ग्राम"पंचायत" लागली..!! -4

विशुमित's picture
विशुमित in जनातलं, मनातलं
18 Oct 2017 - 4:28 pm

http://www.misalpav.com/node/40963
http://www.misalpav.com/node/41040
http://www.misalpav.com/node/41296

'शांती'मामा ने मला आवाज दिला, " भाच्याबा, चला मिटिंगला."
"कुठे आहे मिटिंग?", मला अचूक अंदाज आला होता.
"मारुतीच्या देवळासमोर".
माझा अंदाज खरा ठरला होता. गोठ्यातली खोली सोडून मूर्ती नसणाऱ्या अर्धवट काम झालेल्या नियोजित मारुती मंदिरासमोर मिटिंगचा घाट घातला होता.
शांताराम मामाने निवडणुकीचा अजेंडा लोकांच्या डोक्यात घुसवण्यासाठी स्फोटक स्थळ निवडले होते.
ही आयड्या " राजू मामाची असणार" हे मी पक्के ओळखले होते. तात्याचा धाकटा पोरगा, कचऱ्याचं शेंडेफळ वाडीतला नारद मुनी होता. त्याला प्रत्येकाची तार माहित आहे आणि ती कोठे वाजवायची ह्याचे तर अगाध ज्ञान आहे. मला मिटिंगला आमंत्रण देणे हे ही त्या तार वाजवण्यातलाच एक प्रकार होता.
हुरळून जाणाऱ्यांपैकीतला मी नव्हतो कारण नाना कधी मातीत लोळवतील ह्याची पूर्ती माहिती होती. पण तरी विनंतीला मान दिला पाहिजे म्हणून कॉटन कँडीचा टी- शर्ट घालायला घेतला.
"तुम्हाला काय पडले आहे असल्या मिटिंग-फिटिंगला जायचे ? येड्याचा बाजार नुसता".
"तुझ्यासाठी सरपंचपदाचे तिकीट मागायचे आहे. पुणे सोडून तुम्हाला गावाकडे आणले आहे त्याचे पुनर्वसन नको करायला?" आम्ही शेखी मिरवली.
" घरगाडा हाका आधी नीट मग गावगाड्याकडे लक्ष द्या." तिला एकच भीती होती हा बाबा अज्यासारखा जर गावकरणात पडला तर आपली दुसरी "इंदाबाई"च झाली म्हणून समजा.
आम्ही विषय सोडून दिला. विषय वाढवून पण काही हासील होणार नव्हते. मागच्या चारपिढ्यांचा उद्धार झाला असता. मग पितृ पक्ष पाळण्याचा संबंध उरला नसता.
पण इतर घरामध्ये काही वेगळे वातावरण असावे असे जाणवले. घरागनिज एक जण तरी कुंकवाचा नाम ओढून आला होता. त्यांच्या बायड्यानी ओवाळून पाठवले होते फाकड्याना काही तरी पदरात पडून आणतील म्हणून. ह्यांच्या बापाने ठेवलंय वय सगळ्यांना उमेदवारी.
मिटिंग चा अजेंडा सिम्पल होता. शांती मामाचे १०% मन (मान न्होवे) वळवणे आणि एक पुरुष -एक महिला उमेदवाराची निवड करणे.
नानांनी त्यांच्या नेहमीच्या गॅंगला (सगळे फराटेवाडीच्या बाहेरचे) पंढरपूरला जायचे आहे म्हणून फोन केला. गेली ३०-३२ वर्ष झाले महिन्याच्या दर एकादशीला हे टोळकं पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनाला जातात.
पण आज एकादशी नव्हती...!
----
" पाव्हणे, नाना नाही आले व्हय मीटिंगला ?" शिवाबापूने मला खोचकपणे विचारले.
अभूतपूर्व गर्दी जमली होती. त्यात मी तेवढ्याच तडफेने उत्तर दिले, " नाना कुठेतरी (?) बाहेर गेलेत सकाळी सकाळी". मला माहित होते नाना कुठं गेले आहेत ते पण जिथे सत्य बोलणे शक्य नाही आणि उत्तर देणे बंधनकारक आहे तिथे किमान अर्धसत्य तरी बोलावे हे बाळकडू मी नानांकडून घेतले होते. त्यांच्या नेहमी सत्य आणि रोखठोक बोलण्याने आमची बऱ्याच वेळा गोची झाली आहे तो भाग अलविदा.
शिवाबापूला नाना मीटिंगला नाही याचा अत्यानंद झाला होता कारण सभेचे नेतृत्व साहजिकच त्यांना मिळणार होते.
इंग्रज राजवटीत नानाचे वडील आणि शिवाबापूचे आजोबा शिंगणापुरवरून जुन्या करंज्यात खाननी-बांधणी (शेतमजूर) करण्यासाठी म्हणून आले होते. दोघे अपार मेहनती होते. दोघांनी जमिनी जुमले सुद्धा घेतले. पण नानांच्या वडिलांसारखी प्रगती आणि लोक सांभाळणे त्यांना जमले नाही. कारण एकच होते फाटके तोंड. ज्याचा वारसा त्यांचा पुढल्या पिढ्यानी पण चालवला होता. काही करून दीनदादाच्या घराची जिरवायची आणि पुढे जायचे एवढाच त्यांचा अजेंडा होता.
पण याउलट 'माउलीं'नी चार चांद लावले होते. आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय पटलावरती नानांनी त्यांना कोसो दूर फेकले होते.
नाना त्यांना कधीच (तुल्यबळ) प्रतिस्पर्धी मानत नव्हते. खरेच होते ते म्हणा.
त्यासाठी शिवाबापू नानांविरुद्ध २ वेळेस इर्षेने लढला आणि प्रचंड बहुमताने आपटला होता.
पण मागच्या पंचवार्षिक निवडणुकीत नानांनी आपल्या पॅनलमधून स्वतः शिवाबापूला तिकीट दिले होते. निवडून आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले होते. पण शिवबापूच्या एका भावाने आपला प्रताप दाखवला. भावकी कशी उण्याची वाटेकरी असते याचा प्रत्येय वाडीला दाखवत ६ मतांनी शिवाबापूला पाडला.
साहजिकच त्याचा ठपका नानांवर बसला.
त्याचा रुसवा काढण्यासाठी नाना जर शनिवारी त्याला भजनाला घेऊन जात. अखंड हरिनाम सप्ताहचा सगळा हिशोब पूर्वी पासून त्यांचा थोरल्या माळकरी भावाकडे दिला होता. वरून बापूकडे भावार्थ संपल्यावर "विठोबा रुख्माईला" कीर्तनकारांना हार घालण्याचा मान दिला होता. नाना-बापू जिवाशिवाची जोडी पुन्हा एक झालेत याचा धसका फराटेंनी घेतला होता.
----
बाळूमामा मिटिंगसाठी पुण्यावरून येणार होता. शांताराम मामा ओढ्यात (साईडला) वाट पाहत होता. लहानपणापासून त्याच्या बोटाला धरून चालायची सवयच होती त्याची.
वॅग्नर आली आणि साहेब खाली उतरले. पिकाचा पंचनामा करायला येणाऱ्या सरकारी बाबुंसारखे 'मारुती'च्या दिशेने कूच केले. रस्त्यावर आलेला गटारीच्या पाण्यातून वाट काढताना बेंबटाच्यावर इन-शर्ट केलेला दंडगोलाकार देह धापा टाकू लागला.
"नानांनी एवढे पुढारपण केले पण आंतरिक रस्ता करता आला नाही २० वर्षात. बुवांच्या पंगती उठवणे म्हणजे यांच्या दृष्टीने विकास." आल्या आल्या खड्यांचे जनक असलेले पीडब्लूडी डिपार्टमेंटचे कार्यतत्पर अधिकाऱ्याने नाराजी व्यक्त केली.
प्रत्येक्षात नानांनी झेडपी अध्यक्षाची मनधरणी करत गावठाणात नसलेल्या कचरेवाडीसाठी ३ लाखाचा मुरूम (ठिसूळ मुरमाड दगड) आणि १२ लाखाचे सिमेंटच्या आंतरिक रस्त्यासाठी निधी मिळून आणला होता. पण वाडीतल्या काही नतद्रष्टांमुळे १२ लाखाचा निधी परत गेला आणि ३ लाखचा मुरूम असलेले ट्रक खाली करण्यासाठी जागा न मिळाल्या कारणाने नानांनी गोठ्यात टाकून घेतला. याच गोठ्यात सप्त्याच्या पंगती उठत.
"रस्त्याचे जाऊ द्या मारुतीच्या देवळाची आम्ही ३ वर्ष झाले वर्गणी गोळा करतोय आणि तुमच्या घराने अजून फुटकी कवडी पण नाही दिली. सगळे भाऊ एकमेकांवर टोलवा टोलवी करतात." शिवाबापूने डायरेक्ट पोटातच समशेर घुसवली.
" अरे त्यासाठीच तर आलो आहे. एकदा शांतारामचं १०% मन वळवले की मी तुम्हाला गॅरंटी देतो की मुख्यमंत्रांपर्यँत जाऊन मी मंदिरासाठी मोठा निधी गोळा करून आणेन." बाळूमामांनी पीडब्लूडीच्या तारा कशा वरपर्यंत पोहचल्या आहेत आणि त्यांचे कॅनेक्शन कुठं पर्यंत आहे ते लोकांना अवगत केले.
" तुमच्यात आलेला पाहुणा चहा प्यायला नानांच्यात पाठवता आणि तुम्ही निधी गोळा करणार म्हणे. शांतारामला उभा राहायचे असेल तर नाना म्हणतील त्या पार्टीत उभे राहावे लागेल. पण नाना तुला उमेदवारी देतील म्हणून शंका आहे." बापूने डोबळाच बाहेर काढला.
नाना-बापू एकीचा झेंडा फडफडायला लागला असा विश्वास लोकांच्यात बसला.
"अच्छा बापूच्या हातात मिटिंग सोपवून नाना पंढरपूर गेले तर." फळकुटण्या पम्याने पंढरपूरचं बिंग फोडलं.
बाळासाहेब पंचनामा अधिकाऱ्यासारखे हात हलवत निघून गेले.
----
दोन दिवसांनी बापूने परत मिटिंग बोलावली. स्थळ पुन्हा मारुतीचे अंडर कॅन्स्ट्रक्टेड मंदिर, डेव्हलपरने अर्धवट सोडलेल्या भग्न स्कीम सारखे.
नाना आपला 'पिता'श्री गड सोडायला तयार नव्हते. ज्या गडात त्यांनी पांडुरंगाचे सुबक असे मंदिर बांधले होते. विठ्ठल-रखुमाईची कटेवर हात ठेवलेली या सुंदर मूर्ती सारखी मूर्ती उभ्या महाराष्ट्रात मी पाहिली नाही. गावाच्या बाहेर असणाऱ्या मारुतीला गावात कशाला आणता हा त्यांचा सवाल होता.
बापूच्या आग्रहाखातर म्हातारं धोतराचा सोगा हातात धरत झपझप पावले टाकत दिलेल्या वेळेच्या २-३ मिनिट आधी मंदिरपुढे पोहचले. त्यांना कधीही कोणाला ताटकळत ठेवणे आवडत नसे. पण एखाद्या गोष्टीची वाट पाहायची सहन शक्ती त्यांच्या कडे जबरी होती. म्हणून तर ते राजकारणात इतके दिवस टिकून आहेत.
निसर्गनेमाने अर्ध्या पाऊण तास झाले तरी सगळे नामांकित लोक गोळा झाले नव्हते.
फावल्या वेळात बसल्या बसल्या नाना देवळासमोरचे छोटे छोटे गवत उपटू लागले. राजूमामाने निरर्थक प्रश्न विचारला, "काय करताय नाना?"
"मड्यावरच केस उपटल्यावर मड हलकं होते म्हणतात." बसल्याबसल्या नारदाचा वचपा काढला.
सगळे लोक जसे जमले असे दिसले की नानांनी सगळयांचे लक्ष वेधले.
"इकडे बघा, शिवा आमच्या शांत्याच्या विरोधात उभा राहील. विश्वास दाढीवाल्यांच्या दुसऱ्या उमेद्वाराविरोधात उभा राहील आणि लेडीजच सीट रहदाऱ्यांच्यातून देऊ. कोणाला द्याचे ते तेवढं नाव सुचवा. सरपंचपदाचा उमेदवार संग्रामभाऊ ठरवणार आहे." एका श्वासात ९०% मिटिंग उरकली होती. नानाच कामच धडाडीचं असतं.
आनंदा डाक्टर ने नाराजीने आक्षेप नोंदवला. गुरांचा डॉक्टर असला तरी माणसाच्या पण चार गोष्टी त्याला माहित होत्या.
"बोला डॉक्टर साहेब तुमचा काय आक्षेप आहे. सर्व संमतीनेच निर्णय घायचा आहे आपल्याला." नानांचा जोक फक्त मलाच समजला होता.
"तीन वेळा शिवा बापू पडला तरी त्याला परत तिकीट कोणत्या बेसिस वर दिले. दुसरे मोहन अण्णांकडे सप्त्याचा हिशोब असतो तरी विश्वासला कशासाठी तिकीट? आणि बाहेरून इकडे पोटं भरायला आलेल्या रहदाऱ्यांना तिकीट कशाला ?" डॉक्टरांनी मिळालेल्या काही सेकंड वेळेचा पुरेपूर फायदा उठवला.
"बरं मग असे करू, शिवाचं तर तिकीट फिक्स आहे कारण शांतारामला तोच टफ देऊ शकतो. बाकी दोन ठिकाणी तुम्हाला आणि तुमच्या मंडळीला तिकीट देऊ." नानांनी आपटी बार उडवला. डॉक्टर बळबळच फोन आला म्हणून जे सुसाट सुटला ते परत मंदिराकडे फिरकलंच नाही.
नानांनी लगेच शिवाबापूला टिळा लावला. पण त्याच्या डोळ्यात संशय साफ दिसत होता जो फक्त मलाच दिसला.
विश्वासला पुढे यायला बोलावले तसा तो अंगवेढे घेत बळ एकटुन म्हणाला अजून एक मिटिंग करू मग माझी उमेदवारी ठरवू.
त्याने काही केल्या टिळा काय लावून घेतला नाही.
मीटिंगची सांगता झाली. बाकी इच्छुक कपाळावर ओढलेला नाम पुसत माना खाली घालून "अक्षय ढाब्या"वर गेले. घरी कोणत्या तोंडाने जायचे याचे विचारमंथन करत बसले.
----
" नाना, मी काही उभा राहत नाही. पोरं नको म्हणत्यात. कशाला या वयात असलं थेरं." शिवाबापूने फोन करून नानांना आपली व्यथा सांगितली.
"पोरांना तू काढलेस, त्यांनी तुला नाही काढला. काय त्या गाबड्यांचं ऐकतोस! ", धोतार बीपी ची गोळी खाऊन पण तापलं होतं.
" नाना, तुम्हाला न पोरगा आहे ना बायको, म्हणून सुचतंय हे. म्हातारपण काढायचंय आम्हा नवरा बायकोला" बापूने पुन्हा दुकावली खपली काढली.
"अरे पण, आपल्या पॅनेलचे काय?" नानांचा बीपी जाग्यावर आला होता.
" बरोबर आहे पण पॅनल चालवायला पाहिल्यासारखे दिवस राहिले नाहीत आता. रग्गड पैसा लागतोय त्याला." बापूने व्यवहार समजावला.
" संग्राम भाऊ आहे की सगळा खर्च करायला." माउलींनी खुलासा केला.
" खर्च करेल तो पण लोक संग्रामच्या विरोधात बोलत आहेत. तो तर डुबेलच वरून आपल्याला घेऊन डुबेल. शेवटी तो फराटे आहे आणि फराटेंवर एवढा विश्वास कधी पासून बसू लागला तुमचा." कारण मीमांसा संपली होती.
नानांना कोणाला जास्त हाजीहाजी करायची सवय नव्हती. ठीक आहे म्हंटले. बघतो दुसरा कोण सापडतोय का ते आणि फोन ठेऊन दिला.
मग फोन करून विश्वासला बोलवून घेतले.
विश्वासने नानांना स्पष्ट सांगितले " मी आणि शांताराम त्या पॅनल मधून फॉर्म भरणार आहे. तसा शब्दच दिला आहे आम्ही त्यांना सोसायटीच्या इलेक्शन वेळेस.
सोसायटीचे इलेक्शन ८ मतांनी कसे हरलो याचे धागे मी मनातल्या मनात जुळवले.
----
क्रमश :

((सर्व हक्क लेखकाच्या स्वाधीन.. जागा, पात्रे, सर्व काल्पनिक.))

कथासमाज

प्रतिक्रिया

विलेक्सन रंगायला लागलं हाय. पुभाप्र.

संग्राम's picture

19 Oct 2017 - 1:49 am | संग्राम

+1

पगला गजोधर's picture

18 Oct 2017 - 4:50 pm | पगला गजोधर

मी आणि शांताराम त्या पॅनल मधून फॉर्म भरणार आहे. तसा शब्दच दिला आहे आम्ही त्यांना सोसायटीच्या इलेक्शन वेळेस.
सोसायटीचे इलेक्शन ८ मतांनी कसे हरलो याचे धागे मी मनातल्या मनात जुळवले.

आवडलं...
विशेषतः वरील दोन वाक्यातील 'रीड बिटवीन लाईन्स'....

शलभ's picture

18 Oct 2017 - 6:35 pm | शलभ

मस्त

jamesrao bondpatil's picture

19 Oct 2017 - 9:46 am | jamesrao bondpatil

मस्त...
पुभाप्र...