ग्राम"पंचायत" लागली..!! - १
ग्राम"पंचायत" लागली..!! - २
ग्राम"पंचायत" लागली..!! - ३
ग्राम"पंचायत" लागली..!! - ४
ग्राम"पंचायत" लागली..!! - ५
ग्राम"पंचायत" लागली..!! - ६
ग्राम"पंचायत" लागली..!! - ७
प्रभात फेरी १२.१५ ला संपली. सगळा गाव धुवून काढला गेला. बऱ्याच जणांचे लेंगे प्यांटी उघड्या गटाराच्या चिखलाने भरल्या होत्या. पारदर्शक (अदृश्य) जाहीरनामाच्या फ्रंट पेज वरच्या चवथ्या लायनीत गटारं आणि अंतरिक रस्ता ठळक अक्षरात चमकत होता. तो चवथ्या लायनीत का ठेवला याचे समाधानकारक उत्तर मिळेल याची ग्यारंटी नाही. कारण त्यावरील इतर ३ अजेंडे खूप अति महत्वाचे होते.
इतक्या दिवस त्या घाणीत राहतोय याची जाणीव पहिल्यांदा या प्रचार फेरीत जनता जनार्दनाच्या लक्ष्यात आले आणि पोटात गोळा आला.
कारण चालून चालून भूक लागली होती.
मन्याने सगळी मेंढरं शिरपा अण्णाच्यात जेवायला हाकलली.
या कळपात विरोधी पक्ष्याच्या लांडग्यांनी पण शिरकाव केला होता. जेवण महत्वाचे होते. मीठ कोणाचे खातोय हा भाग गौण होता.
शिरपा अण्णा फराटे संग्रामचा हुकमी एक्का. २ वेळा सदस्य आणि अडीच वर्ष उपसरपंच हा त्यांचा बायोडाटा. ग्रामदैवताच्या जत्रेचा फंड गेली 12 वर्ष ते सांभाळत होते. ह्या फंडाच्या चाव्या काढून घेणे हा प्रमुख उद्देश दाढी वाल्यांचा होता. हा एक्का बाद केला तर संग्रामला खच्ची करणे सोपे होणार होते.
जाऊ द्या. लोकांनी पंगतीत खुर्च्या शोधायची शर्यत लावली होती. टेबलावर जेव्नाळी घालायचे फॅड हल्लीच चालू झाले होते. मेनू कसा का असेना टेबल टाकले होते ह्याची चर्चा जोरात.
खुर्ची पकडायची ही शर्यत जीवघेणी होता होता वाचली. मारतीनाना नावाचं खगड म्हातारं धोतरात पाय अडकून मुंडक्याव पडलं. बरं झाले दात आधीच गळले होते. बचाळ तोंडातून उडून मातीत पडले. फकड्या हार मानतोय थोडीच. खुर्ची पकडलीच. कवळी हातात घेऊन पाणी कधी येतंय याची वाट बघायला लागले.
निम्मी अर्धी गर्दी खुर्चांवर स्थानापन्न झाली. निम्मेजण एक एक खुर्ची मागून पकडून जेवणारा कधी उठणार याची वाट पाहू लागले. मला पुण्यातली लग्न आठवली.
वाढपी जशी धावू लागली तशी बहुतांशी लोकांचा भ्रमनिरास झाला. शुद्ध शाकाहारी घासफूस पाहून मतदारांचे मत बदलणार हे उपस्थित पदाधिकाऱ्यांना स्पष्ट जाणवत होते.
बहात्तरखोडीच्या मन्याने प्रसंगाची गरज समजून लगेच जाहीर केले, "संध्याकाळचे जेवण शिरसाई ढाब्यात आहे. मटण थाळीची कुपन माझ्याकडे मिळतील."
पुंडलिक वर्दे हार विठ्ठल ....
कोपऱ्यापर्यंत ओघळ येई पर्यंत हाणले.
मारतीनानाच कवळी बसवून घोलमांडून घोलमांडून पुऱ्या चाबलने काम चालू होते.
ढाबा मालक तिथे घुटमळणाऱ्या २ तांबड्या कुत्र्यांकडे अभिलाषेने न्याहाळत होता.
----
"काय संभाजी राजे? कसा चालाय प्रचार ?" दाढीवाला नंबर ३, सायबूनाना ने पप्प्या बरोबर कारखान्याच्या चौकात उभा असलेल्या संभाला घोळात घेतला.
"चाललंय. आमची कुठली लायकी निवडणूक लढायची? आपली रिंगणात हजेरी लावायची फक्त." संभाचा कोंफिडन्स स्टेबल होता.
" चल माझ्या गाळ्यात बसून कॉफी घेऊ."
संभा ने इकडे तिकडे बघून सायबूनानांच्या हातात हात घालून गाळ्याच्या दिशेने चालू लागला. सायबूनानाने पप्याला ५० रुपये दिले आणि मल्लापाच्यातली कॉफी सांगून वली भेळ खाऊन जायला सांगितले. दुपारचे दोन वाजले होते. चौकात सगळा शुकशुकाट होता.
गाळ्यात घुसल्यावर कोणीतरी शटर खाली केले आणि लाईट लावली.
शांतारामला पाहून संभा यत्किंचित दचकला.
"संभाजीराव बसा बसा. काळजी करू नका. फक्त कॉफीचं पाजायची आहे तुम्हाला." सुतळीच्या पोत्यावरून उडी मारत विश्वास अवतरला.
तिघांना संगट लोळवू शकतो अशी सलमान सारखी कंमिटमेन्ट संभाच्या डोळ्यात चमकत होती.
" संभा तू पहिल्यापासून आपला माणूस आहेस. आमदारकी आणि कारखान्याच्या इलेकशन मध्ये पैसे वाटपाचे काम तुझ्याकडे माझ्या इशाऱ्यानेच तुला मिळाले होते, हे तरी मान्य करतो की नाही?" सायबूनाना मुरलेला कट्टाप्पा होता.
संभा ने होकार्थी मान हलवली.
" संभाजी, ह्या वेळेस मदत कर. काही करून मला सदस्य झालेच पाहिजे. माझ्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. तू पडला तरी तुला काही फरक पडणार नाही.
त्याची किंमत द्यायला मी तयार आहे." कधी कुणाला कटिंग चहा पाजला नाही त्या शांतारामने संभासमोर २ लाखाची ऑफर ठेवली.
" तुझ्या थोरल्या भावाच्या बायकोला पतपिढीत घेतो" विश्वासचा डबल धमाका सेल.
अर्धा तास- पाऊण तास झाला तरी कॉफी काय आली नाही.
शटर उघडून संभा इकडे तिकडे बघून उसातून बाहेर पडतात तसे बेमालूम बाहेर पडला.
ह्या रांगड्या गड्याला उसाचा बांध ना बांध माहित होता.
मोबाईल वरून एक फोन केला.
----
" भोसडीच्या, माझ्यात खातो आणि तिकडे खबरा पोहचवतो व्हय रे." संग्रामचा पारा चढला होता.
प्रदीप फराटेला संग्रामने डेरीत मोक्याची खुर्ची दिली होती. त्याच्या कर्तबगारीवर प्रचंड विश्वास होता. इतरांच्या तुलनेत त्याचा पगार काही पट जास्तच केला होता. ते थोडे की काय गाय गोठ्यासाठी बिनव्याजी 'बिनहिशोबी' ५० लाख उचल दिली होती. प्रदीपला फॉर्च्युनरच घायची होती पण डोळ्यावर येईल म्हणून प्लॅन पुढे ढकलला होता. नानाच ऐकून दत्ताला सरपंच पदाचा उमेदवार केल्याबद्दल त्याच्या मनात संग्राम बद्दल रोष होता. फराट्यांची सगळी इब्रत माऊलीच्या चरणी वाहणार म्हणून फराट्यांच्यात प्रचंड संताप होता.
विरोधी पक्षाला आपल्यातलाच कोणीतरी महत्वाची बातमी पुरवतो आहे याची भनक संग्रामला लागली होती. फोन करून पैसे वाटपाची माहिती पुरवत असताना त्याला संग्रामने रंगे हात पकडले होते. माणसाने फोन मध्ये किती व्यग्र असावे की संग्राम पाठीमागे उभे राहून १५ मिनिटे त्याचे संभाषण ऐकत होता.
प्रदीपच्या माहितीच्या आधारेच दाढीवाल्यानी ५ हजाराचा उच्चांकी रेट काढला होता. सोयाबीनला भाव नाही म्हणाऱ्यानी स्वतःच्या दोन थोबाडीत मारून घ्याव्यात.
प्रतिप्रभात फेरी आणि इतर घोष वाक्ये ह्या 'लिकेज'चाच परिपाक होता.
" आपली आय घाल, तुझं काळ तोंड परत मला दाखवू नकोस".
प्रदीप चालता झाला. स्व घरातील ४५ जणांचं एकगठ्ठा मतदान घेऊन.
संग्रामला आशा होती प्रदीप घात करणार नाही. खाल्ल्या मिठाला नाही पण दिलेल्या पैशाला तरी जागेल.
बेहिशोबी पैश्याचा आणि बेभरोशी माणसांचा काय भरोसा..!!
----
" पप्पू शेठ, तुमच्या नावाचं पार्सल पाठवले आहे. परडीला हात लावा, भंडारा उचला आणि पार्सल कपाटात ठेवून द्या."
पप्प्याने बेहिजक परडीला हात लावला, भंडारा कपाळाला फासला आणि ५ हजाराच्या हिशोबाने ४ मताचे दोन हजाराच्या गुलाबी नोटांचं २० हजाराचे पार्सल खिश्यात घातले.
सगळीकडे धुमाकूळ माजला. संभाला सगळी माहिती मिळत होती पण न पिलेल्या कॉफी नंतर तो निवांत झाला होता.
गावातल्या जुन्या-जाणत्या मंडळींचं पैशाला हपापलेल्या स्वतःच्या पोरांसमोर चालेना. सहा महिन्याच्या औषधाचा खर्च निघणार होता.
पम्याने तर कहरच केला.
पार्सल मिळाले तसे बायकोला देवयानी साडी आणि स्वतःला, म्हाताऱ्याला आणि पोरांना वेगवेगळ्या कलरचे संग्राम स्टाईल शर्टस आणले.
" कारे बांडगुळा, दमधीर नव्हता का तुला?" धोतार पम्यावर खेकसले. आपल्या पॅनल वाल्यानी आधी काशी केली होती म्हणून गप्प बसावे लागले.
तिसऱ्या पॅनेलचे कार्यकर्ते बोटभर चिटूरे वाटत होते. त्यावर पोपटी पेनाने 'स्टार'चे चित्र काढले होते.
पप्याने चिटोरे घडी घालून जपून पाकिटात ठेवले.
कारखान्यावरच्या होलसेल किराणा दुकानातून चिटूरे दाखवून अडीच हजाराचा किराणा लोक पिशव्या भरून घेऊन जात होते.
खऱ्या अर्थाने आताशी दिवाळी गरगरीत होयला सुरवात झाली होती.
====
क्रमश :
((सर्व हक्क लेखकाच्या स्वाधीन.. जागा, पात्रे, सर्व काल्पनिक.))
(((अपरिहार्य कारणामुळे लेख टाकायला उशीर झाला त्याबद्दल लेखाची वाट पाहणाऱ्यांची दिलगिरी व्यक्त करतो )))
प्रतिक्रिया
10 Jan 2018 - 9:33 pm | पैसा
काय नमुने आहेत एकेक!
10 Jan 2018 - 10:26 pm | संग्राम
वाचतोय
10 Jan 2018 - 11:42 pm | एस
अचूक पकडलंय. एकच नंबर!
11 Jan 2018 - 1:56 am | अनन्त अवधुत
मानलं
11 Jan 2018 - 9:42 am | शलभ
मस्त..
11 Jan 2018 - 10:41 am | सिरुसेरि
निस्ता धुमाकुळ
11 Jan 2018 - 11:27 am | पगला गजोधर
ग्रासरूट पॉलिटिक्स !!!
कथा छान चाललीये पुढे ...
11 Jan 2018 - 11:42 am | नि३सोलपुरकर
मस्त ,कथा छान चाललीये.
अवांतर : भैया ,मद्दान कवा हाय .
11 Jan 2018 - 12:23 pm | विशुमित
मतदान आज रात्री 11 वाजता .
11 Jan 2018 - 11:58 am | urenamashi
पु भा प्र
11 Jan 2018 - 12:35 pm | अभ्या..
भाकर, भंडारा, भावकी अन लेकरांच्या शपथेवरचं हुकमी मतदान.
हाण्तेज्ज्यायला.
.
हाय ते हाय, आन हाय ते लिहलंय.
लगे रहो विशुपाटील.
11 Jan 2018 - 12:47 pm | विशुमित
शपथी तरी आता कोण खर्या वाहतोय.
शपथ वाहताना तोंडात एक अणि मनात दुसरेच असतं.
देवाला सांगतय मनातलं पकड. कारण माझा मनाचा देव आहे.
मनाची तुळशीची माळ असते तशी.
धन्यवाद अभेंद्र शेठ....!!
11 Jan 2018 - 2:37 pm | राजाभाउ
जबरदस्त !!! आत्ता हा भाग आल्यावर पहीले सगळे भाग पुन्हा एकदा वाचुन काढले लिंक लगावी म्हणुन
पुभाप्र.
11 Jan 2018 - 4:12 pm | विशुमित
खूप खूप आभारी आहे...!!
12 Jan 2018 - 6:02 pm | बापू नारू
छान झालाय हा भाग सुद्धा ,पण एवढा लेट नका करू भाग लिहायला ,कोण character कुठल्या पार्टी चा आहे हे पण विसरलो ,परत मागचे दोन भाग वाचाय लागले :)
12 Jan 2018 - 7:53 pm | विशुमित
धन्यवाद...
तयार झाला आहे पुढील भाग.
थोड्याच वेळात टाकतो