सफर ग्रीसची: भाग ८ - बुर्ट्झी आणि नाफ्प्लिओ प्रोमंनाड

निशाचर's picture
निशाचर in भटकंती
5 Jan 2017 - 6:47 am

भाग १ - प्रस्तावना आणि केप सूनिअन
भाग २ - प्राचीन कोरिंथ
भाग ३ - अगामेम्नॉनच्या राज्यात
भाग ४ - नाफ्प्लिओचे पुराणवस्तूसंग्रहालय आणि एपिडाउरोस
भाग ५ - पालामिडी किल्ला
भाग ६ - असिनीचे अवशेष आणि टोलो
भाग ७ - आर्गोसचे अक्रोपोलिस

लारिस्सा किल्ला बघून नाफ्प्लिओला परत आल्यावर बंदरावरील एका कॅफेत बसून थोडा आराम केला. दोनतीन दिवसांच्या सुट्टीसाठी अथेन्सहून मोठ्या प्रमाणात ग्रीक पर्यटक नाफ्प्लिओला येतात. आजूबाजूला सगळी मोठमोठी कुटुंबं दिसत होती. त्यांचं निरीक्षण करण्यात आणि त्यांची आपापसातील नाती ओळखण्यात आमचा मस्त वेळ गेला.
 नाफ्प्लिओ वॉटरफ्रंट

बुर्ट्झी बेटावर सोडणाऱ्या बोटीच्या फेऱ्या सुरू होत्या. बेटापर्यंत जाऊन परत यायला दहा मिनिटं लागतात आणि बेटावरची छोटी गढी बघायला वीसएक मिनिटं वेळ दिला जातो. प्रत्येकी चार युरो देऊन आम्हीही पुढच्या बोटीत बसलो.

बुर्ट्झी (Bourtzi )
बुर्ट्झी हा बुरूज शब्दाचा एक अवतार. नाफ्प्लिओ बंदराच्या रक्षणासाठी १४७३ साली व्हेनिशिअन्सनी बंदराच्या जवळील छोट्या बेटावर गढी बांधली. नंतरच्या काळात आणखी बांधकामे झाली. या गढीचा वापर काही काळासाठी तुरुंग म्हणूनही करण्यात आला. एकोणिसाव्या शतकात पालामिडी किल्ल्यातील तुरुंगात देहदंड देण्याचं काम करणाऱ्याना शहरात राहता येत नसे, ते बुर्ट्झी बेटावर राहत.


 गढीचा मुख्य दरवाजा

नाफ्प्लिओ प्रोमंनाड
नाफ्प्लिओच्या वॉटरफ्रंटपासून पालामिडीच्या पायथ्याशी असलेल्या बीचपर्यंत समुद्रालगत एक दगडी पदपथ जातो. जॉगर्स असोत की रमतगमत जाणारे आमच्यासारखे पर्यटक, सगळ्यांना हा सुंदर रस्ता भुरळ घालतो. त्याची सूर्यास्ताला घेतलेली काही प्रकाशचित्रे:



परतीच्या मार्गावरः

अथेन्सला जाताना: कोरिंथ कालवा
नाफ्प्लिओचा निरोप घेण्याची वेळ आली होती. नाफ्प्लिओ सोडून जाण्याची इच्छा नव्हती, पण अथेन्स बोलावत होतं.
२६ डिसेम्बरला सकाळी नाफ्प्लिओहून निघून अथेन्सला जाताना वाटेत कोरिंथच्या कालव्यापाशी थांबलो. कोरिंथच्या आखाताला एजियन समुद्राशी जोडणारा हा जगप्रसिद्ध कालवा काढण्याचे अनेक प्रयत्न प्राचीन काळातही झाले होते. अखेर ग्रीस स्वतंत्र झाल्यावर कालवा बांधायचा विचार मूळ धरू लागला. इ.स. १८८२ ते १८९३ अशी अकरा वर्षे कालव्याचे काम चालले. आता या कालव्याचा उपयोग फक्त पर्यटनासाठी होतो.


इतके दिवस सांगाती असलेला हा महामार्ग आम्हाला अथेन्सला नेवून सोडणार होता...

(क्रमशः)

प्रतिक्रिया

निशाचर's picture

5 Jan 2017 - 6:59 am | निशाचर

डिसेंबरमधे टाकलेला हा भाग सर्वर डाउन झाल्यामुळे उडाला होता, तो पुन्हा टाकला आहे. या भागावर आधी आलेल्या प्रतिक्रियांसाठी आभार आणि नवीन प्रतिसादांचे स्वागत आहे.

प्रचेतस यांनी कालव्याबद्दल विचारलं होतं. कोरिंथ कालवा अरुंद असल्याने औद्योगिक वाहतुकीसाठी वापरला जात नाही. परंतु पर्यटकांसाठी नौकानयन, बंजी जंपिंग वगैरे सोयी आहेत.

सूड's picture

14 Jun 2017 - 6:56 pm | सूड

सुंदर, पुभाप्र.

निशाचर's picture

15 Jun 2017 - 6:25 pm | निशाचर

पुढचा भाग इथे आहे.

सप्तरंगी's picture

15 Jun 2017 - 8:03 pm | सप्तरंगी

सगळे भाग वाचले नाहीत पण ८ दिवसात काही ग्रीक islands कव्हर करता आले का? अप्रतिम आहेत काही.

अर्थातच ग्रीस बेटांसाठीही प्रसिद्ध आहे. पण बेटांपेक्षा प्राचीन संस्कृती आणि वास्तू बघण्यात जास्त रस असल्याने दोनदा ग्रीसला जाऊनही अजून कुठल्याच बेटांवर जाणं झालेलं नाही. शिवाय अप्रसिद्ध जागा किंवा समुद्रकिनारेही तितकेच सुंदर असू शकतात. त्यामुळे पर्यटकांची गर्दी असलेल्या जागा टाळून वेगळी ठिकाणं शोधायला जास्त आवडतं.

मात्र Island hopping कधीतरी नक्की करणार.