२९ ऑगस्ट
काल रात्री ज्याने रूम दिली तो लॉजच्या काउंटरवर बसलेला मालक का मॅनेजर जो कोणी असेल तो आणि अजून एका व्यक्तीचे जोरजोरात भांडण. का संभाषण ? बहुतेक भांडणचं.
भाषा... बहुतेक उर्दू
सतत खालून वरच्या आणि वरून खालच्या मजल्यावर दोघांचेही धावत जाणे. त्यामुळे भयानक वाजणारा लॉजचा लाकडी जिना.
आणि हा सगळा बिनडोकपणा मध्यरात्री २ ते २:३० ह्या गाढ झोपेच्या वेळेत जर कुणी करत असेल तर तुम्ही काय करू शकता?
एकंदरीत 'रिलॅक्स' असे लॉजचे नाव ठेऊन ग्राहकांना अजिबात रिलॅक्स वाटणार नाही ह्याची घेतलेली पुरेपूर काळजी कौतुकास्पद.
जाऊ दे.
जम्मूहून श्रीनगरला जाण्यासाठी २ मार्ग.
१) जम्मू - उधमपूर - बनिहाल - अनंतनाग - पाम्पोर - श्रीनगर --> अंतर अंदाजे २७० किमी. पूर्ण प्रवास राष्ट्रीय महामार्ग ४४ वरून. प्रवासास लागणारा वेळ अंदाजे ८ ते ९ तास. पण पावसाळ्याच्या दिवसांत कितीही. कारण हा रस्ता अत्यंत दरडप्रवण क्षेत्रातून जातो. पावसाळ्याच्या दिवसात दरड कोसळून आठवडा आठवडा वाहतुकीला बंद राहतो. मग बऱ्याचदा हेलिकॉप्टरच्या मदतीने लोकांना ते जिथे अडकलेत तिथून उचलून सुरक्षित जागी नेले जाते. जर एप्रिल,मे किंवा जून महिन्यात ह्या महामार्गाने प्रवास करायचा झाल्यास ह्या फॅक्टरचा विचार न विसरता करावा. इतर वेळीही जम्मू किंवा श्रीनगर ट्राफिक कंट्रोल रूम ला फोन करून रस्ता चालू आहे का हे विचारावे.
२) जम्मू - नौशेरा - राजौरी - शोपीयान - पुलवामा - श्रीनगर --> अंतर अंदाजे ३३० किमी. प्रवास राष्ट्रीय महामार्ग ४४४ आणि १४४ अ वरून.
ट्रॅफिक कंट्रोल रूम ने रस्ता चालू आहे हे सांगितले आणि सकाळी ७:१५ ला जम्मू काश्मीरच्या हिवाळी राजधानीतून उन्हाळी राजधानीचा प्रवास सुरु केला. रात्री हलकासा पाऊस पडून गेला होता. जम्मूतून वळणा वळणाच्या घाट रस्त्याने चौपदरी रस्त्यावर आलो.
मंजिल अभी बहुत दूर है. फोटोत NH 1A दिसतेय. पण हे जुने नंबरिंग आहे. आता NH 44 आहे हा.
वाटेत एका धाब्यावर कलाडी नामक सँडविच सारखा पदार्थ खाऊन पुढे निघालो.
प्रवासात एका ठिकाणी कारमधले एफ.एम.लावले तर एक देशभक्तीगीत लागले होते. आपले नाही. पाकिस्तानचे. काश्मीर मधल्या एफ.एम. स्टेशन वरून पाकिस्तानचे देशभक्तीगीत कसे प्रसारित केले जातेय ह्याचे आश्चर्य वाटले. पण तसे काही न्हवते. कारण गाणे संपताच एका निवेदिकेने 'रेडिओ पाकिस्तान में आपका स्वागत है' अशा शब्दात स्वागत केले. मग रेडिओ बंद केला. हा भाग भारत पाक सीमेला एकदम लागून आहे अशातली देखील बाब नाही. तरी पण पाकिस्तानचे एफ.एम. स्टेशन इथे ऐकू येण्याचे कारण कळले नाही.
जम्मू श्रीनगर महामार्ग उधमपूर पर्यंत चौपदरी आहे. उधमपूरच्या पुढे रस्ता अरुंद आहे. जेमतेम दीड लेन. मोठमोठी मशिनरी वापरून डोंगर फोडून रुंदीकरणाचे काम चालू आहे. तरी अजून ४-५ वर्षे सहज जातील काम पूर्ण होण्यात असे वाटतेय. उधमपूर ते मंटलाई हे अवघे ३० किमी अंतर कापण्यास तब्बल २ तास लागले. कारण रस्ता असून नसल्यासारखाच. खड्डयांनी भरलेला आणि चिखलाने बरबटलेला. मंटलाईपासून चेनानी नशऱी टनेल चालू होते. हिलाच पटनीटॉप टनेल असे देखील म्हटले जाते. जुलै २०११ साली ह्या टनेलचे काम सुरु झाले आणि एप्रिल २०१७ मध्ये पूर्ण होऊन ही टनेल वाहतुकीला खुली करण्यात आली. ९.२ किमी लांबीची ही टनेल सध्याची देशातील सर्वात मोठी असून हिच्यामुळे जम्मू ते श्रीनगर प्रवासाचा वेळ दोन तासांनी तर अंतर ३० किमींनी कमी झाले आहे. तसेच बर्फ वृष्टीच्या काळात देखील रस्त्यावर बर्फ पडल्यामुळे वाहने दिवसेंदिवस अडकून राहण्याचा धोका ह्या पॅच पुरता संपला आहे. आम्हाला पटनीटॉपला जायचे होते त्यामुळे आम्ही टनेल मधून न जाता टनेलच्या बाजूने असलेल्या रस्त्याने पटनीटॉपला निघालो. हा रस्ता म्हणजेच टनेल होण्यापूर्वीचा महामार्ग. रस्ता ठीकठाक होता. पूर्ण रस्त्याच्या बाजूने देवदार आणि पाईनच्या झाडांचे घनदाट जंगल. आणि जंगलात लाकडाचा मुक्त हस्ते वापर करून बांधलेली घरे.
पाईनची झाडे
घर. अशा घरात तर कायमस्वरूपी राहायला आवडेल मला.
थांबत थांबत निसर्ग सौंदर्य पाहत पटनीटॉपला पोचलो. पटनीटॉप वरून बटोटला गेलो आणि तिथून पुढे पुन्हा महामार्गाला जॉईन झालो. ह्या सर्व प्रवासाला अडीच तास लागले. अगदी हेअरपिन वळणे आहेत ह्या भागात. जर टनेल मधून गेलो असतो तर जेमतेम १५ मिनिटे लागली असती. १:३० च्या सुमारास पीराह गावात पोचलो. इथे अत्यंत चवदार राजमा राईस खाऊन पुढे निघालो. आता रस्त्याच्या कडेने चिनाब नदीची सोबत होती.
चिनाब नदी व वरच्या बाजूने जाणारा महामार्ग
इतक्या दुर्गम भागात जवळपास रोज निसर्गाशी दोन हात करून वास्तव्य करणे म्हणजे खरंच कमाल आहे. रामबन ओलांडून पुढे जाताच एक धबधबा दिसला. त्याच्याच बाजूला एक झरा देखील होता. बरेचसे ट्रकवाले झऱ्याचे पाणी चरवीमधून भरून नेत होते.
धबधबा
धबधब्याच्या जवळ अगणित फुलपाखरे होती. पण आवडले हे मोरपंखी फुलपाखरू.
धबधब्याजवळ दिसलेले मोरपंखी फुलपाखरू
ह्याच्या ४-५ जोड्या तिथे होत्या. धबधब्याजवळ थोडा वेळ थांबून पुढे निघालो. रस्त्यावर लष्कराची उपस्थिती फार वाढली होती. काश्मीर खोऱ्याला उर्वरित देशाशी जोडणारा हा महत्वाचा रस्ता असल्याने त्याची सुरक्षा फार मोठ्या प्रमाणात ठेवावी लागते. २.८५ किमी लांबीची जवाहर टनेल ओलांडताच टायटॅनिक व्ह्यू पॉईंट नावाची एक पाटी दिसली. मेजर भूपिंदर सिंग ज्यांच्या शिरावर ९ मे १९९३ ते १७ जानेवारी १९९४ ह्या महामार्गाच्या सुरक्षेची जबाबदारी होती त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ह्या व्ह्यू पॉईंटला टायटॅनिक व्ह्यू पॉईंट म्हटले जाते. तिथून खालची भात शेती फार सुंदर दिसत होती.
टायटॅनिक व्ह्यू पॉईंट वरून दिसणारी भात शेती
शेतांच्या मधून जाणारा जम्मू श्रीनगर महामार्ग
जवळपास १५ मिनिटे इथे थांबून परत गाडीजवळ आलो तर तिथे दोन माणसांशी गाठ पडली.
'आप महाराष्ट्र से गाडी चलाकर आये है ?'
-- हां
महाराष्ट्र में कहां से?
-- पुणे
आगे कहां जानेवाले है?
- आज श्रीनगर जायेंगे और वहाँसे लदाख.
बहुत बढिया. इधर गाडी बहुत संभल के चलाईये. आपके यहां लोग रुल्स फॉलो करते है. लेकिन यहां के लोगों को रुल्स वगैरा कुछ पता नहीं. बस भगाते जाते है.
-- हां. वो तो देखा मैने.
I am Professor Bashir Sheikh. में यहा कॉलेज में केमिस्ट्री पढाता हूं. पुणे युनिव्हर्सिटी में एक बार एक सेमिनार के लिये आया था. NCL वगैरा सब देखा था ऊस वक्त. बहुत अच्छी जगह है पुणे. आप क्या करते है पुणे में? वरच्या सगळ्या वार्तालापानंतर स्वतःची ओळख करून देत त्या व्यक्तीने विचारले.
-- बहुत बढिया. में भी १० साल से पुणे में हूं. आय.टी कंपनी में हूं.
कश्मीर कैसा लागा आपको? कोई तक्लिफ हुई रास्ते में ?
-- बहुत अच्छा लगा. कोई तक्लिफ नही हुई.
आप लोग टुरिस्ट है. आपको गलती से भी कोई कुछ नहीं करेगा. बहुत बुरा हाल है कश्मिरका. पिछले दो साल से डर के कारण टुरिस्ट बहुत ही कम हुए है. यहां का टुरिझम खतरे में है. उसे किसी भी हालत में बचाना पडेगा. टुरिझम और खेती छोडके वैसे यहां और कुछ है भी तो नहीं. मीडिया ऐसे बिहेव्ह करती है जैसे कश्मीर का मसला सॉल्व हो जायेगा तो देश की सभी समस्यांये मीट जायेगी. ऐसा थोडीही है? देश में और भी कई बडी समस्यांये है. झारखंड, छत्तीसगढ में नक्सलवाद की बहुत बडी समस्या है. लेकिन वो कभी बडी न्यूज नही बनती.'
-- हम्म
आज श्रीनगर क्यूँ जा रहे है? मेरे घर चलीये. ज्यादा दूर नहीं है यहांसे. एक दिन रेहके फिर आगे जाईये.
टायटॅनिक पॉईंट पासून जवळच कुलगाम जिल्ह्यात त्यांचे गाव होते. पण अनोळखी लोकांच्या घरी जाऊन राहण्याचा प्रश्नच नव्हता. त्यामुळे निरोप घेऊन पुढे निघालो.
टायटॅनिक पॉईंटवरून दिसणारी शेते खाली आल्यावर अशी दिसत होती
पुढे लगेच मुंडा टोल पोस्ट आले. टोल पोस्टवर पेर आणि सफरचंद विकायला होती. अवघ्या ६० रुपयात ४ किलो पेर. सफरचंदाचा ४ किलोचा बॉक्स फक्त २०० रुपयाला होता. टोल पोस्टवर टोल भरून पुढे निघालो तेव्हा साडेपाच वाजले होते. जंगलभाग असल्याने अंधारायला सुरवात झाली होती आणि अजून श्रीनगर ८५ किमी दूर होते. खूपच रमत गंमत प्रवास झाल्याने आता घाई करणे भाग होते. काझीगुंड, वानपोह, बटांगू, अवन्तिपोरा, पाम्पोर झपाट्याने ओलांडले. हा सर्व दहशतवादग्रस्त भाग. सुंदर पण कमालीचा मागास वाटत होता. ह्या सर्व भागात एकदा फिरायचे आहे मला. आम्ही कोणतेही हॉटेल बुकिंग केले न्हवते. BSNL ला आमच्यावर दया आली असावी बहुतेक कारण नेट चालू झाले होते. पण रेंज सतत येत जात होती. शेवटी बुकिंग.कॉम वरून एका हाऊसबोटचे बुकिंग केले. अवघ्या ७८० रुपयात दुसऱ्या दिवशीच्या मोफत नाष्ट्यासह. एवढे स्वस्त आहे म्हणजे नक्की हाऊसबोटच आहे ना अशी शंका आली. पण लगेच हाऊसबोटच्या मालकाचा फोन आला. 'आईए आप. शहर में आते ही मुझे फोन किजीये. आपको दाल लेक के १२ नंबर गेटपर आना है. में वहा शिकारा भेज दूंगा. - हाऊसबोट मालक.
मुंडा टोल पोस्ट ते दाल लेक अवघ्या २ तासात कव्हर करून ७:३० ला गेट नंबर १२ वर पोचलो. हाऊसबोट मालकाला फोन केला. त्याने शिकारा पाठवून ठेवलाच होता. गाडीतून जरूरीपुरते सामान काढून गाडी तिथल्या कॉमन पार्किंग मध्ये लावली. पार्किंग फी २०० रु. प्रति दिवस. शिकाऱ्यातून 'गुना पॅलेस' ह्या हाऊसबोट वर गेलो. अतिशय राजेशाही बोट मध्ये बहुतेक ६ रूम होत्या. बाहेर एक कॉमन डायनिंग रूम आणि त्याच्या बाहेर निवांत बसायला एक लाकडी रॅम्प होता. पर्यटक फक्त आम्ही तिघे. पर्यटक नसल्याने हाऊसबोटच्या मालकाने कुकला सुट्टीवर पाठवले होते. जेवणात काय हवेय ते सांगा. मी आणतो असे त्याने सांगितले. पण आम्ही असे अचानक टपकलो होतो त्यामुळे त्यांना जास्त त्रास देणे योग्य नाही म्हणून आम्ही तुम्हाला जे जमेल ते द्या असे सांगितले. मग त्यांनी दाल, चपाती आणि भाजी बनवून त्वरित आणून दिली. जेवून थोडा वेळ बाहेर बसलो. आज फक्त २९७ किमी प्रवास झाला पण बहुतांशी हिमालयातील अवघड वळणे असलेला घाट रस्ता होता. जितका सहनशीलतेचा अंत बघणारा होता तितकाच निसर्गरम्य देखील. विशेष आवडली ती काश्मीर मधील घरे. नुसते कॉंक्रिटचे ठोकळे नाहीत तर लाकडाचा मुक्त हस्ते वापर करून केलेली अत्यंत सुबक, कलात्मक आणि देखणी. बघताच आवडावीत अशी. जेवण करून थोडा वेळ बाहेरच्या रॅम्पवर बसलो आणि हाऊसबोट मालकाशी गप्पा मारून आजचा दिवस संपला.
प्रतिक्रिया
9 Dec 2017 - 7:39 pm | एस
वा! काय अप्रतिम फोटो आणि वर्णन! असं वाटलं की मीच हा प्रवास करून श्रीनगरला पोहोचलो आहे!...
9 Dec 2017 - 8:30 pm | Nitin Palkar
अतिशय सुंदर चित्रदर्शी वर्णन, सुरेख प्रकाशचित्रे!! पुलेशु, पुभाप्र!!!
9 Dec 2017 - 9:53 pm | डॉ सुहास म्हात्रे
पहिला भाग इतका तपशीलवार आहे की तो वरवर वाचून ठरवले की ही मालिका निगुतीनेच वाचायला हवी. आज मोकळा वेळ मिळाला तर पाहिले की पाचवा भागही आला ! पाचही भाग एका बैठकीत संपवले.
प्रवास अगदी बैजवार तपशीलाने लिहिलेला आहे, इतके की दुसर्या कोणाला हे वर्णन ती सहल स्वतंत्रपणे करायला खूप उपयोगी पडेल ! फोटोही सुंदरच !
पुढील भागाची प्रतिक्षा आहे.
10 Dec 2017 - 12:11 am | किल्लेदार
मस्त...
इतका तपशिल द्यायचा खरंच माझ्यात पेशंस नाही. माझा प्रवास तुमच्या एक दिवस पुढे चालू आहे सध्या. ;) फक्त कारगिल मधून आपल्या वाटा वेगळ्या....
10 Dec 2017 - 3:35 am | शेखर काळे
छान चित्रे आणि प्रवाही लेखन. आवडलं .
10 Dec 2017 - 9:36 am | श्रीधर
अतिशय सुंदर प्रवास वर्णन आणि अप्रतिम फोटो
10 Dec 2017 - 4:23 pm | मोदक
+१
हेच बोल्तो.
11 Dec 2017 - 3:29 pm | केडी
+१, लै भारी, लगे राहो...
11 Dec 2017 - 3:29 pm | केडी
+१, लै भारी, लगे रहो...
10 Dec 2017 - 3:28 pm | संजय पाटिल
तपशिलवार वर्णन आणि सुंदर फोटो....
11 Dec 2017 - 12:31 am | पद्मावति
मस्तच.
11 Dec 2017 - 7:07 pm | मराठी कथालेखक
साहेब हाऊसबोटचे फोटो टाका ना ...
12 Dec 2017 - 8:21 am | अभिजीत अवलिया
सर्व वाचकांंचे आभार.
मकले साहेब,
पुढच्या भागात टाकतो दाल मधल्या हाऊसबोटचे फोटो.
12 Dec 2017 - 8:40 am | प्रचेतस
खूप सुंदर.
तपशीलवार लेखनाने प्रत्येक भाग समृद्ध होत आहे.
12 Dec 2017 - 4:30 pm | पाटीलभाऊ
सुंदर वर्णन आणि फोटो..पुढचे भाग येऊ द्या पटपट
15 Dec 2017 - 3:21 pm | रुस्तुम
वाह! . आमच्या दल लेकच्या आठवणी ताज्या झाल्या.आमचा टूर ऑपरेटर आम्हाला दल लेकला सोडताना म्हणाला 'जाओ बच्चन इंतझार कर राहा है'.आमच्या चेहऱ्यावरचा प्रश्नचिन्ह बघून त्यानेच खुलासा केला की 'अमिताभ बच्चन एकदा सहकुटुंब राहायला आले होते त्या हॉऊसबोटीत' आणि त्यांचा फोटो हॉल मध्ये दर्शनी भागात लावलाय. हॉलिडे इन् का काहीसे नाव आहे.
25 Dec 2017 - 8:06 pm | यशोधरा
सुरेख! काश्मीरच्या आठवणी ताज्या झाल्या..