२ सप्टेंबर
अतिशय टापटीप खोली, जेवणासाठी लडाखी बैठक व्यवस्था, काल रात्रीचे चवदार जेवण आणि आज केलेली न्याहारी. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे होमस्टे चालवणारे प्रेमळ कुटुंब. एकंदरीत काल रात्री निम्मू पासून ३-४ किमी पुढे जाऊन परत मागे फिरून निलजा होमस्टे मध्ये पथारी पसरली ते योग्यच झाले. फक्त गरम पाण्याची थोडी बोंब होती. म्हणजे प्रत्येक रूमला स्वतंत्र इलेक्ट्रिक गीझर ऐवजी एक मोठा सामायिक सोलर गीझर होता. ज्यातून तितकेसे गरम पाणी येत न्हवते. पण तरीही आंघोळीला सुट्टी नाही.
जेवणासाठी असलेली लडाखी बैठक व्यवस्था (निलजा होमस्टे)
आज कसलीच घाई न्हवती. कारण लेह हाकेच्या अंतरावर उरले होते. आतापर्यंत कापलेल्या जवळपास ३००० किमीच्या तुलनेत निम्मू ते लेह हे जेमतेम ३४ किमी अंतर म्हणजे हाकेचे अंतरच म्हटले पाहिजे. त्यामुळे सगळं सुशेगात आवरून सकाळी ९ वाजता निम्मू मधून निघालो. सर्वप्रथम गावापासून जवळच असलेला सिंधू व झंस्कार नद्यांचा संगम गाठला. श्रीनगर लेह महामार्गावरून ह्या नद्यांपर्यंत चारचाकी गाडी घेऊन जाता येईल इतका उत्तम रस्ता आहे.
सिंधू झंस्कार संगमाकडे जाणारा रस्ता
दोन्ही नद्यांना ग्लेशिअर मधील बर्फ वितळून पाणी येऊन मिळत असल्याने पाणी प्रचंड थंड होते. त्यामुळे जास्त वेळ पाण्यात हात घालून बसण्याची हिम्मत मात्र झाली नाही. संगमावरून मागे येऊन लेहला निघालो आणि एका ठिकाणाहून नद्यांच्या संगमाचे हे विहंगम दृश्य दिसले.
सिंधू झंस्कार नद्यांचा संगम (टॉप व्ह्यू)
फोटोत डावीकडून येणारी नदी सिंधू असून वरून येणारी झंस्कार आहे. संगमानंतर ती सिंधू बनून पुढे जाते. दोन्ही नद्यांच्या पाण्यातील फरक देखील अगदी स्पष्ट दिसून येतो.
हे दृश्य बघण्यासाठी थोडे कष्ट आहेत मात्र. महामार्गवरून एका ठिकाणी बऱ्याच पायऱ्या आहेत. त्या चढून वर गेल्यावर 'व्ह्यू पॉईंट' बांधलेला आहे. तिथून फोटो क्रमांक ३ मधील दृश्य दिसते.
व्ह्यू पॉईंट कडे जाणाऱ्या पायऱ्या
अगोदर सहज चढून जाऊ असे वाटणाऱ्या ह्या पायऱ्या चढून जाईपर्यंत प्रत्यक्षात चांगलाच दम लागला.
व्ह्यू पॉईंट वरून पुढे लेह येईपर्यंत मॅग्नेटिक हिल, गुरुद्वारा पत्थर साहिब आणि लेहच्या ४-५ किमी अगोदर येणारे 'हॉल ऑफ फेम' हे म्युझिअम हे ३ स्पॉट येतात.
मॅग्नेटिक हिल - हा थोडासा संशयास्पद प्रकार आहे. इथे BRO ने रस्त्यावर एक मार्किंग केलेले आहे. जर त्या मार्किंग केलेल्या पट्ट्यावर गाड्या न्यूट्रल मध्ये ठेवल्या तर पुढच्या चढावावर(*) आपोआप वेगात पुढे जातात. आणि त्या खरेच जातात. पण हा मॅग्नेटिक हिल वगैरे प्रकार नसून 'Optical Illusion' चा प्रकार आहे असे वाचनात आलेय. इथल्या डोंगरांच्या विशिष्ट रचनेमुळे प्रत्यक्षात थोडासा उताराचा असलेला रस्ता आपल्या डोळ्यांना चढावाचा भासतो अशी माहिती आहे.
*माझी केस तर वेगळीच होती. मला रस्ता उताराचाच दिसत होता.
मॅग्नेटिक हिल जवळचा रस्ता
इथून पुढे निघालो. गुरुद्वारा पत्थर साहिब बाहेरूनच बघितले. आणि शेवटी एकदाचे लेहच्या वेशीवर पोचलो. जवळपास ४५००० स्क्वेअर चौरस किमी क्षेत्रफळ असणारा लेह जिल्हा हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील दुसरा सर्वात मोठा जिल्हा आहे. शहराच्या ४-५ किमी आधी असणारे 'हॉल ऑफ फेम' हे म्युझिअम, शहराच्या दुसऱ्या टोकाला असणारा शांती स्तूप, जवळपास नष्ट झालेला लेह पॅलेस आणि लडाख मध्ये यत्र तत्र सर्वत्र दिसणारे गोम्पा हे सोडले तर लेह शहरात फारसे काही नाही. लेह ही लडाख भागातील मोठी बाजारपेठ आहे. मे चा शेवट ते ऑक्टोबर - नोव्हेंबर पर्यंत लेह उर्वरित भारताशी रस्ता आणि विमान मार्गाने जोडलेले असते तर इतर वेळी विमानप्रवास हा एकमेव पर्याय.
हॉल ऑफ फेम म्युझिअम
'हॉल ऑफ फेम' मध्ये भारताच्या आतापर्यंत झालेल्या युद्धांत जे अतुलनीय पराक्रम गाजवले गेले आहेत त्यांची माहिती, पाकिस्तानकडून जप्त केल्या रायफली, अन्य शस्त्रे, डोंगराळ व बर्फ़ाळ भागात सैन्याकडून वापरले जाणारे साहित्य आणि कपडे बघायला मिळतील. इथे २ तास म्युझिअम पाहून लेह शहरात प्रवेश केला.
अत्यंत छोटे रस्ते आणि गल्ल्या, पार्किंगची फारशी सोय नाही हे लेहचे पहिले दर्शन काही आवडले नाही. गेल्या काही वर्षात ह्या भागात पर्यटन हाच मुख्य व्यवसाय झाल्यासारखे आहे. त्यामुळे बहुसंख्य स्थानिक लोकांनी होमस्टे आणि टुरिस्ट टॅक्सी हे दोन धंदे चालू केलेत. प्रत्येक गल्लीबोळात, अगदी प्रत्येक बिल्डिंग किंवा घरात होमस्टे आहेच. इथे टॅक्सी स्टॅन्ड जवळ असलेल्या पार्किंग मध्ये सोमण नावाचा एक ट्रॅव्हल एजन्ट भेटला. खारदूंग ला, तुर्तुक, चांग ला, पॅंगॉन्ग, त्सो मोरिरी, चुशुल सह सर्व सीमावर्ती भाग हा संरक्षित क्षेत्र आहे. त्यामुळे इथे जायचे असल्यास काश्मीर सोडून अन्य भारतीय राज्यातील नागरिकांना ठिकाणी जायला 'इनर लाईन परमिट' (ILP) घ्यावे लागते असे समजले. (अरुणाचल प्रदेश, मिझोरम आणि नागालँड इथे देखील प्रवेश करण्यासाठी अन्य राज्यातील नागरिकांना ILP घ्यावे लागते. तर परदेशी नागरिकांना Protected Area Permit घ्यावे लागते). २०१६ मध्ये भारतीय नागरिकांना केवळ Self Declaration देऊन लडाखच्या सीमावर्ती भागात जाता येत होते. हा Self Declaration चा फॉर्म फोटोकॉपीच्या दुकानात मिळत असे. असे फॉर्म घ्यायचे, त्यात आपली माहिती भरायची आणि जिथे जिथे प्रवेश करायला तो द्यावा लागतो तिथे एक फॉर्म द्यायचा अशी पद्धत होती. पण ह्या वर्षी 'ILP' आवश्यक केले होते जे लेहच्या DC ऑफिस मधून दिले जाते. हे नियम दर वर्षी बदलत असल्याने शक्यतो जाण्यापूर्वी खात्री करून घ्यावी. जर ILP आवश्यक असेल तर ऑनलाईन आवेदन करून ठेवावे आणि लेहला पोचल्यावर तिथल्या DC ऑफिस मधून आपण ते गोळा करू शकतो. (ऑनलाईन आवेदन इथे करता येईल http://www.lahdclehpermit.in/contactfl.php) किंवा दुसरा पर्याय म्हणजे इथले बहुतेक ट्रॅव्हल एजंट कागदपत्रे दिल्यावर हे परमिट काढून देतात. पहिला पर्याय बाद झाल्याने सोमण कडे पासपोर्टची फोटोकॉपी आणि फॉर्म वर माहिती भरून दिली दिली आणि एका होमस्टे वर रूम घेतली. जेव्हा सोमणकडे फॉर्म भरून दिला तेव्हा १ वाजून गेला होता. जर आज परमिट मिळाले नाही तर पुढचे २ दिवस लेह मधेच थांबण्यात वाया गेले असते. कारण दुसऱ्या दिवशी रविवार होता म्हणजे ऑफिस बंद. त्यामुळे परमिट सोमवारी मिळाले असते आणि मंगळवारपासून पुढचा प्रवास करावा लागला असता. ४ च्या दरम्यान सोमणला फोन केला तर साहेबाचा नंबर स्वीच ऑफ. आता मात्र थोडी धाकधूक वाटू लागली. ह्याला कुठे शोधायचा? हा नक्की परमिट आणून देईल का? थोड्या वेळाने परत फोन केला. ह्या वेळी मात्र सोमणने फोन उचलून परमिट मिळाल्याचे सांगितले आणि साडेचार वाजता टॅक्सी स्टॅन्ड जवळ आणून पण दिले. सोमणचे आभार मानून लेह मधल्या खरेदीसाठी प्रसिद्ध असलेल्या 'चंगस्पा मार्केट' आणि मेन मार्केट मध्ये एक फेरी मारली. अन्य काही गोष्टींबरोबरच दोन वेगवेगळ्या प्रकारचे कहावा विकत घेतले. पण सोनमर्ग किंवा गुमरी मधील मिलिटरीच्या कँटीनमध्ये पिलेल्या कहावाची चव तर सोडाच साधा रंग देखील आम्ही घरी बनवलेल्या कहावाला अजूनपर्यंत आलेला नाही. सगळे फिरून रात्री होमस्टेवर आलो. आज रात्रीचे जेवण होते एक लडाखी पदार्थ 'खबीर'. संध्याकाळी मुख्य मार्केट मध्ये फिरत असताना एका फक्त स्त्रियांनी चालवलेल्या छोट्या हॉटेलात चहा पिण्यासाठी गेलो होतो. तिथे चहाबरोबर खबीर नामक पदार्थ मागवला होता. पुढ्यात येईपर्यंत खबीर म्हणजे काहीतरी केक सारखे असेल अशी आमची अपेक्षा होती. प्रत्यक्षात ती होती एक भाकरी. बार्लीच्या पिठापासून बनवलेली भाकरी. चहा आणि भाकरी असे अनोखे कॉम्बिनेशन खाल्ले. चव आवडल्याने रात्रीच्या जेवणासाठी चार भाकऱ्या सॉरी खबीर तिथूनच पार्सल घेतले होते.
एकंदरीत आजचा दिवस खूपच सुशेगात गेला. श्रीनगर - लेह- मनाली ह्या फुल सर्किट मधील निम्मे सर्किट पूर्ण झाले होते. उद्या जगातील सर्वात उंचीवरचा मोटोरेबल रोड म्हणून गणला जाणारा खारदूंग ला खुणावत होता.
******************************************************************************************************************************************
३ सप्टेंबर
सकाळी ७ वाजता लेह मधून खारदूंग ला कडे निघालो. वातावरण फारच प्रसन्न होते.
लेह - खारदूंग ला - डिस्कीट - हुंडर मार्गे भारत पाकिस्तानच्या सीमेवर असणाऱ्या तुर्तुक गावात जाऊन जाऊन मुक्काम करणे आणि दुसऱ्या दिवशी लेहला परत येणे असा प्लॅन होता. लेह ते तुर्तुक एकूण अंतर जवळपास २०५ किमी. प्रवासास लागणार वेळ गूगल मॅपच्या मते अंदाजे सव्वापाच तास. गूगल मॅप ला काय जातंय सांगायला. सव्वापाच तासात हे अंतर कापणे जवळपास अशक्य आहे.
सकाळच्या कोवळ्या उन्हात न्हाऊन निघालेला गोम्पा
खारदूंग ला कडे जाताना
रस्ता अतिशय अरुंद रस्ता होता आणि बहुसंख्य वळणे 'ब्लाइंड टर्न्स' ह्या प्रकारात मोडणारी. पूर्ण १८० अंशात गाडी वळवल्याशिवाय रस्ता कुठे जातोय हे समजने मुश्किल. एका बाजूला ऊंच डोंगररांग आणि दुसऱ्या बाजूस खोल दरी. जस जसे वर चढत होतो तस तसे वरचे बर्फाच्छादित डोंगर दिसू लागले.
थोड्याच वेळात प्रत्यक्ष बर्फ वृष्टी झालेला भाग आला. एकदम ताजा आणि भुसभुशीत बर्फ. बहुतेक काल रात्रीच बर्फवृष्टी झाली असावी.
१५-२० मिनिटे बर्फात खेळून पुढे निघालो. साऊथ पुल्लू आले.
काल काढलेल्या 'ILP' ची एक प्रत इथल्या मिलिटरी चेक पोस्टवर देऊन पुढे निघालो.
'संभलकें जाईये. उपर बर्फबारी हुई है रात को. लेकिन गाडियां जा सकती है.' - चेक पोस्टवरच्या सैनिकाने सूचना केली.
२-३ किमी वर गेलो असू आणि अचानक गाडीच्या डॅशबोर्ड वरचा Malfunction इंडिकेटर पिवळ्या रंगात प्रकाशित झाला. गाडीचे मॅन्युअल उघडले.
'जर हा दिवा प्रकाशित झाला तर ह्याचा अर्थ इंजिन कमी शक्तीने काम करतेय. त्वरित वेग कमी करा आणि गाडी चेक करून घ्या.'
हम्म. चांगली सूचना आहे. फक्त इथे गाडी कुठे चेक करायची हा प्रश्न होता :)
रस्त्याने जाणाऱ्या एका वाहनाला थांबवले. आणि त्याच्या ड्रायव्हरला Malfunction इंडिकेटरचे सांगितले.
'हमको लगता है क्लच प्लेटस गया होगा'
आम्हाला चर्चा करताना बघून अजून २-३ जण थांबले.
'कुछ पता नहीं. हम तो ये कभी देखते ही नहीं. बस चलातें रहते है.' - अजून एकजण
'लगता है क्लच प्लेटस गया. आप लोग नीचे साऊथ पुल्लू वापस जाईये. उधर मिलिटरी का इंजिनिअर रहेगा. वो शायद कुछ बता दे.' - एकाने त्या परिस्थितीतला सगळ्यात उपयुक्त सल्ला दिला.
परत खाली निघालो आणि अचानक बर्फवृष्टी सुरु झाली. अवघ्या मिनिटभरात तिने रौद्र रूप धारण केले. गाडीच्या पुढच्या काचेवर इतक्या वेगाने बर्फ जमा होत होते की पुढचा रस्ता पण धड दिसेना. बर्फ़ाने झोडपून काढणे हा काय प्रकार असतो ते समजले. जवळपास ४५ मिनिटांनी साऊथ पुल्लूला परत आलो.
साऊथ पुल्लूला परत येताना
हातात हॅन्डग्लोव्ज चढवले, छत्री घेतली आणि मिलिटरीचे इंजिनीअर राहतात त्या टेन्ट जवळ जाऊन दार वाजवले. लगेच एक ३५-४० दरम्यान वय असलेल्या व्यक्तीने दार उघडले. अंगातल्या युनिफॉर्म वरती नाव होते श्री.पाटील.
'नमस्कार पाटील साहेब. एक प्रॉब्लम झालाय गाडीत.'
'या. आत या अगोदर. आत बसून बोलू'
टेन्ट मध्ये प्रवेश करताच थंडी कुठल्या कुठे पळाली. जवळपास १०० स्क्वेअर फुटाची खोली, त्यात 3 लोकांची झोपण्याची आणि थोडेफार सामान ठेवण्याची सोय, एक बहुतेक सतत चालू असणारी भट्टी. एकंदरीत फारच आटोपशीर संसार होता.
'बोला. काय झालं ?'
त्यांना गाडीचा Malfunction इंडिकेटर चालू झाल्याचे आणि स्थानिक ड्रायव्हर लोकांनी क्लच प्लेट्स गेल्या असतील अशी जी शंका व्यक्त केली होती त्याबद्दल सांगितले.
कुठली गाडी आहे?
'फोर्ड फिगो'
'ह्या भागात हवा विरळ, ऑक्सिजन कमी. त्यामुळे गाडयांना पॉवर कमी पडते. त्यामुळे बऱ्याचदा गाड्या चुकीचा अलर्ट देतात. आमच्या पण देतात. शक्यतो गाडीला काही झाले नसेल. क्लच प्लेट्स अशा अचानक खराब होतील असे मला तरी वाटत नाही. पण तुमच्याबरोबर लहान मुलगा आहे म्हणून माझा सल्ला असा राहील की पुढे जाऊ नका. कारण पुढे कुठेच कसलीही मदत मिळणार नाही. खाली परत लेहला जा. तिथे मारुतीच्या किंवा एखाद्या लोकल मेकॅनिक कडून गाडी चेक करून घ्या. ते देतील चेक करून. गाडी चेक करायला लागणारी सिस्टीम इथे आमच्याकडे नाही. इथे फक्त किरकोळ दुरुस्ती किंवा पंक्चर काढणे वगैरे कामे होतात. आणि महत्वाच म्हणजे फोर्डच्या लोकांशी एकदा बोलून घ्या. ते लोक सगळ्यात योग्य सल्ला देतीलच. आणि जर खरंच क्लच प्लेट्स खराब झाल्या असतील तरी स्थानिक मेकॅनिक कडून दुरुस्ती करून घेऊ नका. फोर्डवाले खूप स्पेसिफिक असतात त्यांच्या कामाबद्दल.' - पाटील साहेब
चर्चेअंती लेहला परत जाण्याचा निर्णय घेतला.
'बसा थोडा वेळ. चहा करतो.'
पण आता गाडीचे लवकरात लवकर बघणे अत्यावश्यक होते. त्यामुळे चहास नकार देऊन निघालो.
'फार कठीण जीवन आहे इथे तुमचे' - मी निरोप घेत म्हणालो.
'हो. ते आहेच. ३ महिने इथे काढायचे. परत ३ महिने खाली जायचे. परत इथे यायचे. चालूच असतं.'
तिथून बाहेर आलो. आणि परत लेहला निघालो. डोक्यात विचारचक्र चालू झाले. एकंदरीत ही ट्रिप संपुष्टात यायची वेळ आली होती. कारण फोर्डचे सगळ्यात जवळचे शोरूम होते श्रीनगरला. तिथे जाऊन परत इकडे येणे अशक्यच. बरेच खाली आल्यानंतर एका ठिकाणी मोबाईलला रेंज आली. तिथून फोर्डच्या कस्टमर केअरला फोन केला.
'जोपर्यंत Malfunction इंडिकेटर लाल होत नहीं तोपर्यंत काहीही प्रॉब्लम नाही. तुम्ही बिनधास्त पुढे जा. जर इंडिकेटर लाल झाला तर मात्र गाडी बहुतेक बंदच पडेल. तेव्हा आम्हाला कळवा. गाडी टो करून श्रीनगर ला नेऊ.'- कस्टमर केअर
जीवात जीव आला. परत वर निघालो. साऊथ पुल्लू ओलांडले. जवळपास सकाळच्याच स्पॉट ला पोचलो असू आणि परत इंडिकेटर ऑन झाला. म्हणजे एक ठराविक ऊंची गाठली की गाडीच्या इंजिनला ऑक्सिजन कमी पडत असणार असा मी अंदाज बांधला. माझी वैयक्तिक इच्छा पुढे जायची होती. पण बायकोने नकार दिला. आपण आज लेहला परत जाऊ असे तिचे मत पडले. पुढे जाऊन इंडिकेटरने लाल रंग दाखवला तर काय हा देखील प्रश्न होताच. त्यामुळे पुढे जाण्याचे रद्द करून लेह गाठले. एखादा स्थानिक मेकॅनिक गाठून गाडी चेक करावी म्हणून सोमणला फोन केला.
'आप टॅक्सी स्टॅन्ड पर आईए. फिर हम लोग जायेंगे' - सोमण
टॅक्सी स्टॅन्ड वर गेलो आणि सोमणला बरोबर घेऊन एका स्थानिक मेकॅनिकच्या गॅरेज वर गेलो. तिथे गेल्यावर सोमणच्या लक्षात आले की आज रविवार असल्याने गॅरेज तर बंदच. त्यामुळे हात हलवत माघारी आलो. मेकॅनिक वाल्याचा नंबर घेऊन ठेवला आणि दुसऱ्या दिवशी गाडी चेक करावी असे ठरवले.
गॅरेज मधून परत येऊन पुन्हा पहिल्याच होमस्टे वर परत गेलो. सुदैवाने तिथे रूम शिल्लक होती. दिवसभराच्या ह्या दगदगीने डोके प्रचंड दुखू लागले. त्यामुळे मी तर झोपीच गेलो.
संध्याकाळी शांती स्तूप बघून आलो.
शांती स्तूप
शांती स्तूप मधील बुद्धमूर्ती
रात्री मिपाकर मोदक ह्यांना फोन करून सकाळच्या गाडीतल्या समस्येबद्दल मिपावर एखादा धागा काढून काही माहिती मिळतेय का ह्याबद्दल विचारण्यास सांगितले.
आपण खारदूंग ला ला जाण्याचे रद्द करून उद्या सरळ पॅंगॉन्ग ला जाऊ असे ठरवले. पण माझ्या डोक्यात वेगळाच प्लॅन होता.
प्रतिक्रिया
21 Feb 2018 - 12:29 pm | एस
अत्यंत सुंदर फोटो नेहमीप्रमाणेच. मॅग्नेटिक हिल हा शुद्ध दृष्टिभ्रमाचा प्रकार आहे. पुभाप्र.
21 Feb 2018 - 2:07 pm | प्रचेतस
हा भागही खूप आवडला. छायाचित्रे अतिशय सुंदर.
21 Feb 2018 - 9:51 pm | सालदार
लेखमाला उत्तम चालू आहे!
21 Feb 2018 - 10:01 pm | यशोधरा
सुरेख!
22 Feb 2018 - 12:35 am | डॉ सुहास म्हात्रे
मस्तं चालली आहे लेखमाला ! एकट्याने चारचाकी घेऊन अश्या ठिकाणी जाण्याचा अनुभव आम्हीही अनुभवला. फोटो नेहमीप्रमाणेच अप्रतिम. पुभाप्र.
22 Feb 2018 - 1:06 am | अमितदादा
उत्तम लेख..आवडला
22 Feb 2018 - 1:30 pm | शलभ
आवडतेय तुमची सफर..
22 Feb 2018 - 8:51 pm | दुर्गविहारी
अप्रतिम फोटो आणि तितकेच समर्पक वर्णन. मीही तुमच्याबरोबर लढाखची सफर करतोय असे वाटते. पु.भा.प्र.
22 Feb 2018 - 9:13 pm | निशाचर
हा भागही आवडला.
22 Feb 2018 - 9:23 pm | पद्मावति
काय सुरेख लेखमाला! वर्णन आणि फोटो दोन्ही लाजवाब.
27 Feb 2018 - 5:38 pm | श्रीधर
वाह अत्यंत सुंदर भाग आहे छायाचित्रे आणि लेखन दोन्ही छान!
27 Feb 2018 - 9:56 pm | पैसा
सुरेख लिहिताय