अहिराणी भाषेचा गोडवा
लोकसाहित्य हे ज्या त्या बोलीभाषेतच सापडते. अहिराणीत लोकसाहित्याचे खूप मोठे भांडार आहे. काही प्रमाणात त्याचे संकलन आज उपलब्ध असले तरी मुळातून अद्याप सर्वत्र वेचले गेलेले नाही.
कोडी, आण्हे, उखाणे, नाव घेणे, म्हणी, वाक्प्रचार, सुभाषिते, गपगफाडां, लोककथा, नीतिकथा, लग्नाची गाणी, ओव्या, जात्यावरच्या ओव्या, लोकगीते, भारूड, झोक्यावरची गाणी, आखाजीची गाणी, बारातल्या शिव्या, सणांची गाणी, खंडोबाची गाणी, तळी भरण्याची गाणी, गौराईची गाणी, गुलाबाईची गाणी, कानबाईची गाणी, आरत्या, थाळीवरची गाणी, डोंगर्या देवाची गाणी, टापर्या गव्हार्याची गाणी, आदिवासी गीतं, भोवाड्याची गाणी, लळीत, गण, गवळण, लावणी, पोवाडा, तमाशा लावणी, खंजिरीवरची गाणी, कापनीची गाणी, शेतातली गाणी, देवीची गाणी, आढीजागरणाची गाणी, भिलाऊ गाणी अशा प्रकारच्या असंख्य विभागात अहिराणी लोकसाहित्य विखुरलेले आहे. इतकेच काय, मृत व्यक्तीविषयी शोक व्यक्त करण्यासाठी अहिराणी स्त्रिया जे लयबद्ध यमक साधून पद्ममय हेलाने पारंपरिक पद्धतीने रडतात, त्यांच्या या रडण्याच्या प्रकाराचा सुद्धा अहिराणी लोकसाहित्यामध्ये अंतर्भाव व्हायला हवा.
अहिराणी लोकसाहित्यातील या आधी उद्धृत केलेल्या काही ठळक घटकांचा आपण आस्वाद घेऊया. अहिराणी मायेचा गोडवा सर्वश्रुत आहे. या गोडव्याची काही सौंदर्यस्थळे दाखविण्याचा प्रयत्न झाला तर आपण हरखून जातो. वैशिष्ट्यपूर्ण आणि अर्थपूर्ण असे शब्द अहिराणी भाषेत आढळतात. उदाहरणार्थ, टहाळबन, कव्हळ, तव्हळ, चावळ, याळ, गयथा, वनथा, बागे बागे, सोद, काकोळीत, आंदन, रावण्या, मुर्हाळी, वल्ला, गणगोत, ईसड्या, घट्या, डसका... अशी काही शाब्दीक मोजकी उदाहरणे पहिलीत तरी अहिराणीचे शाब्दीक बलस्थान लक्षात येते.
एखाद्या प्रमाणभाषेत आढळावेत इतके अर्थपूर्ण वाक्प्रचार अहिराणीतही विपुल प्रमाणात वापरात आलेले दिसतात. उदा., गुढी उभारनं, हिसका दखाडनं, परनाले जानं, आवकळ्या करन, चिरीमीरी देन, आवुतले जुपनं, मांडोखालतीन जानं, आरातारा पाहनं, सात नवसनं, आब राखनं, चिनगी लावनं, तोफांड करनं, थापा मारनं, जीव लावनं, भाड खानं, घुबडाई जानं इत्यादी.
अहिराणी भाषेत म्हणींचा तर खजिनाच आहे. पैकी उदाहरणादाखल काही म्हणी अशा :
१. तुले ना माले घाल कुत्राले
२. भरी वनी बोळकी, खीर लागे मळकी
३. व्हतं कशे, जये कशे
४. काम नही काय करू, नवं लुगडं दांडे करू
५. आसू ना पासू, मरी गयी सासू
६. कुमार थीन गधडं शान
७. आयजीना जीववर बायजी उदार
८. आग लावू तमासा पाहू
९. गोगलगाय पोटमा पाय
१०. माले नही आबरू, मी कसाले घाबरू
११. वय गयं, पन सोय वनी नही
१२. वावधनमा आरती
१३. सोनाना घास जीवले कास
१४. तवलीभर दाना, भिल उताना.
आण्हे म्हणजे कोडे, अहिराणीत आण्ह्यांचे स्वतंत्र दालन आहे. आण्ह्यांमध्ये आण्हे सांगणार्याची बुद्धिमत्ता, हुशारी, कल्पकता, चातुर्य दिसून येते. अर्थात त्याचे श्रेय पूर्वीच्या आण्हे रचणार्या लोककलावंतांना-लोककवींना द्यावे लागेल. आपण फक्त त्यांच्याकडून परंपरेने उसनं घेतलेलं आहे.
आस्वादासाठी काही आण्हे पहा :
१. येवढा येवढा गडू, भुईमा दडू• - कांदा.
२. काळी गाय, काटा कुटा चेंदी जाय, पानीले पाही वसरी जाय• - चप्पल
३. हात लाल, पाय लाल, बसाले गादी लाल तिकून वना पाटील बुवा, राम राम•
- मारुती
४. येवढं येवढं झाड, बत्तीस घुंगरू• - हरबऱ्याचे झाड.
५. मन्हा मामा गाव गया दारशे बोकड्या टांगी गया• - कुलूप
६. लाल पिशवी, चिप्पट दाना• - मिरची
७. खाल तीन पाय, वर दोन पाय, हातमा डालकी, भरतारनी वाट पहाय•
- चाऊर, माणूस, उपणणे
८. दक्खनकडथीन वना भाट त्यांनी गुफी चौरंग खाट घडाये पन मोडाये ना•
- गोंदण
अहिराणी ओव्यांमध्ये लोकपरंपरा, रूढी, चालीरीती, कौटुंबिक श्रद्धा, सामाजिक श्रद्धा, लोकसमज, लोकरीती, स्त्री स्वभाव, दागिने आदींचे वर्णन सहज येत राहते. उपमा, प्रतिमा, प्रतीके यांचाही ओवीत अगदी सहज अंतर्भाव होत राहतो.
उदाहरणार्थ,
१. पानीवाल्या बाया तुम्ही उचला घागरी।
मना बंधुरायाना पुढे जाऊ द्या पांभरी।।
चांगल्या कामासाठी पाण्याने घागरी भरून स्त्रिया आडव्या गेल्या की तो ग्रामीण श्रद्धेत शुभशकुन समजला जातो. शेतात बंधू पेरणीसाठी जातो आहे. म्हणून स्त्रियांनो, त्याला तुम्ही भरलेल्या घागरींनी आडवे जा असे ही स्त्री ओवीतून सुचवते आहे.
२. जावयींनी जात उडीद मुगधान खेत।
लेक मनी चंद्रज्योत याना मनी नही येत ।।
प्रत्येक स्त्रीला आपली मुलगी सुंदर वाटते. तशी या स्त्रीलाही वाटते. पण आपल्या जावयाला उडीद मुगाच्या शेतात होणार्या खाजेसारखा तो आहे असे म्हणते. अशी या स्त्रीची जावयाबद्दल तक्रार आहे.
३. भावजयी सीता तू कसाले गयी खेता।
मिरीगना पानी तुले लागा घर येता ।।
ह्या ओवीत नणंद- भावजयीचं प्रेम व्यक्त झालं आहे. नणंद भावजयीला म्हणते, मृगाच्या पावसात तू भिजलीस. अशा वातावरणात तू कशाला शेतात गेलीस?
ओवीतला दुसरा भाग म्हणजे जात्यावरच्या ओव्या. स्त्री जात्यावर बसली की तिला आपोआप ओव्या सुचू लागतात, अशी अहिराणी ओवीची ख्याती आहे. जात्यावरच्या काही ओव्या उदाहरणादाखल पहा.
१ अरे मन्हा बाप, माले पंढरीले देता।
राम कुंडावर आंग धोता, भेट पुंडलीकनी घेता ।।
२. पाची पकवान, भाऊ जेवता जियेना।
खेडं मन्ह गाव, पान केळनं मिळेना ।।
३. माय माय करू, माय मळामझारली बोर।
बोरले वना बहार, भर डाळिब्या बिल्लोर ।।
४. मानता मानीसनी, बेल वहास शंकरले।
५. कपाळना कुकू, आयुक्ष मांगस भरतारले ।।
अक्षय तृतीयेच्या पंधरा दिवस आधीपासून घरोघरी गौराया बसतात. गौराई म्हणजे पार्वती. त्यावेळी गौराईसाठी गाणी म्हटली जातात. उदाहरणार्थ :
१. शंकर म्या नकटा तंगडी धरी उपटा
मन्ही गऊरले लयी गया माले खत लायी गया
तसेच
२. काळी घागर दोधे भरू मोती लावू का गुंजा वं
सहा महिनानी रात जयी शाम कुठे गया वं.
अक्षय तृतीयेच्या दिवशीच शेजारील दोन गावात बार होतो. या बारात शक्यतो सर्व स्त्रिया आणि मुलीच भाग घेतात. यात एकमेकांना गाण्यातून लयबद्ध शिव्या दिल्या जातात. या शिव्या बीभत्स, कित्येकदा अश्लील सुद्धा असतात. उदा., काही शिव्या पहा.
१. साना वाटे टाका दोर धरा धरा रम्या चोर
२. एकाना घे पोरी दोनाना घे बारानी गाडीले लवकर ये
३. डोकावर धोनं कोनं वं शिपाई दाद्या तिना वं.
खानदेशी लग्न समारंभात विविध प्रकारची वेगवेगळ्या कर्मसोहळ्यात गाणी म्हटली जातात उदा :
१. रडी रडी डोळा जयात लाल
कोणी काढी हायी हुंडानी चाल
पोरी वालासना व्हनार हाल
शेती इकी बाकी इकी
- इकी बैलजोडी
पोरीसना पाये यानी
हिंमत सोडी.
तसेच
२. आया फुकती बाया फुकती
फुकती मामा मावशा
समदीर सुकतं, पानी मुक्त
हळदकुकू कालवज्या.
एखाद्या कवितेतला नाद या लोकगीतात सहज येऊन जातो.
३. काय रुसतंस जवाई बुवा
जवाई मांगस मळातला आंबा
एवढी दिधी ना पोटनी रंभा
काय रुसतंस जवाई बुवा ।।धृ।।
अशा प्रकारचा अहिराणी लोकसाहित्यातील विविध प्रकारच्या मौखिक परंपरांचा आस्वाद घेता अहिराणीतील लोकवाङ्मयाचे भाषिक बलस्थान किती बळकट आणि खोल आहे याचा प्रत्यय येतो.
.
--------------------------------
.
(लेखक नामवंत साहित्यिक आणि भाषा, कला, लोकजीवन व लोकवाड्.मयाचे अभ्यासक आहेत.)
- डॉ. सुधीर रा. देवरे
सायास, १८७, टेलिफोन कॉलनी,
पाठक मैदानाच्या पूर्वेला, बसस्थानकामागे,
सटाणा- ४२३ ३०१ जि. नाशिक,
मोबाइल: ९४२२२७०८३७, ७५८८६१८८५७
Email: drsudhirdeore29@gmail.com
sudhirdeore29@rediffmail.com
अल्प परिचय:
डॉ. सुधीर रा. देवरे
(विद्यावाचस्पति - एम. ए. पीएच. डी.)
भाषा, कला, लोकजीवन आणि लोकवाड्.मय यांचे अभ्यासक.
साहित्यिक, समीक्षक, संशोधक, संपादक.
अहिराणी भाषा संशोधक, अहिराणी लोकसंचितावर लेखन.
ढोल या अहिराणी नियतकालिकाचे संपादक.
सदस्य, महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समिती.
महाराष्ट्र शासनाचा नरहर कुरूंदकर भाषा पुरस्कार.
ग्रंथ लेखन:
१. डंख व्यालेलं अवकाश (जानेवारी १९९९, मराठी कविता संग्रह, लाखे प्रकाशन नागपूर)
२. आदिम तालनं संगीत (जुलै २०००, अहिराणी कवितासंग्रह, भाषा प्रकाशन, बडोदा, तुका म्हणे राज्यस्तरीय पुरस्कार, वर्ष २०००)
३. कला आणि संस्कृती : एक समन्वय (जुलै २००३, शब्दालय प्रकाशन,
श्रीरामपूर, मुंबई येथील लोकमान्य सेवा संघाचा मा. सी. पेंढारकर पुरस्कार
२००२-२००३, एम. फिल., पीएच. डी. च्या विद्यार्थ्यांसाठी संदर्भ ग्रंथ )
४. पंख गळून गेले तरी! (आत्मकथन, २ आक्टोबर २००७, शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर, स्मिता पाटील पुरस्कार)
५. अहिराणी लोकपरंपरा (लेखसंग्रह, ३ डिसेंबर २०११, ग्रंथाली प्रकाशन, मुंबई)
६. अहिराणी गोत ( ७ मार्च २०१४, पद्मगंधा प्रकाशन, पुणे)
७. अहिराणी वट्टा ( ७ मार्च २०१४, पद्मगंधा प्रकाशन, पुणे)
८. अहिराणीच्या निमित्ताने : भाषा ( ८ एप्रिल २०१४, पद्मगंधा प्रकाशन, पुणे, महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाड्.मय निर्मितीचा नरहर कुरूंदकर भाषा पुरस्कार, २०१५)
९. अहिराणी लोकसंस्कृती ( ८ एप्रिल २०१४, पद्मगंधा प्रकाशन, पुणे)
१०. माणूस जेव्हा देव होतो ( ४ जानेवारी २०१५, अहिरानी नाद प्रकाशन, सटाणा)
११. सहज उडत राहिलो (आत्मकथन, १ ऑक्टोबर २०१६, ग्रंथाली प्रकाशन, मुंबई)
१२. सांस्कृतिक भारत ( राज्यनिहाय लेख, १५ डिसेंबर २०१७, मेनका प्रकाशन, पुणे)
१३. भारतीय भाषांचे लोकसर्वेक्षण: महाराष्ट्र ( १७ ऑगष्ट २०१३ ), पद्मगंधा प्रकाशन, पुणे, यातील पृष्ठ क्रमांक ६८ ते ८१ वरील अहिराणी भाषा वरील दिर्घ लेख.
फोटो:
.
.
प्रतिक्रिया
1 Mar 2018 - 8:58 am | प्रचेतस
खरंच खूप गोड भाषा आहे ही.
ह्या भाषेत तुमच्याकडून एखादं ललित अवश्य येऊ द्यात.
1 Mar 2018 - 10:12 am | पैसा
अहिराणीवर हिंदी/गुजरातीचे संस्कार आहेत का? संदर्भाने बराचसा अर्थ लागला. मात्र काही शब्द अगदीच वेगळे वाटतात.
1 Mar 2018 - 12:29 pm | इरसाल
अहिराणी ही भाषा मराठी,हिंदी आणी गुजराथी भाषेचे मिक्श्चर आहे.
1 Mar 2018 - 12:30 pm | इरसाल
आणी त्यात अहिराणी भाषेचे असे स्वतःचे शब्दपण आहेत.
1 Mar 2018 - 12:54 pm | पैसा
भौगोलिक दृष्ट्या गुजरात आणि मध्य प्रदेश जवळ असल्याने साहजिक म्हटले पाहिजे.
1 Mar 2018 - 11:20 am | नूतन
खूपच सुंदर आणि माहितीपूर्ण
1 Mar 2018 - 2:30 pm | भीडस्त
अजून येऊ द्यात विस्तृत आणि सविस्तर . आवडीचा विषय.
2 Mar 2018 - 2:32 pm | पद्मावति
सुंदर लेख.
4 Mar 2018 - 4:49 pm | डॉ. सुधीर राजार...
माझा लेख पैसा यांनी इथे दिला त्याबद्दल पैसा यांचा आणि प्रतिक्रिया देणार्या सर्वांचा मी खूप खूप आभारी आहे.
4 Mar 2018 - 5:21 pm | Ram ram
आज खूप सविस्तर लिहीलय डॉक्टर साहेबांनी. अनुवाद लिहायला हवा होता काही आन्हे,ओव्यांचा.
एकदोन आण्हे-- खालुन मोठा भाऊ वरून लहान भाऊ मधी लाल लुगड्याची आऊ(पाटा वरवंटा मिरची )
आधी होती साधीभोळी मग ल्याली हिरवी चोळी हात लावू देईना अंगाला ( करडई ची भाजी )
4 Mar 2018 - 8:16 pm | सुधीर कांदळकर
जानं म्हणजे काय समजले नाही. आण्हे फारच आवडले. शिस्तबद्ध तरीही सुंदर, मस्त लेख आवडला.