सफर ग्रीसची: भाग ३ - अगामेम्नॉनच्या राज्यात

निशाचर's picture
निशाचर in भटकंती
25 Jun 2016 - 4:53 pm

भाग १ - प्रस्तावना आणि केप सूनिअन
भाग २ - प्राचीन कोरिंथ

कोरिंथचे वस्तूसंग्रहालय
कोरिंथच्या अवशेषांजवळ तिथे झालेल्या उत्खननांमधून मिळालेल्या वस्तू, पुतळे, मातीची भांडी वगैरेंचं एक छोटेखानी संग्रहालय आहे. तिथल्या दालनांमधे ग्रीक संस्कृतीतील वेगवेगळ्या कालखंडांप्रमाणे वस्तू मांडून ठेवल्या आहेत. या संग्रहालयाचे काही फोटो:

 संग्रहालयाच्या आवारात
 थिएटरच्या इमारतीवर कोरलेली ग्रीक्स आणि अ‍ॅमेझॉन्सची लढाई
 अठराशे वर्षे जुन्या दगडी शवपेटीवर (Sarcophagus) कोरलेला 'Seven Against Thebes' या नाटकातील सात सरदार लढाईसाठी निघतात तो प्रसंग
 ग्रीक गोपाळ
 आणखी एक सुंदर मोझाइक; मध्यभागी डायोनिअस हा द्राक्ष, वाइनची निर्मिती, नाट्यकला इत्यादींचा देव
 हे अठराशे वर्षे जुनं मोझाइक एका घराच्या भोजनगृहातील जमिनीवर होतं. खालच्या फोटोत त्या घराचा आराखडा आणि मोझाइकविषयी माहिती आहे. ५x९ मीटर आकाराच्या या मोझाइकच्या मध्यभागी तीन चौकोनांत फळंफुलं, पक्षी आणि बाजूने वेली व जंगली प्राणी अशी नक्षी होती. कडेने असलेल्या वेलबुट्टीवर भोजनासाठी आसने असत.
 .
शेवटच्या फोटोतील मातीचा घडा चौतीसशे वर्षे जुना (खि.पू. १४०० ते १३०० वर्षे) आहे! ग्रीक इतिहासाच्या ज्या कालखंडात हा घडा बनविला गेला, त्याला मायसिनिअन संस्कृती (Mycenaean civilization) म्हणतात. ज्या राज्यावरून हे नाव पडलं, ते मायसिनी (Mycenae, ग्रीक मिकेने) बघण्याची उत्सुकता होती. मग कोरिंथहून ५० किमीवर असलेल्या मायसिनीकडे मोर्चा वळविला.

अगामेम्नॉनच्या राज्यात (मायसिनी)

इलियड या होमरच्या काव्यातील अगामेम्नॉनचा उल्लेख मागच्या लेखात आला होता. या अगामेम्नॉननं राज्य केलं ते मायसिनी हे पुरातन स्थळ पर्यटकांच्या रडारवर फारसं नसलं तरी त्याला ग्रीसच्या आणि जगाच्याही संस्कृतींच्या (civilization याअर्थी) अभ्यासात महत्त्वाचं स्थान आहे. कांस्य युगाच्या शेवटच्या टप्पात (खि. पू. १६०० ते ११०० वर्षे) ग्रीसमध्ये मायसिनीअन संस्कृती होती. या काळात ग्रीसमध्ये नागरीकरण झालं.

 मायसिनी किल्ल्याच्या अवशेषांचा आराखडा
मायसिनी हे या संस्कृतीचं मुख्य केंद्र होतं, त्याशिवाय टिरिन्स (Tiryns), पायलोस (Pylos), थिब्स (Thebes), आर्गोस (Argos), स्पार्टा (Sparta) अशी अनेक palace states होती. एजिअन समुद्रातील बेटं, मॅसेडोनिआ याठिकाणीही ही संस्कृती होती.
 सिंहद्वार (Lion Gate): ख्रिस्तपूर्व १२५० दरम्यान घडविलेला किल्ल्याचा मुख्य दरवाजा

या काळात स्थापत्य, कला, धातूकाम अश्या अनेक अंगांनी विकास झाला. कांस्य युगातील इतर भूमध्यसागरीय ठिकाणांबरोबर व्यापार सुरू झाला. ग्रीक भाषेची सगळ्यात जुनी लिपीसुद्धा या काळातील. भरभराटीबरोबरच आर्थि़क व धार्मिक व्यवस्था आणि एकसंधता आली. शस्त्र व युद्धकला यांना खूप महत्त्व होतं. भक्कम तटबंदी असलेले कोटकिल्ले आणि कोटाच्या आत राजाचा प्रासाद आणि इतर इमारती असत.

 किल्ल्यातील भग्नावशेष

या संस्कृतीचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे राजघराण्यातील लोकांची दफनभूमी. दफनाच्या ठिकाणी सोन्याचांदीचे दागिने, मुखवटे आणि इतर मौल्यवान वस्तू मिळाल्या आहेत. त्यावरून मायसिनीची संपन्नता तसेच ग्रीसबाहेरील जगाशी असलेले व्यापारी संबंध दिसून येतात.
 मायसिनी येथील २७मी. व्यासाची एक वर्तुळाकार दफनभूमी (Grave Circle), खि.पू. सोळावे शतक

या प्रकारच्या Grave Circle शिवाय थोलोस प्रकाराच्या थडग्यांसाठी (Tholos Tomb) मायसिनी प्रसिद्ध आहे. त्यातील विशेष महत्त्वाचं थडगं म्हणजे ख्रिस्तपूर्व १३५० ते १२५० या काळातील एट्रिअसचा खजिना (Treasury of Atreus). अगामेम्नॉनच्या पित्याचं, एट्रिअसचं नाव या जागेला मिळालं असलं तरी हे एट्रिअसचं थडगं असण्याचा काहीही पुरावा नाही.

 थोलोसची ३५ मी. लांब आणि ६ मी. रुंद मार्गिका (dromos) आपल्याला ५.५ मी. उंच दरवाज्याशी आणून सोडते.
 दरवाज्याचा दर्शनी भाग एकेकाळी असा असावा.
थोलोसच्या मुख्य दालनाची उंची १३ मी. आणि व्यास १४.५ मी. आहे. दगडांच्या ३३ समकेंद्रीय वर्तुळांनी हे दालन बनविलेलं आहे. या वर्तुळांची त्रिज्या छताकडे कमीकमी होते. एट्रिअसच्या खजिन्याची भव्यता, त्याकाळातील स्थापत्यशास्त्रातील प्रगती यांनी आपण स्तिमित होवून जातो.

 मुख्य दालनाचे छत
 अंतर्भागाचा आराखडा
 सगळ्यात आतील दफनाची जागा

मायसिनीत उत्खननातून मिळालेल्या बर्‍याच गोष्टी अथेन्सच्या National Archaeological Museum मध्ये आहेत. परंतु मायसिनीतही एक लहान म्युझिअम आहे. तिथे आपल्याला मायसिनीअन काळाबद्दल अधिक माहिती मिळते.

 मायसिनीअन कलेचा उत्तम नमुना असलेलं भित्तीचित्र (Fresco)

खि.पू. १३०० ते १२५० मधील पाटावरवंटा आणि भांडी
 थडग्यांमधे मिळालेले मुखवटे, दागिने, शस्त्रे
 .

अगामेम्नॉनच्या राज्यावरील लेखाचा शेवट करू या अथेन्सच्या National Archaeological Museum मधील अगामेम्नॉनच्या मुखवट्याने (Mask of Agamemnon). वर दाखविलेल्या Grave Circle मध्ये हा मुखवटा मिळाला. सुरुवातीला अगामेम्नॉनचा मुखवटा म्हणून प्रसिद्ध झालेला हा मुखवटा अगामेम्नॉनच्या काळापेक्षाही जुना आहे, हे नंतरच्या संशोधनातून लक्षात आले.

(क्रमशः)

प्रतिक्रिया

म्हणजे तो मुखवटा अगामेम्नोनचा नाहि?आत्तापर्यंत तेच वाचलेले आहे.रोचक माहिति.वस्तुसंग्रहालयाचे फोटो छान.
पुभाप्र.

निशाचर's picture

25 Jun 2016 - 9:55 pm | निशाचर

ट्रॉयच्या शोधासाठी प्रसिद्ध असलेल्या हाइनरिश श्लीमानने ट्रॉयनंतर २ वर्षांनी १८७६ मध्ये मायसिनीत उत्खनन केले. त्यावेळी (फोटोत दाखविलेल्या) Grave Circle मध्ये मिळालेल्या ५ मुखवट्यांपैकी हा एक मुखवटा आहे. बहुधा श्लीमान आणि ट्रॉयच्या प्रसिद्धीमुळे या मुखवट्याचा संबंध अगामेम्नॉनशी जोडला गेला असावा. स्वतः श्लीमानने असे म्हटल्याचा लिखित पुरावा नाही. नवीन संशोधनानुसार हा मुखवटा खिस्तपूर्व १५८० ते १५५० या काळातील, म्हणजेच अगामेम्नॉनच्या कालखंडापेक्षा सुमारे ३०० वर्षे जुना असावा.

प्रतिक्रियेसाठी धन्यवाद!

निशाचर's picture

25 Jun 2016 - 10:01 pm | निशाचर

अर्थात Misnomer असलं तरी Mask of Agamemnon हेच नाव प्रसिद्ध आहे!

पद्मावति's picture

25 Jun 2016 - 5:53 pm | पद्मावति

मस्तं!

पक्षी's picture

25 Jun 2016 - 8:02 pm | पक्षी

मस्त

प्रचेतस's picture

26 Jun 2016 - 9:25 pm | प्रचेतस

जबराट झालाय भाग हां.
ब्याट्याच्या ट्रॉयची आठवण आली.

निशाचर's picture

27 Jun 2016 - 2:58 am | निशाचर

तुमच्या प्रतिसादामुळे ट्रोजन युद्धावरील लेखांची मालिका शोधून काढली.

यशोधरा's picture

27 Jun 2016 - 6:17 am | यशोधरा

हा भाग आवडला.

चौकटराजा's picture

27 Jun 2016 - 7:16 am | चौकटराजा

सर्व दगडू फोटो मस्त आलेयत . लायन गेट च्या फोटोत आपण माचू पिचू पहातो आहोत असे वाटते. त्याकाळी सुद्धा भूमिती चे ज्ञान अफाट होते हे या अचाट बांधकामावरून कळते
आपला- दगडी बांधकाम प्रेमी चौ रा.

लायन गेट सारखे माचू पिक्चू तील दारांचे काही फोटो जालावर बघितले आहेत. अर्थात लायन गेट किंवा Treasury of Atreus चं बांधकाम ख्रिस्तपूर्व १३५० ते १२५० या काळात झालं. तुलनेने माचू पिक्चू (इ.स. १४५०) किमान दोन हजार सातशे वर्षे नवीन आहे!
Treasury of Atreus चा vault बनविण्यासाठी वापरलेलं Corbelling पाहून कळतं की मायसिनिअन भूमिती आणि स्थापत्य खूप प्रगत असणार.

डॉ सुहास म्हात्रे's picture

28 Jun 2016 - 4:06 am | डॉ सुहास म्हात्रे

फारच सुंदर झाला आहे हा भाग ! फोटो अप्रतिम आहेत.

असे प्राचीन स्थापत्य पाहिले की...

दिवसेदिवस विकसित होणार्‍या नवनवीन शोधपद्धती आणि संशोधनातील खुलेपणा (पूर्वी 'अंदाज, वैयक्तीक ग्रह आणि हितसंबंध' यांच्या आधारावर लिहिला गेलेल्या) मानवाच्या इतिहासात बरेच बदल करतील असेच वाटते ! :)

सुधीर कांदळकर's picture

2 Jul 2016 - 7:40 am | सुधीर कांदळकर

फारच आवडला हा भाग.

प्रीत-मोहर's picture

3 Jun 2017 - 1:12 pm | प्रीत-मोहर

सुंदर झालाय हा भाग"!