समाचार-पत्रांत जॉर्ज भिकारीचं कहाणी !
आमचं ल्योंक आणि सूनाचं बरोर थोडं महिने राह्याकरतां आम्ही अमेरिकाला गेलोतों. तिकडं अधिकपक्षं दनांसीं न्यूस्-पेप्पर् घ्याचं दंडक नाहीं. समाचार अग्गीनं मोबैल-फोनांतं वाचूनचं कळींगतीलं. माझं ल्योंक पणीं तसंचं. पण, स्मार्ट-फोन् मण्जे मला होईना! पाष्टे फिल्टर्-काफी पिताना न्यूस्-पेप्पर् हातांत असामं असं दंडक होऊँगलं. पह्यिलं थोडकं दिवस तर्पडूँगलों आणि सोसाला होईनास्कं ल्योंकाकडं सांगिट्लों. "कां बाप्पा, कां मला तंम्हाच सांगट्ला नाहींतं? हे काय एवढं थोर विषय कां? आत्ताच व्यवस्था करूँ देतों" मंट्ला. समेच, ‘साक्रमेंटो-बी’ मणूँ एक न्यूस्-पेप्पर् आफिसाला फोन् करूनं सहा महिने पेप्पर् घालाला व्यवस्था करूँटकला. (‘साक्रमेंटो-बी’ फार जुनं समाचार-पत्र. दीडशें वर्षाचं पुढं आरंभ केलते).
दुसरं दिवस पाष्टे बरोर सहा घंटेला घराचं बाहेरचं कवाडांत ‘धड’शी शब्द अयिकलों. येऊँ गेलोतं माझं समाचार-पत्र..!
पह्यिलं पानांत हेड्लैन काय मणूँ पाह्यलों. Three Cheers! George is Back!!! मणूँ होतं. काय विषय मणूँ पूरा वाचलों. जॉर्ज म्हणणारं तिकडलं डौन-टौणांतलं एक भिकारी मणं. घरदार काहीं नाहीतो. चार महिने तो कोठकी गेलोता मणं. आता परतूँ आलाहे. ल्हान विषय. हे कां हेड्लैनांत घाट्ले? सांगतों.
डौण-टौणांत कार-पार्किंगाचं ठिकाण मिळणं उदंड कष्टं. दहा मिनिटं पार्क कराला पांच डॉळर पार्किंग-मीटरांत घालामं. जॉर्ज तिकडंच कंम्हाहीं गुंडाळींगूँ असंलं. तेला कळंल, दहा मिनिट मणूँ पार्किंग-मीटरांत पांच डॉळर घालूँटकून गेलत्र, एक-दोन मिनिट उशीर होऊनच परतूँ येतीलं मणूँ. दहा मिनिटाचं आंत पंचवीस सेण्ट् त्यांत घाट्लत्र, पुन्हा पांच मिनिट तिकडंच पार्क करूया. नाही घाट्ले मण्जे, दुगुणा दंड देमं. मण्जे, दहा डॉळर पुन्हा घालामं. जॉर्ज काये करतोता मण्जे, नौ मिनिट होतानंच पार्किंग-मीटरांत पंचवीस सेण्ट् तजं पैसा घालूँटकंल. बंडीचं मनुष पळूँपळूँ येऊँ पाह्ताना पांच मिनिटाचं अधिक समय मिळ्ळसाच पाह्यीलं. अप्पाडा!! संतोषांत तो जॉर्जला अर्ध डॉळर की, एक डॉळर की टिप्स देईलं. Win-Win for both! असं जॉर्ज भरूँ पैसं करत होता.
अस्लास्कसून तो एक दिवस कोठकी नापत्ता होऊँगला. चार महिनेच नंतरं आत्ता, कालं परतूँ आला मणं. हेच ते गांवाच थोर हेड्लैन समाचार!!!
--------------------------------------------------------------------------------
लेखक : श्री. आनंदराव वसिष्ठ
लेखक दक्षिणी मराठी (तंजावूर मराठी) बोलीच्या पुनरुद्धरणाचे काम गेल्या एक दशकापासून एकहाती करत आहेत.
दक्षिणी मराठी (तंजावूर मराठी) बोलीच्या पुनरुद्धरणाच्या कार्याविषयी लेखकाची मुलाखत
भाग १ :- https://youtu.be/rPrDX9WO6i0भाग २ :- https://youtu.be/N6racAPaXI4
.
.
.
.
.
.
--------------------------------------------------------------------------------
दक्षिणी मराठीविषयी थोडेसे :-
१६७४ साली वेंकोजी राजे भोंसले यांनी अळगिरी नायक राजाकडून तंजावूर राज्य जिंकले. साम्राज्यविस्तारासाठी त्यांच्यासह तिथे गेलेले मराठी भाषिक तमिळनाडुतील तंजावूर आणि आसपासच्या प्रांतात स्थायिक झाले. तिथेच राहता-राहता, कालांतराने त्यांच्या भाषेवर आणि संस्कृतीवर तमिळ जीवनव्यवस्थेचा परिणाम होत गेला आणि सुमारे १०० वर्षांतच मराठीची तमिळ भाषेच्या हेलाने बोलली जाणारी ‘तंजावूर मराठी’ ही एक वेगळीच बोली उत्पन्न झाली.
पुढे १८५५ नंतर तंजावूर मराठा साम्राज्य संपुष्टात आल्यानंतर तंजावूरचे महाराष्ट्रीय लोक नोकरी-चाकरी, उद्योग इत्यादि विविध कारणांनी तमिळनाडुतील पुदुच्चेरी तसेच इतर ठिकाणीही गेले, तसेच दक्षिण भारतातील केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगाणा या राज्यांतही गेले; जाताना प्रत्येक ठिकाणी ते आपली बोलीभाषा घेऊनच गेले. कालांतरात इतर दाक्षिणात्य भाषांचे संस्कारही तिच्यावर झाले. ‘तंजावूर मराठी’ ही मराठी भाषेची एक वैशिष्ट्यपूर्ण बोली आहे. या बोलीवर तमिळ व्याकरणाचा प्रभाव अवश्य आहे, परंतु आज साडेतीनशे वर्षांनंतरही तिने तिचे ‘मराठीपण’ हरपलेले नाही.
आज २१ व्या शतकात, कित्येक तंजावूर मराठी कुटुंबे नोकरी-उद्योगानिमित्ताने दक्षिण भारताबाहेर गेली आहेत. अनेक कुटुंबे महाराष्ट्रांतही आली आहेत; तसेच गुजरात, दिल्ली, बिहार, पश्चिम बंगाल या राज्यांप्रमाणेच यूरोप, अमेरिका, आखाती देशांतही स्थायिक झाली आहेत. तंजावूरमध्ये आता मराठी लोकसंख्या फार प्रमाणात नाही. त्या कारणाने; आणि बोलीवरील दाक्षिणात्य संस्कारांमुळे आता तिला ‘दक्षिणी मराठी’ असेही संबोधले जाते आहे.
--------------------------------------------------------------------------------
.
(हा लेख श्री हैयो हैयैयो यांनी दक्षिणी मराठी यांच्याशी संपर्क साधून मिपा वाचकांसाठी उपलब्ध करून दिला आहे. त्यासाठी श्री हैयो हैयैयो आणि दक्षिणी मराठी यांना मिपातर्फे विशेष धन्यवाद!)
.
प्रतिक्रिया
5 Mar 2018 - 11:32 am | पैसा
किस्सा आवडला! तिथल्या हेडलाईन्स आणि आपल्याकडच्या!!
दक्षिणी मराठीकरिता खूप मोठं काम करत आहात. युट्यूब क्लिप बघणार आहे. तिथे अजूनही काही मनोरंजक आणि दक्षिणी मराठीची ओळख करून देणार्या क्लिप्स दिसल्या. सर्वच बघायच्या आहेत.
आवडली!
5 Mar 2018 - 9:33 pm | प्रचेतस
क्लिप फार आवडली, ही बोलीसुद्धा ऐकायला गोड आहे.
5 Mar 2018 - 12:16 pm | एस
अरे वा! दाक्षिणात्य धाटणीचे तंजावूर मराठी वाचताना मजा आली. याचे रेकॉर्डिंग करून क्लिप टाकाल का इथे?
5 Mar 2018 - 12:20 pm | पैसा
5 Mar 2018 - 2:38 pm | पद्मावति
अतिशय सुंदर लेख. दक्षिण मराठी मंडळींची मराठी भाषा जोपसण्याची धडपड मनाला स्पर्शून गेली. खरच खूप कौतुकास्पद कार्य आहे तुमचे.
'थॅंक्स टू मिसळपाव' ही क्लिप खूप आवडली. संवादीकेचा गोड आवाज, भाषेचा लहेजा,आणि सुश्राव्य गायन सगळंच आवडलं.
5 Mar 2018 - 3:09 pm | तेजस आठवले
चांगला लेख. हार्दिक शुभेच्छा
5 Mar 2018 - 6:30 pm | सूड
फारच सुंदर! तुमचं युट्युब चॅनल मी माझ्या हापिसातल्या तंजावूर मराठी बोलणार्याला दाखवलं. आवडलं त्याला. लिहीत चला आणखी.
5 Mar 2018 - 9:34 pm | प्रचेतस
खरं तर ह्या लेखमालेतील प्रत्येक लेख दृकश्राव्य निदान श्राव्य तरी करायलाच हवा, बोलीभाषेतील विशिष्ट लकबी ह्या ऐकल्यानंतरच लक्षात येतात.
6 Mar 2018 - 8:00 am | प्राची अश्विनी
अतिशय गोड. तर्पडूँगलों वर जरा अडकले होते पण क्लिप ऐकली. आणि सर्व कळले.
6 Mar 2018 - 9:55 am | सुधीर कांदळकर
आवडले.
6 Mar 2018 - 9:59 am | नि३सोलपुरकर
अतिशय सुंदर लेख.
6 Mar 2018 - 11:12 am | सस्नेह
आणि ऐकायला जास्तच गोड वाटली ही बोली !
आमीपण बोलतं कि हो, हे भाषा, का मणजे आमचं गावपस्णं कर्णाटक सुरूच कि हो.
6 Mar 2018 - 11:47 am | जव्हेरगंज
लय भारी!!!
9 Mar 2018 - 8:07 pm | प्रीत-मोहर
खुप आवडला लेख हे वेगळे सांगायला नकोच, पण त्याहीपेक्षा जास्त भावली तुमची भाषा टिकविण्याची धडपड!!
शतशः नमन
बायदवे आमच्या जाऊबाईंच्या माहेरी मंकी-
होन्नावर इथे जवळपास अशीच भाषा बोलतात
12 Mar 2018 - 9:40 pm | दक्षिणी मराठी
अग्गीदनांनाईं उदंड धन्यवाद आम्हांला प्रोत्साहन करलांत त्याकरतां..!
:)
13 Mar 2018 - 5:53 pm | जयंत कुलकर्णी
नुकतीच गाडीने दक्षिण भारताची सहल केली त्यात तंजावूरला जाण्याचा योग आला. त्यामुळे हा लेख जास्तच भावला. खाली भोसल्यांच्या दरबाराचे एक छायाचित्र टाकले आहे... गंमत आणि आठवण म्हणून.
13 Mar 2018 - 11:33 pm | निशाचर
लेख अतिशय आवडला. क्लिपही छान आहेत.
14 Mar 2018 - 8:58 pm | खटपट्या
जबरी आयडया केलं मणं भिकारीनं !!! :)
15 Mar 2018 - 3:01 am | गामा पैलवान
द.म.,
लेखातलं हे वाक्यं कळस की हो!
उदंड कष्टं हा वाक्प्रयोग लैच आवडलं की हो आम्हांस. ऐसेच लिहिते ऱ्हावा वो तुमी.
आ.न.,
-गा.पै.