत विरोधी/पाकिस्तान समर्थनाच्या घोषणा भिंतींवर रंगवलेल्या दिसतील. बहुतांश लोक आपल्याशी थोडे अंतर ठेवून वागतात असे जाणवत राहते.
डॉक्टर साहेब,
काढा दौरा. तुमच्यासारख्या भटकण्याची आवड असलेल्या व्यक्तीला निश्चित आवडेल :).
पैसा ताई,
तुमचे पण आभार.