द टाईमब्रिज अर्थात कालसेतू – ४

सस्नेह's picture
सस्नेह in जनातलं, मनातलं
19 Apr 2018 - 12:24 pm

पूर्वसूत्र :
अखेरीस दुसऱ्या दिवशी दुपारी बारा वाजता त्याचे ते यंत्र किंवा उपकरण सेटिंग करून तयार झाले आणि आमची तयारी पूर्ण झाली. पद्या मला खोलीत घेऊन गेला तेव्हा सायन्स फिक्शन चित्रपटात दाखवतात तसले टाईम मशीन छाप यंत्र बघायला मिळेल असे मला जरी वाटत नव्हते,  तरी टेबलवर ठेवलेल्या त्या छोट्याशा वस्तूची  मी खासच अपेक्षा केली नव्हती !
 
भाग ४
.....तो  एक साधा जुन्या पद्धतीचा छोटासा रेडीओ दिसत होता. त्याच्या दोन्ही बाजूला दोन अँटेना बाहेर आल्या होत्या आणि डायलवर काट्यांऐवजी अनेक लहान लहान रंगीबेरंगी दिवे होते. मी तो हातात घेऊन उलटसुलट केला. मागच्या बाजूला चार बटणे होती. त्याच्या शेजारी आणखी एक छोटीशी डबी ठेवली होती.
‘हे काय आहे, पद्या ?’ मी गोंधळून जाऊन विचारलं.
‘हे आहे होकायंत्र.’ प्रद्युम्न  ती लहान डबी हातात घेऊन म्हणाला,  ‘तिथे रात्रीचे गेल्यावर दिशाभूल पडते असे तू म्हणालास ना ? हा कंपास आपल्याला योग्य मार्गावर ठेवेल. ’
‘आणि हा रेडीओ ?’
 ‘रेडीओ ? नो, तो टाईम पल्स कन्व्हर्टर आहे.’
‘म्हणजे काय ?’
‘अं…, त्याची ऑपरेटिंग सिस्टीम जरा किचकट आहे, पण तुला इतकेच सांगतो की याच्यामुळे मला त्या टाईम फ्लॉचा किंवा पॉकेटचा सेंटर नेमका कुठे आहे, हे शोधता येते. ‘
‘हम्म..’
‘आणखी महत्वाचे म्हणजे मला याच्या सहाय्याने कोणत्याही काळातून आपल्या काळात परत येता येईल.’
‘काय म्हणालास ?’ मी एकदम दचकलो. ‘म्हणजे आपण  खरंच काळात मागे किंवा पुढे जाणार आहोत .. ??’
‘आपण नाही..., मी ! आपण त्यासाठीच नाही का हा सगळा खटाटोप मांडला आहे ?’
‘अं.. म्हणजे इतक्या लगेच का, असं म्हणायचं होतं मला.  आणि तू एकटा जाऊन काही प्रॉब्लेम झाला म्हणजे ?‘
वेल, खरोखर ती वेळ इतक्या अनपेक्षितपणे येईल, असं काही मला अंदाज नव्हता. मला काय बोलावं सुचेना. म्हणजे हा पद्या असा एकदम असा डोळ्यासमोरून कुठेतरी दूर, न दिसणाऱ्या जागी जाईल यासाठी माझ्या मनाची तयारी इतक्यात तरी नव्हती. मी काही क्षण विचार केला.
‘हे बघ, प्रद्युम्न, तू स्वत:ला गिनीपिग समजतोस काय ? या... या मशीनचा काय भरोसा ? त्याची ट्रायल घेतली आहेस का आधी ?’ त्या रेडिओ कडे बोट दाखवून मी भराभर प्रश्न केले.
‘ हो, जरा सबुरीनं, अनिकेत. अर्थात मी स्वत:ला गिनी पिग नाही बनवत..! मी याआधीही या कन्व्हर्टरची ट्रायल घेतली आहे आणि ती यशस्वी झाली आहे. या खेपी मी फक्त त्याची व्याप्ती आणि क्षमता वाढवली आहे. नाहीतर एक दिवसात असले काही तयार करणे कसे शक्य आहे ?’
‘ट्रायल म्हणजे काय केले आहेस तू ?’
पद्या त्या खोलीतल्या सोफ्यावर आरामात बसला आणि वैतागलेल्या सुरात म्हणाला,
‘ओके, गुरुजी, तुम्हाला सगळं बयाजवार सांगतो.
..काही महिन्यांपूर्वी मला जुन्या बाजारात एक लाकडी डेस्क मिळाले होते. त्यावरच्या  नक्षीकामावरून सहज हात फिरवताना माझ्या हातून एक कळ दाबली गेली आणि त्या डेस्कच्या तळाशी एक चोरकप्पा दिसला. एक लाकडी पट्टी सहज सरकत होती आणि तिच्या आत  आणखी एक झाकण होतं, ज्यावर लाखेचं  सील होतं. मी लेन्स घेऊन ते बारकाईनं पाहिलं तर त्यावर तारीख होती. १८ डिसेंबर १८५८. आणि कुणा इंग्रज अधिकाऱ्याचं नाव होतं. त्याचवेळी माझ्या डोक्यात ही कल्पना आली.
मी सील लगेच उघडले नाही. या संधीचा वापर कसा करायचा यावर मी काही दिवस विचार केला.  माझी थिअरी बरोबर आहे की नाही, हे तपासून बघण्याचा मला अगदी योगायोगाने आणि सुदैवाने एक चान्स मिळाला होता. हे सील जर १८५८ नंतर उघडले गेले नसेल तर इथे मला एखादा टाईम पॉकेट मिळण्याची शक्यता होती. ज्याअर्थी इतक्या बंदोबस्तात याला सील केले होते, त्याअर्थी काही महत्वाचे दस्तावेज त्यात ठेवले असण्याची शक्यता होती. कदाचित ते उघडले की काही क्षणात किंवा काही मिनिटात आतल्या निरुद्ध अवकाशात काळाची थांबलेली किंवा मंद झालेली सापेक्ष गती पुन्हा पूर्ववत होईल आणि मग  ते पॉकेट माझ्या प्रयोगासाठी निरुपयोगी होईल. असे झाले तर त्यावर काहीच टेस्ट्स घेता आल्या  नसत्या.
पण हे कसे समजणार की १८५८ नंतर हे सील उघडले गेले होते अथवा नाही ?
त्यासाठी मी हे मशीन बनवलं. आधी मी  फक्त  टाईम पल्स डिटेक्टर बनवला होता. काळाच्या घनतेमधील बदल दाखवणारा. त्याचा  प्रयोग केल्यानंतर मला लक्षात आलं की इथे खरोखरी एक छोटेसे टाईम-पॉकेट आहे, जे माझ्या प्रयोगासाठी अचूक प्रयोगशाळा बनू शकते.  यांतून एखादी छोटीशी वस्तू १८५८ मध्ये जाऊ शकेल !’
‘ओ माय !’ हे सांगणारा  पद्या नसता तर मी बिलकुल विश्वास ठेवला नसता.
‘हे मशीन काय करते ? त्या वस्तूला भूतकाळात घेऊन जाते?’
 ‘नो. मी तुला आधीच सांगितलंय की ते काम आपोआप होते. त्या टाईम पॉकेटमध्ये काही सापडलं की मग ते आपोआप त्या फ्लॉमध्ये खेचलं जातं.
आता ऑब्जेक्ट त्या काळात तर जाऊ शकते. पण इकडे परत कसे येणार ?
 ...मग मी हा कन्व्हर्टर बनवला. अर्थात हा कन्व्हर्टर फक्त त्या काळातून वर्तमानात परत येण्यास मदत करतो.’
‘म्हणजे काय करतो ?’
‘तो ठराविक अंतराने एक अल्ट्रा हाय फ्रिक्वेन्सी पल्स पाठवतो. ही पल्स त्या काळ-विवरातल्या इथरमधून प्रवास करते, आणि ती त्या ठराविक स्थळाशी, टाईम पॉकेटशी  ट्यून केलेली असेल.  ती एका रिसिव्हरशी कनेक्टेड असेल. ही रिसिव्हर चिप त्या पॉकेटच्या फ्लॉ मध्ये किंवा भोवऱ्यामध्ये सोडायची आहे. आता ती या पल्सेसद्वारे आपल्या ऑब्जेक्टशी कनेक्टेड आहे.
या कन्व्हर्टर मध्ये आणखी एक रेझोनेटर बसवला आहे, जो ठराविक कालावधी नंतर एक रेझोनेटिंग सिग्नल पाठवतो. तो त्या चिपपर्यंत पोचला की तिथे  पिक अप होईल आणि तिथला अवकाश आकुंचित होईल. मग तिथल्या आणि इथल्या अवकाशामध्ये जी काळाची घडी पडली आहे, तिला ओलांडून,  तिथल्या रिसिव्हरच्या ठराविक क्षेत्रातल्या वस्तू, जिथून या पल्सेस पाठवल्या जात आहेत तिकडे म्हणजे या कन्व्हर्टरकडे आकर्षित होतील आणि या ठिकाणी परत येतील. आणि मग  अ‍ॅज ए रिअ‍ॅक्शन  ऑफ धिस, काळ आणि अवकाश पुन्हा पूर्ववत म्हणजे नॉर्मल होतील.
...आणि आता ते टाईम पॉकेट निकामी झालेले असेल !
...हे तुला मी अतिशय संक्षिप्त आणि सोपं करून सांगतो आहे. प्रत्यक्षात ती प्रक्रिया खूप किचकट आणि गुंतागुंतीची आहे आणि त्यामध्ये प्रकाशाचा वेग आणि इतर बऱ्याच गोष्टी महत्वाचा रोल करतात !
आता तू विचारशील की हे सगळं असं आखीव आणि काटेकोरपणे कसं काय होतं ?
... अनिकेत, खरं सांगायचं तर यामध्ये आणखी काही घटक ...काही नैसर्गिक शक्ती काम करतात, ज्यांचे कार्य मानवाच्या नियंत्रणात नाही. किंबहुना एकदा आपण त्यांना कार्यान्वित केले की त्या आपल्या अधीन रहात नाहीत.  जसे की उंचावर असलेला दगड आपण विशिष्ट दिशेला किंचित ढकलू शकतो पण एकदा त्याला उतारावर गती मिळाली की त्याचे कार्य नियंत्रित करू शकत नाही. पाणी बांध घालून अडवले आणि मग त्याला किंचित वाट दिली की ते आपल्या शक्तीने मोठमोठी झाडे उन्मळून टाकू शकते, त्याची पुढची गती नियंत्रित करणे फार अवघड असते. अवकाशात सोडलेल्या उपग्रहाचे नियंत्रण सुटले की त्याच्यावर कोणत्या शक्ती कशा प्रकारे कार्य करतील, हे शास्त्रज्ञसुद्धा अजून सांगू शकलेले नाहीत.
तसेच काहीसे हेही आहे. ‘तिकडून परत येताना काही नैसर्गिक शक्तीच यात मदत करतात. पाण्याच्या भोवऱ्यात सापडलेले लाकूड पुन्हा पुन्हा वर येते आणि खाली जाते, तसे. वर येण्याचा क्षण आपण फक्त पकडायचा.
..तर सांगायची गोष्ट, मला त्यात बऱ्यापैकी यश मिळाले आणि हा कन्व्हर्टर मी बनवू शकलो. ’
 ‘हम्म... मग पुढे काय झालं ? तू याचा उपयोग कसा केलास ?’
‘वेल, मी त्यातून एखादा उंदीर किंवा सरडा पाठवू शकत होतो. पण त्यातून मला फारसं काही ऑब्झर्व्ह करता आलं नसतं. शिवाय त्यात आणखी एक धोका होता.’
‘कसला ?’
‘तुझ्या लक्षात आलं नाही ? एकोणिसाव्या शतकात प्लेग आणि तत्सम साथीच्या रोगांनी धुमाकूळ घातला होता. सजीव प्राण्यामधून त्याचे जंतू सहज संक्रमित झाले असते. तेव्हा तो पर्याय मी डिलीट केला.
...मी त्यातून एक मिनी कॅमेरा पाठवण्याचे ठरवले ! म्हणजे त्या काळातील लाईव्ह चित्रण मला पाहायला मिळाले असते .’
‘ओह, दॅट्स ए वाईझ डिसिजन इंडीड !’
‘...मी एक साधारण काडेपेटीएवढ्या आकाराचा एक ऑटो कॅमेरा मिळवला. त्या  कॅमेर्‍यात तो रिसिव्हर फिट केला. कन्व्हर्टर फुल चार्ज केला. त्याचे सिग्नल्स रिसिव्हरमध्ये जाताहेत याची खात्री केली. आणि एक मार्कर म्हणून आठ तासाचे सेटिंग ठेवले. आठ तास, कारण हा चोरकप्पा कुणीतरी उघडण्यासाठी पुरेसा कालावधी जायला हवा ना ! ...तर माझा ऑब्झर्व्हर आतापासून बरोबर आठ तासांनी परत येणार होता. यात अडचण एकच होती की ज्या काळात तो कप्पा उघडला गेला होता त्याच कालावधीत माझा रिसिव्हर तिथे असायला हवा होता. हे सेटिंग करणे मला जरा अवघड गेले. पण अखेरीस मी ते करू शकलो.
मग मी  ‘ते’ सील उघडले. !
..तो कप्पा म्हणजे एक चपटा ड्रॉवर होता. आणि त्यात फक्त एक घडी केलेला कागद होता. कागद किंचित पिवळसर होता. मी तो टेबलावर ठेवला. ड्रॉवर उघडून त्यात कॅमेरा अगदी आत सरकवून ठेवला की ड्रॉवर उघडणाऱ्याला सहजासहजी दिसू नये. मग ड्रॉवर पुन्हा व्यवस्थित  बंद केला. आता आठ तास तरी तो उघडायची गरज नव्हती.
मग मी टेबलवर ठेवलेल्या कागदाची घडी काळजीपूर्वक उलगडली. काळपट शाईने त्यावर इंग्रजीत काहीतरी लिहिले होते.
वरती काळ्या शाईने लिहिलेली तारीख होती. १८ डिसेंबर १८५८. आणि खाली अगदी त्रोटक मजकूर होता. असे वाटत होते की ते कुणातरी इंग्रज व्यक्तीच्या दैनंदिनीतील एक पान असावे. पान फाडलेले दिसत होते. अक्षरे अगदी कालच लिहिल्यासारखी स्पष्ट होती.’
प्रद्युम्नने त्याचा मोबाईल उचलला आणि त्यातून मला एक फोटो दाखवला. तो एका लिखित मजकुराचा फोटो होता. कर्सिव्ह वळणात सुवाच्य इंग्रजीत लिहिलेले होते.

 
तो  मजकूर मी सावकाश वाचला. ..
 
                                                                                   18th December 1858.
At last,  this day has arrived !
..We are leaving India today. Our Company worked and ruled  in this  big land for more than one and half century and now the Royal Crown is the master of it.
I would forget all the troubles we faced here  and victories got over natives, except that terrible event ! It is one of the most memorable events,  I could never forget !
On that day, when we conquered Jhansi by killing the Queen  Laxmibaai.
No   any ethics in this world can ever support   the way in  which we killed her. She was with her only maid , and we were about fifity soldiers. She fought bravely and at last, we surrounded her, killed her ! Well, We may have caught her and imprisoned for a long while. But we did not want to do any favor  to her.
…We just killed her  very rudely !
I could never  forgive myself for such a dastardly, brutal  deed !
It’s very nice that we are leaving this country.  We will be boarding on the ship in the evening.
It will be dangerous to keep this page in my diary, but I have to confess this somewhere. I can not give my confession to Bishops, who are  my compatriot.  And I don’t want to destroy this page  at all.
I will keep it  in this Desk , in a secret pocket and will hide from the world. But it will of course be open to the almighty God !!
Oh God, Please forgive me !!!
James Anderson, R/O Welshpool .
 
...खालची सही थोडी स्टायलिश असली तरी नाव सहज वाचता येत होते.
‘बापरे, १८५८ च्या जून महिन्यात  झाशीची राणी लक्ष्मीबाई शहीद झाली होती !’ मी थक्क झालो.
‘हो. ...आणि १ नोव्हेंबर १८५८ ला हिंदुस्तानात ईस्ट इंडिया कंपनीची राजवट संपुष्टात येऊन ब्रिटीश गव्हर्न्मेंटची, राणी व्हिक्टोरियाची  सत्ता स्थापित झाली !’  प्रद्युम्न शांतपणे म्हणाला.
( क्रमश: )

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

manguu@mail.com's picture

19 Apr 2018 - 12:51 pm | manguu@mail.com

छान

वाह वाह ...अजुन येवु द्या

उगा काहितरीच's picture

19 Apr 2018 - 4:46 pm | उगा काहितरीच

वाचतोय...

श्वेता२४'s picture

19 Apr 2018 - 4:52 pm | श्वेता२४

कालचा आणि आजचा पण भाग छोटा वाटतोय वाचताना. जारा मोठे मोठे भाग लिहा. उत्सुकता ताणली गेलीय पुढे काय होणार म्हणून

इष्टुर फाकडा's picture

20 Apr 2018 - 9:44 pm | इष्टुर फाकडा

+१

मंदार कात्रे's picture

19 Apr 2018 - 6:35 pm | मंदार कात्रे

उत्कण्ठावर्धक !

अमित खोजे's picture

19 Apr 2018 - 7:52 pm | अमित खोजे

कथा चांगलीच पकड घेत आहे. फक्त थोडे मोठे भाग टाकलेत तर बरे होईल. वाचायला सुरुवात करून वेग येत नाही तेवढ्यातच भाग संपतोय.

बाकी ते 'खोलले - खोलले' डोक्यात जातंय. पर्यायी मराठी शब्द 'उघडले' असा आहे. तेवढा वापरला तर बरे होईल.
कृ ह घे

सस्नेह's picture

19 Apr 2018 - 9:55 pm | सस्नेह

सॉरी, पण खूप बिझी अन धावपळीच्या दिनक्रमामुळे मी रोज ५००-६०० पेक्षा जास्त शब्द टंकू शकत नाही. पुन्हा ते तपासून योग्य त्या प्रकारे अरेंज करुन थोडेफार एडिटावे लागते, त्यालापण वेळ लागतो.
यामुळे साधारण १२०० ते १६०० शब्दांचा एक भाग होतो. (पहिले दोन भाग तर प्रत्येकी १००० च शब्दांचे आहेत)
पुढचे दोन मोठे टाकण्याचा प्रयत्न करते. :)

अमित खोजे's picture

21 Apr 2018 - 1:13 am | अमित खोजे

गोष्ट छान पुढे चालली आहे याची नोंद घ्यावी आणि माझ्यासारख्या इतर चातकांची तहान भागवावी.

पैसा's picture

19 Apr 2018 - 9:46 pm | पैसा

मस्त रंगात आलेली कथा!

पद्मावति's picture

19 Apr 2018 - 11:38 pm | पद्मावति

तूफान!

मास्टरमाईन्ड's picture

20 Apr 2018 - 12:12 am | मास्टरमाईन्ड

फक्त दोन भागांमध्ये कमीत कमी वेळ जाईल एवढं पाहा.
मान्य आहे तुम्ही बिझी असू शकता, पण वाट पाहायचा कंटाळा येतो हो.

श्वेता२४'s picture

20 Apr 2018 - 11:19 am | श्वेता२४

आपल्या मताशी मीही सहमत आहे

सस्नेह's picture

20 Apr 2018 - 11:41 am | सस्नेह

:)

खिलजि's picture

20 Apr 2018 - 4:29 pm | खिलजि

वैज्ञानिक प्रकरण थोडं डोक्यावरून गेलं या भागात .तरी उत्सुकता कायम आहे . पुभाप्र आणि पुलेशु

सिद्धेश्वर विलास पाटणकर