महत्वाची सूचना

नमस्कार,
मिसळपाव.कॉमवर सदस्य नोंदणी केल्यावर ईमेल आला नसल्यास कृपया admin@misalpav.com या पत्यावर संपर्क साधावा.

द टाईमब्रिज अर्थात कालसेतू –२

Primary tabs

स्नेहांकिता's picture
स्नेहांकिता in जनातलं, मनातलं
9 Apr 2018 - 12:29 pm

भुलीची कोठी आणि त्यासाभोवातलचा रिकामा माळ, जो भुलीचा माळ म्हणून ओळखला जाई, आमच्या गावातले एक कुप्रसिद्ध ठिकाण होते.
गावाच्या बाजूने वळण घेऊन वाहणाऱ्या नदीच्या पलीकडच्या बाजूला दगडाधोंड्यांची एक उतरंड नदीचा चढाव चढत गेली होती. त्यातले काही दगड जुनेपुराणे ताशीव घडीव तर काही अनवट. त्या उताराच्या वरच्या अंगाला काही शेते राने आणि मग एक प्रचंड माळ होता. दहा एक एकर तरी असेल. माळ संपला की काही तुरळक शेते, राने आणि मग जंगल सुरु होत होते. माळाच्या मध्यावर काळ्या करंद घडीव दगडांची प्राचीन वास्तू होती. तिला भुलीची कोठी म्हणत. या वास्तूचे वैशिष्ट्य म्हणजे तिला एकही दरवाजा अगर खिडकी नव्हती. चोहीकडे चिरेबंद भिंती ! पूर्वेकडच्या भिंतीला धरून काही दगडी पायऱ्या वरती गेलेल्या. त्यावरून वर गेलं की साधारण शंभर फुट बाय शंभर फुटाचा वस्तूच्या छताचा रिकामा पसारा नि त्यात चुनेगच्ची फरशी. पूर्वेकडच्या बाजूला मध्यावर साधारण तीन फूट उंच चौथरा होता. हे सतीचे वृंदावन. एके काळी त्यात तुळशी डोलत होत्या. आता ओसाड गवत माजलेले.
राने ज्यांची जंगलाला लागून होती, ते लोक दिवसासुद्धा त्या माळावरून न जाता लांबचा वळसा घालून शेताकडे जात. फार फार वर्षापूर्वी संध्याकाळी, रात्री नदीपल्याड गेलेल्यांना काहीबाही भास झाले होते. रस्ता सापडला नव्हता. काही जण रात्रभर भटकत राहिले. अजूनही काही जण सांगतात. एकूणच तिथे माणसांचा आणि जनावरांचापण वावर जवळजवळ नाहीच. ‘काहीतरी’ अनिष्ट घडल्याचा ठसा त्या जागेवर गेल्यानंतर अजून जाणवत होता...एखाद्या भट्टीजवळ गेल्यावर धग जाणवावी तसा. तेव्हा ही जागा माझ्या दृष्टीने पद्याच्या प्रोजेक्टसाठी अगदी योग्य होती !
...फक्त त्याला तिकडे न्यावे की नाही हे मला ठरवता येत नव्हते ! कारण एकच .. भुलीच्या माळाची अपकीर्ती !

भुलीच्या कोठीची तुटक तुटक कहाणी जुन्या वयस्कर गावकऱ्यांकडून बालपणी माझ्या कानावर आलेली. जहागिरदारांच्या वंशजांनी वाडा विकला तेव्हा मोडी लिपीमधल्या काही जुन्या चोपड्या इतिहासाचा प्राध्यापक म्हणून माझ्या हाती आल्या होत्या. त्या मी पुण्यास घेऊन आलो होतो. एखाद्या सच्च्या इतिहाससंशोधकाला देण्यासाठी मी त्या माझ्याकडे जतन करून ठेवल्या होत्या. त्या चोपड्या पोटमाळ्यावरून शोधून काढल्या. लिंक लावून कागद जुळवून मोडीचे भाषांतर केल्यावर एक अजब कहाणी माझ्यासमोर उलगडली.
सोळाव्या शतकाच्या उत्तरार्धातली गोष्ट. तेव्हाच्या गोपाळपूरचे जहागीरदार घोरपडे यांना सहा मुलांच्यावर मुलगी झाली, धीरावती. धीराला जन्म देताच तिची आई मंगलाबाई निवर्तली, आणि धीरा ही तिच्या आईची निशाणी म्हणूनच वाढली. जहागीरदारांची एकुलती एक लेक म्हणून लाडाकोडात वाढली. सहा भावांची बहिण म्हणून नव्हे, तर सातवा भाऊ म्हणूनच जोपासली तिला आबासाहेबांनी. त्या काळात स्वत: आबासाहेबांनी तिला घोडेस्वारी, तलवारबाजी, दांडपट्टा असे सगळे मर्दानी खेळ शिकवले. पंधरावे वर्ष लागलेली सौंदर्यवती धीरा कमरेला तलवार लटकावून, घोड्यावरून गावात फेरफटका मारायला निघाली की तिच्या तलवारीपेक्षाही धारदार नजरेला नजर द्यायची गावातल्या एकाही मर्दाची हिम्मत नव्हती.
आबासाहेबांनी अर्थातच धीरावतीसाठी वरसंशोधन सुरु केले होते. पण या तलवारीसारख्या तेज पोरीला तोलणारा तसाच खंदा शूरवीर त्यांना आसपासच्या पंचक्रोशीत कुठे दिसत नव्हता.
अजून धीरावतीला पंधरा वर्षे पुरी व्हायची होती, ...आणि अशातच एका लहानशा आजाराच्या निमित्ताने अचानक आबासाहेबांचे निधन झाले.
भाऊबंदकीत लडबडलेले सहा भाऊ आणि जाच काच करणाऱ्या सहा वहिन्यांनी डाव साधला आणि दहा कोस पलीकडच्या सोनगावकर सरदारांच्या धाकल्या पुत्राशी, सुभानरावाशी धीरावतीचा बळेच विवाह झाला. धीरावतीच्या एका वहिनीचे माहेर सोनगाव. सुभानरावाला चार वर्षापासून क्षयाने घेरले होते ही वस्तुस्थिती या वहिनीने अखेरपर्यंत दडवून ठेवलेली.
विवाह झाला आणि प्रथेप्रमाणे चौथ्या दिवशी धीरावती परत माहेरी आली. दोन महिन्यातच सुभानराव पुरा अंथरुणाला खिळला. नवोदित वधूला शुश्रुषेसाठी पतीकडे आणले. वैद्यांचे काढे, औषधी, धीरावतीने निष्ठेने केलेली शुश्रुषा यांचा परिणाम म्हणून त्याच अवस्थेत सुभानराव दोन वर्षे जगला. अखेरीस मृत्यूने त्याला गाठले तेव्हा धीरावती अठरा वर्षांची नवयौवना बनली होती. आणि पती म्हणजे काय हेही न अनुभवलेली विधवा !
प्रथेप्रमाणे तिची सती जाण्याची तयारी केली गेली. पण तिने सती जाण्यास साफ नकार दिला. पुष्कळ वादंग झाला पण धीरावतीच्या करारी निर्धारापुढे कोणाचे काही चालले नाही. अखेर सोनगावकरांनी तिला गावबंदी केली. माहेरी जाण्याशिवाय धीरापुढे इतर काही मार्गच नव्हता.
...माहेरी धीरावतीचे स्वागत अर्थातच उपेक्षेत झाले. भाऊबंदकी विकोपाला गेली होती. मिळकतीचे तुकडे पडण्याच्या बेतात होते. भावाभावात विस्तवसुद्धा जात नव्हता. तिथे धीराचा कोण पत्कर घेणार ?
धीरावतीने माहेरची परिस्थिती जोखली आणि घर सोडून नदीपलीकडच्या जहागिरदारांच्या जंगलाचा आश्रय घेतला. बालपणीचे खेळगडी, मैतरणी, कष्टकरी, नव्या सासुरवाशीणी अशा सगळ्यांना आपल्या अंगच्या नेतृत्वगुणांनी मेळवले आणि जंगल तोडून देखणे रान उभे केले. धीरावतीबाईसाहेब कुळांच्या जोडीने स्वत: औत धरून उभ्या राहिल्या. वेशीपलीकडे नवे गाव उभे राहिले. जहागिरदारांच्या काचाला कंटाळलेले गावकरी धीरावतीमाय जहागिरदारीणबाईच्या नव्या न्यायी राज्यात सुखाने येऊन राहू लागले. घरे झाली, मंदिरे झाली, वाडे उभारले. कुळे औत धरून राबू लागली. धीरावतीबाईसाहेब गावाच्या गळ्यातील ताईत झाल्या. रयतेच्या सुखदु:खात सहभागी राहून त्यांच्या तळहातावरचे फूल बनल्या. विधवा असूनही धीरावती सौभाग्यालंकार घालत असे. त्या काळात हे एक मोठेच धाडस. जेमतेम पंचविशीतली धीरावती नऊवारी नेसून हातात गळ्यात साज अलंकार लेवून घोड्यावर स्वार झाली की साक्षात दुर्गा दिसे. आया बाया तिची अलाबला घेत.
कुळे गाव सोडून गेल्यामुळे धीरावतीच्या भावांचे सारा उत्पन्न कमी झाले. शिवाय धीरावतीची वाढती लोकप्रियता, तिचे गावकर्यांकडून होणारे कौतुक भावजयांना बघवेना. आतावेरी एकमेकांचा गळा धरणारे भाऊ आता एक होऊन धीरावतीला संपवायचे कारस्थान करू लागले. मारेकऱ्यांना सुपाऱ्या गेल्या.
इतके दिवस धीरावती गावकऱ्यांच्या घरांजवळच एका खोपीत राहत होती. काही दिवसांनी रयतेनंच, मायेच्या आईसारख्या जहागीरदारीणबाईसाठी गावकुसालगतच्या माळावर नवा छोटेखानी वाडा बांधायला घेतला. घडीव पाषाण येऊन पडले. तुळयांसाठी सरळसोट झाडे कापली गेली. बघता बघता वाडा उभा राहिला.
एक दिवशी, पूर्ण होत आलेल्या वाड्याचे काम बघण्यासाठी दोन कुळंबिणी सोबत घेऊन धीरावती गावकुसालगतच्या माळावर गेली. संध्याकाळची वेळ होती. देखरेख संपल्यावर अजून न बसवलेल्या मुख्य दिंडी दरवाजातून धीरावतीबाई आणि दोघी कुणबिणी बाहेर आल्या. काहीतरी विसरले म्हणून बाई परत आत गेल्या. आणि पाळतीवरच असलेल्या वैऱ्यांनी डाव साधला. त्या दोघींना हातपाय बांधून तोंडात बोळे कोंबून तिथेच टाकले आणि नागव्या तलवारी हातात घेऊन चारजण आत शिरले. आणखी चौघे बाहेरच्या दारांवर पाळत ठेऊन उभे होते. आत गेलेल्यांनी वाड्याचा कोपरा कोपरा धुंडाळला. पण धीरावतीबाईच्या नखाचाही सुगावा लागेना. हवेत विरघळून जावी तशी धीरावती गायब झाली होती.
दिवस मावळला तसे ते चौघे बाहेर पडले. आठजणांनी मिळून बाजूला रचलेल्या कडब्याच्या गंजी वाड्याच्या चारी बाजूंनी रचल्या आणि आग लावून दिली. नवे वासे आणि कडीपाट पाहता पाहता धडधडून पेटले. आग सर्व बाजूंनी नीट पसरल्यावर मारेकरी निघून गेले.
गुरे चारून परत फिरताना काही धनगरांनी आग पाहिली आणि धावत येऊन त्या दोघा कुणबिणीना सोडवले. गावत जाऊन त्यांनी बॉंब ठोकली. गावकरी हाताला लागेल ते समान घेऊन आग विझवायला धावले. पण काही उपयोग झाला नाही.
तीन दिवसांनी आग विझली तेव्हा धीरावतीचे भाऊ आत शिरले आणि त्यांनी वाडा पिंजून काढला. पण काळ्याठिक्कर पडलेल्या भिंतीमध्ये क्रियाकर्म करण्यासाठी एकही हाड सापडले नाही की धीरावतीच्या अंगावरच्या दोनशे तोळे सोन्याच्या दागिन्यांपैकी गुंजसुद्धा मिळाली नाही. मधल्या बंदिस्त देवघराचे दार अर्धवट जळलेल्या अवस्थेत उघडे होते. थोरल्याने तिथून आत नजर टाकली तेव्हा त्याला जे दृश्य दिसले ते पाहून त्याची वाचाच बंद झाली !
( क्रमश: )

( चित्र आंजावरून साभार )  

विरंगुळाकथा

प्रतिक्रिया

प्रविन ९'s picture

9 Apr 2018 - 1:45 pm | प्रविन ९

एकदम मस्त! उत्कंठा वाढतेय....

टवाळ कार्टा's picture

9 Apr 2018 - 3:17 pm | टवाळ कार्टा

भारी

इरसाल कार्टं's picture

9 Apr 2018 - 3:25 pm | इरसाल कार्टं

pudhil bhag lavkar yeudya

खिलजि's picture

9 Apr 2018 - 5:04 pm | खिलजि

बहुधा खिळवून ठेवणार आहात आपण .. उत्सुकता शिगेला पोहोचली आहे .... ट्वेंटी ट्वेंटी बघायची सवय लागल्यापासून धीर धरवत नाहीय ... कृपा करून मदत करा .. पुलेशु आणि पुभाप्र

सिद्धेश्वर विलास पाटणकर

पैसा's picture

9 Apr 2018 - 5:09 pm | पैसा

रंगात आलेली कथा!

उगा काहितरीच's picture

9 Apr 2018 - 6:25 pm | उगा काहितरीच

पुभाप्र...

राघव's picture

9 Apr 2018 - 7:15 pm | राघव

हा ही भाग आवडला.
आता कथा पूर्ण झाल्यावर प्रतिसाद देईन. पण वाचत आहेच. पुभाप्र. :-)

रातराणी's picture

11 Apr 2018 - 12:48 am | रातराणी

+1

पद्मावति's picture

10 Apr 2018 - 12:45 pm | पद्मावति

मस्तच!

संजय पाटिल's picture

10 Apr 2018 - 1:11 pm | संजय पाटिल

पु.भा.प्र.

श्वेता२४'s picture

10 Apr 2018 - 1:21 pm | श्वेता२४

हाही भाग उत्कंठावर्धक. पुभाप्र

राजाभाउ's picture

10 Apr 2018 - 5:39 pm | राजाभाउ

मस्त !!! एकदम पुभाप्र.

वीणा३'s picture

11 Apr 2018 - 10:13 am | वीणा३

मस्तच !!! पु भा प्र

manguu@mail.com's picture

11 Apr 2018 - 3:33 pm | manguu@mail.com

छान

सतिश म्हेत्रे's picture

11 Apr 2018 - 4:37 pm | सतिश म्हेत्रे

चातकासारखी वाट पाहत आहे.

सविता००१'s picture

11 Apr 2018 - 5:23 pm | सविता००१

जबराट चालली आहे ग कथा. पटापट मोठे मोठे भाग टाक ना. उत्सुकता ताणली गेलेय अगदी

प्राची अश्विनी's picture

13 Apr 2018 - 11:34 am | प्राची अश्विनी

+११

प्रद्युम्नने धीरावतीला भविष्यकाळात आणून तिच्याशी लग्न केले / प्रद्युम्न धीरावतीला भविष्यकाळात आणून तिच्याशी लग्न करणार ....

मला पण हे सुचलं. पण मला वाटतं की ते असंच असेल तर बाकी वाचणार्‍यांच्या रसभंग होऊ शकतो.

बाकी कथा उत्तम लिहिताय स्नेहांकिता, आवडली. पुढील भागाच्या प्रतिक्षेत.

अभ्या..'s picture

13 Apr 2018 - 11:41 am | अभ्या..

मस्त कथा