सफर ग्रीसची: भाग ४ - नाफ्प्लिओचे पुराणवस्तूसंग्रहालय आणि एपिडाउरोस

निशाचर's picture
निशाचर in भटकंती
12 Sep 2016 - 4:55 am

भाग १ - प्रस्तावना आणि केप सूनिअन
भाग २ - प्राचीन कोरिंथ
भाग ३ - अगामेम्नॉनच्या राज्यात

युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांच्या यादीत असलेल्या मायसिनीतून पाय निघत नव्हता. पण ३ वाजून गेल्यावर तिथल्या रखवालदारांनी हाकलण्याआधी निघालो. बाहेर मस्त उन पडलं होतं. निळंशार आकाश आणि समोर ऑलिवच्या झाडांना घेवून उभे असलेले डोंगर! आणखी दोनतीन तास सहज उजेड असणार होता. ३ वाजता साइट बंद करण्याच्या आळशीपणाला नावं ठेवत बाहेर सावलीत गप्पा मारत बसलो. तिथे काम करणार्‍यांच्या गाड्या एकेक करून निघू लागल्या. आम्हाला तिथे बघून एकदोघांनी चौकशी केली. मग त्यांच्यामागोमाग आम्हीही नाफ्प्लिओच्या दिशेने निघालो.

पुढचे चार दिवस नाफ्प्लिओला (Nafplio) मुक्काम होता. ग्रीसमधील सगळ्यात सुंदर आणि रोमँटिक शहरांमध्ये हे शहर गणलं जातं. त्याशिवाय ग्रीसच्या स्वातंत्र्यलढ्यात या शहराला अनन्यसाधारण स्थान आहे. त्याविषयी अधिक माहिती पुढच्या भागात येईलच. पायाशी समुद्र आणी उशाशी पालामिडी किल्ला असलेलं नाफ्प्लिओ हे अथेन्सवासीयांचं सुट्ट्यांसाठी आवडतं ठिकाण. २२ डिसेंबरला फारशी गर्दी नव्हती, पण पुढच्या दोन दिवसात पर्यटक यायला लागले आणि मस्त उत्सवी वातावरण तयार झालं.

हॉटेल जुन्या शहराच्या मागच्या बाजूला उंचावर होतं. गाडी थोडी दूर पार्क करून सामान घेवून चालत गेलो. हॉटेल छोटंसं असलं तरी छान सजवलं होतं. गावात जाण्यासाठी रस्त्याने वळसा घेवून जाण्यापेक्षा समोरच पायर्‍या होत्या. खिडक्यांतून खाली पसरलेल्या जुन्या पद्धतीच्या इमारती, समुद्र आणि त्याच्या पलीकडे डोंगररांगा दिसत होत्या.

दुसर्‍या दिवशी सकाळी तयार होवून न्याहारीला गेल्यावर कळले, हॉटेलमध्ये जास्त पाहुणे नसल्याने आज बुफे नाही आणि आम्हाला हवी ती न्याहारी बनवून मिळेल. अंड्याचा पोळा, चीजटोस्ट आणि चक्क्यासारखं ग्रीक दही अशी मस्त पोटपूजा झाली.
.न्याहारीची जागा
फोटोतल्या काचेतून मध्यभागी दिसणारी वेनिशिअन्सच्या राज्यात १७१३ साली बांधलेली इमारत कालपासून खुणावत होती. त्या इमारतीत आता आर्गोलिस या भागात सापडलेल्या पुराणवस्तूंचे संग्रहालय आहे. तिकडे जाण्याआधी गावात थोडा फेरफटका मारला. सगळीकडे डोळ्यात भरेल अशी स्वच्छता. एकदोन मोठे रस्ते सोडले तर सगळे गल्लीबोळ किंवा पायर्‍या. त्या गल्ल्यांमध्येही गाड्या चालविणारे शूरवीर होते! अलीकडेच गावाचं नूतनीकरण झालं असावं. पण कुठेही जुन्या बांधकामाशी विसंगत असं काही नव्हतं.

नाफ्प्लिओचे पुराणवस्तूसंग्रहालय

संपूर्ण दगडी बांधकाम असलेली ही इमारत ग्रीसमधील वेनिशिअन स्थापत्याचं उत्तम उदाहरण आहे. सुरुवातीला शस्त्रागार म्हणून बांधलेली ही इमारत नंतर सैनिकांना राहायला, तसेच दुसर्‍या महायुद्धात जर्मन इंटरोगेशन सेंटर म्हणून वापरली गेली. नाफ्प्लिओचा मुख्य चौक असलेल्या सिंटाग्मा (राज्यघटना) चौकाची एक बाजू म्हणजे ही इमारत.

तिकिट काढून गेलो तर आतमध्ये जास्त कोणी पर्यटक नव्हते. दुमजली संग्रहालयात वेगवेगळ्या कालखंडांनुसार वस्तू आणि अवशेष मांडून ठेवले आहेत. सुमारे तीस हजार वर्षं जुन्या दगडी वेदिका (Paleolithic altars किंवा hearths) इथे बघता येतात.

आर्गोलिसच्या आग्नेय दिशेला समुद्रकिनारी असलेल्या फ्राग्थी (Fragthi किंवा Franchthi) नावाच्या गुहेत सापडलेले अवशेष हे या संग्रहालयाचे मुख्य आकर्षण आहे. सुमारे चाळीस हजार वर्षांपासून पाच हजार वर्षांपर्यंत म्हणजेच पॅलिओलिथिक, मेसोलिथिक ते निओलिथिक (नवपाषाण युग, पाषाण युगाचा शेवटचा काळ) काळापर्यंत या गुहेत मानवाने निवास केला होता. त्यामुळे मानवी विकासातील विविध टप्प्यांच्या (जसे hunter-gatherer ते शेतकरी) अभ्यासात या गुहेला विशेष महत्त्व आहे. पर्यटकांना या गुहेला भेट देता येत नाही; परंतु संग्रहालयात ही गुहा, ग्रीसच्या या भागातील मानवी अस्तित्व आणि विकास यांवर एक माहितीपूर्ण चित्रफित बघायला मिळाली.
 .
पहिल्या फोटोत ख्रिस्तपूर्व ६८०० ते ३२०० या काळातील बाणांची टोके, धारदार पाती, हाडांपासून बनविलेली हत्यारे, पाटावरवंटा दिसत आहेत. दुसर्‍या फोटोत ख्रिस्तपूर्व ५८०० ते ५३०० मधील एका नवजात बाळाचे अवशेष आहेत. गुहेत दफन करताना बरोबर छोटा संगमरवरी वाडगा आणि एक मातीचं भांडं ही दफन केलं होतं. इतर दफनांच्या ठिकाणीही हत्यारे, भांडीकुंडी मिळाली आहेत, त्यांवरून दफन केलेल्या व्यक्तीच्या पेशाबद्दल अंदाज बांधता येतो आणि त्याकाळच्या समाजजीवनाची ओळखही होते.
  १९५२-५३ साली मायसिनीला झालेले उत्खनन

पाषाणयुगानंतरच्या कांस्ययुगातील वेगेवेगळ्या दफनभूमीत सापडलेल्या काही वस्तू (ख्रिस्तपूर्व १९०० ते १६००) पुढच्या फोटोत दिसतात. यात एक सोन्याचा मुकुटही आहे. भांड्यांचे आकार, घडण, रंगसंगती वगैरेतील वैविध्य बघून थक्क व्हायला होत होतं. दाभण, चाकूसुरे, कुर्‍हाडीची व भाल्याची पाती, मासेमारीचे हूक अशी हत्यारं ते शिक्के, धातूचे वा काचेचे मणी, दागिने, हस्तिदंताच्या वस्तू असं बरंच काही मांडून ठेवलं होतं. चांगली प्रकाशयोजना आणि ग्रीकबरोबर इंग्रजीतही व्यवस्थित दिलेली माहिती यामुळे हे संग्रहालय आवडून गेलं.

मायसिनिअन संस्कृतीच्या वेगवेगळ्या केंद्रांमधील थडग्यामध्ये मिळालेल्या वस्तूंचे काही फोटो:
     कांस्य हत्यारे

वाईन आणि पाणी एकत्र करण्यासाठी मोठी सिरॅमिक भांडी वापरत असत. ख्रिस्तपूर्व तेराव्या ते अकराव्या शतकातील अश्या घड्यांचे तुकडे पाहायला मिळतात. या घड्यांवर रथारूढ योद्धे दाखविले आहेत.

इथल्या संग्रहातील सगळ्यात प्रसिद्ध गोष्ट म्हणजे ख्रिस्तपूर्व पंधराव्या शतकातील म्हणजे सुमारे साडेतीन हजार वर्षे जुने कांस्य चिलखत. एका मायसिनिअन कबरीत हे चिलखत आणि हातापायांसाठीच्या संरक्षक प्लेट्स सापडल्या. बरोबरच्या शिरस्त्राणात रानडुक्कराच्या सुळ्यांचे तुकडे बसविलेले आहेत.
 .
चिलखतापेक्षा बराच नवीन तरीही कारागिरीचा उत्तम नमुना असलेला हा खि.पू. पाचव्या शतकात बनविलेला काश्याचा आरसा:

खालील फोटोतला खि.पू. दुसर्‍या शतकातील शिलालेख हा एर्मिओनी (Hermione) आणि एपिडाउरोस (Epidaurus) या शहरांच्या सीमांविषयी आहे. या शहरांमधील सीमावाद सोडविण्यासाठी र्‍होड्स आणि मिलेटोस या ठिकाणांहून पंच बोलविण्यात आले. पंचांनी दिलेल्या निर्णयाचे शिलालेख एर्मिओनी आणि एपिडाउरोसला बसविण्यात आले, त्यातील एर्मिओनीचा हा शिलालेख आहे.
संग्रहालय पाहताना कर्नाटकाबरोबरचा सीमावाद आठवला होता. आत्ता लिहिताना कावेरीचं पाणीही जोडीला आहे!

एर्मिओनी त्याकाळी आणि अजूनही बंदरासाठी प्रसिद्ध आहे. तर एपिडाउरोस तिथल्या अस्क्लिपिअसच्या आश्रयस्थानासाठी. संग्रहालय पाहून ३० किलोमीटर अंतरावरील एपिडाउरोसकडे मोर्चा वळविला.

एपिडाउरोस
प्राचीन ग्रीकांचा सूर्यदेव अपोलोच्या अनेक मुलांपैकी एक अस्क्लिपिअसच्या (Asclepius) जन्माची गोष्ट अद्भुतरम्य आहे. त्याचा जन्म एपिडाउरोसला झाला, असे समजले जाते. अपोलो हा धन्वंतरी म्हणूनही ओळखला जातो आणि अस्क्लिपिअसकरवी तो लोकांवर उपचार करतो, असा समज प्रचलित होता. एपिडाउरोसपासून थोडं दूर अस्क्लिपिअन हे आश्रयस्थान किंवा उपचारकेंद्र (sanctuary) होते. ख्रिस्तपूर्व तिसर्‍या आणि चौथ्या शत़कात या ठिकाणाची भरभराट झाली. रुग्णांसाठी निवास, चिकित्सागृह, क्रीडांगण, नाट्यगृह अश्या अनेक सुविधा होत्या. तिथे शल्यकर्मही होत असत. क्रीडांगण आणि इतर अवशेषः

एपिडाउरोसच्या छोटेखानी संग्रहालयात अस्क्लिपिअसच्या कल्टबद्दल तसेच औषधोपचार, शल्यक्रिया, त्याकाळी वापरली जाणारी साधने याविषयी माहिती मिळते. का कुणास ठावुक, तिथे कॅमेरा वापरायला मात्र बंदी आहे.

अस्क्लिपिअनचा समावेश युनेस्को जागतिक वारसा स्थळांत असून इथलं नाट्यगृह (Theatre) हे ग्रीसमधील एक उत्तम स्थितीतील प्राचीन नाट्यगृह आहे. १४००० प्रेक्षकक्षमता असलेल्या नाट्यगृहाचं acoustics हे एक वैशिष्टय आहे. नाट्य आणि संगीताचा आरोग्यावर परिणाम होतो, असे मानले जात असे. नाट्यगृहात रुग्णांच्या संगीत आणि नाट्यस्पर्धाही होत असत.

अजूनही दरवर्षी उन्हाळ्यात इथे नाट्यमहोत्सव आयोजित केला जातो. या पायर्‍यांवर बसून प्राचीन नाटकांचे प्रयोग पाहताना प्रेक्षकांनाही मधल्या दोन हजार वर्षांचा नक्कीच विसर पडत असेल!

त्या भारलेल्या वातावरणातून वर्तमानात आल्यावर कुठेतरी शांत बसून राहावंसं वाटत होतं. मग नवीन एपिडाउरोसच्या समुद्रकिनारी गेलो.

  भावी दर्याचा राजा

(क्रमशः)

प्रतिक्रिया

चित्रगुप्त's picture

12 Sep 2016 - 5:41 am | चित्रगुप्त

जबरदस्त. आता आधीचे भाग वाचतो.

जबरदस्त आहे ही प्राचीन ग्रीक संस्कृती.
छायाचित्रेसुद्धा सुरेख.

इथे पुण्यात डेक्कन कॉलेजच्या पुरातत्व संग्रहालयातील विथिकांमध्ये अश्मयुग, ताम्रपाषाणीयुग, लोहयुगातील अवशेष पाहिले होते त्याची आठवण झाली.

निशाचर's picture

13 Sep 2016 - 3:24 am | निशाचर

मायसिनिअन शिवाय मिनोअन सारख्या आणखी प्राचीन ग्रीक संस्कृतींचे अवशेष अथेन्सला बघता आले. त्याबद्दलही लिहायचं आहे.

डेक्कन कॉलेजच्या संग्रहालयाचं वेबपेज बघितलंय. गेल्या एकदोन वर्षांतच कॉलेजच्या पुरातत्व विभागाच्या कामाबद्दल कळलं. अश्या कामाला अजून exposure मिळायला हवं, असं वाटतं.

पिलीयन रायडर's picture

12 Sep 2016 - 8:25 am | पिलीयन रायडर

फारच सुंदर आहे हा भाग! ह्या लेखांमुळे जायलाच हवे अशा देशांच्या लिस्ट्मध्ये ग्रीस आलेले आहे!

पुभाप्र!

वस्तुसंग्रहालय छानच दिसतेय.मौल्यवान वस्तु व्यवस्थित जतन केल्यात.फोटो आणि माहिती आवडली.

वस्तुसंग्रहालय छानच दिसतेय.मौल्यवान वस्तु व्यवस्थित जतन केल्यात.फोटो आणि माहिती आवडली.

वस्तुसंग्रहालय छानच दिसतेय.मौल्यवान वस्तु व्यवस्थित जतन केल्यात.फोटो आणि माहिती आवडली.

पद्मावति's picture

12 Sep 2016 - 11:59 am | पद्मावति

हाही भाग अतिशय छान झाला आहे. खूप आवडला. पुढील भाग लवकर टाका प्लीज़.

छान माहितीपूर्ण भाग आजचाही.पुभाप्र.

डॉ सुहास म्हात्रे's picture

12 Sep 2016 - 2:30 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर ! मस्तं चालली आहे सफर !

प्रतिसादांसाठी सगळ्यांचे आभार! तसेच काही सूचना असल्यास स्वागत आहे.

@पद्मावति, तुमची सूचना लक्षात ठेवली आहेच :)