द टाईमब्रिज अर्थात कालसेतू – ६ (अंतिम)

सस्नेह's picture
सस्नेह in जनातलं, मनातलं
26 Apr 2018 - 12:26 pm

द टाईमब्रिज अर्थात कालसेतू – १
द टाईमब्रिज अर्थात कालसेतू – २
द टाईमब्रिज अर्थात कालसेतू – ३
द टाईमब्रिज अर्थात कालसेतू – ४
द टाईमब्रिज अर्थात कालसेतू – ५

पूर्वसूत्र :
मी तो कोयता हातात घेतला आणि कोयंड्याच्या विरुद्ध बाजूच्या बिजागरीच्या सापटीत त्याचे धारदार चपटे टोक घालून किंचित जोर दिला. त्यासरशी ‘कर्र कर्र ..’ असा आवाज झाला आणि दरवाजा आणि चौकट यामध्ये बारीकशी फट पडली. पद्या आणि मी दोघांनी पाचेक मिनिटे प्रयत्न केल्यावर त्या जुनाट बिजागऱ्या निखळून खळखळत आतल्या जमिनीवर पडल्या आणि दार किंचित तिरके होऊन आतल्या बाजूला कलले.

भाग ६
पद्याने हाताने दार ढकलताच ते करकरत आत गेले आणि आतले दृश्य फ्लॅश लाईटच्या उजेडात दिसू लागले.
ते एखाद्या खोल गुहेसारखे होते. त्रिमिती चित्रासारखे...! वर आणि खाली, डावीकडे आणि उजवीकडे, आणि समोर, कुणीकडेही पाहिले तरी एकच दृश्य दिसत होते ! दोन्ही बाजूंनी पूर्ण उंच वाढून वर एकमेकांना मिळालेल्या झाडांच्या एखाद्या मैलोन्मैल पसरलेल्या सरळ बोगद्यातून जाताना जसे तिन्ही बाजूला झाडे आणि त्यांचा एकच छेदबिंदू समोर दिसावा तसे काहीसे त्या दृश्याचे वर्णन करता येईल. पण छे ! ती उपमासुद्धा समर्पक झाली नसती.
एका सरळ ओळीत आणि अगदी जवळ जवळ, दुतर्फा हजारो खांब असलेल्या एखाद्या कॉरीडॉरमधून दुसऱ्या टोकाला पाहिले तर जसे वाटेल तसा काहीसा भास होत होता. दूरच्या बिंदूपाशी आकाश आणि जमीन, तसेच डावी आणि उजवी बाजू एकच झाल्यासारखे वाटत होते. अगणित कॉन्सेंट्रिक सर्कल्स आपल्या केंद्राकडे प्रवास करत असावीत असा काहीसा भास होत होता.
...खरोखर तसले दृश्य मी जन्मात पाहिले नव्हते !!
काही मिनिटे आम्ही मंत्रमुग्ध झाल्यासारखे पहात राहिलो. त्या हॅवॉक कंडीशनमधून प्रद्युम्नच प्रथम बाहेर आला.
‘वॉव, सो धिस इज इट ! अ ट्रू टाईम पॉकेट !! मार्व्हलस !!!’
आता यात मार्व्हलस काय ते त्यालाच माहिती !
पद्याने सॅकमधून आपला मोबाईल बाहेर काढला आणि पटापट समोरच्या दृश्याचे काही स्नॅप्स मारले. मग मोबाईल ठेवून त्याने कन्व्हर्टर बाहेर काढला आणि भराभर त्यावरचे काही नॉब्ज प्रेस केले. त्याबरोबर त्याच्या पॅनेल वरचे काही लाईट्स उघडझाप करू लागले. कन्व्हर्टर त्या, आता उघडलेल्या दरवाजाजवळ नेताच एका डायलवरचा काटा गर्रकन फिरला आणि एका दिशेला स्थिर झाला. तो आता त्या खोलीच्या छताची दिशा दाखवत होता. आम्ही दोघांनी एकदमच छताकडे पाहिले. तिथे दाट अंधाराच्या पार्श्वभूमीवर काही फिकट प्रकाशरेषा गोलाकार फिरून एकत्र आल्या होत्या आणि एखाद्या भोवर्‍यासारखा आकार दिसत होता. त्याचा मध्य एका पिवळसर प्रकाशाच्या टिंबामध्ये परावर्तित झाला होता, आणि तिथे नजर गेल्यावर ती काही केल्या स्थिर होत नव्हती ! सारखी इकडे तिकडे घसरत होती. दृष्टिभ्रम निर्माण करणारी काही रेखाचित्रे मी पुष्कळदा टाईमपास म्हणून पहात बसत असे. तसे काहीसे तिकडे पाहिल्यावर वाटत होते.

a

'हे त्या पॉकेटचे सेंटर आहे, अन्या.' पद्या उद्गारला.
आता त्याच्या हालचाली अगदी जलद झाल्या. तो झटकन मागे वळला आणि त्याने कन्व्हर्टर पुन्हा आत ठेवून हातातली सॅक खाली ठेवली. आजूबाजूला नजर टाकली. जरा शोधाशोध केल्यावर तिथे एक रिकामा चौथरा आढळला. त्याने स्कार्फचे फटके मारून तो साफसूफ केला आणि सॅकमधला कन्व्हर्टर काढून त्या लहानशा चौथर्‍यावर ठेवला. त्याच्या अँटेना हाताने हलवून पाहिल्या आणि बॅटरी इंडिकेटरकडे एक नजर टाकली. बॅटरी फुल होती. मग त्याने हातातल्या रिस्टवॉचकडे नजर टाकली. आठ वाजून वीस मिनिटे झाली होती. कन्व्हर्टरचा निळा नॉब दोन वेळा प्रेस केला. आता डायलवर २ : १२० : ७२०० असे आकडे दिसू लागले.
'अन्या, ' प्रद्युम्न माझ्याकडे वळून म्हणाला, 'ही घे जिप्सीची किल्ली. नीट सांभाळून ठेव खिशात. सगळे नीट लक्षात आहे ना ? '
'हो रे. तू आत जाताच हा रेड नॉब एकदाच प्रेस करायचा आहे. मग दोन तास इथेच बसून रहायचे, आणि बॅटरीवर नजर ठेवायची. ' मी किल्ली खिशात टाकली.
'येस.. आणि त्यानंतर मी नाही आलो तर कन्व्हर्टर घेऊन घरी जायचे. तिथे गेल्यावर हा करडा नॉब नव्वद अंशात फिरवायचा. गरज पडली तर कन्व्हर्टर चार्जिंग करायचा. आणि झोपून टाकायचे. ...आणि हो, महत्वाचे म्हणजे झोपताना तुझा॑ मोबाईल तुझ्या उशाला ठेवायचा आहे. फुल चार्ज करून आणि सायलेंटवर नाही, ही खात्री करून ! ओके ?'
'..येस बॉस ! ऑल दि बेस्ट !' मी अंगठा वर केला.
पद्याने सॅक उघडून आतला मोबाईल बाहेर काढला. येतानाच तो फुल चार्ज केला होता. त्यात वेळ पाहिली. मग आपल्या रिस्टवॉचमध्येही वेळ पाहिली. कन्व्हर्टर आणि डिटेक्टर सोडून सगळे सामान पुन्हा सॅकमध्ये नीट ठेवले आणि सॅक मधून छोटा टॉर्च बाहेर काढला. त्याचा प्रकाश जेमतेम दहा पावलांपर्यंत पोचत होता. टॉर्च समोर धरून त्याने त्या उघडलेल्या दाराच्या आत एक पाउल टाकले. नजर जरा सरावल्यावर आणखी एक पाऊल टाकले.
...आतल्या अंधारात तो दिसेनासा होईपर्यंत मी डोळे फाडून बघत राहिलो. तो दिसेनसा झाला तसे मागे वळून मी कन्व्हर्टरचा लाल नॉब एकदा प्रेस केला. त्याबरोबर मघाचे २ : १२० : ७२०० हे आकडे एकदा उजळून उठले आणि मग स्टॉप वॉचप्रमाणे भराभर कमी कमी होऊ लागले.
...एक अनोखा काऊंट डाऊन सुरु झाला होता !!
हातातला फ्लॅश लाईट ‘लो’ वर सेट करून मी तो कन्व्हर्टरआणि डिटेक्टरच्या शेजारीच त्या चौथऱ्यावर ठेवला आणि तिथेच शेजारी बैठक मारली. आणि काहीशा अस्वस्थपणे पद्याची वाट पाहू लागलो.
..ते दोन तास म्हणजे माझ्या आयुष्यातील सर्वात बेक्कार, भयानक काळ होता. समोर ठेवलेल्या कन्व्हर्टरचे आकडे फ्लॅश लाईटच्या मंद उजेडात भराभर पळताना दिसत होते आणि आजूबाजूला काहीही जाग नसताना निबिड काळोखात, त्या भयाण खोलीत मी एकटा बसलो होतो ! समोरच्या खोलीचे दृश्य होते तसेच होते आणि आतून काहीही आवाज येत नव्हते. आले असते तरी मी तिच्यात जाण्याचे किंवा डोकावण्याचे धाडस केले असते का, शंकाच आहे.
मी मिनिटामिनिटाला त्या उघड्या दरवाज्याकडे पहात होतो. आणि मग कन्व्हर्टरच्या डायलकडे.
एक तास होऊन गेला. अजून पद्याचा पत्ता नव्हता.
...मधेच मला डुलकी लागली असावी. एक उंदीर खसपसत इकडून तिकडे पळाला आणि मी दचकून सावरून बसलो. आधी त्या दाराकडे पाहिले. सगळे काही जैसे थे. मग घड्याळाकडे नजर टाकली. पावणेदहा झाले होते.
...आणखी अर्धा तास ! मग प्रद्युम्न पुन्हा माझ्याबरोबर असेल ! या विचाराने जरा बरे वाटले.
टाईम पास म्हणून स्मोकिंग करावे काय, असा विचार आला. पण इथे कुठेतरी ठिणगी पडून काहीतरी घोळ झाला असता तर अवघड झाले असते. म्हणून तलफ आवरली.
कन्व्हर्टर संथ गतीने झिरोकडे चालला होता. किती वेळ गेला तरी घड्याळाचे आकडे पुढेच जात नव्हते. कॉलेजात किंवा घरी मी यावेळी एकतर पेपर तपासत बसलेलो असतो किंवा जेवणे आवरून तन्वी, माझ्या छोट्या मुलीसोबत मस्ती करत बसलेलो असतो. तेव्हा वेळ कसा भराभर निघून जात असतो !
काळ कसा सापेक्ष असतो हे मला पुरेपूर अनुभवायला मिळाले !
तन्वीच्या बाललीला आठवताच माझ्या मनावरचा ताण काहीसा कमी झाला. तिचे ‘बाब..बा’ असे बोबडे बोल नकळत कानात घुमले. तिच्या खोड्या आठवून मी स्वत:शीच हसलो.
‘बीsssप बीsssप बीsssप ‘
कन्व्हर्टरमधून तीन वेळा आवाज झाला. मी चमकून तिकडे पाहिले. डायलवरचे तास, मिनिट, सेकंद असे सगळे आकडे झिरो करून तो लुकलुक करत होता. होता. मी घड्याळ पाहिले. साडेदहा वाजून गेले होते.
माय गॉड ! दोन तास होऊन गेले होते आणि प्रद्युम्न अजून आला नव्हता !!
मी झटकन उठून उभा राहिलो आणि त्या दरवाज्याकडे पाहिले. आतला काळोख ‘आ’ करून तिथे अजुनी थबकला होता. मी बिचकतच दाराच्या तोंडाशी गेलो आणि आत डोकावून पाहिले. आतल्या दृश्यात काहीच फरक पडला नव्हता. नाही म्हणायला आतल्या अंधाराची गडद काळी छटा जाऊन किंचित करडी छटा आली होती आणि वरच्या त्या काळविवराचे तोंड जरा रुंद झाल्यासारखे वाटत होते. त्यातून आता रुपेरी रेषा झगमगत होत्या. मी पाचेक मिनिटे त्याचे निरीक्षण केले. मला थांबावे की जावे हे समजेना. पद्याला एकटे सोडून जावेसे वाटत नव्हते. काही वेळ थांबून वाट पहावी काय ?
... पण प्रद्युम्नने ज्याअर्थी मला निघून जायला सांगितले होते त्याअर्थी त्याला तसेच काहीतरी कारण असणार. याबाबतीत स्वत:पेक्षा त्याच्यावर विश्वास ठेवणे शहाणपणाचे होते. म्हणून मी तिथले चंबूगबाळे आवरले. कन्व्हर्टर आणि डिटेक्टर सांभाळून माझ्या खांद्याला अडकवलेल्या बॅगमध्ये ठेवले आणि फ्लॅश लाईट उचलून आल्या वाटेने बाहेर पडलो. जाताना पाय आपटत जायला मी विसरलो नाही.
बाहेर जिप्सी उभी होती. आजूबाजूला एकदा नजर टाकून मी सर्व सामान पुढच्या सीटवर नीट ठेवले गाडी स्टार्ट केली. इतक्या रात्री माळावर निशाचर प्राण्यांशिवाय कुणीच नव्हते. मी संथपणे ड्राईव्ह करत घरी आलो तेव्हा पावणे बारा वाजत आले होते. शंभूने, जुन्या नोकराने दार उघडले आणि जेवायला वाढू का, विचारले. भूक लागल्यासारखी वाटत होती पण काही खायची इच्छा नव्हती. जाताना आम्ही हलका नाष्टा घेतला होता. पद्याला काही खायला मिळाले असेल का ? तो खरंच सोळाव्या शतकात पोचला असावा का ?
डोके झाडून मी ते विचार दूर सारले आणि शंभूला हातानेच काही नको म्हणून सांगितले. वरती जाऊन त्या खोलीत कन्व्हर्टर आणि डिटेक्टर व्यवस्थित ठेवले. कन्व्हर्टरचा करडा नॉब पद्याने सांगितल्याप्रमाणे उजवीकडे नव्वद अंशात फिरवला. एक बीप आवाज होऊन ते आकडे आता तीस मिनिटांचा कालावधी दाखवू लागले. त्यानंतर पुन्हा आपोआप तो तीस तीस मिनिटे फॉरवर्ड होत जाणार होता. पुन्हा त्याचे सेटिंग बदलेपर्यंत !
आकडे भराभर पळू लागले, तसे मी कन्व्हर्टरचे चार्जिंग चेक केले. ते दहापैकी तीन रेघा दाखवत होते. पद्या म्हणाला होता की बॅटरी तीन दिवस जाते. मला थोडे आश्चर्य वाटले. मी तो पुन्हा चार्जिंगला लावला आणि माझ्या रूममध्ये आलो. आधी मोबाईल चार्जिंगला लावला. कपडे बदलले नाहीत. तसाच आडवा झालो. प्रद्युम्नचा फोन केव्हाही येण्याची शक्यता होती. पुन्हा कपडे बदलण्यात वेळ घालवायला नको.
बऱ्याच वेळाने डोळा लागला. मी किती वेळ झोपलो, कुणास ठाऊक. मला तर वाटले की डोळे मिटले न मिटले तोच मोबाईल खणखणू लागला. उठून धडपडत मोबाईल घेतला.
...पद्याचाच कॉल होता !
‘ताबडतोब कोठीपाशी ये.’ तीनच शब्द बोलून त्याने फोन बंद केला.
मोबाईल मध्ये वेळ पाहिली. पहाटेचे सव्वाचार वाजले होते. पाच वाजले की माळाकडच्या रस्त्याला माणसे, जनावरे यांची वर्दळ सुरु झाली असती. घाई करायला हवी होती. मी जिप्सीची किल्ली घेतली आणि ताडताड बाहेर पडलो. शंभू झोपला होता. त्याला माझ्या अशा रात्री अपरात्री येण्याजाण्याची सवय असल्याने काही सांगायची गरज नव्हती. दहा मिनिटातच मी माळापाशी आलो. डांबरी रस्ताय्वरून कच्च्या रस्त्यावर गाडी आत घालताना लक्षात आले, निघताना गडबडीत माझ्याकडचा दुसरा कंपास घ्यायला मी विसरलो होतो ! पण परत फिरणे शक्य नव्हते. देवाचे नाव घेऊन समोरच्या कोठीच्या दिशेने गाडी पायवाटेवर घातली. आश्चर्य म्हणजे कुठेही न चुकता तीनच मिनिटात मी कोठीपाशी आलो. जिप्सीचा आवाज येताच खिंडाराच्या उघड्या तोंडातून प्रद्युम्न बाहेर आला. त्याचा अवतार बघण्यासारखा होता. घामेजलेला चेहरा, विस्कटलेले केस, मळलेले कपडे ! अंगावर खरचटल्याच्या खुणा आणि कपड्यांवर काळे फराटे . पण डोळे मात्र उत्साहाने चमकत होते. त्याने माझ्याकडे पाहून अंगठा वर केला आणि पाठीवरची सॅक जिप्सीच्या मागच्या भागात टाकली. मग पलीकडचे दार उघडून आत बसण्याऐवजी तो पुन्हा खिंडारात शिरला. तो लगेच आत बसणार म्हणून मी इंजिन सुरूच ठेवले होते. पण तो पुन्हा मागे वळलेला पाहून मला आश्चर्य वाटले. मी त्याला हाक मारणार इतक्यात तो पुन्हा बाहेर आला. त्याच्या दोन्ही हातांवर एक बोचके आडवे ठेवलेले होते. अंधारातून तो हेडलाईट्सच्या प्रकाशात येताच माझ्या लक्षात आले की तो एका स्त्रीचा देह होता. तिचे लांबसडक केस सुटून अस्ताव्यस्तपणे खाली लटकत होते आणि अंगावरची साडी चुरगळलेली , कशीतरी लपेटलेली दिसत होती. तिचे डोळे मिटलेले होते.
जिप्सीच्या मागच्या सीटवर त्याने तिला अलगद ठेवले आणि पडू नये म्हणून एक कुशन आणि त्याची सॅक बाजूला लावून ठेवली. गाडीच्या आतल्या मंद उजेडात मला दिसले की ती बेशुद्धावस्थेत असून तिचा श्वास मंदपणे सुरु होता. माझी आजी इरकली लुगडी नेसत असे, त्यापद्धतीचे लुगडे तिने नेसले होते आणि तिच्या अंगावर, आजीच्या अंगावर असत तसे जुन्या पद्धतीचे दागिने भरगच्च घातलेले दिसत होते.
मी डोळे विस्फारून त्यांच्याकडे पाहत होतो. पद्या दुसऱ्या बाजूने पलीकडचे दार उघडून माझ्या शेजारी बसला आणि म्हणाला ‘चला.’
‘पद्या, या....या बाई ...?’
‘धीरावतीदेवी , जहागीरदार ऑफ गोपाळपूर !’ पद्या नाट्यमयरित्या हवेत हात उडवून म्हणाला. ‘आधी घरी चल मग सांगतो सगळं तुला. यांना आधी शुद्धीवर आणायला हवं.’
परतीच्या रस्त्यात आम्ही एक शब्दही बोललो नाही. रस्त्यावर थोडी थोडी जाग दिसत होती. रस्त्याकडेला चुली पेटल्या होत्या. पण अजुनी अंधार गडद असल्यामुळे आमच्या जिप्सीकडे कुणाकुणाचे लक्ष गेले तरी काही दिसू शकले नाही.
वाड्यावर जाताच आम्ही दोघांनी मिळून ते बोचके वरच्या मजल्यावर दुसऱ्या एका रूममध्ये नेले. या रूममध्ये माझी पत्नी राधा कधी आली तर रहात असे. त्यामुळे तिथे तिचे काही कपडे कपाटात ठेवलेले होते. पद्याने आत येऊन बेडवर धीरावती बाईसाहेबांना अलगद ठेवले आणि तो पलीकडच्या त्याच्या 'लॅब'मध्ये गेला. त्याने आधी कन्व्हर्टर चा स्विच बंद केला. त्याचा चार्जर काढून नीट ठेवून दिला. तोपर्यंत मी शंभूला नव्या पाहुणी बद्दल जुजबी कल्पना देऊन पाणी वगैरे आणवले. आता मी प्रथमच तिच्याकडे निरखून पाहिले. ती पंचविशीच्या आसपासची एक अनुपम लावण्यवती होती ! काळेभोर लांबसडक केस आता काहीसे अस्ताव्यस्त झाले होते. चेहरा फिकट झाला होता. लांबसडक पापण्यांचे डोळे मिटलेले होते. राजा रविवर्म्याचे एखादे चित्र जणू जिवंत होऊन यावे तशी ती दिसत होती.
थोड्याफार प्रयत्नानन्तर तिने डोळे उघडले. अगदी अभावानेच आढळणारे तेजस्वी हिरवट निळे डोळे ! त्यांच्याकडे पाहिल्यानंतर सूर्याकडे पहावे तसे डोळे आपोआपच दुसरीकडे वळत होते. एकूण रूप आणि व्यक्तिमत्व असे खानदानी की पाहणाऱ्याच्या वागण्यात अभावितपणेच अदब यावी.
..तिची प्रतिक्रिया अर्थातच टोकाच्या विस्मयाची होती. ती कोठे आणि कशी आली आहे ते तिला समजावून सांगणे हे जिकीरीचे काम होते. कधी मी तर कधी प्रद्युम्न असे आम्ही थोडे थोडे करत तिला जमेल तितके सोप्या भाषेत ते सांगितले. ती जात्याच बुद्धिमान असावी कारण या नव्या संकल्पनेवर विचार करून ती स्वीकारायला तिला काही मिनिटेच पुरली. तिच्या वागण्याबोलण्यात एक वेगळ्याच प्रकारचा डौल आणि आत्मविश्वास होता. भाषा जुन्या पद्धतीची पण अदबशीर होती.
पद्या तिच्या एकूण व्यक्तिमत्वाने अतिशय प्रभावित झाला होता हे तर मी पहातच होतो.
‘हे महाभाग, ‘ अखेर ती हात जोडून म्हणाली. तिचा स्वर किंचित अनुनासिक पण अतिशय मुलायम आणि गोड होता.
‘आपण माझे प्राण वाचवून मजवर अनंत उपकार केले आहेत हे तर मी पाहत्येच आहे. आपण माझे तारणहार होऊन आला आणि या नव्या जगतात मजला सुखरूप आणले यासाठी आपले अनंत आभार ! आता या नव्या विश्वात मजला सामावून जाण्यास मदतही कराल अशी माझी अपेक्षा आहे. नव्हे, तशी मी आपणास विनंती करत्ये आहे. मजसाठी ही एक अनमोल संधी आपण आणून दिली आहे. हे उपकार मी कसे चुकते करू ? या ठिकाणी तर माझे असे काहीच नाही. नाही म्हणण्यापुरते हे अलंकारातील सुवर्ण तेवढे आहे, जे आपणास मी अर्पण करत्ये.’
‘नाही नाही, बाईसाहेब, त्याची बिलकुल गरज नाही.’ पद्या हसून म्हाणाला. ‘आपण या विश्वात रमून जाण्यातच आमचे यश आणि आनंद आहे. ईश्वरकृपेने हे करण्यासाठी पुरेसे धन आणि इतर सुविधा आम्हाकडे आहेत.’
पद्याला ही ऐतिहासिक नाटकातली भाषा शिकायला किती दिवस लागले असतील, याचा मी विचार करत होतो.
...माझ्या पत्नीचे ‘यवनी’ पद्धतीचे कपडे घालण्यासाठी तिला तयार करण्यात आमचे वाटीभर तरी रक्त आटले ! पण अखेरीस जेव्हा ती स्नान करून पंजाबी ड्रेस करून बाहेर आली तेव्हा, लांबसडक केस आणि पुसटसे गोंदण सोडले तर एखाद्या आधुनिक युवतीत आणि तिच्यात काही फरक करता आला नसता. आम्हीही तोपर्यंत सकाळचे व्यवहार आवरून नाष्ट्यासाठी खालच्या हॉलमध्ये आलो होतो. पद्या भान हरपून तिच्या बदललेल्या रुपाकडे पहात राहिला आहे हे मी तिरक्या डोळ्यांनी पहात होतो.
नाश्त्याच्या प्लेट्स मांडता मांडता शंभू विस्मयाने नव्या पाहुणीकडे अधूनमधून पहात होता. जेवणाचे पदार्थ तिच्यासाठी अर्थात नवीन होते तरी तिने ते पुष्कळच सफाईने खाल्ले आणि आमची परवानगी मागून ती आराम करण्यासाठी वरच्या रूममध्ये निघून गेली. ती ज्या प्रसंगांतून जाऊन इथे आली होती, ते लक्षात घेता तिला थोडा रिकामा वेळ आणि बरीचशी विश्रांती यांची नितांत आवश्यकता होतीच.
ती गेल्यानंतर मी आणि प्रद्युम्न माझ्या रूममध्ये खुर्च्या टाकून बसलो.
‘हं., बोल आता ! तू आत गेल्यावर काय काय झाले ?’ माझी उत्सुकता शिगेला पोचली होती.
‘अनिकेत, मी त्या अंधाऱ्या खोलीत प्रवेश केला. खोली रिकामीच होती. टॉर्चच्या उजेडात चारच पावले टाकली असतील तोच एकदम मला डोळ्यासमोर अंधारी आल्यासारखे झाले. डोळे चोळून पुन्हा नीट उघडले आणि पाहिले तर मी त्या देवघरात उभा होतो !
...येस्स, ते देवघरच होते. समोर नवाकोरा नुकताच घडवल्यासारखा मोठा शिसवी देव्हारा होता, पण रिकामा. त्यावर देव मांडलेले नव्हते. कारण अजून या वाड्यात कुणी राहायलाच आलेले नव्हते. पायाखाली दगडी फरशी होती. दोन्ही बाजूच्या भिंतीत कपाटे, काही खुंट्या होत्या. कपाटांची दारे कलाकुसरीने सजवलेली सागवानी दिसत होती.
मी घड्याळाकडे पाहिले. ते रात्री नऊची वेळ दाखवत होते. मात्र बाहेरच्या संधीप्रकाशावरून फारतर सहा वाजले असावेत असे वाटत होते. टाईम इलेमेंट मध्ये काहीतरी लोच्या होता.
दहाएक मिनिटे मी त्या खोलीचे आतून निरीक्षण केले आणि मग मागे वळून त्याच दरवाज्यातून बाहेर पडलो. कारण देवघराला दुसरा दरवाजाच नव्हता. वाट तिथे संपत होती. बाहेर माजघर होते आणि त्यानंतर ती छोटीशी गच्ची. आता ती अगदी नवीन चकचकीत दिसत होती. तिच्या दोन बाजूंनी नक्षीदार लाकडी कठडे होते आणि पुढच्या बाजूला चार पाच पायऱ्या. गच्ची समोर मोठा फरसबंद चौक होता त्यात त्या पायऱ्या उतरल्या होत्या आणि त्या चौकाच्या तिन्ही बाजूला लांबलचक ओवऱ्या होत्या. त्यापैकीच एका ओवरीतून आपण चालत आलो होतो. ओवरीत उघडणारी साताठ दारे आता बंद होती. त्यांच्यामागे वापराच्या खोल्या असाव्यात. फरसबंदी संपते तिथे ओसरीची दर्शनी बाजू होती आणि तिच्या पलीकडच्या बाजूला वाड्याचा मुख्य दरवाजा दिसत होता.
दोन्ही बाजूच्या ओवऱ्यांमधून मी हलक्या पावलांनी सावकाश दोन फेऱ्या मारल्या. वाड्यात कुणीच माणूस दिसत नव्हते. मुख्य दरवाजा बंद होता आणि त्यातून बाहेर घोडा खिंकाळल्याचा आवाज येत होता. बाहेर जाण्याचा प्रयत्न कसा करायचा असा मी विचार करत असतानाच मुख्य द्वाराचा दिंडी दरवाजा उघडला आणि त्यातून एक नऊवारी लुगडे नेसलेल्या स्त्रीचा पाय आत पडला. मी चटकन एका खांबाच्या आडोशाला लपलो.
संध्याकाळच्या प्रकाशात मला या मॅडम आत येताना दिसल्या. त्यांनी मराठी पद्धतीचे लुगडे नेसले होते आणि डोक्यावर पदर घेतला होता. अंगावर जुन्या पद्धतीचे भरगच्च दागिने घातलेले होते. त्या एकट्याच होत्या. चटचट चालत त्या आत आल्या आणि माझ्यापासून दहाएक फुटावरून चालत फरसबंदीकडे केल्या. पायऱ्या चढून त्या वरच्या छोट्या गच्चीत उभ्या राहिल्या. त्यांची नजर इकडेतिकडे काहीतरी शोधत होती.
...आता माझी शंभर टक्के खात्री पटली की मी भूतकाळात आलो होतो ! इट वॉज अ रिअल टाईम पॉकेट ! माय थिअरी इज अ‍ॅबसोल्यूटली करेक्ट !
दोनेक मिनिटे इकडे तिकडे पाहिल्यावर बाईसाहेबांना गच्चीच्या कठड्यावर टाकलेली शालीची घडी दिसली. बहुधा ती तिथेच विसरली होती. त्यांनी ती शाल घडी उलगडून दोन्ही खांद्यांवरून नीट पांघरून घेतली आणि त्या जायला वळल्या. मी अजुनी खांबाच्या आडच होतो. पण येताना मी त्यांना नक्कीच दिसलो असतो. आता कसे करावे या विचारात मी असतानाच दरवाज्याच्या बाहेरून एका स्त्रीची किंकाळी ऐकू आली. त्यानंतर एकदम काही झटापटीचे आवाज आले. बाईसाहेब एकदम स्तब्ध झाल्या. दिंडी दरवाज्याच्या कड्या आणि साखळ्या खळखळल्या तशा त्या एकदम आत वळल्या आणि माजघराच्या दाराआड लपल्या. ते दार आता मी ज्या बाजूला उभा होतो त्याच्या विरुद्ध बाजूस होते. त्या वळल्या तेव्हा मला दिसले की त्यांच्या हातात एक लहानसा खंजीर कुठूनसा आला होता !
इतक्यात दिंडी दरवाजातून चार जण आत आले. त्यांच्या अंगात बाराबंदी टाईप सदरे आणि खाली गुडघ्यापर्यंत धोतर होते. डोक्यावर मुंडासे आणि त्याचा पदर तोंडावरून मागे गेला होता. त्यांच्या हातात उभ्या तलवारी होत्या. ते आता आत येणार हे स्पष्ट होते मी लगेच भराभर खांबांचा आडोसा घेत बाई जिथे लपल्या होत्या त्याच्या जवळच एका खांबांआड लपलो.
आत आलेल्या गड्यांनी एकदा सगळीकडे नजर फिरवली. मग दोघे दोघे एकेक बाजू धरून पुढे निघाले. माझ्या विरुद्ध बाजूचे दोघे ओवरीत उघडणाऱ्या एका दारातून आत जाताच मी तिथून बाहेर आलो आणि माजघराच्या दारातून झटकन आत शिरलो. मी हळूच दार बंद केले. दाराला नुकतेच तेलपाणी केले असावे कारण जराही आवाज झाला नाही ! मी दाराआड लपलो. डोळे अंधाराला जरा सरावले तेव्हा मला दिसले की बाई हलक्या पावलांनी चालत देव्हाऱ्याकडे जात होत्या. माझ्याकडे त्यांची पाठ होती. त्या थेट देव्हाऱ्याच्या मागे गेल्या आणि त्यांनी तिथल्या लहानशा देवळीत हात घालून काहीतरी केले. त्याबरोबर डावीकडच्या कपाटातली भिंत उभीच बाजूला सरकली आणि एक अंधारा चौकोन दिसू लागला. बाई झटकन त्यातून आत शिरल्या आणि तो पुन्हा बंद झाला.
तळघर ! तिथे खाली तळघर तरी असावे किंवा पोटमाळा तरी. ती चोरवाट वरती किंवा खाली जात असावी. मी दाराआडून पुढे सरकणार इतक्यात दार धाडकन उघडले गेले आणि ते चौघेही एकदम आत शिरले. सुदैवाने अजून मी दाराआड होतो त्यामुळे त्यांना दिसलो नाही. इकडे तिकडे पाहून ते पळतच दोन्ही बाजूच्या खांबांभोवती फिरून तपासू लागले. मग त्यांनी सर्व कपाटे उघडून पाहिली. ती रिकामी होती. मग ते देव्हाऱ्यापाशी गेले आणि त्यांनी तिथे असलेली एकुलती एक खिडकी उघडली. तिचे दार उघडेच होते. तिला गज वगैरे काही नव्हते. त्यांनी पुन्हा एकदा मागे वळून पाहिले दरवाजातून येणाऱ्या उजेडाच्या पार्श्वभूमीवर मी त्यांना दिसणे शक्य नव्हते. मग चौघांनीही एकमेकांकडे पाहिले आणि त्या खिडकीतून एकामागोमाग एक बाहेर उड्या मारल्या. तसेच तलवारी हातात धरून ते पळतच निघून गेले.
मला काय करावे समजेना. बाई जिथे लपल्या होत्या तिथे जाण्याची उत्सुकता होती पण तसे करणे योग्य झाले नसते. त्या तिथे सुरक्षित होत्या. मी दरवाज्यातून बाहेर डोकावून पाहिले. बाहेर कुणीही नव्हते. वाड्याचा दिंडी दरवाजा आता बंद होता. बाहेरून हलक्या आवाजातले बोलणे आणि धावपळ ऐकू येत होती.
आग ! माझ्या आधीच ते डोक्यात यायला हवे होते. तू सांगितलेल्या इतिहासात तसेच नोंदले होते. त्यांनी बाहेरून आग लावण्याचे प्रयत्न सुरु केले असणार !
...हे विलक्षण टाईम पॉकेट ज्या घटनेपासून सुरु झाले, बरोबर तिथे मी पोचलो होतो !
मी पळतच देव्हाऱ्याजवळ गेलो आणि मघाशी बाईंनी ज्या देवळीत काहीतरी केले होते तिथे हात घातला. पण ती रिकामीच होती. मी हाताने ती चाचपली. हाताला भिंतीशिवाय काहीच लागले नाही.
...इतक्यात बाहेरून धुराचे लोट आत येऊ लागले. त्यांनी लावलेली आग पसरायला सुरुवात झाली होती. काही मिनिटातच आगीच्या धगींनी हवा तापू लागली आणि ज्वाळा लवलवत दाराखिडक्यांच्या फटीतून आत येऊ लागल्या.
मला ती कळ अजुनी सापडली नव्हती. उशीर झाला असता तर बाईसाहेब तळघरात किंवा माळ्यावर गुदमरून जाण्याची शक्यता होती. अखेर मी छोट्या टॉर्चच्या सहाय्याने त्या देवळीत तपासले तेव्हा वरच्या बाजूला एक खोबणी दिसली. त्यात एक खुंटी होती. ती मी ओढून, दाबून पाहिली. पण काहीच झाले नाही.
आता ज्वाळा माजघरात शिरल्या होत्या आणि आतल्या देवघरात धूर कोंदटला होता. मी घाईने ती खुंटी हलवून पाहू लागलो. एकाएकी माझ्या हातून ती उजवीकडे फिरवली गेली आणि कपाटाचे दार हळूहळू उघडले. मी लगेच तिकडे धावलो. माझा अंदाज खरा होता. भिंतीमागे गोलाकार दगडी जिना होता. पायऱ्या खाली उतरत गेल्या होत्या. खाली एक लहानसे तळघर होते. वरून आत भसाभस धूर शिरत होता. मध्यभागी एक दगडी चौथरा फक्त होता आणि या मॅडम त्यावर हातात खंजीर उगारून उभ्या होत्या.
‘खबरदार ! पुढे येऊ नका !’ त्या ठसकत ठसकत ओरडल्या.
बापरे ! त्या मला शत्रूपक्षापैकी एक समजत होत्या ! मी क्षणभर विचार केला. आताच्या क्षणी त्यांना काही समजावण्याचा प्रयत्न करणेसुद्धा धोक्याचे होते.
आता, या क्षणी त्यांनी वरती जाऊन बाहेर सुरक्षित ठिकाणी जाणे महत्वाचे होते. नाहीतर आगीच्या वेढ्यात जळून जायला वेळ लागला नसता. मी ताबडतोब शरण आल्यासारखे हात वर केले, गुडघे जमिनीवर टेकले आणि लोटांगण घातले. त्यांनी खंजीर धरलेला हात खाली घेतला आणि एक पाउल पुढे टाकले.
तुला माहितीच आहे अन्या, मी कराटे ब्लॅक बेल्ट होल्डर आहे. मी चटकन पलटी मारून उसळलो आणि त्यांचा हात चटकन पकडून मागे वळवला. सेकंदात त्यांच्या मानेवर विशिष्ट ठिकाणी दोन बोटांनी दाब दिला. त्याबरोबर त्या बेशुद्ध झाल्या. मग मी त्यांना वर घेऊन आलो. पण देवघरात आता ज्वाळा शिरल्या होत्या. कुठेही जायला वाट नव्हती. ‘
‘मग ?’ मला एखादा थ्रिलिंग अ‍ॅक्शन पिक्चर बघत असल्यासारखे वाटत होते.
‘ मी घड्याळ पाहिले. आपल्या कन्व्हर्टरचा सिग्नल यायला अजून वीस मिनिटे बाकी होती. इतक्या वेळात आम्ही नक्कीच आगीच्या भक्ष्यस्थानी पडलो असतो !’
‘बापरे ! मग काय केलंस ?’
‘.एक गोष्ट मी तुला सांगायला विसरलो होतो , अन्या.
...तशीच इमर्जन्सी आली तर माझ्याकडच्या रिसिव्हर चिपमधली एक की शॉर्ट करायची सोय मी ठेवली होती, ज्यामुळे कन्व्हर्टरमध्ये एक इमर्जन्सी पल्स सिम्युलेट होऊन मी वेळेपूर्वीच टाईम पॉकेटच्या सेकंड एंडला, म्हणजे आपल्या वर्तमानकाळात आपोपाप खेचला गेलो असतो. अर्थात त्यामुळे कन्व्हर्टरची बॅटरी अर्ध्यापेक्षा जास्त खर्ची पडली असती. ही सोय मी आयत्यावेळी केली होती. म्हणजे तुझ्या या वाड्यातल्या लॅबमध्ये बसून.
...ती इमर्जन्सी आता आली होती ! मी त्याचा वापर करण्यात बिलकुल कुचराई केली नाही. ती की मी ताबडतोब ऑपरेट केली.
...सेकंदाच्या एका भागात आम्ही... अर्थात मी आणि माझ्या सान्निध्यात असणाऱ्या या धीरावतीबाई त्या जुन्या वाड्याच्या देवघरात होतो, आणि दुसऱ्या क्षणाला त्या टाईम पॉकेटच्या दुसऱ्या किनाऱ्याला होतो !’
‘अं..? पण मी तर तिथे दोन तासांपेक्षा जास्त वेळ थांबलो होतो. तुम्ही मला का नाही दिसलात ?’
‘कारण आम्ही टाईम पॉकेटच्या अखेरच्या टोकाला होतो ! धिस टाईम पॉकेट इज क्वाइट बिग ... आणि आपला हा वर्तमानकाळ म्हणजे ते अखेरचे टोक नसून, मधलाच कुठलातरी पॉईंट आहे !’
‘म्हणजे काय ?’
‘अन्या ...आम्ही भविष्यकाळात गेलो होतो !’
‘ओ माय माय !’ आता यावर मी कसा विश्वास ठेवू ?
‘माझी थिअरी करेक्ट होती पण अपुरी !
हा केवळ एक टाईम पॉकेट नसून तो टाईम-ब्रिज आहे ! कालसेतू ... अ रिअल टाईमब्रिज ! त्याचे एक टोक त्या साडेतीनशे वर्षापूर्वीच्या प्रसंगापाशी आहे आणि दुसरे टोक भविष्यकाळात कुठेतरी ! आणि आपल काळ मध्येच कुठेतरी आहे !
याची मी अपेक्षा बिलकुल केली नव्हती ! मी नक्की कोणत्या काळात गेलो होतो मला काही अंदाज करता येत नाही. आय हॅव टु री-चेक अँड रिवाईज ऑल दि थेरम, री-डू ऑल दि कॅल्क्युलेशन्स !’ पद्या खूपच एक्साईट झालेला दिसत होता.
‘तरीच कन्व्हर्टरची बॅटरी एकदम डिस्चार्ज झाली होती !’ मी विचार करत म्हणालो, ‘पद्या, तुला तिथे काय दिसले आणि तुम्ही तिथे किती वेळ होतात ?’
‘वेल, आम्ही एका उंच इमारतीच्या टेरेसवर होतो. टेरेस सहज पाचशे फुट उंचावर आणि वीस हजार स्क्वेअरफूट घेराची असेल. रात्रीची वेळ होती. आजूबाजूला अंधार होता पण दूरवर शहराचे लाईट्स झगमगताना दिसत होते. धीरावती अजुनी बेशुद्धीतच होत्या. मला तिथून आसपास हिंडून बघायची इच्छा होती. पण मग कदाचित मी त्या पॉकेटच्या सेंटरपासून दूर गेलो असतो आणि कन्व्हर्टरच्या पुढच्या सिग्नलच्या वेळी रेंजच्या बाहेर गेलो असतो. मी आजूबाजूला जमेल तितके निरीक्षण केले आणि शांतपणे बाईसाहेब शुद्धीवर यायची वाट पहात तिथेच बसलो. निरीक्षणातून मला असे जाणवले की आम्ही ज्या इमारतीच्या टेरेसवर होतो ती राहण्याची जागा नसून एक पाण्याची प्रचंड टाकी होती. म्हणूनच ती उंचावर होती आणि वस्ती खालच्या बाजूस दिसत होती. यापेक्षा जास्त काही मला पाहता आले नाही.
वीसेक मिनिटे गेली आणि आम्ही कन्व्हर्टरची पल्स पिक अप केली. तत्क्षणी आम्ही त्या वाड्याच्या देवघरात, जिथे तुला शेवटी पाहिले होते, तिथे होतो. घड्याळ आता पहाटेचे चार वाजल्याचे दाखवत होते. या टाईम लॅगचाही मला हिशेब केला पाहिजे.
बाई अजून बेहोशच होत्या. मोबाईलची बॅटरी दोनच रेघा दाखवत होती.
...मी ताबडतोब तुला कॉल केला. .. आणि तुला प्रॉमिस केल्याप्रमाणे आता तुझ्यासमोर हजर आहे !’
काही मिनिटे आम्ही दोघे शांत होतो. प्रद्युम्न बहुधा त्याच्या थिअरीच्या विचारात आणि मी त्याने सांगितलेल्या अद्भुत कथेच्या विचारात.
‘आता पुढे ?’ काही वेळाने मीच आधी भानावर आलो.
‘पुढे काय ? आय शॅल स्टार्ट अगेन अँड सर्च फॉर अनदर टाईम ब्रिज !’
‘आणि धीरावतीदेवींचे काय ?’
‘ओह, वी हॅव टु टेक एफर्टस टु एस्टॅब्लिश हर इन अवर वर्ल्ड ! ‘ पद्याचे डोळे काहीसे सौम्य झाले असे मला वाटले.
‘तिची आयडेंटिटी क्रिएट करावी लागेल. मग आपल्या जगात सर्व्हाईव्ह होण्यासाठी आवश्यक ते शिक्षण द्यावे लागेल ...’
‘वेल, या लहान गावात माझ्या ओळखी सगळीकडे असल्याने आयडेंटिटीचं काम मी सहज करेन ! माझी एखादी दूरच्या खेड्यातली बहीण निराधार होऊन इकडे आली आहे, ही बतावणी चालून जाईल. आणि पुण्यात नेलं तर राधा तिला गरजेपुरते शिक्षणसुद्धा देऊ शकेल. माझ्या तन्वीला आयती आत्या मिळेल !
...आणि हो, माझ्या पीएचडी थिसिसचा विषय मी पक्का केलाय, ..सोळाव्या शतकातील सामाजिक प्रथा आणि चालीरीती ! अँड आय नो, की तो थिसिस प्रचंड यशस्वी होणार आहे !‘
‘येस्स, दॅट्स फाईन ! पण त्यापूर्वी आपल्याला धीरावतीबाईंना त्यांची काय इच्छा आहे ते विचारावं लागेल.’
‘अर्थात ! हे सगळं त्यांच्या संमतीनेच होईल....!
..पण काय रे पद्या , तुला एक विचारू ?’
‘बाय ऑल मीन्स !’
‘पुढे भविष्यात एका जिनिअस सायंटिस्टची पत्नी होण्याइतके गुण मला तिच्यात आत्ताच दिसताहेत, तुला काय वाटतं ?’
पद्या मोठ्ठ्याने हसत सुटला आणि मग गंभीर होऊन म्हणाला,
‘मे बी, बट लेट अस नॉट इंटरफिअर द प्लॅनिंग ऑफ टाईम, लेट इट टेक ऑल द डिसिजन्स इन इट्स ओन वे !
...सध्या तरी मला माझ्या थिअरीतल्या सर्व त्रुटी दूर करायच्या आहेत.’
कालसेतूच्या, कदाचित पाचशेपेक्षा जास्त वर्षे अंतरावर असलेल्या दोन टोकांवरून प्रवास करून आलेल्या त्या माझ्या विलक्षण मित्राकडे मी पहातच राहिलो !
(समाप्त )
( चित्र आंजावरून साभार )  

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

कपिलमुनी's picture

26 Apr 2018 - 12:54 pm | कपिलमुनी

छान लिहिले आहे .
कथे मधे अजून फुलायचे पोटेंशियल आहे असे वाटत रहाते ( हे तुमच्या लिखानाचि बलस्थान आहे )

बिपिन कार्यकर्ते's picture

26 Apr 2018 - 1:08 pm | बिपिन कार्यकर्ते

वा! मस्त!!!!

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Apr 2018 - 1:39 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर कथा ! शेवटपर्यंत उत्सुकता कायम होती !

श्वेता२४'s picture

26 Apr 2018 - 1:48 pm | श्वेता२४

खूपच छान वाटला अंतीम भाग. पण कथा खूप लवकर संपविलीत असं वाटतं.

उपेक्षित's picture

26 Apr 2018 - 1:56 pm | उपेक्षित

निव्वळ अप्रतिम, कुठेही अनावश्यक भापटपसारा नव्हता आणि शेवटही पटणेबल होता.

मोहन's picture

26 Apr 2018 - 2:13 pm | मोहन

थोडी लहान झाली पण फारच छान ! सिक्वेल येवू द्या लवकरच ...

खिलजि's picture

26 Apr 2018 - 5:29 pm | खिलजि

मस्त होती कथा . अजून थोडी वाढवता आली असती आणि अजून छान झाली असती ..

सिद्धेश्वर विलास पाटणकर

राघव's picture

26 Apr 2018 - 5:49 pm | राघव

मस्त! खूप आवडली कथा!! :-)
सिक्वेल नक्कीच निघू शकेल ! आम्ही वाट पाहू!!

पैसा's picture

26 Apr 2018 - 10:03 pm | पैसा

शेवटच्या भागात शीर्षकात 'अंतिम' वाचताना चुटपुट लागली. अजून पाहिजे असे वाटताना कथा संपली पण अनेक शक्यता पोटात ठेवून! भविष्यातला थोडा काळ ओझरता दिसला तिथे, किंवा नायिकेला वर्तमानात adjust होताना, किंवा भूतकाळातील व्यक्ती वर्तमानात आल्यामुळे काल रेषेला पडलेली घडी अशा अनेक दिशांनी लिहिता येईल. वेळ असेल तेव्हा जरूर लिही!!

इतर रणधुमाळीत असे लिखाण वाऱ्याच्या झुळकी सारखे वाटते. विजुभाऊ म्हणाले की प्रतिसाद का येत नाहीयेत, तसं झालं तरी प्लीज तुम्ही लोक लिहीत रहा. काही वर्षांनी आजचे चालू घडामोडींचे धागे लोक वाचणार नाहीत पण हे लिखाण पुन्हा पुन्हा वाचले जाणार आहे.

आनन्दा's picture

27 Apr 2018 - 12:09 am | आनन्दा

हा शेवटचा भाग नव्हता.. खरी कथा तर आत्ता सुरू व्हायला हवी होती.

बायकोने मिपा संन्यास घ्यायला सांगितला की काय :P

इष्टुर फाकडा's picture

27 Apr 2018 - 1:34 am | इष्टुर फाकडा

कथामाला आवडली. सिक्वेल लिहिण्याची संधी पुरेपूर आहे. वाचायला आवडेल.

प्रचेतस's picture

27 Apr 2018 - 9:08 am | प्रचेतस

झकास झाली कथा, मायकल क्रायटनच्या 'टाइमलाईन'ची थोडीशी आठवण आली.

स्पार्टाकस's picture

27 Apr 2018 - 9:42 am | स्पार्टाकस

निखळ फँटसी म्हणून कथा मस्तं, पण शेवटी थोडी गुंडाळल्यासारखी वाटली.
दुसरा भाग लिहीलात तर भविष्यातल्या घटनांशी जोडता येईल.

उगा काहितरीच's picture

27 Apr 2018 - 1:54 pm | उगा काहितरीच

वॉव... ! अप्रतिम... !

पद्मावति's picture

27 Apr 2018 - 2:33 pm | पद्मावति

जबरदस्त!! खुप सुंदर रंगवली कथा. सीक्वेल खरंच लिही स्नेहा.

अनिरुद्ध.वैद्य's picture

28 Apr 2018 - 8:56 am | अनिरुद्ध.वैद्य

मस्त रंगवल आहे कथानक! शेवट जरा अजून खुलवता आला असता.

मंदार कात्रे's picture

28 Apr 2018 - 9:46 am | मंदार कात्रे

खूप छान

सिक्वेल पण येवूद्यात !

tusharmk's picture

28 Apr 2018 - 3:21 pm | tusharmk

तीन दिवसांनी आग विझली तेव्हा धीरावतीचे भाऊ आत शिरले आणि त्यांनी वाडा पिंजून काढला. पण काळ्याठिक्कर पडलेल्या भिंतीमध्ये क्रियाकर्म करण्यासाठी एकही हाड सापडले नाही की धीरावतीच्या अंगावरच्या दोनशे तोळे सोन्याच्या दागिन्यांपैकी गुंजसुद्धा मिळाली नाही. मधल्या बंदिस्त देवघराचे दार अर्धवट जळलेल्या अवस्थेत उघडे होते. थोरल्याने तिथून आत नजर टाकली तेव्हा त्याला जे दृश्य दिसले ते पाहून त्याची वाचाच बंद झाली ...हे द्रुश्य कय होते

सस्नेह's picture

28 Apr 2018 - 10:08 pm | सस्नेह

तिसरा भाग वाचा.
त्याच्या सुरुवातीलाच ते आहे.
:)

सविता००१'s picture

28 Apr 2018 - 6:07 pm | सविता००१

स्नेहाताई... केवळ उच्च लिहिली आहेस कथा. पण तू अजून नक्की फुलवू शकली असतीस गं.
खूप आवडली.
फँटसी आवदते म्हणून आणखीनच आवडली

अभिजीत अवलिया's picture

28 Apr 2018 - 7:14 pm | अभिजीत अवलिया

कथा आवडली.

धन्यवाद सर्व वाचकांना आणि प्रतिसादकांना !
वेळ मिळाल्यावर सिक्वेल लिहिण्याचा जरूर प्रयत्न करेन.

सस्नेह's picture

30 Apr 2018 - 9:39 am | सस्नेह

आणखी एक सांगायचं राहिलं.
बर्याच जणांना कथेचा शेवट त्रोटक वाटला आणि काहींना तो शेवट वाटलाच नाही.
माझ्या मते शेवट स्टिरिओटाइप असावा असे मुळीच नाही. उलट तो जितका abstract असेल तितकी कथा परिणामकारक. काही विस्तार वाचकांच्या कल्पनाशक्ती वर सोडले तर गूढकथा चांगली रंगते. सगळेच ठोकळे अगदी जागच्या जागी बसले तर मजाच संपली, नाही का :)
असो. मतभिन्नता असू शकते. सिक्वेल लिहिताना याचा जरूर विचार करेन.

अर्धवटराव's picture

5 May 2018 - 7:25 am | अर्धवटराव

कालसेतुची कल्पना काहि कळली नाहि. लायगो प्रयोगाने ग्रॅव्हिटी पल्सेसमुळे होणारी स्थळ-काळाची स्पंदनं सिद्ध केली. त्याच धर्तीवर अति ताणलेला काळ म्हणजे कालसेतु अशी काहि कल्पना आहे का??

अति ताणलेला नव्हे, त्याच्या विरुद्ध !
म्हणजे compress झालेला किवा संक्षिप्त झालेला. एखाद्या बंडलप्रमाणे.
त्या बंडलच्या एका टोकाकडून प्रवेश केला की दुसऱ्या अथवा मधल्या कुठल्याही पॉईंट्कडे जाणे म्हणजे एका काळातून दुसऱ्या काळात जाणे सहज शक्य व्हावे.

रातराणी's picture

12 May 2018 - 2:34 am | रातराणी

भन्नाट जमलीये कथा!!

परशुराम सोंडगे's picture

18 May 2018 - 2:07 pm | परशुराम सोंडगे

कथा मस्त जमलीय

कविता१९७८'s picture

26 Jul 2018 - 8:38 pm | कविता१९७८

वाह प्रचंड आवड असलेली खिळवुन ठेवणारी मालिका