भाग १ - प्रस्तावना आणि केप सूनिअन
भाग २ - प्राचीन कोरिंथ
भाग ३ - अगामेम्नॉनच्या राज्यात
भाग ४ - नाफ्प्लिओचे पुराणवस्तूसंग्रहालय आणि एपिडाउरोस
ग्रीसच्या आर्गोलिस भागात इतके किल्ल्यांचे अवशेष दिसतात कि आपल्या सह्याद्रीची आणि गडकिल्ल्यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. खरंतर नाफ्प्लिओच्या आसपास पर्वत असे नाहीतच, फक्त विखुरलेल्या टेकड्या, काही डोंगररांगा आणि छोटी बेटं. पण त्यांवर कुठे छोट्या गढ्या तर कुठे अवाढव्य किल्ले. त्यातील पालामिडी या महत्त्वाच्या किल्ल्याला भेट द्यायचा २४ डिसेंबरचा कार्यक्रम होता. या एककलमी कार्यक्रमाचं कारण होतं क्रिसमस ईव्हची अर्ध्या दिवसाची सुट्टी. बाकीचा दिवस मोकळा ठेवला होता.
बुर्ट्झीला बेटावर जाताना दिसणारं नाफ्प्लिओ शहर आणि पालामिडी किल्ला
थोडं नाफ्प्लिओ शहराविषयी
ग्रीक देव पोसायडनचा मुलगा नाफ्प्लिओसचं नाव दिलेलं नाउप्लिआ प्राचीन काळीही अस्तित्वात होतं. पण ख्रिस्तपूर्व सातव्या शतकात एका युद्धाच्या वेळी आर्गोलिस राज्याऐवजी स्पार्टाची बाजू घेतल्यामुळे आर्गोलिसच्या राजाने नाउप्लिआचा विध्वंस केला. त्यामुळे अक्रोनाउप्लिआ या गढीची थोडी तटबंदी वगळता प्राचीन नाउप्लिआच्या खाणाखुणा दिसत नाहीत. नंतरच्या काळात बायझंटाईन, फ्रँक्स, तुर्की, वेनिशिअन अश्या अनेक सत्तांनी इथे राज्य केलं. व्यापार आणि आयातनिर्यातीमुळे या शहराला महत्त्व होतं. पंधराव्या शतकाच्या उत्तरार्धात वेनिशिअन्सनी नवीन तटबंदी, बंदराची डागडुजी, बंदराहून जवळच असलेल्या बेटावर बुर्ट्झी (Bourtzi) ही गढी अशी बांधकामे केली. त्यानंतर एका तहाअन्वये नाफ्प्लिओ पुन्हा एकदा तुर्कांच्या हाती गेले. सुमारे शंभर वर्षांनी वेनिशिअन्स, जर्मन्स आणि पोलिश सैन्यांनी मिळून नाफ्प्लिओवर विजय मिळवला. यावेळी वेनिशिअन्सची सत्ता तीस वर्षं टिकली. याच कालावधीत पालामिडी किल्ला बांधण्यात आला.
किल्ल्यावरून दिसणारा शहराचा काही भाग
किल्ल्यावरून दिसणारं अक्रोनाउप्लिआ आणि समुद्रातील छोटंसं बुर्ट्झी बेट
सोळाव्या शतकापासूनच ग्रीसचा बराचसा भाग ऑटोमान तुर्कांच्या आधिपत्याखाली होता. तेव्हापासून तुर्की राजवटीविरोधी उठावाचे काही प्रयत्न झाले होते. परंतु ग्रीसच्या स्वातंत्र्ययुद्धाची सुरुवात १८२१ मध्ये पेलोपोनिझं प्रांतातील उठावाने झाली. हळूहळू हे लोण बाकी ग्रीसमध्ये पसरले. नोव्हेंबर १८२२ मध्ये एका वर्षाच्या वेढ्यानंतर ग्रीकांनी नाफ्प्लिओ शहर आणि पालामिडी किल्ला जिंकला. या विजयानंतर नाफ्प्लिओला ग्रीसची अस्थायी राजधानी बनविण्यात आले आणि ते ग्रीक स्वातंत्र्यसंग्राम आणि राष्ट्रनिर्माणाच्या केंद्रभागी राहिले. इ.स. १८२९ मध्ये नाफ्प्लिओ स्वतंत्र ग्रीसची अधिकृत राजधानी झाले. १८३४ साली राजधानी अथेन्सला हलविण्यात आली.
पालामिडीवर फडकणारा ग्रीसचा झेंडा
पालामिडी किल्ला
ट्रोजन युद्धातील एक योद्धा पालामिडीसवरून नाफ्प्लिओ जवळच्या एका टेकडीला पालामिडी हे नाव पडलं होतं. या टेकडीवर वेनिशिअन्सनी इसवीसन १७११ ते १७१४ दरम्यान किल्ला बांधला. आठ बुरूज आणि त्यांना जोडणारी तटबंदी असा किल्ल्याचा आराखडा होता. किल्ल्याचं काम पूर्ण होत आलं आणि पुन्हा नाफ्प्लिओ तुर्कांच्या हाती गेलं. पालामिडीच्या उरलेल्या दोन बुरुजांचं बांधकाम तुर्कांनी पूर्ण केलं. या बुरुजांना वेनिशिअन्सनी दिलेली नावे तुर्कांनी बदलली. ग्रीस स्वतंत्र झाल्यावर बुरुजांची तुर्की नावे बदलून अकिलीस, लिओनिडस, मिल्टायडीस, थेमिस्टक्लीस अशी प्राचीन ग्रीक हिरोंची नावे देण्यात आली.
किल्ल्याचं प्रवेशद्वार
किल्ल्याच्या बुरुजांचे आणि अंतर्भागाचे फोटो:
.
.
जाताजाता नाफ्प्लिओतून रात्री दिसणारं पालामिडीचं हे रूपः
(क्रमशः)
प्रतिक्रिया
4 Nov 2016 - 9:42 am | एस
नेत्रसुखद. आपल्याकडील भव्य वारश्यांची हेळसांड आठवून वाईट वाटलं.
5 Nov 2016 - 6:37 am | निशाचर
हम्म, वाईट तर वाटतंच.
वर लिहिलंय तसं, ग्रीसच्या या भागात खूप अवशेष आहेत. त्यातील काही आपल्याकडच्या बर्याच गडकिल्ल्यांच्या कालखंडातील आहेत; म्हणजे सतराव्या, अठराव्या शतकातील बांधकामे किंवा डागडुजी वगैरे. एकोणिसाव्या शतकात दोन्हीकडे किल्ले आणि आसपासच्या भूभागासाठी लढायाही झाल्या. त्यामुळे तुलना होणे साहजिक आहे.
खरंतर या काळातील आपल्याकडची बांधकामे अनेक बाबतीत उजवी वाटतात. पण त्यांची निगा राखण्यात आपण खूप मागे पडतो, हे युरोपात सतत जाणवत राहतं.
4 Nov 2016 - 12:40 pm | पद्मावति
देर आये पर दुरुस्त आये!
मस्तं. फार सुरेख लेखमालीका. लवकर लवकर लिहीत जा प्लीज़.
4 Nov 2016 - 1:06 pm | यशोधरा
मस्तच फोटो!
4 Nov 2016 - 1:21 pm | पाटीलभाऊ
मस्त सफर सुरु आहे.
सुंदर फोटो
4 Nov 2016 - 8:49 pm | डॉ सुहास म्हात्रे
मस्तं फोटो आणि वर्णन !
5 Nov 2016 - 8:59 pm | अजया
मस्त वर्णन.कधी ऐकला नव्हता हा ग्रीसचा भाग.
7 Nov 2016 - 5:05 am | निशाचर
खरं तर मलाही ट्रिपआधी विशेष माहिती नव्हती. नाफ्प्लिओला अथेन्सहून छोट्या ब्रेकसाठी वगैरे ग्रीक पर्यटक जास्त येतात. विदेशी पर्यटक गेलेच तर अथेन्सहून कोरिंथ, मायसिनी, नाफ्प्लिओ व एपिदाउरोस अशी एक दिवसाची भोज्जा सहल करतात.
पण काही दिवस राहून पाहण्यासारखं या भागात खूप आहे, फक्त स्वतःचं वाहन हवं.
7 Nov 2016 - 4:56 am | निशाचर
एस, पद्मावति, यशोधरा, पाटीलभाऊ, डॉ म्हात्रे, आणि अजया, प्रतिसादासाठी धन्यवाद!