सफर ग्रीसची: भाग १ - प्रस्तावना आणि केप सूनिअन

निशाचर's picture
निशाचर in भटकंती
21 May 2016 - 3:19 am

स्वातंत्र्य किंवा मरण! जगाला लोकशाही, पाश्चिमात्य साहित्य आणि तत्त्वज्ञान देणा-या ग्रीसला साजेसं हे ब्रीदवाक्य! ग्रीस म्हटलं कि आठवतं ते अथेन्सचं अक्रोपोलिस, एजिअन समुद्राचं निळाशार पाणी आणि सान्टोरिनीची निळीपांढरी घरं. ग्रीसला भेट देण्याची आणि विशेषतः तेथील पुरावशेष बघण्याची आम्हा उभयतांची खूप दिवसांपासून इच्छा होती. डिसेंबर २०१५ मध्ये केलेल्या ग्रीसच्या भटकंतीबद्दल लिहिण्याचा हा प्रयत्न आहे.

प्रवासाचे नियोजन

अथेन्स विमानतळावर २१ डिसेंबरला दुपारी आगमन आणि तिथूनच ३० डिसेंबरला संध्याकाळी प्रस्थान ठरले. ग्रीसला प्रथमच जाणा-या इतर अनेक पर्यटकांप्रमाणे आमचाही अथेन्सला अग्रक्रम होता. त्याशिवाय डेल्फी, मेटेओरा, ऑलिंपिया, स्पार्टा आणि जमल्यास सान्टोरिनी सारखी बेटं अशी wishlist बरीच मोठी होती. हाती असलेल्या आठ पूर्ण आणि दोन अर्ध्या दिवसांत कुठेकुठे आणि कसं जायचं, याचं नियोजन सुरू झालं. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अथेन्समध्ये चांगली असली तरी देशाच्या अंतर्गत भागात सुधारणेला पुष्कळ वाव आहे. मग अथेन्स सोडून बाकी प्रवासासाठी गाडी भाड्याने घ्यायचे ठरविले. डिसेंबर महिन्यात उष्म्याचा त्रास नसेल आणि पर्यटक कमी व पर्यायाने हॉटेल्स स्वस्त असतील, असा अंदाज होता. अर्थात मधेच २५, २६ तारखांना सुट्टीमुळे बहुतेक पर्यटनस्थळे बंद असायची शक्यता होती.

या सगळ्या दृष्टीने इंटरनेटवर माहिती गोळा करायला लागल्यावर लक्षात आले कि डिसेंबरमधे जाण्यासाठी दक्षिण ग्रीसचा पेलोपोनिझं (Peloponnese) प्रांत योग्य आहे. २५, २६ ला म्युझिअम्स वगैरे बंद होती. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे सूर्याची कृपा असलेल्या ग्रीसमध्ये (जुन्या ग्रीकमध्ये ग्रीसला 'Hellas' अर्थात 'सूर्याची कृपा असलेला' म्हणतात.) सांस्कृतिक अखत्यारीतील बहुतेक पुरातन स्थळे हिवाळ्यात दुपारी ३ वाजेपर्यंतच खुली होती! (त्याशिवाय सरकारी कर्मचारी अचानक संपावर जाऊ शकतात, हे वाचलं होतं; पण त्याचा फटका बसेल, असं वाटलं नव्हतं.)

ठिकाणांमधील अंतरं आणि दुपारी ३ ची डेडलाईन या अडथळ्यांच्या शर्यतीत आमचे 'कालामाटाहून सकाळी निघून मीस्ट्रास आणि स्पार्टा एका दिवसात बघू' असे इमले ढासळू लागले. शेवटी अथेन्स, डेल्फी आणि पेलोपोनिझं प्रांतातील कोरिन्थ व आर्गोलिस हा विभाग (नाफ्प्लिओ व जवळपासची स्थळं) बघायचं ठरवलं. पेलोपोनिझं (Peloponnese) हा दक्षिणकडील प्रांत (एक बोट नसलेल्या) हाताच्या पंजाच्या आकाराचा असून कोरिंथचा कालवा त्याला ग्रीक मुख्यभूमीपासून वेगळा करतो.

प्रवासाची रूपरेषा

२१ डिसेंबर: दुपारी अथेन्स (Athens) आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन - गाडी भाड्याने घेणे - केप सूनिअन (Cape Sounion) - कोरिंथ (Corinth)
२२ डिसेंबर: कोरिंथ - मिकेने (Mycenae) - नाफ्प्लिओ (Nafplio)
२३ डिसेंबर ते २५ डिसेंबर: नाफ्प्लिओ स्थलदर्शन आणि एपिडाउरोस (Epidaurus)
२६ डिसेंबर: नाफ्प्लिओ - कोरिंथ कालवा - अथेन्स विमानतळ - गाडी परत करणे - अथेन्स शहर
२७ डिसेंबर ते ३० डिसेंबर ची दुपार: अथेन्स स्थलदर्शन आणि एक दिवसाची डेल्फी सहल
३० डिसेंबर: संध्याकाळी अथेन्स आंतरराष्ट्रीय विमानतळाहून प्रस्थान

दिवस पहिला: आगमन आणि केप सूनिअन

अथेन्सला विमान पोहोचायला तासभर उशिर झाला. जेवणासाठी फारसे पर्याय दिसत नव्हते. मग सँड्विच खाऊन घेतलं आणि थोडा आराम केला. कॅफेमध्ये संत्र्याच्या चवीचा रवा केक होता. तो खाऊन कडक ग्रीक कॉफी पिऊन मस्त तरतरी आली. भाड्याची गाडी एका स्थानिक एजंसीकडे जालावरून आरक्षित केली होती. तिथे कागदपत्र बनवून किल्ली घेतली. विमानतळाहून बाहेर पडायचा योग्य रस्ताही विचारला. गाडी पार्किंगमध्ये शोधून तिची अवस्था तपासून निघालो एकदाचे अथेन्सहून! साधारण ५० किलोमीटरचा प्रवास करून आम्हाला सूर्यास्ताच्या शक्य तितक्या आधी केप सूनिअनला पोहोचायचं होतं.

केप सूनिअनवरून संध्याकाळी दिसणारा नजारा

विमानतळाचा परिसर मागे पडल्यावर डोंगराळ भाग सुरू झाला. अधूनमधून छोटीमोठी गावं लागत होती. रस्त्यावर बहुतेक पाट्या ग्रीकमध्ये होत्या. नेविगेटरवर भरोसा ठेवून चाललो होतो. पण सूनिअनची कुठे निशाणी दिसेना. मग शाळाकॉलेजात वापरलेली ग्रीक α, β, γ आठवून आठवून गावांची नावं वाचायचा प्रयत्न सुरू केला. तेव्हा गंमत वाटत होती, पण सहलीत नंतर याचा खूप उपयोग झाला. पण पुढच्या एकदोन दिवसांत आपल्याला ग्रीक शब्द कळत नसले तरी थोडेफार वाचता येत आहेत, असा फाजील आत्मविश्वास वाटायला लागला की बरोब्बर एखाद्या शब्दात ग्रीक Ρ किंवा ρ येऊन दांडी गूल करायचा! तो ग्रीक -हो म्हणजे 'र' आहे, इंग्रजी 'पी' नाही, हे कळत असूनही वळायचं नाही.

थोड्या वेळाने रस्त्याच्या डाव्या हाताला समुद्राचं अस्तित्व जाणवायला लागलं. एका गावी छोटं बंदर दिसत होतं, हिवाळ्यामुळे फारशी हालचाल नसावी. काही मिनिटं रस्ता उन्हात चमकणा-या पाण्याशेजारून गेला.

साडेचार वाजता केप सूनिअनला पोहोचलो. प्रवेशाचं तिकिट काढतानाच ताकीद मिळाली कि सव्वापाचला परिसर बंद होतो. केप सूनिअन हे समुद्रात शिरलेलं भूशिर असून अट्टिका द्वीपकल्पाचं (Attica peninsula) दक्षिण टोक आहे. तीन बाजूंना एजिअन समुद्र (Aegean Sea) असलेल्या टेकडीवर ग्रीक मिथकांमधील समुद्रदेव पोसायडनच्या (Poseidon) देवळाचे अवशेष आहेत. हे संगमरवरी देऊळ ख्रिस्तपूर्व ४४० च्या दरम्यान त्याही आधीच्या देवळाच्या जागी बांधले गेले.

सूर्य अस्ताला जायची वेळ जवळ येऊ लागली तसं देऊळही सोनेरीपिवळ्या प्रकाशात न्हाऊन निघालं.

ग्रीक मिथकांतील हा समुद्राचा देव त्याच्या हातातील त्रिशूळाने समुद्रात वादळे निर्माण करतो. पोसायडनची कृपा होण्यासाठी नाविक इथे प्रार्थना करत. पोसायडनला शांत करण्यासाठी प्राण्यांचे बळी देत असत. आता देवळाच्या कोलोनेडचे काही खांबच शिल्लक आहेत. परंतु पूर्वी बाहेरच्या बाजूने डोरिक पद्धतीचे खांब आणि आत गर्भगृह (Naos) अशी रचना होती. गर्भगृहात बहुधा ब्राँझचा पोसायडनचा पुतळा असावा.

इथून एजिअन समुद्रात होणारा सूर्यास्त आणि संधिप्रकाशात उजळून निघणारे अवशेष बघण्यासाठी अथेन्सहून खूप पर्यटक येतात.

मंदिराच्या पायाच्या दगडांवर आधुनिक मानवाचंही कोरिवकाम दिसलं. इंग्रज कवी लॉर्ड बायरनचं नाव इथे कोरलेलं आहे, असं वाचलं होतं. ते मात्र कुठे दिसलं नाही.

एक ग्रीक मिथक म्हणतं कि अथेन्सचा राजा एजिअसचा (Aegeus) मुलगा थेसेअस (Theseus) हा मिनोटाउरस (Minotaur) या दैत्याचा वध करायला क्रिटी बेटावर गेला असताना एजिअस हा केप सूनिअन येथे त्याची वाट पाहत होता. विजयी होऊन परत येताना थेसेअस विजयाचे चिह्न असलेले बोटीला पांढरे शीड लावायला विसरला. परत येणा-या बोटीचं काळं शीड पाहून पुत्रशोकाने एजिअसने केप सूनिअन येथे समुद्रात उडी मारून मरण पत्करले. तेव्हापासून ह्या समुद्राला एजिअन समुद्र हे नाव पडले.

समोरचं दृश्य डोळ्यात भरून घ्यायचा प्रयत्न करत होतो. आजूबाजूलाही कुणीच बोलत नव्हतं. जणू आम्हाला सगळ्यांना त्या प्रकाशाने आणि पाण्यावरच्या मंद लाटांनी भारलं होतं. पण कातरवेळी वाटणारी हूरहूर नव्हती. सूर्य अस्ताला गेला होता; पण चंद्र त्याचा शीतल प्रकाश घेऊन आला होता!

(क्रमशः)

प्रतिक्रिया

नेत्रेश's picture

21 May 2016 - 4:50 am | नेत्रेश

पुढील भागाच्या प्रतिक्षेत

प्रचेतस's picture

21 May 2016 - 6:49 am | प्रचेतस

फोटो लै म्हणजे लैच भारी.
लिहिलंय पण छान.

रुस्तम's picture

21 May 2016 - 6:57 am | रुस्तम

पु भा प्र

अजया's picture

21 May 2016 - 12:03 pm | अजया

अरे वा ग्रीस का! ग्रीस केव्हापासून माझ्या सफरींच्या लिस्टीत आहे! त्यातच हा धागा आला.
फोटो मस्त.
पुभाप्र

डॉ सुहास म्हात्रे's picture

22 May 2016 - 6:55 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर लेखन आणि फोटो !

राजेंद्र मेहेंदळे's picture

23 May 2016 - 5:59 pm | राजेंद्र मेहेंदळे

वा!!मिपावर अजुन एक सफर सुरु झाली. पु.भा.प्र.

निशाचर's picture

24 May 2016 - 3:00 am | निशाचर

प्रतिसादांसाठी सगळ्यांचे आभार!
@अजया, ग्रीस माझ्याही यादीत बरीच वर्षं होता. खूप छोटा भाग बघून झालाय. अर्थात सफरींची यादी मोठी असण्यातही मजा असते.
@डॉ सुहास म्हात्रे, मला तुमच्या फोटो टाकायच्या धाग्याचा उपयोग झाला, त्यासाठीही धन्यवाद!

DeepakMali's picture

25 Jun 2016 - 11:34 pm | DeepakMali
DeepakMali's picture

25 Jun 2016 - 11:35 pm | DeepakMali
प्रीत-मोहर's picture

2 Jun 2017 - 8:02 pm | प्रीत-मोहर

__/\__

गौरी देशपांडे मुळे मला ग्रीस चे वेड लागले. आणि आता तर पार वेडावले आहे. अफाट छायाचित्रे आहेत!!!

निशाचर's picture

3 Jun 2017 - 2:50 am | निशाचर

DeepakMali आणि प्रीत-मोहर, प्रतिसादांसाठी धन्यवाद!
केप सूनिअनचा सूर्यास्त खासच होता.

अत्रे's picture

20 Jul 2017 - 8:11 am | अत्रे

छान. वाचत आहे.

काही प्रॅक्टिकल प्रश्न -

१. ट्रिपचा खर्च किती आला हे वर्गीकरण करून सांगता येईल का -

* व्हिसा
* विमान प्रवास
* तिथले लोकल ट्रान्सपोर्ट
* हॉटेल रहाणे
* खाणे
* म्युझिअमच्या एंट्री फिया

२. साधारण किती लोकल करन्सी सोबत नेली? इथले एटीएम कार्ड तिथे वापरताना काही अडचण आली का?

3. तुम्ही शाकाहारी आहेत का, असाल तर तिथे खाताना काही अडचण झाली का?

4. तिथले कोणते खाद्यपदार्थ आवडले?

निशाचर's picture

20 Jul 2017 - 9:15 am | निशाचर

युरोपातील शेंगेन करारात सहभागी देशांचा मिळून शेंगेन (Schengen) विजा आहे. यात ग्रीससह अनेक देश येतात. मी शेंगेन मध्ये राहत असल्याने मला ग्रीसला जायला विजा काढावा लागला नाही. पर्यटकांसाठी वेगळा शेंगेन विजा असतो. ग्रीसबरोबर शेंगेनमधील इतर देशांतही (जसे इटली, जर्मनी, ऑस्ट्रिया, फ्रांस) फिरायचे असल्यास एकाच विजाने काम होते. अर्थात पर्यटकाच्या नागरिकत्वाप्रमाणे नियम बदलतात. (उ.दा. अमेरिकन नागरिकांसाठी भारतीयांपेक्षा वेगळे नियम आहेत.) ही शेंगेनची ढोबळ माहिती झाली. आंतरजालावर अधिक माहिती मिळू शकेल. परंतु ज्या देशात जायचे त्या देशाच्या वकिलातीकडून (किंवा तिच्या साईटवरून) अधिकृत माहिती मिळविणे उत्तम!

मी युरोपियन युनिअनच्या अंतर्गत प्रवास केल्याने भारतातून ग्रीसला जायचा विमानप्रवास, तसेच स्थानिक चलन (युरो) किती न्यायचं किंवा एटिएम कार्ड वापर याबद्दल विशेष सांगू शकणार नाही. मी इथल्या एटिएम आणि क्रेडिट कार्डांचा वापर केला; त्यांचे दर आणि नियम भारतीय कार्डांपेक्षा वेगळे असावेत. अश्या बर्‍याच गोष्टींची माहिती तुम्हाला Tripadvisor सारख्या फोरमवर किंवा मिपावरील युरोपात भटकंती केलेल्या इतर सदस्यांकडून मिळू शकेल.

शाकाहारी नसल्याने काहीही अडचण आली नाही. शाकाहार आणि बाकी प्रश्नांची उत्तरे लगेच देता येणार नाहीत. थोडी शोधाशोध करावी लागेल. पण सवड मिळाली की नक्की देईन.

निशाचर's picture

30 Jul 2017 - 5:49 am | निशाचर

हॉटेल्स: एका डबल रूमचा सकाळच्या न्याहारीसह खर्च युरोत
कोरिंथ (साधं b&b): €५०
नाफ्प्लिओ (बुटिक हॉटेल): €६२.९०
अथेन्स (मोठं हॉटेल, उत्तम दर्जा व न्याहारी): €९९. हे हॉटेल ओमोनिया चौकापाशी (फिरायला मध्यवर्ती) होतं. तिथून पाच मिनिटांवर भारतीय उपखंडातील लोकांची दुकाने, उपहारगृहे आहेत; घेट्टोही म्हणता येईल. आम्हाला वाईट अनुभव आला नाही, पण हा भाग बर्‍याच लोकांना असुरक्षित वाटतो. अथेन्समधे हॉटेल्स महाग आहेत आणि दर्जाही सुमार असू शकतो. त्यामुळे ऑनलाईन रिव्यूज वाचणे आवश्यक.

हिवाळा हा लो सीझन आहे, इतर वेळी दर जास्त असू शकतात.

पर्यटनस्थळांचे प्रवेशदर
माणशी €४ ते €१२ असे वेगवेगळे दर होते. यात बर्‍याच ठिकाणी साईट आणि तिथलं संग्रहालय मिळून एक दर होता.

वाहतूक
भाड्याच्या गाडीचे ५ दिवसांचे €१३५ अधिक इंधनाचा खर्च. अथेन्स-ट्रिपोली महामार्ग नवीन असून टोल आहे.
अथेन्समधे पब्लिक ट्रान्स्पोर्ट (मुख्यत्वे मेट्रो)आणि एअरपोर्ट बस वापरली. तिकिटांचे बरेच प्रकार आहेत. डेल्फीला जायला बस आहे. (KTEL ही ग्रीसची बस कंपनी आहे.) परतीचं तिकिट माणशी साधारण ३२ युरो होतं.

खाद्यपदार्थ
ग्रीक खाण्याबद्दल चार ओळीत लिहिणं कठिण आहे. पण शाकाहारात फेटा चीझ घातलेलं सॅलड, वांगं किंवा झुकिनीची भजी, भाताचं मिश्रण भरलेली द्राक्षाची पानं, घट्ट दही किंवा चीझ वापरून केलेली डिप्स असं बरंच काही आहे. शिवाय टोमॅटो किंवा भाज्या घालून भात, कडधान्याचे स्ट्यू, बटाट्याचे काप, वांग्याचं भरितही बनवितात.

मांसाहारातही सुव्लाकी, मीट बॉल्स, ग्रिल्ड मासे, स्ट्यू असे प्रकार आहे. गोमांस एकंदर कमी खातात.

मध आणि अक्रोड घालून घट्ट दही, रव्याचा केक, संत्र्याचा केक, नानकटाईसारखी बिस्किटं हे गोड पदार्थ झाले.