पुणे ते लेह (भाग 2 - पुणे ते शामलजी)

अभिजीत अवलिया's picture
अभिजीत अवलिया in भटकंती
17 Nov 2017 - 11:34 am

पुणे ते लेह (भाग १ - पूर्वतयारी)

२४ ऑगस्ट
तर रात्री ९ ला पुण्याहून (कोथरूड मधून) निघालो आणि लगेच चांदणी चौकातून बायपासवर गेलो. आजचे लक्ष होते फक्त १३५ किमीवर असलेले नवी मुंबईतील कोपरखैरणे. रस्त्याची मुंबईहून पुण्याकडे येणारी बाजू वाहनांनी खचाखच भरलेली होती. दुसऱ्या दिवशी गणेश चतुर्थी असल्यामुळे रस्त्यावर प्रचंड गर्दी अपेक्षितच होती. साडेनऊच्या सुमारास एक्सप्रेस वे वर पोचलो. माझा सर्वात आवडता रस्ता. पाऊस देखील नव्हता त्यामुळे ११ ते ११:१५ पर्यंत कोपरखैरणेला पोचू असा अंदाज होता. १० च्या दरम्यान लोणावळ्याजवळ अमृतांजन पुलाच्या थोडे अलीकडे पोचलो तर पुढे सगळ्या गाड्या थांबलेल्या. जवळपास १० मिनिटे झाली तरी गाड्या काही पुढे सरकेनात. काही लोक मग पुढे जाऊन काय झालेय ते बघून आले तर अमृतांजन पुलाजवळ भयानक अपघात झाला होता असे समजले. अर्धा तास थांबल्यावर शेवटी १०:३० ला रस्ता वाहतुकीस मोकळा झाला पण तरीही वाहतूक संथच होती. कारण रस्ता मोकळा होताच प्रत्येकाला पुढे जायची घाई झाली. त्यामुळे लोकांनी कशाही गाड्या घुसवायला सुरवात केली आणि मुंबईला जाणाऱ्या मार्गावर गाड्यांच्या ५-६ लेन तयार करून टाकल्या. जोडीला जोरदार पाऊस देखील सुरु झाला. हळू हळू पुढे जात असताना अपघात स्थळ दिसले. एक ट्रेलर आणि ४ कारचा अपघात झाला होता. खरोखरच भयानक अपघात झाला असणार. कारण ट्रेलरची चालकाची केबिन एका बाजूने पूर्ण चेपली होती. एका कारचा पूर्णपणे चेंदामेंदा होऊन गेला होता. इतकी चक्काचूर झालेली गाडी मी कधीच बघितली न्हवती. एक नॅनो मागच्या बाजूने निम्मी उध्वस्त झाली होती. अजून दोन गाडयांना थोडे नुकसान झाले होते. पुढे कुसगाव टोल नाका ओलांडताच गाडीने वेग पकडला आणि रात्री कोपर खैरणेला पोचलो तेव्हा रात्रीचे १२ वाजले होते.
##################################################################

२५ ऑगस्ट
आज लवकर निघून शक्य होईल तितके अंतर कापायचे असे ठरवले होते. काल रात्री झोपायला उशीर होऊन देखील पहाटे ५:३० ला जाग आली. सगळे आवरून ७:२० ला कोपर खैरणेतून गूगल मॅप्सने दाखवलेल्या रस्त्याने निघालो. अगोदर ऐरोली टोल नाका आणि त्यानंतर अवघ्या ५ मिनिटात मुलुंड टोल नाका ओलांडला. कदाचित गणेश चतुर्थीची सुट्टी असल्याने असेल पण रस्त्यावर अजिबात गर्दी न्हवती. घोडबंदर रोड मार्गे राष्ट्रीय महामार्ग - ८ वर गेलो. जोरदार पावसाला सुरवात झाली होती. वसई बायपास, वाडा, मनोर झपाट्याने मागे टाकले. ह्या सगळ्या भागात प्रचंड हिरवळ होती.

मुंबई-अहमदाबाद हा महामार्ग ६ पदरी आहे. पण हा रस्ता महाराष्ट्राच्या हद्दीत तितकासा चांगला नव्हता. त्याच्या जोडीला पूर्ण महामार्गावर खालील फोटोत दाखवल्याप्रमाणे महामार्गाच्या तिन्ही लेन अडवून हळूहळू जाणारे किंवा मोठमोठ्या मशिनरी घेऊन जाणारे अगणित ट्रक.

काय आहे बरं हे?

तुम्ही हॉर्न द्या नाहीतर अजून जे काही शक्य असेल ते करा. तुम्हाला साईड दिली जाणार नाही. हे दृश्य पुढे राजस्थान ओलांडेपर्यंत कायम होते. गुजरात मधील माणसे ट्रक सोडून दुसरे कोणतेही वाहन घेत नसावेत अशी शंका यावी इतके ट्रक. महाराष्ट्र गुजरातच्या सीमा जिथे संपतात/सुरु होतात तिथल्या चेकपोस्ट वर जितके ट्रक उभे होते तितके ट्रक मी तरी आयुष्यात एका ठिकाणी कधीच बघितले नव्हते. १०:४५ च्या दरम्याने एक ब्रेक घेऊन प्रवास पुढे सुरु केला. वापी, वलसाड, नवसारी झपाट्याने मागे टाकत पलसाना गाठले. पलसाना जवळ सुरतला फाटा लागतो. इथून सुरत अंदाजे २५ किमीवर आहे. 'अगोदर सुरतला जाऊ आणि मग पुढे जाऊ' अशी कल्पना बाजूच्या सीटवरून आली. 'आपण लडाखला कमीत कमी सामान घेऊन जाणे गरजेचे आहे. परतीच्या प्रवासात आपण इथूनच येणार आहोत त्यामुळे खरेदी वगैरे येताना पाहू.' असे सांगून मी चाणाक्षपणे बेत हाणून पाडला.

३:१५ च्या दरम्याने वडोदरा आले.
वडोदराचा बायपास

वडोदराला बायपास वरूनच बाय बाय केले आणि वडोदरा-हलोल-गोध्रा ह्या गुजरात राज्य महामार्गाने प्रवास सुरु केला. रस्त्याचा दर्जा चांगला होता. फक्त रस्त्यावर जिथे जिथे मोठी मोठी गावे आहेत तिथे अतिक्रमण, बेशिस्त पार्किंग ह्यामुळे थोडी चिडचिड झाली. ह्या पूर्ण रस्त्यावर खाजगी (पांढरी नंबर प्लेट असलेल्या) कारला टोल द्यावा लागत नाही. आम्हाला गोध्राला बायपास करून पुढे लुनावडाला जायचे होते. पण आम्ही चुकून गोध्रा मध्ये शहरात शिरलो. त्यामुळे तिथे थोडा वेळ वाया गेला. रस्त्याच्या बाजूने हिरवीगार शेते, स्वच्छ नद्या दिसू लागल्या. असेच एका ठिकाणी थांबून थोडा टाईमपास केला. खालील फोटोत दिसणाऱ्या शेतांमध्ये ३-४ मोर बागडताना दिसले.

हिरवेगार शेत

संध्याकाळ झाली होती तरी अजूनही गणपतीच्या मूर्ती उंटाच्या रथामधून वाजत गाजत नेल्या जात होत्या.

संध्याकाळ

आता मुक्काम कुठे करायचा ह्याची चर्चा सुरु झाली. उदयपूर का शामलजी चर्चा होऊन अगोदर उदयपूर ठरले पण परत निर्णय फिरवून शेवटी शामलजीच फायनल केले. शामलजी मध्ये लॉज शोधण्यासाठी बस स्थानकाजवळील एका टपरीवर चौकशी केली. शामलजी मधल्या कृष्ण मंदिराची स्वत:ची व्यवस्था आहे किंवा इथे बाजूबाजूला दोन लॉज आहेत असे टपरीचालकाने सांगितले. अगोदर मंदिर पाहू मग लॉज वर जाऊ असे ठरवून मंदिरात गेलो. पण अंधार झाला असल्याने ते बाहेरून नीट बघता आले नाही. त्यामुळे उद्या सकाळी प्रकाशात पाहू असे ठरवून मंगलमूर्ती नामक लॉज गाठला. लॉजकडे पाहून आज आपल्याला निश्चित भूत दिसेल असे वाटू लागले. पण परत दुसऱ्या लॉजवर जाऊन तिथली रूम चेक करण्याची ताकद अंगात न्हवती. म्हणून मंगलमूर्तीवरच सामान टाकले. १००० रु.त A C रूम मिळाली. जेवण चवदार बनवले होते लॉजच्या कुकने. चपाती मात्र बिनमिठाची होती. दुपारी भरूच जवळ जेवण केले होते तिथे सुद्धा चपाती बिनमिठाची होती. इथल्या चपात्यांमध्ये मीठ घालत नसावेत बहुतेक. जवळपास ६४० किमी प्रवास करून आजचा दिवस संपला. एका दिवसात ६०० किमी पेक्षा जास्त गाडी चालवण्याचा हा माझा पहिलाच प्रसंग होता. ह्यापूर्वी पुणे ते गावी (कणकवली) असे ३५० किमी वगैरे गेलो होतो. पण एका दिवसात ६०० किमी जाण्याची कधी वेळच आली न्हवती. आता उद्याचे लक्ष होते राजस्थान मधले चांदवाजी.

प्रतिक्रिया

श्रीधर's picture

17 Nov 2017 - 11:45 am | श्रीधर

सुंदर वर्णन आणि फोटो

तपशीलवार वर्णन आणि सुंदर छायाचित्रे यांनी मजा आणली....

तुमची गाडी कोणती होती हे कळले नाही पण..

अभिजीत अवलिया's picture

17 Nov 2017 - 1:56 pm | अभिजीत अवलिया

फोर्ड फिगो डिझेल.

खेडूत's picture

17 Nov 2017 - 2:25 pm | खेडूत

छान.
राज्याची हद्द बदलली की रस्ते खराब होतात असं व्हायला नको राष्ट्रीय महामार्गावर तरी..!

एस's picture

17 Nov 2017 - 2:35 pm | एस

वाचतोय.

दुर्गविहारी's picture

17 Nov 2017 - 7:02 pm | दुर्गविहारी

मस्तच !!! लवकर टाका पुढचा भाग.

प्रविन ९'s picture

17 Nov 2017 - 7:16 pm | प्रविन ९

छान प्रवास सुरू आहे.....

अजया's picture

18 Nov 2017 - 10:03 am | अजया

वाचतेय.

स्वाती दिनेश's picture

18 Nov 2017 - 7:33 pm | स्वाती दिनेश

वाचते आहे.
वर्णन आणि फोटो दोन्ही छान..
स्वाती

सुबोध खरे's picture

18 Nov 2017 - 8:36 pm | सुबोध खरे

वाचतोय.
वि सू -- ६४० किमी प्रवास खूप जास्त होतो एका दिवसात विशेषतः कुटुंबासहित. विशेषतः संध्याकाली आणि त्यातून एकच चालक असेल तर चालक मानसिक दृष्ट्या थकून जातो त्यामुळे त्याला मुक्कामाला पोहोचण्याची घाई असते . अशा वेळेस विशेषतः संध्याकाळी जेंव्हा रस्त्यावर रहदारी आणि माणसे जास्त असतात तेंव्हा अपघात होण्याची शक्यता वाढते.
ज्याना लांबचा पल्ला गाठायचा असतो त्यांनी याची काळजी घ्यावी.

टवाळ कार्टा's picture

19 Nov 2017 - 11:00 am | टवाळ कार्टा

+१११११
नुकतेच २-३ वेळा एका दिवसात ५०० किमी ड्राइविंग केलेले तेव्हा हेच वाटलेले....एका दिवसात ३०० किमी केले तर आरामात रमत गमत जाता येते

अभिजीत अवलिया's picture

19 Nov 2017 - 11:09 am | अभिजीत अवलिया

सहमत आहे. मानसिक थकव्यामुळेच मी उदयपूर कॅन्सल करून शामलजी मध्ये मुक्काम करण्याचा निर्णय घेतला. तरी देखील एका दिवसात ६४० किमी जास्त होतात ह्याबद्दल सहमत.

कपिलमुनी's picture

18 Nov 2017 - 9:48 pm | कपिलमुनी

गाडीमध्ये काही मोडीफिकेशन करावे लागले का ?

अभिजीत अवलिया's picture

19 Nov 2017 - 11:10 am | अभिजीत अवलिया

नाही. फोर्ड फिगोचा ग्राउंड क्लिअरन्स कमी असल्याने मी तो बाह्य स्पेसर सारखे किट वापरून वाढवावे ह्या विचारात होतो. पण 'असा कोणताही बदल करू नका. ते खूप धोकादायक ठरू शकते' असे मला सर्व्हिस सेन्टरने सांगितले. त्यामुळे मी काहीच बदल केला नाही.

अन्य सर्व वाचकांचे देखील आभार.

केडी's picture

20 Nov 2017 - 10:35 am | केडी

.... वाचतोय...

अभिदेश's picture

28 Nov 2017 - 3:01 am | अभिदेश

भरूच कसे क्रॉस केलं ? गोल्डन ब्रीजने कि महामार्गाने? आता ट्राफिक जॅम नसतो का ?

अभिजीत अवलिया's picture

28 Nov 2017 - 7:53 am | अभिजीत अवलिया

महामार्गाने केले क्राॅॅस. ट्राफिक जॅम नव्हता.

प्रचेतस's picture

28 Nov 2017 - 8:36 am | प्रचेतस

छान लिहिताय.

मराठी कथालेखक's picture

5 Dec 2017 - 6:03 pm | मराठी कथालेखक

१) एका दिवसात ६४० किमी म्हणजे खूप स्टॅमिना.. मस्तच.. मला ३०० च्या वर नको वाटतात.. डोकं सुन्न होतं
२) त्या दिवशी सर्वसाधारणपणे वेग किती ठेवला होतात ? जास्तीत जास्त किती वेगाने चालवली ? घाटांत साधारणतः वेग किती ठेवलात ?
३)डोळयांना उन्हाचा त्रास होवू नये म्हणून गॉगल लावला होता का ? मला डांबरी रस्त्यावरुन चमकणार्‍या उन्हामुळे डोळे दुखण्याचा त्रास होतो. चष्मा फोटोक्रोमॅटिक असला तरी गाडीत बसल्यावर तो फारसा काळा होत नाही. चष्म्यामुळे गॉगल लावता येत नाही.
४) दुपारच्या जेवणाचा ब्रेक कुठे घेतला ? एकूणात किती ब्रेक्स घेतले आणि किती वेळ (अंदाजे) ड्रायविंग केलंत ?
५)

काय आहे बरं हे?

- नक्की सांगता येणार नाही पण थर्मॅक्सच्या चिलरची (vapour absorption जे chiller air coditioning ) आठवण झाली. ते निळ्या रंगात होते का ? अर्थात थर्मॅक्स बहूधा असं उघडेबंब पाठवणार नाही म्हणा :)
६) मलातरी बिनमिठाची चपाती / भाकरी /तंदूरी रोटी नेहमीच आवडते. घरी देखील माझी पसंती बिनमिठाच्या चपाती/भाकरीला असते.

मराठी कथालेखक's picture

5 Dec 2017 - 6:04 pm | मराठी कथालेखक

vapour absorption chiller जे air coditioning साठी वापरतात

अभिजीत अवलिया's picture

5 Dec 2017 - 10:06 pm | अभिजीत अवलिया

२) त्या दिवशी सर्वसाधारणपणे वेग किती ठेवला होतात ? जास्तीत जास्त किती वेगाने चालवली ? घाटांत साधारणतः वेग किती ठेवलात ?

अॅॅव्हरेज ६५ असेल. जास्तीत जास्त ९०. घाटात ५०-६० असेल.

डोळयांना उन्हाचा त्रास होवू नये म्हणून गॉगल लावला होता का ?

हो. मला पण पूर्वी उन्हाचा खूप त्रास व्हायचा. जास्त करुन दुपारच्या वेळी. गाॅॅगल घालायला सुरवात केल्यापासून काहीच त्रास नाही.

दुपारच्या जेवणाचा ब्रेक कुठे घेतला ? एकूणात किती ब्रेक्स घेतले आणि किती वेळ (अंदाजे) ड्रायविंग केलंत ?

भरुचजवळ.
अंंदाजे १२ त्रास प्रवास. त्यातील १० तास ड्रायव्हिंंग व दर २ तासाने एक असे एकूण ५ ब्रेक असतील.