सफर ग्रीसची: भाग २ - प्राचीन कोरिंथ

निशाचर's picture
निशाचर in भटकंती
14 Jun 2016 - 4:57 am

भाग १ - प्रस्तावना आणि केप सूनिअन

केप सूनिअनचा सूर्यास्त मनात साठवून पहिल्या दिवशी मुक्कामासाठी कोरिंथला आलो. हे खरं तर नवं कोरिंथ. साधारण साडेआठ हजार वर्षांपूर्वीपासून मानवी वस्ती असलेलं प्राचीन कोरिंथ (ग्रीकमध्ये Archaia Korinthos) १८५८ साली भूकंपामुळे उध्वस्त झाल्यावर जुन्या शहरापासून दूर नवं कोरिंथ वसविण्यात आलं.

नव्या कोरिंथमध्ये एका न्याहारी आणि निवासात राहिलो. तिथल्या मालकिणबाईंशी थोड्या गप्पा झाल्या. त्यांच्यामते अथेन्स खूप गर्दी असलेलं, अस्ताव्यस्त आणि कुरूप (ugly) शहर आहे! तिथे दोन दिवसांपेक्षा जास्त राहू नये!! अथेन्सहून अधिक वेळ आम्ही त्यांच्या भागात फिरणार आहोत, हे कळल्यावर त्यांचं थोडं समाधान झालं. मग त्यांनी आम्ही जाणार असलेल्या भागाचा नकाशा आणि काही पत्रकंही दिली. बहुधा त्या खुंटा हलवून बघत असाव्यात कि आम्हाला खरोखर त्या जागांबद्दल माहिती आहे कि नाही.

पेलोपोनिझं प्रांताच्या सफरीची सुरुवात कोरिंथपासून होणार होती. हा भूभाग म्हणजे भौगोलिकदृष्ट्या एक प्रचंड मोठं द्वीपकल्प आहे. ख्रिस्तपूर्व सुमारे १,००,००० वर्षांपासून मानवाने या भागात वास्तव्य केलेलं आहे. पेलोपोनिझं प्रांताचं प्राचीन तसेच आधुनिक ग्रीसच्या इतिहासात स्थान खूप महत्त्वाचं. पंधराव्या शतकाच्या मध्यापासून ग्रीस हा ऑटोमन साम्राज्याचा भाग होता. जवळजवळ चारशे वर्षांची ही गुलामी संपविणारं ग्रीसचं स्वातंत्र्ययुद्ध १८२१ साली पेलोपोनिझं प्रांतात सुरू झालं; बरीचशी लढाईही इथेच लढली गेली. १८२७ मध्ये स्वतंत्र होणारा पेलोपोनिझं हा ग्रीसचा पहिला भाग. १८२८ ते १८३४ या काळात इथलं नाफ्प्लिओ हे शहर स्वतंत्र ग्रीसची पहिली राजधानी होतं.

इलियड या होमरच्या जगप्रसिद्ध महाकाव्यातील एक मुख्य पात्र म्हणजे मिकेने किंवा मायसिनिचा (Mycenae) राजा अगामेम्नॉन (Agamemnon). अगामेम्नॉनचे आजोबा पेलोप्सचे (Pelops) बेट ते पेलोपोनिझं! इलियडमध्ये उल्लेख असलेली मिकेने, स्पार्टा, आर्गोस इत्यादी प्राचीन ग्रीक राज्ये पेलोपोनिझं भूभागात होती. त्यातील मायसिनिअन संस्कृतीविषयी पुढच्या भागात अधिक माहिती येईल. ऑलिंपिक खेळ सुरू झाले ते ऑलिंपियाही या प्रांतात येतं.

अक्रोकोरिंथ किल्ल्यावर
 अक्रोकोरिंथचा पहिला दरवाजा

अक्रोपोलिस म्हटलं की आपल्याला आठवतं ते अथेन्सचं अक्रोपोलिस. परंतु अक्रोपोलिस शब्दाचा अर्थ होतो एखाद्या टेकडीसारख्या उंच जागी असलेली गढी किंवा कोट. प्राचीन कोरिंथला पायथ्याशी घेऊन असलेलं कोरिंथचं अक्रोपोलिस, म्हणजेच अक्रोकोरिंथ (ग्रीक Akrokorinthos), ५७५ मीटर उंच डोंगरावर आहे. याठिकाणी ख्रिस्तपूर्व सातव्या शतकातही छोटा कोट होता. तेव्हापासून अनेक शत्रूंनी किल्ल्यावर स्वार्‍या केल्या, किल्ला जिंकून नवीन बांधकामे केली. बायझंटाइन, तुर्की, वेनिशिअन अंमलाच्या खुणा इथे दिसतात.

सुपीक जमिनीबरोबरच सागरी आणि खुष्कीचे मार्ग कोरिंथवरून जात असल्यामुळे कोरिंथला महत्त्व मिळालं. दरवाज्यातून आत गेल्यावर तटावरून दिसणारा दूरवरचा परिसर बघून पटतं की संरक्षणाच्या दृष्टीने किल्ल्याची जागा किती योग्य आहे.

सकाळी न्याहारीच्या वेळी निवासाच्या मालकिणबाईंशी पुन्हा बोलणं झालं होतं. अक्रोकोरिंथला जातोय कळल्यावर आम्ही पायात कसले बूट घातले आहेत हे त्यांनी स्वतः जातीने पाहून खात्री केली होती. त्याचं कारण आता कळत होतं. शेकडो वर्षांच्या वर्दळीने घासून गुळगुळित झालेल्या दगडांवरून ट्रेकिंगचे शूज असूनही पाय घसरत होते!

 मागे वळून पाहिल्यावर

किल्ल्याच्या एकात एक अश्या तीन तटबंद्या आहेत. दुसर्‍या दरवाज्यातून आत गेल्यावर कोरिंथचं आखात आणि दूर डोंगररांगा दिसत होत्या.

 इथे उभं राहून कुण्या ग्रीक युवतीने पर्शियाशी लढायला गेलेल्या तिच्या प्रियकराची वाट पाहिली असेल...

एक जुनंपुराणं चर्च दिसलं. किल्ल्यावर कोणी राहत नाही. पण चर्चमध्ये नियमित प्रार्थना होत असावी. आतमधली रचना अगदी साधी होती. भिंतींवर संतांच्या तसबिरी मात्र खूप होत्या.

किल्ल्याच्या वरच्या भागात चॅपेल, तुर्कांनी बांधलेल्या मशिदी, अफ्रोडाइट देवीचं देऊळ अश्या अनेक इमारतींचे भग्नावशेष विखुरलेले आहेत. पण कुठेही दिशादर्शक नव्हते; कुणाला विचारायची सोय नव्हती. मग ६० एकर पसरलेल्या किल्ल्यावर भटकत न बसता प्राचीन कोरिंथकडे मोर्चा वळवला.

 विस्तीर्ण पसरलेला अक्रोकोरिंथ

प्राचीन कोरिंथचे अवशेष

 अक्रोकोरिंथच्या पार्श्वभूमीवर अपोलोचं देऊळ

 ख्रिस्तपूर्व सहाव्या शतकात बांधलेलं डोरिक पद्धतीचं अपोलोचं देऊळ

कोरिंथमध्ये झालेल्या उत्खननानुसार इथे किमान साडेआठ हजार वर्षांपासून मानवी वस्ती आहे. परंतु ख्रिस्तपूर्व आठव्या शतकात भरभराटीला सुरुवात झाली. अडिच हजार वर्षांपूर्वी कोरिंथ हे ग्रीसमधील एक मोठं आणि अथेन्सपेक्षाही महत्त्वाचं राज्य होतं. तेव्हा येथे खेळांसाठी बांधण्यात आलेल्या मुख्य थिएटरमध्ये १५,००० प्रेक्षक बसू शकत. आता एके काळच्या वैभवाची साक्ष द्यायला फक्त काही अवशेष उरले आहेत.

 दोन हजार वर्षांपूर्वीची काव्य आणि संगीताच्या स्पर्धांची जागा (Roman Odeum). आसनक्षमता ३,०००!

 एका संगमरवरी रस्त्याचे भग्नावशेष. खालील रेखाटनात या रस्त्याचे मूळ स्वरूप कसे असेल, हे कळते.

प्राचीन कोरिंथची बर्‍यापैकी टिकून असलेली एक वास्तू म्हणजे पिरेनं (Peirene fountain) हा पाण्याचा स्रोत. ग्रीसच्या भूमितीय कालखंडात (Geometric Period, ख्रिस्तपूर्व नववे ते सातवे शतक) किंवा त्याआधी इथे पाण्याच्या साठवणीची आणि नियोजनाची सुरुवात झाली असावी. ख्रिस्तपूर्व दुसर्‍या शतकात जवळच्या झर्‍यांचं पाणी चार तळ्यांत साठवत असत. पाणी भरण्यासाठी तीन खोल हौद आणि आजूबाजूला सहा दालने होती. रोमन काळात येथे मोठी आवारं, कोलोनेड असलेलं दुमजली बांधकाम करण्यात आलं. सध्या दिसणारे अवशेष रोमन आणि त्यानंतरच्या बायझंटाइन काळातील आहेत.

 .

पोसायडनची प्रेयसी पिरेनंचं नाव असलेल्या या वास्तूसह आम्ही प्राचीन कोरिंथचाही निरोप घेतला.
पुढिल भागात कोरिंथचं वस्तुसंग्रहालय आणि मायसिनी.

(क्रमशः)

प्रतिक्रिया

छान माहिती आणि फोटो.पुभाप्र

पद्मावति's picture

14 Jun 2016 - 12:56 pm | पद्मावति

मस्तं!!
वाचत राहणार. पु.भा.प्र.

एस's picture

14 Jun 2016 - 2:23 pm | एस

छान सफर. पुभाप्र.

वेल्लाभट's picture

14 Jun 2016 - 3:23 pm | वेल्लाभट

ऐशपथ ! लयच भारी .... लयच.... मागे पर्यटन विशेषांकातही ग्रीस बद्दल वाचून वेडा झालेलो...आता पुन्हा व्हायचं.

निशाचर's picture

15 Jun 2016 - 1:46 am | निशाचर

तुमची प्रतिक्रिया पण लय भारी!

चौकटराजा's picture

14 Jun 2016 - 4:59 pm | चौकटराजा

सर्व फोटो व वृतांत उत्तम !
दगडी बांधकामाचा शौकिन- चौरा

निशाचर's picture

15 Jun 2016 - 1:51 am | निशाचर

हजारो वर्षांचा ज्ञात इतिहास असलेल्या दगडांचाही हेवा वाटतो.

निशाचर's picture

15 Jun 2016 - 1:56 am | निशाचर

सगळ्यांचे आभार! दुसरा भाग टाकायला काही कारणाने वेळ लागला. पुढचे भाग अधिक नियमितपणे टाकायचा प्रयत्न असेल.

यशोधरा's picture

15 Jun 2016 - 2:16 am | यशोधरा

दोनही भाग आवडले.

हा भागही आवडला. फोटो अप्रतिम.

सुधीर कांदळकर's picture

18 Jun 2016 - 8:59 am | सुधीर कांदळकर

तेव्हा या सुंदर सफरीत सामील होतो आहे.

धन्यवाद.

महामाया's picture

7 Jul 2016 - 2:29 am | महामाया

चांगली माहिती मिळाली...

डोळयांचं पारणं फिटलं...

प्रीत-मोहर's picture

2 Jun 2017 - 9:02 pm | प्रीत-मोहर

__/\__

प्रतिसादांसाठी पुनश्च आभार!
फोटो जागेवर आणून लेख पुन्हा प्रकाशित केला आहे.
गेल्या वर्षी अक्रोकोरिंथजवळून महामार्गावरून जात असताना हलकं बर्फ पडत होतं. तेव्हा काढलेला अक्रोकोरिंथचा फोटो यानिमित्ताने टाकत आहे.