पूर्वसूत्र :
…. तीन दिवसांनी आग विझली तेव्हा धीरावतीचे भाऊ आत शिरले आणि त्यांनी वाडा पिंजून काढला. पण काळ्याठिक्कर पडलेल्या भिंतीमध्ये क्रियाकर्म करण्यासाठी एकही हाड सापडले नाही की धीरावतीच्या अंगावरच्या दोनशे तोळे सोन्याच्या दागिन्यांपैकी गुंजसुद्धा मिळाली नाही. मधल्या बंदिस्त देवघराचे दार अर्धवट जळलेल्या अवस्थेत उघडे होते. थोरल्याने तिथून आत नजर टाकली तेव्हा त्याला जे दृश्य दिसले ते पाहून त्याची वाचाच बंद झाली ! …
भाग ३
...देवखोलीत खाली जमीनच नव्हती ! खोलवर नजर जाईल तिथपर्यंत साकळलेला अंधार ! खाली नजर टाकली तरी भोवऱ्यात फसावे तशी भावना होत होती. खोलवर मध्येच प्रकाशाचा ठिपका दिसे. त्याकडे बघावे तर तो एखाद्या भुयारासारखा मोठा मोठा होई. नरकाच्या दारासारखा !
थोरला घाईघाईने मागे सरकला आणि देवखोलीचे अर्धवट जळके दार त्याने लावून घेतले. इथे काहीतरी वेगळेच आहे, हे त्याच्या सावध आणि अनुभवी मनाने टिपले. त्याने ताबडतोब सर्वांना बाहेर काढले. टाकोटाक माणसे लावून वाड्याचे सगळे दरवाजे आणि खिडक्या, चिरेबंदी भिंती बांधून बंद केल्या. पूर्वेकडच्या पायऱ्या चढून वर गेल्यावर भरीव छत दिसत असे व मध्ये दोन हात लांबी रुंदीचा कळसाचा चौक. तिथे वरती एक हौद बांधून तो चौक मातीने बुजवून टाकला.
....धीरावती गाव सोडून गेली अशी बोंबाबोंब भावांनी केली तरी पळून गेलेल्या दोघी कुणबिणींनी सत्य काय ते गावाला ओरडून सांगितले होतेच. जहागिरदारांच्या धाकाने वाडा कुणी उघडला नाही. पण वरच्या हौदात गावातल्या लोकांनी तुळशीची रोपे लावली. धीरावतीबाई सतीसावित्री सारख्या पवित्र असे गाव मानत असे. म्हणून त्याला सतीचे वृंदावन असे नाव पडले. पण नंतरच्या पिढ्या जशा येत गेल्या तसे सतीच्या कोठीकडे गावकऱ्यांचे दुर्लक्ष होत गेले. जहागिरदारांच्या पिळवणुकीने जो तो भरडून निघाला होते.
कालांतराने त्याची भुलीची कोठी झाली आणि तो भुलीचा माळ. कारण त्या माळावर रात्रीचे जे कुणी जात त्यांना दिशाभूल पडत असे. रात्रभर भटकत रहात आणि सकाळ झाल्यावर वाट दिसे. अर्थात या सगळ्या गावकऱ्यांच्याकडून ऐकेलेल्या वावड्या. मी कधी अनुभव घ्यायला गेलो नव्हतो तिकडे.
गाव विरुद्ध दिशेला पसरत गेलं आणि माळावर रान माजत गेलं. दिवसासुद्धा तिकडे फिरकायला कुणी जात नाहीसे झाले.
अशी या भुलीच्या कोठीची कथा आणि कीर्ती. किंवा अपकीर्ती. आणि त्यामुळेच माझ्या जिवलग मित्राला तिकडे जाऊ द्यावे की नाही याबद्दल मी साशंक होतो.
...अर्थात पद्या मात्र बिलकुल साशंक नव्हता.
प्रद्युम्नला मी त्या दुपारी फोन केला तेव्हा तो कसल्याशा कॉन्फरन्समध्ये बिझी होता. जराशानं त्याचा फोन आला. खुशाली विचारून झाल्यावर मी त्याला भुलीच्या माळाबद्दल सागितले.
‘तो वाडा तीनशे वर्षे बंद आहे , म्हणतोस ? आर यू शुअर ?’
‘मी छातीवर हात मारून सांगतो, गेल्या साडेतीनशे वर्षात त्यात घुशी आणि सरपटणारे जीव सोडून दुसरं कुणीही गेलेलं नाहीये. जनावरेपण नाही !’
‘ओके, आज आणि उद्या माझी कॉन्फरन्स आहे. परवा इतर कामे मार्गी लावून मी तुझ्याकडे येतोय. मला सगळा तपशील पुन्हा एकदा तुझ्याकडून ऐकायचा आहे.
तिसऱ्या दिवशी संध्याकाळी प्रद्युम्न माझ्याकडे आला. भुलीच्या कोठीची कहाणी मी पुन्हा एकदा त्याला तपशीलवार ऐकवली. ते मोडीचे भाषांतर केलेले कागद बरंच वेळ हातात घेऊन त्याने सावकाश वाचले.
मग तो म्हणाला, ‘आज गुरुवार ना ? आपण येत्या बुधवारी जाऊ तुझ्या गावी. तू चार दिवस सुट्टी घेऊ शकशील का ?’
‘अम्म.. मग शनिवारीच गेलो तर ? कॉलेजला सोमवारपासून सुट्टी आहे. निवांत काम होईपर्यंत थांबू.’
‘डन ! मीपण आठ दिवस सुट्टीच घेतो.’
यानंतर आठवडाभर मी पेपर्स चेकिंगमध्ये बिझी होतो. पद्याचा एकदा फोन येऊन गेला. प्लानमध्ये काही बदल झाला नाही ना, हे बघण्यासाठी.
शनिवारी रात्री नऊच्या आसपास आम्ही प्रद्युम्नच्या जिप्सीमधून माझ्या गावातल्या वाड्यात पोचलो. जेवणे झाल्यावर प्रद्युम्न म्हणाला, ‘चक्कर टाकायची का भुलीच्या माळाकडे ?’
‘आत्ता ? सांगितले ना तो दिशाभूल करण्यासाठी कुप्रसिद्ध आहे म्हणून ?’
‘त्याची नको तुला काळजी. आफ्रिकेच्या जंगलात सात दिवस सात रात्री एकटा भटकलोय मी ! हा तुझा माळ असेल चार किंवा पाच एकरचा !’
‘पण नकोच, मी खूप थकलोय आता.’
त्याला मी सकाळपर्यंत थोपवून धरले. नऊ वाजता भक्कम नाष्टा आणि चहा घेऊन आम्ही बाहेर पडलो. बाईकवरून गाव ओलांडून नदीवरच्या नवीन झालेल्या पुलावरून पलीकडे भुलीच्या माळाकडे जायला अर्धा तास पुरेसा होता.. माळ समोर दिसला तेव्हा मी आजूबाजूला एक नजर टाकली. सकाळी सकाळी तिकडे कुणी माणसे नजरेस पडण्याची शक्यता नव्हतीच.
गवत आणि झुडुपांमधून वाट काढत आम्ही त्या वास्तूजवळ पोचलो. लांबरुंद चौरस वाडा होता तो. चिरेबंदी भिंती आता बऱ्याचशा ढासळल्या होत्या आणि त्यांच्या चिरांमधून झाडे झुडुपे उगवून वर आली होती. काहींचे तर दहा-पंधरा फुट उंचीचे वृक्ष बनले होते. बहुधा त्यांच्या मुळ्यांनीच भक्कम दगडी चिरे उखडून टाकले होते. उंदीर आणि घुशींनी त्यात मोठी मोठी खिंडारे केली होती.
आम्ही भुलीच्या कोठीच्या चारी बाजूंनी एक चक्कर मारली. गुरे, जनावरांनी पायवाट बनवली होती. रानपाखरांचा किलबिलाट सोडला तर कसलाही आवाज नव्हता. इतक्या प्रसन्न सकाळीसुद्धा तिथली हवा कुंद वाटत होती. मनावर उगाचच सावट आल्यासारखे होत होते. नाही म्हटले तरी धीराची कहाणी मनातून जात नव्हती, त्याचाच तो परिणाम असावा.
पूर्वेकडील दगडी पायऱ्या त्यामानाने बऱ्याच सुस्थितीत होत्या. त्यावरून माणसे, जनावरे यांची ये जा होत असावी. पायर्या चढून आम्ही वर गेलो. समोर सतीचे वृंदावन सकाळच्या लख्ख उन्हात उजळून निघाले होते. वाड्याचा घेर आणि मधला रिकामा चौक यांच्या सीमा साधारण समजत होत्या. मधल्या चौकावर वासे टाकून फळ्या मारल्या असाव्यात. आता त्यात भसके पडलेले दिसत होते. वर सर्वत्र गवत माजले होते. झुडुपे फारशी नव्हती.
खाली उतरून पलीकडच्या बाजूने गेल्यावर आम्हाला एक बंद केलेले दार दिसले. त्याला घुशींनी जवळजवळ दोन फुट व्यासाचे खिंडार पाडलेले दिसत होते. आम्ही जवळ जाताच मोठ्या आकाराच्या दोन घुशी आत पळाल्या. जरा जोर लावताच वरचा आणखी एक चिरा पडला. आता खिंडार तीन बाय दोनचे झाले. खिंडाराच्या तोंडातून पद्याने टॉर्चचा प्रकाशझोत आत टाकला. तोंडाशी असलेल्या दगडमाती आणि पालापाचोळा याखेरीज काहीच दिसत नव्हते.
‘आत जायचे ?’ मी जराशा अनिश्चितपणे पद्याला विचारले.
त्याने घड्याळाच्या डायलकडे नजर टाकली. साडेअकरा वाजून गेले होते.
‘आता नाही. आपण नंतर येऊ.’ पद्या इतकेच बोलला आणि त्याने खिशातून एक बारीकसे घड्याळ काढले. पूर्वी लोक गळ्यातल्या चेनमध्ये घालत असत, तसे. त्याने ते घड्याळ उलटे केले तेव्हा माझ्या लक्षात आले की ते घड्याळ नसून वेगळेच काहीतरी यंत्र आहे. मागे एक लाल अन एक हिरवे अशी दोन बटणे होती.त्यातले लाल त्याने दाबले अन सरळ करून डायल पाहिली. आता मला दिसले की त्यात दोनच काटे होते आणि एकच रेघ. आता त्यातला काटा थरथरू लागला होता. ते घड्याळ हातात घेऊन पद्याने खिंडाराच्या तोंडाशी नेले. काटा थरथरतच राहिला. मग त्याने ते घड्याळ हातात ठेवून वाड्याभोवती एक चक्कर मारली. मीही अर्थात त्याच्या मागून. त्या यंत्राच्या काट्याची थरथर मध्येच वाढे मध्येच कमी होई.
चक्कर पूर्ण झाली तेव्हा पद्या जरा विचारात पडला होता. काही मिनिटे तो तसाच एका दगडावर बसला. मग एकदम काहीतरी स्ट्राईक झाल्यासारखा उठला आणि पूर्वेकडच्या पायऱ्या चढून पुन्हा वरती गेला. मी त्याच्यामागून वरती गेलो तेव्हा तो सतीच्या वृंदावनापशी उभा होता आणि माझ्याकडे वळून हसत होता.
‘हे बघ..!’ तो म्हणाला.
मी पाहिले तर त्या ‘घड्याळा’चा काटा आता पूर्ण नव्वद अंशात वळून स्थिर झाला होता !
‘हे काय ?’
‘चल घरी, तुला सांगतो.’
मग त्याने कॅमेर्याने वेगवेगळ्या अँगल्सनी तिथले फोटो घेतले. काही ठिकाणी जमिनीवर वाकून त्याने ठाकठोक करून पाहिले. नंतर एका त्यातल्यात्यात स्वच्छ चौथऱ्यावर बसून त्याने आपल्या डायरीत काही टिपणे केली. मनासारखे काम झाल्यावर त्याने उठून अंग ताणून एक आळस दिला आणि माझ्याकडे पाहून प्रसन्न हसला ‘चलो. आजके लिये इतना काफी है.’
आम्ही वाड्यावर परत गेलो. जेवणे झाली आणि आम्ही व्हरांड्यात खुर्च्या टाकून बसलो.
‘आता बोल ! मघाशी तू मला काय दाखवलेस आणि काय केलेस ? ते घड्याळ कसले आहे ?’
‘ते घड्याळ नाही. तो टाईम पॉकेट डिटेक्टर आहे. त्याच्यामुळे मला तिथे काळाची घनता कमी किंवा जास्त झाली आहे का, ते समजले. तिथे माझ्या मशीनने पॉझिटिव्ह रिझल्ट्स दाखवलेत, अनिकेत !
होय, तिथे खरोखरीच एक टाईम पॉकेट आहे ! ....आणि आता मी घेतलेल्या निरिक्षणांवरून त्याची डायमेन्शन्स तपासणार आहे. मग माझी तयारी पूर्ण झाली की उद्या दुपारनंतर आपण तिथे जायला निघू.’
‘पण...’
‘अनिकेत, गिव्ह मी सम टाईम. जाण्यापूर्वी मी तुला सगळे काही सांगणार आहे. आता मला माझे काम करू दे, प्लीज !’
‘ओके.’ मी काहीशा असमाधानाने म्हटले.
मी एक जाडजूड पुस्तक घेऊन पलंगावर आडवा झालो. पद्याने त्याची भलीथोरली सॅक उचलली आणि म्हणाला,
‘अन्या, मी वरच्या खोलीत जातो जरा. माझी छोटेखानी लॅब तिथे मांडली तर तुझी काही हरकत नाही ना ? मला काही उपकरणे तयार करायची आहेत. ’
‘ओह, यू आर ऑलवेज वेल्कम. मी मात्र आता जरा झोप काढतो.’
‘शुअर, यू डीझर्व्ह इट ! खूप तंगलो आपण सकाळी...’
संध्याकाळी पाचला मी उठलो तेव्हा अजून पद्या त्याच्या ‘लॅब’ मध्येच होता. चार हाका मारल्यावर तो चहासाठी खाली आला. चहा खारी घेऊन झाल्यावर मी गावात एक फेरफटका मारण्याचा प्रस्ताव मांडला. त्यावर पद्या म्हणाला की तो संध्याकाळभर लॅबमध्येच काम करणार आहे आणि मी हवं तर गावात फिरून यावे.
संध्याकाळ मी गावातल्या परिचितांच्या गाठीभेटी घेण्यात घालवली.
रात्रीच्या जेवणापुरता पद्या खाली आला आणि परत त्याने स्वत:ला त्या छोट्याशा खोलीत कोंडून घेतले. खरं तर जेवणे झाल्यावर वरती जाऊन त्याचे काय काम चालले आहे हे मला बघायचे होते. पण पद्याने हा प्रस्ताव खोडून काढला.
‘ती एक अतिशय सेन्सिटिव्ह यंत्रणा आहे, अनिकेत. तिचे सेटिंग करत असताना थोडासा जरी अनपेक्षित आवाज झाला तरी तिच्या व्हील्सचा बॅलन्स चुकेल. पूर्ण झाल्यावर मी पहिले तुलाच दाखवेन. पण आता नाही.’
अखेरीस दुसऱ्या दिवशी दुपारी बारा वाजता त्याचे ते यंत्र किंवा उपकरण सेटिंग करून तयार झाले आणि आमची तयारी पूर्ण झाली. पद्या मला खोलीत घेऊन गेला तेव्हा सायन्स फिक्शन चित्रपटात दाखवतात तसले टाईम मशीन छाप यंत्र बघायला मिळेल असे मला जरी वाटत नव्हते, तरी टेबलवर ठेवलेल्या त्या छोट्याशा वस्तूची मी खासच अपेक्षा केली नव्हती !
( क्रमश: )
प्रतिक्रिया
17 Apr 2018 - 12:18 pm | खिलजि
जबरदस्त कथानक वाटतेय . पुभाप्र आणि पुलेशु
सिद्धेश्वर विलास पाटणकर
17 Apr 2018 - 12:19 pm | खिलजि
चला , चंगळ आहे जीवाची सध्या . पेपरवगैरे बाजूला ठेवावा म्हणतोय . लवकर येऊ द्यात पुढील भाग .
सिद्धेश्वर विलास पाटणकर
17 Apr 2018 - 12:20 pm | खिलजि
ते शेवटी क्रमशः टाकत चला . कथामालिका आणि क्रमशः नाही चुकल्यासारखे वाटतेय .
सिद्धेश्वर विलास पाटणकर
17 Apr 2018 - 1:53 pm | पद्मावति
वाह..मस्त रंगतेय कथा.
17 Apr 2018 - 2:07 pm | टवाळ कार्टा
वाचतोय....मोठे भाग लिहा
17 Apr 2018 - 2:54 pm | साबु
कृष्ण विवर आहे का काय त्या खोलीत? धीरावती निसटली त्यातुन?
17 Apr 2018 - 2:56 pm | कपिलमुनी
मस्त लिहिला आहे !
आवडलं.
17 Apr 2018 - 3:53 pm | उगा काहितरीच
आवडलं .... पुभाप्र....
17 Apr 2018 - 5:01 pm | manguu@mail.com
छान
17 Apr 2018 - 5:55 pm | प्राची अश्विनी
मस्त चाललीय कथा.
18 Apr 2018 - 8:50 am | प्रचेतस
हा भागही आवडला.
18 Apr 2018 - 7:20 pm | मंदार कात्रे
जबरदस्त
पुलेशु
18 Apr 2018 - 9:05 pm | वीणा३
पुढे पुढे पुढे :D
18 Apr 2018 - 9:07 pm | अभ्या..
छानेय
18 Apr 2018 - 10:29 pm | समाधान राऊत
वाचरा मै वाचरा